शुक्रवार, जुलै 4, 2025
Home Blog Page 34

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा; पुणे घाट परिसरात पुढील २४ तासाकरिता ऑरेंज अलर्ट

मुंबई, दि. 20 : कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) मार्फत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (२० जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) रत्नागिरी जिल्ह्यात ४१.७ मिमी पाऊस झाला आहे. तर ठाणे जिल्ह्यात ४१.६ मिमी, पालघर ४१.६ मिमी, रायगड जिल्ह्यात ४०.१ मिमी  आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात ३१.७ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज २० जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे  ४१.६, रायगड ४०.१, रत्नागिरी ४१.७,  सिंधुदुर्ग २४.२, पालघर ४१.६, नाशिक २७.४, धुळे १.५, नंदुरबार ४, जळगाव ३.४, अहिल्यानगर ८.४, पुणे २८, सोलापूर २,  सातारा २६.५,  सांगली ५.४,  कोल्हापूर १७.४, छत्रपती संभाजीनगर ७.२, जालना ५.५, बीड ४.८,  लातूर ०.६, धाराशिव ३.३, नांदेड ३.७,  परभणी ३, हिंगोली ७.८, बुलढाणा ६.५, अकोला ११.६, वाशिम ७.६ अमरावती १२, यवतमाळ ९.७, वर्धा १०.७, नागपूर ५.९, भंडारा ३.२, गोंदिया ३.९, चंद्रपूर २.६ आणि गडचिरोली जिल्ह्यात १.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात पाण्यात बुडून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात भिंत पडून दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तर जालना जिल्ह्यात वीज पडून एका प्राण्याचा मृत्यू झाला आहे.

राज्य आपत्कालीन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर आहे.       पुणे विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकवासला धरण मुठा नदी १५,०९२ क्यूसेक, बंडगार्डन बंधारा पुणे-२४,४१६ क्युसेक, भिमा नदी दौंड पूल विसर्ग १०,८३३ क्युसेक, घोड नदी घोड धरण  ४,००० क्युसेक, कण्हेर धरण सातारा ५०० क्युसेक, वेण्णा नदी-१,००० क्युसेक विसर्ग सुरू असून नदी किनाऱ्या लागत गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदी नांदूर मधमेश्वर धरणातून  २२,३४५ क्युसेक, सीना नदी – सीना धरणातून  २८९ क्युसेक विसर्ग सुरू आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खेड, दापोली नगरपालिका हद्दीमध्ये पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. बोरघर वावे तर्फे नातू चिंचवली या रस्त्यावरच्या पुलावर पाणी गेल्याने रस्ता बंद होता. वनोशी अंगणवाडी पन्हाळे फणसूर रस्त्याच्या मधील पुलावर पुराचे पाणी आल्याने रस्ता बंद करण्यात आला होता. सद्यस्थित वाहतूक सुरळीत चालू आहे. चिंचगर कोरेगाव भैरवी रोड मधील रस्त्यावर पुलावर पुराचे पाणी आल्याने रस्ता बंद करण्यात आला होता. सद्यस्थित वाहतूक सुरळीत चालू आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ (गुहागर- चिपळूण-विजापूर) सोनपात्र वळणाजवळ दरड कोसळयाने काही काळ वाहतूक बंद करून दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. तसेच अतिवृष्टीमुळे  चिपळूण, दापोली येथे झाड कोसळून आणि भिंत पडून खासगी मालमत्तांचे नुकसान झाली असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ/

‘दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे यांची मुलाखत

मुंबई, दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘आषाढी वारी’ निमित्त  शासनामार्फत करण्यात आलेले नियोजन व सोयी-सुविधा’ या विषयासंदर्भात ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

पंढरपूरची ‘आषाढी वारी’ ही वारकऱ्यांची श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीचा उत्सव आहे. या वारीतील प्रत्येक वारकऱ्याचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा यासाठी राज्य शासनाने यंदा अधिक व्यापक नियोजन केले आहे. वारीमध्ये यंदा शासनाने आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, वाहतूक नियोजन, आपत्कालीन व्यवस्था, स्वच्छता मोहीम आणि सुरक्षा यावर विशेष भर दिला आहे. तसेच ‘मुख्यमंत्री निवारा सुविधा’ ही यंदाच्या वारीतील नवी भर असून, यामाध्यमातून हजारो वारकऱ्यांना विश्रांतीसाठी निवासाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयातून, स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ही वारी अधिक सुसंगठित आणि सुरक्षित करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. वारकरी परंपरेतील या महत्त्वाच्या सोहळ्यात शासनाची भूमिका आणि जनहितकारी उपाययोजनांची माहिती याविषयावर मंत्री श्री. गोरे यांनी ‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार दि.23 आणि मंगळवार दि. 24 जून 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

