मंगळवार, ऑगस्ट 19, 2025
Home Blog Page 572

जिल्ह्यातील करमाळा,  माढा, सोलापूर शहर मध्य व सोलापूर दक्षिण या मतदार संघामध्ये मतदान व मतमोजणी मधील आकडेवारीच्या तफावतीबाबत

सोलापूर, दिनांक 25 (जिमाका):- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या मतमोजणीचा निकाल दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर झाला. त्याअनुषंगाने राज्यातील विविध मतदार संघात निवडणुकीसाठी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतमोजणी दिवशी ईव्हीएम मध्ये आलेले आकडे यात तफावत असल्याची बाब राज्यातील विविध वृत्तपत्रात प्रसिध्द झाल्याचे निर्देशनास आले आहे.

त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 244-करमाळा, 245- माढा, 249—सोलापूर शहर मध्य, 251- सोलापूर दक्षिण या मतदार संघामध्ये मतदान व मतमोजणी मधील आकडेवारीत तफावत दिसून आली. त्याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे.

244- करमाळा या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानादिवशी 2 लाख 29 हजार 375 अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली. तथापि मतमोजणी दिवशी 2 लाख 29 हजार 377 अशी मतदानाची आकडेवारी दिसून आली. यामध्ये 2 मताची वाढ ही केंद्राध्यक्ष केंद्र क्र.115 यांनी नमुना 17 सी मध्ये मतांचा हिशोब लिहीताना चुकीची नोंद घेतल्याने झाली. सदरची मानवीय चुकीमुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालामध्ये तफावत दिसून येते.

245-माढा या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानादिवशी 2 लाख 67 हजार 691 अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली. तथापि मतमोजणी दिवशी 2 लाख 67 हजार 21 अशी मतदानाची आकडेवारी दिसून आली. यामध्ये 670 मताची घट आढळून आली. सदरील बाब ही केंद्र क्र.149 केंद्राध्यक्ष यांनी मॉकपोल वेळी नोंदवलेली मते CRC न केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे हस्त पुस्तिकामधील तरतुदीनुसार निवडून आलेल्या उमेदवाराची मतांची तफावत ही सदर केंद्रावर नोंदवण्यात आलेल्या मतापेक्षा अधिक असल्यामुळे सदर केंद्राची 670 मते मतमोजणी दिवशी मोजली नाहीत त्यामुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालामध्ये तफावत दिसून येते.

249-सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानादिवशी 2 लाख 291 अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली. तथापि मतमोजणी दिवशी 2 लाख 289 अशी मतदानाची आकडेवारी दिसून आली. यामध्ये 2 मताची घट आढळून आली. सदरील बाब ही केंद्राध्यक्ष केंद्र क्र.197 यांनी केंद्राध्यक्ष दैनंदिनीमध्ये 2 प्रदत्त मते ईव्हीएम मतांच्या हिशोबात गृहीत धरल्याने 665 मते नमुद केली तथापि मततोजणीच्या दिवशीच्या ईव्हीएम मध्ये 663 मते आढळून आली. सदरील मानवीय लेखन चुकीमुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालामध्ये तफावत दिसून येते.

251-सोलापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानादिवशी 2 लाख 23 हजार 624 अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली. तथापि मतमोजणी दिवशी 2 लाख 23 हजार 625 अशी मतदानाची आकडेवारी दिसून आली. यामध्ये 1 मताची वाढ दिसून आली. सदरील बाब केंद्राध्यक्ष यांनी 1 ईलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट चे मत गृहीत न धरल्यामुळे 676 मते असा हिशोब केंद्राध्यक्ष दैनंदिनीमध्ये नमुद केला. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएम मध्ये 677 मते आढळून आले. सदरील मानवीय लेखन चुकीमुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालामध्ये तफावत दिसून येते. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.

00000

 

६३ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतून कोल्हापूर येथे रंगणार नाट्यरंग सोहळा

कोल्हापूर, दि. २५ (जिमाका): सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. २५ नोव्हेंबर २०२४ पासून राज्यातील विविध २४ जिल्हास्तरावरील केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. राज्य नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर या केंद्रावरील स्पर्धेचे उदघाटन आज राजर्षी शाहू छत्रपती स्मारक येथे सायंकाळी ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. उद्घाटन अध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य परिषद, कोल्हापूर शाखा आनंद कुलकर्णी, उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परीक्षक अविनाश कोल्हे, प्रवीण शांताराम, पूर्वा खालगावकर उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते आबा कुलकर्णी, कोल्हापूर लिथो प्रेसचे हर्षराज कपडेकर, राजर्षी शाहू स्मारक भवन येथील ज्येष्ठ कर्मचारी आनंदा देसाई यांचा सन्मान त्यांचा नाट्य क्षेत्रातील योगदानाबद्दल करण्यात आला. पहिल्या दिवशी रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाने सुरुवात झाली.

सृजन आणि सर्जनचा अविष्कार वेगवेगळ्या सहभागी २० नाट्य स्पर्धकांमार्फत सादर होणार आहे. यामध्ये ऐतिहासिक पद्धतीचे नाट्य पाहायला मिळणार असून

कोल्हापूर जिल्ह्यातील नाट्य रसिकांना ती शाहू स्मारक नाट्यगृहात पाहायला मिळणार आहेत. दरवेळी केशवराव नाट्यगृहात होणारी ही स्पर्धा शाहू स्मारकात येत्या १५ डिसेंबर पर्यंत असणार आहे. उद्घाटन सोहळ्यात सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन प्रशांत जोशी यांनी पाहिले.

१५ डिसेंबर पर्यंत ही स्पर्धा सुरू असून जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे सहसंचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत मराठी रंगभूमी समृध्द करण्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेची गौरवसंपन्न ६२ वर्ष अविरत वाटचाल चालू आहे. ज्यातून अनेक नाटककार, अभिनेते, तंत्रज्ञ व दिग्दर्शक निर्माण झाले आहेत. त्यांनी नवनवीन प्रयोग करुन या उपक्रमास व मराठी रंगभूमीस समृध्द करुन वैश्विक स्तर प्राप्त करुन दिला आहे, अशी माहितीही श्री. पांडे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.

***

नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेऊ नये – निवडणूक निर्णय अधिकारी रोहन कुवर

धुळे, दि. २५ (जिमाका) : ०६ – धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात २०२४ ची निवडणूक शांततेत पार पडली आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान २० नोव्हेंबर २०२४ रोजी व मतमोजणीची २३ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रक्रिया पार पडली. यानंतर सोशल मीडियावर धुळे ग्रामीण मतदार संघातील अवधान मतदान केंद्रातील आकडेवारीबाबत अफवा व नागरिकांची दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत शहानिशा केल्यावर ती अफवा असून फेक न्यूज व्हायरल करून चुकीची माहिती समाजात पसरवली जात असल्याची माहिती ०६ – धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी रोहन कुवर यांनी दिली आहे. नागरिकांनी अफवा, चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या फेक न्यूजवर विश्‍वास ठेऊ नये. असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी रोहन कुवर यांनी केले आहे.

सोशल मीडियावर सोमवार, दि. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळपासून धुळे ग्रामीण मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांना अवधान मतदान केंद्रावर शून्य मते मिळाली असून त्या जोडीला एका फेक व्हीडीओ क्लिपचा वापर करून शून्य मते मिळाल्याने आंदोलन सुरू आहे असे भासविण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. प्रशासनाकडे ही बाब आल्यावर तिची शहानिशा, खातरजमा करण्यास सुरूवात झाली.

त्यानुसार धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात अवधान येथे २४७, २४८, २४९, २५० असे एकूण चार मतदान केंद्र होते. त्यातील मतदानाच्या आकडेवारीनुसार मतदान केंद्र क्रमांक २४७ वर काँग्रेसच्या उमेदवारास २२७, मतदान केंद्र क्रमांक २४८ वर काँग्रेसच्या उमेदवारास २३४, मतदान केंद्र क्रमांक २४९ वर काँग्रेसच्या उमेदवारास २५२ व मतदान केंद्र क्रमांक २५० वर काँग्रेसच्या उमेदवारास ३४४ मते मिळाली आहेत. अवधान येथे चार मतदान केंद्रावर तीन मते नोटासह एकूण २ हजार ८८१ मतदान झाले. त्यात काँग्रेसच्या उमेदवाराला एकूण १ हजार ५७ मते मिळाली व भाजपचे उमेदवार राघवेंद्र उर्फ रामदादा पाटील यांना एकूण १७४१ मते मिळाली आहे.

