सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 309

धर्मादाय संस्थेअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांनी प्रभावीपणे काम करावे- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. १८ :- धर्मादाय रुग्णालयांनी निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी प्रत्येकी १० टक्के याप्रमाणे एकूण २० टक्के खाटा आरक्षित करणे बंधनकारक असून त्याअनुषंगाने धर्मादाय संस्थाच्या कायद्यांअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांनी प्रभावीपणे काम करावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीत राज्यातील धर्मादाय ट्रस्ट ॲक्ट खालील नोंदणीकृत रुग्णालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, विधी व न्याय विभागाचे उपसचिव विलास खांडबहाले, अवर सचिव (विधी) रा.द. कस्तुरे, मुख्यमंत्री सहायता कक्षाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामेश्वर नाईक उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले, धर्मादाय संस्थेच्या अंतर्गत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांनी निर्धन व दुर्बल रुग्णांना आरक्षित खाटा पारदर्शी पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात. तसेच जास्तीत जास्त निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन द्यावी, असेही श्री.आबिटकर यांनी यावेळी नमूद केले.

राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले, निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना या आरक्षणाचा लाभ होण्यासाठी इतरही रुग्णालयांना या योजनेच्या कार्यकक्षेत आणण्यासाठी प्रयत्न करावे.

00000

मोहिनी राणे/स.सं

जळगाव- चोपडा तालुक्यांना जोडणाऱ्या खेडीभोकरी-भोकर पुलाच्या कामाच्या खर्चास मान्यता

मुंबई दि. १८ :  जळगाव जिल्ह्याच्या जळगाव व चोपडा तालुक्यांना जोडणारा खेडीभोकरी ते भोकर हा तापी नदीवरील महत्त्वाचा फूल आहे. या पुलाच्या कामाच्या खर्चास जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

जलसंपदा मंत्री  महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, तापी पाटबंधारे विकास महामंडळ कार्यकारी संचालक ज. द. बोरकर, जलसंपदा विभागाचे सह सचिव अभय पाठक आदी उपस्थित होते.

तापी नदीवरील खेडीभोकरी ते भोकर  या पुलाची लांबी ८८४ मीटर, रुंदी १० मीटर आणि उंची २७ मीटर इतकी आहे. हा पूल सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागामार्फत बांधण्यात येणार आहे. या पुलामुळे प्रवासाचे अंतर कमी होऊन वेळेची व इंधनाची बचत होणार आहे. प्रवास जलद गतीने होईल असे यावेळी सांगण्यात आले.

००००००

एकनाथ पोवार/विसंअ

भूसंपादनाच्या प्रकरणातील तडजोडी प्रकरणातील रक्कमा तातडीने द्याव्यात – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

तापी व कोकण विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत २३ विषयांना मान्यता

मुंबई, दि. १८ :–  पाटबंधारे प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्यात आलेल्या भूसंदर्भ प्रकरणांमध्ये पॅरिटीच्या आधारावर केलेल्या तडजोड प्रकरणातील रक्कम संबंधित शेतकऱ्यांना तातडीने दिली जावी, असे निर्देश जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

जलसंपदा मंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली तापी व कोकण खोरे पाटबंधारे विभाग नियामक मंडळाची बैठक मंत्रालयात झाली. यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ कार्यकारी संचालक अतुल कपोले, तापी पाटबंधारे विकास महामंडळ कार्यकारी संचालक ज. द. बोरकर,  जलसंपदा विभागाचे सह सचिव अभय पाठक व महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले, पाटबंधारे प्रकल्पासाठी भूसंपादन महत्त्वाची बाब आहे. भूसंपादन प्रक्रियेवर बराचसा  निधी खर्च होत असल्याने भू संपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून सिंचन प्रकल्पांना गती द्यावी. भूसंपादनसाठी आवश्यक निधीची मागणी विभागाने तातडीने करावी. आवश्यक निधी शासन स्तरावरून उपलब्ध करून दिला जाईल.

तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या ७० व्या बैठकीत १६ विषयांना तर कोकण पाटबंधारे  विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या ८७ बैठकीत ७ विषयांना मान्यता देण्यात आली.

००००

एकनाथ पोवार/विसंअ

राज्याच्या घराघरात, मनामनात शिवजयंतीचा आनंदोत्सव साजरा होऊ दे-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वंदन

शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष महाराष्ट्रभूमीत जन्मला हे भाग्य,
त्यांना आदर्शस्थानी ठेवूनंच महाराष्ट्राची आजवरची वाटचाल-उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. १८:- “छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटित करून रयतेचं स्वराज्य स्थापन केलं आणि लोककल्याणकारी राज्याचा आदर्श निर्माण केला. महाराष्ट्राची अस्मिता जागवत त्यांनी अटकेपार झेंडा फडकवण्याची, दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची हिंमत आणि ताकद महाराष्ट्राला दिली,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना कृतज्ञतापूर्वक वंदन केले.

उपमुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांनी जागवलेला महाराष्ट्राभिमान गेल्या चार शतकात जन्मलेल्या राज्यातल्या प्रत्येक पिढीने प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन जपला. महाराष्ट्राभिमान महाराष्ट्रवासियांमध्ये जागवण्याचं श्रेय सर्वार्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य, शौर्य, धैर्य, पराक्रम आणि विचारांना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष महाराष्ट्रभूमीत जन्मला हे भाग्य असून त्यांना आदर्शस्थानी ठेवूनंच महाराष्ट्राची आजवरची वाटचाल राहीली आहे, यापुढेही तशीच राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन शिवजयंतीनिमित्त त्यांना वंदन केलं आहे. उपमुख्यमंत्र्यांनी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांनाही वंदन केले असून, शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्याच्या घराघरात, मनामनात साजरा होऊ दे, अशा शब्दात राज्यातील जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
***

 ‘आम्ही असू अभिजात’ संमेलन गीताला नांदेडचा संगीत साज

आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केले अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे गीत

नांदेड दि.१८ फेब्रुवारी : नवी दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे गीत नांदेडच्या सुप्रसिद्ध गायिका, संगीतकार आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केले आहे. दिग्गज गायकांचा सहभाग असणारे अभिजात मराठीला शब्दबद्ध करणाऱ्या दीर्घ काव्याला त्यांनी संगीताचा साज चढवला असून तमाम नांदेडकरांसाठी ही आनंदाची बाब आहे.

९८ व्या मराठी साहित्य संमेलनासाठी नांदेड मधून एकीकडे शेकडो साहित्यिक रवाना होत आहे. आता नांदेडसाठी आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केलेले ‘आम्ही असू अभिजात’ हे संमेलन गीत आणखी एक आनंद वार्ता ठरले आहे.

काल राज्यपाल श्री.सी.पी. राधाकृष्णन, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या गीताचा शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी नांदेडच्या संगीतकार आनंदी विकास यांचाही सत्कार करण्यात आला. पुण्याचे गीतकार डॉ. अमोल देवळेकर यांनी लिहिलेल्या ‘आम्ही असू अभिजात ‘, या मराठी भाषेच्या गौरवगीताला संगीताचा साज चढविण्याचे काम त्यांनी केले आहे.

विशेष म्हणजे या गीताचे पार्श्वगायन सुप्रसिद्ध गायक हरिहरन, शंकर महादेवन, मंगेश बोरगावकर, प्रियंका बर्वे,सागर जाधव, शमिमा अख्तार यांनी केले आहे.या गीताचे संगीत संयोजन प्रथमेश कानडे, ध्वनिमुद्रण मन्मथ मठपती, ध्वनि मिश्रण आदित्य देशमुख यांनी केले आहे.

हे गीत संगीत, पार्श्वगायन, लेखन सादरीकरण या सर्वच कसोटीवर आगळे वेगळे सिद्ध होत आहे. या संपूर्ण गाण्याचे चित्रीकरण कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आले आहे.

त्यामुळे या गाण्याचा व्हिडिओ देखील लक्षवेधी ठरला आहे. मराठी भाषेच्या अभिजात दर्जा प्राप्त होण्याच्या घटना क्रमावर आधारित हे गीत असून कवी अमोल देवळेकर यांनी १० अंतऱ्याचे हे दीर्घकाव्य मराठीच्या अभिजात दर्जाचा गौरव करताना लिहिले आहे. संदर्भाचे सुनियोजित सादरीकरण या गीतातून होत आहे.

दरम्यान, आयोजकांनी काल या गीताचे राज्यपालांच्या हस्ते लोकार्पण करताना संगीतकार आनंदी विकास यांना सन्मानाने या साहित्य संमेलनाला आमंत्रित केले आहे. साहित्यप्रेमी नांदेडकरांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे.

अंमलबजावणी कक्षामुळे किनारपट्टीची सुरक्षा व मत्स्योत्पादनात वाढ- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

अनधिकृत मासेमारी नियंत्रण व सागरी सुरक्षेसाठी अंमलबजावणी कक्षाची स्थापना

मुंबई, दि. १८ : राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे परराज्यातील मासेमारी नौकांकडून होणारी मासेमारी थांबवणे आणि सागरी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून स्थापन करण्यात आलेला अंमलबजावणी कक्ष महत्वाची भूमिका बजावेल. तसेच यामुळे सागरी मत्स्योत्पादनामध्ये वाढ होईल, असे प्रतिपादन मत्स्यव्यवासमंत्री नितेश राणे यांनी केले.

मंत्रालयात आज राज्याच्या सागरी क्षेत्रात शास्वत मासेमारी टिकून राहण्याकरिता अनधिकृत मासेमारी नौकांवर कठोर कारवाई करण्यासाठी अंमलबजावणी कक्षाची स्थापना झाली, तसेच या कक्षाची बैठक ही झाली. यावेळी मंत्री श्री. राणे बोलत होते.

सागरी सुरक्षेसाठी किनारपट्टीच्या भागात ड्रोनद्वारे गस्त सुरु केल्याचे चांगले परिणाम दिसून येत असल्याचे सांगून मंत्री श्री. राणे म्हणाले की, परप्रांतिय मासेमारी नौका राज्याच्या सागरी क्षेत्रात येऊन मासेमारी करतात. त्यामुळे स्थानिक पारंपरिक मच्छिमार यांच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. तसेच एलईडी मासेमारी विषयी कठोर कारवाई करणे आणि स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे हित जपणे ही शासनाची भूमिका आहे. त्यानुसार या अंमलबजावणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच सागरी किनाऱ्यांमध्ये आवश्यक असलेल्या साधनसामग्रीची माहिती घेऊन त्याची उपलब्धता सूनिश्चित करण्याचे कामही या कक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामुळे या कक्षातील सर्वच सदस्यांनी जबाबदारीने आणि सहकार्याने काम करावे अशा सूचना मंत्री श्री. राणे यांनी दिल्या.

मंत्री श्री. राणे म्हणले की, या अंमलबजावणी कक्षाच्या माध्यमातून सागरी किनारी सुरक्षा आणि मासेमारीस एक शिस्त येईल. तसेच अवैध हलचालींवरही नियंत्रण आणणे आणि कडक कारवाई करणे शक्य होणार आहे. प्रत्येकाने नियम पाळले पाहिजेत हीच विभागाची भूमिका आहे. त्यासाठी या अंमलबजावमी कक्षाची भूमिका महत्वाची असणार आहे. तसेच किनाऱ्यांवर झालेले अतिक्रमण हटवण्याची कार्यवाहीही सुरू करण्यात यावी. याबाबतचा कृती आराखडा तयार करून येत्या तीन महिन्यांमध्ये किनारपट्टीच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या मालकीच्या सर्व जागा अतिक्रमणमुक्त होतील, असे पहावे अशा सूचनाही मंत्री श्री. राणे यांनी दिल्या.

मत्स्य व्यवसाय विभागाच्या या अंमलबजावणी कक्षामध्ये मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त  अध्यक्ष असणार आहेत. तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड,  रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात सागरी किनारपट्टीच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे उपसचिव हे सदस्य असणार आहेत. तसेच मत्स्यव्यवसाय (सागरी) सहआयुक्त हे सदस्य सचिव असणार आहेत.

राज्यातील सागरी क्षेत्रामध्ये परप्रांतिय अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी उपाययोजना सुचवणे, कक्षाची संरचना, संविधानिक चौकट व निधीची तरतूद यांचा अभ्यास करणे, परप्रांतीय अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असलेली साधनसामुग्री व मनुष्यबळ यांचा अभ्यास करुन याबाबत शासनास उपाययोजना सुचवणे यासाठी हा कक्ष काम करणार आहे.

तसेच राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये २४ तास गस्त घालणे, सागरी कायद्याची अंमलबजावणी करणे, गस्ती दरम्यान निदर्शनास येणाऱ्या अनधिकृत नौकांवर सागरी कायद्यानुसार कार्यवाही करणे, नौका जप्त करणे, त्यावरील मासळीचा लिलाव करणे, ड्रोनद्वारे गस्ती दरम्यान टिपण्यात आलेली छायाचित्रे व व्हीडिओ यांची तपासणी करुन अनधिकृत नौकांची माहिती घेणे व त्यांच्यावर सागरी कायद्यातील तरतुदीन्वये कार्यवाही करणे, अनधिकृत नौकांना लावण्यात आलेल्या दंडाच्या वसुलीबाबत नियोजन करणे, अवरुद्ध व जप्त करण्यात आलेल्या नौकांवर देखरेख ठेवणे, आकस्मिक व गोपनीय पद्धतीने मासळी  उतरविणाऱ्या बंदरावर, समुद्रात धाडी टाकण्याबाबत  नियोजन करणे, तसेच सागरी कायद्याच्या कडक अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व कामे करणे याप्रमाणे हा अंमलबजावणी कक्ष काम करणार आहे.

अंमलबजावणी कक्षाच्या बैठकीस मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, सह आयुक्त (सागरी) महेश देवरे, महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिता मेश्राम, उपसचिव किशोर जकाते, यासह कोकण विभागातील मत्स्य व्यवसाय सह आयुक्त आणि विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

00000

वाट पाहतंय आपली… भिलार गाव.. आपलं पुस्तकांचं गाव

महाबळेश्वर आणि पाचगणी या जगप्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी स्ट्राॅबेरीचे गाव अशी ओळख असलेल्या निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याने नटलेले… सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेले असं भिलार गाव…   पुस्तकांचं गाव झालं…. मराठी साहित्याला सोनेरी झळाळी देणारा आणि प्रत्येक रसिक वाचकला दोन्ही बाहु पसरुन खुलेपणानं आमंत्रण देणारा असा  हा प्रकल्प देशभर गाजला… रोजचे पर्यटक तर येतातच पण आजपर्यंत मोठ्या प्रमाणात शालेय सहली इथे आल्या… लाखोंहून अधिक विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या गावाने मोहून टाकले. स्ट्रॉबेरीची गोडी आणि प्रत्येक पुस्तकाच्या घरात जावून फोटो काढण्याचा मोह… यातून भिलार गावाचे आकर्षण वाढले… पुस्तकांचं भारतातलं पहिलं गाव महाराष्ट्राबाहेरच्या लोकांनाही भुरळ घालत आहे.

   

दिल्ली येथे होत असलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या पार्श्वभूमीवर या गावाला दिलेल्या भेटीच्या आठवणी पुन्हा रुंजी घालू लागल्या आहेत. ४ मे २०१७ या दिवशी महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाच्या वतीने अनोखं पुस्तकांचं गाव भिलार साकारण्यात आलं … आज या पुस्तकाच्या गावामध्ये ३५ घरांमध्ये वेगवेगळया साहित्य प्रकाराची पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी वाचन-चळवळ वाढविण्यासाठीचा हा प्रकल्प. प्रकल्पास भेट देणाऱ्या वाचक / पर्यटकांना मराठी भाषेची समृद्धी कळावी म्हणून मराठी भाषेतील नवे-जुने लेखन, संत साहित्य, कथा, कादंबरी, कविता, ललित व वैचारिक, चरित्रे-आत्मचरित्रे, स्त्री साहित्य, क्रीडा, बालसाहित्य आणि इतिहास  या वेगवेगळ्या साहित्य प्रकाराची दालने उभी केली आहेत. निवडलेल्या ३५ घरांवर विविध प्रकारची चित्र रेखाटण्यात आली आहेत.  चित्राच्या संगतीनुसार त्या घरात वाचकाला साहित्य उपलब्ध होते. ज्या घरांच्या भिंतीवर निसर्ग चित्र काढण्यात आली आहेत, त्या घरात निसर्ग चित्रण अथवा प्रवास वर्णनपर साहित्य ठेवण्यात आले आहे. ऐतिहासिक चित्र रेखाटलेल्या घरात ऐतिहासिक साहित्य वाचनासाठी ठेवण्यात आले आहे. संतांची चित्र काढलेल्या ठिकाणी संतसाहित्य-अध्यात्मिक पुस्तकांची भेट वाचकांना होते. अशा प्रकारे केवळ चित्रांवरुन पर्यटकाला त्या त्या घरात कोणते साहित्य वाचनाला उपलब्ध आहे याची माहिती मिळते.

केवळ एक सरकारी वाचनालय उभारण्यापेक्षा या प्रकल्पात स्थानिकांना जास्तीत जास्त सहभागी करण्यात आले आहे. ३५ घरांत वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके ठेवण्यात आली आहेत. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला त्यांच्या आवडीप्रमाणे वाचन करता येते. जवळपास  मोठ्या प्रमाणात मराठी पुस्तके या गावात ठेवण्यात आली आहेत आणि त्यात दिवसेंदिवस भर पडते आहे.

प्रकल्पासाठी निवडलेल्या घरांची व ठिकाणांची नावे : हिलरेंज हायस्कूल – बालसाहित्य,  नितीन प्रल्हाद (बाळासाहेब) भिलारे – कादंबरी, ‘अनमोल्स इन’ राहूल भिलारे- महाराष्ट्र प्रदेश, मराठी भाषा व संस्कृती, ‘शिवसागर’ सुभाष भिलारे- विज्ञान, श्री हनुमान मंदिर – नियतकालिके व साहित्यिक प्रदर्शनी , ‘साई व्हॅली पॅलेस’ विजय भिलारे- इतिहास, , गणपत भिलारे- ‘दिवाळी अंक’, ‘कृषी कांचन’ शशिकांत भिलारे – चरित्रे व आत्मचरित्रे व बोलकी पुस्तके, ‘मंगलतारा’ प्रशांत भिलारे- शिवकालीन इतिहास व गडकिल्ले,  अभिजित दत्तात्रय भिलारे- परिवर्तन चळवळ, समाजसुधारकांचा व सुधारणांचा इतिहास, प्रवीण भिलारे –  कथा, अनिल भिलारे – स्त्री साहित्य, नारायण वाडकर – लोकसाहित्य, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा – बालसाहित्य, सुहास काळे – ललित गद्य व वैचारिक, श्रीराम मंदिर साहित्यिक (प्रदर्शन) आणि भाषीक व साहित्यिक खेळ, संतोष सावंत – विनोदी, जिव्हाळा, आकाश भिलारे – विविध लोकप्रिय व पुरस्कार विजेते, गणपत पारठे – विविध कलांविषयक, मयूर रिसॉर्ट, अजय मोरे – निसर्ग, पर्यटन आणि पर्यावरण, श्री जननीमाता मंदिर, संत साहित्य, श्री जननीमाता मंदिर (श्री गणपती मंदिरा जवळ) – साहित्यिक प्रदर्शनी आणि गिरीजा रिसॉर्ट – कविता.

पुस्तकाचं गावं नेमकं आहे तरी कसं…!

  • ३५ घरात ४० हजार पुस्तकांचा खजिना.
  • पर्यटकांच्या आवडीनुसार वाचनासाठी साहित्य उपलब्ध.
  •  साहित्य प्रकारानुसार दालनातील पुस्तकांची मांडणी – साहित्यानुसार भिंतीवर भित्तीचित्रे
  •  गावात कथाकथन अनं कविता वाचनाचे आयोजन.
  • पर्यटकांच्या भेटीला नामवंत लेखक-प्रकाशक.
  • अंधांसाठी ऑडीओ बुक (बोलकी पुस्तके)
  • पर्यटकांच्या साक्षीने नव्या कादंबऱ्यांचे प्रकाशन सोहळे

शासनाने राबविलेला अत्यंत चांगला उपक्रम आहे. येथे आल्यानंतर दूर्मिळ पुस्तके पाहायला, वाचायला मिळाली. मोबाईल, टीव्हीच्या विश्वात वाचनसंस्कृती टिकविणारा एक चांगला उपक्रम आहे.

असे पुस्तकावे गाव कुठेही पाहिले नाही. येथील पुस्तके पाहुन वेगळाच आनंद झाला. शासनाचा हा उपक्रम स्तुत्य आणि आगळा वेगळा आहे. अशा भावना पुस्तकाच गाव भिलार येथे येणारे पर्यटक व्यक्त करीत आहेत.

विविध घरांमध्ये शिवाजी महाराज, शिवकालीन इतिहास व गडकिल्ले या विषांवरील पुस्तके ठेवण्यात आली आहेत. परिवर्तन चळवळ, समाजसुधारकांचा व सुधारणांचा इतिहास, कथा, कांदबऱ्या, कविता संग्रह यासह अनेक पुस्तके ठेवण्यात आली आहेत. या गावामध्ये साक्षात ज्ञानाची गंगा आली आहे. गावामध्ये पुस्तक प्रेमी, पीएचडी करणारे विद्यार्थी येत आहेत. या गावाची स्ट्रोबेरी बरोबर पुस्तकाच गाव अशी ओळख निर्माण झाली आहे.

पुस्तकं आयुष्याला वळण देतात…. अनुभव, विचार, ज्ञान बळकट करतात…. पुस्तकाची गोडी लागण्यासाठी पुस्तकांचा सहवासही महत्वाचा असतो त्यासाठी पुस्तकाचं गाव भिलार हा एक अभिनव उपक्रम आहे  आणि गावकऱ्यांचा सहभाग याचं उत्तम उदाहरण असणार पुस्तकाचं गाव भिलार हा अभिवन उपक्रम आहे.

वर्षा पाटोळे

जिल्हा माहिती अधिकारी, सातारा

‘उन्नत पॉडकार’ वाहतूक नाविन्यपूर्ण वाहतूक व्यवस्था ठरेल- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. १८ : गुजरातमधील वडोदरा शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भविष्यात “उन्नत पॉडकार ” वाहतूक सेवा ही महत्त्वाची भूमिका पार पडेल. ही निश्चितच नावीन्यपूर्ण वाहतूक व्यवस्था ठरणार आहे, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. ते वडोदरा येथे जगातील पहिल्या व्यावसायिक तयार सस्पेंडेड पॉडकार प्रणालीच्या प्रगतीचा आढावा घेत असताना बोलत होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत वडोदरा येथील स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये ” स्वयंचलित पॉडकार उन्नत प्रणाली ” प्रायोगिक तत्त्वावर विकसित करण्यात येत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या उन्नत पॉडकार वाहतूक व्यवस्था पाहणी करण्यासाठी तसेच अशा प्रकारची वाहतूक व्यवस्था महाराष्ट्रातील लोकसंख्येची दाट घनता असलेल्या शहरात वापर करण्याची चाचपणी करण्याच्या उद्देशाने मंत्री सरनाईक यांनी या प्रकल्पाला भेट दिली.

नुट्रान ईव्ही मोबिलिटी या कंपनीने फुट्रान प्रणालीवर आधारित उन्नत पॉडकार ” वाहतूक व्यवस्था पुढील पिढीची नागरी वाहतूक प्रणाली आहे. जिथे स्वयंचलित पॉडकार्स उन्नत ट्रॅकवर जोडल्या जातात. रस्ते वाहतुकीला अडचण न ठरता त्या कार्यरत राहतात. एका पॉडकारमध्ये किमान 20 प्रवासी बसू शकतात 60 ते 70 किमी प्रति तास या वेगाने या पॉड कार प्रवास करतात. ऑन बोर्ड इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी सिस्टमवर या कार्यरत राहतात. विशेष म्हणजे शहरी रस्त्यावरील कमीत कमी जागेचा वापर करून दाट लोकसंख्येच्या भागात देखील त्या उपयुक्त ठरू शकतात.

मंत्री सरनाईक यांनी ” उन्नत पॉडकार ” वाहतूक यंत्रणा महाराष्ट्रातील मीरा- भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये सुरुवातीला चालविण्याबाबत सकारात्मकता दाखवली असून भविष्यात देशातील पहिला प्रयोग म्हणून मीरा-भाईंदर येथे ” उन्नत पॉडकार ” वाहतूक यंत्रणेचा समावेश होईल, असेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट दूरदर्शी नेतृत्व आणि भारताच्या विकसित होणाऱ्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा संयोगाचे उत्तम उदाहरण आहे. अशा शब्दांमध्ये या संस्थेचे सहसंस्थापक भावेश बुद्धदेव यांनी सरनाईक यांचे आभार मानले.

००००

निलेश तायडे/विसंअ

डॉ.हरिश्चंद्र बोरकर : बहुआयामी व्यक्तिमत्त्व

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विशेष लेख

डॉ. हरिश्चंद्र बोरकर एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. आयुष्य एखाद्या कार्यास झोकून देणे हा त्यांचा विशेष आहे. त्यांची प्रयत्नवादी प्रवृत्ती आहे. जीव ओतून कार्य करण्याची किमया ते आजन्म करीत आहेत. भाषा ही माणसाला जाेडत असते. भाषा विचारविनिमयाचे माध्यम आहे. या भाषेच्या विविध छटा असतात. त्या शोधण्याचे महत्कार्य त्यांनी केले. भाषेला बोली समृद्ध करीत असतात. म्हणून झाडीबोलीचा अभ्यास करणे हे आपल्या जीवनाचे ध्येय त्यांनी ठरविले. या बोलीचा भाषा वैज्ञानिक अभ्यास करणे हा आपला जीवनहेतू ठरवून त्यांनी जीवाचे रान केले आहे. आपण जी व्यवहारात बोली बोलतो ही फार पुरातन काळापासून रूढ आहे. विवेकसिंधू, लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी या महान ग्रंथात या झाडीबोलीतील शब्दांचा आढळ होतांना दिसतो. या बोलीभाषेला मानाचे स्थान प्राप्त करून देण्याचे महान कार्य आदरणीय बोरकरांनी केले आहे.

भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या विदर्भाच्या पूर्वेकडील चार जिल्ह्यात प्रामुख्याने ही झाडीबोली बोलली जाते. व्याकरणशास्त्रदृष्ट्या या बोलीचा शास्त्रीय अभ्यास करण्याचे धाडस बोरकर सरांनी लीलया केले. आणि वन्हाडी, कोकणी, मालवणी, अहिराणी या बोलींच्या बरोबरीने ही बोलीसुद्धा महत्वपूर्ण व श्रेष्ठ आहे. हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले. त्यामुळेच त्यांना ‘झाडीबोलीचे प्रणेते’ असे संबोधणे अगदी यथार्थ व योग्य आहे.

आपल्या समाजजीवनातील लोककला जिवंत राहायला हव्यात ही बोरकर सरांची तळमळ आहे. कारण या लोककलांनीच समाजाचे मानसिक व भावनिक भरणपोषण केले आहे. त्यामुळे प्राचीनतम काळापासून लोककलांचे जतन व संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. कारण या सर्व कला लोकाश्रयावर अवलंबून असतात. केवळ लोकांचे मनोरंजनच नव्हे तर प्रबोधन करणे हे ही लोककलेचे उद्दिष्ट असते. दंडार, खडीगंमत, डहाका, गोंधळ या सर्व लोककला व लोकनाट्यांकडे बोरकर सरांनी सहेतुकपणे पाहिले व समाजात या लोककला हळूहळू विरून जात आहेत या लोककलेकडे दुर्लक्ष होत आहे हे त्यांच्या लक्षात आले. या लोककलांना जिवंत ठेवायला पाहिजे. म्हणून वाङमयीनदृष्ट्या यांचेही मोठेपण लोकांच्या नजरेला आणण्याचे कार्य बोरकर सरांनी केले आहे. लोककलांच्या संहिता गोळा करणे, त्यांचा अभ्यास करणे आणि त्या लोककलांना व्यासपीठावर सादरीकरण करून दाखविणे हा एकच ध्यास बोरकर सरांनी घेतला आणि गावागावातील जे लोक कलाकार आहेत, त्यांना योग्य मार्गदर्शन करून आजच्या वर्तमान काळानुरूप त्यात बदल करून नव्याने त्या लोककला सादर करण्याकडे त्यांनी लोककलाकरांना प्रवृत्त केले त्यामुळे महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरही दंडार या लोककलांना सन्मानाचे स्थान प्राप्त करून दिले. म्हणूनच बोरकर सरांना लोककलांचे संशोधक, महर्षी, गुरू या सन्मानाच्या पदव्या मिळाल्या. ग्रामीण स्तरावर जे लोककलांचे उपेक्षित सादरीकरण करणारे लोककलावंत असतात. त्यांना सन्मानाचे स्थान मिळावे याकरिता बोरकर सर अखंड झटत आहेत. शासनदरबारी त्यांच्या जीवनाचा, स्थितीचा, त्यांच्या उदरनिर्वाहाचा पाढा वाचत राहिले. त्यामुळे शासनाचे एक ठराविक मानधन या लोककलावंताच्या पदरी पडले. हेही बोरकर सरांचे कार्य उल्लेखनीय आहे.

त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूपैकी त्यांच्यातील लेखक मला महत्वाचा वाटतो. आबालवृद्धांकरिता साहित्य निर्मितीकरिता प्रवृत्त करणे हा सरांचा एक महत्वाचा पैलू आहे. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत ज्ञानाची दारे मोकळी करणे व साहित्याच्या माध्यमातून ते ज्ञानवंत होणे या एका उद्देशातून बोरकर सरांनी प्रचंड ग्रंथनिर्मिती केली आहे. त्यांच्यातील हा लेखक सदैव जिवंत आहे. ‘ज्ञानमहर्षी’ ही उपाधी त्यांना चपखलपणेकल्पकता आणि संमेलनाचे नियोजन या लक्षात ठेवण्यासारख्या बाबी आहेत. एखाद्या बोलीचे सातत्यपूर्ण संमेलने होणे ही कदापिही साधी बाब नाही. हे आयोजनाचे काम बोरकर सरांच्या दूरदृष्टिकोणाचे फलित आहे. नवनवीन लोकांना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्यामधील सुप्त गुणांना वाव देण्याचे सरांचे कार्यही लक्षणीय आहे. माणसात दडलेला कवी, लेखक यांना उजागर करण्याचे काम तसे अवघडच आहे पण बोररकर सरांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून झाडीबोलीची नाममुद्रा प्रतिष्ठित केली.

संपूर्ण महाराष्ट्रातील बोलीचे एक व्यासपीठ असावे या उद्देशाने मराठी बोलीचे मंडळ स्थापन करून समग्र बोलींना सन्मान प्राप्त करून देणे, त्यांचे शब्दकोश व व्याकरण स्वतंत्रपणे तयार करणे हा उद्देश या स्थापनेमागील आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विविध बोलींच्या अभ्यासकांच्या भेटी घेण्याचे काम आपल्या सहकाऱ्यांसोबत बोरकर सरांनी केले. त्यांनी मराठी बोलीच्या अनेक संमेलनाचे आयोजन केले. महाराष्ट्रातील विविध बोलींचा अभ्यास होण्याकरता हरिश्चंद्र बोरकर सरांची पाऊले लाख मोलाची ठरली आहेत.

आद्यकवी मुकुंदराज यांनी ‘विवेकसिंधू’ ग्रंथ आंभोरा येथे निर्माण केला. हे स्थानमहात्म्य व ही मुकुंदराजांची कवित्वनिर्मिती लोकांच्या सदैव स्मरणात राहावी याकरिता बोरकर सरांनी मुकुंदराज गौरव सोहळ्याची योजना आखून तिला प्रत्यक्ष वाङ्मयीन रूप देण्याचे व मुकुंदराजाच्या संतत्वाला व कवित्वाला जनसामान्यांपर्यंत आणण्याचेही काम बोरकर सरांनी केले. हा त्यांच्या व्यक्तिमत्वातील महत्वपूर्ण भाग आहे.

कुशल आयोजक, कुशल संघटक याही भूमिकेतून बोरकर सरांच्याकडे पाहिले पाहिजे. झाडीपट्टीचा भाग, त्यातील लोककला, त्यांची बोलीभाषा या जवळून बघायला हव्यात त्यामुळे त्यांच्या भेटीला आपण जावे आणि ते केवळ एकट्याने नव्हे, तर इतर अभ्यासकांनाही आपल्या सोबत घेऊन जावे आणि या ग्रामीण भागाचे वैविध्यपूर्ण दर्शन घडवावे याकरिता बोरकर सरांनी वैनगंगा लोकयात्रेचे आयोजन केले. समाजाप्रती कृतज्ञता हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे. मुंबईला दादरच्या शिवाजी मंदिरात त्यांच्यागौरवसोहळ्यात उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळाले. मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी तिथल्या विद्वान लोकांनी बोरकर सरांच्या महान कार्याची दखल घेऊन त्यांना आपल्या सन्मानाच्या आणि विद्वतेच्या पंक्तीत बसविण्याचे कार्य केले. लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक आदरणीय डॉ. प्रभाकर भांडे यांनीही त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. त्यांच्यावरती स्तुतीसुमने उध ळिली आहेत. तेव्हा समूहयात्रेतील आम्ही सारे यात्रेकरू तेथे उपस्थित होतो. हे नमूद करतांना मला या व्यक्तिमत्वाबद्दल सार्थ अभिमान वाटतो.

व्यक्तितील साहित्यिक वृत्ती, काव्यवृत्ती ओळखण्याची किमया बोरकर सरांना साधलेली आहे. महागाव/सिरोली येथील झाडीबोली साहित्य संमेलनाला आलेल्या सौ. अंजनाबाई खुणे यांना त्यांनी व्यासपीठ दिले आणि बाईंनी आपल्या कवित्वाचा गजर सर्व महाराष्ट्रात केला. काव्यनिर्मितीला शिक्षणाची अट शिथील होते. प्रतिभेची गरज असते, हे त्यांनी लक्षात आणून दिले. ‘झाडीपट्टीची बहिणाबाई’ असा सार्थ गौरव अंजनाबाईंचा होत आहे. ही शोधकवृत्ती, लाखमोलाची माणसे शोधून त्यांची काव्यप्रतिमा जागृत करण्याची किमया डॉ. हरिश्चंद्र बोरकरांनी केली आहे. आज त्यांच्या सोबतीला हिरामण लांजे, राजन जायस्वाल, ना. गो. थुटे, बंडोपंत बोढेकर मिलिंद रंगारी ही मान्यवर मंडळी आहेत. आणखी नवनवीन व्यक्ती येतील, जुळतील आणि झाडीबोलीचे उन्नतावस्थेचे कार्य असेच सुरू राहील यात शंका नाही. ही आपली बोली प्रमाणभाषेला शब्दसंपती पुरवित राहील व प्रमाण भाषेला अधिक बळकटी येईल. लोककला या समाजमानसात जिवंत राहतील यांचे श्रेय डॉ. हरिश्चंद्र बोरकर सरांनाच आहे. त्यांच्या महान कार्यात आम्हाला सहभागी होता आले हे आम्ही आमचे अहोभाग्य समजतो. त्यांच्य हातून अशीच साहित्यसेवा, लोकसेवा त्यांच्याकडून घडत राहो ही प्रभूचरणी प्रार्थना.

प्रा. डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे

संत साहित्याचे अभ्यासक, भंडारा

संपर्क क्र. ९६६५६९२३५५

मध्ययुगीन साहित्य निर्मितीत महानुभावांचे योगदान

महाराष्ट्राचा इतिहास पाहिल्यास लक्षात येते की सांस्कृतिकदृष्टया महाराष्ट्र अतिशय प्रगत राज्य आहे. विविध धर्म आणि संप्रदायांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला श्रीमंती प्राप्त करुन दिली आहे. महाराष्ट्रात विविध धर्म आणि संप्रदायांनी अतिशय स्वतंत्रपणे आपल्या तत्त्चज्ञानाचा आणि संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार केला आहे. यामध्ये वारकरी, महानुभाव, दत्त, शैव, वैष्णव, नाथ, रामदासी, नागेश आदी विविध संप्रदायांचा समावेश आहे. यात बाराव्या शतकापासून आजही आपला प्रभाव कायम ठेवून असणाऱ्या संप्रदायांमध्ये दोन संप्रदाय आहेत. एक म्हणजे वारकरी आणि दुसरा म्हणजे महानुभाव संप्रदाय होय.

आजही महाराष्ट्रातल्या गावा-गावात वारकरी आणि महानुभाव संप्रदायाचे अनुयायी आढळतात. ज्ञानेश्वर ते तुकाराम या संतपरंपरेने वारकरी संप्रदायाला जनमानसात नेण्याचे काम केले. वारकरी संप्रदायाची पताका आपल्या खांद्यावर घेत या संप्रदायाला एक अधिष्ठान प्राप्त करुन दिले. दुसरीकडे वारकरी संप्रदायाच्या आधीच महाराष्ट्रात जम बसविणाऱ्या महानुभाव पंथाची धुरा श्रीचक्रधर स्वामी यांच्या खांद्यावर होती. कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या जंजाळात अडकलेल्या सर्वसामान्य माणसाला भक्तीचा सर्वप्रथम अधिकार मिळवून देण्यात श्रीचक्रधरस्वामींनी पुढाकार घेतला. महाराष्ट्राच्या जडण-घडणीत महानुभाव पंथाचे मोठे योगदान आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. मध्ययुगीन कालखंडात महानुभावांनी केवळ भक्तीच नाही तर मराठी साहित्य निर्मितीचा देखील पाया रचला आहे. मराठीतील आद्य गद्य व पद्य ग्रंथ निर्माण करणाऱ्या महानुभावांकडे चरित्र, व्याकरण, कथा, भाष्य, महाभाष्य, काव्य, महाकाव्य, आख्यान, टीका, स्थळवर्णने, इतिहास, साधनग्रंथ, तत्त्वज्ञान, आणि स्फुट रचना आदींच्याही आद्यत्वाचा मान जातो. किंबहुना साहित्याला विविधांगीपणे मांडण्याचे काम महानुभावांनी या महाराष्ट्रात सर्व प्रथम केले आहे.

श्रीचक्रधर स्वामी हेच महानुभाव वाङ्मयाचे प्रेरणास्थान

महानुभाव पंथाच्या उदयाचा काळ साधारणपणे बारावे शतक मानला गेला आहे. या काळात महाराष्ट्रात यादवांची सत्ता होती. हा मराठी भाषेच्या दृष्टीने सुवर्णकाळ मानला जातो. कारण याच काळात महानुभाव वाङ्मय निर्मितीला प्रारंभ झाला. महानुभांवानी मराठीतून वाङ्मय निर्मितीचा पाया घातला. मराठीतील पहिला ग्रंथ ‘लीळाचरित्र’ याच काळात लिहिल्या गेला. महानुभाव पंथाला जनसामान्यात पोहोचविण्याचे महत्वाचे कार्य श्रीचक्रधर स्वामींनी केले. गुजरातमधील भडोच येथून स्वामी महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रातील गावागावात जाऊन स्वामींनी परंपरेच्या कडीकुलूपात बंदिस्त असलेल्या धर्म या संकल्पनेला मुक्त केले. सर्वसामान्यांना धर्माची दारे सताड उघडी करुन दिली. धर्म ही कोणा एकाची मक्तेदारी नाही, तो सर्वांसाठी उपलब्ध आहे हे स्वामींनी पटवून दिले. महिला व शुद्रांना देखील धर्माचा अधिकार असल्याचे स्वामींनी ठासून सांगितले. सुमारे ६२ वर्ष स्वामींनी संपूर्ण महाराष्ट्रात परिभ्रमण केले. येथील लोकांच्या सुखदुःखामध्ये ते सहभागी झाले. त्यांना कुप्रथांपासून निवृत्त केले. त्यांच्यावर योग्य ते संस्कार करण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्य लोकांना त्यांच्या भाषेत रुचेल आणि समजेल अशा त्यांच्या बोली भाषेमध्ये आदर्श जीवन कसे जगावे याचे निरुपण केले. संपूर्ण महाराष्ट्र स्वामींच्या अलौलिक सामर्थ्य, सौंदर्य व निरुपणाने भारावून गेला होता. स्वामींनी स्वतः कुठलाच ग्रंथ लिहिला नाही.

परंतु त्यांनी जे निरुपण केले ते त्यांच्या उत्तरापंथी गमनानंतर त्यांच्या शिष्यांनी शब्दबद्ध केले. यामध्ये सर्वप्रथम निर्मिती झाली ती ‘लीळाचरित्र’ या ग्रंथाची. म्हाइंभट या विद्वान शिष्याने लीळाचरित्राची बांधणी केली. या ग्रंथाची निर्मिती एक आश्चर्यच होते. यामध्ये काय नाही? तत्त्वज्ञान, प्रवासवर्णन, लोककथा, चरित्र, नितीकथा, भौगोलिक वर्णन, इतिहास, लोकरिती, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, कृषीशास्त्र, पाककला, लोकजीवन, राजकारण अशा अनेक विषयांचा परामर्श लीळाचरित्रात घेतला आहे. बाराव्या शतकातील महाराष्ट्राचे अंतरंग उलगडून दाखविण्याचे काम लीळाचरित्राने केले आहे. लीळाचरित्राला महानुभाव वाङ्मयाचा बीजग्रंथ देखील मानला गेले आहे. कारण याच ग्रंथातातून पुढे महानुभावांचे विविध ग्रंथ निर्माण झाले. सूत्रपाठ, दृष्टांतपाठ, आचारस्थळ, विचारस्थळ, लक्षणस्थळ अशा विविध ग्रंथांच्या निर्मितीचे मुळ लीळाचरित्रात आहे. लीळाचरित्र हा ग्रंथ भाषिकदृष्टयाही अतिशय संपन्न ग्रंथ आहे. व्याकरण, छंद, अंलकार, वाक्प्रचार, म्हणी, यांचा अंतर्भाव लीळाचरित्रात मुबलक आहे. याशिवाय गेयता देखील लीळाचरित्रात अनुभवयास मिळते. त्यामुळेच लीळाचरित्राला महाकाव्य म्हणणे वावगे ठरणार नाही. वरवर हे आपल्याला श्रीचक्रधर स्वामींचे चरित्र असल्याचे वाटते. परंतु ज्यावेळी आपण लीळाचरित्राच्या अंतरंगात शिरतो त्यावेळी असे लक्षात येते की, हे कोणा एका व्यक्तीचे चरित्र नसून अनेक व्यक्तिमत्वाचा कोश ग्रंथ आहे.

याशिवाय महाराष्ट्रातील बाराव्या शतकातील यादवकालीन साम्राज्याची स्थिती, संस्कृती, भाषा यांचा देखील मागोवा लीळाचरित्र हा ग्रंथ घेताना दिसतो. हा ग्रंथ निर्माण करुन म्हाइंभट यांनी मराठी भाषेवर मोठे उपकार केले आहेत.

लीळाचरित्रातून इतर ग्रंथांची निर्मिती

लीळाचरित्रापासून स्फूर्ती घेऊन पुढे अनेकांनी वाङ्मय निर्मिती केली. महानुभावांची वाङ्मय निर्मिती ही शास्त्रीय कसोटीवर खरी उतरली आहे. महानुभाव साहित्याचे वैशिष्टय म्हणजे यात जेवढे समृद्ध गद्य वाङ्मय आहे तेवढ‌्याच तोडीचे समृद्ध पद्य वाङ्मय आहे. महानुभावांच्या पद्य वाङ्मयाचा आढावा घेतला तर आपल्या डोळयापुढे सर्वप्रथम ग्रंथ येतो मराठीतील आद्य काव्य ‘धवळे. महादाइसा उर्फ महदंबा हिने रचलेले हे काव्य भक्ती रसाचा झरा आहे. असे असले तरी यादवकालीन महाराष्ट्राचा आरसा म्हणून आपल्याला या ग्रंथाकडे पाहता येते. या काव्याची भाषा अतिशय साधी, सोपी व रसाळ आहे. यादवकालीन महाराष्ट्राची संस्कृती आणि लोकजीवन यांचे दर्शन हे काव्य घडविते. महानुभावांचे साती ग्रंथ हे तर काव्य निर्मितीचे उत्तम उदाहरण आहे. नरेंद्राचे ‘रुक्मिणी स्वयंवर’, दामोदर पंडिताचे ‘वच्छाहरण’, भास्करभट बोरीकरांचे ‘उद्धवगीता’ व ‘शिशुपाळवध’, नारायणबास बहाळे यांचे ‘रिद्धपूरवर्णन’, विश्वनाथबासांचा ‘ज्ञानप्रबोध’ आणि रवळोबासांचे ‘सहृयाद्रीवर्णन’ हे मराठीतील उत्तम महाकाव्य म्हणून ओळखले जातात. या काव्य ग्रंथांचा विचार केल्याशिवाय मराठी भाषेचा इतिहास पुर्ण होवू शकत नाही. विशेष म्हणजे अतिशय प्रतिभासंपन्न कवींनी या काव्यग्रंथांची निर्मिती केली आहे. त्यांचे अनंत उपकार या मायमराठीवर व महाराष्ट्रावर आहेत. ‘रत्नमालास्त्रोत’ आणि ‘तीर्थमाला’ हे देखील महत्त्वाचे काव्यग्रंथ महानुभावांनी मराठी भाषेला दिले. याशिवाय श्रीकृष्णचरित्रपर आख्यान काव्य, श्रीदत्तात्रेय बाळक्रीडा, श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाहकथा, संतोषमुनीचे रुक्मिीणीस्वयंवर, गोपाळकवीची भागवतकथा, कृष्णमुनी किंवा डिंभकवीकृत नवखंड रुक्मिीणीस्वयंवर, पंडित लक्षमींद्रकृत रुक्मिीणी स्वयंवर, एल्हणकवीचे रुक्मिीणीस्वयंवर, द्रौपदीस्वयंवर, हंसांबा स्वयंवर, शल्यपर्व आदी विविध काव्यग्रंथांना निर्माण करुन महानुभावांनी मराठी काव्य प्रांताचे दालन समृद्ध केले आहे.

यादवकाळात गद्य ग्रंथांच्या वाटयाला महानुभाव लेखक सोडता इतर लेखक गेल्याचे आढळत नाही. मात्र महानुभावांची गद्य निर्मितीची समृद्ध परंपरा आहे. मुळात महानुभावांची वाङ्मय निर्मितीची सुरुवातच लीळाचरित्रासारख्या समृद्ध ग्रंथाने झाली असल्यामुळे पुढे त्याचा प्रभाव पडणे स्वाभाविक होते. म्हाइंभटांनी ‘गोविंदप्रभूचरित्र’ हा वऱ्हाडी भाषेचा उत्तम नमुना असलेला ग्रंथ लिहिला. महानुभावांचे पहिले आचार्य नागदेवाचार्य व इतर आचार्यांचे आणि स्वामींच्या भक्तांचे दर्शन घडविणारा ‘स्मृतिस्थळ’ हा एकापेक्षा अधिक व्यक्तींचे चरित्र असलेला मराठीतील पहिला ग्रंथ  आहे. हा ग्रंथ देखील यादवकालीन महाराष्ट्राचे समाजजीवन चित्रित करतो. केसोबास यांनी ‘सूत्रपाठ’ आणि ‘दृष्टांतपाठ’ हे अद्वितीय ग्रंथ लिहून मराठी भाषेत तत्त्वज्ञानपर ग्रंथ लिखाणाचा पाया रचला. ‘दृष्टांतपाठ’ हा मराठी कथा साहित्यातील एक अनमोल ग्रंथ आहे. सूत्रपाठातूनच पुढे आचारस्थळ, विचारस्थळ, लक्षणस्थळ या स्थळ ग्रंथांची निर्मिती झाली. याच ग्रंथांवर पुढे भाष्य ग्रंथ लिहिल्या गेले ज्याला ‘बंध’ असे म्हणतात.

टीकाग्रंथात देखील महानुभावांचा हातखंडा आहे. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या भगवद्गीतेवर महानुभावांनी सर्वाधिक टीका लिहिल्या आहेत. वि. ल. भावे यांच्या कवी-काव्य सुचीत ३१ गीताटीका महानुभावांनी लिहिल्या असल्याचा उल्लेख आहे. कृष्णदास महानुभावांनी ७८ गीताटीकांचा शोध लावला आहे. त्यापैकी सुमारे ४० गीताटीका उपलब्ध आहेत. यापैकी बहुतेक टीका या मराठी भाषेत आहेत. काही गीता टीका या हिंदी भाषेत आहेत.

स्थळवर्णनात देखील महानुभाव मागे नाहीत. ‘डोमेग्रामवर्णन’, ‘ऋद्धिपूरवर्णन’, ‘प्रतिष्ठाणवर्णन’, ‘पांचाळेश्वर-आत्मतीर्थ महात्म्य’ आदी स्थळवर्णनपर ग्रंथ महानुभावांनी मराठीला दिलेत. या स्थळवर्णनपर ग्रंथांमधून यादवकालीन महाराष्ट्राचा भूगोल आपल्याला अभ्यासावयास मिळतो. साधनग्रंथ ही देखील महानुभावांची एक स्वतंत्र निर्मिती आहे. यात लक्षणरत्नाकर, भीष्माचार्याचे पंचवार्तिक, हेतुस्थळ, निरुक्तशेष, गोपीभास्करचा प्रश्ऩार्णव, स्थानपोथी आणि तीर्थमालिका, टीपग्रंथ, सरवळे यांचा समावेश आहे. याशिवाय महानुभावांच्या काही स्फुट रचना देखील आहेत. यात चौपद्या, पदे, धुवे, लोकगीते, स्त्रोते, आरत्या आदींचा समावेश आहे.

महानुभाव ग्रंथकारांनी केवळ काव्यग्रंथ ओवीबद्ध करुन एका छंदाची प्रतिष्ठा केली नाही तर छंदशास्त्रामध्ये अनेक वृत्त व अलंकार यांची भर घातली आहे. पाणिनीच्या तोडीचे व्याकरण शास्त्र निर्माण करुन मराठी ही संस्कृतची बटीक नाही तर एक समृद्ध भाषा आहे हे महानुभावांनी सिद्ध केले.  सर्वसामान्यांना समजेल अशा मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती करुन महानुभावांनी मराठी ही धर्मभाषा बनवून सर्व स्तरातील लोकांना खरा धर्म समजावून दिला. महानुभावांचे हे कार्य खरोखरच महान आहे. मध्ययुगीन कालखंडात महानुभाव साहित्याने दिलेलं योगदान अमूल्य आहे.

प्रा. डॉ. किरण वाघमारे,

सहायक प्राध्यापक

मोबाईल : ९८५०९०२१५४

ताज्या बातम्या

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...