मंगळवार, जुलै 22, 2025
Home Blog Page 510

मुंबई शहर जिल्ह्यात ८५ वर्षांवरील १९२२ ज्येष्ठ नागरिक व १८७ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

मुंबई, दि. १५ : भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता दि. २० नोव्हेंबर, २०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व प्रपत्र १२ ड भरून दिलेल्या ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना टपाली मतदान पथकामार्फत गृह टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेत मुंबई शहर जिल्ह्यात १९२२ ज्येष्ठ नागरिक व १८७ दिव्यांग अशा एकूण २१०९ मतदारांनी आतापर्यंत गृह टपाली मतदान केले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यात १३ नोव्हेंबरपासून ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांच्या गृह टपाली मतदानाला प्रारंभ करण्यात आला आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील २१३९ ज्येष्ठ नागरिक मतदार व २१७ दिव्यांग मतदार गृह टपाली मतदानासाठी पात्र ठरले आहेत. १६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत गृह टपाली मतदान घेतले जाणार आहे.

धारावी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २१ पैकी २० ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर १२ पैकी ०९ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण २९ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २८ पैकी २३ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर २७ पैकी १६ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण ३९ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

वडाळा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २५८ पैकी २२९ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर २४ पैकी २२ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण २५१ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

माहीम विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण ६२१ पैकी ५५८ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर २५ पैकी २३ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण ५८१ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

वरळी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण १२१ पैकी १११ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर २० पैकी १९ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण १३० मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

शिवडी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २२६ पैकी २०१ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर ३४ पैकी ३२ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण २३३ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

भायखळा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण १९० पैकी १६७ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर ४२ पैकी ३९ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण २०६ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

मलबार हिल विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २८६ पैकी २६९ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर ११ पैकी १० दिव्यांग मतदारांनी अशा एकूण २७९ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण ११८ पैकी १०३ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर १३ पैकी ११ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण ११४ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

कुलाबा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २७० पैकी २४१ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर ०९ पैकी ०६ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण २४७ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

या सर्व मतदारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र १२ ड भरून जमा केले होते. प्रपत्र १२ ड भरून जमा केलेल्या अर्जदारांचे गृह टपाली मतदान घेण्यात आले आहे.

००००

आचारसंहिता भंगाच्या ७३६० तक्रारी निकाली; ५४६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई, दि. १५ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ७ हजार ४०० तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ७ हजार ३६० तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

५४६ कोटी ८४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ५४६ कोटी ८४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

००००

मतदार जनजागृतीसाठी धावले चंद्रपूरकर; मिनी मॅरॅथॉन ‘­रन फॉर व्होट’ मध्ये विद्यार्थी आणि नागरिकांचा सहभाग

चंद्रपूर, दि. 15 : येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग वाढवावा, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी मिनी मॅरेथॉन ‘रन फॉर व्होट’ चे आयोजन करण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये विद्यार्थी, तरुण- तरुणी आणि नागरिकांनी सहभागी होऊन मतदार जनजागृतीचा संदेश दिला.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयद्वारा मतदार जनजागृतीकरीता मिनी मॅरेथॉन ‘रन फॉर व्होट’ चे आयोजन आझाद बगीचा, चंद्रपूर येथे करण्यात आले होते. चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार यांनी मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन केले. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार विजय पवार, रविंद्र भेलावे, महानगर पालिकेचे उपायुक्त मंगेश खवले, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, उपशिक्षणाधिकारी निवास कांबळे, नायब तहसीलदार श्री. गाद्देवार व इतर नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मिनी मॅरॅथॉनला सुरुवात झाली. ‘माझे मत माझा अधिकार’, ‘होय मी मतदान करणारच’, ‘आपण सगळे मतदान करू या – लोकशाहीला बळकट करू या’ अशा विविध घोषवाक्यांसह चंद्रपूरकरांनी यात सहभाग नोंदविला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समारोप व विजेत्यांना पुरस्कार वितरण : सदर मॅरेथॉन आझाद बगीचा पासून गिरनार चौक, गांधी चौक, जटपुरा गेटला वळसा घालून गेल्यानंतर आझाद बगीचा या ठिकाणी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी आपण सर्वांनी जनजागृती करावी, असे आवाहन केले. मिनी मॅरेथॉन मध्ये मुले, मुली व ज्येष्ठ नागरिक या तिन्ही गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त धावपटुला 3 हजार, 2 हजार, 1 हजार रुपयाचा धनादेश, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यांचा होता सहभाग : या रॅलीमध्ये विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सोबतच  जिल्हा परिषद, महानगरपालिकेचे शिक्षक, चंद्रपूर योग नृत्य परिवार, फन ग्रुप, पतंजली ग्रुप, पोलीस भरती ग्रुप, कराटे ग्रुप, नेटबॉल ग्रुप, यांनी जिल्हा प्रशासनामार्फत दिलेल्या टी शर्ट, टोपी परिधान करून मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला. सहभागी सर्व धावपटुंना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व खाऊचे वाटप करण्यात आले.

