रविवार, जुलै 13, 2025
Home Blog Page 598

खा.वसंतराव चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नांदेड दि. २७ ऑगस्ट : नांदेडचे खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्यावर आज २७ ऑगस्टला जिल्ह्यातील नायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना राज्य शासनामार्फत श्रध्दांजली अर्पण केली.

नायगाव येथील चव्हाण कुटुंबीयांच्या स्मशानभूमीमध्ये या भूमीपूत्राला संपूर्ण शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पुष्पचक्र अर्पण केले. तसेच शासनामार्फत विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड महानगरपालिकेतील आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर यांनी पुष्पचक्र अर्पण केले. पोलीस दलातर्फे हवेत तीन फैरी झाडून अंतिम सलामी देण्यात आली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार प्रामुख्याने उपस्थित होते.

२६ ऑगस्टला हैद्राबाद येथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सोमवारी त्यांचे पार्थिव नायगाव येथे पोहोचल्यानंतर त्यांच्या वडिलोपार्जित वाड्यामध्ये अंत दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर आज त्यांचे मूळ गाव असणाऱ्या नायगाव येथे हजारो  चाहत्यांच्या उपस्थितीत अंतीम संस्कार करण्यात आले.चव्हाण कुटुंबांच्या मंदिर परिसरातील स्मशानभूमीत त्यांचे चिरंजिव रवींद्र चव्हाण व रंजीत चव्हाण यांनी भडाग्नी दिला. तत्पूर्वी, त्यांना पोलीस दलाच्या वतीने सलामी देण्यात आली. यावेळी त्यांचा पूर्ण परिवार उपस्थित होता.

नायगाव येथे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी संपूर्ण राज्यातून तसेच तेलंगाना व कर्नाटक मधील स्नेही मोठ्या संख्येने पोहोचले होते.तर देशातील व राज्यातील राजकीय पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने पालकमंत्री गिरीश महाजन,राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, लातूरचे खासदार डाॅ.शिवाजी काळगे, धुळेच्या खासदार डॉ.शोभा बच्छाव, जालणाचे खासदार कल्याण काळे, परभणीचे खासदार संजय जाधव, खा. रजनीताई पाटील, खा.डॉ.अजित गोपछडे,माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात,आ.अमीत देशमुख,आमदार सर्वश्री शामसुंदर शिंदे, राजेश पवार, माधवराव जवळगावकर, बालाजी कल्याणकर, डॉ. तुषार राठोड,धीरज देशमुख,प्रज्ञा सातव ,विक्रम काळे, जितेश अंतापूरकर, मोहन अण्णा हंबर्डे, मेघणाताई बोर्डीकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर, प्रतापराव पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, सुभाष वानखेडे, माजी केंद्रीय राज्य मंत्री सूर्यकांता पाटील, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री कमलकिशोर कदम ,यांच्यासह राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत श्रद्धांजली सभा झाली.

वसंतराव चव्हाण यांचा परिचय

खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या वडीलाचे नाव कै. बळवंतराव अमृतराव चव्हाण होते. त्यांचे वडील बळवंतराव चव्हाण हे देखील विधानसभा व विधान परिषदेवर निवडून आले होते. त्यांचाच राजकीय वारसा वसंतरावांनी पुढे सुरू ठेवला. वसंतरावांचा जन्म दिनांक 15 ऑगस्ट 1954 रोजी झाला होता. त्यांचे जन्मस्थळ नांदेड जिल्हयातील  नायगांव (बा.) आहे.  त्यांचे शिक्षण बीकॉम (दुसरे वर्ष) असे होते.

