मंगळवार, जुलै 22, 2025
Home Blog Page 508

रायगड जिल्ह्यात २ हजार ६८० मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

रायगड, दि. १७ (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यात दि.16 नोव्हेंबर अखेर पर्यंत एकूण 2 हजार 680 मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला.

पनवेल विधानसभा  मतदारसंघात  124 ज्येष्ठ नागरिक, 13 दिव्यांग अशा एकूण 137  मतदारांनी, कर्जत विधानसभा  मतदारसंघात 158 ज्येष्ठ नागरिक, 17 दिव्यांग अशा एकूण 175  मतदारांनी, उरण विधानसभा  मतदारसंघात 66 ज्येष्ठ नागरिक, 16 दिव्यांग अशा एकूण 82  मतदारांनी, पेण विधानसभा मतदारसंघात 545 ज्येष्ठ नागरिक, 58 दिव्यांग अशा एकूण 603, अलिबाग विधानसभा मतदारसंघात 442 ज्येष्ठ नागरिक, 27 दिव्यांग अशा  एकूण 469, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात  423 ज्येष्ठ नागरिक, 107 दिव्यांग अशा एकूण 530, महाड विधानसभा मतदारसंघात 571 ज्येष्ठ नागरिक, 113 दिव्यांग अशा एकूण 684 मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला.

गोपनीय पद्धतीने मतदान करण्याची सुविधा पुरविण्यात येऊन  संबधित विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त करण्यात आलेल्या  क्षेत्रीय अधिकारी, मतदान अधिकारी तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी गृह मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. यावेळी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले.

०००

मतदारांना सुविधा तर आचार संहितेचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा – विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा यांचे निर्देश

नागपूरदि. 16 : विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना विनासायास मतदान करता यावे, त्यांच्यातही उत्साह वृद्धींगत व्हावा यासह पुरेशा सुरक्षित वातावरणासह अधिक सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी तत्पर राहा. याचबरोबर कुठे जर शांतता भंग करण्याचा अथवा आचारसंहितेचे उल्लंघन करून कोणी जर वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याविरुद्ध तत्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा यांनी दिले.

जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी होणा-या मतदानाच्या पूर्वतयारीबाबत विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. मेट्रो भवन येथे आयोजित या बैठकीस पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, निवडणूक निरीक्षक के. वासुकी,नवीन कुमार सिंग, पवन कुमार सिन्हा, अरुण कुमार परमार, संजय कुमार, भोर सिंग यादव, सुनील कुमार,  निवडणूक निरीक्षक (पोलिस) अजय कुमार, निवडणूक निरीक्षक (खर्च) देवरंजन मिश्रा, संतोष कुमार मिश्रा, दीपक आनंद, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) हर्ष पोद्दार, नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे उपस्थित होते.

मतदान केंद्रांवरील पार्किंग व्यवस्थेपासून ते मतदानापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेपर्यंत मतदारांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याबाबत निवडणूक विभागाने स्थानिक पातळीवर यथाशक्य सुविधा पुरविल्या पाहिजे. निर्भय व निरपेक्ष वातावरणात मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता आला पाहिजे. कुठल्याही प्रकारचा अडथळा हा मतदारांना मतदानाच्या दिवशी येऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा यांनी निर्देश दिले.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी यावेळी जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेच्या तयारीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. जिल्ह्यात एकूण 45 लाख 25 हजार 997 मतदार आहेत. यात पुरुष मतदारांची संख्या 22 लाख 63 हजार 890 आहे. तर महिला मतदारांची संख्या 22 लाख 61 हजार 805 आहे. तर 302 तृतीयपंथी मतदार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार, मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणा-या सुविधा, निवडणुकीसाठी उपलब्ध असलेले मनुष्यबळ, कायदा व सुव्यवस्था आदी निवडणूक यंत्रणेच्या तयारी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे दिली. जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या तयारीचे यावेळी विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा यांनी कौतुक केले.

मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी  पोलिस विभागाने घेतलेल्या दक्षतेची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली. संवेदनशील भागात ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येत असून यात रात्रीही निगराणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेणा-यांविरुद्ध पोलिस कठोर कारवाई करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई शहर जिल्ह्यातील मतदान केंद्रांची जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्याकडून पाहणी

मुंबई, दि. १६ :  मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून जिल्ह्यातील वरळी, शिवडी व भायखळा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांना जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी संबंधित विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह भेट देऊन पाहणी केली.

जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. यादव यांनी भेटी दरम्यान निरंतर  जिल्हा निवडणूक व्यवस्थापन आराखडा,  मतदान केंद्र, आरक्षित मतदार केंद्र,  जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर किमान सुविधा,  मतदान केंद्रातील व्यवस्थापन, वेब कास्टिंग,  रूट मॅप,  सेक्टर मॅप,  क्षेत्र नकाशा,  संप्रेषण योजना (Communication Plan), मतदान कक्षात  मतदार सहाय्यकांच्या नियुक्ती, वाहन व्यवस्था, मतदान चिठ्ठ्या याबाबत सविस्तर आढावा घेऊन माहिती जाणून घेतली.

भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून मतदान प्रक्रिया मुक्त, शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आवश्यक सूक्ष्म नियोजन करून पर्यायी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले. श्री. यादव म्हणाले की, मतदान केंद्रावर नियुक्त महिला अधिकारी-कर्मचारी यांच्या राहण्यासाठी सुयोग्य व्यवस्था करावी, दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रनिहाय समन्वय अधिकारी नेमावा, मतदान केंद्रांवर दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सहाय्यता कक्ष, हिरकणी कक्ष, पिण्याचे पाणी व्यवस्था, दिशादर्शक फलक यांचे काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश श्री. यादव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी शिवडी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गणेश सांगळे, भायखळा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव, वरळी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड उपस्थित होते.

यवतमाळात मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची भव्य मानवी साखळी

शहरातील १ हजार ५०० विद्यार्थ्यांचा सहभाग; प्रा.एकबोटे यांच्या जनजागृती गिताचे विमोचन

यवतमाळ, दि.16  (जिमाका) : मतदार जनजागृतीसाठी यवतमाळ विधानसभा मतदासंघाच्यावतीने विद्यार्थ्यांची भव्य मानवी साखळी तयार करून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमात शहरातील एक हजार ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी उत्फूर्तपणे सहभागी झाले होते.

यवतमाळचे निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकूल येथे करण्यात आले होते. यावेळी यवतमाळ व दिग्रस विधानसभा मतदारसंघाच्या सामान्य निरिक्षक श्रीमती ए.देवसेना, तहसीलदार योगेश देशमुख, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, सहाय्यक ट जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, नायब तहसिलदादर रुपाली बेहरे, सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर गोळे, विस्तार अधिकारी पप्पू भोयर, नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी विनोद डवले, प्रा.डॉ.राहुल एकबोटे आदी उपस्थित होते.

लोकशाही अधिक मजबूत व समृद्ध करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकास मतदानाचे महत्व पटवून देण्यासोबतच त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्यावतीने जनजागृती कार्यक्रम राबविला जात आहे. त्यानुसार यवतमाळ येथे आज विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीद्वारे मतदानाचा संदेश देण्यात आला.

जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानात शहरातील विविध शाळांचे एक हजार ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करत भारत निवडणूक आयोगाचे चिन्ह व 78 YAVATMAL VOTE असा विहंगम आकार साखळीद्वारे तयार केला.

यवतमाळ येथील प्रसिद्ध गायक व अमोलकचंद महाविद्यालयातील संगीत विभागाचे प्राध्यापक डॉ.राहुल एकबोटे यांनी मतदार जनजागृतीसाठी तयार केलेल्या गिताचे विमोचन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या गिताचे सादरीकरण देखील यावेळी प्रा.एकबोटे यांनी केले.

कार्यक्रमात अँग्लो हिंदी हायस्कूल, लोकनायक अणे विद्यालय, राणी लक्ष्मीबाई विद्यालय,अभ्यंकर विद्यालय, वेदधारणी स्कूल, रमाबाई आंबेडकर विद्यालय, उर्दू शाळा, महिला विद्यालय, साई विद्यालय, जिल्हा परिषद स्कूलचे विद्यार्थी सहभाग झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षण जितेंद्र सातपुते, संजय कोल्हे, पंकज शेलोटकर, सचिन भेंडे, संजय सातारकर, पियुष भुरचंडी, श्री.अनवर,अजय मिरकुटे, संजय बट्टावार, संजय दंडे,अजय राऊत, मुकुंद हम्मन, मोहन शहाडे, मनीष डोळसकर यांनी सहकार्य केले.

विधानसभेच्या ६७ वर्षांच्या वाटचालीत आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदार….

विधानसभा निवडणुकीसाठी दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पाडणार एकूण ४ हजार १३६ उमेदवार या निवडणुकीत लढत आहेत. ज्यामध्ये ३७७१ पुरूष उमेदवार तर ३६३ महिला उमेदवार सहभागी आहेत. किती तरी आमदारांची निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ तर काही उमेदवारांची ही दुसरी, तिसरी, चौथी वेळ असणार आहे. सन १९५७ ते १९६२ या कालावधीत पहिली विधानसभा स्थापन झाल्यापासून ते आताच्या चौदाव्या विधानसभेपर्यंत म्हणजे गेल्या ६७ वर्षांत महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभागृहात आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदारांना सहभाग घेण्याची संधी मिळालेली आहे. भारतात सर्व नागरिकांसोबतच मतदार म्हणून महिला मतदारांनाही मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. मात्र आपल्याला विनासायास मिळालेल्या मतदानाच्या या अधिकारासाठी जगातील किती तरी देशांतील महिलांना प्रदिर्घ लढा द्यावा लागलेला आहे. ब्रिटन, अमेरीका व इतर अनेक देशांत महिला मतदारांना आपल्या मतदानाच्या अधिकारासाठी शंभर, दिडशे वर्ष लढा देऊन मग तो अधिकार प्राप्त झालेला आहे.

