गुरूवार, जुलै 10, 2025
Home Blog Page 604

बांबू लागवडीसाठी मानवविरहित यंत्र विकसित करणार – मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे अध्यक्ष पाशा पटेल

मुंबई, दि.२० : बांबू लागवडीसाठी  खड्डे खोदणे व बांबू  कापणे या कामांसाठी मानवविरहित यंत्राचा वापर करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असे  कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले. कृषिमंत्री यांच्या मंत्रालयातील दालनात पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सच्या बैठक झाली.

डॉ.भाभा अणुसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ इनव्हा ॲग्रो मेक प्रायव्हेट लिमिटेडचे वेंकट राव,ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्टचे सरदार बलमल सिंह यावेळी उपस्थित होते.

अध्यक्ष पाशा पटेल म्हणाले की, राज्यातील पडीक जमिनीवर २१ लाख हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या लागवडीसाठी खड्डे खोदण्यासाठी भारतातील पहिली इलेक्ट्रीक टूल बार यंत्रणा वापरण्यात येणार आहे. एक एकर क्षेत्रात एक व्यक्ती दोन ते तीन दिवसात  फक्त १२ ते १३ खड्डे काढू शकतो. मात्र या इलेक्ट्रीक टूल बार या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे ४५० बांबू लागडवडीसाठी खड्डे खोदता येतील. तसेच या यंत्रासोबत बांबू कापण्यासाठी मनुष्यबळाची देखील आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन यामध्ये डॉ.भाभा अणुसंशोधन केंद्रामार्फत अधिक संशोधन करून बांबू कापण्यासाठीदेखील आधुनिक तंत्रज्ञान विकसित करावे जेणेकरून कमी मनुष्यबळ आणि कमी खर्चात हे काम करता येणे शक्य होईल, अशा सूचनाही श्री.पटेल यांनी यावेळी केल्या.

००००

संध्या गरवारे/विसंअ

‘जलजीवन मिशन योजने’च्या कामांना अधिक गती द्यावी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. २० :- ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्यासंदर्भात जलजीवन मिशन योजना महत्त्वाची असून यामुळे अनेक गावात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. यामुळे या योजनेतील कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी या कामांना अधिक गती द्यावी, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील यांनी जल जीवन मिशन योजना व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) २.० चा आढावा घेतला. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, जल जीवन मिशनचे कार्यकारी संचालक अभिषेक कृष्णा यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जल जीवन मिशन योजनेतील कामांचा आढावा घेतल्यानंतर पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले, जल जीवन मिशन योजनेतील कामे जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत करण्यात येत आहेत. योजनेतील कामे निर्धारित वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी. तसेच योजनेतील ज्या कामांचे कार्यादेश प्रलंबित आहेत त्यांची पूर्तता करून करून ते तातडीने देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२ चा आढावा घेताना पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले, सन २०२४-२५ पर्यंत संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त अधिक (ODF+) मॉडेल बनवणे हा मुख्य उद्देश आहे. स्वच्छतेमध्ये सातत्य राखण्यासाठी वैयक्तिक शौचालय बांधकाम, सार्वजनिक शौचालय बांधकाम  यासह विविध कामे तातडीने पूर्ण करावीत व यादृष्टीने कार्यवाही केली जावी, असे निर्देश श्री. पाटील यांनी दिले.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ

पंढरपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या मानवतेच्या दृष्टिकोनातून तातडीने सोडविण्यात याव्यात – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. २० :- पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक नियमितपणे येत असतात. येथील नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षे शहरातील साफ-सफाईबरोबरच हाताने मैला उचलण्याचे काम केले आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या विविध समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात. पंढरपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार नियुक्ती देण्यात यावी. त्यासंदर्भातील प्रलंबित वारसांच्या पात्रतेच्या अडचणी सोडविण्यासाठी सोलापूर उपजिल्हाधिकारी आणि पंढरपूरच्या मुख्याधिकाऱ्यांमार्फत वारसा हक्क कागदपत्रे तपासणीसाठी विशेष शिबिर घेण्यात यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधितांना केल्या.

पंढरपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक झाली. बैठकीस माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), नगर परिषद प्रशासनाचे संचालक मनोज रानडे, पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव, सफाई कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, नगरपरिषदेतील ३६२ पात्र सफाई कर्मचाऱ्यांना योग्य क्षेत्रफळाची घरे उपलब्ध करुन देण्यासाठी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव आणि नगरविकास विभागाच्या सचिवांनी संबंधित विषयाबाबत बैठक घेऊन योग्य तोडगा काढावा. नागरी हिवताप प्रतिरोध योजनेतील कार्यरत अस्थायी पदे पुढे कार्यरत ठेवण्याची कार्यवाही आरोग्य विभागाने करावी. पंढरपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या १६ पात्र वारसांना नियुक्ती देण्यात आली आहे. तथापि प्रलंबित ६६ वारसांना नियुक्ती प्रकरणी अर्जदारांकडून आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होऊ शकली नसल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. या ६६ वारसांबाबत पुन्हा निर्णय घेण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष शिबिराचे आयोजन करुन वारसांकडील कागदपत्रे आणि नगरपालिकेकडील कागदपत्रे तपासण्यात यावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

——०००—–

लोणावळा शहरातील विविध नागरी समस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

मुंबई, दि. २०:- पुणे जिल्ह्यातील लोणावळा व खंडाळा ही राज्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे असून येथे येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्व प्रकारची मदत करण्यात येईल. या शहराच्या भविष्यातील लोकसंख्येचा, पर्यटकांचा विचार करून खंडाळा भागाकरिता ५ एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प आणि लोणावळा शहरासाठी विविध ९ ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची कार्यवाही गतीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

लोणावळा नगरपरिषदेच्या विविध प्रलंबित प्रकरणांचा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात आढावा घेतला. बैठकीस आमदार सुनील शेळके, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, डॉ. के.एच. गोविंदराज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (रस्ते) सचिव सदाशिव साळुंखे, वीज वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे संचालक मनोज रानडे उपस्थित होते. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पुण्याचे नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागाचे संचालक अविनाश पाटील आदी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, भांगरवाडी-नांगरगाव रेल्वे उड्डाणपुलाचे उर्वरित काम नगरपरिषद आणि रेल्वे प्राधिकरणाकडून तातडीने करण्यात यावे. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असले तरी पुलाच्या दोन्ही बाजूला भराव टाकून रस्ता केल्याशिवाय या उड्डाणपुलाचा उपयोग होणार नाही. त्यामुळे या कामाच्या भूसंपादनासाठी राज्य शासनामार्फत १५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालयाने नगरपरिषदेच्या सहाय्याने तातडीने भूसंपादन प्रक्रिया सुरु करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, लोणावळा शहरातील दीर्घकालीन भाडेतत्त्वावर (लिजवर) दिलेल्या मालमत्तांची मुदत संपली आहे. मात्र, लिजधारकांनी परस्पर मालमत्ता विकल्याचे निर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर या मालमत्तांबाबत अंबरनाथ नगरपालिकेच्या धर्तीवर दंड आकारून त्या नियमित करण्याबाबत मार्ग काढण्यात यावा. शहरातील स्थानिक रिक्षा, टॅक्सी चालकांच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही यादृष्टीने ओला, उबर यासारख्या ऑनलाईन कॅबचालक कंपन्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात. शहरातील पथविक्रेत्यांच्या समितीमध्ये स्थानिक पथविक्रेत्यांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळण्यासाठी त्यांना निमंत्रित सदस्य म्हणून घेण्यात यावे. औद्योगिक वसाहतीमधील विजेची समस्या सोडविण्यासाठी एक्प्रेस फीडर देऊन प्रश्न मार्गी लावावा. अधिसंख्य पदांची निर्मिती करुन नगरपरिषदेच्या आस्थापनेवर सफाई कामगारांच्या वारसांना वर्ग चार च्या पदांवर नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

लोणावळा शहराचा विकास आराखडा अंतिम करताना हनुमान टेकडी परिसरातील म्हाडा घरकुलांना वाढीव एफएसआय देण्याबाबत नगरविकास सचिवांनी संबंधितांची बैठक घेऊन तातडीने कार्यवाही करावी. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या लोणावळा शहरातील दोन किलोमीटर मार्गाचे नगरपरिषदेच्या निधीतून रुंदीकरण करण्याच्या प्रस्तावास रस्ते विकास महामंडळाने ना हरकत प्रमाणपत्र द्यावे. नगरपरिषदेला पाण्याच्या टाकीसाठी आवश्यक असलेली सार्वजनिक बांधकाम विभागाची ६.५ गुंठे जागा मिळण्यासाठी एकत्रित पाहणी करुन सध्याच्या टाकीलगतची जागा तातडीने देण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

——०००—–

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे मनाेगत

मुंबई, दि २० :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई शहर जिल्ह्यातील विविध विकास कामांची माहिती दिली आहे.

बुधवार, दि. २१ ऑगस्ट २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत हे मनोगत प्रसारित होणार आहे. जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील व विविध घटकांसाठीच्या विकास कामांचे नियोजन केले जाते, त्याची प्रभावी अंमलबजावणीही केली जाते. मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक नुकतीच झाली. या बैठकीच्या अनुषंगाने पालकमंत्री श्री. केसरकर यांनी मुंबई शहर जिल्ह्यातील विकास कामांबाबत दिलखुलास कार्यक्रमात माहिती दिली आहे.

—-000—

केशव करंदीकर/व.स.सं

राजधानीत सद्भावना दिनानिमित्त शपथ

नवी दिल्ली, दि.20 : महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची शपथ दिली. यावेळी रुपिंदर सिंग यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

यावेळी अपर निवासी आयुक्त नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार व स्मिता शेलार इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिन

महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या (प्रभारी) उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची शपथ दिली. श्रीमती अरोरा यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

0000

शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारत बांधकामांची कार्यवाही तत्परतेने करावी – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

मुंबई, दि. २० : शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारत बांधकामांच्या निविदा प्रक्रिया येत्या महिनाअखेर पूर्ण कराव्यात तसेच विहित कालमर्यादेत या सर्व इमारतींचे बांधकाम पूर्णत्वास नेण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण यांनी दिल्या.

शासकीय तंत्रनिकेतन इमारतींच्या बांधकामासंदर्भात मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री.चव्हाण यांनी संबंधितांना सूचित केले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर आदींसह उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी  अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, रत्नागिरी, कोकण, ठाणे, विक्रमगड, पेण या ठिकाणच्या मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन इमारतींच्या बांधकाम प्रस्तावांच्या संदर्भात सद्यस्थितीचा आढावा घेऊन मंत्री श्री. चव्हाण यांनी या महिनाखेर सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच याबाबत पुढील कार्यवाही तत्परतेने करुन शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीचे बांधकाम विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याबाबत संबंधितांना सूचित केले.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, शासकीय तंत्रनिकेतन मधील पदविकाधारक विद्यार्थ्यांना देशांतर्गत तसेच बाहेरही मागणी वाढत असून रोजगाराच्या संधी या विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहेत. शासकीय तंत्रनिकेतन मधून प्राप्त होणाऱ्‍या कौशल्याची  उपयुक्तता आणि महत्त्व  विशेष  उपक्रमाद्वारे उच्च शिक्षण विभागाने पालक आणि विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहोचवले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या वाढत असून या पार्श्वभूमीवर तंत्रनिकेतन इमारतीचे बांधकाम हे दर्जेदार करण्याची खबरदारी सर्व संबंधितांनी  घ्यावी, सुविधायुक्त तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्याच्या व्यापक उद्देशाने सर्वांनी कार्यवाही करावी, असे मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

००००

वंदना थोरात/विसंअ

लोणारी समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. 20 : लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मान्यतेसाठी लवकरच ठेवण्यात येईल, अशी ग्वाही इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.

लोणारी समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात मंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयकुमार गोरे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल व अखिल भारतीय लोणारी  समाज संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

लोणारी समाजातील बांधवाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आर्थिक विकास महामंडळासोबत लोणारी समाजाच्या मुला-मुलींसाठी नवी मुंबई किंवा पुण्यामध्ये वसतिगृह सुरू करावे, लोणारी समाजाचे विष्णूपंत दादरे यांचे सांगोला तालुक्यात स्मारक उभारण्याची मागणी यावेळी करण्यात आली. समाजाच्या इतर विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे मंत्री श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.

रामोशी, वडार, गुरव, लिंगायत, नाभिक, सुतार, विणकर या समाजासाठी महामंडळ स्थापन करण्यात आले असून लोणारी समाजासाठीचे महामंडळ लवकरच होईल. राज्यातील इतर मागास  प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहे सुरू केली असून या वसतिगृहाचा तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचाही लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे मंत्री श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.

0000

शैलजा पाटील/विसंअ

राज्यपालांनी केली इंदू मिल येथील निर्माणाधीन डॉ.आंबेडकर स्मारकाची पाहणी

मुंबई, दि. २० : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल कंपाऊंड येथे निर्माण होत असलेल्या भव्य स्मारकाची पाहणी केली.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समानतेसाठी आपले जीवन समर्पित केले. डॉ.आंबेडकर यांचे इंदू मिल येथील भव्य स्मारक ही त्यांना यथोचित आदरांजली असून या स्मारकामुळे देश विदेशातील लोकांना डॉ.आंबेडकर यांच्या कार्याची महती कळेल, असे राज्यपालांनी सांगितले. डॉ.आंबेडकर यांच्या भव्य स्मारकामुळे भारतीय समाज अधिक सशक्त व एकसंध होण्यास मदत होईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.  सुरुवातीला केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले व राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी राज्यपालांचे स्वागत केले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे करण्यात आलेल्या सादरीकरणाच्या वेळी राज्यपालांनी स्मारकाच्या निर्मितीच्या प्रगतीचा आढावा घेतला. स्मारकामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी करण्यात येत असलेल्या सोयी-सुविधा तसेच स्मारकाचे तीव्र वादळापासून संरक्षण होण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल त्यांनी माहिती जाणून घेतली.