प्राप्त वस्तुस्थिती पाहता सोशल मीडियावर अवधान मतदान केंद्रावर काँग्रेसच्या उमेदवाराला शून्य मते मिळाली असा खोडसाळ, अफवा पसरविणारा, चुकीचा व दिशाभूल करणारा संदेश पसरविला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा फेक न्यूजला, आंदोलनाच्या फेक व्हीडीओला प्रतिसाद देऊ नये व अफवा पसरू नये. तसेच असा बोगस संदेश व्हायरल करू नये, अफवांना बळी पडू नये, असे आवाहनही धुळे ग्रामीण मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी रोहन कुवर यांनी केले आहे.

०००

 

८.२४ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ ची परतफेड

मुबंई, दि. २५ : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या  ८.२४ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ अदत्त शिल्लक रकमेची परतफेड दि. २३ डिसेंबर, २०२४  पर्यंत देय असलेल्या व्याजासह  दि. २४ डिसेंबर, २०२४ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा), सचिव श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

“परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१” अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. २४ डिसेंबर २०२४ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

सरकारी प्रतिभूती विनियम, २००७ च्या उप-विनियम २४ (२) व २४(३) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या  शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास/ त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे, त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि, बँक खात्याच्या संबधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, ८.२४ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस ” प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली.”, असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केलें जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.  रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोकऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील, असे वित्त विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

०००

वंदना थोरात/विसंअ/

 

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे जवाहरलाल दर्डा यांना अभिवादन

यवतमाळ, दि.२५ (जिमाका) : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक वर्ष मंत्री असलेले जवाहरलाल दर्डा यांच्या 27 व्या स्मृतिदिनानिमित्त राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ बागडे यांनी त्यांच्या समाधीस्थळास भेट देऊन अभिवादन केले.

यावेळी माजी खासदार डॉ. विजय दर्डा, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, नवनिर्वाचित आमदार बाळासाहेब मांगूळकर, किशोर दर्डा उपस्थित होते. दर्डा उद्यानातील प्रेरणास्थळ येथे आगमण झाल्यानंतर राज्यपालांनी समाधीस्थळास भेट देऊन पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी बाबूजींच्या अनेक लोकोपयोगी कामांचा उल्लेख करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

उद्यान परिसरात विणादेवी दर्डा व ज्योत्सना दर्डा यांच्या समाधीस्थळास भेट देऊन तेथे देखील पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी उद्यान परिसरात वृक्षारोपण केले तसेच नोंदवहित अभिप्राय नोंदविले. स्मृतीदिनानिमित्त आयोजित संगीत श्रद्धांजली सभेत देखील ते सहभागी झाले होते.

०००

 

पसंतीच्या वाहन नोंदणी क्रमांक आरक्षणासाठी ऑनलाईन सुविधा

मुंबई, दि. २५:  नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरू केल्यानंतर क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची प्रक्रिया परिवहन कार्यालयामार्फत राबविण्यात येते.  लिलावाची ऑफलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित अनारक्षित नोंदणी क्रमांक ऑनलाईन पद्धतीने आरक्षित करता येणार आहेत. त्यासाठी वाहन धारकांना पसंतीचा वाहन नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी परिवहन कार्यालयांमध्ये येण्याची गरज नाही. पसंतीचे वाहन नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांसाठी ‘द इंटीग्रेटेड सोल्युशन फॉर बुकींग ऑफ रजिस्ट्रेशन मार्क ऑफ चॉईस’  ही ऑनलाईन सुविधा कार्यान्वीत करण्यात आली आहे.

या सुविधेबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड जि. पुणे येथे चाचणी प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. ही सेवा पूर्णपणे फेसलेस (चेहराविना) स्वरूपाची असून त्यासाठी अर्जदारास आधार संलग्न मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. हा मोबाईल क्रमांक नोंद करून आधार ओटीपी किंवा मोबाईलद्वारे ओटीपी प्राप्त करून  https://fancy.parivahan.gov.in/  या संकेतस्थळावर पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करता येणार आहे.