महिला मतदारांची संख्या

सन २०११ च्या जनगणनेनुसार १००० पुरुषांमागे ९२९ महिला (Gender Ratio) असे प्रमाण आहे. त्या तुलनेत सन २०१९ साली मतदार यादीतील महिलांचे प्रमाणे ९२५ इतके होते. हे प्रमाण वाढवण्याकरिता महिला मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमा राबविण्यात आल्या व त्यामुळे २०२४ मध्ये या प्रमाणात ९३६ अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी राज्यात ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरूष मतदार ५ कोटी २२ हजार ७३९, महिला मतदार ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ इतकी झाली आहे. म्हणजे एकूण मतदारांच्या संख्येच्या प्रमाणात महिला मतदारांचा टक्का हा जवळपास पन्नास टक्के इतका आहे. राज्यात विविध जिल्ह‌्यात महिला मतदारांची संख्या ही पुरुष मतदारां इतकी काही ठिकाणी त्या पेक्षा जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे.

आतापर्यंतच्या महिला आमदारांचे संख्याबळ

समाजाची अर्धी लोकसंख्या असलेल्या महिला वर्गाचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांच्याच समूहातील म्हणजे महिला आमदार निवडून जाण्याचे प्रमाण हे विधानसभेच्या स्थापनेपासून बदलत असल्याचे बघायला मिळते. २० नोव्हेंबर रोजी मतदान होत होऊन अस्तित्वात येणारी ही विधानसभेची पंधरावी विधानसभा असणार आहे. त्यापूर्वीची म्हणजेच दि.२७ नोव्हेंबर रोजी कार्यकाळ संपणा-या चौदाव्या विधानसभेत एकूण आमदार महिलांची संख्या २७ इतकी होती.

महाराष्ट्राची पहिली विधानसभा सन १९५७ ते १९६२ या कालावधीत अस्तित्वात आली. या महाराष्ट्राच्या पहिल्यावहिल्या विधानसभेच्या सभागृहात संधी मिळालेल्या एकूण महिला आमदारांची उपस्थिती लक्षणीय अशी म्हणजे तीस इतकी होती. तर त्याच्या पुढच्या कार्यकाळातील म्हणजे सन १९६२ ते ६७ या कालावधीतील दुस-या विधानसभेत १७ महिला आमदारांना सभागृहात पोहाेचण्याची संधी मिळाली होती आणि १९६७ ते १९७२ या तिस-या विधानसभेत १२ महिला आमदार निवडून आल्या होत्या. चौथ्या १९७२-७८ या कार्यकाळातील विधानसभेत २८ महिला आमदारांनी सभागृहात हजेरी लावली तर १९७८-८० या कालावधीत कार्यरत पाचव्या विधानसभेत ८ महिला आमदार होत्या. १९८०-८५ या काळातील सहाव्या विधानसभेत २० तर त्याच्या नंतर अस्तित्वात आले्ल्या १९८५-१९९० या कालावधीतील सातव्या विधानसभेत १६ आणि सन १९९०-९५ मध्ये कार्यरत आठव्या विधानसभेत ६ महिला आमदार होत्या. तर नवव्या विधानसभेत म्हणजेच १९९५-९९ या काळात १४ महिला आमदार निवडून आल्या. सन १९९९ – २००४ या काळात अस्तित्वात आलेल्या दहाव्या विधानसभेत १३ महिला आमदार तर अकराव्या विधानसभेत २००४- २००९ या कालावधीत बारा महिला मतदार विधानसभेच्या सभागृहात होत्या. २००९-२०१४ या कार्यकाळात अस्तित्वात आलेल्या बाराव्या विधानसभेत १३ महिला आमदार, तर सन २०१४- २०१९ मधील तेराव्या लोकसभेत २२ आणि सन २०१९- २०२४ या चौदाव्या विधानसभेत २७ महिला आमदारांनी जनतेच्या प्रश्नांची मांडणी केली. या सर्व महिला आमदारांमध्ये पहिल्या विधानसभेतील एकूण महिला आमदारांमध्ये पाच महिला आमदार या अपक्ष होत्या. तर त्यानंतरच्या कुठल्याच विधानसभेत अपक्ष महिला आमदार नव्हत्या. त्यानंतरच्या १४ व्या विधानसभेत २ अपक्ष महिला आमदार राहिल्या. एकंदरीत विधानसभेत राजकीय पक्षाच्याच महिला आमदार प्रतिनिधी यांचे प्रमाण सातत्याने पाहायला मिळत आहे.

पहिल्या विधानसभेत आतापर्यंतच्या सर्वाधिक महिला आमदार

आतापर्यंत स्थापन झालेल्या विधानसभेच्या कार्यकाळात पहिल्या विधानसभेत तीस इतक्या भरघोस संख्यने महिला आमदार सभागृहात होत्या. त्यानंतरच्या कुठल्याच विधानसभेत इतक्या मोठ्या संख्येने महिला आमदार राहीलेल्या नाहीत. त्याच्या खालोखाल १९७२ -७८ या कार्यकाळातील चौथ्या विधानसभेत २८ तर आणि सन २०१९- २०२४ मध्ये चौदाव्या विधानसभेत २७ इतक्या महिला आमदारांची संख्या बघायला मिळाली. आतापर्यंतच्या चौदा विधानसभांच्या कार्यकाळात सर्वात कमी महिला आमदार या सन १९९०-९५ मध्ये कार्यरत आठव्या विधानसभेत ६ तर १९७८-८० या कालावधीत कार्यरत पाचव्या विधानसभेत केवळ ८ महिला आमदार होत्या. म्हणजेच पहिल्या विधानसभेच्या १९५७ ते १९६२ या साली महिला आमदारांची संख्या ही सर्वात जास्त राहिलेली आहे. महिला आमदारांचे प्रमाण वाढत असल्याचे आश्वासक चित्र पुढच्या विधानसभेच्या कार्यकाळात बघायला मिळत नाहीये तर सातत्याने हे प्रमाण तीसच्या आत राहिलेले असून त्यात चढउतार झालेले दिसते.

महिला मतदारांचा मतदानातील सहभाग

सन 2014 विधानसभा निवडणुकीतील महिला मतदान टक्केवारी 61.69 एवढी होती. 2019मध्ये महिला मतदारांची संख्या 4,27,05,777 एवढी होती. सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण मतदान टक्केवारी 61.1 होती, तर महिला मतदानाची टक्केवारी 59.26 आणि पुरुष मतदानाची टक्केवारी 62.77 टक्के एवढी राहीली. म्हणजे महिला मतदानाच्या टक्केवारी पेक्षा साडे तीन टक्के पुरुष मतदान जास्त होते. मात्र विधानसभेत महिला आमदारांचा टक्का हा पुरुष आमदारांच्या तुलनेत अत्यंत कमी राहीलेला आहे.

या वर्षी किती महिला आमदारांना आपला आवाज सभागृहात मांडण्याची संधी मिळणार आहे हे येत्या २३ नोव्हेंबरला म्हणजे या निवडणुकीच्या मतदानानंतर आपल्याला समजेलच, महिला आमदारांच्या निवडून येण्याचे प्रमाण वाढवण्यात महिला मतदारांचे शंभरटक्के मतदान करण्याचे प्रमाण निश्चितच परिणामकारक ठरेल.

(संदर्भ – विधिमंडळ ग्रंथालयाच्या सौजन्याने)

 

वंदना रघुनाथराव थोरात

विभागीय संपर्क अधिकारी

धुळे जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

धुळे, दि. 16 नोव्हेंबर : जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा व आपले कर्तव्य पार पाडून लोकशाही अधिक बळकट होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बोरविहीर येथील मतदार जनजागृती कार्यक्रमात केले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आज बोरविहीर, ता. जि.धुळे येथे मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी विशाल नरवाडे, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, तहसिलदार अरुण शेवाळे, गट विकास अधिकारी गणेश चौधरी, गटशिक्षणधिकारी विठ्ठल घुगे, विस्तार अधिकारी श्री.महंत, शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे, प्राचार्य प्रकाश सोनवणे, सरपंच स्मिता ठाकरे, ग्रामसेवक आबासाहेब पवार, पोलीस पाटील वाल्मीक सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी, नागरीक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.पापळकर म्हणाले की, धुळे जिल्ह्यात अधिकाधिक मतदान होण्यासाठी प्रशासन विविध उपक्रम राबवित आहे. या उपक्रमांमध्ये नागरीकांचा सहभाग महत्वाचा आहे. मतदान हे आपल्याला लोकशाहीने दिलेला मुलभूत अधिकार असल्याने प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा. मतदानापासून कुणीही वंचित राहू नये याकरीता भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार जिल्हा प्रशासन सर्व सुविधा उपलब्ध करुन देत आहेत. या सुविधांचा मतदारांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच या निवडणूकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी अंगणवाडी सेविका, आशासेविका, शिक्षक, पोलीस पाटील, ग्रामसेवक, सामाजिक संस्था यांनी मतदारांना प्रवृत्त करण्याचे आवाहन केले. मतदारांनीही येत्या 20 नोव्हेंबर रोजी आपले कितीही महत्वाचे काम असले तरी मतदानासाठी किमान एक तास वेळ काढून आपला हक्क बजवावा.

मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे म्हणाले की, धुळे जिल्ह्यातील 40 टक्के मतदार हे मतदान करत नाही. बोरविहीर गावात लोकसभेला चांगले मतदान झाले. त्याचप्रमाणे येत्या विधानसभेलाही मतदान करावे. एक एक मताचे महत्त्व ओळखून दर पाच वर्षांनी येणारी ही अनमोल संधी न गमवता जे नागरिक कामानिमित्त, शिक्षणानिमित्त बाहेरगावी गेले असतील त्यांनाही येत्या 20 तारखेला बोलावून मतदानासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन त्यांनी केले.

उपविभागीय अधिकारी रोहन कुवर म्हणाले की, आपल्या पुढील उज्जवल भविष्यासाठी मतदानाचा मुल्यवान अधिकार भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकांना दिला आहे. राज्याचा तसेच गावाचा विकासासाठी योग्य उमेदवार निवडून देण्याची हीच संधी असून ही संधी पाच वर्षांनी प्राप्त होत असल्याने सर्व मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी गावातून विद्यार्थी, शासकीय कर्मचारी यांची मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. तसेच सहकार महर्षी पि.रा. पाटील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चौका चौकात पथनाट्य सादर केले. यावेळी धुळे तालुक्यातील शिक्षकांनी तयार केलेले अहिराणी भाषेतील कलापथकाने मतदार जनजागृतील नाटीका सादर करून उपस्थितांमध्ये जनजागृती केले. यावेळी रांगोळी स्पर्धा, सेल्फी पॉईंट, स्वाक्षरी मोहीम, मतदानाची शपथ आदि जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात आले .

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार महर्षी पी. रा. पाटील हायस्कूल, बोरविहिर, जिल्हा परिषद शाळा,  ग्रामपंचायत, बोरविहिर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डी. एम. पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे प्राचार्य पी. बी सोनवणे यांनी केले.

000000

निवडणूक आयोगाचे विशेष सामान्य निरीक्षक राममोहन मिश्रा यांच्याकडून जळगाव जिल्ह्यातील निवडणुकीचा आढावा

विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत केले समाधान व्यक्त

जळगाव दि. 15 ( मीडिया कक्ष ): केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नियुक्त केलेले विशेष सामान्य निरीक्षक राममोहन मिश्रा यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व 11 विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचा आढावा घेतला. चांगले नियोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी निवडणूक तयारीचे सादरीकरण केले. यावेळी सर्वसाधारण निरीक्षक श्री. राजेशकुमार (आय.ए.एस),भुसावळ, जळगाव शहर,  सर्वसाधारण निरीक्षक श्री. रणजित कुमार सिन्हा (आय.ए.एस) जळगाव ग्रामीण, अमळनेर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सर्वसाधारण निरीक्षक श्री अरुणकुमार(आय.ए.एस) चोपडा, रावेर,सर्वसाधारण निरीक्षक श्री. ब्रजेश कुमार (आय.ए.एस) एरंडोल,  चाळीसगाव,सर्वसाधारण निरीक्षक श्रीमती स्मिताक्षी बरुआ (आय.ए.एस) पाचोरा,जामनेर,मुक्ताईनगर, पोलीस निवडणूक निरीक्षक श्री. तौहिद परवेझ (आय.पी.एस) सर्व 11 मतदार संघ, खर्च निरीक्षक श्री. हरकेश मीना (आय. आर.ए.एस) चोपडा, रावेर, भुसावळ,जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, खर्च निरीक्षक श्री. रोहित इंदोरा (आय. आर.एस) (सी. अॅण्ड सी.ई)अमळनेर,एरंडोल,चाळीसगाव, पाचोरा,  जामनेर, मुक्ताईनगर हे उपस्थित होते.

जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी,नोडल अधिकारी, 11 विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

मतदान केंद्रावर सर्व सुविधा असतील याबाबत खात्री करून घ्यावी, जिथे सुविधा कमी आहेत, तिथे सुविधा पुरवाव्यात. कायदा सुव्यवस्थेबाबत अधिक दक्ष राहावे असे सांगून मतदानाचा टक्का अधिक वाढेल यासाठी मतदान जनजागृतीवर भर द्यावा अशा सूचना विशेष सामान्य निरीक्षक राममोहन मिश्रा यांनी केल्या.

यावेळी सर्व सामान्य निरीक्षक, पोलीस निरीक्षक, खर्च निरीक्षक यांनीही सर्व निवडणूक यंत्रणेवर आमचे लक्ष असल्याचे सांगून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे   निवडणूक प्रशासन काम करत असल्याचे सांगितले. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व 11 विधानसभा मतदार संघतील पूर्व तयारीचे सादरीकरण  केले.

जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाची तयारी, आता पर्यंत केलेल्या सर्व कारवाईची माहिती दिली.

कोल्हापूर येथे निवडणूक दक्षता अधिकारी भासवून व्यावसायिकाला २५ लाख रुपयांना लुटणाऱ्या ५ जणांच्या टोळीला अटक

कोल्हापूर दि. १६ (जिमाका ) : तावडे हॉटेल, कोल्हापूर येथे निवडणूक दक्षता (व्हिजीलन्स) अधिकारी भासवून एका व्यावसायिकाला २५ लाख ५० हजार रुपयांना लुटणाऱ्या ५ जणांच्या टोळीला अटक करुन गांधीनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ४८०/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २०४, ३१८ [४], ३१९ [२], ३१० [२], ३ [५] प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी पहाटे ५.१५ वाजता तावडे हॉटेलच्या हायवे ब्रिजवर व्यावसायिक सुभाष लक्ष्मण हारणे, रा. बागल चौक, कोल्हापूर यांना ५ लोकांच्या टोळीने “निवडणूक व्हिजीलन्स अधिकारी आहोत, आचार संहिता सुरु असून तुम्ही रोख रक्कम जवळ ठेवू शकत नाही,” असे सांगुन फिर्यादीस गाडीमध्ये बसवून सरनोबतवाडी, ता. करवीर येथे घेवून जाऊन त्यांच्याकडील २५ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम व मोबाईल हॅन्डसेट काढून घेतले होते.

सध्या विधानसभा निवडणूक २०२४ ची आचार संहिता लागू असून त्यामध्ये निवडणूक व्हिजीलन्स अधिकारी असल्याचा बनाव करुन रक्कम लुटल्याचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी तात्काळ तपासणी करण्याच्या सुचना तपासणी टीमला दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील ६ तपास पथके नेमून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. गोपनीय बातमीदारामार्फत रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय किरणगी व त्याच्या साथीदारांनी हा गुन्हा केला असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली. तसेच ते गुन्हा केल्यानंतर गोवा येथे गेले असल्याचे समजले. त्याबाबत वरिष्ठांना माहिती देवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक जालींदर जाधव व त्यांचे पथक तात्काळ गोवा येथे रवाना झाले. तपासा दरम्यान नमुद आरोपी गोवा येथुन कोल्हापूरच्या दिशेने परत येत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. चेतन मसुटगे व पथकाने राधानगरी ते कोल्हापूर रोडवर पुईखडी या ठिकाणी १] संजय महावीर किरणगे, वय ४२ वर्षे, २] अभिषेक शशिकांत लगारे, वय २४ वर्षे, ३] विजय तुकाराम खांडेकर, वय २८ वर्षे, सर्व रा. कोल्हापूर यांना गुन्हा करतेवेळी वापरलेल्या टाटा हॅरियर व निसान गाडीसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत माहिती घेतली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच या गुन्ह्यात आणखी २ आरोपी असून त्यांची नावे स्वप्निल उर्फ लाला तानाजी जाधव व हर्षद खरात असून ते सध्या कोठे आहेत याबाबत माहिती नसल्याचे सांगीतले.

तसेच हर्षद खरात व स्वप्निल उर्फ लाला तानाजी जाधव यांना सदर व्यावसायिक हा कर्नाटक येथुन परत कोल्हापूर येथे रक्कम घेवून येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हा कट रचल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेल्या ३ आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली २५ लाख रुपये रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेल्या टाटा हॅरियर गाडी क्र. KA-३३-Z-५५५० किंमत २० लाख रुपये व निसान मॅग्नेट गाडी क्र. MH-०९-GA-६२५९ किंमत १० लाख रुपये असा एकूण ५५ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केला आहे. २ आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. आरोपी व जप्त मुद्देमाल गांधीनगर पोलीस ठाण्यास जमा केला असून गुन्ह्याचा पुढील तपास गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जाधव करीत आहेत.

मतदार जनजागृतीसाठी मतदारांशी विविध माध्यमातून संवाद; निवडणूक यंत्रणामार्फत राज्यभरात जनजागृतीवर भर

राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी प्रशासन सज्ज झाले आहे. २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यात जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी निवडणूक यंत्रणा सर्वांना आवाहन करत आहे. विधानसभा निवडणुकीत राज्याचं मतदानाचं प्रमाण वाढावं असं उद्दिष्ट राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं समोर ठेवलंय आणि त्यासाठी राज्यभर मतदार जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ नुकतीच पार पडली. या निवडणुकांत राज्याची मतदानाची टक्केवारी ६६.०५ टक्के होती. यावेळी नंदूरबार जिल्ह्यात ७२.९४ टक्के, कोल्हापूर मध्ये ७१.७८ टक्के  गडचिरोली मध्ये ७०.५५ टक्के मतदान झाले तर मुंबई शहर राज्यात सर्वात कमी मतदान झालेला जिल्हा असून या जिल्ह्यात ५१ टक्के इतके कमी मतदान झाले होते. राज्यातील मुंबई शहर जिल्ह्यातील कुलाबा मतदारसंघ, मुंबई उपनगर जिल्ह्यातील कलिना मतदारसंघ, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, पुणे येथील पुणे  छावणी (कंटोनमेंट) येथे सर्वात कमी मतदान झाले होते. मतदान कमी असलेल्या जिल्ह्यात मतदान वाढविण्यासाठी प्रशासन विविध जनजागृतीवर भर देत आहे.

स्वीप उपक्रमामुळे मतदानात वाढ

‘स्वीप’ या उपक्रमामुळे तृतीय पंथीय मतदारांची २०१९ मध्ये २५९३ इतक्या संख्येवरून ते ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत ५९४४ इतकी नोंद झाली आहे. त्याचबरोबर युवा मतदारांची निवडणूक प्रक्रियेत अधिक सक्रिय होण्यासाठी निवडणूक प्रशासन अनेक उपक्रम राबवित आहे त्यामुळे युवा मतदारांचीही मोठ्या संख्येने वाढ होत आहे. अमरावती जिल्ह्यात विविध स्वीपच्या उपक्रमांमुळे  २०१९ च्या विधानसभा निवडणुकात ६०.३६ टक्के, सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकांत ६३.५८ टक्के इतके मतदान झाले. नाशिक जिल्ह्यात देखील मतदान जनजागृतीमुळे ६१.७४ टक्केवरून गेल्या लोकसभेत ६४.२१ टक्के इतके मतदान झाले आहे.

