सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 311

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे लेखन अनमोल ठेवा…

संताची कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ, समर्थ रामदास स्वामी, संत जनाबाई, सोयराबाई यांच्या माध्यमातून १२ व्या शतकापासुन आजपर्यंत येथे मराठी भाषा रुजली. अभंग त्यांचे उपदेश आजच्या युगातही समाजाला मार्गदर्शक ठरतात. पुढे मराठीला अनेक जणांनी विविध माध्यमातून समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे हे त्यापैकी एक अग्रगण्य नाव म्हणता येईल…

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि मराठी भाषा

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा जन्म १२ जुलै, १८६४ चा आणि मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले ११ मे, १८७८ रोजी. येथून मराठी साहित्य संमेलनाची परंपरा सुरु झाली.

राजवाडे पुण्यात बीए उत्तीर्ण झाले. डेक्कन आणि एलफिस्टनमध्ये त्यांनी नोकरी केली. डेक्कनमध्ये त्यांनी इंग्रजी विषयाचा अभ्यास केला. ते सर्वभाषा तज्ज्ञ होते. इंग्रजी, पारसी, मोडी, गणित, विज्ञान, मराठी यासह त्यांनी कोपर्निकस, आर्थेलो टेनीसन, शेक्सपीअर, रसेल असे नामांकित लेखक आणि कवी यांचा अभ्यास केला होता. त्यांचे भांषातर करावे म्हणुन राजवाडे यांनी भांषातर मासिक सुरु केले. या सर्वाचे मराठी भांषातर करुन त्यात ते प्रसिध्द करीत असत. परंतु, विष्णुशास्त्री चिपळुणकरांची निंबधमाला राजवाडे यांच्या वाचण्यात आली आणि त्यांनी इंग्रजी लिखाण बंद केले. ज्याला माझ्या लिखाणाची आवड, वाचन, गरज असेल त्यांनी मराठी वाचावे. अशी जणू प्रतिज्ञा केली आणि त्यांचे लिखाण मराठीत सुरु झाले. त्यांचे मराठ्यांच्या इतिहासाची साधने 22 खंड त्यांच्या हयातीतच प्रकाशित केले. हे इतिहासाचे प्रचंड काम त्यांनी करुन ठेवले. आता तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. हे कौतुक पहावयास राजवाडे नाहीत. त्यांना इंग्रजीची चीड होती, असे म्हणून चालणार नाही. त्यांना स्वातंत्र्य हवे होते. कारण ते त्यांच्या चरित्रात खंत व्यक्त करतात की, आजची तरुण पिढी स्वातंत्र्यासाठी का लढत नाही. कारण ते जिथे शिकले तेथे इंग्रजी विद्यार्थी मोठ्या संख्येने होते. तो काळ पारतंत्र्याचा होता.

त्यांनी इतिहास हा इंग्रजीत लिहीला असता तर राजवाडे परदेशातही खूप प्रसिद्ध झाले असते, म्हणून ते म्हणतात मला प्रसिद्धीची हाव नाही. ज्याला गरज असेल तो माझे मराठीतील साहित्य वाचेल. ज्ञार्नाजनाची हौस असेल तर पाश्यात्य लोक माझी मराठी भाषा शिकतील, मी कीर्तिसाठी हपापलेला नाही.

राजवाडे यांना मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले नाही, याचे मात्र दु:ख होते. पण त्याची राजवाडे यांना पर्वाही नव्हती.

न्यायमुर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पहिले संमेलन पुणे येथे ११ मे १८७८ रोजी पुणे येथे भरले होते. न्यायमुर्ती रानडे आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या प्रेरणेने साहित्य संमेलनाला प्रारंभ झाला. ग्रंथकारांनी भरपूर ग्रंथ लिहावे व वाचकांनी भरपूर वाचन करावे, हाच याचा मुख्य हेतू होता.

दुसरे साहित्य संमेलन २४ मे, १८८५ रोजी सार्वजनिक संस्थेच्या जोशी सभागृहात झाले. वेदशास्त्री कृष्णशास्त्री राजवाडे हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. यावेळी महात्मा जोतिबा फुले, जंगली महाराज, डॉ. कानोबा रामछोडदास, महादेव चिमणाजी आपटे यांनी काही सूचना पाठविल्या होत्या.

कादंबरी, कथा, कविता, गझल याचा सगळा सार ग्रंथातच असतो. ग्रंथ वाचन करताना सुख दु:खाच्या गोष्टी कळतात. नवी पिढी, युवकांपर्यंत मराठी साहित्याबद्दल अधिक जवळीकता निर्माण व्हावी. सकारात्मता निर्माण व्हावी आणि वाचन चळवळ वाढावी या उद्देशाने 98 व्या साहित्य संमेलनात चर्चासत्रेही होणार आहे.

आता तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. भारताच्या प्रमुख भाषांमध्ये आता मराठी सन्मानाने विराजमान झालेली आहे. मराठीच्या दृष्टीने या साहित्य संमेलनातून निश्चितच काही तरी चांगले यश मिळेल असे वाटते.

तिसरे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे सन १९०५ या वर्षी झाले. या दरम्यान २० वर्षांचा कालवधी गेला. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी दादासाहेब करंदीकर होते. चौथे संमेलन पुणे येथे झाले. वि. वा. शिरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यातील मडगाव येथे १९६४ मध्ये संमेलन झाले. १९६५ मध्ये वा. ल. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली हैदराबाद येथे साहित्य संमेलन झाले. लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर, वि. का. राजवाडे यांना मात्र संमेलनाध्यक्षपद मिळाले नाही.

पहिल्या २७ वर्षात तीन संमेलने झाली. नंतर 1909 ते 1926 दरम्यानही संमेलने झाली नाहीत. पुढे मात्र एखाद्या वर्षाचा अपवाद वगळता संमेलने नियमित भरु लागली.

साहित्य संमेलने आजही महत्त्वाची आहेत. यामुळे विविध ग्रंथांची माहिती मिळते. वाचनप्रेमींकडून ग्रंथाची मोठ्या प्रमाणावर खरेदी होते. विचारांचे आदान प्रदान होते, चर्चासत्रे होतात याचा फायदा होतो.

2027-28 मध्ये वि. का. राजवाडे यांची १०० वी पुण्यतिथी आहे त्या पार्श्वभूमीवर १०० वे साहित्य संमेलन धुळे येथे व्हावे, अशी अपेक्षा आहे.

०००

  • श्रीपाद नांदेडकर, माजी जिल्हा माहिती अधिकारी, 9833421127

 

साहित्य संमेलने:परंपरा आणि परिप्रेक्ष

साहित्यसंमेलनाची परंपरा आता शतकी वाटचाल करीत आहे. मात्र या परंपरेत अनेक परिप्रेक्ष या साहित्यसंमेलने आणि त्यातून निर्माण होणाऱ्या साहित्य प्रवाह, संमेलनांचे स्वरुप, त्यातून व्यक्त होणारे विषय याबाबत अनेक परिप्रेक्ष तयार होतांना दिसतात. त्याचाच धांडोळा घेतलाय ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यीक प्रशांत गौतम यांनी.
नवी दिल्ली येथे ७२ वर्षापूर्वी ऑक्टोंबर महिन्यात ५४ वे साहित्य संमेलन झाले होते. तेव्हा,महाराष्ट्र राज्याची निर्मितीही झाली नव्हती,आणि अ.भा.मराठी साहित्य महामंडळही अस्तित्वात नव्हते. या ५४ व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरु यांनी केले होते. अध्यक्ष होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी,आणि स्वागताध्यक्ष होते,काकासाहेब गाडगीळ. त्यानंतर दिल्लीत साहित्यसंमेलन होत आहे ते यंदाच. ९८ व्या संमेलनासाठी उद्घाटक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी लाभले आहेत,अध्यक्षपदाचा बहुमान डॉ.ताराबाई भवाळकर यांना मिळाला आहे.तर स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार आहेत.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला,त्या अनुषंगाने देशाच्या राजधानीत होणाऱ्या साहित्य संमेलनास महत्व आहे.
दोन मराठी माणसं एकत्र आली की साहित्य संस्था निर्माण होतात, असे म्हणतात ते खरेच आहे. आधीच्या काळात तेच होते, आणि आताच्या काळात ही तेच आहे. यात काहीही बदल झालेला नाही. संस्था व संमेलने वर्धिष्णू असतात. वर्षानुवर्ष हा साहित्याचा प्रवाह हा अखंड सुरुच असतात. साहित्य संमेलनाची परंपरा आता शतकाकडे जाते आहे. या प्रदिर्घ कालखंडात किती तरी बदल झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी भाषेचे अस्तित्व टिकवण्यासाठी संस्था आल्या. नंतर त्यांचा विस्तार झाला. पुढील काळात याच साहित्य संस्थांचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अस्तित्वात आले. संमेलने त्या आधीही ‘ग्रंथकार संमेलन, महाराष्ट्र साहित्य संमेलन’,या नावाने भरतच होती. तेव्हा निवडणूक नव्हती.
१९६४ साली अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय झाला,आणि १९६५ साली महामंडळाचे पहिले संमेलन हैदराबादेत समीक्षक प्रा.वा.ल कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली भरले. तेव्हा पासून ही परंपरा अखंडीत आहे.
नवी दिल्लीत तर यंदाचे संमेलन ७२ वर्षाने होत आहे. हे संमेलन झाले तेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मितीही झाली नव्हती. तो काळ संयुक्त महाराष्ट्र चळवळीने भारावलेला होता. दिल्लीचे संमेलन १९५४ साली झाले आणि १ मे १९६० साली महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. आणि मराठी साहित्यात साठोत्तरी प्रवाह यायला सुरूवात झाली.
मराठवाड्याच्या संदर्भात सांगायचे तर आजपर्यंत मराठवाड्यात झालेल्या सात संमेलनाचे अध्यक्षपद मराठवाड्याबाहेरील लेखकांनी भूषवले. केवळ एका संमेलनाचे अध्यक्षपद भूमीपुत्र भारत सासणे यांनी भूषवले. अनंत काणेकर (छत्रपती संभाजीनगर), शंकर पाटील (नांदेड), व्यंकटेश माडगुळकर (अंबाजोगाई), नारायण सुर्वे (परभणी), प्रा.द.मा.मिरासदार (परळी), प्रा.रा.ग.जाधव (छत्रपती संभाजीनगर), फादर फ्रान्सिस दिब्रिटो (धाराशीव), भारत सासणे (उदगीर) असे सांगता येईल. तर मराठवाड्यातील लेखक डॉ.यू.म.पठाण (पुणे), डॉ.नागनाथ कोत्तापल्ले (चिपळून), प्रा.फ.मु.शिंदे(सासवड), लक्ष्मीकांत देशमुख (बडोदा), डॉ.श्रीपाल सबनीस (पिंपरी-चिंचवड), नरेंद्र चपळगावकर(वर्धा) येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
मराठी साहित्य संस्कृती,कशी असते हे पाहयचे असेल तर साहित्य संमेलन चळवळीचा इतिहास आणि सद्याचे वर्तमान बघायला हवे. जगात मराठी ही अशी भाषा आहे की फक्त तिचाच साहित्य संमेलनाचा उत्सव उदंड उत्साहात होत असतो. आज सर्वाधिक साहित्य संमेलने ही मराठी भाषेचीच होतात. तालुका, जिल्हा, विभाग, राज्य पातळीवर तर मोठ्या संख्येने संमेलने होतात. विश्व मराठी साहित्य संमेलन होतात; पण कायम लक्षात राहातात ती प्रतिवर्षी होणारी अ.भा.मराठी साहित्य संमेलने. ही संमेलने नव्या-जुन्या लेखकांना हक्काचे व्यासपीठ देतात, वाचकांना आपल्या आवडीचा लेखक भेटतो आणि ग्रंथ प्रदर्शनातून त्याचे आवडीचे पुस्तक मिळते. अशा ग्रंथ प्रदर्शनातून प्रकाशकांनाही फायदा होतो.
१९८९ साली पहिली जागतिक मराठी साहित्य परिषद मुंबईयेथे कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. नंतरच्या काळातही सातत्य राहिले. साहित्य महामंडळानेही अशा तीन चार जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. यात गाजले ते सॅन होजे व (अमेरिका), दुबई येथील संमेलन, या निमित्ताने मराठीचा झेंडा साता समुद्रापार फडकला. राज्य सरकारने प्रतिवर्षी जिल्हा व विभागीय स्तरावर मराठी साहित्य संमेलन भरवण्याचा चांगला उपक्रम सुरू केला आहे. छोट्या व आटोपशीर संमेलनास प्रतिसादही उत्तम लाभतो. तसेच राज्य सरकारने तीन विश्व मराठी साहित्य संमेलनं आयोजित केली. मुंबई, नवी मुंबई आणि पुणे. पुण्यात नुकत्याच झालेल्या विश्वसंमेलनात तर कोट्यावधीची आर्थिक उलाढाल झाली, विक्रमी पुस्तक विक्री झाली. म्हणून प्रत्येक रसिक,वाचकांना साहित्य संमेलनाची उत्सुकता असते,तशी देशाच्या राजधानीत होणाऱ्या संमेलनाचीही आहे.
बृहन्महाराष्ट्रातील संमेलने
या मराठी साहित्य संमेलनास अनेक परंपरा आहेत. या ९८ वर्षातील २४ संमेलनं ही महाराष्ट्रा बाहेर झालेली आहेत. बडोदे, इंदूर, ग्वाल्हेर, बेळगाव, मडगाव, हैदराबाद, कारवार, अहमदाबाद, नवी दिल्ली, भोपाळ, रायपूर(छत्तीस गड) पणजी, घुमान(पंजाब) यातील काही ठिकाणी दोन-तीन वेळा संमेलने भरली आहेत. बृहन्महाराष्ट्रात तर बडोदा येथील वाड.मय परिषद यांची संमेलन वाटचाल अमृत महोत्सवाकडे सुरू आहे. नवी दिल्ली येथील बृहन्महाराष्ट्र मंडळाचीही तेवढीच अधिवेशनं झालीत. या शिवाय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनंही एका काळात भरली होती.
परंपरेची रुजुवात
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सुरू केलेली १८७८ पासून सुरु असलेली ही परंपरा अखंडीत राहिली असती, त्यात सातत्य राहिले असते तर दिल्लीचे संमेलन हे ९८ ऐवजी १४७ वे ठरले असते. या प्रवाहात विविध कारणाने खंड पडला; हे मात्र खरे. स्वातंत्र्यपूर्व काळात संमेलनाचे आयोजन करणे ही साधी बाब नव्हती, त्यावर मात करीत संमेलन सातत्य राखण्याचा प्रयत्न तत्कालीन लेखक व कार्यकर्त्यांनी केला होता. तेव्हा पासूनचा आज पर्यंतचा साहित्य संमेलनाचा प्रवास फारच रंजक आहे,कसा तो आपण जाणून घेवू या!
साहित्यसंमेलनांची परंपरा
यंदाच्या संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. ताराबाई भवाळकर या नियोजित आहेत. आयोजक पुण्यातील सरहद्द संस्था आहे.संजय नहार हे संस्थापक अध्यक्ष आहेत. सरहद्दचे कश्मीर भागात उत्तम,शैक्षणिक, सामाजिक काम आहे. याच आयोजकांनी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली घुमान येथील ८८ वे साहित्य संमेलन चांगले आयोजित केले होते. नंतरच्या वर्षी बहुभाषा संमेलनही डॉ.गणेश देवी यांच्या अध्यक्षतेखाली घुमान येथेच घेतले होते. दिल्ली येथील साहित्य संमेलनाचेही तेच आयोजक आहेत.
पहिले मराठी साहित्य संमेलन ७ फेब्रुवारी १८७८ या दिवशी पुण्यात न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. या संदर्भात “ज्ञानप्रकाश ” या नियतकालिकात रानडे आणि लोकहितवादी(गोपाळ हरी देशमुख)यांचे संयुक्त निवेदन प्रसिध्द झाले. ग्रंथकार संमेलन भरविण्याचा प्रस्ताव आला, त्यास ५० साहित्यिकांचा पाठिंबा होता. खरे तर रानडे यांचे एकही पुस्तक नसले तरी त्यांनीच संमेलनाचे अध्यक्षपद भूषवावे, असा लोकहितवादींसह अन्य प्रतिष्ठीत लेखकांचा आग्रह होता. २४ मे १८८५ या दिवशी पुण्यात दुसरे ग्रंथकार संमेलन झाले. कृष्णाशास्त्री राजवाडे हे अध्यक्ष होते. संमेलनासाठी न्या.रानडे यांनी पुढाकार घेतला होता.
तो काळ होता संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा. साल होते १९५७. तत्कालीन औरंगाबाद आणि आताचे छत्रपती संभाजनगर येथे लघुनिबंधकार अनंत काणेकर यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन सरस्वती भुवन प्रशालेत झाले. मराठी साहित्यातील ऐकापेक्षा एक दिग्गज लेखक-दत्तो वामन पोतदार, कुसुमाग्रज, आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे, वसंत बापट, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर अशी ग्रेट मंडळी हजर होती. यात “,संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे “,असा ठराव मंजूर झाला. पु.ल.देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली इचलकरंजीत सुवर्ण महोत्सवी संमेलन झाले. कराडला जेव्हा १९७५ साली आणीबाणीच्या काळात जे अ.भा.मराठी साहित्य संमेलन झाले. त्याच्या अध्यक्ष दुर्गाबाई भागवत तर स्वागताध्यक्ष यशवंतराव चव्हाण होते. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या प्रश्नाने पुण्यातील पु.भा.भावे यांच्या अध्यक्षते खालचे व कथालेखक वा.कृ.चोरघडे यांच्या अध्यक्षतेखालचे चंद्रपुर येथील संमेलन फारच गाजले होते. १९८१ मध्ये ५६ वे संमेलन मध्यप्रदेशात रायपूर येथे झाले.अध्यक्ष होते गंगाधर गाडगीळ. नगर येथे झालेले संमेलन उंचीवर नेणारेच होते. ऐतिहासिक कादंबरीकार ना.स.इनामदार अध्यक्ष होते. गुलजार उद्घाटक तर गिरीष कर्नाड समारोपात होते. एप्रिल १९९८ मध्ये परळी वैजनाथ येथे साहित्यसंमेलन झाले. द.मा.मिरासदार हे संमेलनाचे अध्यक्ष होते. समारोपात ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखिका महाश्वेतादेवी हजर होत्या.आशा भोसले यांच्या गाण्यांची मैफल रंगली होती, अशा प्रकारे सामाजिक प्रश्नांवरही साहित्यसंमेलनातून भुमिका मांडण्यात आली आहे.
महिला अध्यक्षांची परंपरा
शतकाकडे वाटचाल करणाऱ्या या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून महिलांना मान मिळाला तो सहा महिला साहित्यिकांना. कुसुमावती देशपांडे(ग्वाल्हेर), दुर्गा भागवत(कराड), शांताबाई शेळके(आळंदी), डॉ.विजया राजाध्यक्ष(इंदूर), डॉ.अरुणा ढेरे(वर्धा)आणि आत्ताच्या संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉ.ताराबाई भवाळकर(नवी दिल्ली).
संमेलन गाजतात लक्षात राहातात ती उत्तम नियोजन,भोजन व्यवस्थेमुळे. अशा संमेलनातून ग्रंथ विक्री उदंड होते,ती संमेलने यशस्वी होतात. संमेलन म्हटले की वाद-विवाद सोबतच येतात. असे असले तरी जगभरातील मराठी भाषक संमेलनावर फार प्रेम करतो,गर्दी करतो. संमेलन येण्याची उत्सुकता साहित्यप्रेमी वाचकांना असते आणि संमेलन संपले की रिकाम्या मांडवाकडे पाहून हुरहुर वाटते,आणि काही दिवसांनी पुन्हा संमेलनाचे दिवस आनंद घेवून येतात..
लेखक- प्रशांत गौतम.
(लेखक हे साहित्यिक,ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
०००००

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे ते दिल्ली यादरम्यान महादजी शिंदे यांच्या नावाने विशेष रेल्वे सेवा-डॉ.किरण कुलकर्णी

पुणे, दि.१७: दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर या संमेलनात सहभागी होणाऱ्या साहित्य रसिकांसाठी पुणे ते दिल्ली यादरम्यान महादजी शिंदे एक्सप्रेस ही विशेष रेल्वे सेवा सुरु करण्यात येणार आहे, ही विशेष रेल्वे १९ फेब्रुवारी रोजी दुपारी पुण्यातून निघणार असून २० फेब्रुवारी रोजी रात्री दिल्ली येथे पोहोचणार आहे, अशी माहिती मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांनी दिली आहे.

दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी, ताल कटोरा स्टेडियम येथे हे संमेलन होत आहे. या साहित्य समेंलनात सहभागी होणाऱ्या साहित्य रसिकांकरीता सुरु करण्यात येणाऱ्या या रेल्वेच्या डब्यांना गडकिल्यांची नावे देण्यात येणार आहे.

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर प्रवासी साहित्य संमेलन या संकल्पनेतून ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’ आयोजित करण्यात येणार आहे. मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत होणारे हे मराठीतील पहिलेच आणि जगातील सर्वात मोठे आणि दिर्घ साहित्य संमेलन असणार आहे.

पुणे-दिल्ली प्रवासादरम्यान रंगणार ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’

साहित्यरसिकांना पुण्यातून दिल्लीला घेऊन जाणाऱ्या रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव देण्यात येणार असून या विशेष रेल्वेला १६ डब्बे असणार असून डब्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची नावे दिली जाणार आहेत. राज्याचे मराठी भाषामंत्री उदय सामंत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून तेही ‘मराठी साहित्ययात्री संमेलनात’सहभागी होत आहेत. ते या रेल्वेद्वारे प्रवास करणार करणार आहेत आणि साहित्यिक, कलावंतांशी ते संवाद साधणार आहेत. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका डॉ. संगीता बर्वे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रवासा दरम्यान प्रत्येक बोगीत विविध साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

युवा साहित्यिक व कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ‘मराठी साहित्ययात्री संमेलन भरविण्यात येत आहे.‘मराठी साहित्ययात्री संमेलनात’महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गावा-गावांमधून साहित्यिक, युवक, लोककलाकार, स्टँडअप कॉमेडियन्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स तसेच शाहिर व भजनी मंडळांचा मोठ्या संख्येने सहभागी होणर आहे. मोठ्या प्रमाणात तरुणांच्या सहभागामुळे हे संमेलन तरुणाईचे संमेलन ठरणार आहे.

१९ रोजी असलेल्या शिवजयंतीचे औचित्य साधून सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनानंतर पुण्यातून रेल्वे निघणार आहे. तत्पूर्वी पुस्तक दिंडीही काढली जाणार आहे. याच रेल्वे प्रवासात १ हजार २०० पेक्षा अधिक साहित्यिक येणार असून जळगाव आणि ग्वाल्हेर येथे ही विशेष रेल्वे पोहोचल्यानंतर ग्वाल्हेर येथील स्थानिक नागरिक भव्य स्वागत करणार आहेत. रेल्वे २० फेब्रुवारी रोजी दिल्लीत पोहोचणार असून दिल्ली स्थानकावर पोहोचल्यानंतर पसायदानाने ‘मराठी साहित्ययात्री संमेलना’ची व पहिल्या टप्प्यातील प्रवासाची सांगता होणार आहे. या वेळी दिल्लीतील मराठीजन मोठ्या संख्येने स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत. परतीच्या प्रवासात देखील हे संमेलन रंगणार असून २५ फेब्रुवारी रोजी पुणे रेल्वे स्थानकावर या संमेलनाची समारोप होणार आहे.

या अभिनव उपक्रमाची संकल्पना सरहद, पुणेचे अध्यक्ष संजय नहार यांची आहे. संमेलनाच्या निमित्ताने स्वतंत्र संयोजन समितीची स्थापना करण्यात आली आहे. रावण द आंत्रप्रिन्युअर या पुस्तकांचे लेखक शरद तांदळे यांची संमेलनाध्यक्ष तर वंदेमातरम् संघटनेचे अध्यक्ष व व्हायरल माणुसकी या पुस्तकाचे लेखक वैभव वाघ हे संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. डॉ. शरद गोरे (कार्याध्यक्ष), सचिन जामगे (कार्यवाह), ॲड. अनिश पाडेकर, सोमनाथ चोथे, गणेश बेंद्रे (मुख्य समन्वयक), अक्षय बिक्कड, सागर काकडे (निमंत्रक) यांचा कार्यकारिणीत समावेश आहे, अशी माहिती डॉ. कुलकर्णी यांनी दिली आहे.

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नांदेड येथे उत्सुकता

मराठी सारस्वतांचा महामेळाव्याला लेखक, प्रकाशक व भाषा तज्ज्ञांच्या शुभेच्छा

नांदेड दि. १७ फेब्रुवारी  :- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आणि त्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीत 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य होणे हा दुग्ध शर्करा योग आहे. या साहित्य संमेलनाला मराठी साहित्यिक, सारस्वतांचा महामेळावा दिल्लीत भरणार असून मराठी व अमराठी रसिकांसाठी ही आनंदाची पर्वणी ठरणार आहे. यानिमित्ताने नांदेड येथील लेखक, साहित्यिक, संपादक यांनी या संमेलनाला उपस्थित राहून अनेक ग्रंथसंपदाचा आनंद घेणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.

तमाम मराठी साहित्यिक, रसिक या संमेलनाची आतुरतेने वाट पाहत असतो. आता तो क्षण समिप आला आहे. या क्षणाला साक्षीदार होण्यासाठी अनेक मराठी साहित्यिक, रसिक, वाचक दिल्ली येथे हजेरी लावणार आहेत. अशा नांदेड जिल्ह्यातील कवि, विचारवंत, मराठी साहित्यीकांच्या बोलक्या प्रतिक्रीया ….

नांदेड येथील मराठी भाषा प्रमुख प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर हे सांगतात की , ‘माझी मराठी मराठाच मी’ ना.गा. नांदापूरकर यांच्या कवितेतून स्वातंत्र्यपूर्व काळात दिलेली निजामी राजवटी विरोधात घोषणा या 98 व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आठवण होते. एके काळी मराठयांनी आपला सैन्य तळ दिल्लीत ठोकला होता, त्याच ठिकाणी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर साहित्य संमेलन होत आहे. मराठीवर प्रेम करणाऱ्या, सर्व व्यक्तीसाठी तसेच मराठी संस्कृतीचा आग्रह धरणाऱ्यासाठी ही घटना महत्वाची आहे. दिल्ली येथे साहित्य संमेलनाच्या माध्यमातून उच्चारला जाणारा आवाज जगभर जावा ही मराठी भाषा, संस्कृतीची पताका जगभर फडकविण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासोबत त्यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऋण व्यक्त केले आहे.

ज्येष्ठ साहित्यिक ,कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर या सांगतात की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जोरदार तयारी दिल्ली येथे सुरु आहे. याचा मला मनस्वी आनंद आहे. मराठी भाषा संत ज्ञानेश्वरानी म्हटल्यासारखे अमृता सोबत पैज जिंकल्यासारखे मधुर आहे. या संमेलनाला मराठी, अमराठी भाषिकांनी पहावे, एकावे, मराठीची मधूरता चाखावी असे आवाहनही त्यांनी केले. साहित्य संमेलन व मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर प्रत्येक मराठी माणसाने अचूक मराठी बोलावे, इतर भाषेचे शब्द न वापरता शुध्द मराठी भाषा बोलावी. यामुळे मराठी भाषा जगणार आहे. तसेच या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा साहित्यिक मा. डॉ. ता.रा. भवाळकर यांची निवड झाल्याबाबात त्यांना कवयित्री डॉ. किन्हाळकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

कवि कादंबरीकर मनोज बोरगावकर यांनी या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केले आहेत की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यादाच दिल्लीत ९८ वे मराठी साहित्य संमेलन होत आहे. याबाबत त्यांनी केंद्र शासनाचे आभार मानले असून दिल्लीकराचे स्वागत केले आहे.

विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, म्हणून तीजला भिती नव्हती पराभवाची

जन्मासाठी नव्हती कधी हटून बसली, म्हणून तिजला नव्हती मरणाची या सुंदर भावनेने साहित्यीकांचा हात लिहता राहतो. खेड्यात लहान मुले जसे जत्रेची आतुरतेने वाट पाहत असतात. तसा तमाम मराठी साहित्यिक या संमेलनाची वाट पाहत असतो. आज हा सोहळा दिल्लीत असून यानिमित्ताने सर्व साहित्यीकांना भेटता येईल, विचाराची शिदोरी बरोबर घेता येईलअसे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रकाशक, संपादक, राम शेवडीकर यांनी या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी सारस्वतांचा मेळावा दिल्लीत भरणार असून यांचे आकर्षण तर सर्वाना आहेच, तसेच अभिमान ही वाटतो असे सांगितले. तसेच दिल्लीत मराठीचा झेंडा असाच उंच फडकत राहो अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या साहित्य संमेलनाच्या सर्व मराठी, अमराठी भाषिकांना शुभेच्छा दिल्या.

जिल्हा मराठी भाषा समितीच्या सदस्या प्रा. प्रतिक्षा तालंगकर या आपल्या शब्दातून व्यक्त होतात की, ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ ही कवी कल्पना नसून वास्तव आहे. 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने हे दाखवून दिलेले आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ज्या मराठी माणसाची मुले इंग्रजी शाळेत भाषेत शिकतात, त्या मराठी माणसाने घरात, समाजात वावरताना मुलांसोबत मराठीत बोलले पाहिजे. मराठी भाषेचा वारसा देणे ही आपली जबाबदारी व कर्तव्य आहे. चला तर मग मराठी भाषेला ज्ञान भाषा बनविण्याची सुरवात आपल्या घरापासून करु यात व समृध्द मराठी भाषा बनवुयात, दिल्लीतील मराठी जागराचा आनंद घेऊ या !

0000

कोल्हापूर शहरातील अशा ६२४ कोटी रुपयांच्या प्रस्तावित प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 

कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग विकास कामांचा घेतला आढावा

कोल्हापूर शहरातील वाहतूक प्रश्न आणि महामार्गावरील पुरस्थितीवर निघणार लवकरच तोडगा

कोल्हापूर, दि.१७: रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री, नितीन गडकरी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग विषयक विकास कामांचा आढावा कोल्हापूर विमानतळ येथे घेतला. कोल्हापूर शहरातील वाहतूक प्रश्न आणि महामार्गावरील पुरस्थिती यावर मार्ग काढण्यासाठी शहरात फ्लायओव्हर आणि राष्ट्रीय महामार्गावर बास्केट ब्रिज अशा ६२४ कोटी रुपयांच्या प्रस्तावित प्रकल्पाला त्यांनी तत्त्वत: मान्यता दिली. तसेच याबाबतचे संकल्प चित्र डिझाइन तातडीने सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक संजय कदम यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग १६६ वरील यावळुज ते शिवाजी पूल अशा १०.८ किमी रस्त्याचे रूंदीकरण, पुराच्या पाण्याच्या ठिकाणी उंची वाढविणे, पुराच्या पाण्यामुळे जो बंधारा निर्माण होत आहे त्या ठिकाणी काँक्रीटचे मोठे बॉक्स देणे जेनेकरुन वाहतूकीस अडथळा न होता पुराच्या पाण्याचा लवकर निचरा होईल. तसेच कोल्हापूर शहरातील शिवाजी पूल ते तावडे हॉटेल पर्यंतचा ६.८ किमीचा उड्डान पूलासाठी तत्वत: मान्यता दिली. यासाठी आवश्यक लाईट व पाऊसपाणी निचरा इ. अनुषंगिक कामांसाठी आवश्यक निधी महापालिका व राज्य शासनाने करावा असे ठरले. गगनबावडा ते रत्नागिरी मार्गावर महापालिकेच्या जागेवरील दोन किमीचा जोड रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून देवून शहरातील फ्लायओवरला जोडावा असाही प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच सुरू असलेल्या सातारा कागल रस्त्याच्या कामातील अडथळे दूर करून डिसेंबर २०२५ पुर्वी सर्व कामे पुर्ण करण्याच्या सूचना केल्या.

याचबरोबर रत्नागिरी कोल्हापूर रस्त्यावरील असलेले जमीनीचे अडथळे दूर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जमीनीचे प्रश्न आठ दिवसात मिटवून ती जागा हस्तांतरीत करू. तसेच ज्यांचे पैसे वाटप शिल्लक आहे त्यांचेपण एक महिन्यात पैसे वाटप करून तीही जागा हस्तांतरीत करू असे सांगितले. यामुळे राष्ट्रीय महामार्गचे आंबा ते पैजारवाडी व पैजारवाडी ते चोकाक ही दोन्ही कामे एप्रिल २०२६ अखेर पुर्ण होणार आहेत. याठिकाणच्या लोकप्रतिनीधी व नागरिकांच्या मागणीनुसार आंबा ते पैजारवाडी या दरम्यान ५ अंडरपास व ७ किमीच्या सेवा रस्त्याला तसेच पैजारवाडी ते चोकाक यादरम्यानच्या ५ अंडरपास व १७ किमीच्या सेवा रस्त्यालाही यावेळी तत्वत: मान्यता देण्यात आली. तसा प्रस्तावही दिल्लीला सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

उपस्थित खासदार धनंजय महाडिक आणि आमदार महोदयांनी जिल्हावासियांच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. यावेळी खासदार श्री. महाडिक म्हणाले, ही बैठक व्यापक स्वरूपात झाली असून शहरातील वाहतूक प्रश्न मार्गी लागेल. यातुन जिल्ह्यातील नागरिक आणि येणारे सर्व भाविक पर्यटक यांना वाहतुकीचा त्रास सहन करावा लागणार नाही. तसेच गडहिंग्लज व आजरा शहरासाठी रींग रोडचीही मागणी करण्यात आली असून त्याचा प्रस्ताव देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

०००००००

स्व. बाळासाहेब ठाकरे सिंचन योजनेमुळे सांगोला तालुका पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार – राधाकृष्ण विखे पाटील

योजनेसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही 

तीन वर्षात योजना पुर्ण करण्यात येणार

पंढरपूर (दि.१७) :- स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजेनेचे काम सुरु होणार असल्याने  १२ गावातील सुमारे १५ हजार ४०० हेक्टर जमीनींना बंदिस्त नलिकेव्दारे शेतीला लवकरच कायमस्वरुपी पाणी मिळणार आहे. यामुळे सांगोला तालुक्यातील  दुष्काळ कायमस्वरुपी संपून तालुका शंभर टक्के दुष्काळमुक्त होणार आहे असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला या योजनेच्या कामाचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी खासदार रणजीतसिंह नाईक- निंबाळकर, माजी आमदार शहाजीबापू पाटील, दीपक साळुंखे पाटील, जलसंपदा विभागाचे  मुख्य अभियंता डॉ. ह.तु.धुमाळ, भीमा कालवा अधिक्षक अभियंता धीरज साळी यांच्या मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलताना म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. राज्यातील शेतकरी  दुष्काळातून आता मुक्त झाला पाहिजे.  स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या कामास शासनाने सुधारीत प्रशासकीय मंजुरी दिली या योजनेकरिता उजनी धरणामधून  दोन टीएमसी पाण्याची तरतूद असून या पाण्याद्वारे सांगोला तालुक्यातील १२ गावातील सुमारे १३ हजार ५५ हेक्टर क्षेत्रास व सांगोला शाखा कालवा क्र. ५ अंतर्गत २ हजार ३४५ हे. असे एकूण १५ हजार ४०० हे. क्षेत्राचा सिंचनाचा लाभ मिळणार आहे. ब-याच वर्षापासून शेतकऱ्यांची मागणी यानिमित्ताने पूर्ण होत असून कायमस्वरुपी दुष्काळ असलेला हा भाग सिंचनाने सुजलाम-सुफलाम होणार आहे.  पुढील तीन वर्षात ही योजना पुर्ण करण्यात येणार आहे. या योजनेसाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही . राज्यामध्ये   सांगोला तालुका हा पूर्णतः दुष्काळमुक्त होण्याचा काम होत आहे. आणि याचे भाग्य मला मिळाले याचा आनंद आहे.पुढील पाच वर्षांमध्ये  संपुर्ण महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त  करण्यासाठी  शासन शासन  कटिबध्द आहे.

सांगोला तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी अविरत प्रयत्न्न केले असून त्यांची आठवण आज आल्याशिवाय राहत नाही.  पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी  दुष्काळी भागासाठी अविरतपणे संघर्ष करुन  माण खटाव तालुका पूर्णतः दुष्काळमुक्त केला आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून हा जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा  संकल्प त्यांनी केला आहे. माजी आमदार शहाजी पाटील व माजी खासदार रणजिसिंह नाईक-निंबाळकर यांनी  ही योजना मार्गी लावण्यासाठी सतत पाठपुरावा केला   असल्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी यावेळी सागितले.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, सांगोला तालुका पिढयान-पिढया दुष्काळाशी संघर्ष करीत असणारा शेतकरी दुष्काळ संपावयसाठी आस लावून बसलेला आहे. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजेनेच्या कामांमुळे सांगोला तालुका पुर्णपणे दुष्काळमुक्त होणार आहे. पिढ्यान् पिढ्या दुष्काळाशी संघर्ष करणाऱ्या मातीचे दुख संपले आहे.  माण-खटाव- फलटण -सांगोला तालुक्यातील दुष्काळ संपविण्यासाठी प्रयत्न केला असून ,सद्यस्थित माण-खटाव मध्ये शेतील मुबलक पाणी असून चार ते पाच साखर कारखाने आहेत.  सातारा जिल्ह्यातील राजेवाडी तलावातील शिल्लक राहणारे पाणी सांगोला तालुक्याला देणार असून,  दुष्काळ भागातील तुमचा सहकारी म्हणून कायम तुमच्या बरोबर उभा राहिन असेही त्यांनी यावेळी सांगतिले. तसेच दुष्काळी भागाच्या संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब विखे पाटील होते.. ज्या, कुटुंबातील माणसाने पाण्यासाठी संघर्ष केला होता. त्या बाळासाहेब विखे पाटील यांच्या मुलांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होतोय. याचा अभिमान  वाटत असल्याचे पालकमंत्री श्री गोरे यांनी सांगितले.

यावेळी माजी खासदार  रणजितसिंह नाईक- निंबाळकर, माजी  आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दिपक साळुंखे-पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी सर्व मान्यवरांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजेनेच्या संकल्प चित्राची पाहणी केली.

00000000

एकही नागरिक बेघर राहणार नाही यासाठी शासन कटिबध्द- ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

सांगलीदि. १७ (जि. मा. का.) : महाआवास अभियान २०२४-२५ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ मधील राज्यातील २० लाख लाभार्थ्यांना मंजूरी पत्र व किमान १० लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण कार्यक्रम दि. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. जे लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत त्यांचे सर्वेक्षण करून त्यांनाही लाभ देवू. एकही नागरिक बेघर राहणार नाही यासाठी शासन कटिबध्द असल्याची ग्वाही ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासमवेत दूरदृष्यप्रणालीव्दारे प्रधानमंत्री आवास टप्पा-2 शुभारंभाच्या नियोजनाबाबत जिल्हा परिषद सांगली येथील बैठक सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी दूरदृष्यप्रणालीव्दारे ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले तर प्रत्यक्ष सांगली येथे बैठकीच्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) प्रमोद काळे आदि उपस्थित होते.

ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, हा राज्यस्तरीय कार्यक्रम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्य बॅडमिंटन हॉल, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे होणार आहे. या राज्यस्तरीय कार्यक्रमाबरोबरच राज्यातील जिल्हा, तालुका व ग्रामपंचायतस्तरावर देखील लाभार्थ्यांना मंजूरी पत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२  मधील राज्यातील १० लाख लाभार्थ्यांना एका क्लिकवर पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे. या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ग्रामपंचायतस्तरावर दिसण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी स्क्रीन, एलसीडी प्रोजेक्टर व इंटरनेटची व्यवस्था करावी. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन होईल याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

आत्तापर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ मधील १८ लाख १९ हजार ८३० लाभार्थ्यांना मंजूरी देण्यात आली असून उर्वरित १ लाख ४६ हजार ९३७ लाभार्थ्यांना मंजूरी देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगून ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, या कार्यक्रमास ग्रामपंचायत, तालुकास्तर व जिल्हास्तरावर मान्यवर लोकप्रतिनिधी आजी माजी पदाधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक, लाभार्थी यांना निमंत्रित करून हा कार्यक्रम एक उत्सव स्वरूपात साजरा होईल यासाठी सर्वांनी काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देशही ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी दिले.

प्रारंभी या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सविस्तर माहिती देवून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सक्रीय योगदान देण्याचे आवाहन केले.

सांगली जिल्ह्यात या योजनेंतर्गत मंजूरी व पहिला हप्ता वितरणाचे ३२ हजार १३३ इतके उद्दिष्ट असून आत्तापर्यंत ९३.९ टक्के लाभार्थ्यांचे एफटीओ जनरेट करण्यात आले आहेत. उर्वरित लाभार्थ्यांचे एफटीओ जनरेट करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

00000

मराठी साहित्य दृकश्राव्य माध्यमांवर उपलब्ध करा- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १७ : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता तिचा प्रचार आणि प्रसार व्यापक प्रमाणात व्हावा, यासाठी राज्य सरकारकडून महत्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. मराठी भाषा विभागाने मराठी साहित्य दृकश्राव्य माध्यमांवर उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मराठी भाषा विभागाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस मराठी भाषा मंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सहसचिव नामदेव भोसले, भाषा संचालक विजया डोणीकर, साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील तसेच राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मराठी साहित्य दृकश्राव्य माध्यमांवर आणण्याच्या गरजेवर भर दिला. ” जागतिक स्तरावरील मराठीप्रेमी यांना साहित्याची ओळख व्हावी, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा आहे. दृकश्राव्य स्वरूपात साहित्य उपलब्ध झाल्यास ते सहजतेने लोकांपर्यंत पोहोचू शकेल,” असे त्यांनी सांगितले.

मराठी भाषेचा जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी सुमारे ५०० बृहमंडळे कार्यरत आहेत. या बृहमंडळांमार्फत मराठी साहित्याचा प्रसार होण्यासाठी प्रत्येक बृहमंडळाला ५०० मराठी पुस्तके प्रदान करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यामुळे परदेशातही मराठी भाषेची गोडी वाढेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. परदेशात ज्याठिकाणी बृहन महाराष्ट्र मंडळ आहेत तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत विभागाने कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठी भाषा जतन, संवर्धन व प्रचारासाठी विविध आधुनिक उपक्रम राबवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी केल्या. मराठी भाषा येत नसलेल्या नागरिकांना मराठीबद्दल माहिती व्हावे,यासाठी रेल्वे स्थानके, बस स्थानके इत्यादी ठिकाणी क्यू आर कोड तयार करावेत. मराठीची जास्तीत जास्त पुस्तके इंटरनेटवर उपलब्ध करून देण्याची सूचनाही उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केली.

0000

राजधानीत अभिजात मराठीचा अभुतपूर्व जागर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रम

नवी दिल्ली, दि.१७ : यंदाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या शुक्रवारपासून नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडिअममध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत होणार आहे. या संमेलनात दि. २१ ते २३ फेब्रुवारीपर्यंत कवी संमेलन ,मुलाखत, परिसंवाद असे वेगवेगळे एकापेक्षा एक सरस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजक असणाऱ्या सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी आज महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

तालकटोरा स्टेडिअममधील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत ९८ वे साहित्य संमेलन होत असून या संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी साडेतीनला विज्ञान भवनात आयोजित उद्घाटनाच्या मुख्य सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर स्वागताध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. राज्यातील साहित्यिक मोठ्या संख्येने या साहित्य सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता उद्घाटनाचे दुसरे सत्र संमेलनस्थळी होणार असून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.अशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असेल. मावळते संमेलनाध्यक्ष डॉ.रविंद्र शोभणे यांचे पूर्वाध्यक्ष भाषण होईल, तर संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर यांचे अध्यक्षीय भाषण होईल.

तत्पूर्वी सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून ध्वजारोहण होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे याच्या हस्ते ग्रंथदिंडीस प्रारंभ होणार असून नॅशनल बुक ट्रस्टचे चेअरमन मिलिंद मराठे, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ.रविंद्र शोभणे, राज्याचे सांस्कृतिक कार्य अपर मुख्य सचिव विकास खारगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. या दिंडीत साहित्यिक, साहित्यप्रेमी, ‍मराठी मंडळी सहभागी होणार आहेत. विविध कला पथकेही या दिंडीत सहभागी होतील.

पहिल्या दिवशी सायंकाळी अखेरच्या सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तसेच दिल्लीतील निवडक नामवंत कवी सहभागी होणार आहेत.

सभामंडपांची नावे

छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, महात्मा ज्योतिराव फुले अशा महापुरुषांच्या नावे सभामंडप असून प्रवेशद्वाराला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात आले आहे.

संमेलनाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रकाशकांचे स्टॉल असणार आहेत. या साहित्य संमेलनास देशाबाहेरूनही साहित्यिक मंडळी येणार असल्याची माहिती श्री नहार यांनी दिली.

शनिवारी २२ तारखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभा मंडप येथे ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या विषयावर मान्यवरांची मुलाखत,  विशेष सत्कार सत्र, ‘लोकसाहित्य भूपाळी ते भैरवी’, ‘राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब’ आणि सायंकाळी ‘मधुरव’ हा सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे.

याच दिवशी यशवंतराव चव्हाण सभामंडप येथे ‘बहुभाषिक कवी संमेलन’, बृहन्महाराष्ट्रातील मराठी माणसांचे जीवन व साहित्य’, ‘मराठी भाषा व महाराष्ट्र धर्म’ अशा विषयावर परिसंवाद आहेत. तर महात्मा ज्योतिराव फुले सभा मंडप येथे कवी कट्टा आयोजित करण्यात आला आहे.

रविवारी शेवटच्या दिवशी २३ फेब्रुवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभा मंडप येथे ‘असे घडलो आम्ही’ या विषयावर मुलाखत, ‘सामाजिक कार्य आणि मराठी साहित्य, ‘नाते दिल्लीशी मराठीचे’ आदी कार्यक्रम आहेत. यशवंतराव चव्हाण सभा मंडप येथे ‘अनुवाद मराठीतून इतर भाषेत किंवा इतर भाषेतून मराठीत’, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता व सृजनशीलता’ या विषयावर परिसंवाद आहेत. सायंकाळी ‘खुले अधिवेशन व समारोप’ असे सत्र असणार आहे.

साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे

१९ फेब्रुवारीला पुणे येथून  विशेष रेल्वे दिल्लीसाठी येणार असून या रेल्वेमध्ये देखील साहित्य संमेलन होणार आहे.  या विशेष रेल्वेला महादजी शिंदे एक्सप्रेस असे नाव देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक रेल्वे डब्याला गड-किल्ल्यांची नावे देण्यात आलेली आहेत. या रेल्वेमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठी भाषा मंत्री उदय सामंत असणार आहेत.

००००

बालकांच्या सुरक्षेसाठी निधी कमी पडू देणार नाही – शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई दि. १७ : महिला व बालकांच्या समस्यांवर उपाययोजना आखण्यासाठी तरूणांचे नेतृत्व वाढविणे गरजेचे आहे. त्यांच्या माध्यमातून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केल्यास बालकांना सुरक्षित करण्यास सहकार्य लाभेल असा विश्वास विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.  तर, बालकांच्या सुरक्षेच्या योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा परिसरात दामिनी पथक नेमणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे आणि शालेय शिक्षण मंत्री श्री.दादाजी भुसे, आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत ‘बाल रक्षा अभियानाचा’ शुभारंभ सह्याद्री अतिथीगृह येथे झाला.

यावेळी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या जनजागृतीपर पोस्टरचे अनावरण, बालरक्षा अभियान प्रशिक्षण पुस्तिकेचे प्रकाशन, चिराग ॲपचे डिजिटल पद्धतीने अनावरण विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आयोगाचे सदस्य चैतन्य पुरंदरे, जयश्री पालवे, सायली पालखेडकर, श्री. सिंघल तसेच स्वयंसेवी संस्था विधायक भारतीचे संतोष शिंदे, समतोल फाउंडेशनचे विजय जाधव, प्रथम संस्थेचे किशोर भामरे, विपला फाउंडेशनचे प्रवीण कदम, अवर सचिव वंदना बोत्रा, वंदना भोसले यांच्यासह अधिकारी, समाजसेवी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पालक-शिक्षण समितीचे ऑनलाईन मॉनिटरींग

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, प्रत्येक शाळेत नेमण्यात आलेल्या पालक-शिक्षण समितीचे ऑनलाईन मॉनिटरींग करण्यात येणार आहे. मुलांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी त्यांचे समुपदेशन करणे आवश्यक आहे. आणि हेच समुपदेशन समवयस्क मुलांमार्फत झाल्यास ते नक्कीच प्रभावी  ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, लहान बालकांच्या समस्यांबाबत तक्रारी नोंदवायच्या असतील तर चिराग ॲपद्वारे त्या नोंदविता येतील. या माध्यमातून ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील प्रत्येक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन आयोगास सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात येईल, सखी सावित्री समितीचा विस्तार करण्यात येणार आहे.  पोक्सो कायद्यात अधिक कठोर तरतूदी करण्यात येणार असून यासाठी सामाजिक संस्थांशी समन्वय साधणार असल्याचे श्री.भुसे यांनी सांगितले.

शाळेच्या आवारात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे मोठ्या प्रमाणात बसविण्यात येतील तसेच दुर्गम भागातील शाळातही स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह, आवारातील स्वच्छता आणि सुरक्षितता याकडे प्राधान्याने लक्ष देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या शाळांमध्ये मोठे वर्ग आहेत. तेथे दामिनी पथक तसेच आजूबाजूच्या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येईल. मुलांना आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हेच शासनाचे ध्येय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी आयोगामार्फत फेब्रुवारी २०२५ ते मार्च २०२५ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या ‘बालरक्षा अभियानाबद्दल सविस्तर माहिती दिली. या अभियानामार्फत सुरक्षित व असुरक्षित स्पर्श, सखी सावित्री समिती या शासनाच्या नियमाची प्रभावी अंमलबजावणी, पोक्सो अधिनियम २०१२ मधील तरतूदी, सायबर सुरक्षितता, शिक्षक- शाळांसाठी मार्गदर्शक सूचना, शालेय बसद्वारे नियमित वाहतूक तसेच शालेय सहलीनिमित्त घ्यावयाची दक्षता यानिमित्त परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे. तसेच बालकांच्या संरक्षणासाठी कार्यरत यंत्रणा, चिराग अँप, पोलिस विभाग इत्यादी माहिती दर्शविणाऱ्या फलकांची जनजागृती या अभियानामार्फत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

000

श्रद्धा मेश्राम/विसंअ, ऋतुजा नाकते, आंतरवासिता

ताज्या बातम्या

विधानसभा प्रश्नोत्तरे

0
पीएमजीपी इमारतींच्या पुनर्विकासाबाबत एक महिन्याच्या आत बैठक - मंत्री शंभूराज देसाई मुंबई, दि. ७: पीएमजीपी (प्रधानमंत्री गृह प्रकल्प) योजनेतील इमारतींच्या पुनर्विकासाबाबत येत्या एक महिन्याच्या आत...

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
बांधकामापूर्वी रक्कम अदा केल्याप्रकरणी शाखा अभियंता आणि  कार्यकारी अभियंत्याचे निलंबन - ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे मुंबई, दि. ७ : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मौजे लासूर येथील...

पंढरपूरची वारी जगातील अद्भुत परंपरा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
मुंबई, दि.७ :  राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आषाढी एकादशी निमित्त चेंबूर येथील श्री शृंगेरी शंकर मठ शारदा मंदिराला भेट देऊन मंदिरातर्फे रविवारी (दि. 6...

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...