स्व. वसंतराव चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ग्रामपंचायत सदस्य सरपंच अशी केली आहे. सन 1978 ते 2002 पर्यत सलग 24 वर्ष ते नायगाव ग्रामपंचायतचे सरपंच होते. बिलोली सरपंच संघटनेचे अध्यक्ष होते. सन 1990-95 या काळात जिल्हा परिषद सदस्य नांदेड. सन 2002 मध्ये जिल्हा परिषदेला  दुसऱ्यांदा निवड झाली. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड येथे नांदेड, सन 2002-2008 विधान परिषद सदस्य होते. 2009-2014 या काळात ते राज्याच्या विधानसभेमध्ये विधानसभा सदस्य (अपक्ष) होते. त्यांनी  रोजगार हमी योजना महाराष्ट्र राज्य समितीचे सदस्य म्हणूनही पद भूषविले. संसदीय कामकाज पध्दतीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी युरोपचा अभ्यास दौरा केला. पुन्हा एकदा 2014-2019 या काळात काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून ते निवडून आले. सदस्य अंदाज समिती महाराष्ट्र राज्य. सन 2016-2022 सभापती कृ.ऊ.बा समिती नायगांव, सन 2021-2023 चेअरमन, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली आणि 29 फेब्रुवारी 2024 पासून मुख्य समन्वयक नांदेड ग्रामीण कॉग्रेसची जबाबदारी त्यांनी घेतली. नायगाव तालुका निर्मितीचे ते शिल्पकार आहेत. 4 जून 2024 पासून ते कॉग्रेस पक्षाकडून लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले. खासदार म्हणून त्यांचे कामकाज नुकतेच सुरू झाले होते. राजकीय कारकीर्दीसोबतच त्यांचे सामाजिक, धार्मिक,सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यातही खूप मोठा सहभाग होता.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला विविध योजनांच्या अंमलबजावणीचा व प्रकल्पांच्या कामांचा आढावा

सातारा दि.26 (जिमाका): पाटण तालुक्यातील उरुल येथील लघु पाटबंधारे प्रकल्प, मल्हारपेठ येथील ग्रामीण रुग्णालय या प्रकल्पांचा तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना व पाटण तालुक्यातील पाणंद रस्त्यांच्या कामांचा आढावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, पाटणचे तहसीलदार अनंत गुरव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, रोहिणी ढवळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उरुल येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या प्रकल्पाला निधी उपलब्ध आहे. तरीही काम अपूर्ण आहे. प्रकल्पाच्या कामाची लवकर सुरुवात करुन येत्या 2 महिन्यात काम पूर्ण करावे, अशा सूचना केल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत आत्तापर्यंत 7 लाख 9 हजार प्रकरणांना मंजूरी देण्यात आली आहे. नव्याने 1 लाख 87 हजार प्रकरणांना मंजूरी देण्यात आली आहे. ज्या अर्जाबाबत त्रुटी आहेत त्या त्रुटी लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, असे सांगून या योजनेंतर्गत एकही पात्र महिला लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर मल्हारपेठ येथील ग्रामीण रुग्णालयाच्या जागेचा प्रस्ताव त्वरीत शासनाकडे पाठवावा. तसेच कर्मचाऱ्यांच्या निवास्थानासाठी पर्यायी जागा उपलब्ध करुन घ्यावी अशा सूचनाही केल्या.

पाटण तालुक्यातील पाणंद रस्त्यांची मंजूर कामे सुरु करुन शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मार्ग खुला करावा, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्याला 1 हजारचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी चर्चा करुन लवकरच एक टीम तिर्थदर्शनासाठी पाठविण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत सांगितले.

0000

रुग्णांची सुरक्षा, संसर्ग नियंत्रणासाठी जे जे रुग्णालयात आता अत्याधुनिक तंत्रज्ञान

इजराइलच्या सहयोगातून अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी रूमचे उद्घाटन

