रविवार, मे 25, 2025
Home Blog Page 220

अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकास निधी उपलब्ध करुन देऊ- पालकमंत्री संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर, दि.१६ (जिमाका):  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे उत्तम स्मारक पुतळ्याच्या रुपाने उभे रहावे. तसेच सर्वोपयोगी अद्यावत सभागृह उभारले जावे. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी एकविचाराने अशा लोकोपयोगी कमांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देऊ,असे आश्वासन राज्याचे सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे दिले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशिभिकरण या कामाचे भुमिपूजन पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झाले. यावेळी इतर मागासवर्ग कल्याण व दुग्धविकास मंत्री अतुल सावे, मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत, संजय ठोकळ, राजेंद्र जंजाळ तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, पुतळ्याचे सुशोभिकरण व परिसराचा विकास ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कदाचित हे चांगले काम माझ्या हातून व्हावे, असे होणार असावे. आता सर्व लोकप्रतिनिधी हे एक विचारांचे आहेत. अशा चांगल्या कामासाठी आम्ही निधी आणून हे काम पूर्ण करु. समाजहिताच्या या कामाच्या गुणवत्तेत तडजोड करणार नाही. उत्तम दर्जाचे काम करु. पुतळा, परिसर विकास व सभागृह अशा कामांसाठी निधी उपलब्ध करुन देऊ,असे आश्वास पालकमंत्री शिरसाट यांनी दिले.

इमाव कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले की, अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे समाजाला बोध देणारे आहे. हे साहित्य सर्वांपर्यंत पोहोचविले पाहिजे. प्रत्येकाने ते वाचायला हवे. अण्णा भाऊ साठे यांचे यथोचित स्मारक आणि परिसराच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत,असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक संजय ठोकळ यांनी केले. पंचशिला भालेराव व त्यांच्या कलापथकातील कलावंतांनी अण्णा भाऊ साठे यांची गाणी सादर केली.  विनोद साबळे यांनी आभार मानले.

०००

विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवा – पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे, दि. १६ (जिमाका): सध्याच्या आधुनिक डिजिटल युगामध्ये नवनवीन तंत्रज्ञानामुळे वाचन संस्कृती लोप पावत आहे. विद्यार्थ्यामध्ये वाचन संस्कृती रुजवून चांगले कवी, लेखक, विचारवंत, साहित्यिक, विचारवंत निर्माण करावे, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धुळे, ज्येष्ठांचे टोणगांवकर ग्रंथालय, दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय धुळे ग्रंथोत्सवाचा समारोप झाला. यावेळी पालकमंत्री रावल बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदिश पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजीव गिरासे, साहित्य समिक्षक डॉ.फुला बागुल, प्राध्यापक डॉ.रमेश माने, अहिराणी कथाकार प्रविण माळी, साहित्यिक सुरेश मोरे, प्रभाकर शेळके, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, नाशिक विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. दत्ता परदेशी, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाहक अनिल सोनवणे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री रावल म्हणाले की, आज जग वेगाने बदलत आहे आणि इतक्या वेगाने बदलते की एक गोष्ट आपल्याला समजण्याच्या अगोदर दुसरे काही नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. आज सोशल मीडिया, व्हॉट्सअप संपत नाही तोवर ए.आय हे नवीन तंत्रज्ञान आले आहे. या तंत्रज्ञानाचा मोठा परिणाम वाचन संस्कृतीवर होत आहे. आजच्या युवा पिढीचे वाचन कमी झाले आहे. इंग्रजांनी 200 वर्षापूर्वी देशात इंग्रजी भाषा आणली आणि या इंग्रजी भाषेत आपण सर्व जण गुरफुटून गेलो आहे. यामुळे आज आपण अहिराणी, मराठी भाषा बोलणे विसरून चाललो आहे. या भाषेला टिकविण्यासाठी आपण सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न आणि कष्ट आपल्याला करावे लागणार आहे. मुलांना अहिराणी थोडीफार यायला पाहिजे ते शिकविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. अहिराणी असो, मराठी असो ही आपली स्वत:ची भाषा प्रत्येकाला येणे आवश्यक आहे.  सांस्कृतिक वारसा असणारे भारत वर्ष आपल्याला निर्माण करण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावे लागणार आहे. येत्या काळात जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून तसेच राज्य शासनाच्या माध्यमातूनही वाचनालयासाठी अधिक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. आज साहित्यिकांची संख्या हळूहळू कमी होत आहे.  आपण नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे वाचन संस्कृती रुजवून चांगले कवी, लेखक, विचारवंत, साहित्यिक, विचारवंत निर्माण करण्याची गरज असल्याचे पालकमंत्री रावल यांनी सांगितले. यानंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली.

या दोन दिवशीय ग्रंथोत्सवात काल परिसंवाद कार्यक्रमांत ‘ग्रंथानी मला घडविले’ या विषयावर विद्यार्थ्यांना निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी मार्गदर्शन केले. आज झालेल्या परिसंवाद कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजीव गिरासे, साहित्य समिक्षक डॉ.फुला बागुल, प्राध्यापक डॉ.रमेश माने यांनी ‘खान्देशातील अहिराणी साहित्याची वाटचाल’ या विषयावर उपस्थित श्रोत्यांना सखोल मार्गदर्शन केले. कथाकथन कार्यक्रमात साहित्यिक सुरेश मोरे यांनी शेतकरी आत्महत्या या विषयांवर ‘यसा दादानी फाशी लीदी’ यावर कथाकथन केले. तर अहिराणी कथाकार प्रविण माळी यांनी ‘आयतं पोयतं सख्यांन’ हे एकपात्री नाटक सादर करुन प्रेक्षकांना हसवुन मंत्रमुग्ध केले.

बहुभाषिक कवी संमेलनात प्रभाकर शेळके, रावसाहेब कुवर, अरुणकुमार जव्हेरी, लतिका चौधरी, के.बी.लोहार, बाळु श्रीराम, प्रविण पवार, चंद्रशेखर कासार, प्रा.एन.डी.पाटील, माया साळुंखे, दत्तात्रय कल्याणकर, कमलेश शिंदे, गुलाब मोरे, अरविंद भामरे, शामल पाटील, सुनिल पाटील, गोकुळ बागुल, यशवंत निकवाडे, ईश्वर परदेशी, दत्तात्रय वाघ, जयराम मोरे, अहमद शेख, संजय धनगड, पौर्णिमा पाठक या कवीनी सहभाग घेतला. कवी संमेलनांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्ञानेश्वर भामरे यांनी तर आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदिश पाटील यांनी मानले.

०००

शासकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी प्रयत्न करू – मंत्री हसन मुश्रीफ

सांगली, दि. १६, (जिमाका) : शासकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करू. शासकीय रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांची चांगल्या प्रकारे सेवा करावी. त्यांना चांगली सुविधा द्यावी, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे मॉड्युलर आय.सी.यू. आणि मॉड्युलर ऑपरेशन थेएटर चे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार डॉ. सुरेश खाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज चे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रियांका राठी, उपवैद्यकीय अधिक्षक डॉ. रुपेश शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांच्यासह महापालिकेचे माजी पदाधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे मॉड्युलर आय.सी.यू. आणि मॉड्युलर ऑपरेशन थेएटर चे लोकार्पण झाल्याचे जाहीर करून मंत्री मुश्रीफ म्हणाले, या नविन सुविधेचा गोरगरीब व सामान्य जनतेला लाभ व्हावा. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी याचा लाभ सामान्य जनतेला होण्यासाठी व्यवस्था करावी. शासकीय रूग्णालय व महाविद्यालयामध्ये सोयी सुविधा पुरविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मेरीटवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण चांगले होणे, त्यांना चांगली सुविधा देणे व तशा प्रकारचे काम करण्याची शासनाची व आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देऊन त्यांना गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी तयार करणे हे काम हातामध्ये घेऊ. या रूग्णालयामध्ये विद्यार्थी, विद्यार्थीनींच्या वसतिगृह दुरूस्तीसाठी 17 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगून याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल, असे ते म्हणाले. या रूग्णालयामध्ये हृदयरोग विभाग, मिरजेला कॅन्सर केअर हॉस्पीटल लवकरात लवकर सुरू करण्यासाठी, नर्सिंग कॉलेजला इमारत मंजूर होण्यासाठी, सुपरस्पेशालिटी रूग्णालय मंजूर होण्यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले.

खासदार विशाल पाटील म्हणाले, सांगली व मिरज ची पूर्वीपासून वैद्यकिय पंढरी म्हणून ओळख आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महाराष्ट्रात सांगली जिल्हा वैद्यकीय पायाभूत सुविधामध्ये अग्रेसर आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी नवनविन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. त्यासाठी चांगल्या सुविधा देऊ. आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी, मिरज येथे नर्सिंग कॉलेज व सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल होण्यासाठी आवश्यक निधीसाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू असे ते म्हणाले.

आमदार इद्रिस नायकवडी म्हणाले, मिरज वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे रूग्णालय मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल होण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या मदतीच्या दरामध्ये वाढ होण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

आमदार डॉ. सुरेश खाडे म्हणाले, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय हे गोरगरीब रूग्णांचा आधारस्तंभ म्हणून उभे आहे. हे हॉस्पीटल चांगले व्हावे गोरगरीब रूग्णांना चांगली सेवा मिळावी यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. सांगली व मिरज शासकीय रूग्णालयामध्ये आवश्यक सोयी सुविधांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या रूग्णालय व महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण व रूग्णांना चांगली सेवा मिळावी हे ध्येय ठेवून काम करीत आहोत. डॉक्टरांनी रूग्णांना चांगली सेवा द्यावी, रूग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले.

प्रारंभी मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते मॉड्युलर आय.सी.यू. आणि मॉड्युलर ऑपरेशन थेएटरचे फित कापून लोकार्पण करण्यात आले.

प्रास्ताविकात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव यांनी रूग्णालयात पुरविण्यात आलेल्या विविध सोयी सुविधांबद्दल सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन उपवैद्यकीय अधीक्षक रुपेश शिंदे यांनी केले.

०००

महाराष्ट्राबाहेर पुन्हा एकदा अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा डंका!

यावर्षी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी नवी दिल्ली येथे होत आहे. या आधी तब्बल बावीस वेळा महाराष्ट्राबाहेर साहित्य संमेलने झाली आहेत. यंदाही हे संमेलन अनेक कारणांसाठी विशेष ठरणार आहे.
केंद्र सरकारकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले साहित्य संमेलन आहे. यामुळे हे संमेलन ऐतिहासिक असेल. हा सोहळा मराठी भाषिक, साहित्यप्रेमींसाठी एक अभिमानास्पद क्षण ठरणार आहे. यामुळे संपूर्ण भारतभर आणि परदेशात विखुरलेल्या मराठी जनामनास एकत्र येण्याची संधी मिळणार आहे. या संमेलनामुळे मराठीचा लौकिक अधिक वृद्धिंगत होईल. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारे उद्घाटन हा मराठी भाषिकांसाठी अभिमानाचा क्षण असेल.
अशी आहे मराठी साहित्य संमेलनाची गौरवशाली परंपरा
मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ १८७८ साली पुण्यात रोवली गेली. त्यानंतर महाराष्ट्राबाहेर मराठी साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी अनेक संमेलने महाराष्ट्राबाहेर पार पडली आहेत. विशेष म्हणजे १८७८ साली सुरू झालेली साहित्य संमेलनाची परंपरा आजही सुरू आहे. पहिले संमेलन १८७८ साली पुणे येथे पार पडले.
✒️ यानंतर १९०९ साली म्हणजेच तब्बल २१ वर्षांनी सातवे संमेलन बडोदा (गुजरात) येथे पार पडले.
✒️ १९१७ साली म्हणजेच तब्बल आठ वर्षांनी दहावे संमेलन मध्यप्रदेश मधील इंदूर येथे पार पडले.
✒️ १९२१ साली तब्बल चार वर्षांनी अकरावे संमेलन बडोदा (गुजरात ) येथे पार पडले.
✒️ १९२८ साली तब्बल सात वर्षांनी चौदावे संमेलन मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर येथे पार पडले.
✒️ १९२९ साली पंधरावे संमेलन कर्नाटकमधील बेळगाव येथे पार पडले.
✒️ १९३० साली सोळावे संमेलन गोव्यातील मडगाव येथे पार पडले.
✒️ १९३१ साली सतरावे संमेलन तेलंगणातील हैद्राबाद येथे पार पडले.
✒️ १९३४ साली तब्बल चार वर्षांनी विसावे संमेलन बडोदा (गुजरात) येथे पार पडले.
✒️ १९३५ साली एकविसावे संमेलन मध्यप्रदेशमधील इंदूर येथे पार पडले.
✒️ १९४६ साली तब्बल अकरा वर्षांनी ३० वे संमेलन कर्नाटकमधील बेळगाव येथे पार पडले.
✒️ १९४७ साली ३१ वे संमेलन तेलंगणातील हैद्राबाद येथे पार पडले.
✒️ १९५१ साली तब्बल चार वर्षांनी ३४ वे संमेलन कर्नाटक मधील कारवार येथे पार पडले.
✒️ १९५३ साली ३६ वे संमेलन गुजरातमधील अहमदाबाद येथे पार पडले.
✒️ १९५४ साली ३७ वे संमेलन दिल्ली येथे पार पडले.
✒️ १९६१ साली ४३ वे संमेलन तब्बल सात वर्षांनी मध्यप्रदेशमधील ग्वालेहर येथे पार पडले.
✒️ १९६४ साली ४५ वे संमेलन गोव्यातील मडगाव येथे पार पडले.
✒️ १९६७ साली ४७ वे संमेलन मध्यप्रदेशमधील भोपाळ येथे पार पडले.
✒️ १९८१ साली तब्बल १४ वर्षांनी ५६ वे संमेलन छत्तीसगडमधील रायपूर येथे पार पडले.
✒️ २००० साली ७३ वे संमेलन तब्बल 19 वर्षांनी कर्नाटक मधील बेळगाव येथे पार पडले.
✒️ २००१ साली ७४ वे संमेलन मध्यप्रदेशमधील इंदोर येथे पार पडले.
✒️ २०१५ साली तब्बल 14 वर्षांनी ८८ वे संमेलन पंजाबमधील घुमान येथे पार पडले. त्यानंतर 2018
✒️ २०१८ साली ९१ वे संमेलन गुजरात मधील बडोदा येथे पार पडले.
यानंतर यंदा तब्बल ७ वर्षांनी पुन्हा २०२५ साली ९८ वे संमेलन महाराष्ट्राबाहेर दिल्ली येथे पार पडणार आहे.
मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्याचा जागर
मराठी ही केवळ एक भाषा नसून शब्द, साहित्य, संगीत, कला आणि संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. संत साहित्यापासून ते आधुनिक काव्यापर्यंत, लोककथांपासून आधुनिक कादंबऱ्यांपर्यंत, नाटकांपासून चित्रपटांपर्यंत मराठी साहित्याचा वारसा अत्यंत समृद्ध आहे.
या संमेलनात मराठी साहित्यविश्वातील मान्यवर लेखक, कवी, समीक्षक आणि रसिक वाचक एकत्र येणार आहेत. विविध चर्चासत्रे, परिसंवाद, ग्रंथप्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांमधून मराठी भाषेचे भवितव्य उजळवण्याचा संकल्प केला जाणार आहे.
या भव्य सोहळ्याचा भाग बना!
दिल्लीतील हे साहित्य संमेलन मराठी संस्कृतीचा उत्सव आहे. साहित्यप्रेमी, लेखक, कवी, विद्यार्थी आणि मराठी भाषा जपणाऱ्या सर्वांनी या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याची ही सुवर्णसंधी आहे. आपली मराठी संस्कृती जपण्यासाठी, तिचा जागर करण्यासाठी आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी आपण सर्वांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे. चला, तर मग मराठी साहित्याचा हा ऐतिहासिक उत्सव दिल्लीच्या ऐतिहासिक भूमीवर भव्य स्वरूपात साजरा करूया!
०००
– वर्षा फडके- आंधळे, वरिष्ठ सहायक संचालक (माहिती)

