शनिवार, जुलै 5, 2025
Home Blog Page 50

परदेशी विद्यापीठाच्या आगमनाने भारत शिक्षण क्षेत्रात जागतिक केंद्र होण्याच्या मार्गावर

मुंबई, दि. सरकार, उद्योग, परदेशी विद्यापीठे आणि स्थानिक संस्था यांच्या सहकार्याने भारत जगातील आघाडीचे शैक्षणिक केंद्र बनण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे. हे केवळ शिक्षणाचे नव्हे तर सांस्कृतिक, आर्थिक आणि सामर्थ्यवान भारताच्या उभारणीचे पर्व ठरणार आहे.भारत उच्च शिक्षणाच्या जागतिक नकाशावर एक नवा अध्याय लिहित आहे, असे मत ऑस्ट्रेलिया व ब्रिटनच्या उच्चायुक्तातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
“मुंबई रायझिंग : क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी” या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत, पाच जागतिक स्तरावर प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांना मुंबई आणि नवी मुंबईत त्यांच्या कॅम्पसची स्थापना करण्यासाठी इरादापत्रे (LOIs) प्रदान कार्यक्रम आज मुंबईतील हॉटेल ताज येथे झाला. यावेळी भारतातील परदेशी विद्यापीठे: उद्योग आणि शैक्षणिक सहकार्यासाठी एक नवीन सीमा (Foreign Universities in India: A New Frontier for Industry and Academic Collaboration) या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ब्रिटिश कौन्सिलच्या भारतातील संचालक अ‍ॅलिसन बारेट आणि ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तालयातील शिक्षण सल्लागार जॉर्ज थिव्हिओस यांनी भारतातील परदेशी विद्यापीठांची वाढते स्थान, दोन्ही देशांतील सहकार्याचे स्वरूप आणि भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर नेतृत्व मिळवण्यासाठीची गरज यावर मत मांडले.
मुंबई हे शैक्षणिक आणि सर्जनशील केंद्र – बारेट
यावेळी श्रीमती अ‍ॅलिसन बारेट म्हणाल्या, की. मुंबई ही केवळ आर्थिक नव्हे तर सर्जनशील उद्योगांची राजधानी आहे. त्यामुळे येथील शैक्षणिक सहकार्याला विशेष महत्त्व आहे. युके सरकारच्या आंतरराष्ट्रीय औद्योगिक धोरणात सर्जनशील क्षेत्राला अग्रक्रम आहे आणि भारतासोबत सांस्कृतिक सहकार्य वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लंडनच्या इम्पीरिअल कॉलेजने नुकतीच बेंगळुरूमध्ये आपली शाखा उघडली आहे. पूर्वी शिक्षणासाठी देशाबाहेर गेलेले विद्यार्थी भारतात परत येत नसत. पण आता ही परिस्थिती बदलते आहे. ‘ब्रेन ड्रेन’ ऐवजी आता ‘ब्रेन सर्क्युलेशन’ घडत आहे,” असे अ‍ॅलिसन बारेट यांनी स्पष्ट केले.
भारतीय पारंपरिक ज्ञान, स्टार्टअप संस्कृती आणि नवाचाराला परदेशी विद्यापीठे देखील आत्मसात करू लागली आहेत. युकेच्या अंदाजे ३०० आंतरराष्ट्रीय केंद्रांचा दाखला देत भारतातही अशा सहकार्याच्या अमर्याद शक्यता असल्याचे ही त्यांनी यावेळी नमूद केले.
ऑस्ट्रेलिया-भारत: दीर्घकालीन शैक्षणिक भागीदारी – जॉर्ज थिव्हिओस
जॉर्ज थिव्हिओस म्हणाले की, भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये शैक्षणिक संबंध नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अनुषंगाने अधिक दृढ झाले आहेत. आयआयटी मुंबई,–मोनाश, टीआयएसएस–मोनाश, पुणे विद्यापीठ–युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न यांसारख्या सहकार्यामुळे भारतात शैक्षणिक पायाभूत सुविधा तयार आहेत.
भारतात एकाच शहरात पाच विविध देशांतील विद्यापीठे उघडणे ही जागतिकदृष्ट्या दुर्मिळ गोष्ट आहे. ही सहकार्याची नवी सुरुवात आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधनानुसार, एका विद्यापीठात १०० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक झाली, तर त्याचा सकल राष्ट्रीय उत्पादनावर एक अब्ज डॉलर्सचा परिणाम होतो. भारतात सध्या पाच परदेशी विद्यापीठे सुरू होत असून, याचा ५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आर्थिक फायदा अपेक्षित आहे, असे जॉर्ज थिव्हिओस यांनी सांगितले.
या विशेष परिसंवादाचे सूत्रसंचालन शूलीनी विद्यापीठाचे संस्थापक व उपकुलपती अतुल खोसला यांनी केले.
००००

मुंबईला जागतिक ज्ञाननगरी बनण्याची संधी : भारतातील शिक्षण क्षेत्राचे भविष्य विषयावर तज्ज्ञांचे मत

