मंगळवार, जुलै 8, 2025
Home Blog Page 314

संशोधन आणि रोजगाराभिमुख शिक्षण प्रणालीला प्राधान्य -शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. १७ – राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत एनसीईआरटीचा अभ्यासक्रम स्वीकारताना राज्याशी संबंधित माहितीचा अंतर्भाव करून संशोधनाला प्राधान्य देणारी आणि रोजगाराभिमुख शिक्षण प्रणाली विकसित केली जाईल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

शालेय शिक्षण मंत्री तथा ‘पाठ्यपुस्तक मंडळा’चे अध्यक्ष दादाजी भुसे यांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) च्या कामाचा मुंबईतील प्रभादेवी येथे बालभारतीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. प्रधान सचिव रणजितसिंह देओल यावेळी उपस्थित होते. तर शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंग, ‘एससीईआरटी’ चे संचालक डॉ. राहुल रेखावार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी बालभारतीच्या कार्यपद्धतीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले, आजचे विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. त्यांना बालभारतीच्या माध्यमातून नियमित अभ्यासक्रमाबरोबरच रोजगाराभिमुख, कृषीविषयक माहिती देणाऱ्या, मातीशी नाते जोडून ठेवणाऱ्या, कला – क्रीडा विषयाची माहिती देणाऱ्या अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत, ही समाधानाची बाब आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती जोपासण्यासाठी संशोधनाला प्राधान्य देणारी शिक्षण प्रणाली विकसित केली जाईल. याव्यतिरिक्त नाविन्यपूर्ण उपक्रमांचीही अंमलबजावणी केली जाईल, असेही ते म्हणाले.

शालेय मंत्री श्री. भुसे यांनी बालभारतीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. अभ्यासक्रमाची पुस्तके थेट तालुका पातळीपर्यंत पोहोचवता येतील का याबाबत अभ्यास करण्याची सूचना त्यांनी केली. आधुनिक काळाची कास धरून बालभारतीचे कामकाज संपूर्ण संगणक आधारित करावे. बालभारतीच्या उत्पन्नामधून शैक्षणिक उपयुक्त उपक्रमांसाठी निधी खर्च करावा. केंद्राचा अभ्यासक्रम स्वीकारताना त्यात राज्याशी संबंधित माहितीचा समावेश करावा तसेच तो अभ्यासक्रम विद्यार्थी आवडीने शिकतील असा असेल, याची दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या. श्री. भुसे यांच्या हस्ते यावेळी जर्मन भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

प्रधान सचिव रणजितसिंह देओल, आयुक्त सचिंद्रप्रताप सिंग, एससीईआरटी चे संचालक डॉ. राहुल रेखावार यांनी यावेळी शालेय शिक्षण अभ्यासक्रमातील विविध उपक्रमांची माहिती दिली.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

आजारी, बंद कारखान्यांतील कामगारांच्या थकीत देण्याला पहिले प्राधान्य हवे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधीकरणाकडे तत्काळ पाठपुरावा करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्योग विभागाला निर्देश

औद्योगिक क्षेत्रातील सर्व कामगारांची आरोग्य तपासणी देखील करणार

मुंबई दि १७: कामगारांची देणी वर्षानुवर्ष थकीत ठेवून आजारी किंवा बंद अवस्थेतील उद्योग आणि कारखाने हे एमआयडीसीच्या जागांवरील आपली मालमत्ता विकून टाकतात. या कामगारांची थकीत देणी प्राधान्याने देण्याची बाब त्वरित एनसीएलटी म्हणजे राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधीकरणाच्या निदर्शनास आणून द्यावी आजारी उद्योगांवर लक्ष ठेवून त्यांचा डेटा अद्यावत करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योग विभागाला दिले आहेत.

सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्र्यांनी उद्योग विभागाचा आढावा घेतला. याप्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते.