मुंबई, दि. 27 : जेजे हॉस्पिटल येथे अत्याधुनिक अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी कक्षाचे आज उद्घाटन करण्यात आले. इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार महासंचालक कर्नल (निवासी) याकोव्ह ब्लिटश्टाइन यांच्या हस्ते या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. रुग्णांची सुरक्षा आणि संसर्ग नियंत्रणासाठी यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
ही सुविधा इस्त्रायल येथील डीप-टेक कंपनी नॅनोसोनोने निर्लाटच्या सहकार्याने विकसित केली आहे. प्रगत प्रतिजैविक ऍक्रेलिक पेंटचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. हे नाविन्यपूर्ण पेंट काही तासांत 99.99% जीवाणू, विषाणू यावर नियंत्रण मिळविते. इस्रायलच्या आरोग्य सेवा प्रणालीमध्ये आधीच यश मिळालेले हे तंत्रज्ञान मुंबईतील इस्रायलचे महावाणिज्य दूतावास, ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांतून भारतात आणले गेले आहे. पेंटमध्ये समाविष्ट केलेले QUACTIV™️ हे तंत्रज्ञान पेंट जोपर्यंत भिंतींवर राहते तोपर्यंत हानिकारक सूक्ष्मजीवांपासून सतत संरक्षण देते. हे पेंट आणि तंत्रज्ञान संक्रमण नियंत्रणासह पर्यावरणास अनुकूल आणि सुरक्षित आहे.
कर्नल (निवासी) याकोव्ह ब्लिटश्टाइन यावेळी म्हणाले की “जेजे हॉस्पिटलमध्ये या प्रगत प्रतिजैविक आणीबाणी कक्षाचे होत असलेले उदघाटन हे इस्रायल आणि भारत यांच्यातील आरोग्य सेवेतील सहकार्यातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारतात रुग्णांची सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य सुविधा विकसित करण्यामध्ये हे पाऊल निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 इस्रायलचे मुंबईतील कौन्सुल जनरल श्री. कोबी शोशानी म्हणाले की, इजराइल आणि भारतामध्ये आरोग्य क्षेत्रातील देवाण-घेवाणसाठी होत असलेले सहकार्य महत्त्वपूर्ण आहे. वैद्यकीय क्षेत्रातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. दोन्ही राष्ट्रांमधील सहयोग यामुळे आणखी वृधिंगत होईल. वैद्यकीय सुविधांमध्ये बदल घडवून आणणारी ही झेप आहे. रुग्णांची सुरक्षा आणि संसर्ग नियंत्रण यामध्ये या नव्या तंत्रज्ञानाचा व्यापक परिणाम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता  डॉ. पल्लवी सापळे म्हणाल्या की, या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अवलंबमुळे  रुग्णांची सुरक्षा सुनिश्चित होईल.   “QUACTIV™️ प्रतिजैविक पेंटची अंमलबजावणी हे जेजे रुग्णालयासाठी एक मोठे पाऊल आहे. हे तंत्रज्ञान आमच्या रुग्णांना संरक्षणाचा अतिरिक्त स्तर प्रदान करेल, जे संक्रमण रोखण्यासाठी आणि सुरक्षित वातावरण राखण्यासाठी आवश्यक आहे.”
नॅनोसोनोचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओरी बार चेम यांनी या नवोपक्रमाच्या व्यापक प्रभावाविषयी माहिती दिली. “QUACTIV™️ हे तंत्रज्ञान संक्रमण नियंत्रणातील एक महत्वपूर्ण प्रगती आहे. भारतात त्याचा सकारात्मक प्रभाव पाहून आम्ही उत्साहित आहोत, असे त्यांनी सांगितले.
000

Director General of Foreign Affairs of Israel Inaugurates Advanced Antimicrobial Emergency Room at JJ Hospital, Mumbai

New Facility at JJ Hospital, will be equipped with innovative Israeli technology to enhance patient safety and infection

