रविवार, जुलै 13, 2025
Home Blog Page 330

आदिवासी विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – मंत्री प्रा.डॉ. अशोक उईके

  • १०० दिवसांच्या कृती आराखडा अंमलबजावणीच्या सूचना
  • आदिवासी विद्यार्थ्यांना सर्व सोयी-सुविधा पुरविण्यावर भर

नांदेड दि. १५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला १०० दिवसांचा कृती आराखडा सादर करण्यास सांगितले असून त्यानुसार तळागाळातील वंचित घटकाचा विकास साध्य करण्याचे उदिष्ट ठेवले आहे. या कृती आराखड्याच्या माध्यमातून गरीबांच्या कल्याणासह आदिवासी विकासाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी केले.

किनवट येथे उपविभागीय कार्यालयात त्यांनी प्रकल्प स्तरावरील आरोग्य, शिक्षण, पाणी, आदी योजनांच्या खर्चाचा आढावा घेतला व लाभार्थ्यांच्या संवादानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी आमदार भिमराव केराम, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, प्रकल्प संचालक तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली व संबंधित विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होती.

शासनाने शेवटची व्यक्ती, कुटूंब केंद्रबिंदू मानला आहे. शासनाच्या कल्याणकारी योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचाव्यात, हाच उद्देश ठेवून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्यात पेसातंर्गत १३ जिल्हे व ५९ तालुके आहेत. शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून ७ जानेवारी रोजी राज्यातील ४९७ आश्रमशाळेत मंत्री, राज्याच्या सचिवांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुक्काम करून तेथील सर्व सोयी – सुविधांची पाहाणी केली आहे. पेसातंर्गत नोकरी भरतीत अनिमियतता, आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रवेश, विद्यार्थ्यांचा डीबीटी, आहाराचा प्रश्न यापुढे निर्माण होणार नाही. तसेच भविष्यात एकही आदिवासी विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असा आराखडा तयार करण्यात आला आहे ,अशी  माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या अध्ययन, अध्यापनातील समस्यांच्या सोडवण्यासोबतच कृती आराखड्याच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार दिला जाईल. नांदेड जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या महिला, पुरुषांवर अन्याय, अत्याचार करण्याचा प्रयत्न आदीवासी समाज कदापि सहन करणार नाही, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला आमदार भीमराव केराम, हदगावचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर उपस्थित होते. प्रकल्प स्तरावरील आरोग्य, शिक्षण, पाणी आदी योजनांच्या खर्चाचा आढावा मंत्र्यांसमोर सादर केल्याची माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी मेघना कावली यांनी दिली.

तत्पूर्वी, त्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत प्रकल्प अधिकारी मेघना कावली यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हयात आदिवासी उपाय योजनेतील सर्व योजनांची १०० टक्के अंमलबजावणी करावी, अशी सूचना त्यांनी केली. पेसा कायदा, वसतीगृह आणि विद्यार्थ्यांच्या सुविधा आदी बाबतही चर्चा झाली.

०००

 

विकासामध्ये आर्थिक संस्थांचा मोलाचा वाटा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चंद्रपूर, दि. १६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे. जेथे आर्थिक संस्था उभ्या राहतात, तेथे विकास भरभरून होतो. पंतप्रधान मोदी यांनी भारतातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग क्षेत्रासोबत जोडले आहे. आज भारतातील प्रत्येक नागरिकाचे बँक खाते आहे. त्यामुळे एक डीजीटल ओळख निर्माण झाली आहे. त्याचा फायदा थेट नागरिकांना मिळत असून देशाच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या विकासामध्ये आर्थिक संस्थांचा मोलाचा वाटा असतो, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त प्रियदर्शनी इंदिरा सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी मंचावर आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके, आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, कीर्तिकुमार भांगडीया, करण देवतळे, देवराव भोंगळे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, माजी मंत्री व बँकेच्या संचालक शोभा फडणवीस, अध्यक्षा डॉ. रजनी हजारे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल आदी उपस्थित होते.

सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेने 25 वर्ष यशस्वीपणे पूर्ण केले, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सहकार क्षेत्रात विदर्भातील एक अग्रगण्य बँक म्हणून सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेची ओळख आहे. महिलांना अर्थकारण उत्कृष्टपणे समजते. बचत करणे हा महिलांचा मूळ गुणधर्म आहे. त्यामुळे महिलांच्या हाती बँक असेल तर ती उत्कृष्टच चालेल, यात शंका नाही. रिझर्व बँकेच्या कायद्याचे पालन करीत तसेच एनपीए मानकाला छेद न देता बँक चालविणे अतिशय महत्त्वाचे आहे.

सहकारी बँकेवर नागरिकांचा विश्वास असतो. या बँकेबद्दल सामान्य माणसाला आपुलकी असते. बँकेने सुद्धा दिलेले कर्ज शिस्तीमध्ये परत घेतले पाहिजे. आज 300 कोटींची उलाढाल असलेल्या सन्मित्र बँकेचा एनपीए 0.5 टक्क्यांच्या खाली आहे, ही अतिशय उत्कृष्ट कामगिरी असून यासाठी सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांनी अतिशय चांगली प्रगती केली आहे. व्यावसायिक बँकांसमोर सहकारी बँकेने आव्हान उभे केले आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात सहकारी बँका टिकतील का, असा प्रश्न उपस्थित होत असताना सन्मित्र सारख्या बँकांनी हे आव्हान चांगल्या पद्धतीने स्वीकारून यशस्वीपणे वाटचाल केली आहे. आज या बँकेने कोर बँकिंग, डिजिटल बँकिंग पद्धती स्वीकारली आहे. सन्मित्र बँकेने ग्राहकांच्या सुरक्षेचे विषय हाती घेतले आहेत. बँकांकडून नागरिकांना कर्ज दिली जातात. त्यामुळे नागरिक स्वतःच्या पायावर उभे राहून व्यवसाय करीत आहे. सन्मित्र बँकेने सुद्धा नागरिकांना कर्ज उपलब्ध करून दिले आहेत. त्यातून त्यांनी रोजगार उभा केला. त्यामुळे अर्थव्यवस्थेची चक्र चालण्यास मदत झाली. या बँकेने पुढील वाटचाल अधिक जोमाने करावी.

संयुक्त राष्ट्र संघटनेने 2025 हे वर्ष सहकार वर्ष म्हणून जाहीर केले आहे. याच वर्षी सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेचा रौप्य महोत्सव होत आहे, ही आनंदाची बाब आहे. भविष्यात आणखी दमदार पाऊल टाकून 500 कोटी, 750 कोटी आणि 1000 कोटीचा टप्पा बँकेने पार करावा. तसेच इतर सहकारी बँकांसाठी सन्मित्र बँक एक रोल मॉडेल म्हणून उभी राहावी, अशी अपेक्षा  मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेचा विस्तार सहा-सात जिल्ह्यात झाला असून महिलांना आर्थिक सक्षम करणे, हेच या बँकेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून बँकेला नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रास्ताविकात संचालक शोभा फडणवीस म्हणाल्या की, सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेच्या रौप्य महोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहिले, याचा मनापासून आनंद आहे. बँकेची वाटचाल यशस्वीपणे होत असून पुढे जाण्याचा ध्यास आम्ही घेतला आहे. आज सन्मित्र बँकेच्या सर्व शाखांमध्ये एटीएम, डीजीटल बँकींग आदी सोयीसुविधा आहेत. विशेष म्हणजे आमच्या बँकेचा एनपीए कमी आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी बँकेच्या अध्यक्षा डॉ. रजनी हजारे यांनीही मनोगत व्यक्त केले.

तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘लक्षलक्षिता’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला कर्मवीर मा.सां. कन्नमवार यांचे नाव दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन कीर्ति चांदे यांनी तर आभार माधवी तांबेकर यांनी मानले.

०००

कुंभमेळ्याच्या माध्यमातून समाजाच्या एकतेचा योग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. १६ – प्रयागराज येथे सनातन संस्कृतीचे भव्य दर्शन घडविणारा कुंभमेळा सुरू आहे. आस्थेचा असा भव्य संगम जगात कुठेही पाहायला मिळणार नाही. मानवी संस्कृती आणि सभ्यतेमध्ये हजारो वर्षापासून हा संगम आपल्याला कुंभमेळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळतो. भाविक जात, भाषा, पंथ विसरून कुंभमेळ्यात एकत्रित येतात. हा समाजाच्या एकतेचा योग असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शहरातील रेशीमबाग मैदानात आयोजित  ‘महाकुंभ प्रयाग योग’ कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उपस्थित होते, यावेळी ते बोलत होते. द सत्संग फाउंडेशन नागपूर केंद्राचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे, राजेश लोया, अमेय मेटे आदी यावेळी उपस्थित होते. 50 कोटींपेक्षा जास्त भाविकांनी आतापर्यंत कुंभमेळ्यात स्नान केले. ज्या भाविकांना कुंभमेळ्यात जाण्याचा योग आला नाही त्यांच्यासाठी प्रयागराज येथील संगमावरील जल नागपुरात आणण्यात आले. यासाठी महाकुंभ प्रयाग योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

आजवर कोट्यवधी भाविकांनी महाकुंभादरम्यान प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले आहे. पण ज्यांना तेथे जाणे शक्य नाही अशांनाही या पवित्र संगम जलाच्या स्नानाची अनुभूती व्हावी, या अनुषंगाने प्रयागराज येथील जल रामटेकमार्गे नागपुरात आणण्यात आले होते. या अनुषंगाने  महाकुंभ प्रयाग योग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

०००

१९८५ सालचे नांदेडचे आठवणीतले अ. भा. मराठी साहित्य संमेलन

नांदेड येथे १९८५ साली ५९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. याचे अध्यक्ष विख्यात कथालेखक शंकर पाटील होते. नांदेड येथील स्टेडियम परिसरात तीन दिवस चाललेल्या संमेलनाच्या आयोजनाची धुरा पद्मश्री श्यामराव कदम यांच्या कडे होती. केंद्रीय मंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांचा या संमेलनाच्या आयोजनात मोठा वाटा होता. नांदेडचे हे साहित्य संमेलन अविस्मरणीय ठरले….

उत्तम गुणवत्तेचे कार्यक्रम आणि खास मराठवाडी पद्धतीचे आदारातिथ्य व जेवण. यशवंत महाविद्यालयाच्या प्रशस्त प्रांगणात भोजन व्यवस्था केली होती. साहित्य संमेलनासाठी पुणे – मुंबईहून आलेल्या साहित्यिक पाहुण्यांनी खास नंदिग्रामी व्यंजनांची तोंड भरून तारीफ केली होती. दही, ठेसा आणि वऱ्‍हाडी ज्वारीची भाकरी रूचीपालट करून गेली.

मला आठवते मी संयोजन समितीत होतो. तेव्हा दूरदर्शन सर्वदूर पोचले नव्हते. नांदेडवरून मुंबईसाठी विमानसेवा नव्हती. नांदेड ते मुंबई हा साधारणतः बारा-चौदा तासांचा रेल्वे प्रवास. त्यामुळे मुंबईला ध्वनी चित्रफीत पोचावायची कशी? हा प्रश्न आयोजकांसमोर पडला. स.दि.महाजन हे संयोजन प्रमुख होते. ते मोठे कल्पक. संमेलनाच्या उद्घाटनाची बातमी दूरदर्शनवर आली पाहिजे म्हणून आदल्य दिवशीच उद्घाटनाचा श्रोत्यांविना डमी सोहळा पार पडला. त्याची शुटिंग घेऊन मुंबईला पाठविण्यात आली. अर्थातच दुसऱ्या दिवशी बातमी योग्य प्रकारे सोबतीला पोहोचविण्यात आली. मात्र, व्हिज्युअलसाठी अशा पद्धतीची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. या मागचा उद्देश हा सर्वांना उद्घाटनाची बातमी कळावी हा होता.

हा सोहळा संपल्यानंतर कथाकार शंकर पाटील गमतीने म्हणाले. यावर छान विनोदी कथा लिहिता येईल. तेव्हा खूप हशा पिकला. बातमीसाठीची धडपड आणि साहित्य संमेलनाच्या बातमीचे महत्त्व कायम मनावर अधोरेखित राहिले संमेलन आठवले की ही घटना मात्र आठवतेच आठवते.

नांदेडचे हे साहित्य संमेलन आठवणीत राहण्याची तशी अनेक कारणे आहेत. राजा गोसावी हे अंध कवी या संमेलनातून रसिक श्रोत्यांसमोर आले. राजा मुकुंद यांच्या ‘पोरी जरा जपून ‘ या कवितेला रसिकांनी जोरदार दाद दिली.

राम नगरकर यांच्या ‘रामनगरी’ने हसवता हसवता श्रोत्यांना अंतर्मुख केले. आकाशवाणीला मुलाखत देण्यासाठी त्यांना जे अनुभव आले. ते ऐकताना सतत हास्याचे फवारे उडत होते.

संमेलनाचे अध्यक्ष कथालेखक शंकर पाटील हे तीनही दिवस साहित्य संमेलनात अत्यंत साधेपणाने वावरले. पद्मश्री शामराव कदम यांच्या लिंबगाव येथील शेतात आम्ही गेलो होतो तेव्हा शेती, सहकार, शिक्षण अशा अनेक विषयांवर चर्चा झाली. निजामी राजवटीत मराठवाड्यातील जनतेवर झालेल्या अनन्वित अत्याचाराच्या हकिकती ऐकून शंकर पाटील व्यथित झाले. हा किस्सा कवी ना. धों. महानोर यांनी सांगितला.

कथाकथनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माझ्याकडे होते. द. मा. मिरासदार आणि शंकर पाटील यांच्या कथांना रसिक श्रोत्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मराठवाडी बोलीतून सादर केलेल्या रा. रं. बोराडे यांच्या ‘म्हैस’ या कथेने तर श्रोत्यांची हसून हसून मुरकुंडी वळवली. या संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘खानदेशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा’ हा खानदेशची कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांवरील कार्यक्रम खूप भाव खाऊन गेला. परभणीचे आशा जोंधळे आणि अशोक जोंधळे यांच्या गळ्यातून उतरलेली बहिणाबाईंची गाणी श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहचली. त्यांना बेहद्द आवडली. दत्ता चौगुले यांच्या बासरीने ही गाणी अमीट केली. फ. मुं. शिंदे यांच्या मार्मिक आणि गंभीर निवेदनाने हा कार्यक्रम उंचीवर गेला. या संमेलनानंतर महाराष्ट्रभर या कार्यक्रमाचे प्रयोग झाले.