इंदू मिल येथील भव्य स्मारक हा संपूर्ण हरित परिसर असेल तसेच तेथे ७५० ते ८०० मोठी झाडे लावण्यात येणार आहे. या ठिकाणी १००० व्यक्तींची आसन क्षमता असलेले सभागृह, चवदार तळ्याचे प्रतिरूप तळे तसेच ध्यानधारणा केंद्र, ग्रंथालय व भूमिगत वाहनतळ असणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे, भंते डॉ. राहुल बोधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रवीण दराडे व विजय वाघमारे, वास्तुशिल्पकार शशी प्रभू, मूर्ती शिल्पकार अनिल सुतार आदी उपस्थित होते.

0000

Maharashtra Governor reviews progress of Dr.Ambedkar Memorial at Indu Mill Compound

Mumbai Dated 20 : Maharashtra Governor C.P. Radhakrishnan visited the Grand Memorial of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar at Indu Mills Compound in Mumbai and reviewed the progress of its construction on Tue (20 Aug).

Union Minister of State for Social Justice and Empowerment Ramdas Athawale, Maharashtra’s Minister for Youth Affairs and Sports Sanjay Bansode, senior government officers, Nagsen Kamble, Bhante Dr Rahul Bodhi and others were present.

0000

दिवंगत राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे अभिवादन

‘सद्भावना दिना’निमित्त राज्यपालांनी दिली सद्भावना प्रतिज्ञा

मुंबई, दि.२० : माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन  यांनी  राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच मुंबई पोलीस दलाचे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली.

राज्यपालांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

“जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची, तसेच सर्व प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक मार्गानी सोडविण्याची” प्रतिज्ञा राज्यपालांनी यावेळी उपस्थितांना दिली.

यावेळी राज्यपालांचे  प्रधान सचिव प्रवीण दराडे व  सहसचिव श्वेता सिंघल उपस्थित होते.

000

Floral tributes offered to late PM Rajiv Gandhi

 Governor administers Sadbhavana Day Pledge

Mumbai,20 :-The Governor of Maharashtra  C.P. Radhakrishnan administered the ‘Sadbhavana Day Pledge’ to the officers and staff of Raj Bhavan on the occasion of the birth anniversary of the late Prime Minister of India Rajiv Gandhi at Raj Bhavan Mumbai on Tue (20 Aug).

Earlier the Governor offered floral tributes to the portrait of Rajiv Gandhi. The birth anniversary of Rajiv Gandhi is observed as ‘Sadbhavana Diwas’.

The Sadbhavana Day Pledge calls upon the people ‘to work for the emotional oneness and harmony of all the people of India regardless of caste, creed, region, religion or language’ and to ‘resolve all differences through dialogue and constitutional means without resorting to violence’.

Principal Secretary to the Governor  Pravin Darade  and Joint Secretary Shweta Singhal were prominent among those present.

000

 

ताज्या बातम्या

हिंजवडीकरांच्या समस्या सोडविण्यासाठी नियोजनाचा बृहत आराखडा सादर करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 10 : पुण्यातील हिंजवडी ‘आयटी’ पार्क परिसरातील वाहतूक कोंडी, पूरस्थिती तसेच पिण्याच्या पाण्यासह सर्व समस्या सोडविण्यासाठी पुणे ‘मनपा’, पिंपरी चिंचवड ‘मनपा’, पुणे महानगर विकास प्राधिकरण आणि...

विधानसभा कामकाज

0
शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा देणारी नवीन योजना आणणार - कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल राज्यात शेतकरी आत्महत्या शून्यावर आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट; कृषी विकासासाठी सर्व योजनांमधून ६९...

पारधी समाजातील युवकांनी व्यवसाय अर्थसहाय्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

0
मुंबई, ‍‍दि. १० :- मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी व्यवसाय करण्यास अर्थ साहाय्य मिळण्यासाठी ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत...

विधानसभा लक्षवेधी

0
पीक कापणी, काढणी पश्चात नुकसान भरपाईचे वाटप प्रगतीपथावर – कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मुंबई, दि. १० : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत परभणी जिल्ह्यात सन २०२४-२०२५ या...

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
उरण फाटा येथे पारसिक हिलवर झालेल्या वृक्षतोडीची चौकशी - मंत्री उदय सामंत मुंबई, दि. १० : नवी मुंबई मधील सीबीडी बेलापूर येथील उरण फाटा येथे...