समारोपीय कार्यक्रमाचे संचालन अविनाश जुमडे यांनी तर आभार विस्तार अधिकारी धनपाल फटिंग यांनी मानले. यावेळी मनपाचे प्रशासन अधिकारी श्री. नीत, निखिल तांबोळी, अविनाश जुमडे, अनिल दागमवार, सुरेंद्र शेंडे, प्रशांत मत्ते, आत्राम सर, गेडाम सर आदी उपस्थित होते.

०००००

सर्व यंत्रणांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन समन्वयाने काम करावे – विभागीय आयुक्त राजेश देशमुख

रायगड (जिमाका) दि.15 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये सर्व शासकीय विभागांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन समन्वयाने काम करावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राजेश देशमुख यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, अपर पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मी नांदेडकर, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बढे, निवासी उजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे यांसह  विविध समित्यांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त राजेश देशमुख मार्गदर्शन करताना म्हणाले की, निवडणूकीतील प्रत्येक दिवस महत्वाचा असून ही निवडणूक इतर निवडणूकीपेक्षा वेगळी आहे.  निवडणूक आयोगाने आपल्याला ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे. मतांची टक्केवारी वाढावी यासाठी दिव्यांग मतदार, 85 वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिक यांना आयोगाने घरून मतदान करण्याची (होम वोटिंग) सुविधा दिली आहे. दिव्यांग मतदारांचे 100 टक्के मतदान होईल या दृष्टीने नियोजन करावे. दिव्यांगांना सहजतेने मतदान करता यावे यासाठी त्यांना द्यावयाच्या सुविधा सर्व मतदान केंद्रांपर्यंत उपलब्ध करण्यात याव्यात.  तसेच मतमोजणी झाल्यानंतर व्हीव्हीपॅट व ईव्हिएम  मशीन  स्ट्राँगरुममध्ये व्यवस्थितपणे ठेवण्याची योग्य ती दक्षता घेण्यात यावी.  मतदानावेळी एखादी मशीन बंद पडल्यास ती मशीन तात्काळ दुरुस्त करण्याची कार्यवाही झाली पाहिजे याकडे विशेष लक्ष द्यावे. सर्व यंत्रणानी लोकसभा निवडणूक-2024 मध्ये अत्यंत चांगल्या पध्दतीने काम केल्याबद्दल विभागीय आयुक्त श्री.देशमुख यांनी सर्वांचे अभिनंदन केले. मागील निवडणुकीच्या तुलनेत या निवडणूकीतील मतदान अधिक व्हावे, या दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. निवडणुकीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. कायदा व सुव्यवस्था व पोलीस बंदोबस्त आराखडा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात यावा. मतदान जनजागृती, अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाबाबतही निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

 पोस्टल व होम वोटिंग द्वारे होणारे मतदान मतपत्रिकेवर होत असून या दृष्टीने यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी यांनी काळजीपूर्वक काम करावे. सी-व्हीजील, आचारसंहिता कक्ष, जिल्हा निवडणूक सनियंत्रण कक्ष याकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारी सोडविण्यासाठी सतर्कता राखावी, अशा सूचना विभागीय आयुक्त श्री. राजेश देशमुख यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे निवडणूक विषयक विविध समितीनिहाय   कामकाजाची माहिती दिली. जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता कक्ष, मतदार जागृकता व सहभागिता कार्यक्रम (स्वीप), सी व्हिजील ॲप, सक्षम ॲप, ईव्हीएम, 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार यांचे मतदान,  पोस्टल मतदान व होम वोटिंग प्रक्रिया, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र सरमिसळ प्रक्रिया, सूक्ष्म निवडणूक निरीक्षक प्रशिक्षण यासह विविध बाबींची माहिती दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये कायदा व सुव्यवस्था व पोलीस बंदोबस्त आराखडा बाबतची माहिती दिली.

०००००

दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर’ दक्ष

मुंबई, दि. १५ : महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू आहे. येत्या बुधवारी म्हणजे २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि निर्भय वातावरणात व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्याकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाकडून देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर निवडणुकांसंबंधित प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग केंद्र (ईएमएमसी) स्थापित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होत असलेल्या मतदान दिनी तसेच मतदान दिवसाच्या एक दिवस आधी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होत असलेल्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवण्याचे काम भारत निवडणूक आयोगाकडून होणार आहे. दूरचित्रवाणीवरून प्रसारित झालेल्या बातमीमध्ये निवडणुकीबाबत काही दखलपात्र मजकूर, दृश्य, बातमी असल्यास संबंधित जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेकडून तत्काळ दखल घेतली जात आहे. यासाठी मुंबई येथे राज्यस्तरीय माध्यम देखरेख व संनियंत्रण कक्ष आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय माध्यम देखरेख व संनियंत्रण कक्ष कार्यरत आहेत.

मतदान दिनी तसेच मतदानाच्या एक दिवस अगोदर दूरचित्रवाणी वाहिन्यांवर महत्त्वाच्या घटना, आचारसंहितेचा भंग, कायदा व सुव्यवस्था आदींबाबत बातम्या प्रसारित झाल्यास अशा घटनांची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत किंवा संबंधित यंत्रणेमार्फत इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटरद्वारे तत्काळ दखल घेतली जाणार असून त्याबाबतचा कृती अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे.

इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग केंद्र संदर्भातील बैठक आज मंत्रालयात झाली. यावेळी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव (माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती) यांना सहमुख्य निवडणूक अधिकारी विजय राठोड यांच्याकडून सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीस माहिती व जनसंपर्क संचालक दयानंद कांबळे, अवर सचिव तथा माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी शरद दळवी, कक्ष अधिकारी विवेक जगदाळे, कक्ष अधिकारी श्रीमती कल्पना कारंडे, क्षेत्रीय कार्यालयाचे जिल्हा माहिती अधिकारी आदी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

0000

संजय ओरके/विसंअ/

 

स्वीपअंतर्गत मतदान जनजागृतीसाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

जळगाव दि. १४ ( जिमाका ):  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.  भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार विधानसभा सार्वत्रिक  निवडणूक २०२४ करिता १३ जळगाव मतदार संघासाठी होणाऱ्या मतदानासाठी आणि मतदान जनजागृती स्वीप कार्यक्रमाअंतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अतंर्गत  जळगाव जिल्हयात मतदारांमध्ये मतदान जनजागृती व्हावी याकरिता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव जिल्हातील सर्व तालुक्यामध्ये या मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाल्या.

जळगावातील अमळनेर येथील तहसिल कार्यालय आणि  मंगरूळ येथे तर  भडगाव तालुक्यातील डॉ पुनम पवार माध्यमिक विद्यालय, वाय एम खान हायस्कूल, सो सुगी पाटील विद्यालय, लाडकुबाई माध्यमिक विद्यालय ,अँग्लो उर्दू हायस्कूल, आदर्श कन्या विद्यालय येथे मॅरेथॉन पार पडली

भुसावळ तालुक्यातील डी एस हायस्कूल ग्राउंड, गंगाधर सांडू चौधरी विद्यालय वरणगाव, सु. ग. टेमानी हायस्कूल भुसावल व डी एल हिंदी हायस्कूल भुसावल आणि बोदवड येथील पंचायत समिती, चाळीसगाव तालुक्यात पिंपरखेड, उंबरखेड, मेहुणबारे, शासकिय अधिकारी, चोपडा येथे  पंचायत समिती ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, ग्रामीण पोलिस स्टेशन ते थाळनेर दरवाजा, अगलवाडी रोड ते गुजराथी गल्ली , गोल मंदिर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गोल मंदिर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक याठिकाणी मॅरेथॉन घेण्यात आली.

धरणगाव येथे  कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आणि एरंडोल येथील डी डी एस पी कॉलेज आणि जळगाव येथील न्यु इग्लीश स्कुल नशिराबाद, थेपडे माध्यमिक विद्यालय म्हसावद येथे त्याचबरोबर जामनेर येथील  जि.प. शाळा मराठी जामनेर ते वाकी, हिवरखेडा नाका ते हिवरखेडा, सोनबर्डी ते महाराणा प्रताप चौक येथे मॅरेथॉन पार पडली

मुक्ताईनगर येथे एन एच राका हायस्कूल, पाचोरा येथे ग्रामविकास विद्यालय पिंपळगाव हरेश्वर, गांधी विद्यालय सामनेर, एस के विद्यालय नगरदेवळा , डॉ जे जे पाटील विद्यालय लोहारा , जि प प्रार्थमिक शाळा नांद्रा आणि पारोळा येथे श्री बाजाली विद्या प्रबोधिनी मंडळ संचालीत डॉ व्ही एम जैन माध्यमिक विद्यालय आणि आप्पासो यु एच करोडपती उच्च माध्यमिक  विद्यालय या ठिकाणी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

त्याचबरोबर रावेर येथे पंचायत समिती ते आंबेडकर चौक , सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक विद्यालय ऐनपुर, द. सो. पाटील माध्यमिक विद्यालय केन्हाळा आणि यावल येथील दहिगाव येथे मोठ्या उत्साहात मॅरेथॉन पार पडली. या सर्व १५ तालूक्यात जवळपास ८४७० स्पर्धकांनी सहभाग घेत सर्व मतदारांना मतदानाचे महत्त पटवून देत जनजागृती केली. याप्रसंगी ठिकठिकाणी सेल्फी पॉईंटची व सीग्नेचर पॉईटची व्यवस्था पिण्याचे पाणी व वैद्यकीय पथकाची व्यवस्था  करण्यात आली होती.

०००

 

स्वीप उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात मतदार जनजागृती

सांगली, दि. १४ (माध्यम कक्ष) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी मतदानाची तारीख अवघ्या पाच दिवसांवर आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध माध्यमातून सर्व घटकांपर्यंत पोहोचून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. गावोगावी जनजागृतीचे विविध उपक्रम घेऊन मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे.

मतदार जनजागृती अभियानांतर्गत श्री सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नागज, मिरज शहर व विटा येथे मॅरेथॉनच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली. पंडित विष्णू दिगंबर हायस्कूल पलूस येथे बालहक्क सप्ताह व मतदार जनजागृती अभियानांतर्गत सह दिवाणी न्यायाधीश ए. वाय. खान यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना मतदान करण्यास सांगण्याबाबत आवाहन केले. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मुख्यालय येथे मतदान शपथ वाचन कार्यक्रम घेण्यात आला. तर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त प्रज्ञा त्रिभुवन यांच्या उपस्थितीत सुंदरनगर येथील वारांगनांनी मतदार शपथ घेत 100 टक्के मतदान करण्याचा संकल्प केला.

राजे रामराव महाविद्यालय, जत राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जत शहरांमध्ये मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड किर्लोस्करवाडी कारखान्यातील 500 पेक्षा जास्त कामगारांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली. आदर्श प्राथमिक विद्यामंदिर विटा व बिंदूताई महामुनी विद्यामंदिर विटा, दिघंची हायस्कूल दिघंची व आर एम कलाल कनिष्ठ महाविद्यालय दिघंची, जिल्हा परिषद शाळा आरवडे या ठिकाणी मानवी साखळीचे आयोजन करून मतदान जनजागृती करण्यात आली. चंपाबेन वाडिलाल ज्ञानमंदिर व पटवर्धन कन्या प्रशाला तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या मार्फत मतदान जनजागृती पर मानवी साखळी साकारून सर्व पालक व नागरिकांना दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. जत विधानसभा मतदारसंघात ऊसतोड कामगारांमध्ये उसाच्या फडात जाऊन स्वीप उपक्रमांतर्गत मतदार जनजागृती करण्यात आली. एकता मोरे पाटील माध्यमिक विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज दिघंची येथे मानवी साखळीव्दारे वोट फॉर इंडिया चे आवाहन केले. श्री मुकुंदराज विद्यालय शाळगाव ता. कडेगाव व वांगी हायस्कूल येथे मतदाना संदर्भात संकल्प पत्र वाटप करण्यात आले. कोंडाबाई साळुंखे हायस्कूल हरिपूर येथे मतदार जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली.

 

न्यु इअर महिला बचत गट, आत्मशक्ती महिला बचत गट, प्रगती महिला बचत गट, प्रेरणा महिला बचत गटाच्या सदस्यांनी मतदानाची शपथ घेतली. शिराळा तालुक्यातील ग्रामपंचायत, मौजे मांगले येथे महिलांनी मतदार जाणीवजागृती केली. निमसोड सर्व सेवा सहकारी लि., निमसोड येथे सभासदांना मतदानाचे महत्त्व सांगण्यात आले.

खानापूर विधानसभा मतदारसंघात सरासरीपेक्षा कमी मतदान झालेल्या मतदानकेंद्रामध्ये व त्या गावांमध्ये जेष्ठ मतदार, महिला मतदार, युवक मतदार यांच्याशी संवाद साधून, आवाहन पत्राचे वाटप करून मतदान जनजागृती करण्यात आली. लेंगरे, वाळूज, मादळ मुठी वेजेगांव येथे मतदान जनजागृती करण्यात आली. तासगाव तालुक्यातील आरवडे येथील मतदान केंद्र क्र.28 येथे महिला संवाद मेळावा व प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला. पलूस तालुका डॉक्टर असोशियन पलूस,. निमा वूमन्स संघटना पलूस, आय एम आय संघटना यांच्या विद्यमाने श्री मंगल कार्यालय पलूस येथे मतदार जनजागृती करण्यात आली.

०००

यवतमाळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मतदार जनजागृती चित्रफितीचे प्रकाशन

  • जिल्हा माहिती कार्यालयाची संकल्पना

यवतमाळ, दि. १४ (जिमाका) : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करणे आवश्यक आहे. संपुर्ण राज्यात निवडणूक आयोगाच्यावतीने यासाठी जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्हा माहिती कार्यालयाने जनजागृतीसाठी तयार केलेल्या या चित्रफितीचे विमोचन आज जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांच्या हस्ते झाले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे झालेल्या विमोचन कार्यक्रमास जिल्हाधिकाऱ्यांसह सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी राजेश देवते, यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोपाल देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, चित्रफितीचे निर्माते आनंद कसंबे आदी उपस्थित होते.

लोकशाही मजबूत करण्यासोबतच प्रत्येकाच्या मनात मतदानाचे महत्व वृध्दींगत करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने ही चित्रफित तयार करण्यात आली आहे. यवतमाळ येथील प्रसिद्ध माहितीपट निर्माते आनंद कसंबे यांनी प्रशासनासाठी विनामुल्य चित्रफितीची निर्मिती केली आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्याने अनेकजन मतदान करण्याऐवजी बाहेर फिरायला जातात. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यास अडचण निर्माण होते.

योग्य उमेदवार निवडण्यासोबतच प्रत्येक मतदाराचा लोकशाहीच्या उत्सवात सहभाग वाढविण्यासाठी ही चित्रफित महत्वाची ठरेल. ज्या प्रमाणे पक्षी घरटे बांधण्यासाठी एक एक काडी जमा करून घरटे तयार करते त्याचप्रमाणे एक एक मतदाराच्या मतदानाने लोकशाही समृध्द होत जाते, असा महत्वाचा संदेश या लघुपटातून देण्यात आला आहे. यावेळी उत्तम चित्रफित तयार केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी आनंद कसंबे यांचे कौतूक केले. या लघुपटात महेंद्र गुल्हाने, वैष्णवी दिवटे आणि वेदांती बावणे यांनी भूमिका साकारल्या आहे.

०००

वाई विधानसभा मतदार संघात फिरत्या चित्ररथातून मतदान जनजागृती

सातारा, दि. १४:   वाई विधानसभा मतदार संघातील महाबळेश्वर तालुक्यत मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत  मेटतळे, हरोशी, जावली, दरे, नवेनगर, कुंभरोशी, कुमठे, पारसोंड, बिरवाडी, चतुरबेट, शिरवली, देवळी, दुधगांव  या ठिकाणी मतदान जनजागृती रथाच्या माध्यमातून मतदारांमध्ये उत्साही वातावरणात मतदान विषयक जागृती करण्यात आली.

या गावांमध्ये मतदान करण्याविषयीचे विविध फलक घेऊन ज्येष्ठ नागरिक, महिला वप्राथमिक शाळेतील मुला-मुलींनी  जनजगृती केली. तसेच  या गावांमध्ये लहान मुलांनी साखळी तयार करुन येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्याचे आवाहनही केले.

पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी मतदानाच्या दिवशी म्हणजेच येत्या 20 नोव्हेंबरला विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी असतात. या अनुषंगाने पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज पोस्टल मतदानाच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावला.

 

०००

 

फलटण बसस्थानकात मतदान जागर पथनाट्यद्वारे मतदान जनजागृती

सातारा दि. १४: फलटण बसस्थानक येथे मतदान जागर पथनाट्यद्वारे मतदान जनजागृती व मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अक्षय ईश्वरे, नोडल अधिकारी स्वीप फलटण सचिन जाधव उपस्थिती होते.

यावेळी नोडल अधिकारी फलटण यांनी मतदान बुधवार दि 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी ७ ते सायं. ६ दरम्यान मतदान करण्यासाठी घराबाहेर पडून हक्क बाजवण्याबाबत आवाहन केले. जागरूक मतदार होऊन लोकशाही बळकटीसाठी मतदान करण्यासाठी वेळ काढा तसेच ‘मतदान कर 100 टक्के फलटणकर’ सांगून मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी अहवान केले.

०००

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष : गरजू आणि आर्थिकदृष्ट्या रुग्णांसाठी आशेचा किरण

0
राज्यातील गरजू नागरिकांना दुर्धर आणि महागड्या आजारांवरील उपचारांसाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येते. या निधीतून केवळ वैद्यकीय मदतच...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सर्वसामान्यांचा आधार (भाग-२)

0
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरीता रुग्णांना संबधीत रुग्णालयामार्फत अर्थिक सहाय्य देण्यात येते. या अनुषंगाने मदत मिळविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी...

सर्वसामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. २१, (जि. मा. का.) : कोविड पासून सर्वजण वैद्यकीय सेवेच्या बाबतीत सतर्क झाले आहेत. आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी व उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान भारतासाठी गौरव, मराठी जनतेसाठी अभिमानास्पद...

0
मुंबई, २१ : छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे नेहमीच वैश्विक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्याने त्यांच्या कार्याच्या...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी – गरजू रुग्णांसाठी विश्वासार्ह आधार

0
भारतातील ग्रामीण, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे एक मोठे आव्हान आहे. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता...