रविवार, जुलै 6, 2025
Home Blog Page 307

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आजही दिशादर्शक- पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.१९ (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज भुत, भविष्य आणि वर्तमान बदलणारे दैवत, अद्भूत शक्ती होते. त्यांनी ३५० वर्षापूर्वी राबविलेली निती, धोरणे आजच्या काळातही आम्हा सगळ्यांसाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

शिव जयंतीनिमित्त प्रशासनाच्यावतीने ‘जय छत्रपती शिवाजी – जय भारत’ पदयात्रेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. यात्रेच्या शुभारंभाप्रसंगी पालकमंत्री श्री.राठोड बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड आदी उपस्थित होते.

महाराजांचे कार्य, शौर्य, सामाजिकता, त्यांनी त्या काळात राबविलेली ध्येय, धोरणे युवा पिढीला समजावी यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने संपुर्ण भारतभर जय छत्रपती शिवाजी – जय भारत पदयात्रा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराजांनी त्या काळात स्वराज्य निर्मितीसाठी वापरलेले कौशल्य आजही तितकेच महत्वाचे आहे. राज्याच्या, समाजाच्या विकासासाठी महाराजांच्या कामाचे अनुकरण दिशादर्शक आहे, असे पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले.

महाराजांचे कार्य डोळ्यासमोर ठेऊन सुराज्य उभे करण्याचा प्रयत्न राज्यात केला जात आहे. महाराजांनी दाखविलेल्या मार्गावर आपण सगळे मार्गक्रमन करीत आहोत. भारत युवकांचा देश आहे. देशाच्या विकासात युवकांचे महत्वाचे योगदान लाभणार आहे. त्यामुळे युवकांना महाराजांचे कार्य अवगत होणे फार आवश्यक आहे. पदयात्रेच्या निमित्ताने शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाराज समजून घेता येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी राज्यातील संपुर्ण ३६ जिल्ह्यांमध्ये पदयात्रा काढण्यात आली आहे. महाराजांचे कार्य यातून युवा पिढीला समजेल असे सांगितले. डॅा.ताराचंद कंठाळे यांनी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारे व्याख्यान दिले. शिवाजी महाराज आदर्श राजा होते. वेगवेगळ्या लोकांना सोबत घेऊन कल्याणाचे काम त्यांनी केले. स्त्रीयांचा अवमान होणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली. स्त्रीयांसाठी स्वतंत्र खाते त्यांनी त्यावेळी केले होते. अस्पृश्यता निवारण, सामाजिक समरसता यासाठी देखील महाराजांचे कार्य होते, असे डॅा.कंठाळे यांनी सांगितले

सुरुवातीस पालकमंत्र्यांसह सर्व मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर पदयात्रेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. पालकमंत्री पदयात्रेत देखील सहभागी झाले होते. पदयात्रेत विविध शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पथकांनी ढोलताशा, लेझिम, पांरपारिक वेषभूषा, सांस्कृतिक कार्यक्रम, मल्लखांब, पारंपारिक व ऐतिहासिक बाबींचे सादरीकरण केले. शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरून जिल्हा क्रीडा संकुल येथे रॅलीचा समारोप झाला.

0000

मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे…

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि जेष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन जगात मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेचे स्मरण करत असताना मराठीतील कितीतरी चांगले शब्द काळाच्या ओघात लोप पावले आहेत असे शब्द हुडकून बोली भाषेत त्याचा सर्वांनी वापर केला पाहिजे, केवळ मराठी दिनाच्या निमित्ताने मराठीबद्दल बोलून तिला घासून लख्ख करण्यापेक्षा दरवेळी मराठीच्या अस्तित्वासाठी आपण सर्वांनी झटले पाहिजे. भ्रमणध्वनीवर सध्या मराठी भाषेचे विविध ‘अ‍ॅप्स’ही आले आहेत अशा तंत्रज्ञानाचा स्पर्श मराठीला झाला असला तरी तिचा वापर राजभाषा, ज्ञानभाषा आणि व्यवहाराची भाषा म्हणून वाढला पाहिजे, अन्यथा इतर भाषांच्या आक्रमणात अमृताची भाषा मागे पडेल.अशी भीती मला वाटते .

मराठी भाषेची खरी घसरण सुरू झाली ती १९९१च्या आसपास. मराठी मंडळींनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायला सुरुवात केली. इंग्रजी भाषेला विरोध करण्याचे कारण नाही. ती जगाची भाषा आहे आणि ती न येऊन चालणारे नाही, हे खरे असले तरी काळाच्या ओघात इंग्रजी भाषाच श्रेष्ठ असे जे अवडंबर माजवले गेले, तिथे मराठीचा ऱ्हास सुरू झाला.

आपला देश बहुसांस्कृतिक असून प्रत्येक मैलागणिक भाषा बदलते आणि म्हणूनच बहुभाषेच्या आधाराने भाषा टिकते आणि विकसित होते. मराठी ही ओळख टिकवणे आपले कर्तव्यच आहे. मराठी ही केवळ साहित्य भाषा म्हणून त्याकडे पाहून चालणार नाही. ती संस्कारभाषा, ज्ञानभाषा आणि व्यवहारभाषा होणे गरजेची आहे. नवे ज्ञानविज्ञान मराठी माध्यमातून सुलभपणे येण्यासाठी भाषा तज्ज्ञां कडून विश्वसनीय आणि प्रमाणभूत साधने उपलब्ध झाली पाहिजे.

अद्ययावत ज्ञाननिर्मितीच्या कामात सहज सुलभपणे उपलब्ध होणारी ज्ञानभाषा म्हणून मराठीची वाढ झाली पाहिजे. ज्ञानविज्ञान, तत्त्वज्ञान आणि कला यांच्यातील संशोधन मराठीतून उपलब्ध होणे गरजेचे आहे. विखुरलेल्या मराठी समाजाला मराठीच्या माध्यमातून जोडून घेत या सर्व समाजाचे भाषाज्ञान वाढवणे आवश्यक आहे. मराठी भाषेला सक्षम करण्यासाठी आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी आपण सर्व मराठी जणांनी आणि महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला व केंद्र शासनाने अभिजात दर्जा देऊन त्यावर मोहोर अमटवली आता आपण सर्वजण मराठी भाषा वृध्दींगत करण्यासाठी कसोसीने प्रयत्न करूया.

संस्कृत नंतर सर्व भाषांत मराठी भाषा अधिक सात्त्विक आहे. प्रायोगिक स्तरावर प्रत्येकाने तिचे वैभव टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत,  ‘माय मराठी’ला तिचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मराठी भाषिकांनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपण दृढ निश्चय करूया आणि संघटितपणे ‘मराठी’चे रक्षण तसेच संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करूया !  आणि प्रत्येक मराठी माणसांनी आजच्या मराठी दिनी ठरवलं पाहिजे की माझी मराठी ही माझी जबाबदारी नाही का ? महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे. मराठी ही राजमान्य, लोकमान्य राज्यभाषा झाल्याला आता अनेक वर्ष होऊन गेले, तरी महाराष्ट्रातही मराठीला योग्य स्थान नाही. हे मनातील शल्य व्यक्त करताना कवी कुसुमाग्रज असे म्हणतात, ” महाराष्ट्राच्या राजधानीत मंत्रालयासमोर मराठी भाषा, डोक्यावर राज्य मान्यतेचा सोनेरी मुकुट घालून उभी आहे. परंतु तिच्या अंगावरचे वस्त्र फाटके आहेत.” मराठीचे स्वतःचे राज्य असावे, मराठीला राजभाषेचा मान मिळावा म्हणून वर्षानुवर्षे हजारो मराठी सुपुत्रांनी धडपड केली, संघर्ष केले. प्रसंगी बलिदान ही केले.

प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, चिं. वि. जोशी, ग. दि. माडगूळकर, वि. स. खांडेकर, ना. सि. फडके, साने गुरुजी यांच्या सारख्या साहित्यिकांनी मराठीत आपल्या साहित्याची भर घालून मराठी भाषा मराठी माणसाच्या मनामनात जागृत ठेवली.आज सामाजिकशास्त्रे, तत्त्वज्ञान, चित्रकला, साहित्य, संगीत, नाटक यासारख्या कलांचे समीक्षा-विचार मराठीत मूळ धरू लागले आहेत. तर एकीकडे इंग्रजीच्या वाढत्या आक्रमणाने मूळ मराठी भाषाच बदलत चालली आहे.

दैनंदिन बोली भाषेतून मराठीचे संवर्धन करणे, मराठीचे सौंर्दय, खानदानीपणा टिकवून ठेवणे हे प्रत्येक मराठी भाषकाचे कर्तव्य आहे.

मायमराठीचा जयजयकार असो’ म्हणा, ‘गर्व से कहो हम मराठी है’ म्हणा किंवा ‘वुई वॉन्ट मराठी’ म्हणा… आपल्यातली मराठीपणाची ज्योत तेवत ठेवणं महत्त्वाचं आहे. भाषा आणि संस्कृतीची स्पंदनं प्रथम मनात उमटतात, नंतर ती उच्चारांतून आणि कृतीतून प्रकटतात. केवळ दिखाऊ पणासाठी मराठीचं प्रेम नको, आंतरिक जाणीवांतून ते प्रकट होत राहिलं, तर भाषा आणि संस्कृती कधीच मरत नाही.असे मला वाटते.

आपली स्वाक्षरी मराठीतून करा ! ‘गुड मॉर्निंग’च्या ठिकाणी ‘शुभ प्रभात’ म्हणा ! मुलांना ‘मम्मी-डॅडी’ नको, तर ‘आई-बाबा’ म्हणायला शिकवा !  दूरभाषवर बोलतांना ‘हॅलो’ म्हणण्यापेक्षा ‘नमस्कार’ म्हणून बोलण्यास प्रारंभ करा ! सणाच्या शुभेच्छा मराठीतून द्या, उदा. ‘हॅपी दिवाली’च्या ठिकाणी ‘शुभ दीपावली’ म्हणा ! मुलांना ‘हॅरी पॉटर’ वाचायला न देता ‘पंचतंत्रा’तील कथा आणि साने गुरुजी यांची पुस्तके वाचायला द्या ! दारावर पाटी मराठीतून लावा ! ‘नावात इंग्रजी अक्षरांनी आद्याक्षरे न लिहिता, मराठी (मातृभाषेतील) आद्याक्षरे वापरा. हे काम आपण शाळांमधून करू शकत नाही का ?  म्हणजेच माझी मराठी ही माझी जबाबदरी नाही का ? मराठी ही निव्वळ भाषाच नाही तर ती एक संस्कृती आहे.

मराठी भाषेचा इतिहास खूप आधीपासून म्हणजेच अगदी राष्ट्रकुट राजापासून अस्तित्वात आहे. मराठी भाषा लवचिक आहे. थोड्या‌ थोड्या फरकाने शब्दांचे अर्थ बदलतात. मुंबईची मराठी भाषा। हल्ली खिचडी भाषा झाली आहे. शुद्ध मराठी राहिली नाही. तिच्यात हिंदी, मराठी, इंग्रजी यांची भेसळ झाली आहे. हिंदी आणि इंग्रजी सिनेमा पाहून भाषा अशी झाली आहे. पूर्वी मराठीला मान नव्हता, पण आता काही प्रमाणात आहे. आणि आता केंद्र शासनाने आपल्या मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे, त्यामुळे भाषा संवर्धनाचे मोठे काम यापुढे होणार यात शंका नाही. परंतु आपण सर्व मराठी भाषकांनी एकत्रीत येऊन मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करूया!

‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ !

‘जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी’।।

 

पद्माकर मा कुलकर्णी

अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जुळे सोलापूर.

सारस्वती जन्मभू : आदिपर्व

दक्षिण हिंदुस्थानातील सर्वात प्राचीन देश म्हणून विदर्भाचे नाव घेण्यात येते. रामायण, महाभारत, रघुवंश आदी प्राचीन ग्रंथांमधून विदर्भाचे संदर्भ येतात. कवी राजशेखरने ‘सारस्वती जन्मभू’ म्हणून या भूमीला प्रशस्तिपत्र बहाल केले आहे. मराठी भाषेची जननी म्हणूनही तिचा उल्लेख करण्यात येतो.

काळ कुणासाठी थांबत नाही. गतकाळाची पुनरावृत्तीही होत नाही. या काळाच्या विशाल पडद्यावर अनेक ऋषिमुनी आणि लेखक कवी आपल्या शब्दांची अक्षरनोंद ठेवून व आपले अस्तित्व चिरंजीव करून पडद्याआड निघून जातात. वाचकांच्या हाती उरतो तो या आठवणीतील अक्षरांचा अमोल ठेवा… विदर्भाच्या सुवर्णाक्षरांतले एक पान इंद्रपुरीचे आहे. एके काळची संपन्न आणि विख्यात नगरी म्हणजे इंद्रपुरी म्हणजेच अमरावती. तिच्या प्राचीनतेच्या खुणा आज जागोजागी आढळतात. ऋग्वेदातील काही सूक्तांचा द्रष्टा आणि आर्यपुरुष अगस्ती ऋषी यांची पत्नी विदर्भ राजकन्या लोपामुद्रा, नळराजाची राणी दमयंती, श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी आणि दशरथ राजाची आई इंदुमती येथल्याच मातीत जन्मल्या. या चारही विदर्भकन्यांचा इतिहास अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर तहसीलीतील ‘कौडिण्यपूर’ या एकेकाळच्या विदर्भाच्या राजधानीच्या नावाने जगाला ज्ञात आहे.

सालबर्डी

याच जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या रम्य कुशीत सालबर्डी वसली आहे. येथे वाल्मिकी ऋषींचा आश्रम होता. सीता इथेच आश्रयाला होती. लव-कुश ह्याच ठिकाणी वाढले अणि राम-सीतेचे पुनर्मिलन येथेच झाले, अशी आख्यायिका आहे. श्री चक्रधरस्वामींनीही येथेच तप केले होते.

येथले रिद्धपूर म्हणजे महानुभावपंथीयांची काशी. या पंथाचे चौथे कृष्ण श्री गोविंद प्रभू यांचे वास्तव्य रिद्धपूरला होते. त्यांच्याकडून चक्रधर स्वामींनी ज्ञान प्राप्त केले आणि महानुभाव पंथ पुरस्कृत केला. (तेरावे शतक) अनेक पुरोगामी तत्त्वांची बांधिलकी स्वीकारलेला हा पंथ येथूनच पुढे भारतभर पसरला. चक्रधरस्वामींची शिष्या महदंबा महानुभाव वाङ्मयात आद्य कवयित्री म्हणून प्रसिद्ध आहे. तिचा चक्रधरांच्या स्तुतीपर लिहिलेला अभंग लीळाचरित्रात आहे. तद्वतच ‘धवळे’ हे तिचे एक सुंदर कथागीत असून गेयता हे त्याचे वैशिष्ट्य आहे. आजही महानुभावांच्या मठातून हे धवळे सामूहिकरित्या म्हटले जाते. देश-विदेशातील संशोधक आजही रिद्धपूरला येत असतात.

 राजज्योतिषी कृष्ण:

या भूमीत अंदाजे सतराव्या शतकात एक प्रसिद्ध ज्योतिष घराणे होऊन गेले. या घराण्यातला विद्वान ज्योतिषी आणि ग्रंथकार कृष्ण याने काही ग्रंथांची निर्मिती केली. बीजगणितावर टीकाग्रंथ लिहून स्वतःचे काही नवे सिद्धांत मांडले. त्यावेळचा राजा जहांगीर याने त्याला आपल्या दरबारात राजज्योतिषी म्हणून मानाचे स्थान दिले.

सुर्जी-अंजनगाव

साहित्याचा अभिजात वारसा मिळालेले एक गाव सुर्जी अंजनगाव. संत एकनाथ महाराजांच्या शिष्यपरंपरेतले विदर्भकवी श्री देवनाथ महाराज (इ.स. १७५४-१८३१) हे अंजनगावचेच. श्री. राजेश्वरपंत कमाविसदार यांच्या कुळात सुर्जी येथे ‘देवराज’ जन्माला आले. त्यांना कुस्त्यांचा भारी शौक. ‘निरुद्योगी’ म्हणून घरी आईशी व मोठ्या बंधूशी भांडण झाले. त्यामुळे ते सुर्जीच्या हनुमान मंदिरात गेले आणि ध्यान लावले. योगायोगाने या २७ वर्षांच्या ब्रह्मचारी देवरावांची संत एकनाथांच्या संप्रदायातील तेरावे पुरुष श्री गोविंदनाथ यांच्याशी गाठ पडली. गोविंदनाथांनी त्यांच्यावर अनुग्रह केला.

आणि त्यांचे ‘देवनाथ’ हे सांप्रदायिक नाव ठेवले. तेव्हापासून त्यांचा काव्यप्रवास आणि कीर्तने यांना प्रारंभ झाला. या निमित्ताने ते भारतभर फिरले. संत नामदेव महाराजानंतर पंजाबात जाऊन समाजप्रबोधनाचे कार्य श्री देवनाथांनीच केले. अनेक ठिकाणी आपले मठ स्थापन केले. आज मुख्य मठ सुर्जीला आहे.

श्री देवनाथ महाराज या मुख्य पीठावर विराजमान झाले. त्यांच्यानंतरचे पीठाधीश श्री दयाळनाथ महाराज हेही श्रेष्ठ प्रतीचे आख्यानक कवी होते. त्यानंतरच्याही पीठाधीशांनी काव्यरचना केल्या. श्री देवनाथ व श्री दयाळनाथ यांची कविता प्रासादिक आहे. द्रौपदीचा कृष्णासाठीचा धावा दयाळनाथ या शब्दांत बद्ध करतात- ‘ये धावत कृष्णा बाई अति कनवाळे निज जन मन सर समराळे.’ हृदय हेलावून टाकणारी अशी ही रचना आहे. श्री दयाळनाथांचे निधन वयाच्या ४८ व्या वर्षी (इ.स.१८३६) हैद्राबाद येथे झाले. श्री देवनाथांच्या निधनाची कथा मात्र मती गुंग करून टाकणारी आहे. रामनवमीच्या निमित्ताने ग्वाल्हेरला ते कीर्तन करण्यासाठी गेले. अपार गर्दीत त्यांनी कीर्तन सुरू केले. एवढ्यात मंडपाला आग लागली. शेकडो लोक मारले गेले. देवनाथ महाराज बाहेर पडणार तोच कुणीतरी त्यांना कुत्सितपणे म्हणाले, ‘नैन छिन्दती शस्त्राणी, नैन दहती पावक.’ हे ऐकून देवनाथांनी त्या इसमाला घट्ट पकडून ठेवले आणि त्याच्यासोबतच ते अग्निदेवतेच्या स्वाधीन झाले. श्री देवनाथांची समाधी ग्वाल्हेरला आहे अन् त्यांनी स्थापित केलेला मठही तेथे आहे.

अमरावती : काही वेधक नोंदी

अमरावती हे नाटककारांचे गाव आहे, तसेच ते नाट्यवेड्यांचे गाव आहे. नामवंत कंपनींची नाटके अमरावतीला आली की ती पाहण्यासाठी दूरदूरून नाटकांचे रसिक येत. छकडा, पायटांगी व सायकल ही त्यावेळची वाहने. काही श्रीमंत व्यक्ती घोडा वा घोडागाडी वापरत. जमेल त्या वाहनाने माणसे येत. रात्रभर नाटकांचा आस्वाद घेत. त्या काळची नाटकंही ‘रात्रीचा समय सरूनी येत उषःकाल हा…’ अशा स्वरूपाची असत.

अमरावती लेखक-कवींचेही गाव आहे. या शहराने महाराष्ट्राला ‘साहित्य-सोनियाच्या खाणी’ दिल्या आहेत. मराठी कवितेला मुक्तछंद देणारे कवी अनिल येथेच शिकले. कुसुमावती देशपांडेही येथल्याच. कुसुमावतींचे वडील जयवंत कविता लिहीत. शालेय जीवनापासूनच कुसुमावती येथल्या साहित्य विशेष आणि सांस्कृतिक कार्यक्रमात हिरिरीने भाग घेत. ‘कुसुमानिल’ यांचे प्रेम येथेच फुलले.

बेडेकर इथलेच

विश्राम बेडेकर यांचा जन्म अमरावतीचाच. त्यांची नाटक व चित्रपटातील कामगिरी सर्वांना परिचित आहे. ‘ब्रह्मकुमारी’ हे त्यांचे पहिले नाटक दि.१५/६/१९३३ रोजी रंगभूमीवर आले. (संगीत- मास्टर दीनानाथ) त्यानंतर त्यांनी मोजकेच लेखन केले. त्यांच्या वास्तव्यातली अमरावती, विदर्भ महाविद्यालय, मित्रमंडळी आणि येथे भोगलेले दारिद्र्य… या साऱ्या आठवणी त्यांनी आपल्या आत्मचरित्र ग्रंथातून (एक झाड दोन पक्षी) मांडल्या आहेत. बेडेकरांचे वडील रेल्वे स्टेशन परिसरातील आळशी राममंदिराचे पुजारी होते.

कवी कृष्णमूर्ती, गोपाळराव बेडेकर, बा. सं. गडकरी, ना. कृ. दिवाणजी, दादासाहेब आसरकर, डॉ. श्री. व्यं. केतकर, काकासाहेब सहस्रबुद्धे. वि. रा. हंबर्डे, रा. द. सरंजामे, डॉ. भवानराव म्हैसाळकर, मा. ल. व्यवहारे, पु. य. देशपांडे, खापर्डे बंधू, वीर वामनराव जोशी, नानासाहेब बामणगावकर, कृष्णाबाई खरे, अ. तु. वाळके, जा. दा. राऊळकर, वासुदेवशास्त्री खरे, तात्यासाहेब सबनीस, भाऊसाहेब असनारे, अप्रबुद्ध, संत गुलाबराव महाराज, संत तुकडोजी महाराज, गीता साने, सुदामजी सावरकर, विमलाबाई देशपांडे आदींनी आपल्या लेखनकर्तृत्वाने आपला काळ गाजवला आहे. संत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, श्लोक, अभंग आणि इतर लेखन यांची जनमानसावरील पकड आजही कायम आहे. त्यांचे एकूणच लेखन चिरंजीवी ठरले आहे.

वाचता वाचता

जुन्या लेखनकर्तृत्वाचा धांडोळा घेताना काही संस्मरणे वाचनात आली.

सुप्रसिद्ध कादंबरीकार बाळकृष्ण संतुराम गडकरी, यवतमाळचे यशवंत खुशाल देशपांडे आणि डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हे तिघेही जिवाभावाचे मित्र होते. ते एकाच शाळेत शिकत. नगर वाचनालयात ग्रंथवाचन करीत आणि मराठी वाङ्‌मयावर चर्चा घडवत.

सुप्रसिद्ध कादंबरीकार गीता साने अमरावतीतली १९२६ मध्ये प्रथम श्रेणीत मॅट्रिक होणारी पहिली मुलगी. सायन्स कॉलेजचीही पहिली विद्यार्थिनी. लग्नानंतर आडनाव न बदलविणारी पहिली मराठी लेखिका ! उत्तर प्रदेश व बिहारमध्ये स्त्री-शिक्षणाचा प्रसार करणारी पहिली विदर्भकन्या !

कवी गणपतराव देशमुख हे स्वामी शिवानंद नावाने ओळखले जायचे. अमरावती नगरपालिकेत ते लिपिक होते. इंग्रज अधिकाऱ्यांविरुद्ध कविता रचल्यामुळे १९०७ साली त्यांना सात वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा फर्मावली होती. परंतु पुढे वऱ्हाडात पाय ठेवू नये, या अटीवर त्यांना मुक्त करण्यात आले. कविता लेखनामुळे तुरुंगात जाणारा हा पहिलाच वैदर्भीय कवी असावा.

डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी लेखन केले नसले तरी ते अनेक लेखकांचे प्रेरणास्थान होते. डॉ. वि. भि. कोलते यांनी आपल्या आत्मचरित्रात (अजूनि चालतोचि वाट) भाऊसाहेबांच्या अनंत उपकारांचे स्मरण मोठ्या हृद्यतेने केले आहे. भाऊसाहेबांबद्दल एक विशेष माहिती मिळाली. त्यांना स्वतःचे नाव इंग्रजीत Panjab ऐवजी Punjab लिहिणे योग्य वाटत नसे. कुणी असे लिहिल्याचे लक्षात आले की ते नावातल्या ‘यू’ अक्षराचा ‘ए’ करीत.

सुप्रसिद्ध नट-दिग्दर्शक गजानन जागिरदार अमरावतीलाच चौथीपर्यंत शिकले. सुप्रसिद्ध नाटककार जयराम केशव ऊर्फ भाऊसाहेब असनारे यांनी आपले आयुष्य संगीत नाटकांना वाहून टाकले. आजही असनारे घराण्याची आजची पिढी संगीत, वादन आणि गायन या क्षेत्रात नाव मिळवित आहे. परंतु आज हे कुटुंब सांगलीला स्थायिक झाले आहे.

दादासाहेब खापर्डे ह्यांनी हिराबाई बडोदेकरांना ‘गानकोकिळा’ पदवी अमरावतीलाच प्रदान केली होती.

पूर्वी राजकमल चौकात ‘महाराष्ट्र प्रकाशन’ या नावाची सुप्रसिद्ध प्रकाशन संस्था होती. या प्रकाशनाने आचार्य अत्रे, गो. नी. दांडेकर, जयवंत दळवी इ. नामवंत लेखकांची काही पुस्तके एका काळात प्रकाशित केली होती. कादंबरीकार ह. ना. आपटे यांनी ‘जयध्वज’ नावाचे नाटक लिहून त्याचा पहिला प्रयोग १९०५ च्या सुमारास अमरावतीला केला होता. विख्यात लेखक रा. भि. जोशी हे अमरावतीला शिकले आणि काही वर्षे अमरावतीच्या डेप्युटी कमिशनरच्या ऑफिसात नकलनवीस म्हणून काम केले. ह.भ.प. ल. रा. पांगारकर हे काही काळ अमरावतीला शिक्षक होते. डॉ. श्री. व्य. केतकर हे त्यांचे विद्यार्थी. अमरावतीच्या एके काळच्या साहित्य आणि सांस्कृतिक जीवनाचा हा धावता आढावा.

लेखक सुरेश अकोटकर (भावचित्रे )

अमरावती

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या वाङ्मयाचे प्रबोधनमूल्य…

मध्यप्रांत-वऱ्हाडात अमरावती लगतच्या यावली गावात जन्मलेल्या व पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (1909-1968) या नावाने प्रसिद्धीस आलेल्या सत्पुरुषाच्या व्यक्तिमत्वात संत, तत्त्वज्ञ व कलावंत असा त्रिवेणी गुणसंगम झालेला होता. वऱ्हाडातील प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज आणि लोकसंत गाडगेबाबा या दोन महात्म्यांच्या प्रज्ञा-प्रतिभा तथा जनाभिमुख प्रवृत्तीचा सहज समन्वय राष्ट्रसंतांच्या व्यक्तित्वात झाला असल्याचे त्यांच्या हिंदी, मराठीतील वाङ्मयनिर्मितीवरून लक्षात येते. तसा वयाच्या 8 व्या- 9 व्या वर्षापासूनच त्यांच्या कवित्वाचा आरंभ दिसून येत असला तरी, प्रारंभकाळातील त्यांच्या बहुसंख्य पदरचना या भक्तिगीत वा ‘ईश्वरास आळवणी’ या स्वरूपाच्या असत. मात्र, पुढे वयाच्या वीशी-पंचवीशीनंतर थेट अखेरपर्यंत व्यापक जनतेच्या उपस्थितीत त्यांनी जी वाङ्मयनिर्मिती केली तिचे स्वरूप, आशय व बांधणी दोन्ही बाबतींत वैविध्यपूर्ण आहे. संख्येत तर ती विपुल आहेच ; शिवाय गुणवत्तेतही ती आगळी वेगळी आहे. जनजीवननिष्ठ व प्रासादिक अशी ही निर्मिती मध्ययुगीन संतांच्या काव्यनिर्मितीशी नाते सांगणारी व तरीही आधुनिक काळातील समस्यांशी भिडणारी अशी आहे. त्यामुळे 20 व्या शतकाच्या प्रथमार्धात हिंदी व मराठी साहित्यप्रांतांत रूढ असलेल्या पंडिती कला-निकषांच्या चाकोरीत बसणारी ती नाही. असे असले तरी समकालीन विद्वानांना देखील त्यांच्या ‘या झोपडीत माझ्या-‘, ‘माणूस द्या मज माणुस द्या’, ‘मंदिरात नाही दिसला’, ‘उठा हो दिवस निघाला नवा’, ‘सब के लिए खुला है-‘, ‘बना रहे दरबार’ अशा कितीतरी रचनांनी वेड लावले होते !

हजारोंच्या संख्येतील अशिक्षित / अर्धशिक्षित शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी ग्रामीण जनतेसमक्ष राष्ट्रसंत तुकडोजींनी भजन-भाषणांच्या स्वरूपात वाङमयसेवा प्रत्यक्ष सादर केली. त्यांच्या एकेका भजनाच्या कार्यक्रमात परिसरातल्या वीस-पंचवीस खेड्यापाड्यांतील लोक आवर्जून हजर राहात, आणि एक उच्च व आगळा वाङमयानंद तासन्तास अनुभवून परतताना संस्कारांची शिदोरी आपापल्या गावी सोबत घेऊन जात. अशा जनसंपर्क दौऱ्यांच्या सततच्या धावपळीतच राष्ट्रसंतांची सर्व ग्रंथसंपदा आकारास आली आहे.

राष्ट्रसंतांची ग्रंथनिर्मिती –

राष्ट्रसंत श्री. तुकडोजी  महाराजांचे मराठी भाषेतील आजतागायत 19 पद्यसंग्रह (भजनावली, अभंगावली इ.) व 9 गद्यसंग्रह प्रसिद्ध असून हिंदी भाषेतील 18 पद्य संग्रह (भजनावली, बरखासंग्रह) व 5 गद्यग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत. या व्यतिरिक्त ‘श्रीगुरुदेव’ (मासिक) व ‘सेवक’ तथा ‘सुराज्य’ आदी नियतकालिकांमधून त्या-त्या काळी प्रसिद्ध झालेले वाङमय अद्याप असंग्रहीत स्वरूपातच उपलब्ध आहे. राष्ट्रसंतांच्या एकूण वाड्मयसंभारात विविध आकृतिबंधांमधील हिंदी मराठी काव्यरचना जशा समाविष्ट आहेत तसेच गद्यातील विविध वैचारिक बंधही समाविष्ट आहेत. पद्यरचनांमध्ये-अक्षरगणवृत्त / मात्रावृत्त यांमधील पदरचना (भजने), भावकाव्ये, नाट्यकाव्ये आहेत. तसे अभंग, ओव्या, श्लोक (चतुष्पदी) याबरोबरच गजल, रुबाई, पोवाडे व छंदयुक्त कबित्तही समाविष्ट आहे. उद्देशिका, अन्योक्ती, आध्यात्मिक कूटे जशी त्यात आहेत, तशी स्फुट कणिका, सद्विचारप्रवाह (सुभाषितप्राय) देखील समाविष्ट आहेत.

राष्ट्रसंतांच्या ललित वाङ्मयात प्रकट चिंतन, प्रवासवर्णन, कथाभास (दृष्टान्त) इतकेच नव्हे तर कथाबंधही आहेत. राष्ट्रसंतांच्या एकंदर जीवन शैलीस साजेशा अशा या ललित बंधांसोबतच वैचारिक लेख, निबंध, व्याख्याने, प्रवचने, कीर्तने, पत्रे, शंकासमाधान, आध्यात्मिक निरूपणे त्याचप्रमाणे ‘ग्रामगीता’ सारखी ओवीबद्ध प्रबंधरचना सुद्धा आहे.

ईश्वराशी धागा जोडू पाहणाऱ्या व कोंडलेल्या निराधार विपरीत मनःस्थितीत ईश्वराचा धावा करू पाहाणाऱ्या, आर्त भक्तीपर पदरचनापासून विकसित  होत त्यांच्या अंतरात्म्यातील भक्ताने निसर्गाविषयी अकृत्रिम ओढ व्यक्त करणाऱ्या रचना परिसरातील विपरित समाजस्थितीचे  दर्शन घडविणाऱ्या रचना अखंडितपणे जनांसमक्ष सादर केल्या आहेत. व्यक्ती, कुटुंब, समूह, गाव, राष्ट्र आणि विश्व यांच्या संदर्भातील आदर्शाचे त्याद्वारे त्यांनी प्रबोधन केले आहे. त्यामुळे स्थूल मानाने पाहू जाता, देवभक्तीवर रचना, देशभक्तीवर रचना, समाजास्थितीत परिवर्तन आणू पाहणाऱ्या आदर्शलक्ष्यी रचना, निसर्ग व पर्यावरणलक्ष्यी भावपूर्ण रचना आणि विश्वमानवतेच्या कक्षेतून स्त्रवणाऱ्या वैश्विक, कालातीत (संत साहित्यपर) रचना असा एकंदर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या वाड्मयाचा व्यापक आवाका दिसून येतो.

प्रस्तुत अभ्यासात आपणास राष्ट्रसंतांच्या वाङ्‌मयाचे प्रबोधनमूल्य जाणून घ्यावयाचे आहे. त्याकरिता एक आधुनिक जनजीवनदृष्टीचा धर्मनायक म्हणून राष्ट्रसंतांची भूमिका तटस्थपणे समजून घेणे ज्याप्रमाणे आवश्यक ठरते, त्याचप्रमाणे आधुनिक राष्ट्रीय चेतनेचा प्रवर्तक म्हणूनही त्यांची भूमिका समजून घेणे आवश्यक ठरते.

‘मानवी जीवनाचा उत्क्रांतिमार्ग’ (श्री.गुरुदेव जून 1944, पृ.5-8) या लेखात राष्ट्रसंतांनी मनुष्यत्व, साधुत्व आणि देवत्व हे मानवी जीवनाच्या उत्क्रांतिमार्गाने कसे प्राप्त करता येईल याचे विवेचन केले आहे. मानवी मनाच्या मार्गाने पूर्णत्वाकडे जाण्याचा, उत्क्रांति करून घेण्याचा एकमेव महामंत्र सदा सावधानता (विवेक) व कार्यतत्परता हाच आहे. व्यक्तित्व आणि समाष्टित्व हे त्याच्या कार्याचे दोन भाग पडत असून या पद्धतीने मार्गक्रमण करीत असता, त्यामध्ये राष्ट्रसेवा, देशसेवा, धर्मसेवा सहजासहजीच घडून येतात. प्रत्येक मानवाची उन्नती हीच राष्ट्राची उन्नती व हाच विश्वाचा उद्धार आहे. प्रत्येक माणूस मनुष्यत्वाच्या नात्याने एक झाला की त्यांनाच प्रगल्भ राष्ट्रत्व प्राप्त होते आणि अशा सर्व राष्ट्रांचा ओघ सत्यमार्गाने चालावयास लागला की नवे जग किंवा नवयुग (सत्ययुग) निर्माण होते. ‘माझे करणे माझ्याकरिता नाही; ते राष्ट्राकरिताच आहे’ असे समजून कार्यास सुरुवात झाली की प्रत्येक उन्नत व्यक्ती मिळून एक स्वर्गतुल्य राष्ट्र निर्माण होईल. अशाप्रकारे प्रत्येक मनुष्य स्वतःबरोबर समाजास उन्नत करीत पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करील तर त्यातच सृष्टीचा, धर्माचा, देशाचा व मनुष्यत्वाचा उद्धार आहे, अशी राष्ट्रसंतांची भूमिका आहे.

‘व्यक्तिधर्मापेक्षा राष्ट्रधर्म श्रेष्ठ’ (सुराज्य साप्ताहिक, नागपूर, दि.30-08-1947) या लेखात राष्ट्रसंतांनी स्पष्ट केले आहे की, देवभक्ती हा तुमचा व्यक्तिधर्म असून देशभक्ती हा राष्ट्रधर्म आहे. धार्मिकतेबद्दलची त्यांची कल्पना रूढ कल्पनेपेक्षा वेगळी असून त्यांनी धार्मिकतेचा विशिष्ट क्रम सांगितला आहे: व्यक्तिधर्म, कुटुंबधर्म, समाजधर्म, ग्रामधर्म व राष्ट्रधर्म, लेखाअखेरीस धार्मिकतेसंदर्भात ते लिहितात- “निरनिराळी देवस्थाने व नानाविध संप्रदायांची कल्पनाच मला पूर्णपणे मिटवून टाकायची असून तिथे मानवतेची कल्पना प्रस्थापित करावयाची आहे. आणि जगाला असे शिकवायचे आहे की माणूस ही आमची जात आहे; माणुसकी हा आमचा धर्म आहे; अन्याय-अत्याचाराचा प्रतिकार करून अखिल जगतात सुख-शांती निर्माण करणे हे आमचे कर्तव्यकर्म आहे…”

‘राष्ट्रधर्माची प्राणप्रतिष्ठा’ (श्रीगुरुदेव, ऑक्टोबर 1947, पृ.4-6) या लेखात राष्ट्रसंतांनी कुटुंबाच्या कल्पनेवरून संपूर्ण राष्ट्राची कल्पना स्पष्ट केली आहे. कुटुंबाच्या वा घराच्या संदर्भात बाहेरच्या आक्रमकांविरुद्ध संरक्षण, देणेघेणे व्यापार-व्यवहार, स्वच्छता-आरोग्य, शिक्षण इत्यादी या राष्ट्राशी समांतर असणाऱ्या विकासासंबंधीच्या बाबींवर भर दिला आहे. पुढे ते म्हणतात “गाव हे सुद्धा एक कुटुंब आहे.” गाव हे एखाद्या आदर्श कुटुंबाप्रमाणे नांदणे कसे शक्य आहे; आणि अशा गावांचे बनलेले प्रांत तसेच देशांचेही समष्टिजीवन सक्षम पद्धतीने चालविणे कसे संभवनीय आहे, याचेच येथे विवेचन केले आहे. यापुढील भागात ते लिहितात- दुसऱ्या देशाची गुंडगिरी व वरचष्मा स्वदेशात चालू देऊ नये तसेच अंतर्गत व्यवस्थेतही एक सूत्रीपणा राखला जावा. विश्व हे एका कुटुंबाप्रमाणे स्वर्गतुल्य सुखात ठेवण्याची जबाबदारी नेते, सत्ताधीश, पुढारी  यांची  प्रामुख्याने असली  तरी, त्यांनी मदतीची हाक दिल्यास मनाने, धनाने, वाणीने, शरीराने व पुत्रबलाने सहाय्य करणे हे प्रत्येक कुटुंबियाचे कर्तव्य असते. या योजनेनुसार व्यवहार करण्याला ते ‘राष्ट्रधर्म’ म्हणतात. लेखाच्या अखेरीस राष्ट्र आणि धर्म यांदरम्यानच्या सूत्राचे सार व्यक्त करताना राष्ट्रसंत म्हणतात- “मित्रांनो ! तुम्हाला ज्या कप्प्यात वा चौकटीत बसावयाचे असेल तद्नुसार कार्य करून दाखवा आणि आपला कुटुंबधर्म, गावधर्म (समाजधर्म) व राष्ट्रधर्म सिद्ध करा, हाच खरा धर्माचा संदेश आहे… माझी भारतीय जनता राष्ट्रनिष्ठ बनो हेच ईश्वरचरणी मागणे आहे!”

‘राष्ट्रोद्धारक सेवाधर्म’ (श्रीगुरुदेव, डिसेंबर 1947) या लेखात राष्ट्रसंत लिहितात- ‘सेवाभावात जगाचे खरे जीवन आहे आणि स्वार्थबुद्धीत त्याचा सर्वस्वी नाश आहे. ‘मनुष्यमात्राची सेवा करणे व आपल्या उद्दिष्टांचे ज्ञान लोकांना देणे; मित्रांना आणि शत्रूंनाही माणुसकी शिकविणे आणि स्वतः आचरून दाखवून तो जिवंत पाठ दुसऱ्यांपुढे ठेवणे हे सेवकाचे कार्य असते. सेवकाची जात सेवा, त्याचा पंथ सत्यता व त्याचा धर्म मानवता ! जिव्हाळ्याची सेवावृत्तीच राष्ट्राला नवजीवन देत असते; तर गुलामी वृत्तीचे भाडोत्री लोक प्रसंगी आपल्या सहित देशाचा नाश करीत असतात. मानवतेच्या या सेवाधर्माला राष्ट्रसंत ‘सतीचे वाण’ संबोधतात; आणि ‘सेवक व्हा!’ हाच आज भारतमातेचा आदेश आणि निसर्गाचा संदेश आहे, अशी तरुणांना ग्वाही देतात. याच लेखात ते लिहितात, अशी सेवा करण्याची दृष्टी भारतातील सर्व सेवकांना नवतरुणांना प्राप्त झाली तर रामराज्य, सुराज्य, सत्ययुग इत्यादी शब्द मूर्तरूप घेऊन भारतवर्षाचे नंदनवन नव्या नवलाईने फुलवतील; मात्र ते जर आपल्या हजारो मतभेदांच्या, तर्ककुतर्कांच्या चक्रव्यूहात धडपडतच वेळ गमावतील तर सर्वांना पश्चाताप करण्याची पाळी खात्रीने येईल.

‘जिवंत राष्ट्रधर्म’ (युगप्रभात, पृ.10) या शीर्षकाच्या लेखात राष्ट्रसंतांनी अपेक्षा व्यक्त केली आहे- ‘भारत देशाचा धर्म एकच असावा; त्याचा बाणा एकच असावा; त्याची भाषा व त्याची प्रार्थनाही एकच असावी आणि त्याची सर्व संपत्तीही सर्वांची असावी. मानवधर्माचा प्रकाश जगावर पसरविणारा हा देश जगात पूज्य मानला जावा व तो आतूनही तितकाच उज्वल आणि बलवान असावा. मात्र, राष्ट्रधर्म जिवंत असेल तरच देश जागतिक जीवनसंघर्षात विजयी होईल. त्यासाठी सर्वप्रथम देशातील व्यक्ती-व्यक्तीच्या स्वभावातून द्वेष, मत्सर, गटबाजी, चोरी, लबाडी आदी दुर्गुणांचे उच्चाटन होणे व उत्तम विचारांचे शिक्षण मिळणे आवश्यक असते; आणि गावातील सार्वजनिक हिताचे जे जे कार्य असेल ते सगळे आपले आहे, असे कळकळीने समजून सहभाग देणेही आवश्यक असते. हे सर्व जाणून घेण्याचे अर्थात बौद्धिक उन्नतीचे सात्त्विक स्थान ‘सामुदायिक प्रार्थना’ हे आहे. धर्म व देश यांच्या सेवेचा मार्ग प्रशस्त करण्याचे माध्यम सामुदायिक प्रार्थना होय.

याच लेखाअखेरीस राष्ट्रसंत भारतीय तरुणांना संदेश देतात “भारतात आजचा हा आपत्काळाचा घनघोर अंधार नामशेष होऊन सत्ययुगाची प्रभात फुलावी अशी तुझी इच्छा आहे ना? तर मग तू जिवंत राष्ट्रधर्म आचरू लाग, हीच त्याची साधना आहे !”

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हिंदी व मराठी गद्य-पद्याचा भाग तथा स्फुट-ललित वाङ्‌मयातील प्रारंभकाळातील देवभक्तीचा भाग व तांत्रिक, आध्यात्मिक साधनेशी संबंधित गूढरचनांचा भाग वगळता त्यांचे बहुतांश वाड्मय हे इथवर विवेचन केलेल्या धर्मसोपानाचे प्रबोधन करण्याच्या हेतूने निर्माण झाले आहे. त्यांच्या एकूण वाङ्मयसंभाराचा मेरूमणी शोभेल अशा ‘ग्रामगीता’ (1955) या ग्रंथामध्ये राष्ट्रसंतांच्या तोवरच्या 36 वर्षांमधील वाङ्मयनिर्मितीचा परिपाक उतरला असून राष्ट्रसंतांना अभिप्रेत असलेला मानवधर्माचा सोपान      (1) व्यक्तिधर्म (2) कुटुंबधर्म (3) संघटनधर्म (4) समाजधर्म (5) राष्ट्रधर्म आणि (6) विश्वधर्म या अनुरोधाने विवेचिला गेला आहे :

तसेच-

 विश्व ओळखावे आपणावरून। आपणचि विश्वघटक जाण।

 व्यक्तिपासून कुटुंबनिर्माण। कुटुंबापुढे समाज आपुला ।।45।। (अ.1)

 समाजापुढे ग्राम आहे। ग्रामापुढे देश राहे।

 देश मिळोनि ब्रह्माण्ड होय। गतीगतीने जवळ ते ।।46।। (अ.1)

 या शब्दांत या विविध पायऱ्यांमागील  सूत्र स्पष्ट केले आहे. या मांडणीप्रमाणे-

 व्यक्तिधर्म, कुटुंबधर्म। समाजधर्म, गांवधर्म।

 बळकट होई राष्ट्रधर्म। प्रगतिपथाचा ।।16।। (अ.2)

 व्यक्ति व्हावी कुटुंबपूरक। कुटुंब व्हावे समाजपोषक ।

 तैसेचि ग्राम व्हावे राष्ट्रसहाय्यक। राष्ट्र विश्वा शांतिदायी ।।17।।

 याकरिता जी जी रचना। तियेसि धर्म म्हणति जाणा।

 देशद्रोह अधार्मिकपणा। एकाच अर्थी ।।18।। (अ.2)

            मात्र ‘ग्रामगीता’ ग्रंथाच्या पहिल्याच अध्यायात ग्रामगीतेचे निर्मितिकारण स्पष्ट करताना त्यांनी जो दृष्टान्त वर्णिला आहे, त्यानुसार ‘कासया करावी। विश्वाची मात? प्रथम ग्रामगीताचि हातात। घ्यावी म्हणे।।’ या निष्कर्षावर राष्ट्रसंत स्थिरावलेले दिसतात. याच भूमिकेतून ‘गाव हा विश्वाचा नकाशा’ म्हणून राष्ट्र आणि विश्वाच्या सुबत्तेची / सुव्यवस्थेची परीक्षा ग्रामाच्या व्यवस्थेवरून करण्याचा त्यांचा विचार यापुढील विवेचनात दिसून येतो; त्यामुळे व्यक्तिधर्म ते ग्रामधर्म एवढाच धर्मसोपान येथे राष्ट्रसंत देतात :

विश्वाचा घटक देश। गाव हाचि देशाचा अंश।

गावाचा मूळ पाया माणूस। त्यासि करावे धार्मिक ॥22।।

व्यक्तिधर्म सर्वां कळावा। कुटुंबधर्म आचरणी यावा।

ग्रामधर्म अंगी बाणावा। राष्ट्रधर्माच्या धारणेने ॥23 (अ.2)

या अनुरोधाने राष्ट्रसंतांनी व्यक्तिधर्म अत्यंत संक्षेपाने विवेचिलेला दिसतो. राष्ट्रसंत म्हणतात,

‘प्रथम पाया मानव-वर्तन। यास करावे उत्तम जतन ।।48।।’ (अ.1)

‘मुख्य धर्माचे लक्षण। त्याग अहिंसा सत्य पूर्ण।

अपरिग्रह ब्रह्मचर्य जाण। तारतम्ययुक्त ।।19।। (अ.2)

 ‘निर्भयता शरीरश्रम। परस्परांशी अभेद प्रेम।

 पूरक व्हावया विद्या-सत्कर्म। सकालांसाठी ।।20।।’ (अ.2)

अर्थात् व्यक्ती-व्यक्ती धार्मिक व्हावी म्हणजे एकांगी / लहरी बनावी असे नव्हे; तर तिचा भौतिक आणि पारमार्थिक विकास व्हावा. याचाच अर्थ शरीर-मन-वाणी-इंद्रिये-बुद्धी-प्राण या सर्वांच्या विकासाची साधना म्हणजे (व्यक्ति) धर्म होय. आणि या सद्धर्माचे ज्ञान रुजविण्यासाठीच पूर्वसूरींनी आश्रम-व्यवस्थेची योजना केली असल्याचे राष्ट्रसंत विवेचितात. (24-27, अ.2)

राष्ट्रसंतांच्या मते व्यक्तिधर्माचा पाया विद्यार्थीधर्म असून त्यासाठी ब्रह्मचर्याश्रमाची योजना आहे, गृहस्थाश्रम हा गृहस्थ/कुटुंबधर्माचा निदर्शक असून त्यात ऋषिऋण-देवऋण फेडण्यातून कुटुंबसेवा, जीवसेवा व ग्रामसेवा धर्मरूप होण्यासाठी संयम आणि त्यागबुद्धीचे महत्त्व राष्ट्रसंतांनी निरूपले आहे. तिसऱ्या ‘वानप्रस्थाश्रम’ हा समाज वा समूहाच्या कल्याणाचा धर्म असून चौथा ‘संन्यासाश्रम’ हा ग्रामधर्मास इष्ट गरिमा व आकार आणून देणारा ग्रामविकासाशी-पर्यायाने प्रांत तथा देशविकासाशी निगडित धर्म होय. अंततः तो विश्वधर्माशीच जोडून देण्याचे गृहीतक राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेच्या सुरुवातीलाच उघड केले आहे.

ग्रामसेवाचि देशसेवा। देशसेवाचि ईश्वरसेवा।

हाचि अनुभवावया जीवभावा। वानप्रस्थ आश्रम ।।99।। (अ.3)

करावी ग्रामसेवा ज्ञानसेवा। वानप्रस्थवृत्ति वाणवूनि जीवा ।

आणि मोक्षासाठी साधावा। संन्यासभाव ।।7।। (अ.4)

झाला वासनेचा नाश। त्यासीच नाम असे संन्यास ।

 मग त्याचे सर्व करणे निर्विष। आदर्श लोकी ।।10।। (अ.4)

अशाप्रकारे ‘व्यक्तिधर्म’ ते ‘ग्रामधर्म’ या सोपानाचा सार सांगताना ग्रामगीतेत राष्ट्रसंतांची भूमिका ही गुणसंग्राहकतेची व कार्यतत्परतेची दिसते. ते म्हणतात-

सुखे करावा संसार। साधेल तैसा परोपकार।

चारही आश्रमांचा सार। आचरणी आणावा ।।36।। (अ.4)

आणि या आचरणात संयम, त्याग व विवेक यांबरोबरच सेवाभाव व सेवाधर्म यांस त्यांनी ग्रामधर्माचे सार व संघटनेचे सूत्र म्हणून अतिशय महत्त्व दिल्याचे पदोपदी ध्यानात येते.

डॉ. सुभाष सावरकर

 ‘जनसाहित्य’, शिल्पकला कॉलनी,   शेगाव-रहाटगाव रोड, अमरावती

भ्रमणभाष-९८६०४५१०७५

(संकलन-विभागीय माहिती कार्या.अमरावती)

शिर्डीत ‘नक्शा’ प्रकल्पास प्रारंभ; शहरी भूअभिलेख होणार डिजिटल

शिर्डी, दि.१८ – केंद्र शासनाने शहरी भूअभिलेखांचे डिजिटायझेशन करण्यासाठी देशातील १५२ नगरपालिकांमध्ये “नक्शा” प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला आहे. महाराष्ट्रातील १० नगरपालिकांचा या उपक्रमात समावेश आहे. त्यापैकी एक असलेल्या शिर्डी नगरपरिषद क्षेत्रात आजपासून या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली असून, शहराच्या हद्दीतील संपूर्ण भूभागांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मध्यप्रदेशातील रायसेन येथे “नक्शा” (राष्ट्रीय भौगोलिक माहिती आधारीत शहरी भूमापन) प्रकल्पाचा शुभारंभ केला. शिर्डी नगरपरिषद सभागृहात या कार्यक्रमाचे दृकश्राव्य प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी सर्वे ऑफ इंडिया अधिकारी अल्पेश हेडाऊ, राहाता भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश थोरात, नायब तहसीलदार मनोज भोसेकर आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

उपअधीक्षक श्री. थोरात यांनी सांगितले की, हा प्रकल्प केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भू-संसाधन विभागांतर्गत राबविला जात आहे. या प्रकल्पाद्वारे शहरी भूअभिलेखांचे आधुनिकीकरण, भूमालकीची स्पष्टता आणि भू-विकास प्रक्रियेत पारदर्शकता आणली जाणार आहे.

आधुनिक भौगोलिक माहिती प्रणाली ( जीआयएस) आणि ड्रोन सर्वेक्षणाच्या मदतीने भूमापन प्रक्रिया सुधारली जाईल. या प्रकल्पांतर्गत सर्वे ऑफ इंडिया तांत्रिक भागीदार असून, ड्रोन्सच्या सहाय्याने हवाई सर्वेक्षण केले जाईल. यामुळे सुधारित नकाशे तयार करून अधिक अचूक भूअभिलेख विकसित करता येतील.

अचूक भूअभिलेख निर्माण झाल्यामुळे भूमालकीशी संबंधित वाद कमी होतील. शहरी विकास आराखडे तयार करताना जीआयएस तंत्रज्ञानाचा उपयोग होईल. मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये स्पष्टता राहील आणि अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवता येईल. स्थावर मालमत्तेचा अद्ययावत नकाशा उपलब्ध झाल्याने कर आकारणी अधिक प्रभावी होईल.

महाराष्ट्रातील पंढरपूर, बारामती, कुळगाव बदलापूर, शिर्डी, वरणगाव, कन्नड, बुलढाणा, घुग्घस, खोपोली आणि मुत्तीजापूर या १० शहरांमध्ये या प्रकल्पाचा पथदर्शी प्रयोग होणार आहे. “नक्शा” प्रकल्पामुळे शहरी भूअभिलेख व्यवस्थापनात आमूलाग्र बदल होईल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भूविकास प्रक्रिया अधिक पारदर्शक, वेगवान आणि अचूक होईल. केंद्र सरकारच्या या उपक्रमामुळे नागरीकांना अधिक सक्षम भूसेवा मिळेल आणि शहरी नियोजन अधिक सुकर होईल, अशी माहितीदेखील श्री.थोरात यांनी दिली.

तंबाखू नियंत्रण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यशाळा

मुंबई, दि. १८ : महाराष्ट्रात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागानी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी WHO FCTC Artical ५.३ अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तंबाखू विक्री साठी परवाना देण्यासाठी नियमावली यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभाग, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था (MGVS) व टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्यस्तरीय कार्यशाळा झाली.

राज्यात तंबाखू नियंत्रण कायदा 2003 व FCTC (Framwork convention on Tobaco control) article ५.३ ची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता संबंधित विभाग व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेमध्ये सहायक पोलिस महानिरिक्षक राजतिलक रोशन यांनी तंबाखू नियंत्रण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस विभागाचे पूर्णपणे सहकार्य राहील असे सांगितले. टोबॅको कंट्रोल, साऊथ एशीया, वाइटल स्टृटॅजी डॉ.राणा जे.सिंग यांनी १८ वर्षाखालील मुलांना तंबाखुच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी उपाययोजना? तसेच तंबाखु नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रत्येक विभागाची असल्याचे सांगितले.

डॉ.अर्जुन सिंग यांनी लहान वयात व्यसनास बळी पडल्यामुळे निर्माण होणारा कॅन्सरचा धोका याबाबत मार्गदर्शन केले. मराठवाडा ग्रामीण विकास संस्थाचे सचिव अप्पासाहेब उगले यांनी महाराष्ट्रात ‘कोटपा’ (सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादन कायदा) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, याबाबत सविस्तर माहिती दिली. कायदेशीर तरतुदीनुसार तंबाखू क्षेत्रातील उद्योग आरोग्य संस्था व त्यांच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करत असतील तर संबंधित विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे संपर्क साधून कळवावे, असेही यावेळी सूचित करण्यात आले.

तंबाखू नियंत्रणावरील FCTC article 5.3 च्या मार्गदर्शक सूचना अधोरेखित करण्यात आल्या. या धोरणानुसार किरकोळ तंबाखू विक्रेत्यांची संख्या आणि तंबाखू उत्पादनाचे प्रकार मर्यादित करते. विशेषत: तरुणांना तंबाखूजन्य पदार्थांपासून रोखणे हा मुख्य उद्देश आहे.

कार्यशाळेसाठी आरोग्य, शिक्षण, अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभाग, महानगरपालिका, महसूल विभागाचे तसेच जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.

आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, हेलीस सेक्शेरीया इन्स्टिटय़ूट फॉर पब्लिक हेल्थचे संचालक, डॉ.प्रकाश गुप्ता टोबॅको कंट्रोल, साऊथ इस्ट, एशिया, वाइटल स्टृटॅजीस संचालक, डॉ.राणा जे.सिंग यांच्यासह टाटा मेमोरियल सेंटर मुंबई, Tobacco control, vital strategies चे तांत्रिक सल्लागार डॉ.शिवम कपुर, oral public health department चे उपसंचालक डॉ.उमेश शिरोडकर, आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन,टाटा मेमोरियल सेंटरचे प्रोजेक्ट अधिकारी डॉ..राहुल सोनवणे, NTCP चे कार्यक्रम अधिकारी किशोर गांगुर्डे, अध्यक्ष मनसुख झांबड, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थाचे सचिव अप्पासाहेब उगले, डॉ.निकिता गायकवाड यांनी सूत्र संचालन केले व अन्नपूर्णा ढोरे यांनी आभार मानले.

00000

त्रिपुराच्या धर्तीवर महाराष्ट्रातही बांबू लागवड मिशन प्रभावीपणे राबवू – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे त्रिपुराच्या दौऱ्यावर;बांबू हस्तकला प्रदर्शनाला भेट

मुंबई, दि. १८ – महाराष्ट्राच्या हवामान व भौगोलिक परिस्थितीचा विचार करून, शास्त्रीय दृष्टीची सांगड घालून महाराष्ट्र राज्यात बांबू मिशन अमलबजावणी प्रभावीपणे राबवू, असे पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या त्रिपुरा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल यावेळी त्यांच्यासमवेत उपस्थित होत्या.

आगरताळा येथील बांबू लागवड प्रदर्शनाला भेट देऊन मंत्री पर्यावरण श्रीमती पंकजा मुंडे यांनी महिलांच्या हस्तकला कौशल्याचे भरभरून कौतुक केले. तसेच विविध जातीच्या बांबू लागवडीची यावेळी पाहणी केली.

त्रिपुरातील बांबू हस्तकला देशातील सर्वोत्तम हस्तकलेपैकी एक आहे. तसेच अगरबत्ती बनवण्यासाठी बांबूच्या काड्यांसाठी संपूर्ण देशाच्या गरजांपैकी बहुतांशी गरज या राज्यातून पूर्ण केली जाते. बांबू क्षेत्राच्या एकात्मिक विकासासाठी, पीपीपी फ्रेमवर्क अंतर्गत, २००७ मध्ये त्रिपुरा बांबू मिशन (टीबीएम) सुरू करण्यात आले होते.

त्रिपुरा बांबू हस्तकला उत्कृष्ट डिझाइन, विस्तृत श्रेणीतील उत्पादनांसाठी आणि कलात्मक आकर्षणासाठी देशातील सर्वोत्तम मानल्या जातात. या प्रदर्शनात विविध जातीच्या बांबूच्या लागवडीचे आणि हस्तकला कौशल्याची पाहणी केल्यानंतर मंत्री पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राच्या हवामान व भौगोलिक परिस्थितीचा विचार करून राज्यात बांबू मिशनची अमलबजावणीचा करण्यात येईल, असे सांगितले.

श्रीमती मुंडे यांचे आगरतळा विमानतळावर शासकीय वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी यांनी स्वागत केले.

०००

नंदकुमार वाघमारे/विसंअ

बेलारुससोबत परस्पर सहकार्य वाढीसाठी पुढाकार- राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. १८ : रिपब्लिक ऑफ बेलारुस सोबत सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढीसाठी राजशिष्टाचार विभागामार्फत पुढाकार घेण्यात येऊन सामंजस्य करार करण्यात येईल. त्याचबरोबर राज्यातील कृषी उत्पादन, प्रक्रिया उद्योग यामध्ये बेलारुसच्या उद्योजकांना गुंतवणुकीसाठी सर्व ते सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

बेलारुसचे महावाणिज्यदूत अलेक्झांडर मात्सुकोऊ यांनी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र आणि बेलारुसमधील परस्पर संबंध वृद्धीबाबत चर्चा करण्यात आली. वाणिज्यदूत कान्स्टान्सिन पिंचुक यावेळी उपस्थित होते.

राजशिष्टाचार मंत्री श्री.रावल म्हणाले, मुंबई हे देशातील सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक आहे. महाराष्ट्रात उत्तम समुद्र किनाऱ्यांसह विविध प्रकारची पर्यटनस्थळे आहेत. राज्यात मुबलक कृषी उत्पादन होत असून उत्तम दर्जा आणि वाजवी किंमत यामुळे आंबा, डाळींब, केळी आदी फळे, भाजीपाला विविध देशात निर्यात केला जातो. बेलारुसच्या उद्योजकांनी राज्यातील शेतीला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, त्यांना निर्यातक्षम कृषीमाल उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी देखील सहकार्य करण्यात येईल असे सांगून द्विपक्षीय सामंजस्य कराराच्या माध्यमातून परस्पर सहकार्याच्या क्षेत्रांची निश्चिती करुन देवाण-घेवाण वाढीवर भर देता येईल, असे त्यांनी नमूद केले.

श्री.मात्सुकोऊ यांनी श्री.रावल यांच्यासमवेत आश्वासक चर्चा झाल्याचे यावेळी सांगितले. बेलारुस मध्ये एप्रिल ते ऑक्टोबर हा काळ तर महाराष्ट्रात नोव्हेंबर ते मार्च हा काळ पर्यटनासाठी उत्कृष्ट असल्याने परस्पर पर्यटनवृद्धीसाठी वर्षभर संधी असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रातील सिनेसृष्टी जगप्रसिद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

0000

बी.सी.झंवर/विसंअ

ग्रामीण साहित्याच्या पाऊलखुणा

दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान होत आहे. मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन आहेअशा या विशेष संमेलनानिमित्त मराठी भाषेतील ग्रामीण साहित्य निर्मितीचा धांडोळा घेणारा हा लेख…

ग्रामीण साहित्याची निर्मिती ही ग्रामीण संवेदनशीलतेतून झाली. सातवाहन राजा हाल यांच्या ‘गाथासप्तशती’ या सारख्या ग्रंथात ग्रामीण जीवनाच्या काही छटा प्रकट होताना दिसतात. याशिवाय मध्ययुगीन महानुभाव, वारकरी वाङ्मय, म्हाइंभट्टाचा ‘लिळाचरित्र,’ ‘गोविंदप्रभुचरित्र’ केशिराजबासांचा ‘दृष्टांतपाठ’ या सारख्या महानुभाव वाङ्मयात ग्रामजीवनाचे दर्शन घडते तसेच संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत सावतामाळी, संत गोरोबा कुंभार, संत चोखामेळा, संत तुकाराम, संत एकनाथ आदी व इतर संताच्या अभंग, गौळणी व भारूडादी काव्य प्रकारातून ग्रामीण संस्कृतीचे सुक्ष्म व प्रभावी प्रकटीकरण दिसून येते.

मराठी काव्याची ‘प्रभात’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहिरी कवनातही ग्रामीण रांगड्या श्रृंगाराचे, ग्राम संस्कृतीचे भावप्रकटीकरण दिसून येते. परंतु उपरोक्त साहित्यलेखनकर्त्याचा लेखन हेतू, प्रेरणा भिन्न स्वरूपाच्या दिसून येतात. लोकसाहित्य हे श्रमिक कष्टकऱ्यांच्या रंजनासाठी, महानुभाव साहित्य पंथनिष्ठेतून उदय पावले, वारकरी साहित्य समाजप्रबोधन व अध्यात्मनिरूपणाच्या प्रेरणेतून तर शाहिरी वाङ्मय हे लोकरंजनाच्या हेतूतून उगम पावले. या साहित्य कलावंताच्या कलाकृतीतून ग्रामजीवनाच्या विविध छटा प्रकट होत असल्या तरी ग्रामजीवनाचे विविध प्रश्न, समस्या केंद्रीभूत मानून साहित्य लेखन करावे असे त्यांना वाटलेले दिसत नाही. कदाचित त्या काळाचा विचार करता ग्रामीण समाज जीवनाच्या व्यथा, वेदना आणि समस्या यांच्या अनुषंगाने आवश्यक असणारी शिक्षणप्रणाली व समाजप्रबोधनाची चळवळ झालेली नव्हती. ग्रामीण साहित्याला महात्मा फुले, राजर्षी शाहू, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, शरद जोशी यांच्या विचाराचे अधिष्ठान आहे.

ग्रामीण संवेदनशीलतेचा आणि जाणीवेचा प्रारंभ आपणास महात्मा जोतीराव फुले यांच्या साहित्यात सापडतो. महात्मा फुले यांनी ‘तृतीयरत्न’ नाटक (१८५५) ‘ब्राम्हणाचे कसब’ (१८६९), ‘गुलामगिरी’ (१८७३), ‘शेतक-याचा आसूड’ (१८८३), ‘मराठी ग्रंबकार सभेस पत्र’ (१८८५), ‘इशारा’ (१८८५), ‘अखंडादी काव्यरचना’ (१८८७) इ. ललित आणि वैचारिक स्वरूपाचे लेखन केलेले दिसते. शेतकरी, कष्टकरी व शुद्रादीशुद्रांच्या संबंधी काही मुलगामी विचार मांडून त्यांच्या दारिद्रयाचा, गरिबीचा अन्वयार्थ त्यांनी शोधला. शेतकऱ्यांच्या दयनीय स्थिती व दाहकतेचे वर्णन करताना महात्मा फुले यांची ग्रामीणतेसंबधी प्रगल्भ जाणीव प्रकट होते.

कृष्णराव भालेराव यांनी १८७७ मध्ये ‘दीनमित्र’ च्या अंकात ‘बळीबा पाटील’ ही कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीतून खेडुतांचे होणारे शोषण आणि दाहकता यांचे वास्तवदर्शी चित्र रेखाटले आहे. पाटील, कुलकर्णी, अस्पृश, मुसलमान यांच्या संबंधासह वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था व स्त्रियांचे स्थान यावर प्रकाश टाकते. हरिभाऊ आपटे यांनी १८९८ च्या दरम्यान लिहिलेली ‘काळ तर मोठा कठीण आला’ ही दीर्घकथा १८९७ च्या सुमारास महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळ स्थितीवर आधारलेली आहे. ‘धनुर्धारी (श्री. रा. वि. टिकेकर) यांनी १९०३ मध्ये ‘पिराजी पाटील’ ही पहिली ग्रामीण कादंबरी लिहिली.

१९२० च्या सुमारास भारतीय राजकारणाची सूत्रे महात्मा गांधी यांच्याकडे गेली. राजकारणी, समाजसुधारक, विचारवंत व साहित्यिक यांनी खेड्यात जाऊन तेथील समाजाचा जीवनानुभव समजावून घेतला पाहिजे, ही भूमिका त्यांनी मांडली. आपल्या अनुयायांना ‘खेड्याकडे चला’ अशी हाक दिली. गांधीजींच्या हाकेने संमोहित होऊन माधव त्र्यंबक पटवर्धन, यशवंत दिनकर पेंढारकर, ग. त्र्य. मांडखोलकर, श्री. बा. रानडे इत्यादी मंडळीनी १९२३ मध्ये ‘रविकिरण मंडळा’ ची स्थापना केली याच काळात हळुहळू ग्रामीण जीवनातील साहित्यामध्ये आस्था आणि जिव्हाळा निर्माण झाला. त्याचे पर्यावसान ग्रामीण कविता लिहिण्यात झाले.

गिरीश, यशवंत, ग. ल. ठोकळ, ना. घ. देशपांडे, मा. भि. पाटील, के. नारखेडे यांच्या जानपद गीतांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. १९३३ साली ‘सुगी’ हा प्रतिनिधीक जानपदगीत संग्रह प्रकाशित झाला. १९३४ साली ग. ह. पाटलाचा ‘रानजाई’, ग. ल. ठोकळ यांचा ‘मीठभाकर’ (१९३८), के. नारखेडे ‘शिवार’ (१९३९), भा. रा. तांबे ‘गुराख्याचे गाणे,’ गिरीशांचे ‘आंबराई,’ चंद्रशेखराचे ‘काय हो चमत्कार’ हे खंडकाव्य दरम्यानच्या काळात प्रसिध्द झाले. तथाकथित ग्रामीण साहित्याचा निर्माता आणि भोक्ताही शहरी मध्यमवर्गीय समाज होता. म्हणून एक रूचीपालट म्हणून ग्रामीण जीवनाला साहित्यात स्थान दिले गेले. या संदर्भात आनंद यादव म्हणतात की, “हौसेखातर नागर मुलीने खेड्यातल्या मुलीचा पोशाख घटकाभर धारण करावा आणि मिरवावा” तसा हा केवळ बदलाचा एक नवा प्रकार म्हणूनच ही कविता आरंभी जन्माला आली.

या काळात सर्वच वाङ्मय प्रकारात विपूल साहित्य निर्मिती होतांना दिसते. ही आनंददायी बाब असली तरी या काळात ग्रामीण जीवनाचे वास्तवदर्शी चित्र प्रकट झाले का? या प्रश्नांचे उत्तर नकारार्थी द्यावे लागेल. या कालखंडातील अपवाद म्हणून श्री. म. माटे यांचा विचार करावा लागेल. त्यांनी लिहिलेल्या ‘उपेक्षितांचे अंतरंग’ व ‘माणूसकीचा गहिवर’ या संग्रहातून आलेल्या कथा ही ग्रामीण, दलित, उपोक्षितांच्या व्यथा, वेदनांचा छेद अंतरिच्या उमल्यातून येतांना दिसतात. या अर्थाने माटे यांना ‘ग्रामीण कथेचे जनक’ म्हणतात.

१९४५ च्या नंतर एकूणच मराठी साहित्यात संक्रमण सुरू झाले. हा काळ मराठी ग्रामीण साहित्याच्या दृष्टीनेही परिवर्तनाचा काळ आहे. या काळात उदयास आलेली नवकाव्य, नवकथा हे मराठी साहित्याला वास्तवतेच्या पातळीवर आणू पाहत होते. परिणामतः ग्रामीण साहित्य रंजनपरतेची कात टाकून ग्रामीण वास्तवतेच्या अविष्करणाला महत्व देऊ लागते. “मर्ढेकरांनी नवकाव्याबरोबर साहित्याच्या मूल्यांची भूमिका कलावादी जाणीवेतून मांडली. आपल्या निष्ठा आणि शुध्द कलावादी भान गंगाधर गाडगीळ, गोखले, पु. भा. भावे नव्या जोमाने कथा लेखनाद्वारे मांडीत होते. या लेखनाचा आणि दृष्टीचा ताजा जोम आणि पीळ व्यंकटेश मांडगुळकरांच्या ‘माणदेशी माणसे’ नी शिल्पीत झाला. मांडगुळकर, द. मा. मिरासदार, रणजित देसाई, अण्णाभाऊ साठे, शंकर पाटील, श्री. ना. पेंडसे आदीचे लक्षणीय लेखन राहिले. विभावरी शिरूरकर यांच्या ‘बळी’ (१९५०) या कादंबरीने समाजापासून वंचित असणाऱ्या मांग-गारूडी या जमातीच्या जीवनातील अंधश्रध्दा, निरक्षरता जोपासणारी, माणसाचा दिशाहिन पट अतिशय प्रगल्भपणे या कांदबरीत मांडली. बहिणाबाई चौधरी यांचा ‘बहिणाबाईची गाणी’ (१९५२) हा अस्सल ग्रामीण संवेदनशीलतेचा ठेवा सापडला. लोकगीताच्या अंगाने कृषीसंस्कृतीचे अनेकविध धागे सहजपणे त्यांनी साकारले.

दरम्यानच्या काळात शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणामुळे खेड्यातील नवशिक्षितांची पिढी उदयाला आली आणि आपले अनुभव शब्दात मांडू लागली. यालाच ‘साठोत्तरी साहित्य’ हो संज्ञा रूढ केली गेली, या पिढीने ग्रामीण जीवन प्रत्यक्ष अनुभवले होते. त्यामुळे त्याच्या लेखनातून अनुभूतीच्या खुणा प्रकट होतांना दिसतात त्यांना आत्मभान आले होते. या काळातील ग्रामीण साहित्य अस्सल ग्राम बास्तवाच्या निकट जाताना दिसते. यातूनच अण्णाभाऊ साठे यांची ‘फकिरा’, उध्दव शेळके ‘धग’, हमीद दलवाई ‘इंधन’, शंकर पाटील ‘टारफूला’, ना. धो. महानोर ‘गांधारी’, आनंद यादव ‘गोतावळा’, रा.रं. बोराडे ‘पाचोळा’ या कांदबऱ्या लक्षणीय स्वरूपाने आलेल्या दिसतात. ग्रामीण साहित्याच्या क्षेत्रात द. ता. भोसले, म. भा. भोसले, ग. दि. मांडगुळकर, शंकरराव खरात, नामदेव व्हटकर, मधु मंगेश कर्णिक, चंद्रकांत भालेराव, वा. भ. पाटील, चंद्रकुमार नलगे, महादेव मोरे, सखा कलाल, चारुता सागर यांच्या शिवाय अनेक साहित्यिक अधूनमधून ग्रामीण लेखन करतांना दिसतात, या काळात ग्रामीण साहित्याने संख्यात्मक व गुणात्मक उंची गाठलेली दिसते. पण ही पिढो ग्रामीण जीवनाचे वास्तव मांडताना स्वतःच्या अनुभवाशी रेंगाळताना दिसतात.”समूहाचे जगणे, सामाजिक प्रश्न-समस्या त्यांच्या साहित्यातून येईनाश्या झाल्या. व्यक्तीजीवन, कुटुंबजीवन, नाते संबंध यांच्या मोहात अडकले.

१९७७ पासून सुरू झालेल्या ग्रामीण साहित्य चळवळीने ग्रामीण साहित्याला नवी दृष्टी आणि अस्मिता दिली, तसेच या काळात ग्रामीण साहित्याच्या स्थित्यंतराबाबत एक अतिशय आश्वासक घटना घडली ती म्हणजे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचा उदय ही होय. ‘भीक नको घेऊ घामाचे दाम’ हा शेतकरी संघटनेने कष्टकरी शेतकरी समूहाला दिलेला स्वाभिमानी मंत्र त्यांच्या ठायी ‘आत्मभान’ निर्माण करण्यास सहाय्यभूत ठरला. शेतकऱ्याचे प्रश्न आणि त्यासाठी उभी राहणारी आंदोलने ग्राम आत्मभानासाठी पूरक असल्याची भूमिका चंदनशिव व्यक्त करतात. शेतकऱ्यांच्या शोषण परंपराची नोंद घेऊन शेषराव मोहिते, विठ्ठल वाघ, भास्कर चंदनशिव, श्रीराम गुंदेकर, नागनाथ कोतापल्ले, वासुदेव मुलाटे, फ. म. शहाजिंदे, बाबाराव मुसळे, महादेव मोरे, भिमराव वाघचौरे, मोहन पाटील, इंद्रजित भालेराव, संदानंद देशमुख, रा. रं. बोराडे, आनंद यादव, विश्वास पाटील, प्रभाकर हारकळ, राजन गवस, पुरुषोत्तम बोरकर, बा. ग. केसकर, आनंद पाटील, श्रीकांत देशमुख, नागनाथ पाटील, जगदीश कदम, भारत काळे, आसाराम लोमटे, सुरेंद्र पाटील, प्रकाश मोगले, अप्पासाहेब खोत, नारायण सुमंत, प्रकाश होळकर, गणेश आवटे, अशोक कोळी, कृष्णात खोत, भगवान ठग, उत्तम बावस्कर, केशव देशमुख, उत्तम कोळगावकर, भास्कर बडे, लक्ष्मण महाडिक, प्रमोद माने, बालाजी इंगळे, सुधाकर गायधनी, संतोष पवार, कैलास दौंड, नामदेव वाबळे, हंसराज जाधव इत्यादी (अजूनही काही नावे सांगता येतील) साहित्यिक ग्रामजीवन प्रगल्भ जाणीवेसह मांडताना दिसतात. या कालखंडात लिहिणा-या साहित्यिकांना ‘समाजभान’ आल्याचे जाणवते. त्यांनी ग्रामजीवनाचे मानसिक आंदोलनाचे, जगण्याचे प्रश्न नीट नेटकेपणाने आकलन करून घेतले.

ग्रामीण साहित्य प्रवाहाच्या कार्याची गती आणि व्याप्ती वाढविण्याची गरज आहे. जो साहित्यिक कलावंत जनतेच्या व्यथावेदना, मानसिक आंदोलन, आकांक्षा, सुख दुःखांना लेखणीत मुखरीत करतो. ते साहित्य खऱ्याअर्थाने विश्वव्यापी रूप धारण करते. मुळात ग्रामीण साहित्याजवळ प्रतिभावंतांची वाणवा नाही. उलटपक्षी वैश्विकतेकडे जाण्याचे सर्वाधिक सामर्थ्य ग्रामीण साहित्यातच आहे, हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे. तिची बांधिलकी कष्टकरी, श्रमिक व सर्जक मानवतेशी आहे. जोपर्यत ग्रामीण कष्टकऱ्यांची संस्कृती अस्तित्वात आहे तोपर्यत ग्रामीण साहित्याला भवितव्य आहे, यामध्ये कसलाही संदेह नाही.

संदर्भ ग्रंथ

०१. अत्रे त्रि.ना, ‘गावगाडा’, वरद बुक्स, पुणे, तिसरी आवृती, १९८९.

०२. गुंदेकर श्रीराम, ‘ग्रामीण साहित्य प्रेरणा आणि प्रयोजन’ दिलीपराज प्रकाशन, पुणे, ऑगस्ट, १९९९.

०३. चंदनशिव भास्कर, ‘भूमी आणि भूमिका’, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, १९९२.

०४. फडके य. दि., ‘महात्मा फुले समग्र वाड़मय’, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, १९९१.

 डॉ. ज्ञानदेव राऊत

शहीद भगतसिंग महाविद्यालय, किल्लारी

dnraut800@gmail.com

आपण सर्व संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बदलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

ठाणे,दि.१८ (जिमाका):- छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सर्वात जास्त सन्मान स्त्रियांना होता. आपले राज्य हे महिलांना सन्मान देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीतील लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केले. राज्य करताना संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होवून राज्य केले जाते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

बदलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा, आमदार किसन कथोरे, आमदार कुमार आयलानी, विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे, विधानपरिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, मुख्याधिकारी मारुती गायकवाड व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बदलापूर सारख्या ऐतिहासिक शहरात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. आपण सर्वजण जाणता की, आज आपण जो स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत, जगतो आहोत, आज आपला स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा ही जिवंत आहे याचे एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्यामुळे हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे. ज्या काळामध्ये अनेक राजे मुघलांचे मांडलिकत्व स्वीकारत होते, स्वातंत्र्याची इच्छा सोडून दिली होती, गुलामीत राहणे पसंत करत होते, अशा काळामध्ये आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना शिकवण दिली आणि संकल्प दिला की शिवबा तुला देव, देश आणि धर्मासाठी लढायचे आहे. कितीही मनसबदारी मिळाली, सरदारी मिळाली तरी परकीय आक्रमकांचा नोकर म्हणून आपल्याला काम करायचे नाही तर आपल्या सामान्य माणसावर ओढवलेले हे जे संकट आहे ते दूर सारून या मराठी मुलुखाला स्वराज्यामध्ये परिवर्तित करावेच लागेल.

ते पुढे म्हणाले की, एकीकडे मुघलांच्या फौजेमध्ये इराणी, अफगाणी, उज्बेकिस्तान, बलुचिस्तान या सगळ्या भागातले मोठमोठे सरदार होते, त्यांना मोठमोठा पगार होता. ते पगारी नोकरदार होते, लढणे हा त्यांचा व्यवसाय होता. मोठा प्रशिक्षण आणि पैसा त्यांच्या पाठीशी होता. पण आपले मावळे मात्र अर्धपोटी राहून लढायचे. पण फरक काय होता, तर मुघलांचे सैन्य हे पगारार्थ लढायचे आणि आपले मावळे देव, देश आणि धर्मासाठी लढायचे. त्यांना माहिती होतं, ज्या राजाकरता आपण लढतोय तो स्वतःसाठी लढत नसून आपल्या जनतेला मुघलांच्या जाचातून बाहेर काढण्यासाठी लढतो आहे. त्यामुळे लाखाची फौज घेऊन मोघल आक्रमक यायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे 5 हजार मावळे त्या फौजेला नामशेष करायचे. याचे कारण त्यांच्यामध्ये जी क्रांती, जे तेज छत्रपती शिवरायांनी पेरलं होतं त्यामुळेच खऱ्या अर्थाने ही लढाई ते जिंकू शकायचे.

छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक चांगले योद्धे म्हणूनच मर्यादित नसून ते एक उत्तम प्रशासक देखील होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले पाण्याचे नियोजन, जंगलांचे नियोजन, बांधलेले किल्ले आणि तयार केलेले आरमार यातील प्रत्येक गोष्ट जर आपण बघितली तर कोणाकडून कर घ्यायचा व कोणाकडून घेऊ नये, कशा पद्धतीत कर घ्यायचा आणि कशा पद्धतीत घेऊ नये, ही प्रत्येक गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आज्ञावलीच्या माध्यमातून लिहून ठेवली आणि कार्यान्वित केली, असे सांगून ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सर्वात जास्त सन्मान स्त्रियांना होता. आपले राज्य हे महिलांना सन्मान देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीतील लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केले. राज्य करताना संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होवून राज्य केले जाते. हा केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा नसून प्रेरणेचे स्थान आहे. एक असे स्थान आहे ज्यातून प्रेरणा घेवून आपल्या सर्वांना पुढील वाटचाल करायची आहे.

ते पुढे म्हणाले की, बदलापूरसाठी एमएमआरडीएकडून विकासकामांचा निधी येईल आणि विकास होण्यास होईल. पाण्याच्या योजनेचा प्रस्तावास नगरविकास विभागाकडून मंजुरी घेवून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. उल्हास नदीवर काही धरणं देखील बांधत आहोत. त्यामुळे पूररेषा निश्चितपणे कमी होणार आहे. उल्हास नदीच्या खोलीकरण व गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात येईल. या कामासाठी ज्या ज्या गोष्टी करणे शक्य आहे त्या त्या सर्व गोष्टी केल्या जातील. अस्वच्छ पाणी स्वच्छ करून त्याचे योग्य नियोजन केले जाईल. तसेच मेट्रोच्या कामाला देखील गती देण्यात येईल.

आमदार किसन कथोरे हे आपल्या मनोगतात म्हणाले की, बदलापूर शहराला शिवकालीन इतिहास आहे. उल्हास नदीला पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्यास पर्यटनाला चालना मिळेल.

यावेळी लाडक्या बहिणींच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान करण्यात आला.

00000

ताज्या बातम्या

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...

“गिरगावच्या शाळेतील शिक्षकांमुळे मी घडलो” – सरन्यायाधीश भूषण गवई यांची शिक्षकांविषयी कृतज्ञता

0
मुंबई, दि. 6: देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालयाला भेट देत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. प्राथमिक ते...

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची...

0
पंढरपूर, दि. ६- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र...