रविवार, जुलै 27, 2025
Home Blog Page 287

वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी ग्रंथोत्सव आवश्यक- मंत्री अतुल सावे

छत्रपती संभाजीनगर, दि.२२ (जिमाका):  वाचन संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी ग्रंथोत्सवासारख्या उपक्रमांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन इतर मागास वर्ग कल्याण, दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी आज येथे केले.

दोन दिवसीय ग्रंथोत्सवास इतर मागसवर्ग कल्याण मंत्री सावे यांनी आज भेट दिली. ग्रंथोत्सवातील ग्रंथ प्रदर्शनाची त्यांनी पाहणी केली. तसेच ग्रंथोत्सव उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. जयदेव डोळे, डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ. ह. नि. सोनकांबळे, ॲड बाबा सरदार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे आदी उपस्थित होते.

वाचन संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वाचनाचे आपल्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी महत्त्व आहे. त्यामुळे आपले व्यक्तिमत्व विकसीत होते,असेही मंत्री सावे यावेळी म्हणाले.

०००

 

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते डॉ. हेडगेवार यांच्यावरील जीवनचरित्राचे प्रकाशन

मुंबई, दि. २२: फुटीरतावादी प्रवृत्ती आजही देशाच्या काही राज्यांमध्ये सक्रिय असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा एकतेचा संदेश आज पूर्वीपेक्षाही अधिक प्रासंगिक आहे असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते शनिवारी डॉ. हेडगेवार यांच्यावरील जीवन चरित्राचे राजभवन, मुंबई येथे प्रकाशन पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.

ब्रिटिश भारतीय युवा लेखक सचिन नंदा यांनी ‘हेडगेवार : अ डेफिनिटिव्ह बायोग्राफी’ या इंग्रजी चरित्रात्मक ग्रंथाचे लेखन केले आहे.

आपसात एकी नसल्यामुळे अवघ्या काही हजार ब्रिटिशांनी भारतावर अनेक दशके राज्य केले असे सांगून फुटीरतेमुळे महाराणा प्रताप यांना देखील पराभव पाहावा लागला होता, मात्र छत्रपती शिवाजी महाराज अशा फुटीर प्रवृत्तींना पुरून उरले, असे राज्यपालांनी सांगितले.

परकीय शासकांमुळे भारत एकसंध राष्ट्र झाले असे चुकीचे दावे केले जातात असे सांगून सम्राट अशोक यांच्या काळात भारत कितीतरी दूरपर्यंत जोडला गेला होता, असे राज्यपालांनी सांगितले. सांस्कृतिक व अध्यात्मिकदृष्टया भारत नेहमीच एक राष्ट्र होते असे त्यांनी सांगितले.

यावेळी लेखक सचिन नंदा यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रकाशन सोहळ्याला एशियन पेंट्सचे प्रवर्तक जलज दाणी, आवादा ग्रुपचे अध्यक्ष विनीत मित्तल, मोहित डायमंड्सचे व्यवस्थापकीय संचालक मोहित मेहता, लेखक सचिन नंदा, एनएसईचे प्रमुख डॉ. आशिषकुमार चौहान, रवींद्र संघवी, मिलिंद घुमरे आणि इतर निमंत्रित उपस्थित होते. समीर कोपीकर यांनी आभार मानले.

०००

एचपीव्ही लसीकरणाने मुलींच्या कॅन्सरमुक्तीसाठी प्रयत्न करूया – मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि. २२ (जिमाका): जिल्ह्यातील 9 वर्षे पूर्ण झालेल्या मुली ते अविवाहित 26 वर्षापर्यंतच्या मुलींना एचपीव्ही लसीकरण गरजेचे आहे. तोंड, स्तन व गर्भाशय पिशवीचा कर्करोग रोगाचे प्रमाण अधिक आहे. एचपीव्ही लसीकरणाने कॅन्सरमुक्तीसाठी प्रयत्न करत मुलींना आरोग्यदृष्ट्या सक्षम करूया, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