Mumbai, India – August 27, 2024 – In a landmark event for healthcare innovation, Col. (Res) Yaakov Blitshtein, Director General of Foreign Affairs of Israel, inaugurated a state-of-the-art emergency room at JJ Hospital, Mumbai. The facility is equipped with advanced antimicrobial acrylic paint developed by the Israeli deep-tech company Nanosono, in collaboration with Nirlat. This innovative paint can eliminate up to 99.99% of bacteria, viruses, and moulds within hours.
Already a success within Israel’s healthcare system, this technology has been introduced to India through the collaborative efforts of the Consulate General of Israel in Mumbai, Grant Government Medical College, and the Government of Maharashtra. The QUACTIV™️ technology integrated into the paint offers continuous protection against harmful microorganisms as long as the paint remains on the walls. The paint achieves its antimicrobial effects without toxic substances, ensuring an environmentally friendly and safe solution for infection control.
During the inauguration, Col. (Res) Yaakov Blitshtein stated, “The launch of this advanced antimicrobial emergency room at JJ Hospital marks a significant milestone in the collaboration between Israel and India in healthcare. This initiative reflects our commitment to sharing Israeli technological advancements to enhance patient safety and public health in India.”
Consul General of Israel to Mumbai, Mr. Kobbi Shoshani remarked, “This cooperation represents a significant milestone in the medical sector by seamlessly integrating India’s advanced healthcare system with Israel’s pioneering expertise in speciality chemicals. It underscores a unique collaborative effort between our nations, marking a transformative leap in revolutionizing medical facilities. This initiative not only enhances patient safety and infection control but also symbolizes a profound partnership, where both countries contribute equally to advancing healthcare standards. By merging our strengths, we are setting a new benchmark in medical innovation that will have a lasting impact on healthcare practices in both India and Israel.”
Dr. Pallavi Saple, Dean, JJ Hospital, expressed the hospital’s commitment to adopting cutting-edge technology: “The implementation of QUACTIV™️ antimicrobial paint is a major step forward for JJ Hospital. This technology provides an additional layer of protection for our patients, which is essential for preventing infections and maintaining a safe environment.”
Mr. Ori Bar Chaim, CEO, Nanosono, highlighted the broader impact of this innovation: “QUACTIV™️ is a breakthrough in infection control, setting new safety standards in healthcare environments and beyond. We are excited to see its positive impact in India and look forward to further expanding its applications.” Mr Bar Chaim has three decades of extensive experience in the realm of international business and investments. Before embarking on his journey with Nanosono, Ori held pivotal roles as the CEO and Senior Advisor in both the private and public sectors, both in Israel and on a global scale.
With this inauguration, JJ Hospital Mumbai is leading the way in adopting innovative solutions to enhance patient safety, demonstrating the success of the partnership between Israel and India in addressing critical public health challenges.

शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘लाडकी बहीण’ प्रमाणेच ‘सुरक्षित बहीण’ ही जबाबदारीही शासनाचीच ; कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही

ठाणे, दि.27(जिमाका):- हे शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे आहे आणि यापुढेही राहील. शासनाकडून गोविंदांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व काही करण्यात येईल. “लाडक्या बहिणी” प्रमाणेच “सुरक्षित बहीण” ही जबाबदारी देखील शासनाचीच आहे, शासनाने ही जबाबदारी निश्चितपणे स्वीकारली आहे. हे शासन कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात ते बोलत होते. यावेळी खासदार नरेश मस्के, आमदार प्रताप सरनाईक, पूर्वेश सरनाईक, संस्कृती युवा प्रतिष्ठानचे इतर सर्व पदाधिकारी, विविध गोविंदा पथके व गोविंदाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हा खेळ पाहून आम्हालाही आमचे बालपण आठवते. आम्हीही आमच्या लहानपणी या खेळात उत्साहाने सहभागी होवून दहीहंड्या फोडत असू. आता हा उत्सव सातासमुद्रापलीकडे पोहोचलाय. “प्रो-कबड्डी” प्रमाणे हा “प्रो-गोविंदा” खेळ झाला. शासनाने या खेळाला साहसी खेळ म्हणून मान्यताही दिली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी या खेळामध्ये खूप लक्ष घालून या खेळाला लोकप्रिय बनविण्यात मोठा हातभार लावला आहे. त्यांनी या खेळाची व्यापकता वाढविली आहे. त्यातला साहसीपणा व धोका लक्षात घेऊन सर्व गोविंदांचा विमा काढण्याबाबत शासनाकडे मागणी करण्यात आली होती. शासनाने ही मागणी तात्काळ मान्य केली. सर्व गोविंदांचा विमा काढण्यात आला.