या साहित्य संमेलनानिमित्त ‘नांदण’ नावाची अत्यंत देखणी स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. नांदेडच्या सांस्कृतिक, साहित्यिक वैभावाची नोंद घेणारे लेख या अंकात असून भालचंद्र कहाळेकर, नरहर कुरुंदकर, नागनाथ कोत्तापल्ले अशा नांदेड जिल्ह्यातील लेखक, कवींवर स्वतंत्र टिपणे आहेत. नांदेडचा सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा समजावून घेण्याच्या दृष्टीने ही स्मरणिका महत्त्वाची ठरेल.

नांदेड येथे झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उत्तम व्यवस्था, काटेकोर नियोजन आणि कसल्याही प्रकारच्या वादविवादाविना पार पडले. या संमेलनात एकच उणीव जाणवत होती. ती म्हणजे विख्यात विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या आकस्मिक निधनाच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन पार पडत होते. कुरूंदकर गुरूजी हयात असते तर या संमेलनाची उंची आकाशाला गवसणी घालणारी ठरली असती.

०००

  • प्रा.डॉ.जगदीश कदम, ज्येष्ठ साहित्यिक, नांदेड, भ्रमणध्वनी ९४२२८७१४३२

 

लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी – एक अभिमानास्पद वारसा

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती एक संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचे प्रतीक आहे. “लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी” हे वाक्य उच्चारताना हृदय अभिमानाने भरून येते, कारण ही भाषा संत, साहित्यिक, योद्धे आणि समाजसुधारकांनी समृद्ध केलेली आहे.

महाराष्ट्राच्या साहित्यपरंपरेचा अभिमान :

“बोलतो मी मराठी!” हे केवळ वाक्य नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा गर्जनाट्य उद्घोष आहे. ही भाषा केवळ संवादाचे साधन नाही, तर संतांचा अभंग, शाहिरांचा पोवाडा, कीर्तनाची गोडी, बखरींचा इतिहास, नाटकाची रंगत आणि साहित्याचा अमूल्य ठेवा या साऱ्यांचे संचित आहे. मराठी भाषेचा हा प्रवास हजारो वर्षांचा आहे, आणि आजही ती तितक्याच जोमाने पुढे चालत आहे.

मराठी भाषेचा प्राचीन वारसा:

मराठी भाषा ९व्या-१०व्या शतकापासून लेखी स्वरूपात आढळते. शिलालेख, ताम्रपट, आणि संतसाहित्य हे याचे जिवंत पुरावे आहेत. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांनी भाषेला भावनिक आणि तात्त्विक खोलवर रुजवले, तर शाहिरांनी तिला जोश आणि चैतन्य दिले. शिलाहार आणि यादव काळातील शिलालेख: यामध्ये मराठीचा लिखित वापर दिसतो.

संत साहित्य

ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, अमृतानुभव यांसारख्या ग्रंथांनी भाषा लोकांपर्यंत पोहोचवली. शिवकालीन पत्रव्यवहार: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठी प्रशासनाची भाषा बनली. शाहीर, भारूड आणि लोकसाहित्याचा ठेवा: मराठी लोकसाहित्य हे जनसामान्यांच्या भावना व्यक्त करणारे माध्यम आहे. शाहीर तुकडोजी महाराज, शाहीर रामजोशी आणि अनंत फंदी यांचे पोवाडे

तमाशा आणि लावणीच्या माध्यमातून लोकजागृती करणारी परंपरा

भारूड, कीर्तन, गोंधळ, गवळण, ओव्या यांसारखी विविध लोकसाहित्याची रूपे हे साहित्य केवळ करमणुकीसाठी नव्हे, तर समाजप्रबोधन, राजकीय जाणीव आणि सांस्कृतिक ओळख प्रस्थापित करण्यासाठी वापरले गेले.

नाट्यसृष्टी आणि कथा-कादंबऱ्यांचा सुवर्णकाळ नाट्यपरंपरा मराठी नाट्यसृष्टीला विष्णुदास भावे यांनी 1843 मध्ये “सीता स्वयंवर” या नाटकाने प्रारंभ केला. पुढे, केशवराव भोसले, बालगंधर्व, गणपतराव जोशी, आणि पु. ल. देशपांडे यांनी नाटकाला नवा सन्मान मिळवून दिला.

काही अजरामर नाटके

संगीत नाटक: “संगीत शारदा”, “संगीत सौभद्र”, “संगीत मानापमान”

सामाजिक नाटक: “नटसम्राट”, “तो मी नव्हेच”, “संन्यस्त खड्ग”

विनोदी नाटक: “वाऱ्यावरची वरात”, “तुझे आहे तुजपाशी”

कथा आणि कादंबऱ्या :

हरिभाऊ आपटे: “पण लक्षात कोण घेतो?” (सामाजिक कादंबरी)

वि. स. खांडेकर: “ययाती” (ज्ञानपीठ पुरस्कार विजेती कादंबरी)

शिवाजी सावंत: “मृत्युंजय” (महाभारतातील कर्णावर आधारित कादंबरी)

पु. ल. देशपांडे: “बटाट्याची चाळ”, “व्यक्ती आणि वल्ली” (विनोदी साहित्य)

दया पवार, लक्ष्मण माने, नामदेव ढसाळ: दलित साहित्याचे नवे प्रवाह

समकालीन मराठी साहित्य आणि डिजिटल क्रांती

साहित्य आता पुस्तकापुरते मर्यादित राहिले नाही.

ब्लॉग, पॉडकास्ट, ऑडिओबुक, ई-बुक्स यामधून नवी पिढी मराठीत लेखन करत आहे.

“बोलतो मी मराठी” हा केवळ घोष नाही, तर महाराष्ट्राच्या अभिमानाची साक्ष आहे. मराठी भाषा आणि साहित्य हे संस्कृतीचा आत्मा, इतिहासाचा दस्तऐवज आणि समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. आपली भाषा, आपली संस्कृती जपणं ही प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे. आपण मराठीत वाचले पाहिजे, लिहिले पाहिजे आणि बोलले पाहिजे – कारण, जेव्हा मराठी टिकेल, तेव्हाच महाराष्ट्राचा आत्मा जिवंत राहील!

मराठी भाषेचा ऐतिहासिक ठेवा :

मराठी भाषेचा उगम संस्कृतपासून झाला असून तिचे अस्तित्व हजारो वर्षांपासून टिकून आहे. चालुक्य, यादव आणि पेशवे काळात मराठीत अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ आणि काव्यसंग्रह रचले गेले. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांनी या भाषेत भक्तीची गंगा वाहवली, तर शाहिरी परंपरेतून लढवय्या इतिहास रेखाटला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला राज्यकारभाराची भाषा म्हणून मान्यता दिली आणि तिचा विस्तार केला.

साहित्य, कला आणि लोकसंस्कृती :

मराठी भाषा केवळ लिखित ग्रंथापुरती सीमित नाही, तर ती लोकसंस्कृतीतही खोलवर रुजली आहे. अभंग, ओवी, भारुड, लावणी, गोंधळ, गजर ही महाराष्ट्राच्या मातीतून उमललेली लोककला आजही मराठी संस्कृतीला समृद्ध करत आहे. कालिदास, पु. ल. देशपांडे, वि. स. खांडेकर, शिवाजी सावंत यांसारख्या लेखकांनी मराठी साहित्याला नवे आयाम दिले.

