शुक्रवार, मे 9, 2025
Home Blog Page 482

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विकसित महाराष्ट्रासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु

७८ व्या स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

मुंबई, दि. 15-  राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येथील नागरिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे. शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी या सर्व घटकांच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकासाला चालना देण्याचे काम होत आहे. विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी  राज्य शासनाने राबविलेल्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालय येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे  यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव,  प्रधान सचिव यांच्यासह सैन्य दलाचे अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधीकारी, स्वातंत्र्यसैनिक आणि इतर विभागांचे अधिकारी –कर्मचारी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपस्थितांना अभिवादन केले. त्यानंतर, मंत्रालयातील राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने भरीव कामगिरी केली आहे. विदेशी गुंतवणूक, समाजातील दुर्बल, गोरगरीबांसाठी आखलेल्या नाविन्यपूर्ण योजना या माध्यमातून नागरिकांप्रती असणारी बांधीलकी दाखवून दिली आहे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 5 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनवून जगातली तिसरी अर्थव्यवस्था होण्यासाठी आगेकूच सुरु आहे. त्यामध्ये आपल्या राज्याचा वाटा मोठा असणार आहे. राज्याची वाटचाल त्या दिशेने सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्यातील गुंतवणूकदार, उद्योजक किंवा सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम राज्य शासनाने केले आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,   कृषि, शिक्षण, ऊर्जा, निर्मिती, माहिती तंत्रज्ञान, बांधकाम, पर्यटन, आरोग्य सुविधा, कौशल्य विकास,  पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा या क्षेत्रांमध्ये आपण आमूलाग्र क्रांती आणत आहोत.  राज्यात 15 दशलक्ष रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट्य आपण ठेवले आहे. राज्याची लॉजिस्टिक पॉलिसी जाहीर केली आहे. यातून येत्या पाच वर्षात 30 हजार कोटींचा महसूल राज्य शासनाला मिळणार आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याने राज्यात गुंतवणुकीचा वेग वाढला आहे. गेल्या दोन वर्षात 5 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी करार झाले आहेत. थेट परकीय गुंतवणुकीत तर आपण देशात प्रथम आहोत. त्या माध्यमातून अडीच लाख रोजगार निर्मिती आपण केली आहे.देशाच्या एकूण उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा 14 टक्के आहे. उद्योगात आणि सेवा क्षेत्रात आपले राज्य क्रमांक एकवर आहे. विदेशी पर्यटकांची पसंतीही महाराष्ट्र असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सुमारे दहा लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामे राज्यात सुरु आहेत.  समृद्धी महामार्गा सारखा गेम चेंजर असणाऱ्या प्रकल्पाचा शेवटचा टप्पा पूर्ण होऊन नागपूर ते मुंबई पूर्ण वाहतूक लवकरच सुरु होणार आहे. पायाभूत सुविधांसोबतच गोरगरीब, दुर्बल, वंचित यांना विकासाच्या प्रक्रियेत समाविष्ट करुन घेतले जात आहे. राज्य शासनाच्या सात पथदर्शी (फ्लॅगशिप)  योजनांनी राज्याच्या सामाजिक क्षेत्रात क्रांती आणली असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  राज्य शासनाने शासन आपल्या दारी योजनेच्या माध्यमातून तब्बल ४ कोटी लाभार्थींना लाभ दिला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ रक्षाबंधनापासून महिला भगिनींना मिळण्यास सुरुवात होईल. याशिवाय, युवकांना रोजगारासाठी प्रशिक्षण आणि भरीव स्टायपंड, गोरगरीब, दुर्बलांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर,  शेतकऱ्यांना वीज सवलत, मुलीना संपूर्ण व्यवसायिक शिक्षण मोफत आणि सगळ्या धर्मातल्या ज्येष्ठ नागरिकांना देशातल्या तीर्थस्थळांची यात्रा करत यावी म्हणून योजना सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.  अठरा वर्षाच्या मुलीला १ लाख रुपये देणारी महत्वाची “लेक लाडकी” योजनाही सुरु असल्याचे ते म्हणाले.

गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून ३०० कोटी रुपये मदत केली आहे. निराधारांचं निवृत्ती वेतन, अंगणवाडी आणि आशा सेविका, ग्रामसेवकांचं मानधन, विद्यार्थ्यांची  स्कॉलरशिप, अनुसूचित विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता  या सगळ्यात भरीव वाढ केली आहे. सारथी, बार्टी,  महाज्योती, अमृत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या सगळ्या संस्था मागास, दुर्बल, गरीब युवकांसाठी अनेक योजना घेऊन काम करताहेत. अल्पसंख्याकांसाठी मार्टी संस्था सुरु केली. मातंग समाजासाठी आर्टी संस्था सुरु केली. यातून राज्य शासनाची संवेदनशीलताच दिसून येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

राज्य शासनाने  महिला आणि शेतकरी यांना डोळ्यासमोर ठेवून भरीव तरतूद केली आहे. याशिवाय, गेल्या दोन वर्षांत विविध विभागांच्या माध्यमातून 44 हजार कोटीपेक्षा जास्त निधी शेतीसाठी देत आहोत. मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागाला पाण्यानं समृद्ध करण्यासाठी वैनगंगा- नळगंगा प्रकल्पाला मान्यता दिल्याने पावणे चार लाख हेक्टर जमीन सिंचित होणार आहे, गेल्या दोन वर्षात 125 जलसंपदा प्रकल्पांच्या कामांना वेग दिल्याचे यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले.

राज्यातल्या तळागाळातल्या व्यक्तीचे उत्पन्न वाढावं, शहर आणि ग्रामीण भाग असा भेद न करता सर्वांगीण विकासाचा प्रयत्न राज्य शासन करीत आहे. त्यादृष्टीने पावले टाकल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

राज्यात 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून हर घर तिरंगा अभियान आपण राज्यभरात उत्साहाने राबवले. देशप्रेमाची ही ज्योत नेहमी आपल्या सर्वांच्या ह्रदयात तेवत राहिली पाहिजे, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

000

दीपक चव्हाण/वि.सं.अ

विषमुक्त रानभाज्यांचा दैनंदिन आहारात समावेश होणे आवश्यक – पालकमंत्री संजय राठोड

पालकमंत्र्यांच्याहस्ते रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन

महोत्सवात दुर्मिळ ३८ रानभाज्यांचा समावेश

यवतमाळ, दि.15 (जिमाका) : अलिकडे फास्टफुडचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. शरीरास घातक अशा खाद्यपदार्थांचा वापर टाळत नागरिकांनी विषमुक्त अशा रानभाज्यांचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश केला पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत आत्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व जीवनोन्नती अभियानाच्यावतीने वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्र येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डावरे, कृषि विकास अधिकारी राजेंद्र माळोदे उपस्थित होते.

रानभाज्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. जुन्या लोकांना या भाज्यांचे महत्त्व माहित आहे. त्यामुळे घरातील जेष्ठ मंडळी आजही रानात जाऊन रानभाज्या आणून आपल्या घरातील मुलांना खावू घालतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर या भाज्या उपलब्ध होते. त्यामुळेच दरवर्षी पावसाळ्यात स्वातंत्र्यदिनी या भाज्यांचा महोत्सव आपण आयोजित करतो, असे पुढे बोलतांना पालकमंत्र्यांनी सांगितले.