ते पुढे म्हणाले, असे असले तरी हा उत्सव सुरक्षितपणे साजरा करणे, ही आपली जबाबदारी आहे. आपले कुटुंबीय आपली वाट पाहत असतात. 2011 या वर्षी नऊ थरांचा विक्रम या दहीहंडी उत्सवात झाला होता. “जय जवान” या मित्रमंडळाने हा विक्रम केला होता आणि याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली होती. आपल्याकडे एकापेक्षा एक मित्रमंडळे, दहीहंडी पथके आहेत, जे या खेळामधील विक्रम दरवर्षी मोडताना दिसत आहेत. परंतु ही सोपी गोष्ट नव्हे. यासाठी वर्षभर मेहनत घ्यावी लागते, कसून सराव करावा लागतो. एकाग्रपणे सांघिक भावनेने या खेळाचे प्राविण्य मिळवावे लागते. या गोविंदाची मेहनत बघून हे शासन आपल्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहील. जे जे शक्य आहे ते सर्व काही गोविंदांसाठी करण्यात येईल.
मुख्यमंत्र्यांनी शेवटी महिला गोविंदा पथकांचेही विशेष अभिनंदन केले.

000

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू

मुंबई, दि.२७ : आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रु.१०.०० लाख व कायमस्वरुपी अंपगत्व आल्यास रु.५.०० लाख रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून, या संदर्भातील महाराष्ट्र शासनाचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. १ एप्रिल, २०२४ पासून हा निर्णय लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रति वर्ष अंदाजित रु.१.०५ कोटी इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व ग्रामस्थ, समाजातील अन्य घटक यांमध्ये आरोग्यासंदर्भात जागरुकता, सुसंवाद, समन्वय, प्रोत्साहन, निर्माण करण्याच्या दृष्टीने “आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक” महत्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत. राज्यातील आशा स्वयंसेविकांचा माता आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंब नियोजन इत्यादी कारणांसाठी नियमित गृहभेटी देणे, माता व बालकांना मार्गदर्शन करणे, रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे संदर्भीत करणे अशा प्रकारची कर्तव्ये बजावावी लागतात.

 आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेवून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू आल्यास रु.१०.०० लक्ष व कायमस्वरुपी अंपगत्त्व आल्यास रु.५.०० लक्ष इतके सानुग्रह अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

0000

निलेश तायडे,विसंअ

ई-गव्हर्नन्सवर २७ वी राष्ट्रीय परिषद; पुरस्कार विजेत्यांसह केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांचे सादरीकरण

मुंबई, दि.27 : राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद  (27 वी) 3 आणि 4 सप्टेंबर 2024 रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत पुरस्कार विजेत्यांसह केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांचे 48 स्टाँलच्या माध्यमातून आपापल्या विभागाविषयी आणि ई-गव्हर्नन्स विषयी सादरीकरण केले जाणार आहे.

“विकसित भारत : सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा वितरण” या दोन दिवसीय परिषदेत सहा पूर्ण सत्रे आणि सहा विविध छोटी सत्रे असतील, ज्यात सरकार, शैक्षणिक, पुरस्कार विजेते आणि उद्योगातील प्रमुख भागधारक आणि नेत्यांना चर्चा करण्यासाठी आणि नावीन्यपूर्ण गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र आणले जाईल.

केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासह प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभाग आणि राज्य शासनाचा प्रशासकीय नावीन्यता, उत्कृष्टता आणि सुशासन उपविभाग, सामान्य प्रशासन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “27 वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद 2024” दि. 3 व 4 सप्टेंबर, 2024 रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर वांद्रे-कुर्ला संकुल, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.

या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये  सुवर्ण, रौप्य आणि ज्युरी अशा पुरस्कारांचा समावेश आहे. विविध श्रेणींमध्ये 375 नामांकनांमधून प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. या वर्षीच्या परिषदेची थीम “सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा वितरणाला आकार देणे” आहे. जी मजबूत आणि शाश्वत ई-सेवा वितरणासाठी भारताच्या ई-गव्हर्नन्स उपक्रमांच्या प्रगतीवर जोर देते.

संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत समारोपीय सत्रात पुरस्कार प्रदान केले जातील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार याच्यांसह डीएआरपीजी, महाराष्ट्र शासन, मायजिओ, एनआयसी आदी मधील वरिष्ठ अधिकारी, नॅसकॉम मधील उद्योग, स्टार्ट-अप्स आणि ई-गव्हर्नन्स विचारांचे लोक सहभागी होतील. 27 व्या एनजीसीमध्ये केंद्र, राज्य सरकारे आणि स्टार्ट-अप्सद्वारे पुरस्कृत प्रकल्प आणि प्रकल्पांचे प्रदर्शन देखील प्रदर्शित केले जाईल.

000

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा मानस – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांकडून महामार्गाची पाहणी

रायगड, दि.२६ (जिमाका): गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास होवू नये, यासाठी शासनाकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा आमचा मानस असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सर्वश्री आमदार प्रशांत ठाकूर, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, रवींद्र पाटील, विभागीय आयुक्त पी.वेलरासू, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक श्री.घोटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, रूपाली पाटील, प्रांताधिकारी राहुल मुंडके, प्रवीण पवार, ज्ञानेश्वर खुटवळ,  इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पनवेल, पळस्पे येथून या मुंबई-गोवा मार्गावरील रस्त्यांच्या कामांच्या प्रत्यक्ष पाहणीला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली आणि कशेडी घाटातील भोगाव येथील बोगद्याच्या ठिकाणी या पाहणी दौऱ्याची सांगता झाली.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तसेच खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे. पहिली टेक्नॉलॉजी एम 60 आरएफसी आणि लिओ पॉलिमर पद्धत, दुसरी रॅपिडेक्स हार्डनर एम 60 पद्धत आणि तिसरी डीएलसी पद्धत या तीन आधुनिक पद्धतींनी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे ब्रिक्स कास्ट एम 60 या पद्धतीचाही उपयोग करण्यात येत आहे. या पद्धतीमध्ये सिमेंटच्या तयार प्लेट्स बसवून रस्ता तयार करण्यात येत आहे.या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा तसेच उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी संपूर्ण टीम काम करीत आहे.

ते म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या सहकार्याने कुठल्या पद्धतीने कुठे काम करायचे, हे आपापसातील समन्वयाने नियोजनपूर्वक काम सुरू आहे.

जे जुने कंत्राटदार काम सोडून गेले, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दिले.

या तब्बल 155 किलोमीटर रस्त्याच्या पाहणीदरम्यान त्यांनी पळस्पे, गडब, कोलाड, माणगाव, लोणेरे फाटा आणि कशेडी बोगदा या ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची भर पावसात पाहणी केली.

शेवटी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी या महामार्गावरील रस्त्यांची राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्याविषयी निर्देश दिले.

या पाहणी दरम्यान रायगड प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याविषयीचे निवेदन दिले.

०००

सहकारी बँकेच्या संचालकांनी नियमानुसार बँक चालवावी-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वाकड शाखेचे स्थलांतर

पुणे,दि.२६: सहकारी बँकांचे संचालक पद अतिशय महत्वाचे असून, संचालक मंडळाने ग्राहक हिताचे निर्णय घ्यावे आणि बँकिंग कायदे कडक केलेले असल्यामुळे नियमानुसार बँक चालवावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वाकड येथील शाखेचा नूतन वास्तूमध्ये स्थलांतर समारंभात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, संचालक माऊली दाभाडे, प्रविण शिंदे, शैलजा बुट्टे पाटील, प्रदीप कंद, विकास दांगट, मुख्याधिकारी अनिरुद्ध देसाई, सरव्यवस्थापक संजय शितोळे, उपसरव्यवस्थापक समीर राजपूत, सुनिल खताळ यावेळी उपस्थित होते.

