शुक्रवार, जुलै 18, 2025
Home Blog Page 267

महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार

मुंबई, दि. २२: महावितरणला शुक्रवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय सिंचन व ऊर्जा मंडळातर्फे (सीबीआयपी) सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी वीज वितरण कंपनी म्हणून गौरविण्यात आले. अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी महावितरणचे कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर उपस्थित होते.

महावितरणच्या गौरवाबद्दल अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे आभार मानले तसेच महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

महावितरण मुंबईचा काही भाग वगळता संपूर्ण राज्याला वीज पुरवठा करते. महावितरणचे घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक आणि कृषी असे 3 कोटी 11 लाख ग्राहक आहेत. महावितरण देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे.

महावितरणने ग्राहक सेवेसाठी तसेच वीज वितरणासाठी माहिती तंत्रज्ञानाचा केलेला वापर, ऊर्जा परिवर्तन आराखडा राबवून नवीकरणीय ऊर्जेच्या वापरावर दिलेला भर, वीज खरेदी खर्चात कपात करून ग्राहकांसाठीचा वीजदर कमी करण्यासाठी आयोगासमोर मांडलेला प्रस्ताव, शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर ऊर्जा मिळण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 सह राबविलेल्या विविध योजना आदी बाबींचा विचार करून महावितरणला सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या पुरस्कारासाठी निवडण्यात आले. वीज उपकेंद्रांची संख्या वाढविणे, त्यांची क्षमता वाढविणे, नव्या वीज वाहिन्यांचे जाळे उभारणे, वितरण रोहित्रांची उभारणी तसेच वीज वितरण व्यवस्थेत केलेली सुधारणा यांचाही विचार महावितरणचा सन्मान करताना करण्यात आला.

कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही गेम चेंजर योजना आहे. हा देशातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अनेक दशकांची कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठ्याची मागणी पूर्ण होणार आहे. योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. आगामी वर्षामध्ये राज्यातील सर्व कृषी पंपांना शंभर टक्के सौर ऊर्जेचा पुरवठा करण्याचे उद्दीष्ट पूर्ण होईल. या योजनेत किफायतशीर दरात वीज उपलब्ध होत आहे. त्यामुळे महावितरणचा वीज खरेदी खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेच्या माध्यमातून सौर कृषी पंप बसविण्यात महावितरणने देशात प्रथम स्थान मिळविले आहे. उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालविण्यासाठीच्या राज्य सरकारच्या योजनेसाठी महावितरणला नोडल एजन्सी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.गावाची संपूर्ण विजेची गरज स्थानिक पातळीवर तयार झालेल्या सौर ऊर्जेवर भागवून गावाला ऊर्जा स्वयंपूर्ण करण्यासाठी महावितरणने सौर ग्राम योजना सुरू केली आहे. त्यामुळे गावकरी वीजबिलमुक्तही होतात. राज्यात 100 गावे महावितरणतर्फे सौर ग्राम विकसित करण्यात येणार असून त्यापैकी 10 गावे सौर ग्राम झाली आहेत.

महावितरणने स्वतःची कार्यालये, वीज उपकेंद्रे, ग्राहक सेवा केंद्रे आणि अतिथी गृहे सौर ऊर्जेवर चालविण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. महावितरणच्या मुख्यालयाच्या छतावर बसविलेल्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन झाले.महावितरणने राज्यात विद्युत वाहनांसाठी 63 चार्जिंग स्टेशन्स राज्यात उभारली आहेत. पुणे येथे उभारलेल्या विद्युत वाहनांचे चार्जिंग स्टेशन छतावरील सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पाला जोडून महावितरणने अक्षय्य ऊर्जेच्या आधारे वाहनांचे चार्जिंग करण्यासाठी पाऊल टाकले आहे.

०००

 

‘नवसखी सरस महोत्सवा’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर, दि. २२:  जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून दक्षिण मध्य सांकृतिक केंद्र येथे आयोजित जिल्हास्तरीय नवसखी सरस महोत्सवाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी आदी यावेळी उपस्थित होते.

नवसखी सरस महोत्सवात एकूण शंभर स्टॉल्स लावण्यात आले आहेत. या स्टॉल्सची पाहणी करीत मुख्यमंत्र्यांनी स्टॉलधारक महिलांशी संवाद साधला. २६ मार्चपर्यंत सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार  आहे. ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारावे आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, हे शासनाचे धोरण यशस्वी करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. त्यासाठी विविध प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. या संकल्पनेतूनच हे आयोजन करण्यात आले आहे.

०००

संत विचारांमध्ये समाज एकसंघ ठेवण्याचे सामर्थ्य – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी, दि. २२:  संत साहित्य, विचारातून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला असून संताची भूमिका लोककल्याणाची होती. संत साहित्य टिकून राहिले तर समाजातील विषमता नष्ट होऊन एकता प्रस्थापित होते. समाज एकसंघ ठेवण्याचे सामर्थ्य संत विचारांमध्ये आहे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र आयोजित १३ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनास शिर्डी येथे सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, संमेलनाध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज देहूकर, मागील संमेलनाचे अध्यक्ष ह.भ.प.माधवमहाराज शिवणीकर, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, सचिव तथा संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, ह.भ.प चकोर महाराज बावीस्कर आदी उपस्थित होते.

श्री साईबाबांच्या शिर्डीनगरीत संत साहित्य संमेलनाचे आयोजन ही जिल्हावासियांसाठी भाग्याची गोष्ट असल्याचे नमूद करत पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, संत साहित्यातून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला आहे. संताची भूमिका लोककल्याणाची होती. मराठी भाषा व तिच्या बोली भाषांमध्येही संत साहित्याचे प्रतिबंब दिसून येते. संत साहित्य समाजाच्या उद्धारासाठी आहे.

संत साहित्य टिकून राहिले तर समाजातील विषमता नष्ट होऊन एकता प्रस्थापित होते. समाजाचे ऐक्य टिकविण्याची ताकद संत साहित्यात असल्याने प्रत्येकाने संत साहित्य वाचले पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पाया मजबूत करण्याचे काम या साहित्यातून झाले आहे. संतानी समाज सुधारणेचा मंत्र आपल्याला दिला. संत साहित्याच्या माध्यमातून निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचे काम झाले. ही परंपरा पुढे नेतांना लोकशिक्षण व लोकजागृतीचे काम अविरतपणे सुरू ठेवण्याचे काम संत आणि वारकरी निश्चित करतील,अशी अपेक्षाही  विखे पाटील यांनी व्यक्त केली.

वारकऱ्यांकडून समाज एकसंघ ठेवण्याचे काम – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

महाराष्ट्र संतांची भूमी आहे. संतांच्या विचारांचा वारसा घेऊन वारकरी काम करतात. माणसाचे कल्याण साधण्याचे आणि सुखदुःखासाठी जगण्याचा मंत्र देण्याचे काम वारकरी करतात. संत, वारकरी नसते तर समाज व्यवस्था टिकली नसती. माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करणे व समाज एकसंघ ठेवण्याचे काम संत, वारकऱ्यांनी केले. वारकऱ्यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. समाजातील कुप्रवृत्ती बाजूला नष्ट करण्यासाठी संत, वारकऱ्यांनी समाजप्रबोधन व संस्काराचे काम प्रभावीपणे करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी केले.

संत, वारकऱ्यांकडून संस्कृती संवर्धनाचे कार्य – संजय शिरसाट

संत आणि वारकरी हे संस्कृती टिकवण्याचे काम करतात. वारकऱ्यांच्या माध्यमातून आध्यात्मिक वारसा सामान्य जनांपर्यंत पोहोचतो,  समाजातील सांस्कृतिक मूल्यांची जोपासना होते. राजसत्ता आणि धर्मसत्तेच्या समन्वयाने समाजात अनुकूल बदल घडवून आणण्याचे काम व्हायला हवे.

वारकरी साहित्य संमेलनास सामाजिक न्याय विभागाने २५ लाख रूपयांची आर्थिक मदत दिली आहे. सर्व वारकरी दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रूपयांची शासनाकडून मदत दिली जाईल. संत साहित्य व वारकऱ्यांना आवश्यक सहकार्य शासनातर्फे करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी मंत्री शिरसाट यांनी दिली.

संमेलनाध्यक्ष श्री. देहूकर म्हणाले, संत साहित्य आणि वारकरी संप्रदाय हे मराठी संस्कृती आणि भक्ती परंपरेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. वारकरी संप्रदाय हा भगवान विट्ठलाच्या भक्तीवर आधारित असून, त्यात संतांनी रचलेले साहित्य हे भक्ती, ज्ञान व समाज प्रबोधनाचे माध्यम बनले आहे.

यावेळी ह.भ.प माधव महाराज शिवणीकर व सदानंद मोरे यांची भाषणे झाली.

प्रास्ताविकात विठ्ठल पाटील यांनी वारकरी संत साहित्य संमेलन आयोजनामागील भूमिका विशद केली.

संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी, श्री साईबाबा समाधी मंदीर ते संमेलनस्थळ शेती महामंडळ मैदानापर्यंत वारकरी दिंडी काढण्यात आली. दिंडीची सांगता अश्व रिंगणाने करण्यात आली.

दोन दिवसीय संत साहित्य संमेलनाचा समारोप २३ मार्च रोजी होणार आहे. या संमेलनास राज्यातून मोठ्या संख्येने वारकरी व संत अभ्यासक उपस्थित झाले आहेत.

०००

गडचिरोलीतील वाघांचे मानवांवरील हल्ले रोखण्यासाठी ३ महिन्यात आराखडा तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २२ : गडचिरोली जिल्ह्यात व्याघ्र हल्ल्यातील मनुष्यहानी टाळण्यासाठी परिस्थितीचा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून तातडीने विशेष उपाय योजना राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यामध्ये गेल्या पाच वर्षात वाघांच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना विशेष नुकसान भरपाई देणे, अतिरिक्त वाघांचे स्थलांतर आदींचा समावेश असून त्याचा अहवाल ३ महिन्यात देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाघांच्या हल्ल्यातील नागरिकांच्या जिवीतहानीची गंभीर दखल घेतली आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून त्यांनी तेथील नागरिकांच्या मागणीची तत्काळ दखल घेऊन यावर उपाय योजना सुचविण्याचे निर्देश दिले. तसेच यासाठी ‘मित्रा’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार परदेशी यांनी नागपुरात वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजनांवर चर्चा केली व त्यावर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस राज्याच्या प्रधान मुख्य वन संरक्षक (वन बल प्रमुख) शोमिता बिस्वास, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक विवेक खांडेकर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. रामचंद्र रामगावकर, गडचिरोली वन वृत्ताचे मुख्य वन संरक्षक एस. रमेशकुमार आदी उपस्थित होते.

व्याघ्र हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना विशेष नुकसान भरपाई

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत व्याघ्र हल्ल्यात सुमारे 50 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. विशेषतः गडचिरोली, चार्मोशी, आरमोरी, वडसा आणि धानोरा क्षेत्रात वाघांच्या हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गडचिरोलीतील परिस्थितीचा अभ्यास करून गडचिरोलीतील अतिरिक्त वाघांचे स्थलांतर तीन महिन्यात करण्यात यावे. तसेच गेल्या पाच वर्षांत व्याघ्र हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची माहिती गोळा करून त्यांच्या वारसांना विशेष नुकसान भरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते.

यासंदर्भात परिस्थितीचे अवलोकन करून आराखडा तयार करण्यासंदर्भात मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. या बैठकीत विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील चपराळा व प्राणहिता अभयारण्यात सागवान झाडांचे विरळीकरण करणे व कुरणाचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय झाला. जेणेकरून तृणभक्षी प्राण्याची संख्या वाढून मांस भक्षी प्राण्यांना खाद्य मिळेल. प्रत्येक गावात पोलिस पाटलाच्या धर्तीवर वन पाटील नेमण्याचेही यावेळी ठरविण्यात आले. स्थानिकांना जंगलात लाकूड, सरपण गोळा करण्यासाठी जंगलात जावे लागू नये यासाठी गावामध्ये पाइपलाईनद्वारे CBG गॅस पुरवठा करण्यासाठी ग्रामस्थांच्या शेतात गवत उत्पादन करून त्याचा उपयोग सीबीजीसाठी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यासाठी सीबीजी गॅस प्लांट उभारण्याचेही ठरविण्यात आले. वन्य प्राण्यामुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई लवकर देण्यासाठी ई पंचनामा करणे, वाघांची वाढती संख्या लक्षात घेऊन चपराळा अभयारण्यातील 6 गावांच्या स्थलांतरासाठी तेथील स्थानिकांचे सामाजिक, आर्थिक मूल्यांकन करणे, पुनर्वसनासाठी नव्या जागेचा शोध घेणे आदी उपाय योजना राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

तसेच यासंबंधीच्या उपाय योजना करण्याबाबत या विषयावर काम करणाऱ्या वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट सारख्या संस्थांच्या तज्ञांची नेमणूक करण्यात येणार आहे. धोकादायक व संवेदनशील क्षेत्राचे सौम्यीकरण (मिटीगेशन) आराखडा तयार करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. मानव आणि वन्यजीव संघर्षात आढळणारे वाघ हे वयस्कर असल्याचे दिसून येते. अशा वाघाच्या स्थलांतरासंदर्भातही धोरणात्मक निर्णय घेण्याचे आवश्यक असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले.

०००

अनधिकृत भूखंड, बांधकामाचे सर्वेक्षण – विभागीय आयुक्त दिलीप गावडे

छत्रपती संभाजीनगर,दि. २१, (विमाका): छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रात अनाधिकृत भूखंड तसेच बांधकामाबाबत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे.  महानगर क्षेत्रात सर्वेक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात आज छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील विना परवानगी भूखंड तसेच बांधकाम सर्वेक्षणाबाबत विभागीय आयुक्त गावडे यांनी आज शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्वेक्षणासाठी सेवा देणारे विद्यार्थी तसेच अधिकाऱ्यांशी संवाद साधला, यावेळी महानगर नियोजनकार हर्षल बावीस्कर, सह महानगर नियोजनकार रविंद्र जायभाये यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महानगर आयुक्त गावडे म्हणाले, छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रात अनाधिकृत ,विना परवाना भूखंड व बांधकामाबाबत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी सर्वेक्षणासाठी आपली सेवा देणार आहेत. “कमवा व शिका” योजनेच्या धर्तीवर शैक्षणिक अभ्यासक्रमावर कोणत्याही प्रकारचा परिणाम न होऊ देता विद्यार्थी सर्वेक्षणाचे काम करणार आहेत. या सर्वेक्षणा अंतर्गत महानगर क्षेत्रात नागरिकांकडे विद्यार्थी जातील त्यावेळी नागरिकांनी आपल्याकडील या संदर्भातील कागदपत्रे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याबरोबरच  सर्वेक्षणातील प्रश्नावलीबाबत अचूक माहिती द्यावी. जेणेकरून नियमाप्रमाणे भूखंड तसेच बांधकाम नियमित करण्याकामी मदत होणार आहे.

अनधिकृत भूखंड तसेच बांधकाम नियमित झाले तर गरजूंना या मालमत्तेवर बॅंकेकडून कर्ज मिळणेही सुलभ होणार आहे. तसेच ज्यांना सदर मालमत्तेची विक्री करावयाची असल्यास विक्री करणेही सुलभ होईल. त्यामुळे नागरिकांनी या सर्वेक्षण मोहिमेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही विभागीय आयुक्त गावडे यांनी केले.

सर्वेक्षणाअंतर्गत विद्यमान वापर, भूखंड धारकांचे नाव, भूखंड क्रमांक, गट क्रमांक, मालकी हक्काबाबतची कागदपत्रे, बांधकाम परवानगी, सातबारा उतारा, भूमी अभिलेख कार्यालयाकडील मोजणी, ग्रामपंचायत 8 अ उतारा, वीज देयक ,लेआऊट प्रत, भूखंडाचे क्षेत्रफळ, बांधकामाचे क्षेत्रफळ, भूखंड तसेच बांधकामाचा कच्चा नकाशा, मिळकतीचे वर्णन याबाबतची माहिती संकलित केली जाणार आहे.

०००

निवडणूक प्रक्रियेच्या बळकटीकरणासाठी भारत निवडणूक आयोगाची ठोस पावले

  • 1 कोटी निवडणूक अधिकाऱ्यांच्या क्षमता वाढीसाठी डिजिटल प्रशिक्षण योजना.
  • ईआरओ, डीईओ आणि सीईओ स्तरावर निवडणूक अधिकाऱ्यांसोबत 5000 सर्वपक्षीय बैठकींमध्ये राजकीय पक्षांचा सहभाग.
  • निवडणूक यादीत नावांचा समावेश आणि दुरुस्ती मार्गदर्शक तत्त्वे याबाबत कायदेशीर चौकट.
  • 89 पहिल्या अपील्स आणि एकच दुसरे अपील दाखल.

मुंबई, दि. 20 : भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) म्हणून श्री ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एका महिन्याच्या आत, त्यांच्या नेतृत्वाखाली भारत निवडणूक आयोगाने निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्यासोबत संपूर्ण निवडणूक यंत्रणेला बीएलओ स्तरापर्यंत सर्व मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि मतदान केंद्रांवर त्यांना सुखद अनुभव देण्यासंदर्भात ठोस पावले उचलली आहेत. मुख्य भागधारक असलेल्या राजकीय पक्षांना या बळकटीकरण प्रक्रियेत सामील करुन घेतले जात आहे, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे.

मतदारयादीचे नियमित अद्यतन

आयोगाने स्पष्ट केले आहे की, 100 कोटी मतदार लोकशाहीचा आधारस्तंभ आहेत. ‘यूआयडीएआय’ आणि ‘ईसीआय’च्या तज्ञांमध्ये तांत्रिक सल्लामसलत लवकरच सुरू होणार आहे. एक मतदार जरी त्याच्या नियुक्त मतदान केंद्रात मतदान करू शकत असेल, तरी आयोगाने देशभरात ईपीआयसी क्रमांकांमध्ये डुप्लिकेट्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आणि अनेक दशकांपासून चालत आलेली समस्या संपविण्याचे ठरवले आहे. मतदारयादीचे नियमित अद्यतन जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिकाऱ्यांबरोबर समन्वयाने मजबूत करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधत्व कायद्यानुसार आयोगाच्या राजकीय पक्षांबरोबरच्या संवादात स्पष्ट करण्यात आले की मसुदा मतदार यादीत कोणताही समावेश किंवा वगळण्यासंदर्भातील बाब संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार अपील प्रक्रियेने नियंत्रित केली जाते. अशा अपीलच्या अभावात, ईआरओने तयार केलेली यादी लागू राहील. 7 मार्च 2025 रोजी ईसीआयने स्पष्ट केले होते की विशेष संक्षिप्त पुनरावलोकन (एसएसआर) प्रक्रियेनंतर फक्त 89 पहिल्या अपील्स आणि एकच दुसरे अपील दाखल करण्यात आले.

ग्रामीण मतदान केंद्रावरही मूलभूत सुविधा (एएमएफ) सुनिश्चित

सर्व पात्र नागरिकांची 100% नोंदणी सुनिश्चित करणे, मतदानाची सोय करणे आणि सुखद मतदान अनुभव देणे हे भारत निवडणूक आयोगाचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर 1200 पेक्षा जास्त मतदार नसतील याची खात्री करण्यासाठी पावले उचलली जातील आणि ती 2 किमीच्या आत असतील. अगदी दूरच्या ग्रामीण मतदान केंद्रावरही मूलभूत सुविधा (एएमएफ) सुनिश्चित केल्या जातील. शहरी भागातील उदासीनता दूर करण्यासाठी आणि अधिक सहभाग प्रोत्साहित करण्यासाठी, उच्च इमारतींचे क्लस्टर आणि वसाहतींमध्ये देखील मतदान केंद्रे असतील.

प्रशिक्षणावर भर

1 कोटी निवडणूक कर्मचाऱ्यांच्या व्यापक आणि क्षमतेच्या विकासासाठी एक मोठे पाऊल म्हणून, 4 आणि 5 मार्च रोजी नवी दिल्लीतील ‘आयआयआयडीइएम’ येथे सर्व राज्य/संघराज्य क्षेत्रांच्या सीईओंचा दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये प्रत्येक राज्य/संघराज्य क्षेत्राच्या डीईओ आणि ईआरओंचा सहभाग होता. या परिषदेत संपूर्ण निवडणूक यंत्रणेला ऊर्जा देण्यासाठी 28 भागधारकांचा आराखडा तयार करण्यात आले, त्यांच्या जबाबदाऱ्या संविधान, निवडणूक कायदे आणि ईसीआयने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निश्चित करण्यात आल्या. निवडणूक हँडबुक आणि सूचना मॅन्युअल्स नवीन बदलांनुसार समन्वयित केले जातील. अनेक भारतीय भाषांमध्ये डिजिटल प्रशिक्षण किट तयार करण्यात येत असून, जेणेकरून कार्यकर्त्यांचे प्रभावी प्रशिक्षण होईल. अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ आणि एकत्रित डॅशबोर्ड प्रशिक्षणाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. भविष्यात बीएलओंना प्रशिक्षण देण्यासाठी एक प्रशिक्षण मॉड्यूल तयार केले जात आहे.

सर्वपक्षीय बैठकांच्या नियमित आयोजनाचे निर्देश

निवडणूक प्रक्रियेच्या सर्व पैलूंमध्ये राजकीय पक्षांचा पूर्ण सहभाग सुनिश्चित करण्यासाठी, मुख्य निवडणूक आयुक्त  ज्ञानेश कुमार यांनी 4 मार्च रोजी सीईओ परिषदेत सर्व 36 सीईओ, 788 डीईओ, 4123 ईआरओंनी सर्वपक्षीय बैठकांचे नियमित आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. देशभरातील अशा बैठका राजकीय पक्षांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रलंबित आणि उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत करतील. ही प्रक्रिया 31 मार्च 2025 पर्यंत संपूर्ण भारतात पूर्ण केली जाईल. निवडणूक कायद्यानुसार मतदार यादीतील दावे आणि हरकतीबाबत योग्य प्रक्रियांचे प्रशिक्षण देण्यासाठी आयोगाने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आणि त्यांच्या नियुक्त बीएलओ यांना प्रशिक्षण देण्याची संधी दिली आहे, ज्याचे राजकीय पक्षांनी स्वागत केले आहे. ‘ईसीआय’ने निवडणुकांच्या आयोजनाशी संबंधित इतर सर्व बाबींवर सर्व राजकीय पक्षांकडून 30 एप्रिल 2025 पर्यंत सूचना मागविल्या आहेत. राजकीय पक्षांना आयोगाशी दिल्लीत एकत्रित वेळेत भेटण्याचे आमंत्रण देखील देण्यात आले आहे.

या ठोस आणि दूरगामी उपक्रमांव्दारे निवडणूक प्रक्रिया अधिक बळकट करण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रियेतील सर्व संबंधीत घटकांशी समन्वय साधला जात आहे. असेही भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

0000

संजय ओरके/विसंअ

 

इंदरदेव धनगरवाडा येथे वणवा बाधित घरांची पुर्नबांधणी होणार – मंत्री आदिती तटकरे

मुंबई,दि. २१: रायगड जिल्ह्यातील इंदरदेव धनगरवाडा येथे नुकतेच वणव्यामुळे ग्रामस्थांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त गावकऱ्यांच्या घरांची पुनर्बांधणी त्याच ठिकाणी करण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

रोहा तालुक्यातील मौजे धामणसई हद्दीतील इंदरदेव धनगरवाडा येथील जंगलातील वणव्याची आग पसरुन बाधित झालेल्या ठिकाणी सोई सुविधाकामी निधी उपलब्ध होण्याबाबत विधिमंडळात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, धनगरवाडा येथे 6 मार्च 2025 रोजी जंगलातील वणव्याची आग पसरुन 39 घरे आणि 12 जानावरांचे गोठे बांधित झाले होते. या बाधित घराचे व गोठ्यांचे झालेल्या नुकसान झाले असून, ज्या ठिकाणी नुकसान झाले त्याच ठिकाणी त्यांच्या घरांची पुर्नबांधणी करण्यात येणार आहे.   इंदरदेव धनगरवाडीला जाणेसाठी रस्ता नसल्याने लागलेल्या आगीवर नियंत्रण करता आले नाही. इंदरदेव धनगरवाडा येथे जाण्यासाठी अडीच किलोमीटर लांबीचा रस्ता होण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत धामणसई यांनी ठराव करुन प्रस्ताव सादर करावा, असेही  त्यांनी सांगितले.

यावेळी रोहा येथील उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, रोहा तालुक्याचे तहसीलदार किशोर देशमुख, रोहा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शुभदा पाटील, रोहा वन परिक्षेत्रचे वन अधिकारी मनोज वाघमारे, सहाय्यक वनरक्षक रोहित चोबे, ग्रामविकास अधिकारी निता श्रीवर्धनकर, तानाजी देशमुख, अनंता देशमुख तसेच इंदरदेवचे ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

***

गजानन पाटील/विसंअ

०००

विधानपरिषदेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी

मुंबई, दि.२१: विधानपरिषदेसाठी नवनिर्वाचित झालेले सदस्य सर्वश्री चंद्रकांत रघुवंशी, दादाराव केचे, संजय केणेकर, संजय खोडके आणि संदीप जोशी यांना सभापती प्रा. राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली.

सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय करून दिला. यावेळी सभापती प्रा.राम शिंदे यांच्यासह सभागृहातील उपस्थित सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित सदस्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

***

ब्रिजकिशोर झंवर/विसंअ

०००

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून शेतकऱ्यांची आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल….

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक सिंचन सुविधांची निर्मिती करणे आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य पाण्याची सुविधा मिळेल आणि त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होईल व ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.

अनुदानाची माहिती

या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अनुदानांची सुविधा उपलब्ध आहे

  • नवीन विहीर: 2 लाख 50 हजार
  • जुनी विहीर दुरुस्ती: 50 हजार
  • इनवेल बोअरिंग: 20 हजार
  • पंप संच: 20 हजार (10 अश्वशक्ती क्षमतेच्या विद्युत पंप संचासाठी 100% अनुदान)
  • वीजजोडणी आकार: 10 हजार
  • शेत तळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण: 1 लाख
  • सूक्ष्म सिंचन संच:
  • ठिबक सिंचन संच: 50 हजार
  • तुषार सिंचन संच: 25 हजार

पॅकेजेस

योजनेअंतर्गत विविध पॅकेजेस उपलब्ध आहेत:

  1. नवीन विहीर पॅकेज

या पॅकेजमध्ये नवीन विहीर, पंप संच, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच, आणि आवश्यकतेनुसार इनवेल बोअरिंग यांचा समावेश आहे.

  1. जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज

यामध्ये जुनी विहीर दुरुस्ती, पंप संच, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच, आणि आवश्यकतेनुसार इनवेल बोअरिंग यांचा समावेश आहे.

  1. शेत तळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण

या पॅकेज अंतर्गत शेत तळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करण्यात येते.

पात्रतेच्या अटी

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही अटी पूर्ण कराव्या लागतात:

  1. लाभार्थी अनुसूचित जाती/नवबौद्ध शेतकरी असावा.
  2. जात प्रमाणपत्र असावे.
  3. नवीन विहीरचा लाभ घेण्यासाठी किमान 0.40 हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
  4. सामुहिक शेतजमीन किमान 0.40 हेक्टर धारण करणारे एकत्रित कुटुंब लाभ घेऊ शकते.
  5. इतर घटकांसाठी किमान 0.20 हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
  6. कमाल शेतजमीन 6.00 हेक्टरआहे.
  7. 7/12 दाखला आणि 8 अ उतारा आवश्यक आहे.
  8. आधार कार्ड आवश्यक आहे.
  9. बँक खाते आधार कार्डाशी संलग्न असावे.
  10. स्व. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत जमीन वाटप झालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य.
  11. वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार पेक्षा कमी असावे.
  12. उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांकडून मिळवावा लागेल.
  13. ग्रामसभेची शिफारस आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा लागतो. अर्ज भरण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  1. वेबसाईट: www.mahadbt.maharashtra.gov.in http://www.mahadbt.maharashtra.gov.in
  2. ऑनलाईन अर्ज भरण्यावर लाभार्थीची निवड लॉटरी पद्धतीने होते.
  3. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
  4. जिल्हास्तरीय समितीकडून मंजूरी मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना अनुदान मिळेल.

आवश्यक कागदपत्रे

अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर करावी लागतात:

  1. 7/12 दाखला आणि 8 अ उतारा
  2. 6 ड उतारा (फेरफार)
  3. जात प्रमाणपत्र
  4. तहसीलदारांकडील उत्पन्नाचा दाखला
  5. आधार कार्डाची छायांकित प्रत
  6. बँक पासबुकाची छायांकित प्रत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची संधी आहे, ज्यामुळे त्यांच्या शेतीतील उत्पन्न वाढण्यास मदत होईल. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक साधन-संपत्ती उपलब्ध करून देण्यात येते, ज्यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल. तरी सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विहित पद्धतीने अर्ज करावेत. प्रशासनाच्या या योजनेतून आपल्या शेतीला कायमस्वरूपी सिंचनाची सुविधा उपलब्ध करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करावेत.

०००

 

  • सुनील सोनटक्के, जिल्हा माहिती अधिकारी, सोलापूर

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात ‘प्रत्यय’ ऑनलाईन प्रणालीची अंमलबजावणी

श्रम आणि पैशांची होणार मोठी बचत

मुंबई, दि. 21 : राज्यभरातील महसूल प्रकरणांवरील सुनावण्या डिजिटल स्वरूपात होणार असून, त्यादिशेने आज प्रत्यय ही पेपरलेस रिव्हिजन व अपील प्रणाली सुरू महसूल विभागाने आज महत्वाकांक्षी पाऊल टाकले. प्रत्यय प्रणालीमुळे फेरफार, तक्रारी, अपील, पुनर्विलकन अर्ज आदी विषय ऑनलाईन पद्धतीने हाताळता येतील. यामुळे नागरिकांना मुंबई किंवा इतर ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज भासणार नाही. असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

‘प्रत्यय’(PAPERLESS RIVISION & APPEALS IN A TRANSPERANT WAY) प्रणालीचा शुभारंभ आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

यावेळी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, प्रधान सचिव संतोष कुमार, जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्यासह महसूल विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘प्रत्यय’ प्रणाली ही शासकीय कामांची सुंदर अनुभूती आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यानी महाराष्ट्राला पारदर्शी आणि गतिमान शासन देण्याचा संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महसूल खात्याने १०० दिवसांत ‘प्रत्यय’ प्रणाली विकसित करण्याचे लक्ष्य पूर्ण केले आहे. या प्रणालीमुळे राज्यभरातील महसूल प्रकरणांवरील सुनावण्या डिजिटल स्वरूपात होतील, परिणामी नागरिकांना मुंबई किंवा इतर ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज भासणार नाही. राज्यात सध्या महसूल खात्यात अकरा हजार प्रलंबित प्रकरणे आहेत. या प्रकरणांचे त्वरित आणि न्याय्य निवारण करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने निर्णय प्रक्रीया जलद आणि सुटसुटीत करण्याचा विचार शासन करत आहे. आगामी काळात महसूल विभागाच्या सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न सुरू आहे. सरकारची नाममात्र फी भरुन सर्व निर्णय डाऊनलोड करता येणार आहेत.

नागरिकांची गैरसोय दूर

सध्या राज्यामध्ये महसूल विभागात साधारणपणे  दीड लाख अर्ध न्यायिक तर भूमि अभिलेख विभागात सुमारे १५ हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. वैचारिक मतभेद यामुळे वादाचे प्रसंग उद्भवतात परिणामी अपिलाची प्रकरणे निर्माण होतात. प्रत्ययमुळे नागरिकांची पायपीट वाचणार असून वेळ, पैशाची बचत होणार आहे.

राज्यातील महसूल विभागाला देशातील पहिल्या क्रमांकावर नेण्याचा मानस आहे. इतर राज्यांसाठी महाराष्ट्राचे महसूल खाते एक आदर्श ठरेल. आगामी काळात व्हिडिओद्वारे महसुली सुनावणी घेण्यासाठी प्रयत्न आहे. संपूर्ण कार्यप्रणाली पेपरलेस होईल यासाठी काम सुरू असून महसूल विभागाचे डेटा सेंटर सुरू करण्याचा मानस आहे.

चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री, महाराष्ट्र काय आहे ‘प्रत्यय ‘ प्रणाली

  • ‘प्रत्यय’(PAPERLESS RIVISION & APPEALS IN A TRANSPERANT WAY) प्रणालीमुळे नागरिकांना फेरफार,तक्रारी,अपील,पुनर्विलोकन अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येणार आहे.
  • अर्जाची सद्यस्थिती, सुनावणीचा दिनांक वेळ, विरुद्ध पक्षाचे म्हणणे सर्व काही ऑनलाईन पाहता येणार आहे.
  • दिवाणी न्यायालयाप्रमाणे ऑनलाईन सुनावणीची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.
  • घरबसल्या अपिलदार, जबादार आणि वकील आपले म्हणणे मांडून वेळ, श्रम आणि पैसा वाचवू शकतील.
  • ‘प्रत्यय’ प्रणालीचे पहिल्या टप्प्यात जिल्हा अधीक्षक ते टीएलआर स्तरावरील अधिकाऱ्यांसाठी, तर दुसऱ्या टप्प्यात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि अन्य महसूल अधिकाऱ्यांसाठी कार्यान्वित होणार आहे.

0000

 

मोहिनी राणे/विसंअ

ताज्या बातम्या

विधानपरिषद निवेदन

0
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (ता. वाळवा) शहराचे नामांतर "ईश्वरपूर" करण्याबाबत केंद्र शासनाकडे शिफारस करणार - संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील मुंबई, दि. १८ : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, (ता....

विधानपरिषद कामकाज

0
परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ‘एमआयडीसी’ची चार देशात केंद्र उभारणार - उद्योगमंत्री उदय सामंत महाराष्ट्रात टेस्लाचे पहिले शोरूम  मुंबई, दि. १८ : देशातील टेस्लाचे पहिले शोरुम मुंबईमध्ये...

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
कृष्णा कालव्यातील पाण्याची गळती थांबविण्यासाठी अस्तरीकरणाची कामे करण्यात येणार - जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुंबई, दि. १८ : कराडजवळील कृष्णा कालव्याच्या पाण्याची गळती थांबविण्यासाठी...

केंद्रीय आरोग्य सेवा योजनेच्या दरांमध्ये सुधारणा करणार – केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया

0
मुंबई, दि. 18 : केंद्रीय आरोग्य सेवा योजनेच्या (CGHS) दरांमध्ये सुधारणा करण्याची बाब केंद्र सरकारच्या विचाराधीन असून लवकरच त्यात सुधारणा केली जाईल, अशी ग्वाही...

शासनाचे कौशल्य विकास उपक्रम समाजाभिमुख व्हावेत – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
मुंबई, दि. 18 : शासन निधी देवून नवनवीन लोकाभिमुख उपक्रम राबविते. इस्कॉनसारख्या मूल्याधारित संस्थांनी शासनासोबत भागीदारी केल्यास शासनाचे कौशल्य विकास उपक्रम फक्त तांत्रिक शिक्षणापुरते न राहता, व्यक्तिमत्व घडविणारे...