रविवार, जुलै 6, 2025
Home Blog Page 386

रोहा रेल्वे स्थानकावर दहा जलद व अतिजलद गाड्यांना थांबा

रायगड जिमाका दि. २५ : रोहा रेल्वे स्थानकावर जलद व अतिजलद दहा गाड्यांना थांबा देण्याचा शुभारंभ महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे आणि खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला.

रोहा येथे कोचुवेली इंदोर एक्स्प्रेस, कोयंबटुर हिसार एक्स्प्रेस, कोचुवेली चंढीगड एक्स्प्रेस, दादर तिरुनेलवेली एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मडगांव एक्स्प्रेस या दहा   जलद व अतिजलद गाड्या थांबणार आहेत. यावेळी जलद गाडीतून प्रवास करणार्‍या पहिल्या प्रवाशाला खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते तिकीट देऊन शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे, मध्य रेल्वेचे विभागीय अभियंता वाय. पी. सिंग, एडीआरएन श्री शशीभूषण, एसीएम राजीव रंजन, आदी उपस्थित होते.

रोहा येथे जलद व अतिजलद गाड्यांना थांबा मिळावा ही गेल्या कित्येक वर्षांपासून रोहावासियांची मागणी होती.

रोहा स्थानकावर अतिजलद दहा गाड्यांना थांबे रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाले आहेत आणि आज त्याची सुरूवात होत आहेत हा आपल्या आयुष्यातील महत्वपूर्ण दिवस आहे.लवकरच २० कोटी रुपये खर्च करून रोहा रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण होणार आहे.याठिकाणी विविध सुविधा उपलब्ध होत आहेत, असे महिला व बालविकास मंत्री कु. अदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.

जनतेची कामे करताना संवेदनशील रहावे लागते. कामाची तत्परता असावी लागते आणि याच भावनेने रोहेकरांचे कित्येक वर्षाचे स्वप्न पूर्ण करत असल्याचा आनंद आहे असे खासदार श्री. तटकरे यांनी सांगितले. दूरपल्ल्याच्या गाड्या रोहा येथे थांबाव्यात यासाठी प्रयत्न होता. ते आज पूर्ण होत आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री यांचे  विशेष आभार त्यांनी यावेळी मानले. रोहा रेल्वे स्थानकावर अतिजलद गाड्यांना थांबा मिळाल्यानंतर माणगाव, रोहा, कोलाड, पेण येथील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणार्‍या गाड्या इथे थांबणार आहेत. अजून नवीन थांबे कसे मिळतील यासाठी शंभर टक्के प्रयत्न केले जातील असे आश्वासनही खा. तटकरे यांनी दिले.

०००

शैक्षणिक गुणवत्तेच्या अधिक वाढीसाठी सर्वांचे योगदान आवश्यक : शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

धुळे, दिनांक 25 जानेवारी, 2025 (जिमाका वृत्त) : शैक्षणिक गुणवत्तेच्या अधिक वाढीसाठी व विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी पालक, शिक्षक, तसेच समाजसेवी संस्थांचे योगदान आवश्यक आहे. असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनिष पवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. किरण कुवर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य डॉ. मंजुषा क्षिरसागर आदी उपस्थित होते.

शिक्षणमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करतानाच शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक आहे. कृत्रिम बुध्दीमत्ता (आर्टिफिशियल इंटिलीजन्स) सारख्या माध्यमांचा शालेय शिक्षणात उपयोग करावा. प्रत्येक शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गायले पाहिजे. पहिलीच्या विद्यार्थ्यास किमान बाराखडी व अंक गणिताची ओळख असणे, दुसरीच्या विद्यार्थ्यांना लिहिता, वाचता येणे आवश्यक तर तिसरीच्या विद्यार्थ्यांना पाढे यावे अशा सोप्या पद्धतीने शिकविणे आवश्यक आहे. चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्याबरोबरच नाविण्यपूर्ण उपक्रमाचे स्वागत करण्यात येईल. शाळेतील शिक्षण ग्रामसमितीला सोबत घेऊन काम करावे. शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. यासोबत इतर योजनांच्या माध्यमातून शाळेचा भौतिक विकास करावा. मनरेगा योजनेतून जिल्हा परिषदेच्या शाळांच्या संरक्षण भितींचे काम करावीत. जलजीवन मिशनच्या माध्यमातून शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. तसेच शाळेतील स्वच्छता गृहाची साफसफाईची कामे  ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करावी. 14 वा 15 व्या वित्त आयोग, क्रीडा विभाग, स्थानिक स्वराज्य निधी, आमदार, खासदार निधी तसेच अनेक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सीएसआर फंडातून शाळांना आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करण्याच्या सुचनाही त्यांनी केल्यात. शाळेचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. शाळा सुटण्याच्या वेळी टवाळखोर विद्यार्थ्यांवर पोलीस विभागाने दामिनी पथकाच्या माध्यमातून कारवाई करावी.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करताना, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमात जिल्ह्यातील दोन शाळांना पारितोषिक मिळाल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे अभिनंदन करुन ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना चांगला पोषण आहार, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह सुविधा, तसेच विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या सुपर 50 सारखे उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात यावेत. आगामी काळात किमान आठवीपासून आठ झोनमध्ये विविध क्षेत्रातील शाळा सुरू करणार आहे. यात कला, क्रीडा, इंजिनिअरिंग, अभियांत्रिकी, विज्ञान, डिजिटल शाळा सुरु करण्यात येणार आहे. तसेच राज्यात 200 पेक्षा जास्त पटाच्या शाळेच्या एक गट स्मार्ट शाळा म्हणून सुरु करणार, शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी जलदगतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शाळाबाह्य कामे कमी करण्याचा आगामी काळात प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. धुळे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करुन त्यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नरवाडे यांनी शिक्षण विभागामार्फत राबवावयाचा 10 सुत्री कार्यक्रम तसेच शिक्षकांच्या अडचणी सोडविणेबाबत, शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण, जिल्ह्यातील नाविण्यपूर्ण कॉपीमुक्त अभियान याबाबत माहिती दिली.

प्रांरभी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनिष पवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ.किरण कुवर, डाएटच्या प्राचार्या मंजुषा क्षिरसागर यांनी पीपीटीद्वारे जिल्ह्यात शिक्षण विभागामार्फत सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या बैठकीस शिक्षण विभागाचे सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000000

कृतिशील विचारवंत हरपले – मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. 25 : ज्येष्ठ विचारवंत, सिद्धहस्त लेखक आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. सामाजिक मुद्यांवर परखड भाष्य करणारे कृतिशील विचारवंत आज आपल्यातून हरपले आहे. मराठी साहित्य, भाषा, आणि संस्कृतीसाठी त्यांनी आयुष्यभर योगदान दिले, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

व्यक्तिचित्रण आणि ललित लेखनातून त्यांनी साहित्यप्रेमींना प्रेरित केले. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मराठी साहित्याला वैभव प्राप्त करून दिले. त्यांच्या जाण्याने न्याय, समाज, आणि साहित्य क्षेत्रातील त्यांच्या मार्गदर्शनाची उणीव आपल्याला नेहमीच भासत राहील, असे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

000

राष्ट्रीय मतदार दिन : राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव

भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या मतदान प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी २५ जानेवारी हा दिवस “राष्ट्रीय मतदार दिन” म्हणून साजरा केला जातो. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली, आणि त्यानिमित्ताने देशभर जनजागृतीचे उपक्रम राबवले जातात.

मतदान : लोकशाहीचे प्रतीक आणि राष्ट्रीय कर्तव्य

मतदानाचा हक्क बजावणे हे केवळ आपले सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्य नसून, लोकशाही टिकविण्याचे अत्यंत प्रभावी साधन आहे. भारतातील लोकशाही निवडणूक प्रक्रिया जगभरात आदर्श मानली जाते. ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) च्या माध्यमातून आज आपली मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व पारदर्शक झाली आहे.

लोकशाही मजबूत असेल तर देशाचा विकास सुकर होतो. म्हणूनच, प्रत्येक नागरिकाने मतदानात सक्रीय सहभाग घेतला पाहिजे. आपले एक मत देशाच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरू शकते.

मतदान नोंदणी : पहिला पाऊल

१८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक तरुण-तरुणीने मतदार यादीत नाव नोंदवून मतदान प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे आहे. आजच्या डिजिटल युगात मतदार नोंदणी सोपी झाली आहे. www.nvsp.in या वेबसाइटद्वारे ऑनलाईन नोंदणी करता येते.

राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त, देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, जसे की; प्रभातफेरी, निबंध, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा,मतदान जागृतीवर व्याख्याने, पोवाडे, पथनाट्याद्वारे जनजागृती विशेषत: तरुण पिढीला मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात.

लोकशाहीचे संरक्षण : आपली जबाबदारी

भारतीय निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली देशातील निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य पद्धतीने होतात. मतदार नोंदणीसाठी कोणत्याही सबबी न सांगता, आपला हक्क बजावणे हे आपल्या राष्ट्रप्रेमाचे खरे दर्शन आहे.

“आपले मत महत्त्वाचे आहे! चांगले राज्यकर्ते निवडण्यासाठी आजच आपली मतदार नोंदणी करा.”

मतदान हा आपला अधिकार, हक्क आणि कर्तव्य आहे. लोकशाहीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. चला, राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त, आपल्या समाजाला लोकशाहीचे खरे मूल्य समजावून देऊ.

 

आपली मतदार नोंदणी करा, देशाच्या विकासात आपले योगदान द्या!

0000

श्री. हेमकांत सोनार

रायगड-अलिबाग

 

ज्येष्ठ विचारवंत, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दुःख

मुंबई दिनांक २५: ज्येष्ठ विचारवंत, सिद्धहस्त लेखक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे.

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेल्या न्यायमूर्ती चपळगावकर यांनी मराठी साहित्य, भाषा, संस्कृती यांच्या अभिवृद्धीसाठी प्रयत्न केले.

मराठवाड्याच्या या सुपुत्राने सामाजिक, न्याय विषयांवर तसेच व्यक्तिचित्रण, ललित लिखाण देखील केले. आपल्या वैचारिक लिखाणातून समाजाला नेहमी जागृत आणि ज्ञानी करण्याचा त्यांचा प्रयत्न असे.

त्यांच्या निधनाने केवळ मराठवाड्यातीलच नव्हे तर, राज्यातील साहित्य क्षेत्राची हानी झाली आहे अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.

0000

चिंतनशील साहित्यिक, महाराष्ट्र सुपुत्राच्या निधनाने सामाजिक, वैचारिक क्षेत्राची हानी

मुंबई, दि. २५ :- महाराष्ट्राची चिंतनशील, वैचारिक परंपरा आपल्या कर्तृत्वाने समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने सामाजिक, वैचारिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

स्वातंत्र्य संग्राम, हैद्राबाद मुक्ती संग्रामात सक्रिय असलेल्या वडिलांकडूनच न्यायमूर्ती चपळगावकर यांना वैचारिकतेचा वारसा लाभला. त्यांचा मराठवाड्यासह राज्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राचा गाढा अभ्यास होता. प्राध्यापक, वकिल, न्यायमूर्ती, साहित्यिक आणि विचारवंत अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. त्यांच्या लेखनात सहजता आणि वक्तृत्वात परखडता होती. स्वामी रामानंद तीर्थ यांच्यावरील चरित्रात्मक लिखाणामुळे स्वामींचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचले. कथा, कवितांचे लेखन करतानाच वैचारिक लेखन सर्वसामान्यांपर्यंत पोहचले पाहिजे, यासाठी शब्दांच्या निवडीवर त्यांचा विशेष भर असे. त्यांची ग्रंथसंपदा हे मागे राहिलेले विचारधन आहे.

न्या. चपळगावकर यांच्या निधनाने एक चिंतनशील साहित्यिक, महाराष्ट्र सुपुत्राला आपण मुकलो आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

0000

 

माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने परखड भाष्यकार, कृतीशील विचारवंत हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 25 :- “ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती  नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने सामाजिक मुद्यांवर परखड भाष्य करणारा कृतीशील विचारवंत हरपला आहे. कायद्याचे अभ्यासक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहिल्याने समाजातील घडामोडीचा समतोल आणि चिकित्सक अभ्यास करण्याचे कसब त्यांच्याकडे होते. वैचारिक निष्ठा आणि बांधिलकी जपत राजकीय, सामाजिक विषयांवर स्पष्ट भूमिका घेणारे, साहित्यातून आपली भूमिका ठामपणे मांडणारे लेखक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. ते मराठवाड्याचे सुपुत्र होते. मराठवाड्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी लिहिलेली पुस्तके आणि लेखांमध्ये त्यांच्यातला विचारवंत ठळकपणे दिसतो. देशाचा स्वातंत्र्यलढा, मराठवाडा मुक्तीसंग्रामातही त्यांनी मोलाचं योगदान दिलं. त्यांनी लिहिलेलं ‘गांधी आणि संविधान’ पुस्तक संविधान आणि गांधीविचारांचं अलौकिक दर्शन घडवणारं आहे. वर्ध्याला झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात साहित्यिक आणि राजकीय नेतृत्वं दोघांच्याही जबाबदाऱ्यांवर त्यांनी केलेलं भाष्य सर्वांसाठी मार्गदर्शक ठरलं आहे. आदरणीय नरेंद्र चपळगावकर सरांसारख्या व्यक्तिमत्वाचं निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, वैचारिक चळवळीची हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली आहे.

—-००००—-

देशातील प्रत्येक नागरिक सहकार चळवळीशी जोडला जाणार – केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह

मुंबई, दि. २४ : भारतातील सहकारी संस्था समृद्ध बनविण्यासाठी सहकार मंत्रालयाने महत्त्वाची पावले उचलली असून देशातील प्रत्येक नागरिक या माध्यमातून सहकारी चळवळीशी जोडला जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ध्येयाप्रमाणे आपण जगातील तिसऱ्या महासत्ताकडे वाटचाल करीत असून २०४७ मध्ये आपण पूर्ण विकसित राष्ट्र असू, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ चा आरंभ केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री श्री.शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरेगाव येथे करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार व   नागरी विमानचालन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, केंद्रीय सचिव आशीष बुधानी, पंकज बन्सल, तसेच सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा तसेच संपूर्ण देशभरातून सहकार चळवळीशी संबंधित मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ कार्यालयाचे उद्घाटन, नव्याने स्थापन झालेल्या १० हजार बहुउद्देशीय सहकारी संस्थांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम व उद्घाटन तसेच आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ दरम्यानच्या उपक्रमाचे वार्षिक कॅलेंडरचे विमोचन करण्यात आले.

 

केंद्रीय सहकार मंत्री श्री.अमित शाह म्हणाले की, अम्ब्रेला संगटनामुळे अर्बन को-ऑपरेटिव्ह क्षेत्राला फायदा होणार आहे. ज्याप्रमाणे राष्ट्रीय आणि खासगी बँकेमध्ये सेवा मिळतात, अगदी त्याचप्रमाणे सहकारी बँकेद्वारे सेवा मिळतील. यासाठी सहकारी बँकेच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यात येत आहे. आज एक हजार ४६५ सहकारी अर्बन सहकारी बँका असून त्या महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आहेत. आगामी काळात वित्तीय व्यवहार हा सहकारी बँकामार्फत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सहकार क्षेत्राला आत्मनिर्भर बनविण्यासाठी नवीन पिढीने त्याबाबतचे तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. प्रत्येक गावात रोजगार निर्माण करावयाचा असेल तर सहकार क्षेत्राला नवीन आयाम देणे आवश्यक आहे. भारत सरकारने साखर उद्योगासाठी १० हजार करोड रूपयांचा इन्कम टॅक्स माफ केला आहे. काही वाद राहू नये यासाठी कायद्यात सुद्धा सुधारण केली असल्याचे त्यांनी सांगितले. दहा लाख टन साखर निर्यातीमुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फायदा होणार आहे. आगामी काळात सहकार क्षेत्राला पुढे नेण्याचा संकल्प केला असल्याचेही श्री.शाह यांनी सांगितले.

महाराष्ट्र : सहकार चळवळीची जननी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सहकार क्षेत्राची मूळ बिजं रोवली असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र ही सहकार चळवळीची जननी आहे. सहकार हे कोणाची मत्तेदारी नसून सहकार हा देशाचा प्राण आहे. सहकार आणि साखर उद्योगाला केंद्र सरकारच्या धोरणांमुळे चालना मिळाली. देशातील गावात सहकाराची मुळे मजबूत होत असून मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायट्यांना इज ऑफ डुईंग बिझिनेसमुळे उपयुक्त असे पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलमुळे अर्जाची सद्यस्थिती जाणून घेता येते. त्याचबरोबर नवीन १० हजार पॅक्समध्ये फिशरिज, डेअरीची सहकारी संस्था सुरू झाल्या. नाबार्डच्या सहाय्याने देखील ग्रामीण मार्ट सुरू झाले. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, जैविक खते, शेतमालाला बाजारपेठ मिळवून देणे यासाठी राष्ट्रीय पातळीवर बहुउद्देशीय संस्था सुरू झाल्या. किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो एटीएम ही सहकारातील मोठी क्रांती असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

सहकाराला बळकट करण्यासाठी या सरकारने अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले असून सहकाराला संजिवनी दिल्याचे सांगून श्री.शिंदे म्हणाले की, राज्यातील ८ हजार पँक्सचे संगणकीकरण पूर्ण केले आहे. १०० वर्षोपेक्षा जास्त गौरवशाली इतिहास असलेला सहकार आता विदर्भ आणि मराठवाडा या भागात रूजेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सहकाराच्या माध्यमातून सकारात्मक बदल – उपमुख्यमंत्री अजित पवार

सहकार चळवळ अतिशय पारदर्शक आणि स्वच्छ पद्धतीने पुढे जाऊन ग्रामीण भागात आर्थिक सुबत्ता नांदत आहे, सहकार चळवळीशिवाय विकास अशक्य होता, असे मत व्यक्त करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सहकार क्षेत्राची ताकद ओळखून सहजता, सुलभता आणि पारदर्शकता आणण्यासाठी आणि चळवळीला बळकटी देण्यासाठी सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आले. सहकाराच्या माध्यमातून आपल्या देशातील शेतकरी, कष्टकरी, महिला, व्यापारी आणि उद्योजक यांना एकत्र आणण्यामध्ये तसेच समाजतील उपेक्षित, दुर्बल घटकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी सहकार विभागाच्या क्रांतीकारी निर्णयांमुळे चांगले परिणाम दिसू लागले असल्याचे त्यांनी सांगितले.

सहकारी चळवळीत कुशल, प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, या माध्यमातून युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार, स्वयंरोजगारांच्या संधी निर्माण होणार आहे. नव्या पिढीला या सहकारामध्ये सामावून घेण्यात येणार असून पुढील दोन तीन वर्षात प्रत्येक गावात सहकारी संस्था स्थापन व्हावी, यासाठी महाराष्ट्रातील सहकार चळवळ पूर्ण योगदान देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र ही सहकाराची पंढरी – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

महाराष्ट्र ही सहकाराची पंढरी आहे, असे सांगून केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, अनेक माध्यमातून निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही सहकाराशी जोडली आहे. ग्रामीण भागाला मजबूत करण्यासाठी तसेच रोजगार निर्माण करण्यासाठी सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. पॅक्स मजबूत झाल्यास गावे समृद्ध होण्याबरोबर तेथील गावकरी सुद्धा समृद्ध होणार असल्याचे विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना पुनर्जीवन देण्यासाठी अनेक पाऊले उचलली गेली असल्याचे सांगून ते म्हणाले की, मागील दोन आर्थिक वर्षात महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना जवळपास आठ हजार कोटी रूपयांची मदत मिळाली आहे. साखर कारखान्यांच्या इन्कम टँक्सच्या समस्या सोडविण्यात आल्या. याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी काळात एनसीडीसीच्या माध्यमातून सहकारी साखर कारखान्यांच्या सक्षमीकरणासाठी दहा हजार कोटी रूपयांची तरतूद केली असल्याचेही यावेळी सांगितले.

आभार प्रदर्शन करताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, केंद्रीय सहकार मंत्री श्री.शाह यांनी सहकार चळवळीला न्याय देण्याचे काम केले आहे. भारताची ओळख ही महाराष्ट्राच्या या सहकार चळवळीमुळे आहे. सर्वसामान्य घटनांना या चळवळीत आणण्यासाठीच्या केंद्रीय सहाकर मंत्री श्री.शाह यांच्या प्रयत्नांबद्दल त्यांनी आभार मानले.

००००

महापारेषणमध्ये ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ उत्साहात

मुंबई, दि. २४ : शासकीय कामकाजाबरोबरच दैनंदिन व्यवहारातही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मराठी भाषेचा जास्तीत-जास्त वापर करावा. तसेच मराठी संस्कृती टिकविण्यासाठी मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापारेषणचे संचालक (मानव संसाधन) श्री. सुगत गमरे यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने १४ ते २८ जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. वांद्रे येथील ‘प्रकाशगड’ येथील सभागृहात आयोजिलेल्या ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभात श्री.सुगत गमरे बोलत होते. यावेळी संचालक (संचलन) श्री. सतीश चव्हाण, संचालक (वित्त) श्रीमती तृप्ती मुधोळकर, मुख्य महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्रीमती अंजू गुप्ता, मुख्य अभियंता श्रीमती जुईली वाघ, श्री. सुनील सूर्यवंशी, मुख्य महाव्यवस्थापक (सुरक्षा व अंमलबजावणी) श्री. कैलास कणसे, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. राजू गायकवाड, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. मंगेश शिंदे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भरत पाटील, मुख्य विधी सल्लागार डॉ. कीर्ती कुळकर्णी, मराठी भाषा समन्वय अधिकारी श्री. नितीन कांबळे, उपमहाव्यवस्थापक (मा.सं. आस्थापना) श्री.अभय रोही उपस्थित होते.

श्री. सुगत गमरे म्हणाले, ‘मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी दैनंदिन जीवनातही मराठीचा वापर करावा. मराठी भाषेच्या प्रसारासाठी महापारेषणने म्हणी स्पर्धा, चरित्रवाचन स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आयोजित केल्या, हे कौतुकास्पद असून या सांस्कृतिक कलागुणांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सांघिक भावना वाढीस लागते.

यावेळी नाट्यअभिनेत्री श्रीमती मधुरा वेलणकर-साटम यांचा अस्सल मराठमोळा मधुरव (बोरू ते ब्लॉग) हा दर्जेदार कार्यक्रम घेण्यात झाला.

मराठी भाषा समन्वय अधिकारी तथा उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री.नितीन कांबळे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन श्री. रितेश चौधरी व श्रीमती प्राजक्ता मदाने यांनी केले. श्री.महेश आंबेकर यांनी आभार मानले.

महापारेषण मध्ये नावीन्यपूर्ण संकल्पनांवर भर

महापारेषणमध्ये विविध नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्यामध्ये संचालक (मानव संसाधन) श्री. सुगत गमरे नेहमी अग्रेसर असतात. दरवर्षी मराठी भाषा दिनाला विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. विशेषतः महापारेषणच्या वर्धापनदिन अनोख्या पध्दतीने करण्यावर श्री. गमरे यांचा विशेष भर असतो. महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली व संचालक (मानव संसाधन) श्री. सुगत गमरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महापारेषण’ने विविध पुरस्कार मिळविले आहेत.

 

स्पर्धांचे निकाल :

मराठी म्हणी स्पर्धा : अनिक मांढरे (प्रथम), पराग पाटील (व्दितीय)

चरित्र वाचन स्पर्धा : सीमा डुबेवार (प्रथम), रितेश चौधरी (व्दितीय)

वादविवाद स्पर्धा : माहिती व तंत्रज्ञान विभाग (प्रथम), तांत्रिक विभाग-२ (व्दितीय)

000

संजय ओरके/विसंअ

एसटीच्या टप्पा वाहतूक सेवेची १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यास मान्यता

मुंबई, दि. २४ : हकिम समितीने निश्चित केलेल्या सुत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये  १४.९५  टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही भाडेवाढ दिनांक 25 जानेवारी 2025 (२४ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्रीनंतर) पासून अंमलात येईल, अशी माहिती राज्य परिवहन प्राधिकरणाने दिली आहे.

वाहनासाठी आवश्यक असलेल्या डिझेल, चेसीस, टायर या घटकांच्या किंमतीत बदल झाल्यामुळे तसेच महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे भाडेवाढ सुत्रानुसार महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या पत्रान्वये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बसेसच्या प्रवासी भाडेदरात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाच्या २७६ व्या बैठकीत विचारार्थ सादर करण्यात आला. मागील भाडेवाढ दिनांक २६ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आली होती.

मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या  तरतूदीनुसार शासनाने राज्य परिवहन प्राधिकरणाची स्थापना केली आहे. राज्य परिवहन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य यांची २७६ वी बैठक  अपर मुख्य सचिव, गृह विभाग (परिवहन) तथा अध्यक्ष, राज्य परिवहन प्राधिकरण संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली २३ जानेवारी रोजी झाली. सदर बैठकिस राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) व  परिवहन आयुक्त उपस्थित होते.

या बैठकीत  महामंडळाच्या पर्यावरणपूरक नवीन बीएस ६ मानकाच्या नविन साध्या बसेस टोमॅटो लाल रंगसंगतीस मान्यता देण्यात आली. महामंडळाने ५० ई-बसेससाठी  पांढरा व हिरवा रंग तसेच १०० ई-बसेससाठी सद्यस्थितीत चलनात असलेल्या शिवनेरी प्रमाणेच आकाशी रंगसंगतीस मान्यता देण्यात आली. तसेच रेन्ट-ए-कॅब लायसन्स धारकांचे  रेन्ट-ए-कॅब लायसन्स नूतनीकरण करण्यास व अर्जदारास  नवीन रेन्ट-ए-कॅब लायसन्स जारी करण्यास मान्यता देण्यात आली, असे राज्य परिवहन प्राधिकरणाचे सचिव भरत कळसकर यांनी कळविले आहे.

अशी आहे भाडेवाढ

सेवेचा प्रकार :  साधी बस – सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ८.७० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये,

जलद सेवा (साधारण) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ८.७० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये.

रात्र सेवा (साधारण बस) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ८.७० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये,

निम आराम : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ११.८५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १३.६५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये.

विनावातानुकूलीत शयन आसनी: सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ११.८५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १३.६५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये.

विनावातानुकूलीत शयनयान : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ११.८५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १४.७५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १६ रुपये.

शिवशाही (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १२.३५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १४.२० रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १६ रुपये.

जनशिवनेरी (वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १२.९५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १४.९० रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.

शिवशाही स्लिपर(वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १३.३५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १५.३५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.

शिवनेरी (वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १८.५० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर २१.२५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) २३ रुपये,

शिवनेरी स्लिपर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. २२ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर २५.३५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) २८ रुपये,

ई बस ०९ मिटर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १२ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १३.८० रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये,

ई-शिवाई / ई बस १२ मिटर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १३.२० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १५.१५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.

ताज्या बातम्या

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...

“गिरगावच्या शाळेतील शिक्षकांमुळे मी घडलो” – सरन्यायाधीश भूषण गवई यांची शिक्षकांविषयी कृतज्ञता

0
मुंबई, दि. 6: देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालयाला भेट देत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. प्राथमिक ते...

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची...

0
पंढरपूर, दि. ६- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र...