प्रारंभी उद्योग सचिव डॉ पी अन्बलगन, विकास आयुक्त उद्योग दीपेंद्र कुशवाह यांनी सादरीकरण केले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, एमआयडीसी तसेच उद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून आजारी आणि बंद पडलेल्या कारखान्यातील कामगारांच्या आर्थिक कुचंबना मी पाहतो आहे. माझ्या परीने मी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतो पण यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

एमआयडीसी जरी औद्योगिक विकासासाठी हातभार लावत असली तरी देखील कामगार हा त्यातला महत्त्वाचा घटक आहे. आजारी किंवा अवसायानातील, बंद पडलेल्या कारखान्यांची प्रकरणे राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणसमोर जातात. हे कारखाने एमआयडीसीच्या जागेवर असतात. न्यायाधिकरणमार्फत निघालेल्या हुकूमनाम्यानुसार लिलावाच्या प्रक्रियेतून त्यांची विक्री केली जाते परंतु कामगारांच्या थकबाकीला मात्र प्राधान्य नसते, ही बाब गंभीर असून एमआयडीसी आणि उद्योग विभागाने यासंदर्भात एक विशेष कक्ष स्थापन करावा. त्यात कामगार विभाग व इतर तज्ज्ञांचा समावेश करून सध्या एनसीएलटीकडे किती उद्योग गेले आहेत त्याचप्रमाणे जाण्याच्या परिस्थितीत आहेत अशा उद्योग घटकांचा डेटा अद्ययावत करून एनसीएलटीकडे ही बाब निदर्शनास आणून द्यावी.

या संदर्भात कंपनी कायद्यात आवश्यकतेप्रमाणे सुधारणा करण्यासाठी उद्योग विभागाने पत्रव्यवहार करावा असेही उपमुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले.

कामगारांसाठी आरोग्य शिबिरे

एमआयडीसी ही केवळ उद्योगांना भूखंड देणे आणि सुविधा देणे एवढ्यापुरतीच मर्यादित नाही तर या ठिकाणच्या लहान मोठ्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांप्रति देखील त्यांची बांधिलकी आहे. मोठे उद्योग त्यांच्या कामगारांसाठी आरोग्याची व्यवस्था करतात, मात्र लहान लहान असंख्य उद्योग घटकातील कामगारांची आरोग्य तपासणी होत नाही. समाजातील विविध घटकांसाठी आपण आरोग्य तपासणी मोहीम आणि शिबिरे राबवली जातात. त्याच धर्तीवर आता एमआयडीसीमार्फत आरोग्य विभागाच्या मदतीने औद्योगिक क्षेत्रातल्या सर्व कामगारांसाठी व्यापक प्रमाणात आरोग्य शिबिर घेऊन त्यांची व्यवस्थित वैद्यकीय तपासणी करून घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

एक जिल्हा एक उत्पादनाला क्लस्टरमार्फत गती

राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक तरी आगळे वेगळे उत्पादन असते. एक जिल्हा एक उत्पादनला गती देण्यासाठी त्या त्या जिल्ह्यात त्या त्या उत्पादकांचे क्लस्टर करावे. त्या उत्पादनांसाठी संशोधन आणि विकास ( आरएंडडी) केंद्र सुरू करावी , त्याला कौशल्य विकासाची जोड द्यावी जेणेकरून मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल असे सांगून उपमुख्यमंत्र्यांनी महाबळेश्वरचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, महाबळेश्वर भागात मध तसेच इतर वनौषधी आहेत. इथे सध्या फक्त पावसाळी शेती घेतली जाते मात्र संशोधन आणि विकास केंद्र उभारून इतर वनौषधीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेता येईल त्याचप्रमाणे प्रक्रिया उद्योगांची देखील सुरुवात करता येईल.

0000

मंदिरं सामाजिक समतेची केंद्र व्हावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तिरुपती, १७ :- मंदिरं ही श्रद्धेची स्थानं तर आहेतच. पण, ती पुरातन काळी जशी सामाजिक समतेची केंद्र होती, तशीच ती पुन्हा व्हावीत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

तिरुपती येथे आयोजित इंटरनॅशनल टेम्पल कन्व्हेन्शन आणि एक्स्पोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आचार्य गोविंददेव गिरी महाराज, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, आ. प्रसाद लाड, गिरीश कुळकर्णी, मेघना बोर्डीकर, विश्वजित राणे, प्रवीण दरेकर आदी यावेळी उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे हे ३०० वे जयंती वर्ष असून, त्यावर्षात हे आयोजन होत आहे, हा अतिशय चांगला योग आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या काळात परकीय आक्रमकांनी आपली संस्कृती ध्वस्त केली, त्यानंतर पूर्वेपासून पश्चिमेकडे आणि उत्तरेपासून दक्षिणेकडे मंदिर, घाटांचे पुननिर्माण अहिल्यादेवी होळकर यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर धर्माच्या पुनर्स्थापनेचे काम अहिल्यादेवींनी केले.

