गुरूवार, ऑगस्ट 14, 2025
Home Blog Page 544

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांचे अभिनंदन

नागपूर, दि. 18 :  साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. या पुरस्कारामुळे मराठी समीक्षा क्षेत्रातील एका व्रतस्थ साहित्यिकाचा सन्मान होत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे.

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या राष्ट्रीय साहित्य संस्थेच्यावतीने साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यात डॉ. रसाळ यांच्या ‘विंदांचे गद्यरूप’ या समीक्षात्मक पुस्तकाला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, डॉ रसाळ यांचे मराठी साहित्य विश्वातील योगदान अमूल्य असे आहे. मराठी भाषेचे अध्यापन, संशोधन, संपादन आणि समीक्षा असा त्यांचा चौफेर विहार राहिला आहे. विशेषतः त्यांचे मराठी काव्यविषयक संशोधनात्मक लेखन मौलिक असे आहे. समीक्षेतून कठीण विषय सहज-सुलभपणे समजावून देणारी त्यांची शैली नवोदितांना आश्वासक वाटते, यातच त्यांचे मोठेपण आहे. मराठी भाषा जतन, संवर्धन तसेच साहित्य विषयक चळवळीतील संस्था, समित्यांवरही डॉ. रसाळ सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांच्या समीक्षात्मक लेखनाला राष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही दाद नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. डॉ. रसाळ आजही तितक्याच तडफेने लेखन, संशोधनात कार्यरत आहेत. त्यांच्या हातून यापुढेही मराठी साहित्याची अशीच अखंडित सेवा घडत राहो. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो या शुभेच्छांसह मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी डॉ. रसाळ यांचे अभिनंदन केले आहे.

जीएसटी परिषदेत मंत्री आदिती तटकरे करणार राज्याचे प्रतिनिधीत्व; जीएसटीबाबत अधिकाऱ्यांकडून घेतला सविस्तर आढावा

SPK DGIPR Mantralay Mumbai

नागपूर, दि. १८ : राजस्थानमधील जैसलमेर येथे होणाऱ्या डिसेंबर २०२४  च्या जीएसटी परिषदेमध्ये मंत्री आदिती तटकरे या राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर मंत्री कु. तटकरे यांनी विधानभवन येथे झालेल्या बैठकीमध्ये  अधिकाऱ्यांकडून जीएसटीबाबत सविस्तर आढावा घेतला.

या बैठकीस राज्य कर आयुक्त आशिष शर्मा, विक्रीकर सह आयुक्त किरण शिंदे, विक्रीकर उपायुक्त नंदकुमार दिघे आदी उपस्थित होते.

SPK DGIPR Mantralay Mumbai

यावेळी मंत्री कु. तटकरे यांनी यापूर्वी झालेल्या ‘जीएसटी’ परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्याने सुचविलेल्या सुधारणा, नव्याने सुचवावयाच्या सुधारणा, करांमध्ये विविध उद्योग, घटक यांना द्यावयाची सूट तसेच कररचनेमध्ये सुलभता आणि करदात्यांच्या व्याख्या सुस्पष्ट असण्याबाबतची माहिती घेतली. इलेक्ट्रीक वाहने, विमा हप्ते, कृषी उत्पादने यासारख्या क्षेत्रांना करांमध्ये सूट देण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. तसेच काही क्षेत्रांमध्ये करावयाची करकपात आणि करवाढ, त्यामुळे महसुलामध्ये येणारा फरक याची माहितीही मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी घेतली.

जैसलमेर येथे दि. २० व २१ डिसेंबर २०२४ असे दोन दिवस ही जीएसटी परिषद होणार आहे. तसेच या परिषदेवेळी अर्थसंकल्पाविषयीही बैठक होणार आहे. यामध्ये राज्यांच्या अर्थसंकल्पाकडून असणाऱ्या अपेक्षांची चर्चा करण्यात येणार आहे. याविषयीही या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

नागपूर,दि. 18 : माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला अधिक माहितीसक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’  ने उपलब्ध करून दिला आहे. आपल्या मातृभाषेतून मिळणाऱ्या ज्ञानाला ज्या मर्यादा होत्या, त्या मर्यादा आता ‘एआय’ च्या माध्यमातून कमी झाल्या आहेत. ज्या भाषेत आपल्याला माहिती हवी आहे, त्या भाषेत ती सहजरित्या उपलब्ध होते. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेपासून दूर राहण्याऐवजी तंत्रज्ञान समजून घेणे आणि आपल्या वापरातून ते अधिक परिपूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह  यांनी केले.