गडहिंग्लज नगरपरिषदेच्या छत्रपती शाहू सभागृहात आयोजित एचपीव्ही (HPV) लसीकरणाच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते.  मंत्री मुश्रीफ म्हणाले की, देशात दर 8 मिनिटांनी एक महिला गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्युमुखी पडत असून हे थांबायला हवे. या कर्करोग मुक्तीसाठी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) प्रतिबंधक लस ही मुली व महिलांसाठी आरोग्यदायी आहे. मुलींच्या शरीर, प्रजनन क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही. कागल तालुक्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. गडहिंग्लज, आजरा, उत्तुर भागातील मुलींनी लसीकरण करून घ्यावे, शिक्षक पालकांनी शंका निरसन करून लसीकरणासाठी आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.

यावेळी अधिष्ठाता डॉ.सत्यवान मोरे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी एकनाथ काळवडे, गडहिंग्लज तहसीलदार ऋषिकेत शेळके, आजरा तहसीलदार समीर माने,गडहिंग्लज मुख्याधिकारी देवानंद डेकळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गीता कोरे, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लजचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत खोत तसेच वैद्यकीय, महसूल व शिक्षण विभागाचे अधिकारी व तालुक्यातील मुख्याध्यापक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमावेळी अधिष्ठता डॉ.मोरे व यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देशमुख यांनी कर्करोगमुक्तीसाठी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) प्रतिबंधक लसीविषयी माहिती देताना उपस्थितांचे शंका निरसन केले.

किरण कदम यांनी स्वागत केले तर सतीश पाटील यांनी प्रास्ताविक केले.

०००

भविष्याचा वेध घेऊन उद्दिष्टपूर्ती करावी – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

अमरावती, दि. २२ : येत्या काळात शेती आणि जलसंवर्धन क्षेत्रात नवीन दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे. यासाठी पुढील शतकाचा वेध घेऊन आज कार्य करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने भविष्याचा वेध घेऊन उद्दिष्टपूर्ती करावी, त्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने केंद्रीय मंत्री गडकरी यांना शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी खासदार अनिल बोंडे, बळवंत वानखेडे, आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, प्रवीण पोटे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, कमलताई गवई आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी कृषी आणि शिक्षण क्षेत्रात डॉ. पंजाबराव देशमुख यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यातूनच मागास भागाचा बदल घडविणे शक्य झाले. सामाजिक सुधारणा या काळ बदलविणाऱ्या असतात. त्यामुळे अशा व्यक्तिमत्त्वातून प्रेरणा मिळते. समाजाप्रती त्यांचा असलेला दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याने त्यांच्या विचारावरच मार्गक्रमण करण्यात येत आहे.

येत्या काळात ज्ञान हीच शक्ती राहणार आहे. त्यामुळे शेतीच्या क्षेत्रात जगभरात होत असलेल्या प्रयोगाची माहिती घेऊन त्यानुसार आपल्यातही बदल घडून येणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनीही शेतीमध्ये बदल घडविताना आधुनिक शिक्षण मार्गदर्शक ठरणार आहे. शेतीतील प्रयोग यशस्वी होण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी पुरस्काराची संकल्पना ही गरजेची आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी यासाठी त्यांना प्रशिक्षणही देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर पुरस्काराच्या मिळालेल्या पाच लाख रुपयांमध्ये वीस लाख रुपयांची भर घालून त्यातून दरवर्षी पाच शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात यावा, असे आवाहन केले.

प्रारंभी हर्षवर्धन देशमुख यांनी संस्थेचे कार्य आणि पुरस्काराबद्दल माहिती दिली. यावेळी मिथीला कवीश्वर, श्रीमती राठोड, वैष्णवी मानवटकर, वैष्णवी कदम, समीक्षा नागापुरे, धनश्री मोये, आयुष्य दिवाण, सौम्या राऊत, दीप्ती काळमेघ यांना विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल अभ्यासवृत्ती प्रदान करण्यात आली. उत्कृष्ट महिला शेतकरी वंदना धोत्रे आणि वंदना वैद्य यांचा सन्मान करण्यात आला. तसेच नवनियुक्त आमदार संजय खोडके यांचा सत्कार करण्यात आला.

केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलच्या नवीन इमारत आणि कार्डीयाक कॅथलॅबचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, दादाराव केचे, सुलभा खोडके, प्रताप अडसड, उमेश यावलकर, केवलराम काळे, सुमित वानखेडे, राजेश वानखेडे, प्रवीण तायडे, प्रवीण पोटे, सचिन देव महाराज आदी उपस्थित होते.

यावेळी त्यांनी गोरगरीब जनतेची सेवा ही महत्त्वाची असून अशा कार्यांना कायम मदत केली जाईल. रुग्णालयामार्फत देणगी आणि नागरिकांच्या सहभागातून शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. यातून अनेकांचे प्राण वाचले. गरजूंना मदत झाली. त्यामुळे संत अच्युत महाराजांना अभिप्रेत असलेली सेवा घडली आहे. या रुग्णालयाचा तळागाळातील नागरिकांना लाभ होणार आहे. येत्या काळात फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण आदींच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयाने पुढाकार घ्यावा. रुग्णालयाच्या विकासाचे ध्येय ठरविण्यात यावे. तसेच येत्या काळातही रुग्णालयाने निस्वार्थी भावनेने कार्य करावे, असे आवाहन केले.

शारदा उद्योग मंदिराला भेट देऊन महिला उद्योगाबद्दल मत व्यक्त करताना त्यांनी उद्योगात महिलांनी पुढे येण्याची गरज आहे. यासाठी महिलांनी कौशल्य आत्मसात करावे. दर्जेदार सेवा दिल्यास त्यातून उत्तम उत्पन्न मिळू शकेल,असे मत त्यांनी व्यक्त केले. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी पंचवटी येथील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळा आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

दरम्यान बेलोरा विमानतळ येथे केंद्रीय मंत्री गडकरी यांचे आगमन झाले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार उमेश यावलकर, प्रविण पोटे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे आदी उपस्थित होते.

०००

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून मिलेट रॅलीत जनजागृती

कोल्हापूर, दि. २२ (जिमाका): पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याबाबत जनजागृती करण्यासाठी कृषी विभाग कोल्हापूर यांच्यावतीने अन्न आणि पोषण अन्नधान्य पिके सन २०२४-२५ योजनेअंतर्गत मौजे कुर ता. भुदरगड येथे आयोजित मिलेट महोत्सवाचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रारंभी पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला प्रारंभ करण्यात आला. रॅलीचे कुर -कोनवडे- नीळपण- दरवाड- म्हसवे- गारगोटी – कुर या मार्गावर आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री आबिटकर यांनी बुलेट चालवत या रॅलीमध्ये इतरांना प्रोत्साहित केले. यावेळी पालकमंत्र्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ च्या पौष्टिक तृणधान्य स्टॉलना भेट देत कृषी विभागामार्फत यांत्रिकीकरण योजनेतून लाभ दिलेल्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटावेटरचे वाटप केले.

या महोत्सवात उपस्थित शेतकरी बांधवांना डॉ. योगेश बन यांनी बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उद्भवणारे आजार याबाबत सांगितले. यावर मात करण्यासाठी पौष्टिक तृणधान्याचा आहारात समावेश करणे ही काळाची गरज बनली आहे. आहारात नाचणी, वरई, ज्वारी, बाजरी, राजगिरा, राळा, सावा, कोडो, कुटकी यासारखी पौष्टिक तृणधान्ये असावीत. लोह, कॅल्शियम, झिंक, आयोडिन अशा पोषक घटकांनी समृद्ध असून ग्लुटेनमुक्त असल्याचे सांगितले. शेतकरी मिलिंद पाटील यांनी पौष्टिक तृणधान्य लागवडीबद्दल त्यांचे अनुभव कथन केले. ऊस लागवडीबाबत सुरेश माने-पाटील यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतंर्गत मृत शेतकऱ्यांच्या 19 वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे मंजुरीपत्र देण्यात आले. त्याचबरोबर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या पाच शेतकऱ्यांना तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनंतर्गंत फळबाग लागवड उत्कृष्टपणे राबवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. महोत्सवात पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे 150 महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

प्रथम तीन महिलांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील (कोल्हापूर विभाग) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, प्रकल्प संचालक (आत्मा) रक्षा शिंदे, कोल्हापूर, गोकुळ दूध संघाचे संचालक नंदकुमार ढेंगे, दत्तात्रय उगले (अशासकीय सदस्य) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे मदन देसाई, अजित देसाई, माजी उपसभापती (भुदरगड) मदन पाटील, कुरचे सरपंच कल्याण निकम, अशोक फराकटे,अशोक व भांदिगरे, बाबा नांदेकर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन किरण पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी गडहिंग्लज, नितीन भांडवले, तालुका कृषी अधिकारी, भुदरगड, सुनील कांबळे, आत्मा (बीटीएम ) यांनी नियोजन केले. या कार्यशाळेस शेतकरी, प्रक्रियादार, नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दर्शविला.

०००

 

 

 

दुर्मिळ साहित्याचे जतन करुन ते अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक -पालकमंत्री नितेश राणे

  •  मालवणी भाषा भवन उभारणार
  • साहित्यांचे डिजिटायजेशन होणे आवश्यक
  • तरुणांनी वाचन संस्कृती जोपासावी

सिंधुदुर्गनगरी  दि. २२ (जिमाका): सिंधुदुर्ग जिल्ह्याची साहित्य संस्कृती फार मोठी आहे. या जिल्ह्याने अनेक साहित्यिक, लेखक घडविले आहेत. दुर्मिळ साहित्यांचे जतन करणे जेवढे आवश्यक असते तेवढेच ते साहित्य सर्वांसाठी उपलब्ध करुन जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचणेही गरजेचे आहे. या दोन्ही गोष्टी परस्परांना पूरक असून वाचनसंस्कृती टिकविण्यासाठी आवश्यक आहेत. पालकमंत्री म्हणून साहित्याचे जतन करून वाचक वाढविण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा आयोजित जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष गंगाराम गव्हाणकर, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, प्रांतअधिकारी हेमंत निकम आदी उपस्थित होते.

पालकमंत्री राणे म्हणाले की, पद्मश्री ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी कोकणातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. कोकणातील सर्व साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून  कोकणची प्रतिमा सर्वदूर पोहचविणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत जुन्या साहित्याचे डिजिटलायझेशन होणे आवश्यक आहे. नव्या पिढीला वाचनाची गोडी लावायची असेल तर केवळ पारंपरिक मार्गावरून चालता येणार नाही. त्यासाठी नव्या पिढीचे नवे मार्ग, नवी माध्यमे हाताळावी लागतील.    ही साहित्य चळवळ पुढे अविरत चालू ठेवण्याच्या दृष्टीने कोकण मराठी साहित्य परिषदेने सावंतवाडी येथे घेतलेले हे  जिल्हास्तरीय साहित्य संमेलन महत्त्वाचे आहे.

पालकमंत्री म्हणाले की, वाचन चळवळ वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. जुन्या ग्रंथाचे जतन करणे आवश्यक आहे. आजची तरुण पिढी  ई-बुक किंवा किंडलच्या माध्यमातून वाचन करत असते. म्हणून त्यांच्यासाठी ही ग्रंथसंपदा कशी उपलब्ध करता येईल यासाठी देखील प्रयत्न होणे आवश्यक आहे. ग्रंथालयांचा डिजिटलायझेशन करण्यासाठी देखील मी प्रयत्न करणार आहे. जेणेकरुन जिल्ह्याच्या ग्रंथालयांची परिस्थिती बदलू शकते.  जिल्हा ग्रंथालयांच्या विकासासाठी आराखडा तयार केला आहे. तसेच पुढील आर्थिक वर्षामध्ये ग्रंथालयाच्या विकासासाठी निधीची देखील तरतूद केली असल्याचे ते म्हणाले.

पालकमंत्री म्हणाले की, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यात कोकणचा मोठा सहभाग आहे. मुंबईमध्ये मरीन ड्राईव्ह परिसरात मराठी भाषा भवन बांधले जात आहे. आपण आपल्या कोकणामध्ये ‘मालवणी भाषा भवन’ उभारुया. त्यानिमित्ताने आपली मालवणी बोलीभाषा भावी पिढीपर्यंत पोहोचवता येईल, त्याबद्दल आपण सर्वजण एकत्र येऊन चर्चा करूया, असेही ते म्हणाले.

०००

नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी प्रत्येक विभागाने समन्वयाने काम करावे -विभागीय आयुक्त श्वेता सिंघल

  • विभागीय आयुक्तांची शंकरबाबा पापळकरांच्या बालसुधारगृहास भेट

अमरावती, दि.२२: राज्य शासनाने 100 दिवसांसाठी सात कलमी कृती आराखडा ‍निश्चित केला असून त्यात जनतेच्या तक्रारींचे निवारण, सुकर जीवनमान तसेच क्षेत्रीय कार्यालयांना भेटी हे घटक अंतर्भूत आहेत. मेळघाटसारख्या दुर्गम, आदिवासी बहुल भागातील नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी प्रत्येक विभागांनी समन्वयाने कामे करुन त्यांच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी संबंधित शासकीय यंत्रणांना दिले.

सेमाडोह पर्यटन संकुल येथे 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत मेळघाट क्षेत्रातील गावांना भेट व ग्रामस्थांच्या प्रश्नांचे निराकरण या कार्यक्रमांतर्गत विभागीय आयुक्त सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आढावा बैठक झाली, त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. ‍

यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, ‍ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, अपर आयुक्त अजय लहाने, रामदास सिध्दभट्टी, सुरज वाघमारे, उपवनसंरक्षक सुमीत सोळंके,  दिव्यभारती एम., प्रकल्प अधिकारी प्रियवंदा म्हाळदळकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमांतर्गत महसूल विभागाच्या दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मेळघाट ‍परिसरातील दहा गावांना भेट देऊन तेथील ग्रामपंचायत, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र, रेशन दुकान, गावातील सोयी-सुविधा आदींची पाहणी करुन ग्रामस्थांचे प्रश्न व समस्या जाणून घेतल्या. तसेच उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.

100 दिवस कृती आराखड्यांतर्गत महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मेळघाटातील गावांना प्रत्यक्ष भेटी व तेथील ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनस्तरावर करावयाच्या उपाययोजनाबाबत विभागीय आयुक्तांनी आढावा घेतला. त्या म्हणाल्या की, मेळघाटातील नागरिकांचे जीवनमान हे प्रामुख्याने जंगल व जंगलातील उत्पादनांवर आधारित आहे. येथील क्षेत्राचा विकास होण्यासाठी याठिकाणी पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य, वीज, रस्ते, रोजगार आदी मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. टंचाईग्रस्त गावांना नियमितपणे पाणी पुरवठा होण्यासाठी विहिर खोलीकरण, गाव तलावातील गाळ काढून तेथे पाणी संचयनासाठी प्रभावी उपाययोजना होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने संबंधित विभागांनी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. प्रत्येक गावांत वीज पुरवठा अखंडीतपणे सुरु राहण्यासाठी विद्युत विभागाने सब स्टेशनची निर्मितीसाठी नियोजन करावे तसेच सोलर योजना प्रभावीपणे राबवावी.

महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून भेटी दिलेल्या गावांतील प्रश्नांबाबत आढावा घेवून त्यापुढे म्हणाल्या की, पिढ्यांपिढ्यापासून वन जमीनीवर शेती करणाऱ्या आदिवासी बांधवांना वनहक्क पट्ट्यांचा ताबा देण्यासाठी वन विभागाने जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. यासाठी विशेष मोहीम राबवावी. वन विभागाच्या अखत्यारित असलेली कामे स्थानिक गावकऱ्यांना प्राधान्याने देण्यात यावी. त्यांचे मजूरीचे मस्टर अद्ययावत ठेवून वेळेत मजूरीचे चुकारे करण्यात यावे. वन्य प्रान्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्यांच्या वारसांना तत्काळ सानुग्रह मदत तसेच जखमींना तत्काळ उपचारासाठी वन विभागाने सहाय्य करावे. जंगल परिक्षेत्रात शेत असणाऱ्यांना शेतीपीकांसाठी विहिर तसेच बोअर करण्यासाठी परवानगी देण्यात यावी.