आज महाकुंभात ५० कोटी लोक स्नान करतात, पण, कुणी कुणाची जात, पंथ विचारत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सनातन जीवनपद्धतीला मोठे बळ दिले. भारत एकजूट आहे कारण, आम्ही सनातन संस्कृतीच्या समान धाग्याने बांधलेलो आहोत. मंदिर हे आपल्या समाजजीवनाचे अभिन्न अंग आहे. मंदिर हे केवळ पूजास्थळ नाही, तर सामाजिक परिवर्तनाचे, शिक्षणाचेही स्थळ आहे. मंदिरे ही पुरातन काळी सामाजिक समतेची स्थळे होती, तशीच पुन्हा ती व्हावीत. तिरुपती देवस्थान हे सरकारी ट्रस्ट आहे, महाराष्ट्रात श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगावचे खासगीतून व्यवस्थापन होते. दोन्ही व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरणे आहेत. या अधिवेशनात मंदिर व्यवस्थापन, भाविकांच्या सुविधा, गर्दीचे व्यवस्थापन, निर्माल्यप्रक्रिया, स्वच्छता अशा अनेक विषयांवर व्यापक मंथन होईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ५७ देशांमधून मंदिर व्यवस्थापन या परिषदेत सहभागी आहेत. यापूर्वी सकाळी तिरुपती येथे भगवान बालाजी यांचे दर्शनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले.

०००

राज्यातील २५ हजार विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

नांदेड ( किनवट ) दि. १७ फेब्रुवारी :- राज्यातील २५ हजार अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी वसतिगृह उभारणार असून, यात किनवट, माहूर व हिमायतनगरचा समावेश असेल, अशी घोषणा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी रात्री किनवट येथे केली.

किनवट येथील समतानगरात आयोजित चौदाव्या जागतिक धम्म परिषदेला मार्गदर्शन करताना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट बोलत होते. यावेळी किनवटचे आमदार भीमराव केराम, हदगावचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर ,उमरखेडचे माजी आमदार विजय खडसे, धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ.मोहनराव मोरे, संयोजक दया पाटील, अध्यक्ष सुनील भरणे आदींची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा शासनाचा मानस आहे.किनवटमध्ये १०० मुलांसाठी तर  माहूर व हिमायतनगरमध्ये १०० मुलींसाठी १५ ते २० कोटी रुपयांची वसतिगृह उभारण्यात येणार असून, येत्या ३ ते ४ महिन्यात या कामाच्या भूमिपुजनाला आपण स्वतः येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

किनवटमध्ये सातत्याने चौदा वर्षांपासून धम्म परिषद होते, ही बाब कौतुकास्पद आहे. बाबासाहेबांनी काय निर्माण केले, हे पाहायचे, ऐकायचे असेल, तर धम्म परिषदेत आले पाहिजे. समाज जागरुक होत असला, तरी समाजव्यवस्था परिपूर्ण नाही. अन्याय, अत्याचार सुरूच आहेत. समाजाने मागणारे नव्हे, तर देणारे व्हावे. बाबासाहेबांची ताकद इतकी प्रचंड आहे की, त्यांच्या नावाशिवाय राजकारणच होवू शकत नाही. समाजाने चिंता न करता संघर्षातून पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आमदार भिमराव केराम, आमदार बाबूराव कदम, विजय खडसे यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले. अॅड.सुनील येरेकार यांनी आभार मानले. मंत्री संजय शिरसाट यांनी शहरातील गजानन महाराज मंदिर तसेच संथागार वृद्धाश्रमास भेट दिली. त्यांच्यासमवेत महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

00000

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोतवालबड्डी दुर्घटनेतील कुटुंबीयांचे केले सांत्वन

 मृतकांच्या कुटुंबीयांना २० लाखांची मदत देण्याचे कंपनीला निर्देश

 जिल्ह्यातील सर्वच स्फोटक निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची काटेकोरपणे तपासणी होणार

नागपूर, दि.१७ : काटोल तालुक्यातील कोतवालबड्डी येथील एशियन फायर वर्क्स या कंपनीमध्ये दि. १६ फेब्रुवारी रोजी स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला तर तीन कामगार जखमी झाले होते. या दुर्घटनास्थळी आज महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले व घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. या प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्ह्यातील स्फोटक निर्मिती करणाऱ्या कंपन्या सुरक्षिततेचे पालन करीत आहे की नाही याची काटेकोरपणे तपासणी करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील सर्वच स्फोटके निर्मिती करणाऱ्या २३  कंपन्यांच्या सुरक्षिततेची संबंधित यंत्रणेने काटेकोरपणे तपासणी केली पाहिजे. स्फोटक निर्मिती कंपन्या या सदैव आव्हानात्मक परिस्थिती स्वीकारून तत्पर असायला हव्यात. त्यामुळे अशा अस्थापनांनी सुरक्षेची अतिशय काळजी घेण्याची गरज असते. वारंवार जर अशा घटना घडत असतील व यात जीवितहानी होत असेल तर संवेदनशील शासन म्हणून अशा घटना पुढे होऊ नयेत यासाठी तपासणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिले.

मृतकांच्या कुटुंबीयांना कंपनीतर्फे २० लाख तर जखमींना  ५ लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश कंपनी व्यवस्थापनाला पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिले. यासोबतच शासन नियमानुसार आवश्यक मदत देण्यात येणार असल्याचे ते पुढे म्हणाले.

कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना नियमानुसार पीएफ  उपलब्ध करून द्यावा, कुठल्याही कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवू नये असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) हर्ष पोद्दार, उपविभागीय अधिकारी पियूष चिवंडे,  पोलीस अधिकारी नरेश म्हस्के, कामगार विभागाचे सहाय्यक आयुक्त उज्वल लोया, तहसीलदार राजू रणवीर यांच्यासह कामगार, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

०००

वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या कर्ज योजनेची व्याप्ती वाढवावी- मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. १७ : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची कर्ज मर्यादा वाढविण्याबाबत प्रस्ताव तयार करून सादर करण्यात यावा. जेणेकरून योजनेची व्याप्ती वाढेल असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी  सांगितले.

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची १२६ वी बैठक इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात झाली. या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रताप पवार, तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत, संचालक मंडळाच्या १२५ व्या सभेच्या इतिवृत्तास व केलेल्या कार्यवाहीस मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर, बैठकीत युवक-युवतींकरिता कौशल्य विकास प्रशिक्षण आणि महिलांसाठी महिला समाज सिद्धी योजना सुरू करण्याबाबत, तसेच विभागातील सहायक संचालक यांची नेमणूक करण्याच्या विषयावर चर्चा झाली. त्याचप्रमाणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना करार पद्धतीने मानधनावर घेण्याबाबतही सूचना श्री.सावे यांनी दिल्या. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले, महामंडळाच्या कार्यप्रणाली अधिक सुलभ व प्रभावी बनवावी जेणेकरून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना याचा लाभ घेता येईल. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत एकूण १८ महामंडळे स्थापन करण्यात आली असून या सर्व महामंडळाची एक सारखी कार्यपद्धती तयार करावी.

0000

शैलजा पाटील/विसंअ

कर्जत, जामखेड तालुक्यातील जलसंधारण कामांना गती द्यावी-सभापती प्रा. राम शिंदे

मुंबई, दि. १७ :अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत व जामखेड तालुक्यात सुरू असणारी जलसंधारणाची कामे मार्च अखेर पूर्ण करण्याचे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

विधानभवनात अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत व जामखेड तालुक्यातील जलसंधारणाच्या मंजूर व पूर्ण झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मृद व जलसंधारण विभाग नाशिकचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गीते, पुण्याचे मुख्य अभियंता एस.पी.कुशिरे, जामखेडचे उप विभागीय जलसंधारण अधिकारी पी. एन. शिंदे, पारनेरचे जलसंधारण अधिकारी वाय. ए. अबिलवादे उपस्थित होते.

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, जामखेड तालुक्यातील जवळा-बारव येथील साठवण तलाव योजनेची निविदा प्रक्रिया २८ फेब्रुवारी अखेर पूर्ण करावी. यावेळी कर्जत तालुक्यातील  कामांचा तसेच १५१ कामांपैकी पूर्ण ६० आणि अन्य प्रगतीपथावरील ४५ कामांबाबत आणि जलसंधारण मंडळ, जलयुक्त  शिवार अभियान 2.0, अटल भूजल योजना, जलसंवर्धन योजना, गाळमुक्त शिवार योजना आदी बाबींचा आढावा घेण्यात आला.

000000

कर्जत व जामखेड तालुक्यातील रस्त्यांची तात्काळ पूर्ण करावी – सभापती प्रा.राम शिंदे

वन विभागासह संबंधित विभागाच्या परवानग्या तातडीने घ्याव्यात

मुंबई, दि. १७ : जामखेड – कर्जत – श्रीगोंदा राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी तसेच कर्जत व जामखेड तालुक्यातील राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग संदर्भातील सर्व प्रलंबित रस्त्यांची कामे, दुरूस्ती कामे मार्च २०२५ अखेरपर्यंत तातडीने पूर्ण करण्यात यावीत. वन विभागाकडून प्राप्त करावयाच्या आवश्यक परवानग्या विनाविलंब प्राप्त करण्यात याव्यात. वाहतूक व दळणवळण संदर्भात रहिवाशांची, प्रवाशांची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश विधानपरिषदचे सभापती  प्रा.राम शिंदे यांनी दिले.

विधानभवन येथील दालनात कर्जत-जामखेड (जि.अहिल्यानगर) मधील सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग, वन विभाग यांच्या अधिकाऱ्यांची प्रलंबित कामांसंदर्भातील आढावा बैठक झाली. त्यावेळी विधानपरिषदचे सभापती प्रा.राम शिंदे बोलत होते.

तुकाई उपसा सिंचन योजना व श्रीगोंदा-वालवड-जामखेड राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी व कर्जत व जामखेड तालुक्यातील राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग रस्त्यांची कामे  यासंदर्भात वन विभागाकडून प्राप्त करावयाच्या आवश्यक परवानग्या विनाविलंब प्राप्त करण्यात याव्यात. या संदर्भात विलंब झाल्यास त्याबाबतची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करून कारवाई केली जाईल. यासंदर्भात पुढील बैठक वनमंत्री यांचेसमवेत घेण्यात येणार असल्याचेही सभापती प्रा. शिंदे यांनी सांगितले.

अढळगाव ते जामखेड, रांजनगाव ते उखलगाव, श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी श्रीगोंदा, देऊळगाव, मांडवगणरस्ता, न्हावरा-इनामगांव-काष्टी-श्रीगोंदा-जामखेड रस्ता, मौजे डोकेवाडी, भावडी, बिकटकेवाडी, माळवाडी, वालवड व सुपे (जि. अहिल्यानगर) येथील वनविभागालगत व वनविभागात असणाऱ्या रस्त्यांची दुरूस्ती, अढळगाव ते जामखेड,नेटकेवाडी-कुंभेफळ-अळसुंदे या रस्त्यांची कामे, दुरूस्ती मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याबाबतचे आदेश सभापती प्रा. शिंदे यांनी दिले.

बैठकीस अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) डॉ.व्ही.बेन, उप वन संरक्षक तुषार चव्हाण, वन्यजीव पुणे साल विठ्ठल, विभागीय वन अधिकारी, अहिल्यानगर, अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, सहाय्यक अभियंता प्रशांत वाकचौरे, उपविभागीय अभियंता शशिकांत सुतार  उपस्थित होते.

0000

मोहिनी राणे/ससं/

अंगणवाडीत साजरी होणार शिवजयंती- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. १७ : राज्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये शिवजयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

१९ फेब्रुवारी रोजी निमित्त राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यावेळी अंगणवाडीतील बालकांनाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची महती समजावी व त्यांच्या बालमनावर महाराजांच्या कार्याचे संस्कार व्हावे, याकरिता अंगणवाड्यांमध्येही मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात येणार आहे. यावेळी बालकांना शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या गोष्टी सांगण्यात येतील तसेच राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान असे अनुषांगिक उपक्रमही घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

000

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

राज्यपाल, उदय सामंत यांच्या उपस्थितीत ‘आम्ही असू अभिजात’चे प्रकाशन

राज्यपाल राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत मराठी साहित्य संमेलन गीताचे राजभवन येथे उदघाटन संपन्न

मुंबई, दि. १७ : नवी दिल्ली येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त तयार करण्यात आलेल्या संमेलन गीताचे प्रकाशन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते तसेच उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन, मुंबई येथे करण्यात आले.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रित करण्यात आलेल्या या गीतासोबत राज्याचा गौरवशाली इतिहास दाखविण्यात आला आहे.

सन २०२४ या वर्षात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे हे वर्ष मराठी भाषेकरिता अतिशय संस्मरणीय झाले आहे. मराठी भाषेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे प्रादेशिक भाषांच्या संवर्धनासाठी सर्वांनाच कसोशीने प्रयत्न करावे लागतील नाहीतर प्रादेशिक भाषा केवळ बोलण्याच्या  भाषा राहतील असे राज्यपालांनी सांगितले.

मराठी भाषा ही संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, यांची भाषा असून या भाषेसोबत नैतिक मूल्ये व संस्कार जोडले असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची देखील भाषा असून त्यांचे समाजासाठी योगदान अनन्यसाधारण आहे, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काही पिढ्या गेल्यानंतर आपण आपली संस्कृती विसरून गेलो असतो व इतर संस्कृती अंगिकारली असती. तामिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी फार लढावे लागले होते व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तामिळ भाषेला अभिजात दर्जा बहाल केला होता असे सांगून मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल केल्याबद्दल राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र शासनाचे आभार मानले. पंतप्रधान स्वतः प्रादेशिक भाषांचा संवर्धनाला प्रोत्साहन देत असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात देखील मातृभाषेतून शिक्षणाला महत्व देण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

‘आम्ही असू अभिजात’ या संमेलन गीताचे गीतकार डॉ. अमोल देवळेकर, संगीतकार आनंदी विकास, गायक मंगेश बोरगावकर, समन्वयक विकास सोनताटे, तसेच आयोजक संस्थेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

संमेलन गीत ज्येष्ठ गायक हरिहरन, शंकर महादेवन, प्रियंका बर्वे, मंगेश बोरगावकर, शमीमा अख्तर आदींनी गेले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

००००

Maha Governor releases Sammelan Song of All India Marathi Literary Meet

Mumbai 17 : Maharashtra Governor C P Radhakrishnan accompanied by Minister of Industries and Marathi language Uday Samant released the ‘Sammelan Geet’ of the 98th edition of the Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan at Raj Bhavan Mumbai on Mon (17 Feb).

The All India Marathi Literary Meet is being held in New Delhi from 21st to 23rd February

The Sammelan Song has been sung by playback singer Hariharan, Shankar Mahadevan, Priyanka Barve, Mangesh Borgaonkar, Shamima Akhtar among others.

Lyricist of the Sammelan Geet ‘Aamhi Asu Abhijat’ Dr. Amol Deolkear, Music Composer Anandi Vikas, Singer Mangesh Borgaonkar, Coordinator Vikas Sontate and Members of organizing committee were present.

००००

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. 7 : मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. महामार्गाच्या संदर्भात विधानभवनात...

पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी घेतली केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार...

0
नवी दिल्ली 7 : महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा पिकाचे उत्त्पन्न घेतात. केंद्र शासनाने या शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी पणन मंत्री...

अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ७ : राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठ आणि अशासकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदे भरल्यास नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनुसार उच्च शिक्षणाची गुणवत्ता...

पनवेल व उरणमधील आदिवासी बांधवांचे नियोजनबद्धरित्या पुनर्वसन करावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

0
मुंबई, दि. 7 : पनवेल व उरण तालुक्यातील सिडको परिक्षेत्रात वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांचे पुनर्वसन नियोजनबद्धरीत्या करण्यात यावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले. आदिवासी...

मिरा-भाईंदर येथील ‘पंडित भीमसेन जोशी’ शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधांची कामे वेळत पूर्ण करावी – सार्वजनिक आरोग्य...

0
मुंबई, दि. 7 : मिरा-भाईंदर शहरातील ‘पंडित भीमसेन जोशी’ शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत, तसेच तांत्रिकदृष्ट्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही...