रविवार, जुलै 13, 2025
Home Blog Page 332

शेती सिंचनाला प्राधान्य देऊन पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

नाशिकदि. 15 फेब्रुवारी, 2025 (जिमाका वृत्तसेवा):   धरण समूहातील पाणी शेतीसाठी उन्हाळ्यापर्यतंत पुरविण्याच्या दृष्टीने व नाशिक शहर महानगरपालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या लक्षात घेवून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री ( गोदावरी कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील  यांनी दिल्या.

आज नाशिक महानगरपालिका सभागृहात जिल्हा प्रशासन, नाशिक महानगरपालिका व जलसंपदा विभागाच्या अधिकारी यांच्या समवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार सरोज आहिरे, विभागीय आयुक्त डॉ प्रविण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसळ, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे कार्यकारी अभियंता वैभव भागवत, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, उपायुक्त अजित निकत, शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता पाणी पुरवठा अविनाश धनाइत, कार्यकारी अभियंता रविंद्र धारणाकर,बाजीराव माळी,गणेश मैड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, पाणी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पाण्याचे नियोजन लक्षात घेता 7.2 टी.सी.एम पाणी महापालिका क्षेत्रात वापर होतो. नदीपात्रात जवळपास 65 टक्के प्रक्रिया करून प्रवाहित करणे अपेक्षित आहे. परंतु तसे निदर्शनास येत नाही  त्यामुळे येत्या तीन महिन्यांत नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या सर्व व्हॉल्व्हचे तातडीने मिटरींग करण्यात यावे, त्यामुळे मंजूर पाण्यापैकी नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या पाण्याची तफावत दूर होण्यास मदत होईल. जवळपास 20 टक्के प्रक्रिया न केलेले पाणी नदी प्रवाहात सोडले जाते या दुषित पाण्यामुळे पाणवेलींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या नदीपात्रावरील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या नगरपालिका व ग्रामपंचायत यांचे जलसाठेही प्रदुषित होत आहेत. यासाठी महानगरपालिकेने तातडीने शाश्वत उपायोजना कराव्यात, असेही जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.

आगामी कुंभमेळाच्या दृष्टीने पाण्याचा काटकसरीने वापर झाला पाहिजे तसेच शहरातही काही भागात कमी-अधिक प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. यासाठी महापालिकाक्षेत्रात पाण्याचे योग्य परिक्षण होणे गरजेचे असून शहरासाठी 100 टक्के मीटरींग प्रक्रिया जलदपणे लागू केल्यास पाण्याच्या अतिरिक्त होणाऱ्या अपव्ययावर आपोआपच निर्बंध येतील. शेतीचे सरंक्षण करणे हे आपले प्रमुख दायित्व असून शेतीसाठी पाणी सिंचनास प्राधान्य देवून पाणी आवर्तनात होणारी पाणीगळती टाळण्याच्या दृष्टीनेही जलसंपदा विभागाने उपायोजना कराव्यात. अहिल्यानगर व नाशिक साठी गोदावरी आराखड्यात प्रवाहातून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी पाईपलाईन पाणी पुरवठा करण्यातचे नियोजन आहे. यासाठी नियामक मंडळाला सल्लागार नेमणूक करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यांचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील नियोजन करता येईल. यामुळे शेतीसिंचनासाठी पाण्यास अधिक वाव मिळेल. दारणा धरणातून थेट पाईपलाईन महानगरपालिका व जलसंपदा विभागाने समनवयाने आराखडा तयार करावा. अशा सूचनाही जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी बैठकीत दिल्या.

यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार सरोज आहिरे यांनी मांडलेल्या सूचनांचे स्वागत करण्यात आले.

00000

रामटेक येथील नियोजित चित्रनगरीसाठी तात्काळ जागा हस्तांतरीत करण्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

नागपूर, दि. 15 : रामटेक येथील नियोजित चित्रनगरीसाठी महसूल विभागाने सांस्कृतिक विभागास तत्काळ जागा हस्तांतरीत करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने या चित्रनगरीचे निर्माण होत असून या प्रकल्पासाठी सांस्कृतिक विभागाने तत्वत: मान्यता दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात चित्रनगरीबाबत आढावा घेतांना ते बोलत होते. सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यावेळी उपस्थित होते. रामोजी फिल्म सिटीचे संचालक राजीव जालनापूरकर यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभाग घेतला.

रामटेक येथील खिंडसी तलावाजवळ चित्रनगरी तयार करण्यात येणार आहे. चित्रीकरण व इतर बाबींसाठी ही जागा योग्य असून हे ठिकाण वनक्षेत्राशी जोडले असल्याने पर्यटनास भरपूर वाव आहे. यातून रोजगार निर्मिती होईल. चित्रनगरीसाठी प्रशिक्षीत मनुष्यबळ तयार करण्यासाठी येथे प्रशिक्षण केंद्र तयार करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.