000000

जयश्री कोल्हे/ससं/

मंत्रालयात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

मुंबई, दि. 20 : मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योगा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. ‘इन्स्टिट्युट ऑफ योगा’ यांच्या सहयोगाने आयोजित या प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्यमंत्री पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, इन्स्टिट्युट ऑफ योगाचे सह संचालक ऋषी योगेश यांच्यासह विविध विभागांचे सचिव, उपसचिव, अधिकारी आणि कर्मचारी  उपस्थित होते.

यावेळी इन्स्टिट्युट ऑफ योगाच्या मार्गदर्शकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच योगाच्या महत्त्वाविषयी माहिती दिली. यावेळी पर्वतासन, शवासन यासारख्या योगांची प्रत्यक्षिके उपस्थितांनी केली. तसेच अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धामध्ये सुवर्ण पदक विजेते मंत्रालयीन अधिकारी जगन्नाथ लांडगे, दत्ताराम सावंत आणि योगिता जाधव यांनी योग प्रात्यक्षिके सादर केलीत.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगाव येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन

जळगाव, दि. २० जून (जिमाका वृत्तसेवा) : धरणगाव  येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात येत असून यामध्ये प्रस्तावित खाटांची वाढ करत एकूण ५० खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारले जाणार आहे. या रुग्णालयाची मुख्य इमारत व वैद्यकीय अधिकारी निवासस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

धरणगाव शहराला लागून एकूण २ हेक्टर क्षेत्रफळाच्या या जागेवर उपजिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर उभारले जाणार आहे. या प्रकल्पासाठी शासनाकडून ३९ कोटी ४६ लाख ७५ हजार इतक्या निधीस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

या श्रेणीवर्धनामुळे धरणगाव तालुक्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम होणार आहेत. नव्याने विविध वैद्यकीय अधिकारी पदांची निर्मिती करण्यात येणार असून, शस्त्रक्रिया, स्त्रीरोग व प्रसूती, बालरोग, बधिरीकरण आदी सेवांसाठी तज्ज्ञ अधिकारी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे परिसरातील गरजू आणि अत्यवस्थ रुग्णांना अत्याधुनिक रुग्णसेवा उपलब्ध होणार आहे.

000

जिल्ह्यात दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – पालक सचिव एकनाथ डवले

नाशिक, दि. १९ : राज्य शासनाने अलीकडेच दिलेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात विविध विभागांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. आता शासनाने 150 दिवसांचा कार्यक्रम दिला आहे. त्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. ई – ऑफिस प्रणालीचा वापर करावा, अशा सूचना पालक सचिव एकनाथ डवले यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज सकाळी राज्य शासनाने दिलेल्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाचा पालक सचिव डवले यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पालक सचिव डवले यांनी सांगितले की, शासनाच्या शंभर दिवसांच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी भविष्यातील वाटचालीसाठी विकसित महाराष्ट्र २०४७ च्या अनुषंगाने व्हीजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यात दीर्घकालिन म्हणजे २०४७ पर्यंत गाठावयाची उद्दिष्टे, मध्यमकालिन उद्दिष्टे म्हणजे राज्याच्या अमृत महोत्सवापर्यंत गाठावयाची उद्दिष्टे आणि अल्पकालिन म्हणजे २ ऑक्टोबर २०२९ पर्यंतच्या पाच वर्षांत वर्षनिहाय गाठावयाच्या उद्दिष्टांचा समावेश आहे. दीडशे दिवसांच्या कार्यक्रमात विकसित महाराष्ट्र २०४७, ई गव्हर्नन्स, सेवाविषयक, प्रशासकीय सुधारणांचाही समावेश आहे. तसेच तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा. आगामी काळात शंभर टक्के ई- ऑफिस प्रणालीचा वापर करावा, असेही पालक सचिव श्री. डवले यांनी सांगितले. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी शर्मा यांनी 150 दिवसानिमित जिल्हा प्रशासनातर्फे सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

या बैठकीनंतर पालक सचिव डवले यांनी नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यातील विविध विकास कामांचा आढावा घेत त्यांना गती देण्याचे निर्देश दिले. कुंभमेळा प्राधिकरणाच्या सह अध्यक्ष श्रीमती नायर यांनी कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.

०००

ढेबेवाडी येथील बस अपघातातील जखमींवर तात्काळ उपचार

सातारा दि. १९:  पाटण तालुक्यातील सळवे, ढेबेवाडी, पाटण मार्गावर जानुगडेवाडी गावच्या हद्दीत आज सकाळी पाटण आगार बसचा अपघात झाला. या अपघातात 20 जण जखमी झाले असून जखमींना नजीकच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. ही घटना पालकमंत्री शंभूराज देसाई यांना समजताच तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधून जखमींना आवश्यक ते सर्व उपचार त्वरीत सुरु करण्याचे निर्देश दिले. जखमींच्या उपचारामध्ये कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याबाबत दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितले आहे.

एमच-14 बी.टी.1127 ही बस सळवे–ढेबेवाडी या मार्गावर धावत असताना जानुगडेवाडी या गावच्या हद्दीत आली असता समोरून ट्रॅव्हल येत आसताना बस चालकाने बस डावीकडे घेतली आसता रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या झाडाला बसची धडक बसून गंभीर अपघात झाला. अपघातात रा. प. चालकाला वाहन नियंत्रित न झाल्याने सदर अपघाता झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

या अपघातात 30 जण किरकोळ जखमी झाले असून बसचेही नुकसान झाले आहे. यातील बहुतांश जणांना  प्रथमोपचार करून घरी सोडण्यात आले.त्यापैकी 9 जणांना कराड येथे  व  9 जखमी प्रवाशांना स्थानिक  ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी येथे उपचारासाठी हलविण्यात आले.

पालकमंत्री देसाई यांनी दिलेल्या निर्देशानुसार पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी सुनिल गाढे यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पीटल येथे तातडीने जाऊन त्याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णाची विचारपूस केली. त्यांच्या उपचाराबाबत स्थानिक डॉक्टरांना सूचना दिल्या. कृष्णा हॉस्पिटलच्या वतीने देखील उपचाराबाबत कोणतीही कमतरता राहणार नाही असे सांगण्यात आले. तसेच तत्काळ तेथे दाखल 9 प्रवाशी यांचेवर उपचार करण्यात आले. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे स्थानिक डॉक्टरांनी सांगितले. तसेच यातील किरकोळ स्वरुपाच्या जखमींना उपचारानंतर लगेच घरी सोडण्यात आले असून सद्यस्थितीत दोन जण कृष्ण हॉस्पिटलमध्ये दाखल असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी येथील रुग्णालयात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची पोलीस उपअधीक्षक विजय पाटील, महसूल प्रशासनाचे सर्कल यांनी स्वत:भेट घेऊन विचारपासून केली व तात्काळ उपचार उपलब्ध होतील, याची दक्षता घेतली. किरकोळ जखमी प्रवाशांवर उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. कराड येथील विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड व त्यांचे सहकारी यांनी देखील हॉस्पिटलमध्ये भेट देऊन याबाबत रुग्णाची विचारपूस केली आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील हे देखील जखमी वरील उपचार व तात्काळ आवश्यक मदत या बाबींवर लक्ष ठेवून आहेत.

०००

मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाचे अनेक नवे उपक्रम यशस्वी

मुंबई, दि. १९ : भारत निवडणूक आयोगाने (ECI) आज घेतलेल्या पाच विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण नवकल्पनांची यशस्वी अंमलबजावणी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार व निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार महिन्यांत हे उपक्रम राबवले गेले.

गुजरातमधील २४-कडी (SC) आणि ८७-विश्वदर, केरळमधील ३५-निलांबूर, पंजाबमधील ६४-लुधियाना वेस्ट आणि पश्चिम बंगालमधील ८०-कालिगंज या मतदारसंघांत १३५४ मतदान केंद्रांवर पोटनिवडणुका पार पडल्या.

या निवडणुकीत खालील नवकल्पनांची यशस्वी अंमलबजावणी झाली:

🔹 मोबाईल डिपॉझिट सुविधा:

प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना त्यांच्या मोबाईल फोन ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रात प्रवेशापूर्वी फोन कुठे ठेवावा, हा मोठा प्रश्न असतो. यावर उपाय म्हणून साधे डब्याचे खाचे किंवा गोण्यांमधून ही व्यवस्था करण्यात आली आणि स्वयंसेवकांमार्फत सुविधा दिली गेली.

🔹 सुधारित VTR (मतदान टक्केवारी) प्रणाली:

पूर्वी मतदान टक्केवारीचे आकडे सेक्टर अधिकारी फोन, SMS वा मेसेजिंग अ‍ॅप्सद्वारे संकलित करत असत. मात्र आता ECINET अ‍ॅपवरून प्रत्येक दोन तासांनी मतदान टक्केवारी थेट अद्ययावत केली जाऊ लागली. मतदान पूर्ण झाल्यानंतरही, प्रिसाइडिंग ऑफिसर मतदान केंद्र सोडण्यापूर्वी अंतिम VTR डेटा अ‍ॅपवर अपलोड करतात. त्यामुळे आकडेवारीत होणारा उशीर टळतो. जिथे नेटवर्क उपलब्ध नाही, तिथे ऑफलाईन नोंदी करून नंतर त्यांचे समक्रमण होते.

🔹 १००% वेबकास्टिंग:

सर्व मतदान केंद्रांवर (फक्त एका अपवादाने) मतदान प्रक्रियेचे थेट वेबकास्टिंग करण्यात आले. यामुळे सर्व प्रक्रिया पारदर्शकतेने पार पडली. RO, DEO आणि CEO स्तरावरील विशेष टीम्सने या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले.

🔹 इलेक्टोरल रोल्सचा विशेष संक्षिप्त पुनरावलोकन (SSR):

सुमारे वीस वर्षांनंतर प्रथमच पोटनिवडणुकीपूर्वी मतदार यादींचे विशेष पुनरावलोकन करण्यात आले.

या सर्व उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी बिहार विधानसभा निवडणुकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

०००

 

नोंदणी विधेयक मसुद्यात सुधारणेसाठी नोंदणी अधिकाऱ्यांची कार्यशाळा

मुंबई, दि. १९ : नोंदणी विधेयक मसुदा २०२५ वर सुधारणा सुचविण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाच्यावतीने पुणे येथे नुकतीच एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. राज्यातील उपविभागीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सूचनांमुळे मसुदा अधिक प्रभावी व सर्वसमावेशक होईल. डिजिटल इंडियाच्या दिशेने हे एक निर्णायक पाऊल असून नागरिकांना जलद, पारदर्शक व विश्वासार्ह सेवा मिळण्यास मदत होईल, असे नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी यावेळी नमूद केले.

नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेत नोंदणी उपमहानिरीक्षक तथा मुद्रांक उपनियंत्रक यांच्या सादरीकरणातून विधेयकाच्या मसुद्यातील सर्व कलमांवर सखोल चर्चा करण्यात आली. नोंदणी विधेयक मसुदा २०२५ हा नोंदणी कायदा १९०८ ला आधुनिक स्वरुपात रुपांतर करण्याचा प्रयत्न असून यामध्ये डिजिटल नोंदणी, आधार आधारित पडताळणी, इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज व विस्तारित बंधनकारक दस्तऐवज यांचा समावेश करण्यात आलेला आहे. राज्यातील सर्व नोंदणी व मुद्रांक उपविभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या चर्चेत सहभाग घेऊन नागरिक केंद्रित, पारदर्शक व डिजिटलायझेशनला चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.

कार्यशाळेत डेटा गोपनीयतेसंदर्भात डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्‍शन ॲक्ट २०२३ च्या तरतुदींचे पालन करुन डेटा संकलन, वापर, सुरक्षा आणि तृतीय पक्ष सामायिकरणासाठी कठोर नियम लागू करणे आवश्यक असल्यावर भर देण्यात आला. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात ऑफलाईन नोंदणी केंद्रे स्थापन करणे व डिजिटल साक्षरता कार्यक्रम राबवणे, डेटा एनक्रिप्शन, ऑडिटसाठी कठोर तरतुदी,  नोंदणी रद्दीकरण प्रक्रियेत स्पष्टता आणि अनिवार्य नोटीस,  स्वतंत्र नोंदणी विवाद निवारण प्राधिकरणाची स्थापना करणे आदी सूचना करण्यात आल्या.

या कार्यशाळेस अप्पर मुद्रांक नियंत्रक संजय चव्हाण, विशेष कार्य अधिकारी  राजेंद्र मुठे, सहसचिव सत्यनारायण बजाज, मुद्रांक अधीक्षक अशोक पाटील आणि नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय) उदयराज चव्हाण यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नोंदणी विधेयक २०२५ लागू झाल्यानंतर नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ, सुरक्षित आणि आधुनिक होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

निधी चौधरी यांच्या चित्रातून पर्यावरण संवर्धनाचे वास्तव उभे – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. १९ : पर्यावरण संरक्षण या वैश्विक प्रश्नावर विविध प्रकारे जनजागृती होते. नॅशनल गॅलरी ऑफ आर्टच्या संचालक निधी चौधरी यांच्या बोलक्या चित्रातून पर्यावरण संवर्धनाचा केवळ संदेशच नाही, तर वास्तव चित्र उभे राहत असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले आहे. जहांगीर आर्ट गॅलरीत भरलेल्या निधी चौधरी यांच्या चित्र प्रदर्शनाला मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी भेट देऊन त्यांच्या कलाकृतीचे  कौतुक केले.

एकीकडे प्रशासकीय जबाबदारी आणि दुसरीकडे आपली कला जोपासत सनदी अधिकारी चौधरी सामाजिक संदेश देण्याचे काम करत आहेत. जहांगीर आर्ट गॅलरीत येत्या २२ जूनपर्यंत त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन नागरिकांना पाहता येणार आहे. प्रशासकीय अधिकारी निधी चौधरी यांनी चित्रांमधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. पर्यावरण संवर्धन आणि वृक्ष लागवडीबाबत जगात प्रचलित असलेल्या विविध कथांवर आधारित त्यांनी चित्र रेखाटली आहेत. त्यांच्या एकूण ४० चित्रांचा या प्रदर्शनात समावेश असून यातील काही चित्रांमध्ये महापुरुषांच्या तत्त्वांचाही समर्पक वापर करण्यात आला आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

मारुती चितमपल्ली वनसंपदेचे सजग प्रहरी – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. १९ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी प्रसिद्ध निसर्गप्रेमी आणि लेखक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

पद्मश्री चितमपल्ली यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. आपल्या तरल आणि प्रवाही लेखनातून त्यांनी निसर्गाचे निरागस व निर्मळ विश्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले.

ज्येष्ठ वनसंरक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतरही, चितमपल्ली आयुष्यभर वन्यजीव तसेच जैवविविधतेचे संरक्षक राहिले. त्यांच्या निधनामुळे देशाने मानवतेचा आणि विशेषतः वनसंपदेचा सजग प्रहरी गमावला आहे. त्यांचे कार्य व वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. या दुःखद प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबिय, चाहते आणि निसर्गप्रेमी जनतेला आपल्या शोकसंवेदना कळवतो, अशा शब्दात राज्यपालांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

०००

 

ताज्या बातम्या

विधानसभा कामकाज

0
आदिवासी विभागाच्या वसतिगृहांतील विद्यार्थ्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ - आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके मुंबई, दि. 4 : आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या...

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा ८ जुलै रोजी महाराष्ट्र विधानमंडळातर्फे सत्कार

0
मुंबई, दि. ४ : महाराष्ट्राचे सुपुत्र आणि देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचा सत्कार महाराष्ट्र विधानमंडळातर्फे करण्यात येणार आहे. हा गौरव सोहळा मंगळवार,...

प्रत्येक क्षेत्रात देशाला अग्रेसर ठेवण्याची प्रेरणा पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या जीवनचरित्रातून – केंद्रीय गृहमंत्री अमित...

0
पुणे, दि. ४ : संपूर्ण विश्वात प्रत्येक क्षेत्रात आपला देश पुढे राहील हे आपले जीवन ध्येय असले पाहिजे, यासाठीची प्रेरणा आणि ऊर्जा पहिले बाजीराव...

‘विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत’ योजनेद्वारे ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ...

0
मुंबई,  दि. ४ : राज्यातील काही भागात १६ जून पासून शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित...

वन क्षेत्रातील निर्धारित जागांवर मेंढ्यांना चराई करण्यास परवानगी – वनमंत्री गणेश नाईक

0
मुंबई, दि. ४ : वनांमध्ये विशिष्ट वयापर्यंत वाढलेल्या झाडांच्या परिसरात मेढ्यांना चरण्यासाठी परवानगी देण्यात आली असून अशा ठिकाणी मेंढपाळांना अडवू नये, असे निर्देश वनमंत्री...