मुंबई, दि. 14 – जागतिक दर्जाच्या शैक्षणिक पायाभूत सुविधा, सरकारी प्रोत्साहन, उद्योगक्षेत्राचा सहभाग आणि प्रेरणादायी शिक्षक यांच्या साहाय्याने भारताचे शिक्षण क्षेत्र जगात अग्रस्थान मिळवू शकते आणि मुंबई हे त्याचे प्रमुख केंद्र ठरू शकते. मुंबईला ‘जागतिक ज्ञाननगरी’ बनण्याची संधी असल्याचे मत मुंबई रायझिंग – क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी” या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.
“मुंबई रायझिंग : क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी” या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत, पाच जागतिक स्तरावर प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांना मुंबई आणि नवी मुंबईत त्यांच्या कॅम्पसची स्थापना करण्यासाठी इरादापत्रे (LOIs) प्रदान कार्यक्रम आज मुंबईतील हॉटेल ताज येथे झाला. यावेळी आयोजित ‘भारतातील शिक्षण क्षेत्राचे भविष्य’ या विषयावरील विशेष परिसंवादात भारतातील शिक्षण क्षेत्राच्या भविष्यावर तज्ज्ञांनी सखोल चर्चा केली. या परिसंवादात रॉय कपूर फिल्म्सचे संस्थापक सिद्धार्थ रॉय कपूर, सॉफ्टबँक इंडिया चे माजी प्रमुख मनोज कोहली आणि अ‍ॅक्सिस बँकेचे कार्यकारी संचालक मुनीश शारदा सहभागी होते.

विद्यार्थ्यांचे परदेशगमन रोखण्यासाठी संधी निर्माण करा – सिद्धार्थ रॉय कपूर
सिद्धार्थ रॉय कपूर म्हणाले, “भारतात सर्जनशील कलेसाठी संरचित प्रशिक्षणाच्या संधी कमी आहेत, म्हणून विद्यार्थी परदेशी जातात. परंतु परत आल्यावर त्यांना भारतीय प्रणालीशी जुळवून घेता येत नाही, असे सांगितले जाते. ही मोठी विसंगती आहे. आपल्याकडे कलाक्षेत्रातील प्रशिक्षण केंद्रे निर्माण करून ही परिस्थिती बदलता येईल. दक्षिण कोरियाने आपली संस्कृती, चित्रपट, खाद्यसंस्कृती जगभर पोहोचवली. भारतही अशा प्रकारे सॉफ्ट पॉवरचा प्रभाव निर्माण करू शकतो.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) म्हणजे धोका नसून संधी आहे. सर्जनशील क्षेत्रातही एआयचा योग्य वापर करून दर्जेदार काम करता येईल. उद्योग आणि एआय कंपन्यांनी एकत्र प्रयोगशाळा उभारल्या, तर नैतिक व सामाजिक समस्या आधीच सोडवता येतील,” असेही श्री. रॉय यांनी सांगितले.

मुंबईचे रूपांतर जागतिक शिक्षण केंद्रात होऊ शकते – मुनीश शारदा
अ‍ॅक्सिस बँकेचे कार्यकारी संचालक मुनीश शारदा म्हणाले की, पुढील सात वर्षांत भारताचा नवा चेहरा उभा राहील. मुंबईकडे ज्ञाननगरी होण्याची पूर्ण क्षमता आहे. शिक्षणासाठी पायाभूत सुविधा, दर्जेदार प्राध्यापक, प्रयोगशाळा, रोजगार संधी आणि जागतिक दर्जाचे विद्यार्थी हे सर्व इथे उपलब्ध होऊ शकतात. योग्य नियोजन आणि गुंतवणुकीद्वारे मुंबई न्यूयॉर्क, बोस्टन आणि सिंगापूरलाही मागे टाकू शकते.
शिक्षणासाठी भांडवल आवश्यक आहे. बँकांनी शिक्षण कर्ज, व्यवहार प्रणाली, आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करून महत्त्वाची भूमिका बजावावी. सरकारने ‘मुंबई शिक्षण सार्वभौम निधी’ स्थापन करून शिक्षणात दीर्घकालीन गुंतवणुकीला चालना द्यावी,” अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

उद्योग, सरकार आणि शिक्षक यांची त्रिसूत्री आवश्यक – मनोज कोहली
मनोज कोहली यांनी शिक्षण क्षेत्राच्या दीर्घकालीन यशासाठी सरकारचे प्रोत्साहन, उद्योगक्षेत्राचे सहभाग आणि गुणवत्तापूर्ण शिक्षक हे तीन महत्त्वाचे घटक अधोरेखित केले. मुंबईतील पाच नव्या विद्यापीठांची घोषणा ही सुरुवात आहे. २०४७ पर्यंत आपल्याला जागतिक दर्जाची ज्ञाननगरी घडवावी लागेल. त्यासाठी उच्च दर्जाचे शिक्षक तयार करणे, संशोधनासाठी प्रयोगशाळा उभारणे आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे शिक्षण देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
भारताकडून जागतिक गुंतवणूक अपेक्षित आहे. आपल्याकडे प्रतिभावान विद्यार्थी आहेत, परंतु दर्जेदार शिक्षणसंस्था नाहीत. ही पोकळी भरून काढल्यास मोठ्या प्रमाणात गुंतवणूक भारतात येऊ शकते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
०००००

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.१४: भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज राहणार नाही कारण आज राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरणातंर्गत पाच परदेशी विद्यापीठांसोबत आशयपत्र प्रदान  केले आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब मुंबई, नवी मुंबईत उभारण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हॉटेल ताज येथे ‘मुंबई रायझिंग : क्रिएटिंग अ‍ॅन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी’ या पाच जागतिक विद्यापीठांना (एलओआय) आशयपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,केंद्रीय शिक्षण सचिव तथा विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष विनित जोशी,अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, ब्रिटनच्या उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन, ऑस्ट्रेलियाचे कॉन्सुल जनरल पॉल मर्फी,अमेरिकेचे कॉन्सुल जनरल माईक हॅंकी, इटलीचे कॉन्सुल जनरल वॉल्टर फेरारा, अ‍ॅबर्डीन विद्यापीठाचे उपप्राचार्य ग्लोबल एंगेजमेंट प्रा.सिलादित्य भट्टाचार्य, यॉर्क विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. चार्ली जेफ्री, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ उपकुलगुरू गॉय लिटलफेअर, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष इलिनॉय टेक राज ईचंबाडी, आयईडी चे रिकार्डो बाल्बो,अधिष्ठाता,विविध विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,युनिव्हर्सिटी ऑफ अॅबर्डीन (स्कॉटलंड, यु.के.),युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क (यु.के.),युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया),इलीनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका),इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन (इटली) ही  जगातील पाच नामवंत विद्यापीठे भारतात येत आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

परिसरात ही विद्यापीठे उभी राहणार आहेत.याचं परिसरात येत्या काही वर्षात मेडिसिटी,स्पोर्टस सिटी आणि इनोव्हेशन सिटी उभारणारण्यात येणार आहे. येथे आगामी कालावधीत दहा विद्यापीठ एकत्र येतील अशी संकल्पना राबवण्यिाचा विचार आहे. सध्या या पाच विद्यापीठांमुळे हा परिसर पूर्ण शिक्षण आणि संशोधन साठी ओळखला जाईल.मुंबईची सध्या वित्तीय,औद्योगिक आणि मनोरंजन उद्योगाचे शहर म्हणून ओळख आहे. विद्यापीठामुळे एज्युकेशनल सिटी अशी ओळख होईल.विकसित भारत २०४७ मध्ये हा निर्णय महत्वाची भूमिका बजावेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अ‍ॅबरडीन विद्यापीठ, यॉर्क विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इस्टिट्यूटो युरोपियो डी डिझाईन हे मुंबई,नवी मुंबईत पूर्ण कॅम्पस आणणार आहेत – राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० शी सुसंगत अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित होत आहे. अटल सेतू निर्माण झाला आहे.. पायाभूत सुविधांच्या व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी यामुळे

विद्यापीठाशी निगडित सर्वांना उपयुक्त ठरेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे परदेशातील अनेक विद्यापीठांना भारतात येण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे.ज्या भारतीय तरुणांना परदेशी जाऊन शिक्षण घेणं शक्य नाही त्यांचे स्वप्न आता अपुरे राहणार नाही. सध्या पाच विद्यापीठे आली आहेत. पण भविष्यात अजूनही विद्यापीठांचे स्वागत करायला आम्ही तयार आहोत.नुकताच वेर्स्टन युनर्व्हसिटी आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

विकसित भारत करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण हातभार लागेल : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की,मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे त्याचबरोबर ही आर्थिक राजधानी देखील असून आगामी कालावधीत मुंबई येथे शिक्षणाचे हब होण्यासाठी परदेशी पाच विद्यापीठांचा खूप महत्त्वाचं योगदान राहील. भारत हा प्राचीन काळापासून शिक्षण क्षेत्रात जागतिकस्तरावर  नावलौकिक राहीला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये विकसित भारतची स्वप्न साकारण्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. नवीन शैक्षणिक धोरणामुळे जागतिक पातळीवरच्या विद्यापीठांना देखील आपल्या संस्था भारतात सुरू करता येणार आहेत त्याचबरोबर भारतातील शिक्षण संस्थांना परदेशामध्ये आपल्या शाखा उघडता येणे शक्य होणार आहे.भारतात जागतिक दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना कमी खर्चात उपलब्ध होईल. आज भारतातील आयआयटी, आयआयएम, आयएफ, सिम्बॉयसिस यासारख्या संस्था परदेशामध्ये  सुरू झाल्या आहेत.परदेशी विद्यापीठ भारतात येवून शिक्षण देणार भारताला विकसित बनवण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रात पुढे नेण्यासाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे असेही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

यावेळी गुजरात अहमदाबाद विमान दूर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाश्यांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली.मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ ढवसे यांनी सुत्रसंचालन केले.प्रास्ताविक सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले.यावेळी केंद्रीय शिक्षण सचिव विनित जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.

जागतिक दर्जाची पाच विद्यापीठे नवी मुंबईत

युनिव्हर्सिटी ऑफ अ‍ॅबरडीन, यूकेमधील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक आणि भारतात कॅम्पस स्थापन करणारे पहिले स्कॉटिश विद्यापीठ असून 200 हून अधिक भारतीय विद्यापीठे आणि संशोधन केंद्रांसह अनेक दशकांच्या विद्यापीठ भागीदारी  यामध्ये असून  आयआयटी – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी; एम्स – ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस; मणिपाल अकादमी; आयसीएआर – इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च, आयसीएमआर – इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि दिल्ली विद्यापीठ यांचा समावेश आहे.

जगातील टॉप 100 विद्यापीठांमध्ये स्थान मिळवलेले आणि आयव्ही लीग समतुल्य संस्था आणि मुंबईत कॅम्पस स्थापन करणारे ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित ग्रुप ऑफ एट (Go8) विद्यापीठांमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेले वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ. भारतीय विद्यार्थ्यांच्या आकांक्षा आणि भविष्यात जागतिक कार्यबल आणि अर्थव्यवस्थेच्या विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेले विज्ञान,औद्योगिक व इंजिनिअरींग या क्षेत्रात (STEM)व्यवसाय या विषयांमध्ये पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम असतील.

यॉर्क विद्यापीठ ही यूकेमधील सर्वात प्रतिष्ठित संशोधन-केंद्रित संस्थांपैकी एक आहे तसेच ते रसेल ग्रुपची सदस्य आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षा, व्यवसाय, अर्थशास्त्र आणि सर्जनशील उद्योगांसह संगणक विज्ञानातील अत्याधुनिक पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध होतील. उदयोन्मुख क्षेत्रातील कार्यक्रम – एआय, सायबर सुरक्षा, सर्जनशील उद्योग – जागतिक उद्योगांच्या इनपुटसह डिझाइन केले जातील.भारतीय विद्यार्थ्यांसाठी नोकरीचा संधी उपलब्ध होतील.

इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इलिनॉय टेक) हे स्वतंत्ररित्या पदवी देणारे आणि भारतात कॅम्पस स्थापन करणारे पहिले अमेरिकन विद्यापीठ आहे.संगणक विज्ञान, अभियांत्रिकी आणि व्यवसाय यासारख्या उच्च मागणी असलेल्या क्षेत्रांमध्ये पदवीपूर्व आणि पदवीधर शिक्षण उपलब्ध होतील. त्यांचा प्रसिद्ध एलिव्हेट प्रोग्राम देखील ते राबवणार आहेत. जो सर्व विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, संशोधन, स्पर्धा उपलब्ध करून देईल.

युरोपमधील प्रीमियम डिझाइन शाळांपैकी एक, इस्टिटुटो युरोपियो डी डिझाइन (IED) फॅशन, उत्पादन डिझाइन आणि व्हिज्युअल कम्युनिकेशनमध्ये जागतिक दर्जाचे कौशल्य उपलब्ध  करून देईल.

०००००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण

पुणे, दि. १४: पुणे शहरात प्रवास करणारे नागरिक आणि वाहतूक विभागात समन्वयासाठी, परिस्थितीनुसार दुहेरी संवाद राहण्यासाठी आणि नागरिकांना वाहन चालवताना संबंधित परिसरातील वाहतूकीची माहिती तात्काळ मिळण्याच्या दृष्टीने पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने तयार केलेल्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे (PTP TRAFFICCOP APP) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

विधानभवन येथे आयोजित एका बैठकीत झालेल्या लोकार्पण कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून हे ॲप तयार करून घेण्यात आले आहे. यावेळी पुणे शहरच्या पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी या ॲपबाबत माहितीचे चित्रफीतीद्वारे सादरीकरण केले.

पुणेकरांना उद्भवणाऱ्या नागरी समस्यांमध्ये मुख्यतः वाहतूक कोंडी, त्यातून घडणारे अपघात आणि वाहतूकीमुळे निर्माण होणारे प्रदूषण आदी गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यास प्रामुख्याने वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर प्रभावी कारवाई न होणे, हे सुद्धा एक मुख्य कारण आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी पुणे पोलिसांनी नागरीकांना सक्षम करण्यासाठी व वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त श्री. पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खासगी संगणक अभियंत्यांकडून हे ॲप तयार करून घेण्यात आले आहे.

या ॲपमध्ये फुटपाथवर वाहन पार्किंग करणे, पदपथावरून वाहन चालविणे, जड वाहनांचे निर्बंधांचा भंग करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, ट्रिपल सिट वाहन चालविणे, काळ्या फिल्मचा वापर, फॅन्सी नंबर प्लेट, विरूद्ध दिशेने नो एंन्ट्रीतुन वाहन चालविणे आदी प्रकारचे धोकादायक नियमभंग करणान्या वाहन चालकांची छायाचित्रे नागरीक या ॲपवर अपलोड करू शकतील.

या व्यतिरिक्त रिपोर्ट इन्सीडेन्टअंतर्गत वाहतूक कोंडीस कारणीभूत असणाऱ्या अपघात, वाहनात बिघाड, रस्त्यातील खड्डे, वाहतूक कोंडी, रस्त्यात तेल गळती, रस्त्यावर पाणी साचणे, रस्त्यावर झाड पडणे, रस्त्यात बेवारस असणारे वाहन आदी अडथळ्यांची माहिती नागरीक या ॲपद्वारे वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षास कळवू शकतात. वाहतूक नियमभंगाचा फोटो पाठविणाऱ्या किंवा तक्रार करणाऱ्या नागरिकांची गोपनीयता राखली जाणार आहे. गोपनीयता भंग होणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घेण्यात येईल.

अशी देता येईल माहिती :

वाहतूक नियमभंगाची माहिती अपलोड करताना नियमभंग करणाऱ्या वाहनाचे छायाचित्र किंवा चित्रफीत पोस्ट करावे. संबंधित वाहनाची नंबरप्लेट सुस्पष्ट दिसणे आवश्यक आहे. वाहतूक अडथळ्यांची माहिती अपलोड करताना वाहतूक अडथळयाचे छायाचित्र किंवा चित्रफीत पोस्ट करावे. अडथळ्याचे वर्णन या टॅबमध्ये सविस्तर व अचूक माहिती देणे आवश्यक आहे.

या ॲपच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारीची पुढील ४८ तासांमध्ये पडताळणी करून वाहतूक पोलीस नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर ऑनलाईन चलन तयार करतील.

अडथळ्यांबाबतची माहिती मिळाल्यावर वाहतूक नियंत्रण कक्ष अधिकारी त्याची तात्काळ दखल घेवून, तक्रारीचे निरसन करण्यासाठी संबंधित वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी यांना किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेस कळवून प्राप्त तक्रारींची पूर्तता प्राधान्याने करून घेतील. जेणेकरून वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या बाबींवर तातडीने उपाययोजना होवून शहरातील वाहतूक सुरळीत राहील. या प्रणालीद्वारे माहिती मिळाल्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याने नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतुक शाखेकडून करण्यात आले.

0000

पुणे विभागातील कोविड-१९ परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

पुणे दि. १४: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवन येथे आयोजित बैठकीत पुणे विभागातील कोविड-१९ साथीच्या अनुषंगाने आढावा घेतला. लक्षणे सौम्य असली तरी वृद्ध तसेच सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक असून आरोग्य विभाग, महानगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे कोल्हापूर मनपा आयुक्त के. मंजुलक्ष्मी, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. कंदेवाड यांनी कोविड-19 च्या अनुषंगाने सादरीकरण केले. सद्यस्थितीत तपासणीमध्ये ओमीक्रॉनचे जेएन, एक्सएफजी व जीएफ7-9 हे उपप्रकार आढळून येत आहेत. या प्रकारामुळे ताप, खोकला, घसा दुखणे असे सौम्य आजार होतात. फक्त रक्तशर्करा, कर्करोग आदी सहव्याधी कमी असलेले, रोग प्रतिकार शक्ती कमी असलेले नागरीक आदींना थोडा धोका जास्त आहे. अशांनी गर्दीत जाणे टाळावे. हात स्वच्छ धुणे, मास्क वापरणे तसेच सुरक्षित अंतर ठेवावे. श्वसनदाह वाढल्यास त्वरीत जवळच्या दवाखान्यात जाऊन तपासणी व इलाज करावा, असे यावेळी सांगण्यात आले.

सहायक संचालक डॉ. प्रशांत वाडीकर, विभागातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यावेळी होते. त्यांना कोविड व वारीबाबत काळजी घेण्याच्या सूचना व सर्व रुग्णालये कोविडच्या संभाव्य साथीसाठी सज्ज ठेवण्याच्या व सतत माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

0000

 

 

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे दि. १४: आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी; पालखी तळ, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच संपूर्ण पालखी मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

पुणे विधानभवन येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२५ पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीए आयुक्त डॉ.योगेश म्हसे, पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, पावसाच्या पार्श्वभूमीवर विसाव्याच्या, मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक व्यवस्था करावी. दिवे घाटात पाऊस पडत असल्यास पालखी सोहळा जाण्यास अडचण येणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. घाट परिसरात पालखीचे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांना प्रतिबंध करावा. डोंगराच्या बाजूने खोदाई सुरू असल्याने पावसाने दगड रस्त्यावर येऊन वारकऱ्यांना धोका होऊ उत्पन्न होऊ नये म्हणून बॅरिकेटिंग करावे.

उंडवडी कडेपठार येथील बारामतीकडे जाणाऱ्या जुन्या तुकाराम महाराज पालखी मार्गावरील राडारोडा दूर करावा, रस्त्यावरील खड्डे भरून घ्यावेत, काम वेगाने पूर्ण करावे. इंदापूरकडे जाणाऱ्या पालखी महामार्गाचे कामाला वेग द्यावा. इंदापूर ते पंढरपूर दरम्यान पालखी महामार्गाच्या कामाला गती मिळणे आवश्यक असून पालखी जाईपर्यंत सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना कराव्यात. पीएमआरडीएच्या मेट्रोच्या कामामुळे रस्त्याच्या बाजूला असलेले बांधकाम साहित्य त्वरित बाजूला करावे.

महावितरणने संपूर्ण पालखी मार्गावर आपली अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक सतर्क आणि कार्यरत ठेवावे. जिल्हा परिषद व नगरपालिकांनी पालखी सोहळा पुढे गेल्यावर त्वरित त्या मार्गाची, गावांची स्वच्छता करावी. मुक्कामाच्या ठिकाणी वीज व्यवस्थेसाठी संबंधित जिल्हा परिषदेने जनरेटरची व्यवस्था करावी. आवश्यकता असल्यास जनरेटरसाठी जिल्हा नियोजन समितीतून अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

वादळात रस्त्याच्या कडेला असलेले जाहिरात फलक खाली कोसळून दुर्घटना होऊ नये म्हणून अनधिकृत फलक तातडीने काढावे. त्यासाठी संपूर्ण मार्गावर महसूल, पोलीस अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांनी संयुक्त पाहणी करावी. अधिकृत जाहिरात फलकांचे संरचनात्मक स्थीरता परीक्षण (स्ट्रॅक्चरल स्टॅबिलीटी ऑडिट) करून घ्यावे, असे निर्देशही श्री.पवार यांनी दिले.

कोविडच्या साथीच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा प्रमुख, दिंडीप्रमुखांशी संवाद साधून सर्दी, ताप, खोकला आदी त्रास असणाऱ्या वारकऱ्यांनी वारीत सहभागी होण्यापूर्वी तपासणी करुन घ्यावी असे आवाहन करावे. असे आजार असलेल्या वारकऱ्यांची तपासणी, उपचार तातडीने होतील यासाठी आवश्यक ते तपासणीची व्यवस्था, औषधे पालखीमार्गावरील आरोग्य पथकांकडे ठेवावीत, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त श्री. पुलकुंडवार यांनी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. स्वच्छ आणि निर्मल वारीसाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार, विनय कुमार चौबे यांनी सुरक्षा आणि वाहतूक नियोजनाबाबत माहिती दिली. इतर उपस्थित जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही पालखी सोहळ्यासाठी आवश्यक सूचना तसेच केलेल्या तयारीची माहिती दिली.