मराठीचा अभिमान आणि जबाबदारी :

मराठी भाषेचा अभिमान बाळगणं ही फक्त भावनिक बाब नसून ती जबाबदारी आहे. तिच्या संवर्धनासाठी मराठी माध्यमातून शिक्षणाला प्रोत्साहन द्यावे, अधिकाधिक मराठीत लेखन-वाचन करावे आणि पुढच्या पिढीपर्यंत ही भाषा सन्मानाने पोहोचवावी.

“बोलू मराठी, लिहू मराठी, टिकवू मराठी!”

आजच्या पिढीने मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे. भाषा टिकली तर संस्कृती टिकेल, आणि संस्कृती टिकली तर आपली अस्मिता कायम राहील. म्हणूनच, आपण सर्वांनी ठरवूया – “लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी!”

शेवटी म्हणावं वाटतं..

शब्दांचा सोहळा, संस्कृतीचा उत्सव!

शब्दांच्या गंधाने भारलेले, साहित्यात न्हालेले,

मराठी मातीचे सोने, आज पुन्हा नटलेले!

 

संतांचे अभंग इथे, ओवींचे गीत झाले,

शाहीरांचे पोवाडे, स्वराज्याचे रक्त झाले.

नाट्याचे पडदे उघडले, हास्यकल्लोळ फुलला,

कादंबऱ्यांच्या पानांतून, काळच जणू रंगला!

 

शब्दांमध्ये इतिहास, शब्दांमध्ये संस्कृती,

साहित्याच्या मांदियाळीत, महाराष्ट्राची कीर्ती!

लेखक, कवी, विचारवंत, साऱ्यांचा मेळा आज,

संमेलनाच्या या स्नेहात, जुळती नवे आवाज!

 

आणि पुन्हा एकदा मराठीचा झेंडा उंचावतो,

बोलतो मी मराठी… अभिमानाने मिरवतो!

०००

 

संकलन:  अनिल कुरकुटे , जिल्हा माहिती कार्यालय, वाशिम

 

गदिमा : शब्दसृष्टीचे ईश्वर  

नवी दिल्ली येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने कविवर्य गजानन दिगंबर उर्फ ग. दि. माडगूळकर यांच्याबद्दल प्रकाशझोत टाकणारा प्रा. डॉ. मंजिरी महेंद्र कुलकर्णी यांचा लेख… 

            आता वंदू कवीश्वर

ते शब्दसृष्टीचे ईश्वर

असे समर्थ रामदासांनी कवींच्या बाबतीत म्हटलेले आहे. आधुनिक वाल्मिकी म्हणून ज्यांचा गौरवाने उल्लेख केला जातो ते कविवर्य गजानन दिगंबर उर्फ ग. दि. माडगूळकर हे खरोखरच शब्दसृष्टीचे ईश्वर होते. त्यांना शब्दांचे अक्षरशः वरदान होते. त्यांना एकदा एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता की “अण्णा, तुम्हाला असे अचूक, समर्पक आणि चपखल असे शब्द त्या त्या ठिकाणी कसे सुचतात ?” त्यावेळी अण्णा म्हणाले होते, “मला स्वत:लाही त्याबद्दल आश्चर्य वाटते. मात्र माझ्यासमोर शब्द अक्षरश: फेर धरून नाचतात आणि ‘मला घ्या मला घ्या, माझा कवितेमध्ये उपयोग करा’ असे जणू म्हणतात”. इतकी शब्दांवर अण्णांची हुकमत होती.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात माडगूळ नावाचे गाव आहे. ते अण्णांचे गाव. आजही तेथे अण्णांच्या आठवणी सांगणारे काहीजण भेटतात. अण्णा त्यांच्या शेतामध्ये बसून शब्दसाधना करीत असत. त्या ठिकाणाला बामणाचा पत्रा असे म्हटले जाते. ते बामणाचा पत्रा हे ठिकाण आजही आपल्याला तेथे पहायला मिळते.

अण्णा हे स्वातंत्र्यसैनिक. महात्मा गांधीजींच्या आदेशाने ज्यांनी स्वातंत्र्ययुद्धात त्यावेळी उडी घेतली, त्यामध्ये अण्णा अग्रेसर होते. त्या स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात कलावंतांनी ठिकठिकाणी मेळे सुरू केले होते. या मेळ्यांमध्ये कथानक असे. तसेच ते कथानक विविध गीतांनी सजवलेली असे. स्वातंत्र्ययुद्ध, समाजासमोरचे प्रश्न, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले प्रतिसरकार, ब्रिटिशांच्या दंडुकेशाहीचा आणि समाजातील सावकारशाहीचा बिमोड असे अनेक विषय या गीतांमधून मांडले जात असत.

काँग्रेस सेवादलाच्या अनेक बैठका सांगली जिल्ह्यात (त्यावेळचा सातारा जिल्हा) त्यावेळी होत असत. विशेषतः आटपाडी, कुंडलमध्ये अशा बैठका सातत्याने होत असत. कारण कुंडल हे त्यावेळी औंध संस्थानमध्ये होते. त्या संस्थाचे अधिपती श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी आणि त्यांचे चिरंजीव बॅरिस्टर आप्पासाहेब पंत यांचा स्वातंत्र्ययुद्धाला पूर्ण पाठिंबा होता. क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड, शाहीर शंकरराव निकम यांच्यासोबतीने अण्णा स्वातंत्र्य सैनिकांच्या अनेक बैठकांना हजर असत.. पूज्य साने गुरुजीही अशा बैठकांसाठी यायचे आणि त्यावेळी सेवादलाच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करायचे. अण्णा अनेक स्फूर्तीदायक अशी गीते रचत असत. त्या गीतांचे गायन त्यावेळी अतिशय प्रसिद्ध असलेल्या मेळ्यांमध्ये आणि काँग्रेस सेवादलाच्या बैठकांमध्ये आंदोलनांमध्ये होत असे. त्या गीतांमुळे स्वातंत्र्यसैनिकांना प्रेम मिळत असे.

अण्णांनी नंतर मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन तसेच पटकथालेखन सुरू केले. अतिशय भावमधुर अशी गीते अण्णांनी लिहिलेली आहेत. ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’, हे गीत आजही म्हणजे जवळजवळ 60 ते 65 वर्षानंतरही लोकप्रिय आहे. तमाशाप्रधान, सामाजिक समस्याप्रधान किंवा संतांच्या जीवनावरचे चित्रपट यासाठी त्यांनी लिहिलेल्या गीतांनाही रसिकांची उदंड पसंती मिळाली.

तमाशाप्रधान चित्रपटातही अण्णांनी अनेक सुंदर अशा लावण्या लिहिल्या की त्या आजही लोकांच्या आठवणीत आहेत. ‘ऐन दुपारी यमुनातीरी, खोडी कुणी काढली, बाई माझी करंगळी मोडली’, ‘बाई मी पतंग उडवीत होते’ किंवा ‘काठेवाडी घोड्यावरती’ अशा त्यांच्या अनेक लावण्या गाजलेल्या होत्या. त्याचवेळी अतिशय नितांत सुंदर आणि समाजाचे उद्बोधन करणारी गीतेही त्यांनी चित्रपटांसाठी तसेच नाटकांसाठीही लिहिली होती.

प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक राजा परांजपे यांनी तयार केलेल्या अनेक चित्रपटांचे पटकथा, संवाद आणि गीतलेखन अण्णांनी केले होते. ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटातील त्यांची सगळी गाणी आजच्या भाषेत सांगायचे तर अक्षरशः हिट झाली होती. ‘तुला पाहते रे तुला पाहते रे, जरी आंधळी मी तुला पाहते रे’, ‘जग हे बंदीशाळा’, ‘थकले रे नंदलाला’ अशी त्या चित्रपटातील गीते अक्षरश महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही त्यावेळी गाजत होती. आजही त्या गीतांची गोडी आहे. अनेक संतांच्या जीवन चरित्रावरील चित्रपटांसाठी अण्णांनी गीते लिहिली आणि तीही तेवढीच मधुर आहेत. संत गोरा कुंभार या चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली ‘उठ पंढरीच्या राजा, वाढवेळ झाला, थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला’, तसेच समचरण सुंदर, कासे ल्याला पितांबर’ ही गीते अतिशय लोकप्रिय झाली होती. संत दामाजीपंत यांच्या जीवनावरील चित्रपटात गदिमांनी लिहिलेले ‘निजरूप दाखवा हो, हरिदर्शनासी याहो’ हे गीतही असेच गाजले होते.

गदिमांनी अनेक लघुनिबंध लिहिले आहेत. विशेषतः हस्ताचा पाऊस, जांभळाचे दिवस अशी त्यांची लघु निबंधांची पुस्तके अतिशय प्रसिद्ध आहेत. अतिशय सहज सोपी शैली आणि लोकांना समजेल असे लेखन हे त्यांच्या साहित्याचे सगळ्यात प्रमुख वैशिष्ठ्य आहे. ते नेहमी असे म्हणायचे की माझे लेखन हे सर्वसामान्य लोकांना कळले पाहिजे. केवळ विद्वान किंवा खूप शिकलेल्या लोकांसाठीच नव्हे; तर अगदी खेड्यापाड्यातील सामान्य लोकांसाठी मला लिहायचे आहे.

अण्णांवर लहानपणापासून कीर्तन, तमाशा, भजन, प्रवचन यांचा मोठा प्रभाव झाला होता. संत साहित्याचे त्यांनी उदंड वाचन केले होते. संत ज्ञानेश्वर, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराज, संत एकनाथ, संत रामदास अशा संतांच्या साहित्याचा त्यांनी गाढा अभ्यास केला होता. उत्तर भारतातील प्रसिद्ध संत कबीर, तुलसीदास, सूरदास आणि मीराबाई यांच्या साहित्याचाही त्यांनी सखोल अभ्यास केला होता. साहजिकच त्यांच्या कवितेवर या सर्वांच्या प्रतिमासृष्टीचा आणि प्रतिभेचाही निश्चितच परिणाम झालेला आहे. साहजिकच त्यांची शब्दकळाही त्यामुळे अतिशय ओघवती आणि समृद्ध अशी बनलेली होती.

1952 च्या दरम्यान अण्णांच्या साहित्यिक जीवनात एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आला. तो टप्पा म्हणजे गीत रामायण महाकाव्य. या गीत रामायणाने अफाट लोकप्रियता मिळवली. या गीत रामायणामधील अनेक गाणी ही आठ नऊ कडव्यांचीसुद्धा आहेत. प्रसिद्ध गायक सुधीर फडके यांचे गायन आणि गदिमांची शब्दसंपत्ती यामुळे गीतरामायण हे महाकाव्य अक्षरशः प्रचंड लोकप्रिय झाले. त्यावेळी आकाशवाणीच्या पुणे आणि मुंबई या केंद्रावरून या गीत रामायणाचे कार्यक्रम प्रथम प्रसारित झाले होते. त्याची ठराविक वेळ असायची. पहिल्या दोन-तीन दिवसातच या गीत रामायणाबद्दल लोकांना श्रद्धा आणि प्रेम वाटू लागले. तेव्हा रेडिओ फार कमी होते. त्यामुळे बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती असलेल्या एखाद्या घरात रेडिओ असे. त्या घरात आसपासचे लोक तिथे जमायचे आणि त्या रेडिओची अक्षरशः फुले वाहून आणि त्याच्यासमोर उदबत्ती लावून पूजा करायचे. मग गीत रामायण – ऐकायचे. म्हणजे लोकांनी गदिमांच्या या महाकाव्यावर किती प्रेम केले, किती श्रद्धा ठेवली हे आपल्याला यावरून कळून येईल.

गदिमांनी विपुल लेखन केले आहे. कथा, कविता, नाटक, चित्रपट कथा त्यांनी अनेक लिहिल्या. परंतु असे म्हणतात की गदिमांनी फक्त गीत रामायण जरी लिहिले असते तरीसुद्धा त्यांची कीर्ती दिगंत झाली असती. गीत रामायणामध्ये गदिमांनी अनेक ठिकाणी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. वनवासात असताना अयोध्येचा राजा भरत हा प्रभू रामचंद्रांना भेटण्यासाठी येतो. त्यावेळी त्याचे दुःख दूर करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी त्याला अतिशय हळुवार अशा शब्दात उपदेश केला. ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हेच ते प्रसिद्ध गीत आहे. गीत रामायणातील अनेक गीते आजही लोकप्रिय आहेत. आजही त्या गीतांचे सातत्याने स्वतंत्र कार्यक्रम होतात. गदिमांच्या या गीतरामायणामुळे त्यांना आधुनिक वाल्मिकी अशी पदवी मिळाली आणि ती सार्थ अशी आहे.

–        प्रा. डॉ. मंजिरी महेंद्र कुलकर्णी

खानदेशातील अहिराणी साहित्य: उत्साहवर्धक व आशादायी प्रारंभ..

नवी दिल्ली येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने खानदेशातील नावाजलेले साहित्यिक डॉ. फुला बागुल यांनी अहिराणी भाषा साहित्य यावर या लेखातून आपले विचार व्यक्त केले आहेत. शिवाय मराठी वाचकांसाठी त्यांनी अहिराणी भाषेच्या माध्यमातून निर्माण झालेल्या साहित्यकृतींची माहितीही या लेखाच्या माध्यमातून वाचकांसाठी देण्याचा प्रयत्न केला आहे…

अहिराणी ही धुळे, जळगाव, नंदुरबार या खानदेशातील तीन जिल्ह्यांत राहणाऱ्या लोकांसह गुजरातेतील व्यारा, सोनगड, बारडोली, उधना येथे खानदेशातून स्थलांतरित झालेल्या लोकांची तसेच मध्य प्रदेशातील सेंधवा, खेतिया भागात राहणाऱ्या लोकांची बोली आहे. यासह नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या तालुक्यातुनही अहिराणी बोलली जाते. साधारण दीड दोन कोटी लोकांची ती बोली असल्याचे म्हटले जाते.

प्राचीन राजे अभीर यांच्यापासून तिचा ऐतिहासिक वारसा सांगितला जातो. शिलालेखासह व मध्ययुगीन ग्रांथिक पुरावे देखील दिले जातात. प्राचीन अहिराणी लोकगीते देखील अहिराणीच्या प्राचीनत्वात भर घालतात. अहिराणीचा प्रवास प्राचीन काळापासून प्रमाण मराठी सोबतच होतो आहे. प्रमाण मराठीच्या अंतर्गत असलेली अहिराणी ही सर्वात प्रमुख व क्षेत्र बहुल बोली आहे. प्रमाण मराठीच्या तुलनेत अहिराणी साहित्याची वाटचाल मात्र अलीकडे साहित्य निर्मिती सुरू झाल्यामुळे मर्यादित आहे. अहिराणी साहित्याच्या वाटचालीचा आरंभबिंदू शिलालेखातील या ओळी असा मानला जातो.

संत ज्ञानेश्वरांनी बागलानी अहिराणीत लिहिलेली ओवी (मी तं बाई साधी भोयी/गऊ त्याना जवयी/फाडी मनी चोयी) हा अहिराणी साहित्याचा भरभक्कम ग्रांथिक पुरावा होय. मध्ययुगीन अहिराणी कवी निंबा चा उल्लेख येतो तथापि, अजून त्यांचे अहिराणी साहित्य मिळून आल्याचे ऐकिवात नाही. अर्वाचीन काळात अहिराणी साहित्याच्या प्रारंभाचा मान निर्विवादपणे दा. गो. बोरसे यांना दिला जातो.

खानदेशातील विविध लेखक, कवी, समीक्षकांनी पुढीलप्रमाणे अहिराणी व अहिराणी संदर्भातील साहित्य निर्मिती करून हा प्रवाह आरंभिला आहे.

अहिराणी काव्यसंग्रह पुढीलप्रमाणे-

१. मी कान्हाना देसनी

वनमाला पाटील …अजिंक्य प्रकाशन, वापटा, जि. वाशिम

२. नियतीना सूड ..

लतिका चौधरी .. अपेक्षा प्रकाशन, भुसावळ

३. वानोया..

चंद्रकला बाविस्कर ..

४. राम पाऱ्हाना राम ..

नानाभाऊ पाटील .. कस्तुरी प्रकाशन, अमळनेर

५. वयंबा ..

सुभाष आहिरे .. भावना प्रकाशन, धुळे

६. पाठवरना हात ..

प्रा. आ. न. पाटकरी .. पुष्पा प्रकाशन, धुळे

७. आदिम तालनं संगीत ..

सुधीर देवरे .. भाषा संशोधन प्रकाशन केंद्र, बडोदा

८. पारसमनी..

पारसमल जैन.. प्रकाशक, निला जैन

९. आपली माय अहिराणी ..

प्रा . आ . न . पाटकरी, प्रकाशक सौ . पुष्पा पाटकरी

१०. खानदेशी मेवा ..

प्रा. विमल वाणी .. प्रकाशक शंतनु येवले

११. पुरनपोयी …

रमेश बोरसे .. राऊ प्रकाशन, धुळे

१२. रापीनी धार ..

वाल्मिक अहिरे .. प्रज्ञेश प्रकाशन, पुणे

१३. गावगाडा ..

एन एच महाजन .. तिसरी आवृत्ती, अनुराग प्रकाशन, शिरपूर

१४. मी आनी मना आवकाया ..

पप्पू पाटोळे, प्रकाशक स्वरूप बोरसे

१५ लाह्या ..

नानाभाऊ माळी ..भावना प्रकाशन, धुळे

१६. मिरीगना पानी …

भगवान अहिरे … चौखंबा प्रकाशन, धुळे

१७. अभिरानी

शकुंतला पाटील .. अथर्व पब्लिकेशन्स, जळगाव

१८. सरगम

शंकर पवार .. दीक्षा प्रकाशन, धुळे

१९. नियं आभाय

लतिका चौधरी .. कस्तुरी प्रकाशन, अमळनेर

२०. मन्हा मामाना गावले जाऊ (बाल कविता) ..

आबा महाजन, अथर्व प्रकाशन, जळगाव

अहिराणी कादंबऱ्या पुढील साहित्यिकांनी लिहिल्या आहेत.

१. कायी माय

गोकूळ बागूल .. द्वि आ . कस्तुरी प्रकाशन, अमळनेर

२. आख्खी हयाती

बापूराव देसाई, सरस्वती प्रकाशन, नाशिकरोड

३. लगीन

संजीव गिरासे … राजश्री प्रकाशन, पुणे

४. आक्का ..

राजाजी देशमुख … दीपाली प्रकाशन, नाशिक

५. गलीनी भाऊ बंदकी ..

लतिका चौधरी

६. देव बोकड्यानी माणुसकी ..

प्रकाश महाले

डॉ. बापुराव देसाई यांच्या अन्य अहिराणी कादंबऱ्याही आहेत.

अमीना या कादंबरीचा अहिराणी अनुवादही झाला आहे.

अहिराणी कथा संग्रह पुढील लेखकांनी निर्मिले आहेत.

१. बठ्ठा बजार येडास्ना …

गोकूळ बागूल, कस्तुरी प्रकाशन, अमळनेर याच संग्रहाचे नाव बदलून (ज्वारी म्हनी माय) पुनर्प्रकाशित करण्यात आला .

२. गोधडीनी उब ..

प्रा. आ. न. पाटकरी .. अंकुर प्रकाशन, अकोला

३. गोठ पाटल्या ..

सौ. रत्ना पाटील .. भावना प्रकाशन, धुळे

४. पसात –

मच्छिंद्र वाघ, राहुल बूक, नाशिक

५. भोवरा –

डॉ. ज्ञानेश दुसाणे

 अहिराणी ललितगद्य या प्रांतातही पुढील लेखकांनी आपले योगदान दिले आहे.

१. आख्यान ..

रामदास वाघ, प्राजक्ता प्रकाशन, नाशिक

२. गावनं गावपन ..

सुभाष आहिरे,  भावना प्रकाशन, धुळे

३. आप्पान्या गप्पा ..

रमेश बोरसे .. अभ्यासिका प्रकाशन, कन्नड

४. चांगभलं ..

प्रा. भगवान पाटील, कस्तुरी प्रकाशन, अमळनेर

५. वानगी …

रामदास वाघ, प्राजक्ता प्रकाशन, नाशिक

६. आप्पान्या गप्पा (भाग दोन )

रमेश बोरसे, अभ्यासिका प्रकाशन, कन्नड

७. माय नावना देव

रामदास वाघ, प्राजक्ता प्रकाशन, नाशिक

८. खान्देशी बावनकशी

लतिका चौधरी, दिशोत्तमा प्रकाशन, नाशिक

९. आगारी…

संजीव गिरासे … सुधा प्रकाशन, जळगाव

अहिराणी नाट्य या प्रवाहात लिखित संहिता फक्त एकच आढळते अन्य नाटय रूपे प्रत्यक्ष सादर केली जात आहेत.

१. राम राम भावड्या …

प्रा. बी. पी. राजपूत, प्रकाशक सौ .छाया राजपूत, होळनांथे

२. पांडोबा आणि फिरस्ता (संवाद लेखन),

आत्माराम मुंगा पाटील

३. बुध्याना पोऱ्यानी मानता हा अहिराणी एकपात्री प्रयोग सुभाष आहिरे तर आयतं पोयतं सख्यानं हा अहिराणी प्रयोग प्रवीण माळी आणि खानदेसनी माटी हा प्रयोग प्रतिभा साळुंके सादर करतात.

अहिराणी समीक्षा या प्रातांत डॉ. फुला बागूल यांचे अग्रक्रमीय योगदान आहे.

१. खारं आलनं …  . फुला बागूल, प्रशांत पब्लिकेशन्स, जळगाव. या समीक्षा ग्रंथाला पुरस्कारांनी गौरविले गेले आहे. उच्चशिक्षणातही अभ्यासघटक म्हणून या ग्रंथाचा समावेश आहे. अहिराणी साहित्याच्या समीक्षेचे निकष या ग्रंथाने स्थापित केले आहेत.

अहिराणी आत्मकथन पुढील लेखकांनी लिहिले आहे.

१. शांताई

सुभाष आहिरे, भावना प्रकाशन, धुळे

अहिराणी अनुवाद या प्रांतातही काही लेखकांनी योगदान दिले आहे. उडाणेकर श्री. सुभाष यांनी व जालन्याच्या वनमाला पाटील यांनी गीतेची अहिराणी भाषांतरे केली आहेत. प्रा आ. न. पाटकरी यांचे प्रयत्नही स्तुत्य आहेत .

१. संत मीरानी भक्ती ..

प्रा. भगवान पाटील, पानफूल प्रकाशन, जळगाव

२.अमिना (मूळ उर्दू कादंबरी, मोहम्मद उमर)

अथर्व प्रकाशन, जळगाव

अहिराणी संमेलनाची अध्यक्षीय भाषणे देखील पुस्तिकेच्या रूपात प्रकाशित आहेत.

१. पाचवे अ. भा. अहिराणी साहित्य संमेलन..

सुभाष आहिरे, प्रकाशक खान्देश विकास प्रतिष्ठान, धुळे

अहिराणी संकलने देखील पुढील लेखकांनी प्रकाशित केली आहेत.

१. अहिराणी दर्शन

प्रा. सदाशिव माळी, शिवमूर्ती प्रकाशन, धुळे

२. कानबाई माता गीत संग्रह,

रामचंद्र सदाशिव व सौ. शोभा रामचंद्र चौधरी, मुद्रक का. स. वाणी संस्था, धुळे

३. कानोड जागर

प्रा. विमल वाणी, मुद्रक अक्षरा ऑफसेट, भडगाव

४.अहिरानी मायबोली,

चंद्रकांत कोळी, प्रकाशक सौ. भारती शिरसाठ, देवळाई

५.जाईचा सुगंध,

अशोक चौधरी,  कस्तुरी प्रकाशन, अमळनेर

६. लग्न सोहळा,

शकुंतला पाटील. अथर्व प्रकाशन, जळगाव

७.अहिराणी बोली भाषेतील जात्यावरील ओव्या..

डॉ. छाया निकम, अथर्व प्रकाशन, जळगाव

८.उपकार माऊलीना खरा

प्रा. अशोक शिंदे, वर्षा प्रकाशन, विसरवाडी

९. अहिराणी वाग्वैभव

अभिमन्यू पाटील .. कस्तुरी प्रकाशन, अमळनेर

अहिराणी संदर्भातील संशोधन पर ग्रंथ (मराठी भाषेतून) पुढील प्रमाणे होत.

किमान दहा पीएच. डी. प्रबंध अहिराणीवर सादर झाले आहेत.

१. आभीरायण,

गंगाधर पारोळेकर .. प्रकाशक सौ मीनाक्षी पारोळेकर, पुणे

२. खानदेशातील ग्राम दैवते आणि लोकगीते

डॉ. सयाजी पगार, का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था, धुळे

३. खानदेशी: एक स्थानिक अभ्यास

डॉ. विजया चिटणीस, प्रेस्टीज प्रकाशन, पुणे

४. अहिराणी म्हणी: अनुभवाच्या खाणी

डॉ. बाळासाहेब गुंजाळ, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर

५. बागलाणी लोकगीते आणि लोक संस्कृती

डॉ. सुरेश पाटील, प्रज्ञा प्रकाशन, नाशिक

६. समाज भाषाविज्ञान: बोलींचा अभ्यास (अहिराणी बोली)

डॉ. सुधाकर चौधरी, अथर्व प्रकाशन, जळगाव

७. अहिराणी लोक साहित्याचा अभ्यास

डॉ. शशिकांत पाटील, चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद

८. अहिराणी : भाषा वैज्ञानिक अभ्यास

डॉ. रमेश सूर्यवंशी, अक्षय प्रकाशन, पुणे

९. खानदेशी स्त्री गीते

डॉ. उषा सावंत, प्रतिमा प्रकाशन, पुणे

१०. खानदेशी अहिराणी लोककथा,

डॉ . बी . एन . पाटील, प्रशांत पब्लिकेशन्स, जळगाव

११. अहिराणी लोक वाङ्मयातील लोक भाषा

डॉ. म. सु. पगारे, प्रशांत पब्लिकेशन्स, जळगाव

अहिराणी शब्दकोश देखील प्रकाशित झाला आहे.

१. अहिराणी शब्दकोश,

डॉ. रमेश सूर्यवंशी, अक्षय प्रकाशन, पुणे

अहिराणी संकीर्ण ग्रंथ / पुस्तिका  [मराठीतून लेखन] देखील प्रकाशित झाले आहेत .

१. अहिराणी लोकपरंपरा

डॉ. सुधीर देवरे, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई

२. खानदेशी साहित्य सुरभी,

डॉ. बापूराव देसाई, प्रकाशक शंतनु कुलकर्णी

३. खान्देशी संस्कृती

डॉ. बापूराव देसाई, पानफूल प्रकाशन, जळगाव

४. अहिरराष्ट्र कान्हदेश

देविदास हटकर, मुद्रक राजयोग डिजिटल, कल्याण

अशा रीतीने साहित्याच्या सर्व प्रकारात खानदेशातील अहिराणी लेखकांनी आपली निर्मिती करून अहिराणी साहित्याचा हा प्रवाह समृद्ध करण्याचा संकल्प घेतला आहे.

०००

  • डॉ. फुला बागुल, सदस्य विद्वत परिषद, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, भ्रमणध्वनी 9420605208/ 9822934874

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे महानगरपालिका अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमास भेट

पुणे, दि. 15 : पुणे महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त महानगरपालिकेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमास उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार सुनील तटकरे, आमदार विजय शिवतारे, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी श्री. पवार यांनी प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विविध मान्यवर तसेच महानगरपालिकेतील अधिकारी- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम पोलीस दलाने करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. 15 : राज्य सरकारच्यावतीने पोलीस दलाकरीता नवीन कार्यालये, वाहने, सीसीटिव्ही,अत्याधुनिक तंत्रज्ञान अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय नेत्रदीपक अशा प्रकारची कामगिरी केलेली असून येत्या काळातही सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम राज्यातील पोलीस दल करेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात आयोजित ‘तरंग-2025’ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार सुनेत्रा पवार, सुनील तटकरे,  आमदार अमित गोरखे, योगेश टिळेकर, विजय शिवतारे, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, सुनील शेळके, हेमंत रासने, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पुनीत बालन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते.

    

श्री. फडणवीस म्हणाले, पुणे हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे शहर असून ते राज्याचे उत्पादन व तंत्रज्ञानाचे हब आहे; शहरात आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध नागरिक याठिकाणी येत असतात. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राखण्यासोबत वाहतूकीच्या नियमांचे पालन झाले पाहिजे. नागरिकांना उत्तमप्रकारच्या सेवा देवून त्यांना न्याय दिला पाहिजे, अपराध घडल्यानंतर अपराध्यांना शिक्षा झाली पाहिजे या गोष्टीवर प्रचंड भर पुणे पोलिसांच्या माध्यमातून देण्यात येत असतो. पुणे पोलीसांनी गंभीर घटनेच्यावेळी चांगल्या प्रकारे जलद प्रतिसाद देत त्या घटनांचा उलगडा केलेला आहे. त्यामधील आरोपींना जेरबंद करुन शिक्षा मिळत आहे, हे आपल्याकरीता अधिक महत्त्वाचे आहे. यापुढेही पुण्यासारख्या शहरांमध्ये अधिकाधिक घटनेच्या अनुषंगाने पोलिसांचा प्रतिसादाचा वेळ कमीत कमी असला पाहिजे. पोलिसांचा वावर नागरिकांना जाणवला पाहिजे.

पोलीसांच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याच्यादृष्टीने देशातील सगळयात चांगला सायबर फ्लॅटफॉर्म राज्याने निर्माण केला आहे. केंद्र शासनाने 1945 हा क्रमांक राज्याकरीता दिला असून तक्रारदाराला 24 तासाच्या आत कारवाई करुन अहवाल देण्यात येत आहे. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगल्या आरोग्यदायी वातावरणात जगता यावे, याकरीता पोलीस कल्याणाच्यामाध्यमातून आरोग्य, निवासस्थाने अशा अनेक गोष्टी राज्यशासनाने अजेंडावर घेवून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे.

नागरिकांना उत्सव चांगल्याप्रकारे साजरा करता यावा, याकरीता राज्यातील पोलीस दल 24 तास बंदोबस्त करीत असतात, उत्सवाच्या काळात कुटुंबापासून दूर राहावे लागते, म्हणून अशा पोलिसांना आपल्या परिवारासोबत एखादा उत्सव साजरा करता यावा, याकरीता पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने  पोलिसांचा उत्सव म्हणून ‘तरंग’ एक अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता सामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये हास्य असले पाहिजे, त्यांना सुखशांती मिळाली पाहिजे, अपराधापासून मुक्ती मिळाली पाहिजे याकरीता पोलीस काम करीत असतात, अशा उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करुन त्यांचे अभिनंदन करुन यापुढेही अशाच प्रकारचे चांगले काम करतील, अशी अपेक्षा श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.

श्री. पवार म्हणाले, राज्यात कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राहिले पाहिजे, जातीय सलोखा राहिला पाहिजे, शहरातील वाहतूक कोंडी सुटली पाहिजे, नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी ‘कॉप-24’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत ठेवण्याकरीता पोलीस दलाला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असून यापुढेही राज्य सरकार कमी पडणार नाही. नागरिकांनीही आपली जबाबदारी नीटपणे पार पाडावी, असे आवाहन श्री. पवार म्हणाले.

श्री. कुमार म्हणाले, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने मागील एक वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासोबत गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता विविध उपाययोजना करण्यात आल्या. यापुढे अधिक जोमाने करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे श्री. कुमार म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते कॉप-24 उपक्रमाअंतर्गत दुचाकी व चारचाकी वाहनांना हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले. तसेच कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे पाल्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमापूर्वी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्याची चित्रफीत दाखविण्यात आली.

00000

शासकीय योजना गुणवत्तापूर्ण राबवा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर, दि. १५ – केंद्र शासनाच्या सर्वसामान्यांसाठी विविध योजना आहेत. या योजना प्रभावीपणे व गुणवत्तापूर्ण राबवण्यात याव्यात, असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील संबंधित कार्यान्वयन यंत्रणेला आज दिले.

जिल्हा विकास समन्वय तथा संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. सदर येथील नियोजन भवनच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार कृपाल तुमाने, आमदार चरणसिंग ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर,  मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्यासह दिशा समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी नागपूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या केंद्र सरकार पुरस्कृत योजनांचा आढावा मंत्री श्री. गडकरी यांनी घेतला.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी स्वच्छ भारत अभियान, सक्षम अंगणवाडी व पोषण, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, अमृत 1 व 2, प्रधानमंत्री आवास योजना, पाणी व कचरा व्यवस्थापन योजना, प्रधानमंत्री स्वानिधी योजना, प्रधानमंत्री आदिवासी ग्राम विकास योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, आयुष्मान भारत आदी योजनांचा आढावा घेतला. प्रधानमंत्री आवास योजना, रस्ते विकास योजना, अमृत योजना अशा अनेक योजना सर्वसामान्यासाठी आहेत. सरकारी योजना राबविण्यात हयगय करणारे अधिकारी अथवा कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी यावेळी दिले

प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये गरिबांना घरे द्या, पण त्याचवेळी अवैधरित्या घरांचा ताबा घेणाऱ्या लोकांवर पोलिसांच्या सुरक्षेत कारवाई करावी. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचाही चुकीचे लोक लाभ घेत असतील तर त्यांच्यावर कारवाई करा, असेही श्री. गडकरी म्हणाले.

ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापन योजनेचा आढावा देखील त्यांनी घेतला. गावातून गोळा होणारा कचरा रस्त्याच्या कामात वापरता येईल का किंवा त्यातून कंपोस्ट खत तयार करता येईल का, याचा विचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजनेची 137 कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यावर योजनेची अंमलबजावणी करताना पाइपलाइन टाकण्यापूर्वी पाण्याचा स्रोत निश्चित करा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गात सिकलसेल, थॅलेसिमियाची मोठी समस्या आहे.  लोक सिकलसेल, थॅलेसिमियाने ग्रस्त आहेत. या आजारांवर नागपुरात उपचार व्हावा यासाठी आपण एम्समध्ये यंत्रणा तयार करीत आहोत. याच्या  अंमलबजावणीवर लक्ष द्यावे, अशा सूचना केंद्रीय मंत्री श्री.गडकरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

रस्ते अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला कुठल्याही रुग्णालयात उपचार घेण्यासाठी सरकार मदत करेल. ही योजना रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे लागू करण्यात आली आहे. या योजनेची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी यावेळी दिले.

ताज्या बातम्या

परिसरातील उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन न्यू एज अभ्यासक्रम सुरू करावेत- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व...

0
पुणे, दि.१३: राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन युगातील ६ अभ्यासक्रम (न्यू एज कोर्सेस) यावर्षीपासून सुरू करण्यात येत असून प्रत्येक आयटीआयमध्ये परिसरातील उद्योगांच्या गरजा लक्षात...

नवीन वीज उपकेंद्रामुळे श्रीरामपूरमधील उद्योगवाढीस चालना — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
शिर्डी, दि. १३ — श्रीरामपूर तालुक्याला भेडसावणाऱ्या अपुऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येचे निराकरण २२०/३३ केव्ही क्षमतेच्या उच्चदाब वीज उपकेंद्रामुळे होणार असून, शेती व एमआयडीसीमधील उद्योगांना पूर्ण...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन

0
मुंबई, दि. १३ :- माहिती व जनसंपर्क विभागातील वरिष्ठ सहाय्यक संचालक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख (वय ५५ वर्षे) यांचे...

हिंजवडी परिसरातील समस्या सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पुणे, दि. १३ : हिंजवडी, राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला अधिक चालना देण्याकरिता परिसरातील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने...

न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन नागपूर, दि. १३: महाराष्ट्रात देशातील सर्वात अत्याधुनिक सायबर न्यायसहायक वैज्ञानिक व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. आधुनिक सायबर प्रयोगशाळांसह मोबाईल न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा उभारल्या जात आहेत....