१०० दिवस कृती विकास आराखड्यांतर्गत मेळघाट क्षेत्रातील वझ्झर, घटांग, सलोना, भवई, सेमाडोह, माखला, ‍चिखली, तारुबांधा, बोरी, केशरपूर, कारा या गावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्यात आल्यात.

विभागीय आयुक्तांची शंकरबाबा पापळकरांच्या बालसुधारगृहास भेट

मेळघाट क्षेत्रातील गावांना भेट व पाहणी या कार्यक्रमांतर्गत प्रारंभी विभागीय आयुक्तांनी अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील ग्राम पंचायत, जिल्हा परिषदेच्या शाळेला आणि पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या स्व.अंबादासपंत वैद्य मंतिमंद, मुकबधीर बेवारस बालसुधारगृहास भेट दिली व मतिमंद मुला-मुलींशी संवाद साधून आस्थेवाईपणे विचारपूस केली.

यावेळी शंकरबाबा पापळकर यांनी बालसुधारगृहातील 18 वर्षावरील अनाथ मुलांना कायमचे पालकत्व व पूनवर्सन होण्याचा कायदा होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत, अशी मागणी केली. यासंबंधी राजभवन येथे बैठक लावून सकारात्मक निर्णय होण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही विभागीय आयुक्तांनी यावेळी दिली.

०००

आरोग्य सेवेतील उमेदवारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्ती आदेश

नागपूर,दि. २२: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत तसेच आयुर्वेद महाविद्यालयासह संलग्न ९ रुग्णांलयातील गट ‘ड’ संवर्गातील ६८० पदांची सरळसेवेने भरती करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. रुग्णालयातील रुग्णांना उत्तम सेवा देण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात गट – ड  संवर्गातील मंजूर पदापैकी बऱ्याच वर्षापासून 680 पदे रिक्त होती. रिक्त पदावर सरळसेवा भरतीची प्रक्रिया तात्काळ सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती स्थापन होऊन पदभरतीची एकत्र प्रक्रिया राबविण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना या समितीचे सदस्य सचिव म्हणून नेमण्यात आले होते.

रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निवड झालेल्या 13 उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्तीचे आदेश देण्यात आले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये उपस्थित होते.

जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मेयो, दंत, आयुर्वेद महाविद्यालय व सलग्नित रुग्णालयातील गट ड सवर्गातील सरळसेवेचे रिक्त पदे भरण्याकरिता मागणीपत्र सामाजिक व समांतर आरक्षणासह मागविण्यात आले होते. जिल्ह्यातील नऊ संस्थांकडून 680 रिक्त पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अर्जामधून 680 उमेदवारांची निवड करण्यात आली. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 66 पदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये 344 पदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोउपचार रुग्णालयासाठी 19 पदे, ग्रामीण आरोग्य केंद्र सावनेर 11 पदे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 57 पदे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी 135 पदे, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयासाठी 22 पदे, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय 3 पदे तर शासकीय आयुर्वेद रुग्णालयासाठी 23 पदांचा समावेश आहे.

रुग्णसेवेला बळकटी

जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व विविध सलग्नित रुग्णालयात एकत्र 680 रिक्त पदांची भरती होत असल्यामुळे रुग्णसेवेला बळकटी मिळणार आहे. रुग्णसेवेसाठी गट ड मधील भरती अत्यंत आवश्यक होती. अशी प्रतिक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व निवड समितीचे सदस्य सचिव डॉ.राज गजभिये यांनी यावेळी दिली.

०००

शांतता भंग करणाऱ्या दंगलखोरांविरुद्ध कडक कारवाई करा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • संचारबंदी टप्प्याटप्याने हटवणार
  • आक्षेपार्ह पोस्ट संदर्भात सहआरोपी करणार
  • नुकसानीचे पंचनामे, तीन दिवसात मदत
  • नागपूरची शांतता भंग होणार नाही, दक्षता घेणार
  • दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार

नागपूर, दि. २२: नागपूर हे धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहराची वेगळी संस्कृती आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा प्रकारच्या घटना बरेच वर्षानंतर पहिल्यांदाच घडली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाही यादृष्टीने शांतता भंग करणाऱ्या दंगलखोरांविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांच्यासोबत शहरात घडलेल्या घटनेसंदर्भात आढावा घेतला. त्यानंतर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

पोलीस आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीस महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र सिंगल, नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील-भुजबळ, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, सहपोलीस आयुक्त निसार कांबळी, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील, प्रमोद शेवाळे, शिवाजी राठोड, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलीस उपायुक्त लोहीत मतानी, राहुल मदने, महेक स्वामी, विशेष शाखेचा पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, अश्विनी पाटील आदी उपस्थित होते.

शांतताप्रिय शहर म्हणून नागपूरची ओळख आहे. या शहराला अशांत करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, औरंगजेबासंदर्भात दुपारी आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध पोलीसांनी कारवाई केल्यानंतरही समाजकटंकांकडून सायंकाळी दंगा भडकविण्यात आला. दंगलखोरांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस विभागाने तत्काळ कारवाई करुन दंगल आटोक्यात आणली. परंतु, या दंगलीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची जाळपोळ व संपत्तीचे नुकसान झाले आहे. पोलिसांवरही दगडफेक केल्यामुळे 34 पोलीस जखमी झाले आहेत. अशा प्रकारच्या घटना शहराच्या कुठल्याही भागात घडणार नाही यादृष्टीने पोलीस विभागाने सतर्क राहून कठोर कारवाई करावी, असे निर्देश यावेळी दिले.

शहराच्या अकरा पोलीस स्टेशनच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. या संदर्भात 13 गुन्हे दाखल झाले असून 104 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी 12 विधी संघर्षित बालक आहेत. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच जनतेकडून प्राप्त झालेल्या कव्हरेज (व्हिडीओ क्लीप) च्या आधारे दंगलखोरांना शोधून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाईचा सूचना देण्यात आल्या असून एकही दंगलखोर यामधून सुटणार नाही, अशी सूचना करताना मुख्यमंत्री म्हणाले की, दंगल भडकविण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या विविध समाज माध्यमांवरील पोस्टची तपासणी करुन अशा प्रकारच्या 250 पोस्ट शोधण्यात आल्या आहेत. या पोस्ट टाकणाऱ्या 62 लोकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर दोन लोकांना अटक करण्यात आली आहे. अशा पोस्ट टाकणारे व शेअर करणाऱ्यांविरुद्ध दंगल भडकविल्याबद्दल सहआरोपी करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

झालेल्या नुकसानीची दंगलखोरांकडून भरपाई

दंगलीमध्ये मालमत्तेचे तसेच वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. नुकसानीसंदर्भात पंचनामे करुन येत्या तीन ते चार दिवसात नुकसान भरपाई देण्याच्या सूचना करताना मुख्यमंत्री म्हणाले की, संपूर्ण नुकसानीची भरपाई दंगलखोरांकडून करण्यात येईल. नुकसान भरपाई करताना दंगलखोरांच्या मालमत्तेची विक्री करुन संपूर्ण भरपाई वसूल करण्यात येईल. यासाठी महानगरपालिका, जिल्हा प्रशासन व पोलीस विभागातर्फे संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश यावेळी दिले.

दंगलीमध्ये 71 वाहनांचे तसेच विविध मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानी संदर्भात जिल्हा प्रशासनाने पंचनामे सुरु केले आहे. वाहनांच्या नुकसानी संदर्भात विमा कंपन्यांना आवश्यक असलेले दस्ताऐवज उपलब्ध करुन देण्यासबंधी तत्काळ कारवाई करावी, अशी सूचना यावेळी केली.