सद्यस्थितीत नवीन मालिका सुरू केल्यानंतर नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची कार्यपद्धती पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने सुरू राहणार आहे. विविध संवर्गातील वाहनांसाठी नवीन मालिका सुरू केल्यानंतर प्रथम संबंधित कार्यालयामार्फत आकर्षक अथवा पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज स्वीकारले जातील. त्यामध्ये पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्याबाबत लिलावाची प्रक्रिया पूर्ण करून जास्तीच्या रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्या अर्जदारास संबंधित कार्यालयातील रोखपालद्वारे पसंतीच्या क्रमांकाचे शुल्क भरणा केल्याची पावती ऑफलाईन पद्धतीने जारी करण्यात येईल, असे परिवहन विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

ऑनलाईन पद्धतीने पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याचे टप्पे

अर्जदाराने https://fancy.parivahan.gov.in/  या संकेतस्थळावर जावून न्यु युजर / रजिस्टर नॉऊ यावर क्लिक करावे. यामध्ये संपूर्ण नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून ईमेल व मोबाईल क्रमांक ओटीपीद्वारे पडताळून घ्यावे. त्यानंतर संकेतस्थळावर लॉग इनमध्ये जावून ईमेल किंवा मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेले युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉग इन करावे. त्यानंतर अर्जदाराने ऑनलाईन उपलब्ध असणारे पसंती क्रमांक निवडावे. यासाठी घेण्यात येणारे शुल्क एसबीआय ई पे या पेयमेंट गेटवेवरून ऑनलाईन अदा करावे आणि प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर ई पावती प्रिंट काढून संबंधित वाहन विक्रेत्याकडे (डीलर)कडे नोंदणीसाठी देण्यात यावी.

 

०००

नीलेश तायडे/विसंअ/

बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई, दि. २५: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी – मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणार आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक मंडळामार्फत www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मंडळाचे सचिव देविदास कुलाल यांनी दिल्याचे मुंबई विभागीय सचिव ज्योत्स्ना शिंदे – पवार यांनी कळविले आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण, द्विलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा) दि. ११ फेब्रुवारी ते दि. १८ मार्च २०२५ या कालावधीमध्ये घेण्यात येतील. तर, प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा दि. २४ जानेवारी ते दि. १० फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये घेण्यात येतील.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी) दि. २१ फेब्रुवारी ते दि. १७ मार्च २०२५ या कालावधीमध्ये घेण्यात येतील. तर, प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि. ३ फेब्रुवारी ते दि. २० फेब्रुवारी २०२५ या कालावधीत घेण्यात येणार आहेत.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/ उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हाट्सॲप किंवा तत्सम माध्यमातून प्रसारित झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये, असेही राज्य मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

 

 

राज्य विधानसभा निवडणुकीची अधिसूचना, राजपत्राच्या प्रती राज्यपालांना सादर

मुंबई दि.२४: भारत निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची रविवारी (दि. २४) राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांना राज्य विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना – निवडून आलेल्या सदस्यांची यादी – व राजपत्राची प्रत सादर केली.

महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आले. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलम ७३ मधील तरतूदीनुसार, या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची नावे, भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक २४ नोव्हेंबर, २०२४ च्या अधिसूचनेन्वये महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. सदर राजपत्र व अधिसूचनेच्या प्रती निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी आज राज्यपालांना सादर केल्या. यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, भारत निवडणूक आयोगाचे सचिव सुमन कुमार दास व कक्ष अधिकारी निरंजन कुमार शर्मा उपस्थित होते.

 

०००

मतदानानंतरही ईव्हीएम पॉवरपॅक स्थिती ९९% दिसणे तांत्रिकदृष्ट्या वस्तुस्थितीजन्य -निवडणूक निर्णय अधिकारी, अणुशक्ती नगर

मुंबई दि २३: मतदानानंतरही ईव्हीएम पॉवरपॅक स्थिती 99% दिसणे ही बाब तांत्रिकदृष्ट्या वस्तुस्थितीजन्य असल्याचे 172-अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दिवशी 172- अणुशक्तीनगर मतदारसंघातील मतदान केंद्रात मतदानादिवशी ईव्हीएम मशीन पूर्ण दिवस वापरल्यानंतरही काही CUs मध्ये EVM पॉवर पॅक स्थिती 99% दर्शविली गेली याबाबत एक उमेदवार यांनी आक्षेप नोंदविला होता.

भारत निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम मशीन संदर्भातील मार्गदर्शक सूचनांनुसार याबाबत वस्तुस्थितीदर्शक खुलासा करताना 172- अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे की, EVM पॉवर पॅक 2000 मतांसह 1 CU सह 4 BU ला जोडणी देण्यासाठीची रचना आहे. जेंव्हा क्षमता जास्त असते तेव्हा व्होल्टेज खूप हळूहळू कमी होते परंतु जेंव्हा बॅटरीची क्षमता ‘थ्रेशोल्ड’च्या खाली कमी होते तेव्हा ते वेगाने घसरते. एकच BU आणि 1000 पेक्षा कमी मते नोंदविली असताना हलके विद्युत प्रवाह असल्यास, बॅटरीचा प्रवाह कमी असतो आणि आऊटपुट व्होल्टेज 7.4V च्या खाली जाऊ शकत नाही आणि त्यामुळे 99% क्षमता दर्शविली जाऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत ही एक सर्वसामान्य स्थिती असून याबाबतचा आक्षेप अयोग्य असून अशाप्रकारे गैरसमज पसरविणे अयोग्य असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.

०००

 

 

‘संविधान दिना’निमित्त ‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात विशेष मुलाखतींचे प्रसारण

मुंबई, दि. २४: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘संविधान दिना’ निमित्त विशेष मुलाखतींचे प्रसारण होणार आहे. राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक व विचारवंत प्रा. अशोक चौसाळकर यांची दि. २५ व २६ नोव्हेंबर रोजी आकाशवाणीवरील ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत होईल. अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि विचारवंत प्रा. डॉ. नरेंद्र जाधव यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात दि. २७, २८, २९ व ३० नोव्हेंबर रोजी तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मंगळवार दि. २६ रोजी मुलाखत प्रसारित होणार आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समितीची स्थापना झाली. अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला आणि तेव्हापासून 26 नोव्हेंबर हा दिवस देशात ‘संविधान दिवस’ साजरा केला जाऊ लागला. या दिनानिमित्त संविधान निर्मितीची प्रक्रिया, इतिहास, वैशिष्टे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राज्यघटना निर्मितीतील योगदान या विषयावर ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी घेतलेली प्रा. चौसाळकर यांची मुलाखत ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दि. २५ व २६ नोव्हेंबर रोजी तर निवेदक सुषमा जाधव यांनी घेतलेली प्रा. डॉ. जाधव यांची मुलाखत दि. २७, २८, २९ व ३० रोजी आकाशवाणीची सर्व केंद्रांवरुन सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार असून ‘न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर देखील ही मुलाखत ऐकता येईल.

प्रा. डॉ. जाधव यांची मुलाखत ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मंगळवार दि. २६ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

०००

ताज्या बातम्या

ग्रामीण भागातील जनतेलाही आरोग्याच्या उत्तम सुविधा देऊ – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
नागपूर,दि. १८: ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्याच्या चांगल्यातल्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासन कटिबद्ध आहे. नागपूर जिल्ह्यात आपण भक्कम वैद्यकीय सुविधांचे जाळे निर्माण केले...

नागपूरलगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी परिपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणार –  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन विकास कामे प्रस्तावित करण्याचे निर्देश जिल्हा वर्षिक योजनेंतर्गत १ हजार ३२७ कोटी नियतव्यय मंजूर नागपूर,दि. १८: महानगराचा वाढता विस्तार...

समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा -पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
जळगाव दि. १८ (जिमाका): पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली धरणगाव पंचायत समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल...

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते अवयवदान करणाऱ्यांचा सत्कार

0
यवतमाळ, दि. १८ (जिमाका): राज्य शासनाच्या अवयवदान पंधरवड्यादरम्यान अवयवदानाकरीता इच्छुक व्यक्तींकडून तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील व सर्व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी...

किसान समृद्धी प्रकल्पांमुळे माल थेट बाजारपेठेत विकण्याची संधी – पालकमंत्री संजय राठोड

0
जिल्हा वार्षिक योजनेतून प्रकल्पांवर १२ कोटी ४७ लाखाचा खर्च यवतमाळ, दि. १८ (जिमाका): वसुंधरा महिला किसान समृद्धी कार्यक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या धान्य प्रतवारी, ग्रेडिंग व...