चित्रीकरणासाठी लोकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. चित्रनगरीसाठी या क्षेत्रातील लोकांनी कार्यशाळा घ्याव्यात, असे ते म्हणाले.

या प्रकल्पामुळे मध्यप्रदेश छत्तिसगड येथील निर्मात्यांना डाक्युमेंटरी, लघुपट तयार करण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

ही चित्रनगरी नागपूर विमानतळ येथून अवघ्या 40 किलोमिटरवर आहे. याभागात रिसार्ट भरपूर आहेत. यासर्व बाबींचा लाभ निर्मात्यांना होईल, असेही त्यांनी सांगितले.

00000

दिल्‍लीचे संमेलन : मराठीची मुद्रा देशभरात उमटवणार

येत्‍या 21 ते 23 फेब्रुवारी रोजी नवी दिल्‍लीतील तालकटोरा मैदानावर 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन होवू घातले आहे. संमेलनाचे उद्धाटन पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते होणार असल्‍याने या संमेलनाला अनन्‍य साधारण महत्त्व प्राप्‍त झाले आहे. या निमित्त दिल्‍लीकर मराठी भाषकांमध्‍ये कमालीचा उत्‍साह दिसून येत आहे. दिल्‍लीतील साहित्‍य वर्तुळात आनंद तर वाढलेला आहेच शिवाय हे संमेलन अनेक वर्षानंतर देशाच्‍या राजधानीत होत असल्‍याने समस्‍त मराठी भाषक जनतेसाठी ही एक आनंदाची पर्वनी ठरणार आहे. गेल्‍या वर्षी 96 वे अखिल भारतीय मराठी संमेलन महात्‍मा गांधी आणि विनोबा यांच्‍या कर्मभूमित घेण्‍यात आले होते. या वर्षी हे संमेलन दिल्‍लीत होत असल्‍याने वर्धा ते दिल्‍ली असा संमेलनाचा प्रवास वर्धेकर जनतेसाठी आनंद द्विगुणीत करणारा आहे. वर्धा आणि दिल्‍लीचा तसा संबंध स्‍वातंत्र चळवळी पासून राहिलेला आहे.

या चळवळीच्‍या दरम्‍यान महात्‍मा गांधी वर्धेत वास्‍तव्‍यास आल्‍याने अधिक जवळचा ठरला आहे. या काळात वर्धा शहर स्‍वातंत्र चळवळीचे एक महत्‍वाचे केंद्र ठरले. गांधीजींनी शेगावचे नामकरण सेवाग्राम केले आणि सेवाग्राम हे भारताची अशासकीय (नॉन पॉलिटिकल) राजधानी म्‍हणून ओळखले जाऊ लागले.

थानावरतयायानिमित्ताने दिल्‍लीतील राजकीय पुढारी यांची उपस्थिती वर्धेकर जनतेसाठी ऐतिहासिक महत्‍व अंकित करणारी ठरली, सोबतच साहित्‍य विश्‍वातही वर्धेचा नावलौकिक वाढला. स्‍वातंत्र्य मिळाल्‍यानंतर 48वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन वर्धा येथे आयोजित करण्‍यात आले होते. त्‍यानंतर तब्‍बल 76 वर्षानंतर हे संमेलन आयोजित करण्‍यात आले. दरम्‍यानच्‍या काळात साहित्‍य क्षेत्रात अनेक महत्‍वाच्‍या घटना घडल्‍या. वर्धेतील सत्‍यनारायण बजाज वाचनालय, राष्‍ट्रभाषा प्रचार समिती, आर्वी येथील लोकमान्‍य टिळक वाचनालय आणि वर्धेचे गांधी ज्ञान मंदिर साहित्‍य विश्‍वात प्रेरणा केंद्र राहिली. या केंद्रातून झालेले मंथन कवी व लेखक घडवण्‍यात कारणीभूत ठरले. नवकवी व नवलेखकांनी मराठी साहित्‍यात नाव कमावले व त्‍याची चर्चा दिल्‍लीत मानाने करण्‍यात आली. आतापर्यंत वर्धेत झालेले हे दुसरे संमेलन होते, तसेच राजधानीत होणाने यावर्षीचे संमेलन देखील दुसरे आहे. हा एक योगायोगच म्‍हणावा.