बँकींग क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आले असून त्याचा वापर करुन बँकेने ग्राहकांना चांगली सेवा द्यावी. ग्राहकांच्या अडचणी सोडविण्यासाठी बँक प्रशासनाने काम केले पाहिजे. निष्काळजीपणे बँका चालविल्याने बँका अडचणीत आल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे संचालक मंडळाने आर्थिक शिस्तीचे पालन करावे, असे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक शून्य टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज देते, परंतु शेतकऱ्यांनी त्या कर्जाची वेळेवर परतफेड करतानाच सावकाराच्या मोहाला बळी न पडता गैरव्यवहार होणाऱ्या आणि गुंतवणूकीवर अधिक व्याज देणाऱ्या बँकामध्ये शेतकऱ्यांनी पैसे गुंतवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना घरबसल्या बँकेच्या सेवा मिळत असल्याने, ऑनलाईन व्यवहार करताना ग्राहकांनी काळजी घ्यावी  असे श्री.पवार म्हणाले. त्यांनी बँकेच्या वाटचालीस  शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिला लाभार्थ्यांना दीड हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून येत्या ३१ ऑगस्ट रोजी नागपूर येथे होणाऱ्या कार्यक्रमाद्वारे सुमारे दीड कोटी महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येणार असून, महिलांना कुटूंबाच्या गरजा पूर्ण करण्याबरोबरच आर्थिक उन्नती साधता येणार आहे, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तीन महिला खातेदारांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत झीरो बॅलन्स खाती सुरु करण्यात आली.

यावेळी बँकेचे संचालक मंडळ, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

 

द्राक्ष बागायतदारांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या द्राक्ष परिषद २०२४ परिषदेची सांगता

पुणे,दि.२६: राज्य शासनाच्यावतीने द्राक्ष बागायतदारांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. वाकड येथे २४ ते २६ ऑगस्ट या कालावधीत आयोजित द्राक्ष परिषदेचा समारोप उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, उपाध्यक्ष कैलास भोसले, खजिनदार सुनील पवार, माजी अध्यक्ष सुभाष आर्वे यावेळी उपस्थित होते.

जवळपास एकवीस हजार सभासद संख्या असलेल्या या संघाच्या वार्षिक बैठकीला कधी काळी आपण द्राक्ष उत्पादक म्हणून उपस्थित होतो असे सांगून, उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, तीन दिवसीय द्राक्ष परिषदेच्या माध्यमातून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने चर्चा केली आणि त्यांच्या समस्यांचा आढावा घेतला. हा संवाद असाच पुढे सुरू ठेवावा. विविध पिकांसाठी पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये द्राक्ष पीकाचा समावेश करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात.  मागेल त्याला सौरपंप  योजना अर्थसंकल्पामध्ये जाहीर केली असून त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. कृषी वाहिन्यांचे सौर उर्जिकरण करण्यात येत आहे. सौर कृषी पंप प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर वीजचे दर कमी होण्याबरोबर या योजनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सात हजार कोटी रुपये खर्चाच्या नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पाला शासनाने मान्यता दिली असून नाशिक, जळगांव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. नवनवीन तंत्रज्ञान आणि शेती अवजारांचा शेतकऱ्यांनी वापर करुन शेतीची कामे करावी असे आवाहन त्यांनी केले.

द्राक्ष निर्यातीसाठी अमेरिकेची बाजारपेठ मोठी असल्याने अमेरिकेत द्राक्ष निर्यात करणे, द्राक्ष वाहतूकीसाठी रेल्वेचे जाळे उभारणे, द्राक्षावर प्रक्रिया केल्यानंतर लागू होणारा जीएसटी कमी करणे, हळदी पिकाप्रमाणे बेदाण्यावर जीएसटी आकारणी, २००९-१० साली युरोपमध्ये निर्यात केलेल्या परंतु, नाकारण्यात आलेल्या द्राक्षांसाठी नुकसान भरपाई देणे हे प्रश्न केंद्र शासनाच्या कक्षेतील असून, केंद्रीय वाणिज्य मंत्री तसेच अन्य संबधित मंत्र्यांसमवेत यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात येईल आणि द्राक्ष उत्पादकांच्या समस्या सोडविण्यात येतील असे आश्वासन श्री.पवार यांनी दिले.

केंद्र शासनाची लखपती दीदी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे दीड हजार रुपयांची मदत अशा महत्त्वाच्या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येणार असून, महिलांना कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याबरोबरच आर्थिक उन्नती साधता येणार असल्याचे सांगून, पात्र महिलांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री.पवार यांनी केले.

यावेळी यशस्वी द्राक्ष उत्पादकांचा प्रातिनिधीक स्वरुपात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी  प्रास्ताविक केले. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर द्राक्षे निर्यात होतात, त्यापासून जवळपास ३ हजार ५०० रुपयांचे परकीय जलन प्राप्त होते अशी माहिती त्यांनी दिली.