शांतता राखण्यासाठी सहकार्य करा – मुख्यमंत्र्यांचे आवाहन

शहरात आगामी काळात विविध समुदयांकडून सण व उत्सव आयोजित करण्यात येतात. अशा उत्सवाच्या प्रसंगी कुठलाही अनूचित प्रकार घडणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. तसेच सण व उत्सवाच्या काळात शांतता भंग होणार नाही यादृष्टीने जनतेनेही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला केले आहे. शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध पोलिस विभागाने तात्काळ दखल घेऊन कठोर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

प्रारंभी पोलिस आयुक्त डॉ.रवींद्र सिंगल यांनी शहराच्या काही भागात भरलेल्या घटनेसंदर्भातील माहिती सादरीकरणाद्वारे दिली. या घटनेतील दोषी असणाऱ्या सर्वांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

०००

मंत्री चंद्रकांत पाटील यांची ‘दिलखुलास’ मध्ये २४ ते २६ तर ‘जय महाराष्ट्र’मध्ये २५ मार्चला मुलाखत

मुंबई दि. २२ : ‘शिका व कमवा’ योजनेमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून उद्योग क्षेत्राकरीता उपयुक्त असे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यामध्ये तांत्रिक कौशल्य विकसीत होण्यास मदत होणार आहे. शिक्षणाबरोबर रोजगाराचाही पर्याय उपलब्ध या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमाच्या माध्यमातून केले आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे. ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार दि. 24, मंगळवार दि.25 आणि बुधवार दि. 26 मार्च 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 25 मार्च 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व राज्यातील विविध संस्थाच्या संयुक्त विद्यमाने ‘शिका व कमवा’ या उपक्रमास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी राष्ट्रीय कौशल्य विकास उपक्रमांतर्गत केली जाणार असून, उद्योगधंद्यातील कुशल मनुष्यबळाच्या वाढत्या मागणीला पूरक ठरणार आहे. या उपक्रमात राज्यातील इच्छुक संस्था, उद्योगसमूह आणि संबंधित तज्ञ यांना सहभाग घेता यावा याकरिता महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने धोरणात्मक रूपरेषा निश्चित केली आहे. यासाठी उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने अल्पमुदतीचे शासनमान्य पदविका अभ्यासक्रम तयार करण्यात आले असून, त्याद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. ‘शिका व कमवा’ ही योजना काय आहे, राज्यात या योजनेची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येणार आहे याविषयी मंत्री  पाटील यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

०००

ताज्या बातम्या

रायगड जिल्हा, पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

0
मुंबई, दि. २७: - रायगड जिल्हा आणि पुणे घाट, सातारा घाट  परिसरात पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या...

‘महा स्माईल्स’ मोहिमेमुळे विदर्भातील निष्पाप चेहऱ्यांवर फुलणार हसू

0
मुंबई, दि. 27 : बालकांच्या चेहऱ्यावरील दुभंगलेले ओठ (क्लेफ्ट) व फाटलेल्या टाळू (पॅलेट) या जन्मजात विकारावर उपचार आणि जनजागृती करून या बालकांच्या निरागस चेहऱ्यावर...

‘ई-लायब्ररी’ चे सरन्यायाधीशांच्या हस्ते लोकार्पण: वकील आणि कायदेक्षेत्राला नवी दिशा

0
अमरावती, दि. २६ (जिमाका): अमरावती जिल्हा वकील संघातर्फे आज  'स्व. ॲड. टी. आर. गिल्डा स्मृती ई-लायब्ररी'चे अमरावती ल्हा व सत्र न्यायालय इमारतीत उद्घाटन सिपना...

आरोग्य शिबिरातून मोफत अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

0
कोल्हापूर, दि. २६ (जिमाका) : मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानातून जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी सर्व विभागांमार्फत जिल्ह्यात चांगले काम सुरू आहे. विशेषत: आरोग्य विभागाकडून...

कारगिल युद्धातील सैनिकांचे बलिदान अविस्मरणीय  – पालकमंत्री शंभूराज देसाई 

0
सातारा दि.२६ : कारगिल युद्धात वीर शहीद झालेल्या सैनिकांचे कर्तव्य, धैर्य, धाडस, शौर्य व बलिदान सर्वांनी स्मरणात ठेवले पाहिजे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून त्यांच्या कुटुंबियांना...