महोत्सवाच्या निमित्ताने शहरी लोकांना रानभाजीचे महत्त्व समजून येईल. महोत्सवाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘रानभाज्यांचे महत्त्व आणि उपयोग’ या पुस्तिकेतून प्रत्येक रानभाजीचे महत्त्व, या भाज्या कशा बनवायच्या हे समजेल. रानभाज्यांचा आहारात समावेश वाढविण्यासाठी या भाज्यांचा प्रचार, प्रसार मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक असल्याचे देखील पालकमंत्र्यांनी सांगितले. उद्घाटनानंतर पालकमंत्र्यांनी महोत्सवातील रानभाज्यांच्या स्टॅालला भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे यांनी केले. महोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका त्यांनी विशद केली. महोत्सवात 38 पेक्षा जास्त रानभाज्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. भाजी खरेदीसाठी यवतमाळकरांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे संचलन चंद्रबोधी घायवटे यांनी केले तर आभार संजय भोयर यांनी मानले.

000

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांची कुटुंबात, समाजात भागिदारी वाढेल – पालकमंत्री संजय राठोड

स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहण

सर्वसामान्यांसाठी अनेक नवीन कल्याणकारी योजना; महिला, वृध्द, कामगारांना दिलासा देण्याचा प्रयत्न

यवतमाळ, दि.15 (जिमाका) : राज्य शासनाने नुकतीच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु केली. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच त्यांची समाजात, कुटुंबात भागिदारी वाढविण्यासाठी ही योजना अत्यंत महत्वपूर्ण आणि क्रांतीकारी ठरणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 4 लाख 68 हजार अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 4 लाख 60 हजार अर्ज लाभ वितरणासाठी शासनास पाठविण्यात आले आहे, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांच्यासह विभाग प्रमुख अधिकारी, स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे कुटुंबिय, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले, अशा सर्व शुरविरांना पालकमंत्र्यांनी अभिवादन केले. स्वातंत्र्यानंतर देशाची जशी प्रगती होत गेली तसा महाराष्ट्र देखील झपाट्याने विकासाच्या बाबतीत अग्रेसर होत गेला. समाजातील सर्वच घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन सातत्याने नवनवीन योजना राबवित असल्याचे पालकमंत्री म्हणाले. युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली. प्रशिक्षणाची मागणी असलेल्या प्रत्येक युवकास या योजनेतून प्रशिक्षण दिले जातील. मासिक 6 ते 10 हजारापर्यंत विद्यावेतन सुद्धा शासन देणार आहे.

गृहिनींचा आर्थिक भार कमी करण्यासाठी वर्षातून 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु करण्यात आली. 60 वर्षावरील प्रत्येक व्यक्ती मोफत तीर्थ स्थळांना भेटी देऊन शकतील. जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री नावाची आणखी एक योजना शासनाने सुरु केली. 65 वर्षावरील नागरिकांना वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी 3 हजाराचे अर्थसहाय्य या योजनेतून दिले जाणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरु करण्यात आली. 7.5 एचपी पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व कृषी पंपधारक शेतकरी योजनेच्या लाभासाठी पात्र आहे. शेतकऱ्यांना उद्योजक बनविण्यासाठी केंद्र शासन ‘प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना’ राबविते. या योजनेंतर्गत जिल्ह्यात 544 प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली आहे. यापैकी 127 प्रकल्पांना अनुदान देखील वितरीत करण्यात आले.

तुती, फळबाग आणि बांबू लागवडीस रोजगार हमी योजनेतून आपण प्रोत्साहन देतो आहे. यावर्षी 2 हजार एकरवर तुती लागवडीचा कार्यक्रम आपण हाती घेतला. 34 हजार हेक्टरवर बांबू तर 4 हजार 725 हेक्टरवर फळबाग लागवड केली जात आहे. प्रधानमंत्री पिकविमा योजनेत यावर्षी देखील 3 लाख 47 हजार शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला. या शेतकऱ्यांचे 6 लाख 66 हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. जिल्ह्यात 1 लाख 46 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 557 कोटी रुपयांचे पिककर्ज वाटप करण्यात आले आहे.

गेल्यावर्षी कापुस व सोयाबीन पिकाच्या किंमतीत घसरण झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच प्रति हेक्टर 5 हजार याप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहे. जिल्ह्यात एप्रिल 2023 पासून आतापर्यंत 3 लाख 73 हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना 263 कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले आहे. काही दिवसांपुर्वी झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जात असून नुकसानग्रस्तांना लवकरच वाढीव दराने मदत वाटप केली जाणार आहे.

इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गासाठी राज्य शासनाने स्वतंत्रपणे मोदी आवास घरकुल योजना सुरु केली. या योजनेतून 29 हजार 999 घरे बांधली जात आहे. खनिज विकास निधीतून 21 हजार शेतकऱ्यांना सोलर फेन्सिंग साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. या निधीतूनच 63 शाळा आपण मॅाडेल स्कूल तर 15 प्राथमिक आरोग्य केंद्र, 4 उपजिल्हा रुग्णालये व 1 ग्रामीण रुग्णालय मॅाडेल रुग्णालय बनवतो आहे. वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत सोई सुविधा असलेले 4 मॅाड्युलर ऑपरेशन थिएटर सुरु करण्यात आले. महाविद्यालयाची प्रशासकीय ईमारत पुर्णत्वास आली. सुपर स्पेशालिटी हॅास्पिटलची 288 बेड असलेली फेज 3 बिल्डींग पुर्ण झाली असून रुग्णसेवेत दाखल झाली आहे.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून 5 लाखापर्यंतचे उपचार विनामुल्य केले जातात. जिल्ह्यात 6 लाख 81 हजार लाभार्थ्यांनी योजनेचे गोल्डन कार्ड काढले आहे. बांधकाम मंडळाच्यावतीने विविध योजनेंतर्गत यावर्षी 11 हजार 794 कामगारांना 12 कोटी 85 लक्ष रुपयांच्या लाभाचे वितरण करण्यात आले. 15 हजार 550 कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच तर 32 हजार 442 कामगारांना गृहउपयोगी वस्तु संचाचे वितरण करण्यात आले, असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत 1 हजार 800 मुलांना विनामुल्य प्रवेश देतो आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून गेल्यावर्षी जिल्ह्यात 628 उद्योजकांचे प्रस्ताव मंजूर केले. यावर्षी 800 युवकांना उद्योजक बनविण्याचे उद्दिष्ट आपण ठेवले आहे. आदिम जमातीच्या विकासासाठी ‘प्रधानमंत्री जनमन योजना’ केंद्र शासनाने सुरु केली. जिल्ह्यात कोलाम या आदिम जमातीच्या नागरिकांना या अंतर्गत विविध विकास योजनांचा लाभ दिला जात आहे, असे पालकमंत्री म्हणाले.

सुरुवातीस पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते ध्वजारोहन झाले. त्यानंतर राष्ट्रगित व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात आले. पोलिस दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत उपस्थित सर्वांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली.

000

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेत दोन लाख महिला पात्र; जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न – पालकमंत्री विजयकुमार गावित

भंडारा, दि. 15 : महिलांच्या आर्थिक विकासासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जिल्ह्यात कार्यरत असून यामधून एकूण दोन लाख 3 हजार 581 महिला पात्र ठरल्या आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ देणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज केले.

पोलीस कवायत मैदानावर आयोजित 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रशांत पडोळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांच्यासह जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी, पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्यासह प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आधारभूत दरानुसार 688 कोटी रुपये धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाईन पद्धतीने वर्ग करण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात दिली. मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण कार्यक्रमात जास्तीत जास्त युवक युवतींना सामावून घेण्यात येणार आहे. जलजीवन मिशन जिल्ह्यातील एकूण 83 टक्के कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

पोलीस कवायत मैदानावर आज सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन परेड निरीक्षण झाले. पोलीस, गृह रक्षक दल, छात्रसेना व विद्यार्थी यांनी मानवंदना दिली. परेड संचलनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार पालकमंत्री श्री.गावित यांनी यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्मिता गालफाडे व मुकुंद ठवकर यांनी केले. ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाच्या पार्श्वमीभूमीवर तिरंगा शपथ घेण्यात आली.

या मुख्य शासकीय कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नागरिक माध्यम प्रतिनिधी तसेच महिला बचत गटाच्या प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होत्या.

स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार

पोलीस कवायत मैदानावर आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार पालकमंत्री श्री.गावित यांच्या हस्ते स्वातंत्र्याच्या मुख्य कार्यक्रमानंतर करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी, पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्यासह प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जम्मु काश्मीर मोहिमेमध्ये अपंगत्व आलेल्या सेवारत सैनिक विरेंद्र भोजराज अंबुले यांना ताम्रपट धनादेश व शाल श्रीफळ देऊन श्री. गावित यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्षारोपण कार्यक्रमात उत्कृष्ट काम केल्याबद्दल वनपाल आर.टी.मेश्राम व वनरक्षक पि.आर आंबुले यांचा सन्मान करण्यात आला. स्वच्छ भारत मिशन या विभागातर्फे पुरुषोत्तम रुखमोडे सरपंच व नरेश शिवणकर, सचिव ग्रामपंचायत वलमाझरी, सौ. शारदा गायधने व विलास खोब्रागडे ग्रामपंचायत बेला प्रशांत भुते व कृष्णा दोनोडे ग्रामपंचायत मोखाडा यांना सन्मानित करण्यात आले.

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योग पुरस्कार प्राप्त कृष्णा उद्योग व बजरंग राईस मिल खडकी यांना सन्मानित करण्यात आले. पोलीस अधीक्षक भंडारा यांच्यामार्फत सौरभ घरडे व मोहन निखारे, सुरेश उपाध्याय, दिनू मते आणि राजेश बांते यांना सन्मानित करण्यात आले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत शालेय क्रीडा स्पर्धामध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या शाळांना प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात आले. यामध्ये रॉयल पब्लिक स्कूल भंडारा, नूतन कन्या विद्यालय भंडारा, गांधी विद्यालय कोंढा, यांचा समावेश आहे.

00000

जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

भारतीय स्वातंत्र्याचा ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात आत्तापर्यंत  लाख ६० जार प्राप्त अर्जापैकी  लाख ४५ हजाराहून अधिक अर्जांना मान्यता

९० हजारपेक्षा अधिक कामगारांना विविध योजनांचा जवळपास २२० कोटींचा लाभ

        सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : विकास प्रक्रियेत मागे राहिलेल्या वंचित, मागास बांधवांना सगळ्यांबरोबर संधी मिळावी, तसेच जिल्ह्याचा सर्वंकष विकास व्हावा, यासाठी शासन वचनबद्ध आहे. यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यातून विकास कामांसाठी 573 कोटींची तरतूद केली असून, या माध्यमातून जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिली.

        भारतीय स्वातंत्र्याच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासह विविध कार्यालय प्रमुख, स्वातंत्र्य सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले, धरणातील पाणी विसर्गाचे योग्य नियोजन केल्यामुळे आपल्याला महापूर टाळता आला. पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज होत्या. त्यांच्यामुळेच महापूर टाळता आला. पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश देण्यात आले असून महिलांना आर्थिकरित्या सबळ करण्याच्या हेतूने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला प्रतिमाह दिड हजार रूपये शासनाकडून देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्यात आत्तापर्यंत जवळपास 4 लाख 60 हजार अर्ज प्राप्त झाले असून जिल्ह्यात यापैकी 4 लाख 45 हजाराहून अधिक अर्जांना मान्यता दिली आहे. या योजनेचे पैसे बुधवार पासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरूवात झाली आहे. यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आरोग्य, शिक्षण, उर्जा, सामाजिक न्याय, कामगार विभाग, कौशल्य विकास, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या योजनांचा आढावा घेतला. तसेच कामगार विभागाकडून, जिल्ह्यातील कामगारांना  शैक्षणिक, आरोग्य, आर्थिक व सामाजिक लाभाचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये 90 हजारपेक्षा अधिक कामगारांना विविध योजने अंतर्गत जवळपास 220 कोटीहून अधिक रूपयांचा लाभ देण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते सैन्य सेवेत जम्मू काश्मिर येथे सीमा नियंत्रण रेषेवर कार्यरत असताना दिव्यांगत्व आलेल्या तासगाव तालुक्यातील बेंद्री येथील हवालदार प्रशांत वसंत पाटील यांना त्यांच्या शौर्याच्या सन्मानार्थ ताम्रपट व 20 लाख रूपये सानुग्रह अनुदान देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल सांगली शाळेतील 9 वर्षाच्या इयत्ता 5 वी मधील मुलगी कु. वल्लभी शेंडगे हिने गार्डनमधील अनोख्या झोपाळ्याचे केलेल्या संशोधनासाठी भारत सरकारचे पेटंट मिळाले आहे याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2024 मध्ये राज्य गुणवत्ता यादीतील 16 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच पोलीस प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी बजाविलेल्या अनुक्रमे मिरज उप विभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, विटा उप विभागीय पोलीस अधिकारी विपूल पाटील, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस हवालदार सागर लवटे, पोलीस नाईक संदीप नलावडे, पोलीस फौजदार महेश जाधव व शरद माने, सहायक पोलीस फौजदार राजेंद्र पाटील, चालक पोलीस हवालदार अनिल सुर्यवशी व संजय माने यांच्यासमवेत महसुल ‍दिनानिमित्त महसूल विभागातील, विभागीयस्तरीय पुरस्कारासाठी निवड झालेल्या सहायक जिल्हा नियोजन अधिकारी पूजा पाटील, लघु टंकलेखक वहिदा तांबोळी-मणेर, अव्वल कारकून विनायक यादव यांचा सत्कारही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आला. तद्नंतर डॉ. खाडे यांनी उपस्थितांची प्रत्यक्ष भेट घेऊन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास विविध मान्यवर, शासकीय अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पत्रकार आदि उपस्थित होते.

00000

एकही नागरिक व शेतकरी आपत्तीच्या भरपाईपासून वंचित राहणार नाही – पालकमंत्री अनिल पाटील

नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाला देणार क्रांतीवीर खाज्या नाईक यांचे नाव;

नंदुरबार, दिनांक 15 ऑगस्ट, 2024 (जिमाका वृत्त) – नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास क्रांतीवीर खाज्या नाईक यांचे नाव देण्याची शिफारस करणारा ठराव जिल्हा नियोजन समितीने केला असून शासनस्तरावर त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. तसेच जिल्ह्यातील एकही नागरिक, शेतकरी कुठल्याही आपत्तीच्या भरपाईपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही आज जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आपत्ती नियंत्रण, मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.

ते आज भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमात जिल्हावासीयांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, माजी आमदार चंद्रकांत ररघुवंशी, प्रा. इंद्रसिंह वसावे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित, जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ, प्रांताधिकारी विनायक महामुनी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे आदिवासी विकास प्रकल्प अघयधिकारी चंद्रकांत पवार, उपवनसंरक्षक कृष्णा भंवर तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख व लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

 

पालकमंत्री म्हणाले की, आपला नंदुरबार आदिवासी बांधवांच्या जीवन, संस्कृतीची रूपेरी कडा लाभलेला, शूरवीरांचा,सुधारकांचा आणि लोकनेत्यांचा जिल्हा आहे.जिल्ह्यावासीयांच्या मनामनात राष्ट्राचा अभिमान जागृत करण्यासाठी 9 ऑगस्टपासून ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाची सुरूवात झाली आहे. स्वातंत्र्य चळवळ आणि शहिदांच्या पवित्र स्मृतींनी पावन झालेल्या आपल्या जिल्ह्यातील 73 “अमृत सरोवर” स्थळांवर वेगवेगळ्या उपक्रमांमधून जनउत्सवाचे आयोजन केले गेले आहे. 1 ऑगस्ट पासून सुरु झालेल्या ‘महसूल दिन पंधरवाडा’ मधून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. शासनामार्फत शेतकरी बांधवांना दिलासा देणारी “मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना” सुरू करण्यात आली आहे. याद्वारे जिल्ह्यातील 45 हजार 561 शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल. त्यासाठी रुपये 33 कोटी 5 लाख अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 66 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 8 मध्यम व 13 लघु सिंचन प्रकल्पांमध्ये सुमारे 57 टक्के जलसंचय झाला असून त्यातील 4 मध्यम प्रकल्प हे 100 टक्के भरले आहेत. या खरीप हंगामात 2 लाख 71 हजार 414 हेक्टर क्षेत्रावर 99 टक्के पेरण्या झाल्या असून पिक परिस्थितीही समाधानकारक आहे. यंदा जिल्ह्यात मक्याचे क्षेत्र 110 टक्क्यांनी तर सोयाबीनचे क्षेत्र 118 टक्क्यांनी वाढले आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत 1 लाख 13 हजार 440 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. 2023 च्या खरीप हंगामात 39 हजार 745 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात 54 कोटी 19 लाख 93 हजार 285 रूपये जमा करण्यात आले आहेत. यंदाच्या मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात नुकसान झालेल्या 296 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 27 लाख 62 हजार 630 रूपयांच्या मदतीचे वितरण करण्यात आले आहे.

पालकमंत्री म्हणाले की, चालू आर्थिक वर्षात नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे झालेल्या पशुहानीसाठी रुपये 11 लाख 82 हजारांची, तसेच मनुष्यहानीसाठी 7 व्यक्तिंच्या कुटुंबियांना रूपये 28 लाख एवढ्या मदतीचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात 949 घरांचे नुकसान झाले आहे. तसेच नवापूर तालुक्यात गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे घरात पाणी घुसून 603 घरांचे, दुकानांचे नुकसान झाले आहे. अशा अतिवृष्टी व पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नागरिक व दुकानदारांच्या नुकसानाकरिता जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत विशेष दराने मदत देण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतला आहे. त्यासाठी प्रतिकुटुंब रुपये 5 हजार, घरगुती भांडी, वस्तु यांच्या नुकसानाकरिता रूपये 5 हजार देण्यात येणार आहेत. तसेच अशा प्रकरणात यापूर्वीची दोन दिवसापेक्षा अधिक काळ घर पाण्यात बुडले असल्याची अटही शिथिल करण्यात आली आहे. ज्या दुकानदारांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशनकार्डधारक आहेत अशा नोंदणीकृत व परवानाधारक दुकानदारांच्या पंचनामे करुन 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तसेच अधिकृत टपरीधारकांनाही 10 हजार रुपयांची आर्थिक मदतही देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकही शेतकरी अथवा नागरिक नैसर्गिक आपत्तीच्या भरपाईपासून वंचित राहणार नाही याची ग्वाही, मी जिल्ह्याचा पालकमंत्री व राज्याचा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री म्हणून आपणांस देतो.

पालकमंत्री म्हणाले की, दाट वस्तीच्या ठिकाणी किंवा छोट्या स्वरूपातील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून फायर बाईकचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला असून त्याची सुरूवात 9 फायर बाईक्सचे लोकार्पण व वितरण करून आपल्या जिल्ह्यातून करण्यात आली आहे. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबुत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेत जिल्ह्यातील सुमारे 2 लाख 61 हजार 997 महिला भगिनींच्या खात्यात येत्या 19 ऑगस्टला रक्षाबंधनच्या दिवशी जुलै व ऑगस्ट महिन्याची रक्कम एकाचवेळी जमा करण्यात येणार आहे. या भगिनींना “मुख्यमंत्री अन्नपूर्णा” योजनेत वर्षाला तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. येणाऱ्या गौरी-गणपती उत्सवानिमित्त 2 लाख 70 हजार 99 शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वितरीत करण्यात येणार आहे.

पालकमंत्री म्हणाले की, मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरु केलेल्या लेक लाडकी योजनेत चालू वर्षात 1 हजार मुलींच्या बॅंक खात्यावर 5 हजार रूपयांच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. तरुणांना खाजगी तसेच शासकीय आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावा, म्हणुन सुरु केलेल्या “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” योजनेत जिल्ह्यात 2 हजार उमेदवारांना प्रथम टप्प्यामध्ये लाभ मिळणार असुन सध्या 120 उमेदवार या योजनेंतर्गत कामावर रुजू झालेले आहेत. राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची/दर्शनाची संधी देण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरु करण्यात आली आहे. 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता 100 टक्के अर्थसहाय्य देणारी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ शासनाने सुरू केली आहे. दारिद्र्य रेषेखालील दिव्यांग, दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे या योजनेत खरेदी करता येणार आहेत. महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटरटॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करुन त्यासाठी शासनाने 50 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अनोखे अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये 1 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत यशस्वीरित्या राबविण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात या अभियानात 2 हजार 85 शाळांनी सहभाग नोंदवून हे अभियान यशस्वी करून दाखवले, त्याबद्दल शिक्षण विभाग व सर्व शाळांचे मी अभिनंदन करतो.

पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा सामान्य रूग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांची यंत्रणा सदैव प्रयत्नशील आहे. “लक्ष्य 84 दिवस” या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील संस्थात्मक प्रसूतीचा दर 97 टक्क्यांपर्यंत आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश प्राप्त झाले असून शासनाने सन 2024-25 मध्ये नव्याने 3 ग्रामीण रुग्णालये, 5 प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच 50 आरोग्य उपकेंद्रांना मंजूरी दिली आहे. आरोग्य सेवेच्या महत्वपूर्ण अशा हॉस्पिटल रॅंकींगमध्ये जून महिन्यात जिल्हा सामान्य रूग्णालय 70 गुण मिळवून राज्यात अव्वल राहिले आहे, त्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक व त्यांच्या टीमचे मी या निमित्ताने अभिनंदन करतो. “मुलांमधील अंमली पदार्थ आणि मादक पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी प्रतिबंध” या संयुक्त कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी गेल्या 2 वर्षात “सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या” जिल्ह्यांमध्ये नंदुरबार जिल्ह्याला गौरविण्यात आले आहे, त्याबद्दल जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यांचे मी अभिनंदन करतो. जिल्ह्यातील दळणवळण अधिक सुलभ व्हावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 704 कोटी रूपए खर्चाच्या रस्ते, संरक्षक भितं व लहान पूलांच्या एकूण 902 कामांना मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 300 वाड्यावस्त्या रस्त्यांनी जोडल्या जाणार आहेत. यात 300 किलोमीटर रस्ते व 30 लहान, मोठ्या पुलांचा समावेश आहे.

पालकमंत्री म्हणाले की, सन 2024-25 साठी जिल्हा वार्षिक योजनांकरीता 595 कोटी 25 लाख इतका नियतव्यय अंतिमतः मंजूर केला आहे. त्यातील सर्वसाधारण योजनेत 192 कोटी रुपये, आदिवासी उपयोजनेत सुमारे 389 कोटी 25 लाख तसेच अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 14 कोटी रुपयांचा समावेश आहे. जिल्ह्यातील आदिवासी समुदायाचे सांस्कृतिक वेगळेपण, मानवतेबद्दल असलेली असीम श्रद्धा, निसर्गाच्या संतुलनावर असलेले प्रेम आणि उत्त्युच्च प्रामाणिक, निखळ संस्कृती, परंपरांच्या गुणगौरवासोबत शासनामार्फत आदिवासी बांधवांसाठी राबवल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांच्या जागरासाठी जागतिक आदिवासी दिनाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे गेल्या आठवड्यात दिनांक 7 ते 9 ऑगस्ट या कालावधीत नंदुरबारमध्ये यशस्वी आयोजन करण्यात आले होते. वनविभागाने पर्यटन व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामातुन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. यंदाच्या पावसाळ्यात 790 हेक्टर क्षेत्रावर 8 लाख 19 हजार 580 रोपांची लागवड केली आहे. केंद्र शासनाच्या “एक पेड माँ के नाम” उपक्रमातून विविध स्तरावर वृक्षारोपन कार्यक्रम घेण्यात आले. जिल्ह्यात तोरणमाळ, उनपदेव, मोहीदा इकोपार्क, नंदुरबार इकोपार्क, गिधकडा धबधबा, कोंडाईबारी वनपर्यटन क्षेत्र विकास आराखड्यास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वनपर्यटनाच्या वाढीस चालना मिळणार आहे.

शासनाने सुरु केलेल्या सर्व योजनांचा लाभ आपण घ्यावा, असे आवाहन मी या निमित्ताने करतो, तसेच कुठल्याही परिस्थितीत शासन जिल्ह्यातील शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी सर्व सामान्य नागरिक यांच्या पाठीशी सर्वोतोपरी उभे असल्याची ग्वाही देतो असे त्यांनी यावेळी सागितले.

यावेळी विविध विभागात उत्कृष्ट काम करणारे अधिकारी -कर्मचारी यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यांचा झाला सत्कार…

महसूल विभाग
• सराखाम शिंदे, तहसिल कार्यालय, शहादा
• श्रीमती मंगला पावरा, तहसिल कार्यालय, तळोदा
• संतोष मोरे, उपविभागागीय अधिकारी कार्यालय, शहादा.
• आनंद महाजन, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार
• संदीप रामोळे, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार
• प्राजंल पाटील, तहसिल कार्यालय, नंदुरबार

पोलीस विभाग
• विश्वास वळवी, पोलीस मुख्यालय नंदुरबार
• तानाजी बहिरम, वाहतुक शाखा, नंदुरबार

कृषि विभाग
• सुरज नामदार, अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, नंदुरबार
• सुरभी बाविस्कर, अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, नंदुरबार
• उमेश भदाणे, मंडळ कृषि अधिकारी कोरीट
• करणसिंग गिरासे, कृषि पर्यवेक्षक

• राज्यस्तरीय खरीप पिकस्पर्धा-2023 आदिवासी गटात प्रथम क्रमांक मिळविणारे शेतकरी झूजऱ्या पाडवी, कोठार ता. तळोदा यांचाही पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.

• जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने आयोजित केलेल्या “एक धाव सुरक्षेसाठी” या मॅरेथॉन स्पर्धेला झेंडा दाखवून उद्घाटन केले.

• पोलीसांसाठी घेतलेल्या नवीन दुचाकी वाहनांना हिरवी झेंडी दाखवून दुचाकी वितरीत करण्यात आल्या.

सोलापूरचा स्वातंत्र्यलढा हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ऐतिहासिक लढा – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

घरोघरी तिरंगा मोहिमेतून राष्ट्रीय भावना जागृत ठेवण्याचे कार्य

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न

सोलापूर, दिनांक 15(जिमाका) :- भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास हा सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य लढ्याचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. ब्रिटिशांच्या 150 वर्षाच्या राजवटीत मार्शल लॉ ची अंमलबजावणी झालेले एकमेव शहर सोलापूर होते. त्यामुळे सोलापूरचा स्वातंत्र्यलढा हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक ऐतिहासिक लढा होता, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

भारताचा 78 व स्वातंत्र्य दिन निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद त्यांच्या हस्ते संपन्न झाले, त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते.

यावेळी खासदार प्रणिती शिंदे, सोलापूर महापालिका आयुक्त शितल उगले-तेली, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, वैशपांयन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. संजीव ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख तसेच अन्य अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याचे आणि अखंडतेचे प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज. आपल्या देशाचा तिरंगा हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे, त्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे. हर घर तिरंगा मोहिमेतून राष्ट्रीय भावना जागृत ठेवण्याचे कार्य केले जात आहे. ही मोहीम संपूर्ण देशासह सोलापूर जिल्ह्यात ही अत्यंत प्रभावीपणे राबवली जात आहे, असे त्यांनी सांगितले.

विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा आपला सोलापूर जिल्हा उद्योग, कृषी, शैक्षणिक, आरोग्य, संस्कृती, पर्यटन या क्षेत्रात चांगली प्रगती करत आहे सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन ही सर्व प्रकारचे सहकार्य करत आहे. प्रशासन ही सर्व शासकीय योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करून शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचतील यासाठी प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

प्रारंभी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते भारताच्या 78 व्या  स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. त्यानंतर राष्ट्रगीत व राज्य गीत गायन झाले. या समारंभास उपस्थित असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य, सैनिक ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, पत्रकार त्यांची सदिच्छा भेट घेऊन सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी राष्ट्राचा अभिमान असलेला राष्ट्रध्वज तिरंगा ची सर्व मान्यवरांनी शपथ घेतली.

*मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण-

  1. जिल्हाधिकारी कार्यालय

उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक तीन सोलापूर श्री संतोष कुमार व्यंकटराव देशमुख यांना उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना शाखा श्रीमती जयश्री पंच उत्कृष्ट नायब तहसीलदार, आस्थापना शाखा लक्ष्मीकांत आयगोळे उत्कृष्ट अव्वल कारकून, महसूल शाखा अविनाश स्वामी उत्कृष्ट महसूल सहाय्यक, महसूल शाखा गणेश जगताप उत्कृष्ट शिपाई यांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

  1. पोलीस आयुक्त कार्यालय-

नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल विशेष सेवा पदक सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब बाळू सावंत व पोलीस उपनिरीक्षक नागेश आप्पासाहेब येणपे यांना तर पोलीस दलामध्ये उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुनील हांडे यांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार व पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले.

3.जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी कार्यालयाचे मुख्य लिपिक शाम सुरवसे यांना लेखाविषयक महत्त्वपूर्ण कामकाज केल्याबद्दल उत्कृष्ट मुख्य लिपिक म्हणून जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध; गत दोन वर्षांत राज्य शासनाने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले : पालकमंत्री गिरीष महाजन

????????????????????????????????????

स्वातंत्र्यदिनाचा 77 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न

धुळे, दिनांक 15 ऑगस्ट, 2024 (जिमाका वृत्त): जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासोबत नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासनाने गत दोन वर्षाच्या कालावधीत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात जिल्हावासीयांना शुभेच्छा देताना पालकमंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, आमदार कुणाल पाटील, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अनिल पवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक प्रभाकर शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, सहायक पोलीस अधिक्षक एस. ऋषिकेश रेड्डी, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, संजय बागडे, संदीप पाटील, गंगाराम तळपाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार,जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील, जिल्हा सैनिक अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील, तहसिलदार अरुण शेवाळे, पंकज पवार, वैशाली हिंगे, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी महापौर प्रदीप कर्पे, प्रतिभाताई चौधरी यांचेसह सर्व शासकीय विभागांचे अधिकारी, मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. महाजन आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की, गेल्या 77 वर्षात देशाच्या विकासासाठी अनेकांनी योगदान दिले, त्याग केला. आज देश अनेक क्षेत्रात अग्रेसर आहे. याचे श्रेय देशातील प्रत्येक नागरिकाला आहे. सर्वांच्या सामूहिक शक्तीतून मजबूत भारत उदयास येत आहे. अशाप्रसंगी स्वातंत्र्य चळवळीत सहभागी देशभक्तांच्या त्याग आणि बलिदानाला विसरता येणार नाही.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले.

जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 2 लाख 65 हजार लाभार्थी

राज्यातील महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेत जिल्ह्यात 2 लाख 72 हजार 897 महिलांनी अर्ज केले. यापैकी 2 लाख 65 हजार 297 अर्ज मंजूर करण्यात आले आहे. पात्र महिलांना येत्या 17 तारखेला दोन महिन्याचे दरमहा 1500 प्रमाणे 3 हजार रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली. या योजनेंतर्गत धुळे जिल्ह्यात 2 हजार 271 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

पालकमंत्री श्री.महाजन पुढे बोलतांना म्हणाले की, राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवनमान सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना आवश्यक सहायक साधने, उपकरणे खरेदीकरीता वयोश्री योजनेतून प्रत्येकी 3 हजार रुपये देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व धर्मियांच्या 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत प्रती व्यक्ती 30 हजार इतका खर्च शासनामार्फत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत भरुन मिळणार आहे. राज्यातील शासकीय, शासन अनुदानित अशासकीय, कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्र निकेतन, विद्यापीठातील व्यवसायिक, वैद्यकीय अभ्यासक्रमांस प्रवेशित आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, इतर मागास प्रवर्गातील, नविन तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कात 100 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना एप्रिल 2024 पासून 5 वर्षासाठी मोफत वीज मिळणार आहे. तर सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्यास मान्यता देण्यात आली आहे.

 पर्यटन विभागाचे एकच घोषवाक्य

पर्यटन विभागाच्या अंतर्गत असलेल्या पर्यटन संचालनालय तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यामार्फत वापरण्यात येणारे बोधचिन्ह तसेच घोषवाक्य हे स्वतंत्र वेगळ्या स्वरूपातील होते. मात्र आता पर्यटन विभागाला एकच घोषवाक्य असणार आहे. राज्यातील पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी शासनाने नुकतेच ‘पर्यटन धोरण 2024’ जाहीर केले आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात आला विविध योजनेचा लाभ

यावर्षी जिल्ह्यात आतापर्यंत 125 टक्के पाऊस झाला आहे. यंदाच्या खरीप हंगामात 3 लाख 77 हजार हेक्टर क्षेत्रात विविध पिकांची पेरणी झाली आहे. शेतकरी सुखी आणि समाधानी राहण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा योजना सुरु केली. या योजनेत जिल्ह्यातील 2 लाख 41 हजार 186 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 1 लाख 62 हजार 232 शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना फळबाग लागवड कार्यक्रमात जिल्ह्यात 165.35 हेक्टर क्षेत्रावर फळबागांची लागवड केली आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत 36 शेतकऱ्यांना 70 लाखाचे अनुदान देण्यात आले. राष्ट्रीय कृषि विकास योजनेत 1 हजार 38 शेतकऱ्यांना 676.70 लाख अनुदान देण्यात आले. कृषि औजारांसाठी 241.30 लाख रक्कम देण्यात आली. साक्री तालुक्यात पशु चिकित्सालयाच्या इमारतीसाठी 466 लक्ष निधी मंजूर झाला आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेच्या माध्यमातून सहा मोठे पशु प्रकल्प जिल्ह्यात सुरू होत आहे. गोशाळा अनुदान योजनेत शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील दोन गोशाळांना अनुदान वितरीत केले आहे.

महसुल पंधरवड्याचे आयेाजन

राज्यात महसूल व वनविभागामार्फत 1 ऑगस्ट पासून महसूल पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या पंधरवड्यात प्रत्येक दिवशी नवनवीन उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, कृषी मार्गदर्शन कार्यक्रम, शेती, पाऊस आणि दाखले, युवा संवाद, महसूल-जनसंवाद, महसूल ई-प्रणाली, सैनिक हो तुमच्यासाठी, आपत्ती व्यवस्थापन मागर्दर्शन असे 581 शिबिर घेण्यात आले. यात 17 हजार 555 नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेत अनुसूचित जमातीच्या 300 महिला बचतगटांना प्रति बचतगट 10 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. एकात्मिक कुकुटपालन व्यवसाय अर्थसहाय्य योजनेत आदिवासी महिला बचत गटांना 78 लाख 75 हजार रक्कम देण्यात आली आहे. ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेत 1 हजार 120 कामांना मान्यता दिली आहे. जिल्ह्यात सन 2016-17 पासून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 59 हजार 451 घरकुले, राज्यस्तरीय शबरी आवास योजनेतंर्गत 9 हजार 173 घरकुले, राज्यस्तरीय रमाई आवास योजनेंतर्गत 7 हजार 104 घरकुले पूर्ण करण्यात आली. मोदी आवास योजनेत जिल्ह्यास 9 हजार 709 घरकुलाचे उद्दिष्ट असून सर्व घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. जलजीवन मिशन अतंर्गत ग्रामीण भागातील सर्व कुटूंबांना सन 2024 पर्यंत हर घर नल से जल प्रमाणे पाणी पुरवठा करण्यास शासन कटिबध्द असून धुळे जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेतून नवीन व सुधारणात्मक पुनर्जोडणीच्या एकूण 357.51 कोटी किमतीच्या 451 योजना हाती घेण्यात आल्या असून आजअखेर 127 योजना पूर्ण झाल्या असून जिल्ह्यातील 3 लाख 2 हजार 716 ग्रामीण कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील 673 गावापैकी 194 गावे हर घर जल घोषीत झाली आहे.  जिल्ह्याच्या विकासासाठी सन 2024-2025 या वर्षांसाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत एकूण 469 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

यांचा झाला सन्मान

भारतीय स्वातंत्र्याचा 77 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गत श्रीमती भावना आकाश पाटील, कु. दिशा सोनवणे, श्रीमती वैष्णवी विलास मराठे, श्री. हिम्मतसिंग देवीसिंग गिरासे, श्री. सिध्दांत महेंद्र महिरराव यांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.

मतदार जनजागृती व नावनोंदणीबाबत प्रचार प्रसाराचा उल्लेखनीय कामगिरीबाबत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दिनेश सैंदाणे व सुभाष कुलकर्णी यांना पुरस्कार देण्यात आला. सन 2023-24 मध्ये उतकृष्ठ कामगिरी बजावल्याने धुळे जिल्हा कारागृह वर्ग 1 येथील तुरुंगाधिकारी सचिन झिंजुर्डे, कारागृह शिपाई धनराज चव्हाण, निलेश जाधव  तसेच सन 2020-21 करिता प्रशंसनीय सेवेबद्दल कारागृह शिपाई कैलास चौधरी यांना पुरस्कार देण्यात आला.

जिल्हा उद्योग केंद्र, धुळे यांच्यावतीने सन 2022-2023 साठी पात्र उद्योग घटक प्रथम पुरुस्कार मे.यु.के.प्लॅस्टिक, धुळे तर द्वितीय पुरस्कार मे. बाबुजी ॲग्रो इंडस्ट्रिज, शिंदखेडा जि. धुळे या कंपनीला  देण्यात आला. तसेच सन 2023-2024 वर्षांसाठी प्रथम पुरुस्कार मे. वर्धमान पेंटस, एमआयडीसी अवधान. धुळे तसेच द्वितीय पुरस्कार मे. सागर एन्टरप्राईजेस, एमआयडीसी अवधान, धुळे या कंपनीला देण्यात आला.

त्याचप्रमाणे गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या बेकायदेशीर कारवायांना परिणामकाररित्या आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या पोलीस उप निरिक्षक हरिशचंद्र पाटील, संदिप ठाकरे, मिलींद नवगिरे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पोलीस दलात उल्लेखनिय व उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल भारत सरकारकडून राष्ट्रपती पदकासाठी निवड करण्यात आलेले पोलीस उप निरिक्षक देवीदास वाघ, सहायक पोलीस उप निरिक्षक, संजय पाटील यांचा सन्मान करण्यात आला. उप अधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयामार्फत स्वामित्व योजनेतंर्गत रघुनाथ पाटील, किरणकुमार पाटील, सुभाष पाटील, देवीदास मिस्तरी, प्रविण पाटील यांचा स्वामित्व योजनेतंर्गत सनद वाटप कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

धुळे राखीव पोलीस दलाचे परेड कमांडट मुकेश माहुले यांनी मंत्री महोदयांना मानवंदना दिली. यावेळी तिरंगा शपथ देण्यात आली. जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते नागरीकांना तिरंगा ध्वजाचे वितरण करण्यात आले. राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्याचा निर्णय घेतल्यामुळे स्थानिक महिलांनी पालकमंत्री श्री. महाजन यांना राखी बांधली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पुनम बेडसे आणि जिल्हा आपत्ती व्यस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी केले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते एलईडी मोबाईल व्हॅनचे उद्धटन

ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एलईडी मोबाईल व्हॅनचे उद्धटन पालकमंत्री  गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या व्हॅनद्वारे राज्यातील 34 जिल्हा परिषद क्षेत्रातील 288 ठिकाणी या व्हॅनद्वारे प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास घरकुल योजना, ग्रामीण महाआवास अभियान, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा  खरेदी अर्थसहाय्य योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, ग्रामीण भागातील पायाभूत विकास, संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना, बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तीथक्षेत्र विकास योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, स्वच्छ वारी, सुंदर वारी या योजनांची प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे.

शिरपूर येथील सीसीटीव्ही यंत्रणेचे ई लोकार्पण संपन्न

शिरपूर शहरातील नवीन सीसीटीव्ही यंत्रणेचे ई-लोकार्पण पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात संपन्न झाले. पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या निर्देशानुसर जिल्हा नियोजन समितीमार्फत शिरपुर शहरात निश्चित केलेल्या 37 संवेदनशिल ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बसविण्यासाठी 1 कोटी 81 लक्ष 14 हजारच्या रक्कमेस मान्यता देण्यात आली होती. यातून शिरपुर शहरात 37 संवेदनशिल ठिकाणी एकुण 105 फिक्सड बुलेट, 10 पी.टी. झेड कॅमेरे व 18 ए.पी.आर. कॅमेरे बसविण्यात आले आहे. यामुळे शिरपुर शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी, शाळा / कॉलेज, महाविद्यालये, मुख्य बाजारपेठ भागात मुख्य महामार्ग या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत होणार आहे.

स्व.मीनाताई ठाकरे प्रसूतिगृहाच्या नूतन वास्तूचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

चांगल्या कामासाठी मुख्यमंत्री निधी खर्च झाल्याचे समाधान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

ठाणे ,14(जिमाका) : ठाणेकरांच्या आरोग्यासाठी उपयुक्त अशी विनामूल्य सुविधा स्व.मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह आणि डायलिसिस केंद्राच्या रूपाने मिळाली आहे. चांगल्या कामासाठी मुख्यमंत्री निधी खर्च झाला, याचे समाधान मला या लोकार्पण सोहळ्यामुळे मिळाले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे इस्टेट येथील शिवाजीनगर भागातील जुन्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह आणि डायलिसिस केंद्राच्या अद्ययावत नूतन वास्तूचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी (14 ऑगस्ट रोजी) झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेवक राम रेपाळे, दिलीप बेतकर, माजी नगरसेविका जयश्री फाटक, सुखदा मोरे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त उमेश बिरारी, मनीष जोशी, जी. जी. गोदेपूरे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतना नितील, वैद्यकीय अधिकारी डॉ. राणी शिंदे, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले,  या इमारतीचे काम संरचनात्मक दुरुस्ती करून पूर्ण झाले आहे. सर्व सोयींनी युक्त असे वातानुकुलित प्रसूतिगृह आणि डायलिसिस केंद्र नागरिकांसाठी खुले झाले आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे.

प्रसूतिगृहाची वास्तू अतिशय सुंदर तयार कऱण्यात आली आहे. व्यवस्थाही अद्ययावत दिल्या आहेत. त्यांची काळजी घेणे आणि नीट वापरणे यांची जबाबदारी येथील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची आहे. मी कधीही अचानक भेट देईन तेव्हा हे प्रसूतिगृह मला याच स्थितीत दिसले पाहिजे, अशी अपेक्षा याप्रसंगी मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्त केली.

श्रीनगरमधील मातोश्री गंगूबाई शिंदे रुग्णालयासाठी नवीन इमारत घेण्यात येत आहे. त्यामुळे तेथेही रुग्ण खाटा वाढणार आहेत. याचा लाभ नागरिकांना होणार आहे. हॉस्पिटलच्या बिलाची नागरिकांनी चिंता करायची नाही. ती काळजी सरकार घेत आहे. महात्मा फुले योजनेत राज्याच्या सर्व नागरिकांना पात्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्री महोदय म्हणाले.

 प्रशिक्षण नियुक्ती पत्रे प्रदान

याच लोकार्पण सोहळ्यात  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत पात्र ठरलेल्या १० प्रातिनिधिक प्रशिक्षणार्थींना ठाणे महापालिकेतील प्रशिक्षण नियुक्ती पत्रे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते  देण्यात आली. त्यात एका दिव्यांग युवकाचाही समावेश होता.

ठाणे महापालिकेत ५४३ तर परिवहन सेवेत १७२ युवकांना अशा प्रकारे प्रशिक्षण नियुक्ती दिली जाणार आहे. अशा प्रशिक्षणार्थींना दरमहा प्रशिक्षण भत्ता देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

या प्रसूतिगृहाची उत्तम वास्तू व व्यवस्था उभी केल्याबद्दल नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे, उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतना नितील, वैद्यकीय अधिकारी डॉ. राणी शिंदे, फेरफॅक्स इंडिया, सीएसबी बँक आणि अपेक्स किडनी केअर प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी या सर्वांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

स्व.मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह आणि डायलिसिस केंद्र

ठाणे महापालिका क्षेत्रात माता बाल संगोपन कार्यक्रम राबविताना येणाऱ्या विविध अडचणींचा विचार करून त्यावर मात करण्यासाठी ‘मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट प्रतीच्या सेवा देण्यासाठी प्रसूतिगृहांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. वागळे प्रभाग समिती अंतर्गत १० खाटांचे स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह मागील तीस वर्षापासून कार्यान्वित आहे.  या इमारतीचे बांधकाम जुने असल्याने या ठिकाणी पाण्याची गळती तसेच फ्लोअर स्लॅब पडणे , अशा प्रकारची नादुरुस्ती झाली होती. मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेंतर्गत सुमारे ३ कोटी ७८ लाख रुपये खर्च करून या वास्तूचे बळकटीकरण करण्यात आले आहे.

स्व.मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह येथे आता ०७ खाटांचा एएनसी वॉर्ड, १० खाटांचा पीएनसी वॉर्ड, दोन खाटांची रिकव्हरी रूम, न्यू बॉन्सेबलायझेशन युनिट, लेबर रूम, मॉड्युलर ओटी (अद्ययावत शस्त्रक्रियागृह), ओपीडी, प्रयोगशाळा तपासण्या, सोनोग्राफी तपासणी, सात खाटांचे डायलिसिस केंद्र या सुविधांचा समावेश आहे.

त्याचबरोबर माता बालसंगोपन कार्यक्रमांतर्गत दररोज प्रसूतीविषयक सेवा,  नॉर्मल व सिझेरियन प्रसूती, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, कुटुंब कल्याण साधने, महिलांच्या आजारासंबंधी दैनंदिन स्त्री रोग तज्ज्ञ यांच्याद्वारे कन्सल्टेशन, गरोदर मातांच्या रक्त चाचण्या,गरोदर मातेची सोनोग्राफी तसेच प्रसूतीपश्चात द्यावयाच्या सेवा , नवजात शिशूची काळजी घेण्यासाठी न्यू बॉर्न स्टेबलायझेशन युनिट ज्यामध्ये फोटोथेरेपी, बेबी वॉर्मर या सुविधाही उपलब्ध होणार आहेत.

तसेच या ठिकाणी सात खाटांचे डायलिसिस केंद्र सुरू करण्यात येत आहे. याकरिता डायलिसिस मशीन या सीएसआरच्या माध्यमातून फेरफॅक्स इंडिया व सीएसबी बँक यांच्यामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.   हे डायलेसिस केंद्र हे मेसर्स अपेक्स किडनी केअर प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत चालविण्यात येणार असून गरजू रुग्णांना डायलिसिसच्या सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे येथे ‘एक पेड माँ के नाम’ अभियानाचा शुभारंभ

सर्व महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रात एक लाख झाडे लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ठाणे,14(जिमाका)-  राज्यातील सर्व महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रात एक लाख झाडे लावावीत, असे निर्देश दिले असून त्याप्रमाणे सर्व महापालिका वृक्षारोपण करीत आहेत. पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने वृक्षारोपण करणे, ही भविष्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे येथे ‘एक पेड माँ के नाम’ अभियानाच्या शुभारंभप्रसंगी केले.

‘एक पेड  माँ के नाम’  या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन प्रत्येकाने आपल्या आईच्या नावे एक झाड लावावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नागरिकांना केले.

ठाणे महानगरपालिका, महाराष्ट्र वन विभाग, ग्रीन यात्रा आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुख्यमंत्री हरित ठाणे एक लक्ष वृक्ष लागवड’ या अभियानांतर्गत ‘एक पेड  माँ के नाम’  या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, लोकमान्य नगर येथे वृक्षारोपण करून करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त शंकर पाटोळे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे उपसंचालक उदय ढगे, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील, ज्येष्ठ माजी नगरसेवक हणमंत जगदाळे, एकनाथ भोईर, दिगंबर ठाकूर, विहंग सरनाईक, माजी नगरसेविका राधाबाई जाधवर, आशा डोंगरे, वनिता घोगरे, प्राजक्ता खाडे, वृक्ष प्राधिकरण समितीच्या माजी सदस्य नम्रता भोसले तसेच ग्रीन यात्राचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

राज्यातील सर्व महापालिकांनी वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला असून आतापर्यंत ठाणे महापालिकेने सर्वाधिक म्हणजे ६१ हजार झाडे लावल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आयुक्त सौरभ राव यांचे विशेष अभिनंदन केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्यात जाहीर केलेल्या “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” या योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली असून महिलांसाठी ही योजना सुरू केल्याबद्दल लोकमान्य नगरमधील महिलांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

ताज्या बातम्या

स्टार्टअप ही लोकचळवळ झाली पाहिजे – मंत्री मंगलप्रभात लोढा

0
मुंबई, दि. ९ : एकेकाळी भारताचा जगभरात व्यापार होता. घराघरात लघु आणि कुटीर उद्योगही सुरु असायचे, त्यामुळेच भारताला  'सोने की चिडिया' म्हटले जात होते....

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

0
मुंबई, दि. ९ : भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला....

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

0
सातारा दि. 9 : पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 66 व्या पुण्यतिथीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात समाधीस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. यावेळी...

पाकिस्तानमधील स्ट्रीमिंग सामग्रीबाबत केंद्र सरकारची कडक भूमिका

0
नवी दिल्ली, दि. ८ : केंद्र सरकारने सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्स, मीडिया स्ट्रीमिंग सेवा व डिजिटल इंटरमिजिअरीज (मध्यस्थ) यांना पाकिस्तानमधील वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट...

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

0
नवी दिल्ली, 8 : हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूपात माहिती व्हावे, यासाठी...