मल्टिमिडीयाचा वापर

स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदारांशी विविध माध्यमांतून संवाद साधला जात आहे. यात मल्टिमीडियाचा प्रभावी वापर आणि थेट जनसंपर्क अशा दोन्ही पद्धतींचा समावेश आहे. मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी अठरावं वरीस मोक्याचं, इथे सगळी बोटे सारखी आहेत, मधाच्या बोटाला बळी पडू नका, निर्धार महाराष्ट्राचा विधानसभा निवडणुकीत मतदानाचा, अशा आकर्षक संदेशांचा वापर केला जातोय. हे संदेश शासकीय आणि नागरी सेवांच्या सहकार्यानं राज्यभर पोहोचवले जात आहेत. राज्यातली माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाची ८०० होर्डिंग, वाहतूक कार्यालयाच्या राज्यभरातील शाखांमधील होर्डिंग, राज्यभरातील महानगरपालिकांचे ३ हजारांपेक्षा जास्त डिजिटल डिस्प्ले, सार्वजनिक बस सेवा पुरवणाऱ्या १००० पेक्षा जास्त बस आणि १५०० पेक्षा जास्त इतर वाहने, ११०० पेक्षा जास्त बस स्थानकं, सुमारे ५ हजार स्वच्छता वाहनांवरून होत असलेल्या घोषणा, मध्य आणि पश्चिम रेल्वे तसंच मेट्रो रेल्वे सेवेद्वारा रेल्वेगाड्यांमधल्या घोषणा – फलाटांवरील जाहिरातींचे डिस्प्ले इतकी याची व्याप्ती मोठी आहे. इतकंच नाही तर महानगर – टाटा पॉवर – बेस्ट वीज सेवा यांच्याद्वारे २० लाखांपेक्षा जास्त देयकांवर तसंच राज्य भरातील महानगर पालिकांनी पाठवलेल्या ८ लाख मालमत्ता करांच्या देयकांवर प्रसिद्ध केलेल्या जाहिरात स्वरुप संदेशांमधून, राज्यभरातील लाखो कुटुंब म्हणजे कोट्यवधी मतदारांपर्यंत मतदान करण्याचं आवाहन थेट पोहोचत आहे.

राज्यस्तरीय मतदान जनजागृती कार्यक्रम                                

मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं भारत निवडणूक आयोगाच्या ‘स्वीप’ कार्यक्रमाअंतर्गत राज्यस्तरीय मतदारजागृती उपक्रमांचा प्रारंभही झाला. मुंबई पोलीस दलाच्या वाद्यवृंद पथकाचं सादरीकरण, निवडणूक गीताचं सादरीकरण – त्यावरचं नृत्य, टपाल विभागाकडून विशेष पाकीट – शिक्क्याचं अनावरण, मतदारांना प्रतिज्ञा, असे उपक्रम राबवले. महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सदिच्छादूत श्रीगौरी सावंत आणि दिव्यांग मतदार सदिच्छादूत निलेश सिंगीत, राज्याच्या निवडणूक गीताचे संगितकार गायक मिलिंद इंगळे, गायक राहुल सक्सेना, रॅपर सुबोध जाधव, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, अभिनेत्री वर्षा उसगांवकर,  दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेत्री अनन्या पांडे, हास्य कलाकार भारती सिंग, हर्ष लिंबाचिया, अभिनेते मनोज जोशी, अभिनेता बजाज आनंद, अभिनेत्री सोनाली खरे, अभिनेता अली असगर यांच्यासह सामाजिक आणि कला क्षेत्रातल्या अनेक नामांकित व्यक्तिमत्वांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मतदारांना आपला मताधिकार बजावण्याचं आवाहन केलं. या कार्यक्रमातच, केंद्रीय संचार ब्यूरोच्या प्रादेशिक कार्यालयाच्या फिरत्या मतदार जनजागृती वाहनालाही हिरवा झेंडा दाखवला गेला. हे फिरतं वाहन राज्यातील मतदानाचं अल्प प्रमाण असलेल्या १५ जिल्हे आणि १३३ मतदारसंघांमध्ये जनजागृती करत आहे. या फिरत्या वाहनाच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया, मतदान केंद्राचं ठिकाण समजून घेणं, आदर्श आचारसंहिता, आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी, उमेदवारांविषयी जाणून घेणं याविषयी मतदार जागृती केली जातेय.

जिल्हास्तरीय निवडणूक यंत्रणाकडूनही मतदार जनजागृतीसाठी उपक्रम

राज्यात प्रत्येक जिल्ह्याची निवडणूक यंत्रणाही स्वीप कार्यक्रमाअंतर्गत स्वतंत्रपणे मतदार जनजागृतीचे उपक्रम राबवते आहे. घरोघरी भेटी, रांगोळ्या, मानवी साखळ्या, प्रभात फेऱ्या, पथनाट्य, सायकल – बाईक रॅली, मॅरेथॉन, मतदारांना शपथ, संकल्पपत्र, विविध स्पर्धा, सण साजरे करण्याच्या निमित्तानं मतदारजागृतीपर उपक्रम सुरु आहेत. बुलडाणा जिल्ह्यात मतदारांना मतदान प्रक्रियेची ओळख करून देण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमार्फत अभिरुप मतदान केंद्रांची तालीम आयोजित करण्यात आली. यामुळे लोकांना प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेचा अनुभव मिळाला.

लातूर जिल्ह्यात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अभंग, गवळणी, भारुड, गोंधळगीत, पोवाडा अशा पारंपरिक कलाप्रकारांचा अभिनव वापर केला जातोय. तिथे १२१ शाळांच्या विद्यार्थ्यांमार्फत १ लाख ३ हजारापेक्षा जास्त पालकांपर्यंत पोहोचत मतदानाचं संकल्पपत्र भरून घेण्यात आलंय. सांगलीत शासकीय रुग्णालयांच्या ओपीडी दस्तऐवजांवर, बँकांच्या व्यवहार पावत्यांवर मदानाच्या तारखेचं स्मरण करून देणारा शिक्का वापरून मतदार जनजागृती केली जातेय. जळगाव जिल्ह्यात, एकाच वेळी तब्बल १३३३ ग्रामपंचायतींमध्ये मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. सव्वा लाखापेक्षा अधिक मतदारांनी मतदानाची प्रतिज्ञा घेतली तर दोन लाखांपेक्षा अधिक मतदारांनी संकल्पपत्र भरले.

 

एक जिल्हा – एक व्हाट्सअप नंबर

अहिल्यानगर जिल्ह्यात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी एक जिल्हा – एक व्हाट्सअप नंबर हा अभिनव उपक्रम राबवला जातोय. या उपक्रमासोबतच, जिल्ह्यातील मतदारांसाठी ई-शपथविधीचा उपक्रमही सुरू करण्यात आला आहे, ज्यामध्ये मतदारांना शपथ घेतल्यानंतर क्यू आर कोडच्या माध्यमातून ई-प्रमाणपत्रही दिलं जातंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री मध्ये आमची स्वीपची टीम थेट शेतमजुरांपर्यंत पोहोचली, सर्व शेतमजुरांनी काम तर बारा महिने चालतं, पण मतदानाच्या दिवशी आम्ही नक्की मतदान करणार असा संकल्प व्यक्त केला आहे. या अशा प्रयत्नांसोबतच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सर्व जिल्ह्यांच्या समाजमाध्यम खात्यांवरूनही मतदार जागृती केली जाते, मतदार जागृतीच्या उपक्रमांना प्रसिद्धी दिली जातेय. समाजमाध्यमांवरून सेलिब्रिटी, समाजातील प्रभावी व्यक्तिमत्वांची आवाहनं प्रसिद्ध केली जात आहेत.

सर्व सोयीसुविधायुक्त मतदान केंद्र

मतदान प्रक्रियेला मतदारांना आकर्षित करणारी असावी यासाठीही राज्यात अनेक ठिकाणी विशेष संकल्पना घेऊन मतदान केंद्र उभारली जात आहेत. यात वन्यजैवविविधता, सांस्कृतिक – सामाजिक वारशाचं दर्शन, स्तनदा – गर्भवती महिलांसाठी हिरकणी मतदान केंद्र, युवा – दिव्यांग – महिला संचलित विशेष मतदान केंद्र उभारली जात आहेत. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, सहकार्यासाठी स्वयंसेवकांची व्यवस्था, मतदारांसाठी शेड – पिण्याचं पाणी, स्वच्छतागृहांची सोय उपलब्ध असतील हे पाहिलं जातंय. अभिनव पद्धतीनं मतदारांचं स्वागत करून त्यांचा मतदानाचा अनुभव संस्मरणीय करण्याचा प्रयत्न सर्व ठिकाणी केला जातोय.

अशा या विविधांगी प्रयत्नांच्या माध्यमातून ९ कोटी ७० लाखापेक्षा जास्त मतदारांपर्यंत ज्यात, २ कोटी पेक्षा जास्त युवा म्हणजे १८ ते २९ वयोगटातलेही मतदार आहेत आणि वयाची शंभरी पूर्ण केलेले ४७ हजारापेक्षा जास्त मतदार आहेत त्या सर्वांपर्यंत पोहोचून सजग, जाणकार, आणि शिक्षित मतदार घडवण्याचा आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा निवडणूक यंत्रणेचा प्रयत्न आहे. त्यामुळे निवडणूक यंत्रणा मतदानाच्या दिवसासाठी सज्ज झाली असून आता प्रत्येक मतदाराची जबाबदारी आहे आपला मतदानाचा हक्क बजावण्याची.

संध्या गरवारे

विभागीय संपर्क अधिकारी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

*****

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात १९ नोव्हेंबर तर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात १८, १९ आणि २० नोव्हेंबरला मुलाखत

मुंबई, दि. 16 : राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाची तर 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभेची ही निवडणूक नि:पक्षपाती वातावरणात पार पडावी यासाठी भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगामार्फत काटकोरपणे तयारी करण्यात आली असून यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाच्या दिवशी प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला अधिक बळकट करावे, असे आवाहन अतिरिक्त निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून केले आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करिता ‘राज्य निवडणूक आयोगाची तयारी’ याविषयावर राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

डॉ. कुलकर्णी यांची मुलाखत ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मंगळवार दि. 19 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत सोमवार दि. 18, मंगळवार दि. 19 आणि बुधवार दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रसाद मोकाशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

00000

ताज्या बातम्या

सर्वसामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. २१, (जि. मा. का.) : कोविड पासून सर्वजण वैद्यकीय सेवेच्या बाबतीत सतर्क झाले आहेत. आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी व उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान भारतासाठी गौरव, मराठी जनतेसाठी अभिमानास्पद...

0
मुंबई, २१ : छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे नेहमीच वैश्विक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्याने त्यांच्या कार्याच्या...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी – गरजू रुग्णांसाठी विश्वासार्ह आधार

0
भारतातील ग्रामीण, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे एक मोठे आव्हान आहे. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता...

महाराष्ट्र नायक कॉफी टेबल बुकचे राज्यपालांच्या हस्ते २२ जुलै रोजी प्रकाशन

0
मुंबई, दि. २१ :-  मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

आरोग्य क्षेत्रात सामाजिक संस्थांचे योगदान मोलाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. २१ :-  राज्यात आरोग्यसेवा अधिक सक्षम करत सामान्य माणसाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी शासन विविध योजना, उपक्रम राबवत आहे. शासनाच्या या...