राज्‍याची उपराजधानी नागपूर येथे पहिले विश्‍व हिंदी संमेलन 10 ते 14 जानेवारी 1975 रोजी आयोजित करण्‍यात आले होते. यासाठी मराठी भाषिक साहित्यिकांनीच पुढाकार घेतला होता. त्‍या‍तील एका ठरावातून वर्धा येथे महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विद्यापीठाची स्‍थापना झाली. एका अर्थाने संमेलनाचा किती प्रभाव असतो हेच यातून दिसते. वर्धा शहराची स्‍थापना तशी 1866 मध्‍ये झाली. ज्‍याचे नाव पालकवाडी असे होते व जिल्‍ह्याचे मुख्‍यालय पुलगाव जवळील कवठा या छोट्याशा गावात होते. त्‍यानंतर वरदायीनी वर्धा नदीच्‍या नावावर वर्धा असे नामकरण झाले.

वर्धा हे नाव ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक ऊर्जेचे शहर म्हणून ओळखले जाते. तसा उल्लेख अनेक ग्रंथांमध्ये व वर्धा जिल्हा गॅझेटियरमध्ये सापडतो. भाषिक दृष्टिकोनातूनही वर्धा जिल्हा एक समृद्ध जिल्हा राहिला आहे. हे शहर संस्कृत, प्राकृत, गोंडी, मराठी आणि हिंदी भाषेचे शहर म्‍हणून लौकिक प्राप्‍त झालेले आहे. इतिहासाच्या ओघात येथे भाषांचा विकास होत राहिला आणि काही भाषा कमी-अधिक संख्येने बोलल्या जाऊ लागल्या. वर्धा जिल्ह्यात भिली वा भिलोडी, इंग्रजी, गोंडी, गोरखाली वा नेपाळी, हलबी, खानदेशी, कोलामी, कोकणी, कोरकू व कोया अशा दहा भाषा बोलल्या जात होत्या, ज्यामध्ये मराठी प्रथम स्थानी तर हिंदी दुसऱ्या स्थानी राहिली आहे.

मराठी भाषेला आताच भारत सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेच्‍या प्राचीनत्‍वावर यामुळे मोहर उमटली आहे. मराठी भाषेचे चिरंतन साहित्‍य संत ज्ञानेश्‍वरापासून ते आजतागायत प्रवाहित होत आहे. चिरंतन साहित्‍याचे लक्षण संत ज्ञानेश्‍वरांनी सांगितले आहे. ‘वाचे बरवे कवित्‍व । कवित्वी बरवे रसिकत्‍व । रसिकत्‍वी परतत्‍व । स्‍पर्शु जैसा।। अर्थात भाषेमध्‍ये काव्‍य उत्तम. काव्‍याला रसामुळे बहर येतो आणि रसाला परतत्वाचा स्‍पर्श झाला म्‍हणजे मग त्‍याची गोडी काय वर्णावी. जीवनात क्रांती घडवून आणण्‍याची शक्ति फक्‍त आणि फक्‍त वाड्:मयात अशी महती आचार्य प्र. के. अत्रे यांनी वर्णीली आहे. समाज मनावर साहित्याचा परिणाम त्वरीत होत नाही. सतत सूक्ष्‍म संस्‍कार होत राहिल्‍याने समाजात बदल घडत असतो. साहित्‍य संमेलनातून असे बदल घडत असतात आणि हेच बदल देश आणि समाजात सकारात्‍मक परिणाम घडवत असतात. लेखन आणि वाचनातून माणसात जी प्रगल्‍भता येते ती निरंतर पुढच्‍या पिढीकडे प्रवाहित होत असते आणि त्‍याचा लाभ समाजाला होत असतो.

देशाच्‍या राजधानीत होणारे संमेलन अनेकार्थाने विशेष ठरणारे आहे. येथे अनेक लहान-मोठ्या संस्‍था मराठीची पताका फडकवित असतात. महाराष्‍ट्र सदन असो की बृहन्महाराष्‍ट्र मंडळ असो येथे साहित्यिक व सांस्‍कृतिक मेळावे, कार्यक्रम व शिबिरे सतत चालू असतात.  यातून दिल्‍लीकरांना मराठी भाषा, साहित्‍य व संस्‍कृ‍तीची मेजवाणीच मिळत असते. येथे मोठ्या संख्‍येने मराठी भाषा बोलणारे असल्‍याने त्‍यांना अशा कार्यक्रमांची सतत ओढ लागलेली असते. दिल्‍लीत मराठी, हिंदी व इतर भारतीय भाषा एक समूह म्‍हणून किंवा सवंगडी म्‍हणून वावरत असतात. येथे असणारे मराठी भाषी नागरिक नोकरी व व्‍यवसायासाठी आलेले असतात परंतु त्‍यांनाही साहित्‍याची भूक असते ती ते साहित्यिक व सांस्‍कृतिक कार्यक्रमांच्‍या आयोजनातून भागवत असतात.

दिल्‍लीतल्‍या प्रत्‍येक मराठी भाषकांसाठी हे संमेलन आपले वाटणारे यामुळेच ठरणार आहे व त्‍याचे पडसाद देशभरात उमटणार आहे. संमेलनाचा वर्धा ते दिल्‍ली हा एका वर्षाचा प्रवास साहित्‍याच्‍या क्षेत्रातील अनेक प्रकारांना मार्ग तर मोकळा करणारच आहे, तो अधिक प्रशस्‍तही करणारा ठरणार आहे.  हे संमेलन राराची ाचा प्रवास सन 1878 पासुन मराठी भाषा व साहित्‍याला एक नवी झळाळी तसेच नव्‍या वाटा देणारे ठरो हिच रास्‍त अपेक्षा. या संमेलनातून दिल्‍लीत मराठीची मुद्रा नक्‍कीच देशपातळीवर उमटणार हेही तितकेच खरे.

 

 

बी.एस. मिरगे

जनसंपर्क अधिकारी

महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालय, वर्धा

9960562305

रंगशारदा नाट्य मंदिरात ‘महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा’; रसिकांसाठी विनामूल्य प्रवेश

मुंबई, दि. १५ : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा २०२४-२५ ची अंतिम फेरी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. १७ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२५ या कालावधीत वांद्रे येथील रंगशारदा नाट्यगृहात ही स्पर्धा पार पडणार असून रसिकांना विनामूल्य प्रवेश असणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार आणि मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

या स्पर्धेत सादर होणारी ४५ नाटके रसिकांना विनामूल्य पाहता येतील. विनामुल्य प्रवेशिका श्री शिवाजी मंदीर, दादर येथे उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र राज्यातील २३ केंद्रांवर आणि गोवा अशा एकूण २४ केंद्रांवर राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील प्रथम व द्वितीय पारितोषिक प्राप्त दर्जेदार नाटकांची अंतिम फेरीत निवड करण्यात आलेली आहे. अंतिम फेरीतील सर्व नाटके प्रेक्षकांना विनामुल्य पाहता येणार आहेत.

६३ व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पहिले नाटक ‘पंचमवेद’ हे १७ फेब्रुवारीला सायंकाळी ७.०० वाजता रंगशारदा नाट्यगृह येथे सादर होणार आहे. यानंतर दररोज सकाळी ११.३० वा. आणि सायंकाळी ७.०० वाजता नाटकांचे प्रयोग सादर होतील. या राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये सुमारे १२०० पेक्षा अधिक हौशी कलाकार आपली कला सादर करणार आहेत.

राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीमधील स्पर्धक संघाचे मनोधैर्य वाढवण्याकरीता, त्यांना शुभेच्छा देण्याकरीता आणि विविध विषयांवरची विविध अंगी नाटके पाहण्याकरिता जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

000

संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

मुंबई दि. १५ : संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. सागर शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

000

केसरी टूर्सचे केसरीभाऊ पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. १५: पर्यटन क्षेत्रातील संधीची ओळख करून देणारा, महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारा उद्यमी म्हणून उद्यमशील केसरीभाऊ पाटील यांचे नाव सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केसरी टूर्सचे संस्थापक, अध्यक्ष केसरीभाऊ पाटील यांना निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली  आहे.

‘उद्योग-व्यवसायाच्या एखाद्या नव्या क्षेत्रात उतरून, त्यामध्ये नाव कमावून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची क्षमता केसरीभाऊ पाटील यांनी आपल्या अंगी असलेल्या व्यवस्थापन आणि उद्मोजकतेच्या कौशल्याच्या जोरावर सिद्ध केली. ‘केसरी टूर्स’ च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या उद्यमशीलतेची ओळख जगभर पोहोचवली. या क्षेत्रातील रोजगार आणि व्यवसाय, व्यवस्थापन संधीची माहिती आणि अनेकांना या क्षेत्रात येण्याची प्रेरणा देण्यात ते मार्गदर्शकाची भूमिका बजावत असत. त्यांच्या निधनामुळे एका धडाडीच्या, उद्यमशील अशा व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. केसरीभाऊ यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या कुटुंबियांच्या केसरी समूहाशी निगडित सहृदयींच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

 

000

अभिजात मराठी भाषेची साहित्य चळवळ पुढे नेताना…

२१ ते २३ फेब्रुवारी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विशेष लेख..

भारताच्या संस्कृतीवर रामायण, महाभारताचा मोठा पगडा आहे. ज्या काळात एखाद्या गावात किंवा एखाद्या पंचक्रोशीत क्वचित एखादा लिहिणारा वाचणारा असे त्या काळातही  महाभारतातील, रामायणातील किंवा पुराणातील  कथा घराघरातील आजी आजोबा न चुकता रंगवून आपल्या नातवंडाना सांगत असत. हे सगळं ज्ञान त्यांना कुठून मिळत असे ?

स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत तरी भारतातील बहुतांश खेडी इतर दुनियेपासून दूर होती. बैलगाडी शिवाय इतर वाहन नसल्यामुळे पावसावर अवलंबून असलेल्या शेतीचे काम संपल्यानंतर पुढील पाच सहा महिने त्याच शेतातून बैलगाडीचा रस्ता जायचा. त्याशिवाय पायवाटा हा एकमेव मार्ग दुसऱ्या गावांना जोडण्यासाठी उपलब्ध होता. तरीही प्रत्येक गाव स्वयंपूर्ण होते, आनंदी होते. अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार हे त्यांना नेमून दिलेले कामे करत असल्यामुळे, प्रत्येकाचं महत्त्व प्रत्येकाला माहित असल्यामुळे गावाचं लोक जीवन हे सुरळीत चालत होतं. प्रत्येक जाती जमाती त्यांच्या त्यांच्या सांस्कृतिक कलांचा आस्वाद घेत होते. मात्र ते सगळे एकाच धाग्यात गुंफल्यासारखे होते. तो धागा होता भारतीय संस्कृतीचा. कोकणभाग सुद्धा यापेक्षा वेगळा नव्हता. कोकणात भजन कीर्तन गाणारे होते, गोंधळ घालणारे होते, कुंभार क्रिया करताना  डाक लावणारे होते, नमन जाखडी सारख्या मनोरंजनाच्या कला येथे होत्या. नाटकाचे खेळ इथे चालत होते. नवरात्रीत घरोघरी फिरून अंबाबाई ची आरती बोलणारे सरावदी होते. गोसावी होते. इतर व्यवसाय करणाऱ्या लोहार, सुतार, कुंभार यांच्यापेक्षा वरील मनोरंजन करणाऱ्या आणि ज्ञानात भर घालणाऱ्या कलांना ग्रामीण जीवनात आनंद देणाऱ्या कला म्हणून पाहिले जात होते. खरे तर हेच भारतीय संस्कृतीचे प्रसारक होते.

शेती हाच कोकणातील खेड्यांचा मुख्य व्यवसाय असल्याने दिवसभर काबाड कष्ट करणाऱ्या त्या कष्टकरी जनतेला विरंगुळा देण्याचं काम याच कलांनी केले. करमणुकीचे अन्य साधन नसल्यामुळे एखाद्या घरच्या गोंधळाला सुद्धा अंगणात मावणार नाहीत एवढी माणसांची गर्दी होत असे. धार्मिक भावनेमुळे उपस्थिती अनिवार्य असली तरी पेंगुळलेल्या डोळ्यांवर पाणी मारून रात्रभर जागून एखाद्या कलेचा आस्वाद घेण्याचा आनंद म्हणजे मनोरंजनाची भूक भागवण्याचा प्रकार असे. याचा परिणाम काय होई.?

रात्री ऐकलेल्या कीर्तनात निरूपणासाठी घेतलेला बुवांचा अभंग दुसऱ्या दिवशी शेताच्या बांधावर काम करत असताना आपसूक मुखातून बाहेर पडत असे. आपल्याला काही आठवत नसेल तर सोबत काम करणाऱ्या माणसाकडून ते जाणून घेतलं जायचं. मग तो कधी एकांतात किंवा सार्वजनिक ठिकाणी सहज बोलला जायचा आणि तो पक्का मनात बसून जायचा. गोंधळ आणि सांगितलेली चिलिया बाळाची कथा किंवा सत्यवान सावित्रीची कथा आई झोपणाऱ्या बाळाला थोपटत थोपटवत ऐकवायची. राम कसा आज्ञाधारक होता हे सांगताना उभ रामायण आपल्या मुलांच्या समोर जिवंत करण्याचं कसब त्यावेळच्या मातांना चांगले जमत असे.

आज कोकणात शिमग्याला किंवा गणपती उत्सवाला चाकरमान्यांची गर्दी होत असते ती केवळ परंपरा राखण्यासाठी असते. मात्र एकेकाळी हे सगळे सण इथल्या ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग होते. अजीर्ण झालं तरी देवाचा प्रसाद हा नाकारायचा नसतो तोच प्रकार शहरात राहून मनोरंजनाचा अजीर्ण होईपर्यंत आस्वाद घेतल्यानंतर वाड वडिलांची परंपरा पुढे चालवण्याच्या भावनेतून ही चाकरमानी मंडळी गावाकडे येत असतात. त्यात कलेचा आस्वाद घेण्याचा मुख्य गाभा आम्ही कधीचा विसरून गेलो आहोत.

स्वातंत्र्यपूर्व काळात खऱ्या अर्थाने कोकणातील प्रत्येक गाव मुखोद्गत साहित्याचा ठेवा पुढच्या पिढीला देत असताना दिसत असे. घरातल्या प्रत्येक दैनंदिन कामाबरोबर इथल्या माणसाच्या मुखात ओव्या असत, गाणी असत, उखाणे असत, म्हणी असत, भजन असे किंवा श्लोक असे. घरातली बाई पहाटेच्या वेळी दळण करण्यासाठी जात्यावरती बसायची तेव्हा ओव्या गाऊन ती स्वतःची करमणूक करायची. विहिरीवरच्या राहाटावर बसून मोग्यातून पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर याचेही गाणे असायचे त्यामुळे रहाट दाबताना पायात येणारे गोळे तो विसरून जायचा. शेतावरती चार माणसं जमून काम करत असताना, एकमेकांची थट्टा करताना गाण्यांच्याही मैफिली चालायच्या तर कधी एकमेकाला उखाणे देऊन उत्तरे जाणून घ्यायचा प्रयत्न होत असे. ‘उडत कोंबडा बुडत जाय सोळा शिंगे बत्तीस पाय ‘ किंवा ‘ घाटावरून आल्या बाया त्यांच्या लाल लाल डोया.’ असले उखाणे सोबत असलेल्या मुलांना डोकं खाजवायला भाग पाडायचे. याच स्त्रिया श्रावण महिन्यात रात्रीच्या वेळेला फुगड्या घालण्यासाठी एकत्र यायच्या वेगवेगळ्या तऱ्हेची गाणी म्हणता म्हणता  फुगड्यांचे वेगवेगळे प्रकार नाचता नाचता अंगातून घाम जायचा पण मिळालेल्या क्षणांचा आनंद लुटताना देहभान विसरून जात.

त्या काळातील लग्न म्हणजे एक बिन वाद्यांचा  तीन-चार दिवस चालणारा आर्केस्ट्राच होता. भात भरडताना ची गाणी वेगळी, हळदीची गाणी वेगळी रुखवताची गाणी वेगळी, घाणा भरतानाची गाणी वेगळी. नवरा नवरीची गाठ सोडताना बांधताना नाव घेण्याची तऱ्हा तर आणखी वेगळीच होती. लग्न मंडपातील जेवणावळीत पंगतीच्या श्लोकांची तर जुगलबंदी व्हायची. यात गंमत अशी होती की बोलणाऱ्यात वयोवृद्ध माणसांपासून तरुणांपासून सात आठ वर्षाची मुले सुद्धा त्यात भाग घेत असत याचा अर्थ केवळ पाठांतरावरती हे श्लोक पुढे पुढे चालत असत. शिमग्यात पालखीच्या सोबत गोमूचा नाद चालायचा त्यामध्ये एखाद्या युवकाला स्त्रीचा वेश देव ढोलकी आणि मंजिरीच्या तालावर नाच गाणे व्हायचे. त्यामध्ये गायली जाणारी गाणी स्थानिक लोक तिथल्या प्रसंगावर आधारित बनवायचे. ‘तुकाराम बोट बुडाली हरचेरी बंदरात’ ‘गोमू चालली बाजारा नाखवा घाली येरझारा’ आशा धापनेची ती गाणी असत. होळीच्या दिवशी दिलेल्या फाका या काहीशा शिवराळ असल्यातरी त्यातील यमक योग्य तऱ्हेने जुळवल्याने त्या अधिक आकर्षक ठरायच्या.

पुढे शाळा झाल्या. मुले शाळेत जाऊन शिकू लागली. शाळेतल्या शिक्षकांवरती सर्वांनी विश्वास टाकला. शिक्षणाचे तेच एकमेव साधन आहे याच्यावर शिक्कामोर्तब केले त्यामुळे लोक जीवनातून मिळणाऱ्या ज्ञानापासून शिकलेली पिढी दूर जाऊ लागली. गावातल्या बोलीला दुय्यम स्थान मिळाले आणि पुस्तकातल्याच भाषेवरती सर्वांनी अवलंबून राहण्याचे ठरवले. गावातली भाषा बोलणाऱ्याला गावंढळ म्हणून हेटाळणी होऊ लागली. प्रत्येक जण प्रमाणीत भाषेवरती जोर देऊ लागला आणि स्थानिक बोलीभाषेतून मिळणाऱ्या ज्ञानसंपदेपासून आपण दूर गेलो. काळ पुढे सरकत गेला. सगळ्याच बाबतीत आपण पुढारलेले आहोत हे दाखवण्याची अहंमिका सुरू झाली. घरात नळाचे पाणी आले आणि विहिरीवरती स्त्रीयांचे एकत्र येणे कमी झाले त्यामुळे तिथला संवाद तुटला तिथली गाणी बंद झाली.  भाताला पर्याय असलेले हरिक धान्य आज काळाच्या पडद्याआड गेले आहे त्या शेताची भांगलण करण्यासाठी  उभ्या गावाला बोलावलं जायचं. तिथे खेळ व्हायचे, वाद्य वाजायची, गाणी व्हायची त्या खेळाला सापड म्हटले जायचे. गोठ्यातली गुरे नाहीशी झाली आणि रानातला गुराखी दिसेनासा झाला. त्यामुळे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी गुराख्यांचे बासरीचे मंजूळ सुर ऐकू येईनासे झाले.

आज भले आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. भले यात पुढे अधिक साहित्य संपदा निर्माण होईल. प्रमाणित भाषेचा व्याप वाढेल, प्रसार वाढेल. पण ज्या काळात गाव गावातल्या मातीवर प्रेम करत होता, शेतीत राबत होता, वेगवेगळे व्यवसाय करीत होता त्यावेळी ची बोलीभाषा, त्या बोली भाषेतील शब्दसंपदा, त्या त्या बोली भाषेतील मौखिक साहित्य आज पडद्याआड गेले आहे. जर अभिजात मराठी भाषेला अधिक श्रीमंत करायचे असेल तर आता तग धरून असलेल्या गावांकडे साहित्यप्रेमीनी, लेखकांनी, कवींनी आपले पाय वळवायला हवेत. तिथल्या शेतांना, तिथल्या पाय वाटांना, तिथल्या निर्झराना, तिथल्या झाडांना, तिथल्या विहिरींना, तिथल्या नद्यांना बोलतं करायला हवंय. त्यांच्या तिथल्या बोलीभाषेचा गौरव करायला हवा आहे. खरं तर लोकभाषा अर्थात बोली भाषा याच कोणत्याही भाषेच्या मानदंड असतात. त्या जोपासल्या तरच भाषा फुलते, बहरते. गत दहा वर्षे मुंबईसारख्या महानगरातून’ राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई’ या संस्थेच्या माध्यमातून  कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यात लांजा राजापूर या दोन तालुक्यात ग्रामीण मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन केले जाते. या संमेलनातून कोकणातील ग्रामीण बोलीभाषेला जोपासण्याचे कार्य चालले आहे. कोकणच्या ग्रामीण भागातील बोलीभाषेत सकस लिहिणाऱ्या कवि – लेखकांनाही यातून व्यासपीठ मिळते आहे. ही सर्व साहित्य चळवळ लोकवर्गणीतून उभी राहिली आहे.

सुभाष लाड

अध्यक्ष, राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई
९८६९१०५७३४

संत सेवालाल महाराज जयंती निमित्त मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे अभिवादन

मुंबई दि.15:  संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्री कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता, तथा मुंबई उपनगरचे  सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मंत्रालयात आयोजित कार्यक्रमास सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे,  यांच्यासह राजेंद्र बच्छाव,  मेघा गवळी तसेच मंत्रालयीन विविध विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गुलाबपुष्प अर्पण करून संत सेवालाल महाराजांना अभिवादन केले.

000

युपीएससी उत्तीर्णतेच्या प्रमाण वाढीसाठी गुणात्मक उपाययोजना सुचवा – जे. पी. डांगे

अमरावती, दि. १४: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या परिक्षांमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण वाढावे, यासाठी संबंधीत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षक आदींनी स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेऊन सदर परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच राज्य शासनाद्वारे चालविण्यात येणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रांना गुणात्मक उपाययोजना सुचवाव्यात, असे आवाहन माजी मुख्य सचिव तथा सुधारणा समितीचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांनी गुरुवारी केले.

राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये सुधारणा करण्यासाठी येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, अमरावती प्री आएएस ट्रेनिंग सेंटरच्या संचालिका डॉ. संगिता यावले, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे तसेच विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक आदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

माजी मुख्य सचिव डांगे म्हणाले की, राज्यात राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद व कोल्हापूर असे सहा भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांना या केंद्राच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उर्त्तीण होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. या केंद्रात विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेऊन मेरीटनुसार प्रवेश दिला जातो. या केंद्रात युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवास, भोजन, विद्यावेतन यासह परीक्षेच्या अभ्यासक्रमाशी निगडीत पुस्तके, ग्रंथालय, इंटरनेट सेवा आदी सुविधा पुरविण्यात येते. यासंदर्भात ग्रामीण व शहरी भागातील होतकरु विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करण्यात यावी.

भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रांमध्ये गुणात्मक उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय सुधारणा समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडून अध्यापन, शिक्षण व मुल्यांकन पद्धती, भौतिक सुविधा संसाधने व तांत्रिक सुविधा, ग्रंथालय सुविधा, प्रशिक्षणाचा कालावधी, ताणतणाव व्यवस्थापन, विद्यावेतन, मार्गदर्शकांना देण्यात येणारे मानधन, सर्व केंद्रामध्ये डिजीटल कनेक्टीविटी, निवासी वसतीगृह व तेथील सुविधा, संगणक प्रयोगशाळा सुविधा, प्रवेश प्रक्रिया व वसतीगृह प्रवेश नियमावली, नवी दिल्ली येथे मुलाखतीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुलाखत पूर्व प्रशिक्षण आदी संदर्भात गुणात्मक उपाययोजना सुचविण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तांनी दिली. विभागातील भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा उत्तीर्ण अधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील युपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षांबाबत विशेष उपक्रम राबवून मार्गदर्शन करावे, असे आवाहन श्रीमती सिंघल यांनी यावेळी केले.

०००

 

ठाणे महापालिकेचा घनकचरा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी ठरेल – मंत्री प्रताप सरनाईक

ठाणे दि. १४: मौजे भाईंदरपाडा (गायमुख) येथील ठाणे महापालिकेच्या जागेवर विकसित होत असलेल्या एरोबिक्स स्वयंचलित बायो कंपोस्टींग मशीनद्वारे ओल्या कचऱ्यापासून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कंपोस्ट खतनिर्मिती प्रकल्प राज्यात पथदर्शी ठरेल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ठाणे महापालिका हद्दीतील विकास कामांच्या पाहाणी दौऱ्याच्या प्रसंगी ते बोलत होते.यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मौजे भाईंदरपाडा येथे ठाणे महापालिकेची सुमारे 4190 चौ.मी. क्षेत्र घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. सध्या या जागेतील 1/3 जागेवर 90-100 टनांपर्यंत प्राप्त झालेल्या ओल्या कचऱ्यापासून पासून एरोबिक्स स्वयंचलित बायो कंपोस्टींग मशीनद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कंपोस्ट खतांची निर्मिती प्रकल्प सुरू आहे. उर्वरित जागेवर हा प्रकल्प विस्तारित करण्यात येणार असून सुमारे 300 टनांपर्यंतचा घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेने लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले.

Lahs Green India Pvt Ltd. SOLARISED CONTROL WINDROW COMPOSTING (IIT PAWAI, MUMBAI PATENTED) technology द्वारे अशा प्रकारे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प राबविणारी ठाणे महापालिका देशातील पहिलीच महापालिका ठरणार आहे. या जोडीला Enviro Invent System Pvt. Ltd या कंपनीने बनविलेले Treatment Of The Waste On The Go (TOWGO vehicle) वाहनाद्वारे जागेवर एकावेळी सुमारे 2 टन ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करण्यात येते, अशी लवकर अजून 20 वाहने उपलब्ध होत आहेत.

या पाहणी दौऱ्यात मंत्री सरनाईक यांनी स्वराज्याचे पहिले आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांचे यथोचित स्मारक विकसित होत असलेल्या नांगला बंदराची देखील पहाणी केली. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, “प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या प्रत्येक आगरी-कोळी कुटुंबांचे सन्मानपूर्वक पुनर्वसन करण्यात यावे!” असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी महापालिका क्षेत्रातील विकास कामांला अडथळा ठरणाऱ्या अन्य जागेवरील अतिक्रमण निर्मूलन तातडीने करुन घ्यावे अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

०००

ताज्या बातम्या

कामठीतून जाणाऱ्या जबलपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण होणार

0
▪️कामठीत साकारणार भव्य व्यापारी संकुल नागपूर, दि. १२ : कामठी शहरातून नागपूर-जबलपूर हा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने कामठी शहरात होणाऱ्या वाहतूकीच्या कोंडीवर मात काढण्यासाठी आज...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव येथील क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे भूमिपूजन

0
बारामती, दि.१२: माळेगाव येथील तालुका क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक...

कराड – चिपळूण महामार्गाचे पाटण तालुक्यातील काम १५ डिसेंबर आधी पूर्ण करा -पालकमंत्री शंभूराज...

0
सातारा दि. १२ : पाटण तालुक्यातील कराड - चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम पाऊस कमी झाल्यानंतर 15 डिसेंबरच्या आधी पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री...

मिरगाव येथील भूस्खलन बाधितांना पक्की घरे मिळण्यासाठी डिसेंबरअखेर काम पूर्ण करा -पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा, दि. १२ :  मिरगाव येथील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या बाधित कुटुंबांना पक्की घरे ताब्यात मिळण्यासाठी येत्या डिसेंबर अखेर काम पूर्ण करावे, अशा सूचना पर्यटन,...

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्त्तेचा होणार चपलख वापर-  मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
नागपूर वन विभाग पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळील गावात ३ हजार १५० कॅमेरे व सायरन करणार वाघांची निगराणी गावात वाघ शिरताच वाजणार वस्त्यांमध्ये...