नागपूर प्रेस क्लब आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक नागपूर कार्यालयाच्या वतीने ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स इन जर्नालिझम’ (कृत्रिम बुद्धिमत्ता  आणि पत्रकारिता) या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ज्येष्ठ पत्रकार तथा माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर-अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे, माहिती संचालक किशोर गांगुर्डे, दयानंद कांबळे उपस्थित होते.

श्री. ब्रिजेश सिंह म्हणाले, कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले की नोकऱ्या कमी होतील, अशी एक भीती व्यक्त होत असते. मात्र तंत्रज्ञानातून नवनवीन संधी निर्माण झाल्याची प्रचिती आपण आजवर घेत आलो आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीतही अशीच भीती व्यक्त केली जात आहे. वास्तविक याचा परिपूर्ण वापर जर करता आला नाही, तर संबंधितांना आपल्या नोकऱ्या गमाविण्याची भीती अधिक आहे. हे माध्यम वापरताना मात्र प्रत्येकाला अगोदर स्वत:ला सिद्ध करावे लागेल. ‘एआय’च्या माध्यमातून जी काही माहिती आपल्यासमोर येईल, त्या माहितीला अधिक पडताळून घेणे, त्यात असलेल्या त्रुटी दुरूस्त करून अधिक परिपूर्ण करणे, अशा माहितीला नैतिक व संवैधानिक दृष्टीने पडताळून पाहणे व दक्ष राहून चुका दुरुस्त करणे, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला.

आज विविध समाजमाध्यमांचा लोकांवर प्रचंड प्रभाव आहे. यात अनेक धोके आहेत. एखादी व्यक्ती गाफील राहून आपल्या मोबाईलवर आलेल्या चुकीच्या संदेशाला बळी पडला तर त्याला आर्थिक फसवणुकीलाही तोंड द्यावे लागते, याची अनेक उदाहरणे आहेत. यातील भीती बाजूला सारून आपण दक्ष असायला हवे. इतर प्राणीमात्रांबद्दल व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून ज्या मानवतेच्या दृष्टीने आपण त्यांना पाहतो, त्याच दृष्टीमध्ये संवैधानिक व सत्य -असत्य या परिभाषेत सावध होत ‘एआय’ ला आपण जवळ केले पाहिजे. कोणतीही उत्सुकता ही ज्ञानाच्या स्त्रोतांपर्यंत आपल्याला घेऊन जात असते. पूर्वी या उत्सुकतेला आपण गुगलची जोड देऊन समाधान करून घेतले. आता या उत्सुकतेचे अधिक पुढचे पाऊल म्हणून ‘एआय’मार्फत मिळणाऱ्या माहितीकडे पाहावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे म्हणाले, आपल्यामध्ये मुळात असलेल्या गुणवत्तेसोबतच कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. भारतविरोधी कृत्य करण्यासाठी ‘एआय’चा वापर होणार नाही, यासाठी ‘एआय’ची माहिती भारतीय पद्धतीने तयार करणे आवश्यक आहे. मराठी भाषेलासुद्धा ‘एआय’शी जोडावे लागणार आहे. तसेच अशा कार्यशाळांचे अधिकाधिक आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही राहुल पांडे यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी केले. संचालन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी तर आभार माहिती संचालक दयानंद कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार बाळ कुलकर्णी, धमेंद्र जोरे, भूपेंद्र गणवीर यांच्यासह विविध माध्यमातील पत्रकार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच राज्यातील जिल्हा माहिती कार्यालये आणि विविध पत्रकारिता संस्थांनी ऑनलाईन पद्धतीने व्याख्यानाचा लाभ घेतला.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा सुयोग येथे पत्रकारांशी संवाद

नागपूर, दि. १८ : मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज सुयोग पत्रकार सहनिवास येथे भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला.

शिबिरप्रमुख प्रवीण पुरो, सहशिबिरप्रमुख तथा मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी मंत्री श्री. लोढा यांचे स्वागत केले.

राज्यातील रोजगार निर्मिती क्षेत्र, पायाभूत सुविधा, केंद्र व राज्य शासनाकडून विकासासाठी होत असलेले प्रयत्न आदी विविध बाबींची माहिती मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी दिली. कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी शासनाकडून कौशल्य विकास कार्यक्रमावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मंत्री श्री. लोढा यांनी सुयोग येथे पत्रकारांसाठी उपलब्ध व्यवस्थेची पाहणी केली. श्री. डोईफोडे यांनी आभार मानले.

०००

 

विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून सदस्य चैनसुख संचेती यांची नियुक्ती जाहीर

नागपूर, दि. १८ : विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभा कामकाजासाठी सदस्य चैनसुख संचेती यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली.

0000

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण

नागपूर, दि. १८ : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे अनावरण करण्यात आले. www.home.maharashtra.gov.in या नावाचे अद्ययावत असे संकेतस्थळ आता माहितीजालकावर उपलब्ध झाले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी झालेल्या गृह विभागाच्या बैठकीत संकेतस्थळाचे अनावरण झाले. या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी तसेच अन्य विविध विभागांचे अतिरिक्त सचिव, प्रधान सचिव तसेच गृह विभाग, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

हे नवीन संकेतस्थळ वापरकर्त्यासाठी सुलभ करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर विविध जलद दुवे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र कारागृह विभाग, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क (ऑनलाईन सेवा), आपले सरकार, महाराष्ट्र राज्य पोलीस, बृहन्मुंबई पोलीस,महाराष्ट्र सागरी मंडळ, महाराष्ट्र शासन, मोटार वाहन विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी, केंद्रीय अन्वेषण ब्युरो, पोलीस संशोधन केंद्र, (सीपीआर) पुणे, गुन्हे अन्वेषण विभाग पुणे, महाराष्ट्र सुरक्षा दल, मुंबई वाहतूक पोलीस, एनजेडीजी | राष्ट्रीय न्यायिक डेटा ग्रिड, देशाच्या सेवेत भारतीय पोलीस, राष्ट्रीय तुरुंग माहिती पोर्टल, ई-प्रोसिक्युशन आदी विभागांचे जलद दुवे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

0000

राज्यात सुरु असलेल्या, प्रस्तावित प्रकल्पांना ‘एडीबी’ने मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूरदि. 17 : राज्याच्या सर्वांगीणसर्वसमावेशक आणि गतिमान विकासासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉरमेशनच्या (MITRA ‘मित्रा’) माध्यमातून आरोग्यग्रामीण रस्ते वाहतूककौशल्य विकास आणि बांबू प्रकल्प या क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे. या प्रकल्पांची गती वाढविण्यासाठी राज्यात सुरु असलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या प्रकल्पांना आशियाई विकास बँकेने (ADB) मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावेअसे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकेला केले आहे. एडीबीच्या संचालक मिओ ओका यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विधानभवन परिसरातील मंत्रिमंडळ सभागृहात आशियाई विकास बँकेसंदर्भातील विविध विषयांबाबत बैठक झाली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीराज्याच्या विकासासाठी ग्रामीण भागाचा वेगाने विकास होणे गरजेचे आहे. त्यामुळे रस्त्यांच्या माध्यमातून एक हजार लोकसंख्येवरील सर्व गावे विकसित भागाशी जोडण्यात यावीत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे उन्नतीकरणविषय-शाखांची संख्या वाढविणे आदी माध्यमातून अतिरिक्त 75 हजार जागा वाढविण्यात याव्यात. नागरिकांच्या आरोग्यावर अधिकाधिक भर देतानाच गर्भाशयमुखाच्या कर्करोगावरील उपचारांवर भर देण्यात यावा. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचालसीचा उपयोग करावाअसे निर्देशही त्यांनी यावेळी सचिवांना दिले.

बांबू लागवड अभियानातून शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध करण्याबरोबरच जंगल क्षेत्रामध्ये वाढीसाठी विविध उपाययोजना राबविण्यात याव्यात. त्यासाठी रोपवाटिकांमध्ये बांबू रोपे उपलब्ध करून द्यावीत. मराठवाड्यातील पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड करून जंगल क्षेत्रामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करावा. राज्यातील महत्त्वाकांक्षी अभियानांना गती देण्यासाठी मुख्य सचिवांनी प्रमाणित प्रक्रिया (एसओपी) ठरवून द्यावी. अभियानाचा कालावधीसंबंधितांच्या जबाबदाऱ्या याबाबत स्पष्टता ठेवावीअशा सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, ‘मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, ‘एडीबीच्या संचालक मिओ ओकावित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ताआरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरनियोजन-महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरामुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेग्रामविकासचे प्रधान सचिव एकनाथ डवलेवने विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डीपर्यावरणचे प्रधान सचिव प्रवीण दराडेमुख्यमंत्र्यांचे सचिव सचिव श्रीकर परदेशी यांच्यासह एडीबीचे विविध विषयतज्ज्ञ उपस्थित होते.

0000

संतोष तोडकर/विसंअ/

 

कृत्रिम बुध्दिमत्ता आणि पत्रकारिता या विषयावर प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांचे उद्या व्याख्यान

नागपूर, दि. १७ : कृत्रिम बुध्दिमत्ता आणि पत्रकारिता या विषयावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांचे उद्या बुधवार दिनांक १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रेस क्लब येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

प्रेस क्लब ऑफ नागपूर व संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारितेमध्ये होत असलेल्या कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर या विषयावर आयोजित व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार व माजी राज्य माहिती आयुक्त श्री. राहुल पांडे हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. या व्याख्यानास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेस क्लब ऑफ नागपुरचे अध्यक्ष श्री. प्रदीप मैत्र तसेच नागपूर व अमरावती विभागाचे संचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे यांनी केले आहे.

00000

महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

नागपूर, दि. 17 – राज्यातील गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या www.mahagosevaayog.org या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे अऩावरण करण्यात आले.

विधानभवनातील समिती सभागृहात या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. राज्यामध्ये देशी गोवंशाचे संवर्धन, संरक्षण व कल्याण करण्यासाठी आणि त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण करण्यासाठी, गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.

राज्यात 1 कोटी 39 लाख गोवंश असून त्यामध्ये 13 लाख देशी गायी असल्याची माहिती अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. ‘गो टेन’ अंतर्गत गो संगोपन, गो संवर्धन, गो संरक्षण, गोमय मुल्यवर्धन, गोशाळा, गोरक्षक, गोपालक, गो आधारीत शेती, गो साक्षरता आणि गो पर्यटन या माध्यमातून गायींच्या संवर्धनाचे काम करण्यात येत आहे. राज्यात देशी गायींसाठी विशेष दुग्धशाळा (डेअरी) निर्माण करण्यात येतील, असेही श्री. मुंदडा यांनी सांगितले.

आयोगामार्फत देशी गोवंशाचे संवर्धन, संरक्षण व कल्याण करणे व त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण केले जात आहे. गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोवंश संस्थांची नोंदणी,  गोवर्धन गोवंश सेवा केन्द्र योजना व इतर योजना अंतर्भुत करणे व त्याची अंमलबजावणी करणे,  पशुआरोग्य सेवांचे प्रचालन करणे, दुर्बल, वयस्क व रोगग्रस्त पशुंचे व्यवस्थापन, काळजी व उपचार यांची सुनिश्चिती, पशुंची काळजी घेणाऱ्या व्यक्तींचे प्रशिक्षण आणि जनजागृती केली जात असून त्याबाबतची माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातून सार्वजनिक करण्यात आली आहे.  सर्वसामान्य जनता आणि गोवंश संवर्धन करणाऱ्या संस्थांसाठी या संकेतस्थळाच्या माध्यमातून एका क्लिकवर माहिती उपलब्ध करून दिली आहे.

संकेतस्थळाच्या अनावरण प्रसंगी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, गोसेवा आयोगाचे सदस्य सर्वश्री संजय भोसले, डॉ. नितीन मार्कंडेय, उद्धव नेरकर, सुनील सूर्यवंशी, सनत कुमार गुप्ता, दीपक भगत आदी उपस्थित होते.

00000

 

महामेट्रो आणि आशियाई विकास बँक यांच्यात प्रकल्प करार; नागपूर मेट्रो प्रकल्प टप्पा-२ साठी १५२७ कोटींचे अर्थसहाय्य

नागपूर, दि. १७ नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून १ हजार ५२७ कोटी रुपयांचे (२०० मिलियन डॉलरअर्थसहाय्य मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात यासंदर्भात प्रकल्प करार करण्यात आला. या प्रकल्पामुळे नागपूर शहरासह परिसराच्या विकासाला आणखी गती मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आणि आशियाई विकास बँकेच्या संचालक मिओ ओका यांनी अर्थसहाय्याच्या करारावर सह्या केल्या. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या टप्पा-२ साठी आशियाई विकास बँक (ADB) आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक (EIB) यांच्याकडून एकूण ३५८६ कोटी रुपयांचा वित्तपुरवठा करण्यात येणार आहे. त्यापैकी १५२७ कोटी रुपये आशियाई विकास बँकेकडून मिळणार असून त्यासंदर्भातील करार करण्यात आला. महामेट्रोला हा वित्तपुरवठा जपानी येन या चलनामध्ये मिळणार आहे. यामुळे कर्जावर तुलनेने कमी व्याज द्यावे लागणार आहे. महामेट्रोला या कर्जाची रक्कम केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (MoHUA) माध्यमातून उपलब्ध केली जाणार आहे.

नागपूर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-२ हा खापरी ते एमआयडीसी इएसआर दरम्यान १८.५ किलोमीटर, ऑटोमोटिव्ह स्क्वेअर ते कन्हान नदी दरम्यान १३ किलोमीटर, प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्टनगर दरम्यान ५.६ किलोमीटर आणि लोकमान्यनगर ते हिंगणा दरम्यान ६.७ किलोमीटर असा एकूण ४३.८ किलोमीटरचा असणार आहे. या मेट्रो प्रकल्पाचा लाभ नागपूर परिसरातील १० लाख रहिवाशांना होणार आहे.

यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव आश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, विविध विभागांचे सचिव, आशियाई विकास बँकेचे विविध विषयतज्ज्ञ यांच्यासह महामेट्रोचे संचालक (एसपी) अनिलकुमार कोकाटे, संचालक (वित्त) हरेंद्र पांडे आदी उपस्थित होते.

0000

संतोष तोडकर/विसंअ/

 

 

 

 

ताज्या बातम्या

सुलवाडे-जामफळ-कनोली योजनेचे काम लवकरच पूर्ण होणार – पालकमंत्री जयकुमार रावल यांची माहिती

0
सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेचे ८१ टक्के काम पूर्ण; पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडून कामाचे कौतुक धुळे,दिनांक 14 ऑगस्ट, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा व...

धुळे व नंदुरबार जिल्ह्याला शौर्य आणि बलिदानाचा गौरवशाली वारसा धुळ्यातील नूतन शहीद स्मारक त्यांच्या बलिदानाची...

0
पोलीस मुख्यालयातील शहीद स्मारकाचे लोकार्पण संपन्न धुळे, दिनांक 14 ऑगस्ट, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे व नंदुरबार जिल्ह्याला शौर्य आणि बलिदानाचा गौरवशाली वारसा आहे. धुळे जिल्हा...

प्राचीन काळातील प्रकाशित नसलेले ज्ञान, संदर्भ  नागरिकांसमोर आणण्याची गरज – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
भारतीय ज्ञान प्रणाली-दृश्यश्रव्य कक्ष आणि 'पुनः' छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे, दि.14: प्राचीन काळातील प्रकाशित नसलेले ज्ञान, संदर्भ नागरिकांसमोर आणून त्याचे जतन व संवर्धन डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि...

मुला-मुलीत भेद करण्याची मानसिकता बदला – पालकमंत्री संजय शिरसाट

0
कन्या सन्मान दिवस छत्रपती संभाजीनगर, दि.१४ (जिमाका) - जन्म देणारी आई, आयुष्यभर साथ देणारी पत्नी, जिव्हाळा लावणारी बहिण हवी असतांना मुलीचा जन्म नको, ही मुला-मुलीत...

रुग्णसेवेत शासनासोबत खाजगी संस्थांचाही सहभाग – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
कर्नावट येथील कर्करोग रुग्णालयाचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर, दि.१४(जिमाका) - रुग्णांना  उपचार सुविधा देण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचे शासनाचे...