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते पुणे पोलीस वाहतूक शाखेतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ मोबाईल ॲपचे लोकार्पण करण्यात आले. पालखीचे रिअल टाईम ट्रॅकिंगसाठी पालखी ट्रॅकिंग ॲपचे लोकार्पण करण्यात आले. तसेच पुणे पोलीस आयुक्तालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट वारी’ या संगणकीय उपक्रमाचेही लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत वारकऱ्यांची संख्या मोजण्यात येणार असल्यामुळे भविष्यात अचूक नियोजनासाठी उपयोग होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

0000

आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क

मुंबई,दि. १४ : अतिवृष्टी आणि संभाव्य पूर परिस्थिती बाबत उपाय योजना म्हणून   एनडीआरएफ, एसडीआरएफ पथकांना आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  राज्यात मागील २४ तासामध्ये (१४ जून रोजी सकाळपर्यंत) सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७०.३ मिमी पाऊस झाला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात ४५ मिमी,  मुंबई शहर २५.४, पुणे २३.८ आणि रायगड जिल्ह्यात २० मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.

राज्यात कालपासून आज १४ जून २०२५  रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे ३.४,रायगड २०, रत्नागिरी ४५,  सिंधुदुर्ग ७०.८,  पालघर ०.२, नाशिक १०.५, धुळे २.२, नंदुरबार ४.६, जळगाव ४.८, अहिल्यानगर ५.५, पुणे २३.८, सोलापूर ५.९,  सातारा ८.८,  सांगली २.६,  कोल्हापूर ७, छत्रपती संभाजीनगर १६.७, जालना ७.८, बीड ७.६, लातूर २,  धाराशिव ९.५, नांदेड ०.६,  परभणी ०.७,  हिंगोली ०.८, बुलढाणा २.७, अकोला ३, वाशिम १.८, अमरावती ०.६, यवतमाळ ०.८, नागपूर २.४, भंडारा ३.४, गोंदिया १.१, चंद्रपूर ०.४ आणि गडचिरोली ०.२.

इंद्रायणी नदी पात्रात देहू, आळंदी येथे एसडीआरएफ व एनडीआरएफ पथक

आषाढवारी निमित्ताने इंद्रायणी नदी पात्रात मोठ्याप्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे  (एसडीआरएफ) एक पथक देहु येथ तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) एक पथक आळंदी येथे तैनात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दोन व्यक्ती, तीन प्राण्यांचा मृत्यू

राज्यात अहिल्यानगर जिल्ह्यात  वीज पडून दोन प्राण्यांच्या मृत्यू, नाशिक जिल्ह्यात वीज पडून एका प्राण्याचा मृत्यू, पुणे जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्ती मृत्यू आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भिंत पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील अडीवरे गावात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन पुलावरुन पाणी वाहत होते. स्थानिक प्रशासनाकडून वाहतुक बंद करण्यात आली होती. याबाबत स्थानिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ठाणे जिल्ह्यातील तुर्भे एमआयडीसी येथे जनरेटरच्या धुरामुळे ग्रस्त झालेल्या २८ लोकांपैकी २६ व्यक्तींना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून दोन व्यक्ती रुग्णालयात उपचार घेत असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

००००

जागतिक शिक्षणाचा केंद्रबिंदू मुंबईत भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे शैक्षणिक हब महाराष्ट्रात

देशाच्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत भारतात शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. देशातील एकूण नोंदणी गुणोत्तर (Gross Enrollment Ratio – GER) ५०% पर्यंत नेण्याचे राष्ट्रीय उद्दिष्ट गाठण्यासाठी, भारताने जागतिक दर्जाचे शिक्षण आणि संशोधन भारतातच उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली आहेत.तसेच  महाराष्ट्रातही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे  महाराष्ट्रात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी  विविध अभिनव आणि परिवर्तनशील उपक्रम राबविले आहेत. यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञानाधारित अध्यापन, पारदर्शक भरती प्रक्रिया, विद्यार्थ्यांपर्यंत संधींची समान उपलब्धता आणि संशोधनाला चालना देणे यावर अधिक भर देऊन उच्च  शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शैक्षणिक बदल घडवत राज्यातील शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम, लोकाभिमुख केले जात आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने मुंबई/नवी मुंबई येथे पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे स्वतंत्र कॅम्पसेस उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम  हाती घेतला असून  भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रात हा मैलाचा दगड ठरणार आहे.

पहिल्या टप्प्यात सहभागी आंतरराष्ट्रीय विद्यापीठे

  1. University of Aberdeen – स्कॉटलंड
  2. University of York – युनायटेड किंगडम
  3. University of Western Australia – ऑस्ट्रेलिया
  4. Illinois Institute of Technology – अमेरिका
  5. Istituto Europeo di Design (IED) – इटली

या पाच नामवंत विद्यापीठांनी मुंबईत आपले शैक्षणिक केंद्र स्थापन करण्यास सहमती दर्शवली आहे. त्यांना केंद्र सरकार व विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) परदेशी विद्यापीठांना दिले जाणारे LOI (Letter of Intent) प्रदान करण्यात येणार आहे. या विद्यापीठांपैकी अनेक संस्था त्यांच्या देशात टॉप १०० मध्ये आहेत आणि Go8, Russell Group किंवा आयव्ही लीग यांसारख्या उच्च दर्जाच्या संघटनांशी संलग्न आहेत. भारतातील त्यांच्या कॅम्पसेसना पदवीपूर्व, पदव्युत्तर, पीएच.डी., डिप्लोमा आणि संशोधन कार्यक्रम राबवण्यासाठी पूर्ण स्वायत्तता आणि मान्यता देण्यात आली आहे.

भारतीय विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, देशातच विद्यार्थ्यांना आता जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम, संशोधन संधी आणि अनुभव परदेशी न जाता देशातच उपलब्ध होतील. हे शिक्षण केवळ परदेशी अभ्यासक्रमांची प्रतिकृती न राहता, भारतातील स्थानिक गरजांशी सुसंगत व रोजगारक्षम असेल. हे अभ्यासक्रम स्थानिक औद्योगिक गरजांनुसार अनुकूल केले जातील. संशोधन, स्टार्टअप्स आणि उद्योग सहकार्याला चालना मिळेल.विद्यार्थ्यांना एक्स्चेंज प्रोग्राम्स, सेमिस्टर ट्रान्सफर, ग्लोबल इंटर्नशिप्स यांसारख्या संधी उपलब्ध होतील. आणि प्राध्यापक व संशोधक यांचाही आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग वाढेल.

प्रत्येक विद्यापीठाचे वैशिष्ट्यपूर्ण योगदान

University of Aberdeen (स्कॉटलंड)

भारतामध्ये कॅम्पस स्थापन करणारे पहिले स्कॉटिश विद्यापीठ. जागतिक समस्यांवर उपाय शोधणाऱ्या अभ्यासक्रमांवर विशेष भर.

University of Western Australia (Go8)

STEM, व्यवसाय आणि संशोधन क्षेत्रातील अभ्यासक्रम. भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक कार्यबलासाठी सक्षम करणे हे मुख्य उद्दिष्ट.

University of York (UK – Russell Group)

एआय, सायबर सुरक्षा, बिझनेस आणि क्रिएटिव्ह इंडस्ट्रीजसाठी विशेष अभ्यासक्रम. जागतिक उद्योगांच्या गरजेनुसार अभ्यासक्रम डिझाइन.

Illinois Institute of Technology (USA)

इंजिनिअरिंग, संगणक विज्ञान आणि बिझनेस क्षेत्रात अग्रगण्य. Elevate प्रोग्रामच्या माध्यमातून संशोधन, इंटर्नशिप आणि रिअल-वर्ल्ड अनुभव.

Istituto Europeo di Design (IED – इटली) फॅशन, प्रॉडक्ट डिझाईन आणि व्हिज्युअल कम्युनिकेशन क्षेत्रात कौशल्याधारित, क्रिएटिव्ह शिक्षण देणारे प्रतिष्ठित संस्था आहेत.

राज्य शासन केवळ परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारत नाही, तर महाराष्ट्रातील विद्यापीठांनाही आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या संधी प्रदान करत आहे.यामध्ये Twinning, Dual Degree आणि Joint Degree कार्यक्रम संशोधन सहकार्य व विद्यार्थी-प्राध्यापक आदान-प्रदान असून उद्यमशीलता व नवोन्मेषावर आधारित आहे

त्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता वाढविणे या सहकार्यामुळे राज्यातील विद्यापीठांचे ग्लोबल रँकिंग सुधारण्यास मदत होईल, विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील करिअर व संधी उपलब्ध होतील आणि उद्योग-संस्थांशी थेट जोडले जातील

मुंबई रायजिंग – क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी” या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत, पाच जागतिक स्तरावर प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांना मुंबई आणि नवी मुंबईत त्यांच्या कॅम्पसची स्थापना करण्यासाठी इरादापत्रे (LOIs) अधिकृतपणे प्रदान केली जाणार आहेत. यामध्ये अ‍ॅबर्डीन विद्यापीठ (Aberdeen University), यॉर्क विद्यापीठ (University of York), वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ (University of Western Australia), इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (Illinois Institute of Technology) आणि इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन (Istituto Europeo di Design – IED) या विद्यापीठांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित पार पडणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली, सिडकोमार्फत उभारल्या जाणाऱ्या या आंतरराष्ट्रीय एज्युसिटीमुळे संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाची संधी मिळणार असून, हे शिक्षण विविध संस्कृतींच्या आदान-प्रदानाला चालना देईल आणि विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये सहकार्य व संवाद वाढवेल. भारतामध्येच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणे आणि परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस महाराष्ट्रात स्थापन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पाच किलोमीटर परिसरात सर्वोच्च 10 परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारण्याचे नियोजन आहे. ही देशातील पहिली अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी ठरणार आहे.

हा प्रकल्प नवी मुंबई व मुंबईला जागतिक शैक्षणिक केंद्र म्हणून ओळख मिळवून देईल आणि महाराष्ट्र राज्याचे एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट व भारताचे पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे आर्थिक लक्ष्य २०२९ पर्यंत साध्य करण्यासाठी एक महत्त्वाचा घटक ठरेल.

हा उपक्रम म्हणजे ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वज्ञानाचा शैक्षणिक अविष्कार आहे. महाराष्ट्राची ही वाटचाल केवळ राज्यापुरती मर्यादित नसून, ती नव्या भारताच्या ज्ञानाधिष्ठित विकासाची दिशा दर्शवणारी आहे.

-काशीबाई हनुमंत  थोरात धायगुडे

विभागीय संपर्क अधिकारी

००००

मुंबई उच्च न्यायालय मुख्य न्यायमूर्ती व न्यायमूर्ती मंडळ यांनी व्यक्त केल्या अहमदाबाद विमान दुर्घटनाप्रकरणी संवेदना

मुंबई, दि.१३ : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तसेच न्यायमूर्ती मंडळ आणि नोंदणी विभागातील अधिकारी यांनी अहमदाबाद येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात प्राण गमावलेल्या आणि गंभीर जखमी झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांप्रती आपल्या तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत.

या दु:खद प्रसंगी पीडित कुटुंबियांच्या सोबत खंबीरपणे उभे असून, त्यांच्या दु:खात सामील असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पीडित कुटुंबियांना या दुःखाच्या प्रसंगी बळ आणि मानसिक आधार मिळावा, यासाठी सदिच्छा व प्रार्थना व्यक्त केल्या आहेत.

त्याचप्रमाणे, बी. जे. मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटल, अहमदाबाद येथील प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी वर्गासाठीही आपल्या सदिच्छा व प्रार्थना व्यक्त केल्या आहेत.

००००

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सामाजिक न्यायाच्या विचारांना चालना देणारा ठरेल – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

नवी दिल्ली 13  : मुंबईतील इंदू मिल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक तयार होत असून या ठिकाणी 350 फूट उंच उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांचा भव्य पुतळा हा सामाजिक न्यायाच्या विचारांना चालना देणारा ठरेल असे पुतळ्याचे सुरू असलेले काम पाहिल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सांगितले.

सुप्रसिद्ध मूर्तिकार पद्मभूषण राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली गाझियाबाद येथे त्यांच्या वर्कशॉपमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे काम जलदगतीने सुरू आहे. श्री बनसोडे यांनी या पुतळयाच्या कामाची पाहणी केली, तसेच  या प्रकल्पाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. हा पुतळा तयार झाल्यावर जागतिक किर्तीमान तर ठरेलच सोबतच  देशासाठी प्रेरणादायीही ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राम सुतार यांचे चिरंजीव अनिल सुतार प्रत्यक्ष काम पाहत असून त्यांना येणाऱ्या अडचणी उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांनी समजून घेतल्या तसेच त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले. पुढील आठवडयात यासंदर्भात मुंबई येथे बैठक आयोजित करून या प्रकल्पाशी संबंधित सर्व विभागांची बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहितीही श्री बनसोडे यांनी यावेळी  दिली.

विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांनी पुतळ्याच्या निर्मिती प्रक्रियेची बारकाईने पाहणी केली. 100 फुट  उंच पादपीठासह 350 फूट उंचीच्या या पुतळ्याचे काम सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. पुतळ्याचा पायाचा भाग (बूट) 65 फूट लांब आणि 35 फूट रुंद असून, त्यासाठी सुमारे 20 टन धातूचा वापर होणार आहे. या पुतळयाचे काम डिसेंबर 2026 पर्यंत काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. श्री.बनसोडे यांनी पुतळ्याच्या गुणवत्तेची आणि तांत्रिक बाबींची तपासणी करून राम सुतार आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यावेळी झालेल्या बैठकीत राम सुतार, त्यांचे चिरंजीव अनिल सुतार, महाराष्ट्र विधानसभेचे सचिव डॉ. विलास आठवले,  एमएमआरडीएचे मुख्य अभियंता प्रकाश भांगरे, उमेश साळवी, शापुरजी पालनजीचे उमेश साळुंखे, शशी प्रभू अँड असोसिएट्सचे अतुल कैटीकवार, भदंत राहूल बोधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन समन्वय समितीचे नागसेन कांबळे, सुबोध भारत उपस्थित होते.

विधानसभा उपाध्यक्ष यांनी त्यांच्या दिल्ली दौऱ्याची सुरुवात महाराष्ट्र सदनातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केली. त्यानंतर त्यांनी  अलीपुर रोडवरील डॉ.आंबेडकर नॅशनल मेमोरियलला भेट दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर आधारीत तसेच त्यांनी केलेल्या कार्याची माहिती या संग्रहालयाच्या माध्यमातून जनसामान्यांना कळेल असे सुरेख संग्रहालय बनविले असल्याचे गौरवउद्गार त्यांनी काढले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सेंटरचे संचालक आकाश पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जनपथ येथे असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सेंटरलाही त्यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटी दरम्यान महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत तयार करण्यात आलेली खासदार परिचय पुस्तिका विधानसभा अध्यक्ष बनसोडे यांना यावेळी देण्यात आली.

0000

ताज्या बातम्या

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पंढरपूर, दि.५:  सर्व संतांनी निसर्गप्रेम आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे, आपल्या नद्या, निसर्गांवर प्रेम करायला शिकवले आहे. त्यामुळे विठुमाऊलीच्या दर्शनाला येताना त्यांचा संदेश प्रत्यक्षात...

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार पंढरपूर, दि. ५: शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी, यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

0
मुंबई दि ०५: विविध विषयांचे अभ्यासक व तज्ज्ञ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व विधिज्ञ, अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ असे बहुआयामी होते. शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाबरोबरच डॉ. बाबासाहेब...

विद्यार्थी नात्याने नवीन विषयांचा प्रांजळपणे अभ्यास करणेही गरजेचे – सरन्यायाधीश भूषण गवई

0
मुंबई दि ०५:  विविध आव्हानात्मक परिस्थितींचा सामना करताना वेळप्रसंगी प्रत्येक नवीन विषयाचा विद्यार्थी या नात्याने प्रांजळपणे अभ्यास करणेही गरजेचे असल्याचे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन

0
पंढरपूर, दि. ५ (जिमाका): आषाढी शुद्ध एकादशी निमित्त वाखरी येथे पोहोचलेल्या आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट...