शनिवार, ऑगस्ट 2, 2025
Home Blog Page 62

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे – मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

पंढरपूर, दि. ६- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले.

आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी श्री कैलास दामु उगले, सौ. कल्पना कैलास उगले यांच्या समवेत केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री महोदय यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सौ. अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह समितीचे सर्व सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, वारीची परंपरा सातत्याने वाढत आहे आणि यावर्षी तर वारीने एक नवीन विक्रम केलेला आहे.  इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी या वारीमध्ये चालत पांडुरंगाच्या दर्शनाकरीता या ठिकाणी आले. ज्या दिंड्या आहेत त्या सोबत तर वारकरी आलेच परंतु पायी चालत ही मोठ्या प्रमाणात वारकरी आले. विशेषत: या वारकऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. शासन व प्रशासनाने वारकऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत. पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वात प्रशासनाने चांगले जर्मन हँगर तयार केल्याने वारकऱ्यांसाठी चांगली व्यवस्था झाली, असे त्यांनी सांगितले.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाची पूजा करायला मिळणे हा सर्वांच्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे. दिंड्या सोबत अनेक वारकरी स्वयंप्रेरणेने पायी चालत आले. वारीत प्रत्येक व्यक्ती इतरांमध्ये पांडुरंग पाहतो, ही प्रथा जगाच्या पाठीवर कुठेही नाही. वारीत हरीनाम गजर करतांना नवी ऊर्जा मिळते. वारीने खऱ्या अर्थाने  भागवत धर्माची पताका उंचावत ठेवली आहे. ही आपली संस्कृती अलौकिक आहे असे सांगून मानाच्या वारकऱ्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळत राहो, अशी सदिच्छा श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.

निर्मल वारीच्या माध्यमातून अतिशय चांगला आवश्यक व्यवस्था उपलब्ध केल्याने कुठेही अस्वच्छता पाहायला मिळाली नाही आणि निर्मल वारी सोबत हरित, पर्यावरण पूरक वारीदेखील झाली. खऱ्या अर्थाने आपल्या संतांनी जो स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे तो या वारीमध्ये  प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला.  राज्याच्या गतीमध्ये अध्यात्मिक प्रगती महत्त्वाची असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्र्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे सर्वसामान्य भाविकांचा श्री विठ्ठल दर्शनाचा कालावधी पाच तासाने कमी झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रारंभी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रस्तावित केले. यामध्ये यावर्षीच्या आषाढी वारीमध्ये शासन व जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांसाठी खूप चांगल्या सुविधा दिल्यामुळे वारकरी वर्ग समाधानी असून वारकऱ्यांची संख्या वाढली आहे व त्यावर योग्य नियंत्रण ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी मु.पो. जातेगांव ता. नांदगांव जि. नाशिक येथील कैलास उगले आणि कल्पना उगले या वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडवणीस यांच्या हस्ते महापुजेनंतर यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच एसटी महामंडळाकडून त्यांना मोफत वर्षभर एसटी पास मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते वितरित करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार वितरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पायी स्वच्छता आणि सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. प्रथम क्रमांक – श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक १३, जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा. द्वितीय क्रमांक – श्री बाळकृष्णबुवा वारकरी दिंडी क्रमांक १९, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा. तृतीय क्रमांक – श्री गुरु बाळासाहेब आजरेकर दिंडी क्रमांक २३, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा.

000

आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

मुंबई, दि. ५ : “आषाढी वारी ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीची, वारकऱ्यांच्या शक्तीची, अध्यात्मातील शिस्तीची, समतेच्या विचारांवरील श्रद्धेची गौरवशाली परंपरा आहे. महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक समृद्धीची सशक्त चळवळ आहे. गेली अनेक शतके पंढरपूरची वारी करणाऱ्या वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनाला दिशा देण्याचे, समृद्ध करण्याचे काम केले आहे. आजही लाखो वारकरी ‘हरिनामा’च्या गजरात पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने पंढरीच्या दिशेनं चालताना आपल्या कृतीतून एकतेचा, समतेचा, बंधुत्वाचा संदेश देत आहेत. ही महाराष्ट्राची आध्यात्मिक सांस्कृतिक एकजुटीची ताकद आहे. ती टिकवणे, वाढवणे ही आपली जबाबदारी आहे,” असे  सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आणि माता रुक्मिणीच्या चरणी साष्टांग दंडवत घालत वारकरी बांधवांना, राज्यातील शेतकरी, कष्टकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणतात की, “आषाढीवारीच्या रूपाने महाराष्ट्राची आध्यात्मिक परंपरा, सांस्कृतिक चळवळ जपत, वाढवत पुढे नेत असताना मराठी भाषा, मराठी संस्कृती टिकवणे, मराठीचा आवाज आसमंतात दुमदुमत, महाराष्ट्राच्या प्रगतीचा झेंडा सदैव फडकत राहिला पाहिजे, त्यासाठी कष्ट करण्याचे बळ आम्हाला दे. राज्यात यंदाही चांगला पाऊस होवो. शेतकऱ्याच्या शिवारात पिकांची, घरात धनधान्याची सुबत्ता येवो. राज्यातल्या घराघरात सुख, शांती, समाधान, समृद्धी नांदो,” असं साकडंही उपमुख्यमंत्री पवार यांनी पांडुरंगाच्या चरणी घातलं आहे.

वारीतील शिस्त, स्वच्छता, सेवाभाव, परस्पर सहकार्य, सामाजिक बंधिलकी याबद्दलही उपमुख्यमंत्री पवार यांनी गौरवोद्गार काढत, “वारीनं आपल्याला सामाजिक ऐक्य, समर्पणाची भावना आणि माणुसकीचा खरा अर्थ शिकवला आहे. हीच ऊर्जा आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी वापरली पाहिजे,” असं आवाहनही त्यांनी राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देताना केलं आहे.

०००

‘पर्यावरण वारी’तून विठ्ठल भक्तांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • पर्यावरणाची पूजा, रक्षण व संवर्धनाने जग वाचवण्याचा संतांचा संदेश
  • मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह परिसरात वृक्षारोपण

पंढरपूर, दि. 5 : ‘पर्यावरणाची वारी, पंढरपूरच्या दारी’ हा उपक्रम १६ वर्षापासून अत्यंत प्रभावीपणे राबवला जात आहे. या माध्यमातून आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत पर्यावरण संवर्धनासाठी प्रबोधन केले जात आहे. आपल्या सर्व संतांनी पर्यावरणाची पूजा, रक्षण व संवर्धन करून जग वाचवण्याचा संदेश दिला. हा संदेश अनुसरत सर्व विठ्ठल भक्तांनी वारीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’  या आळंदी ते पंढरपूर पायी वारीच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, रणजीतसिंह मोहिते पाटील, अभिजीत पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, प्रदूषण मंडळाचे प्रभारी सचिव रवींद्र आंधळे, माजी आमदार प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत व अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडवणीस म्हणाले, वातावरणातील बदलामुळे पर्यावरणाचा ऱ्हास  होत असून जल, वायू व वनराईचे महत्त्व समजून न घेतल्यास जग विनाशाकडे जाईल. त्यामुळे पर्यावरणाच्या जागर हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण असून या माध्यमातून पर्यावरणाचे संवर्धनासाठी जनजागृती केली जात आहे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराजांनी हिरवी वनराई फुलवण्याचे आवाहन केले तर जगद्गुरु संत तुकाराम यांच्या  ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगातून निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला. हा संदेश घरोघरी पोहोचवीत आपल्याला वनराई वाढवायची आहे, प्रदूषण कमी करायचे आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनातील आपली जबाबदारी ओळखून वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे, अमृता फडणवीस, सोनिया गोरे, आमदार समाधान आवताडे, आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील आदी भजनाचा टाळ वाजवत ठेका धरत ‘ज्ञानोबा तुकाराम’, ‘जय जय राम कृष्ण हरी’ असा गजर करत वारकरी यांच्या समवेत भक्तीरसात दंग होऊन गेले.

यावेळी महाराष्ट्र कला संस्कृती मंचचे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे, चंदाबाई तिवाडी, शाहीर पृथ्वीराज माळी, सत्यपाल महाराजांचे सप्त खंजिरी भजन, शैलाताई घाडगे यांच्यासह अन्य कलाकारांनी किर्तन, भारुड, पोवाडा यांच्या माध्यमातून टाळ मृदुंगात हरिनामाचा गजर करत पर्यावरणाचे संवर्धन व समतोल राखण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम सादर केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदूषण विभागाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कटे यांनी केले.

०००

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘एकात्मिक सनियंत्रण कक्ष’ व ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन

पंढरपूर, दि. ५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने पंढरपूर आषाढी वारीच्या संनियंत्रणासाठी शहर पोलीस ठाण्याच्या मागे स्थापन करण्यात आलेला एकात्मिक सनियंत्रण कक्ष, हरित वारीच्या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, गृह राज्यमंत्री  डॉ. पंकज भोयर, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, डॉ. बाबासाहेब देशमुख, अभिजित पाटील, सचिन कल्याणशेट्टी, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, देवस्थान समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.

आषाढी वारी मार्ग, नदीपात्र, वाळवंट, वाखरी पालखी तळ, 65 एकर परिसर, पत्रा शेड, प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर या ठिकाणी ड्रोन कॅमेरे तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून अहोरात्र गर्दीचे संनियंत्रण केले जात आहे. कोठे काही घटना घडल्यास तत्काळ नियंत्रण कक्षातील स्क्रीनवर दिसत असल्याने त्या ठिकाणी गतीने पोहोचून स्थिती नियंत्रणात आणता येत आहे असे,  पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले.

या एकात्मिक सनियंत्रण कक्षाद्वारे प्राप्त चित्रीकरणाच्या विश्लेषणातून आषाढी वारीसाठी कालपर्यंत पंढरपूर शहरात सुमारे 14 लाख वारकरी दाखल झाल्याचा अंदाज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन

सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत ‘हरित वारी’ हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याच्या संनियंत्रणासाठी तयार करण्यात आलेल्या ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.

‘हरित वारी’ उपक्रमांतर्गत दीड लाखावर वृक्षांची लागवड सोलापूर ग्रामीण हद्दीत विविध ठिकाणी करण्यात येणार आहे. प्रत्येक झाडाला स्वतंत्र क्यूआर कोड दिला जाणार आहे. ह्या माध्यमातून प्रत्येक झाडाची जात, त्या झाडाचे जिओ लोकेशन आणि त्याच्या सद्यस्थितीबाबत माहिती उपलब्ध असणार आहे. ॲपचा वापर करण्याचे प्रशिक्षण ठाणे अंमलदारांना  देण्यात आले आहे. हे ॲप ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असल्याने वृक्षारोपण मोहिमेतील विश्वासार्हता, पारदर्शकता आणि डिजिटल ट्रॅकिंग शक्य होणार आहे, असे यावेळी कुलकर्णी यांनी सांगितले.

राज्य सहकारी बँकेच्यावतीने देवस्थान समितीला इलेक्ट्रिक वाहन प्रदान

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्यावतीने विठ्ठल रुख्मिणी देवस्थान समितीला भक्तांच्या सेवेसाठी इलेक्ट्रिक वाहन प्रदान करण्यात आले.

यावेळी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कार, मुख्य सरव्यवस्थापक डॉ. अशोक माने, देवस्थान समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्याच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, अभिजित पाटील, गोपीचंद पडळकर, सचिन कलशेट्टी, डॉ.बाबासाहेब देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते.

०००

 

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंढरपूर, दि.५:  सर्व संतांनी निसर्गप्रेम आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे, आपल्या नद्या, निसर्गांवर प्रेम करायला शिकवले आहे. त्यामुळे विठुमाऊलीच्या दर्शनाला येताना त्यांचा संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम निर्मल दिंडीच्या माध्यमातून वारकरी करतात, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पंढरपूर पंचायत समिती आवारात ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्यावतीने आयोजित श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ‘निर्मल दिंडी’ तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या ‘चरणसेवा’ उपक्रम आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या ‘आरोग्यवारी’ उपक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल, कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, गृह राज्यमंत्री पंकज भोयर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार समाधान आवताडे, अभिजित पाटील, गोपीचंद पडळकर, सचिन कलशेट्टी, डॉ.बाबासाहेब देशमुख, देवेंद्र कोठे, विक्रम पाचपुते, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाची आस लाऊन पंढरपूर येथे पोहोचतात. वारी दरम्यान वारकऱ्यांना येणाऱ्या अडचणीचा विचार करुन २०१८ वर्षीपासून निर्मलवारीची सुरुवात केली. याअंतर्गत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली. सर्व दिंडीमधील वारकऱ्यांनी या संकल्पनेचा स्वीकार केला, त्यामुळे पालखी तळावर घाणीचे साम्राज्य दिसत नाही. महिलांची मोठ्या प्रमाणात सोय झाल्यामुळे वारीमध्ये त्यांची संख्या वाढलेली आहे. आपली वारी निर्मल, स्वच्छ झाली आहे.

ग्रामविकास आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने  निर्मलवारी संकल्पना यशस्वीरित्या राबविली, त्याचबरोबर निर्मल दिंडीच्या माध्यमातून लोककलावंत लोकजागर करुन स्वच्छतेबाबतचा संदेश घरोघरी पोहचविण्याचे काम करीत असतात.  विठुरायाच्या दर्शनाची आस लाऊन चालणाऱ्या पावलांची सेवा करून विठुरायांच्या चरणाची सेवा केल्याचे प्रत्यंतर यावे, या सेवाभावाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाद्वारे ‘चरणसेवा’ उपक्रम राबवून वारकऱ्यांचे सेवा केली. त्यांचे आरोग्य आरोग्य व्यवस्थित ठेवण्याचे काम केले.

वारीच्या दरम्यान महिलांना येणाऱ्या मासिक पाळीसह इतर अडचणीचा विचार करता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या ‘आरोग्यवारी’ उपक्रमाच्या माध्यमातून महिला वारकऱ्यांची विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न केला. याकरीता आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन अतिशय सुंदर नियोजन केले, असे मुख्यमंत्री म्हणाले. पुणे, सातारा आणि सोलापूर प्रशासनाने वारकऱ्यांना अतिशय चांगल्या सुविधा उपलब्ध केल्याबद्दल तसेच निर्मल दिंडी, चरणसेवा, आरोग्यवारी यशस्वी केल्याबद्दल प्रशासन, सेवाभावी संस्था आदींचे त्यांनी अभिनंदन केले.

वारकऱ्यांची सेवा ही मोठी संधी असून वारीचे चांगल्या प्रकारचे नियोजन करण्याचे प्रशासनाला निर्देश देण्यात आले होते. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला सोबत घेऊन वारीचे अतिशय उत्तम नियोजन केले. वारकऱ्यांना जर्मन हँगरच्या माध्यमातून राहण्याची व्यवस्था, महिलांकरीता स्वच्छतागृहासह स्नानगृह, पायाचे मसाज अशा आवश्यक त्या सर्व सुविधा वारकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला, नवीन उंची गाठत एक उच्चांक निर्माण केला आहे. त्यामुळे यावर्षीच्या वारीचे वेगळेपण पहायला मिळत आहे. सेवा कधीच संपत नसते, सेवेचे नवीन उच्चांक गाठायचे असतात. याकरिता प्रयत्नपूर्वक वारकऱ्यांची सेवा केली पाहिजे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न-ग्रामविकास मंत्री गोरे

मंत्री गोरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वारी सर्वोत्तम व्हावी, वारकऱ्यांना त्रास होता कामा नये, याकरिता त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी प्रशासनासोबत विविध सेवाभावी संस्था, विश्वस्त आदी घटकांनी अहोरात्र कामे करत मनोभावे सेवा करीत आहे. वारकऱ्यांकरिता पालखीतळावर सुविधा देण्याच्यादृष्टीने जर्मन हँगरसह, वैद्यकीय सुविधा, महिलांकरिता शौचालय, स्वच्छतागृहे, मसाज मशीन आदी सर्वोत्तम सुविधा वारकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला. वारी दरम्यान प्रशासनाच्यावतीने केलेल्या व्यवस्थेबाबत वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केल्याचे मंत्री गोरे म्हणाले.

श्रीमती चाकणकर म्हणाल्या, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, त्र्यंबकेश्वर यांसह विविध भागातून महिला वारकरी वारीत सहभागी होतात. अशा या सहभागी महिलांच्या मासिक पाळी आदी आरोग्य आणि स्वच्छताविषयक बाबींचा विचार करुन महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने गेल्या ४ वर्षापासून ‘आरोग्य वारी’ प्रशासनाच्या सहकार्याने उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत महिलांकरिता हिरकणी कक्ष, ३७५ ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन वितरण, नॅपकिन बर्निंग इन्सिनरेशन आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक म्हणाले, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या चरण सेवेचे महत्त्व लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून पालखी सोहळ्यात कक्षाच्यावतीने प्रथमच ‘चरणसेवा’ उपक्रम राबविण्यात आला. २ कोटी ७५ हजार वारकऱ्यांची  चरणसेवा करण्यात आली. लोकसहभातून एकूण २ कोटी रुपयाहून अधिक निधी उपलब्ध झाला. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या ९ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सेवा केली,  चरणसेवा सेवा उपक्रमाबाबत वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केल्याचे नाईक म्हणाले.

श्री. जंगम म्हणाले, ‘निर्मल दिंडी’ उपक्रमाअंतर्गत सुमारे ११ हजार शौचालय, १५५ हिरकणी कक्ष, स्तनदा माताकरिता हिरकणी कक्ष, सॅनिटरी नॅपकिन, नॅपकिन बर्निंग इन्सिनरेशन, लहान बालकांकरिता खेळणी वस्तू आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. स्वच्छतेच्या कामाकरिता सुमारे १ हजार २३६ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले, तसेच निर्मल दिंडी यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या वतीने पालखी सोहळ्यात राबविण्यात आलेल्या ‘चरण सेवा’ उपक्रमाच्या यशस्वीतेकरिता काम केलेल्या अधिकारी, सेवाभावी संस्था, कार्यकर्त्याचा तसेच आरोग्यवारी उपक्रमात उल्लेखनीय काम केलेल्या संस्थांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी पंढरपूरचे उप विभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, विकास अधिकारी सुशील संसारे आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात ‘निर्मल दिंडी’, ‘चरणसेवा’ आणि  ‘आरोग्यवारी’ उपक्रमाबाबत माहितीपट दाखविण्यात आले.

०००

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार

पंढरपूर, दि. ५: शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी, यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आगामी काळात शेतीच्या सर्व फिडरचे सौर ऊर्जीकरण करण्याचा शासनाने निर्णय घेतलाअसून या योजनेत महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा प्रथम असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित ‘कृषी पंढरी’ कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल, आमदार सर्वश्री विजय देशमुख, रणजीतसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विभागीय कृषी सह संचालक दत्तात्रय गावसाने आदी उपस्थित होते.

उत्पादन खर्च कमी होणे आणि उत्पादकता वाढावी, यासाठी राज्य शासन अनेक योजना राबवित आहे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत गाव हा घटक धरून जलसंधारण, जलनियोजन, शेतीच्या यांत्रिकीकरणापासून बाजारसाखळी तयार करण्यापर्यंत पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन अशा सर्व बाबी गावात पूर्ण करून गावातल्या छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्याला सर्व शासकीय योजनांचा लाभ होईल, असा प्रयत्न करण्यात आला आहे. पिक विमा योजना नुकतीच सुधारित केली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, शेती क्षेत्रात यावर्षीपासून येत्या ५ वर्षात दरवर्षी ५ हजार याप्रमाणे २५ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ठिबक संच, कृषी यांत्रिकीकरण, शेततळे, पंप आदी देण्यात येणार आहे. गतकाळात निर्णय घेतल्याप्रमाणे साडेसात अश्वशक्ती पर्यंतच्या कृषी पंपांचे वीजबिल आकारले जात नाही.

पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, योजनांचा लाभ घेण्याची माहिती मिळावी यासाठी कृषी प्रदर्शन भरवावे, अशी अपेक्षा माजी आमदार दिवंगत सुधाकरपंत परिचारक यांनी २०१५ साली व्यक्त केली होती. तेव्हापासून दरवर्षी हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. यामध्ये शासनाचे विविध विभाग, कृषी विद्यापीठे यांचे स्टॉल, विविध योजना, वेगवेगळ्या व्यावसायिकांनी आणि शेतकऱ्यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगांचाही समावेश आहे. एकात्मिक कीड नियंत्रणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’चा वापर, उत्पादकता वाढविण्यासाठीच्या वेगवेगळी पद्धतींचेही प्रदर्शन या ठिकाणी पहायला मिळत आहे. सेंद्रिय खते, नैसर्गिक खते, वेगवेगळ्या खतांचे मिश्रणे, माती परीक्षण ते कापणीपर्यंत पर्यंतच्या तंत्रज्ञानाची झलक येथे पाहायला मिळते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पणनच्या योजनांचा लाभ बाजार समित्यांच्या माध्यमातून मिळत आहे. गावातील विकास सहकारी संस्थांचे बहुउद्देशीय संस्थात रूपांतरण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असून १८ प्रकारचे व्यवसाय या संस्थाना करता येणार आहेत. बाजार आणि शेतकऱ्यांमध्ये दुवा ठरण्याचे काम या संस्था करतील. स्टोरेज, कोल्ड स्टोरेज आदी व्यवस्था करून शेतकऱ्यांच्या माल योग्य भावात मोठ्या प्रमाणात माल विकला जाईल, असा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती अत्यंत प्रगतशील असून चांगले काम करते. समितीने पणन विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

कृषीमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले, वारकरी आणि शेतकरी वारीच्या दोन बाजू आहेत. शेतीत येणाऱ्या तंत्रज्ञानाची वारीत सहभागी शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी चांगले प्रदर्शन भरविण्यात आले आहे. शेती चांगली आणि सुरळीत करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. या प्रदर्शनात सुमारे २५० स्टॉलच्या माध्यमातून शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, पीएमएफएमई योजना, आत्मा, स्मार्ट प्रकल्प आदींची माहिती आहे. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अत्यंत चांगली शेती करतात. केळीची निर्यात मोठी प्रमाणात होते. माशीमुळे डाळिंब आणि इतर फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी बॅगेज, ठिबक, मलचिंग पेपर आदीं योजनांचा फलोत्पादसाठी  शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही मंत्री ॲड. कोकाटे यांनी केले.

राज्य आणि केंद्र सरकार मिळून शेतकरी स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आपल्याला एआय मध्ये मोठे काम करायचे आहे. त्यासाठी राज्य शासनाने कृषी मध्ये ५००, कोटींची तरतूद केली आहे, असेही मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले.

मंत्री रावल म्हणाले, पंढरपूर बाजार समिती उत्कृष्ट आहे. केळीचे सर्वात मोठे निर्यात हब सोलापूर जिल्हा आहे. मनुके, द्राक्ष, डाळिंबाच्या क्षेत्रात प्रगती करणारा हा जिल्हा आहे. ड्रॅगन फ्रुटची लागवड करण्याचे धाडस या तालुक्यात झाले आणि ते यशस्वीही करण्यात आले.

लवकरच एडीबीची योजना राज्यात आणण्याचा प्रयत्न होणार आहे. यामध्ये मार्केट कमिटीची बळकटीकरण करण्यासाठी योजना आणण्याचे प्रयत्न होणार आहेत. त्यात पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री रावल यांनी दिली.

प्रशांत परिचारक यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ही एक अग्रेसर बाजार समिती आहे. ५५० कोटींहून अधिक उलाढाल या समितीच्या माध्यमातून केली जाते. बेदाण्याचे मोठे मार्केट या बाजार समितीत आहे. चांगल्या प्रकारची शेती या भागातील शेतकरी करतात. मुख्यमंत्री यांनी पंढरपूर हे भविष्यकाळातील एक मोठे तीर्थक्षेत्र होण्यासाठी ध्यास घेतला आहे. प्रशासनाने आषाढी वारीचे अत्यंत चांगले नियोजन केले, असेही ते म्हणाले.

यावेळी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड, उपसभापती राजू गावडे संचालक मंडळ आदी उपस्थित होते.

०००

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

मुंबई दि ०५: विविध विषयांचे अभ्यासक व तज्ज्ञ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व विधिज्ञ, अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ असे बहुआयामी होते. शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही मोलाची आणि प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.

शासकीय विधी महाविद्यालय येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्राध्यापक आणि प्राचार्य, कारकीर्दीला 90 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त स्मृतीपटलाचे अनावरण आणि सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती मनिष पितळे, महाधिवक्ता बीरेंद्र सराफ व प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य हे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर व जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. शासकीय विधि महाविद्यालयाच्या वतीने मानपत्र देऊन सरन्यायाधीश भूषण गवई यांचा गौरव करण्यात आला. विविध संस्था तसेच मान्यवरांनीही यावेळी सरन्यायाधीश गवई यांचा गौरव केला.

सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व व्यासंगी व बहुआयामी होते. ते एक उत्कृष्ट शिक्षक असल्याने त्यांच्या विविध क्षेत्रातील योगदानाबरोबरच त्यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी ठरली. शासकीय विधि महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करीत असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील दुर्बल घटकांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे कार्य सुरू केले. 1935 च्या गव्हर्मेंट ऑफ इंडिया या अॅक्टमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोलाचे ठरले.

शासकीय विधि महाविद्यालयाला देदीप्यमान शैक्षणिक वारसा लाभला असून अनेक विधिज्ञ या महाविद्यालयातून घडले. महाविद्यालयाच्या विविध समित्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्यही अभिनंदनीय आणि अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार सरन्यायाधीश गवई यांनी काढले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले त्या ठिकाणी गौरव होणे व शासकीय विधि महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमानाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्राचार्य अस्मिता वैद्य प्रास्ताविकात म्हणाल्या, शासकीय विधि महाविद्यालयाला देदीप्यमान शैक्षणिक वारसा लाभला असून अनेक नामवंत विधिज्ञ या महाविद्यालयाने घडविले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून 1935 मध्ये अध्यापन कारकीर्दीस सुरुवात केली. न्यायशास्त्रासारख्या अत्यंत गहन विषयाचे अध्यापन डॉ. आंबेडकर करीत असत. या महान कार्याला 90 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गौरवार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विधि सेवा क्षेत्रात महाविद्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचेही वैद्य यांनी सांगितले.

या कार्यक्रमास सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले, न्यायाधीश रेवती ढेरे, न्यायाधीश नीला गोखले, कुलगुरू डॉ. दिलीप उके, कुलगुरू डॉ हेमलता बागला, कुलगुरू डॉ अपूर्वा पालकर, कुलगुरू डॉ. गोसावी, प्रधान सचिव सुवर्ण केवले, सिनियर कौन्सेल र‍फिक दादा,  बार कौन्सिल अध्यक्ष विठ्ठल कोंडे-देशमुख, प्रिन्सेस आशाराणी गायकवाड व मान्यवर उपस्थित होते.

०००

विद्यार्थी नात्याने नवीन विषयांचा प्रांजळपणे अभ्यास करणेही गरजेचे – सरन्यायाधीश भूषण गवई

मुंबई दि ०५:  विविध आव्हानात्मक परिस्थितींचा सामना करताना वेळप्रसंगी प्रत्येक नवीन विषयाचा विद्यार्थी या नात्याने प्रांजळपणे अभ्यास करणेही गरजेचे असल्याचे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.

हॉटेल ताज महल पॅलेस येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांचा गौरव समारंभ पार पडला. यावेळी, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य  न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर व तेजस्विनी गवई हे उपस्थित होते. यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयातील लाईव्ह स्ट्रीमिंग प्रणाली तसेच वाय फाय सेवेचे उद्घाटन करण्यात आले.

सरन्यायाधीश गवई म्हणाले, प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात काम करताना तळमळीने आणि सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून काम करण्यावर भर देणे महत्त्वाचे आहे. नव्या पिढीतील सहकाऱ्यांना सकारात्मक दृष्टिकोनाने प्रेरित करणे आणि त्यांच्यातील अंगभूत गुणांना अधिक सक्षम करणे हे वरिष्ठांचे कर्तव्य आहे. याबरोबरच काम आणि कार्यालयीन जबाबदाऱ्या यामध्ये संतुलन राखणेही गरजेचे आहे. उच्च न्यायालयाने नव्याने उपलब्ध करून दिलेल्या आधुनिक सुविधा नागरिकांसाठी नक्कीच उपयुक्त ठरतील, असा विश्वास सरन्यायाधीश गवई यांनी व्यक्त केला.

न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी मनोगतात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कारकीर्दीचा गौरव केला.

०००

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन

पंढरपूर, दि. ५ (जिमाका): आषाढी शुद्ध एकादशी निमित्त वाखरी येथे पोहोचलेल्या आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमवेत पालखी खांद्यावर घेऊन दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला.

टाळ मृदंगआणि विठू माऊलीच्या गजरात वातावरण भक्तीरसात न्हाऊन निघाले. प्रारंभी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे श्री माऊलींची प्रतिमा देऊन स्वागत केले.

वाखरी येथे जिल्हा प्रशासनाने वारकरी, भाविक यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी-सुविधांची पाहणीदेखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार गोपीचंद पडळकर, अभिजित पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, माजी आमदार राम सातपुते यांच्यासह हजारो वारकरी भाविक उपस्थित होते.

०००

बिहारमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण यशस्वीरित्या सुरू

मुंबई, दि. ५ : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) उपक्रमांतर्गत बिहारमध्ये १.५ कोटी घरांना बूथ स्तर अधिकारी (Booth Level Officers – BLO) यांनी दिलेली पहिली भेट पूर्ण झाली आहे. दिनांक २४ जून २०२५ रोजी बिहारमधील ७.९० कोटी मतदारांपैकी ८७ टक्के म्हणजेच ६,८६,१७,९३२ गणना फॉर्म वितरित करण्यात आले आहेत.