बैठकीला द्राक्ष उत्पादक शेतकरी, शेतीसाठी आवश्यक अवजारे आणि औषधांचे उत्पादक, शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

शिक्षण विभागासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करणार -शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

बदलापूर आदर्श विद्यामंदिर प्रकरणी शिक्षण विभागाचा प्राथमिक अहवाल सादर

मुंबई, दि. २६ : बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिरमध्ये घडलेल्या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष यांच्या समितीचा प्राथमिक अहवाल शासनास सादर झाला आहे. या अहवालातील निरीक्षणे तपास यंत्रणांना सादर करण्यात येणार असून शिक्षण विभागाअंतर्गत स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

शिक्षण विभागाच्या वतीने बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिर शाळेमध्ये घडलेल्या घटनेसंदर्भात राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह यांच्या उपस्थितीत शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी चौकशी केली. हा चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना शालेय शिक्षण मंत्री श्री.केसरकर म्हणाले, या अहवालातील निरीक्षणांनुसार अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत सेविका असणे आवश्यक होते. त्यांना चौकशीदरम्यान आपले म्हणणे मांडण्याची संधी असताना त्या अनुपस्थित राहिल्याने त्यांचे काही म्हणणे नाही असे गृहीत धरुन त्यांना या प्रकरणी सहआरोपी करण्याची त्याचप्रमाणे ज्यांना या घटनेची माहिती मिळाली त्यांनी ती तातडीने वरिष्ठांना कळविली किंवा नाही, याचा तपास करण्याची शिफारस तपास यंत्रणांना करण्यात येत आहे. या अनुषंगाने शाळेतील संबंधित शिक्षिका, मुख्याध्यापक यांना नोटीस देण्यात येणार आहे. घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, दोषी ठरलेल्यांना पाठिशी घातले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुलींच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी शिक्षण विभागाने घेतली असल्याची माहिती मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी दिली.

शाळांच्या सुरक्षेसाठी आणि मुलांच्या संरक्षणासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये सीसीटीव्ही लावणे, त्याचे रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवणे आदींचा समावेश आहे. शाळांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. महिलांवरील अन्याय टाळण्यासाठी मोबाईलवर पॅनिक बटन देता येईल, यासाठी महिला व बालविकास तसेच गृहविभागामार्फत निर्णय घेण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमध्ये असे बटण देता येईल, यासाठी निर्णय घेतला जाईल, असे श्री.केसरकर यांनी सांगितले.

०००

बी.सी.झंवर/विसंअ

 

 

ताज्या बातम्या

हिंजवडी परिसरातील समस्या सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पुणे, दि. १३ : हिंजवडी, राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला अधिक चालना देण्याकरिता परिसरातील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने...

न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन नागपूर, दि. १३: महाराष्ट्रात देशातील सर्वात अत्याधुनिक सायबर न्यायसहायक वैज्ञानिक व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. आधुनिक सायबर प्रयोगशाळांसह मोबाईल न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा उभारल्या जात आहेत....

युवकांना स्वयंरोजगाराकरिता राज्य शासनाच्यावतीने सर्वोतोपरी सहकार्य-मंत्री मंगलप्रभात लोढा

0
पुणे, दि.१३: राज्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करुन त्यांचे भविष्य घडविणे राज्य शासनाची जबाबदारी असून स्वयंरोजगाराकरिता युवकांना राज्य शासनाच्यावतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन...

सामाजिक न्याय विभागाच्या शैक्षणिक सहाय्य योजना

0
वंचित घटकांतील नागरिकांना शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा या क्षेत्रात समान संधी आणि सामाजिक न्याय सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग...

कामठीतून जाणाऱ्या जबलपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण होणार

0
▪️कामठीत साकारणार भव्य व्यापारी संकुल नागपूर, दि. १२ : कामठी शहरातून नागपूर-जबलपूर हा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने कामठी शहरात होणाऱ्या वाहतूकीच्या कोंडीवर मात काढण्यासाठी आज...