घरे बंद असणे, नागरिक प्रवासात असणे, स्थलांतरित कुटुंबे किंवा मृत मतदार अशा काही कारणांमुळे अद्यापही काही घरी बीएलओ पोहोचू शकलेले नाहीत. तेथे बीएलओ प्रत्येकी तीन वेळा भेटी देतील, त्यामुळे वितरित फॉर्मची संख्या पुढील काळात वाढण्याची अपेक्षा आहे.

गणना फॉर्म ऑनलाईन देखील उपलब्ध असून भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ https://voters.eci.gov.in आणि ECINET App वर अंशतः भरलेले फॉर्म डाऊनलोड करता येतात. मतदार स्वतःही भरलेले फॉर्म ECINET App वर अपलोड करू शकतात.

राजकीय पक्षांकडूनही सक्रिय सहभाग मिळत असून राज्यात १,५४,९७७ बूथ स्तर एजंट्स (Booth Level Agents – BLAs) विविध राजकीय पक्षांकडून नेमले गेले आहेत. २ जुलै २०२५ रोजीपर्यंत भाजपकडून सर्वाधिक ५२,६८९ एजंट्स नेमले गेले आहेत. त्यानंतर RJD (४७,५०४), JD(U) (३४,६६९), काँग्रेस (१६,५००) यांचा क्रमांक लागतो. इतर पक्षांनीही BLAs नेमले असून, प्रत्येक एजंट दररोज ५० प्रमाणित फॉर्म सादर करू शकतो.

सध्या बीएलओंकडे सुमारे ५ टक्के म्हणजेच ३८ लाख भरलेले व स्वाक्षरीयुक्त फॉर्म जमा झाले आहेत. आयोगाने वेळोवेळी ‘प्रथम समावेश’ या घोषवाक्यावर भर दिला असून, या उपक्रमाचा उद्देश राज्यातील सर्व पात्र नागरिकांना मतदार याद्यांमध्ये समाविष्ट करणे हा आहे.

जो कोणी १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रकाशित होणाऱ्या मसुदा मतदारयादीत आपले नाव समाविष्ट करू इच्छितो, त्याने २५ जुलै २०२५ पर्यंत स्वाक्षरीयुक्त गणना फॉर्म सादर करणे आवश्यक आहे.

२ ऑगस्टपासून यादीतील नावांची पडताळणी मोठ्या प्रमाणावर सुरू केली जाईल. या मसुद्यावर कोणतीही हरकत किंवा दावा २ ऑगस्टपासून कोणताही राजकीय पक्ष किंवा सामान्य नागरिकाला दाखल करता येईल.

अंतिम मतदार यादी ३० सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर जिल्हाधिकारी किंवा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे अपील सादर करता येईल, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

०००

संजय ओरके/वि.स.अं.

ताज्या बातम्या

जैवविविधतेचे संवर्धन, स्थानिक रोजगार आणि पर्यावरण पर्यटनासाठी जंगल सफारी महत्त्वाचा टप्पा ठरणार !- पालकमंत्री...

0
पालकमंत्र्यांनी सफारीचे पाच हजार रुपये देऊन दोन तिकीट केले बुक जळगाव दि. २ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) - “सातपुडा जंगल सफारी हा ग्रामीण विकास आणि पर्यावरण...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाईन रित्या...

0
पुणे, दि. ०२: भविष्यात शेतीला निश्चितच चांगले दिवस येणार असून त्यासाठी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून कृषी विभागाने लोकाभिमुख पद्धतीने कार्यरत रहावे, असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री...

निवडणूक आयोगाकडून बीएलओ आणि पर्यवेक्षकांच्या मानधनात वाढ

0
मुंबई, दि.०२ :– भारत निवडणूक आयोगाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे वार्षिक मानधन दुप्पट करण्याचा तसेच बीएलओ पर्यवेक्षकांचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय,...

रायगड जिल्ह्यातील आरोग्य व शैक्षणिक सुविधा वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील –  उपमुख्यमंत्री अजित पवार

0
 रायगड जिमाका दि. ०२ -  रायगड जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता राज्यशासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार...

 समाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून डॉ.आंबेडकर महाविद्यालयाने कार्य करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
 डॉ.आंबेडकर महाविद्यालयाचा हिरक महोत्सवी सोहळा उत्साहात संपन्न नागपूर, दि. ०२ :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित शिक्षण व शिक्षणाचा दर्जा मिळवत डॉ.आंबेडकर महाविद्यालयाने  वंचित समाजाला...