भगूर शहराच्या विकासाला नवी चालना मिळणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

नाशिक, दि. १६ (जिमाका):  पाणी हा जीवनाचा मुलाधार आहे. दर्जेदार व शुद्ध पाणी मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. नवीन पाणी पुरवठा योजनेमुळे भगूर शहरास नियमित पाणीपुरवठ्यासह विकासाला नवी चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

आज भगूर नगर नगरोत्थान महाअभियान अभियांनंतर्गत भगूर शहराकरीता 24.38 कोटी निधीच्या पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार सरोज अहिरे, भगूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुवर्णा दखणे, माजी खासदार देविदास पिंगळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, भगूर शहर हे एतिहासिक दृष्ट्या महत्वाचे शहर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. स्वातंत्रपूर्व काळापासून सन 1925 पासून येथे नगरपरिषद अस्तित्वात असून ती आता शताब्दी वर्षात पदार्पण करीत आहे. भगूर शहराच्या विकासासाठी, शहराची वाढती लोकसंख्या व पाण्याची गरज लक्षात घेता नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे गरजेचे होते. चार वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियांनंतर्गत भगूर शहर पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. भगूर शहर हे स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांचे आंतराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व थीमपार्क करिता शिखर सामितीच्या बैठकीमध्ये 40 कोटींच्या विकास आराखड्यास मंजूरी दिली असून प्रथम टप्प्यामधील कामाकरिता 16 कोटी रूपये मंजूर करण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

नाशिक शहरात आगामी काळात होणाऱ्या कुंभमेळाच्या दृष्टीने आता शासन स्तरावर बैठका व नियोजन सुरू झाले आहे. यानिमित्ताने नाशिकसाठी केंद्र व राज्यशासानाकडून जास्तीत जास्त निधी कसा देता येईल यादृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मी प्रयत्नशील राहील. भगूरवासियांना सर्व मूलभूत सेवा-सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने निधी कमतरता भासू देणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री पवार यांनी नागरिकांना शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

स्वातंत्र्यवीर सावरकर याच्या स्मारक व थीमपार्कसाठी मंजूर 40 कोटींच्या निधीतून पहिल्या टप्प्यात प्राप्त झाले 16 कोटींच्या निधीतून सूरू झालेले स्माराकाचे काम अतिशय दर्जेदार, गुणवत्तापूर्ण होणार आहे. देवळाली कॅन्टोन्मेंट साठी 75 कोटींचा आराखडा सादर केला असून त्यास मंजूरी प्राप्त होताच कामे सुरू केली जातील. संत निवृत्तीनाथ महाराज समाधीचा व परसिराच्या विकासासाठी 45 कोटींचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीला सादर केला असून त्यास विशेष बाब म्हणून मान्यता मिळावी,असे आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले.

०००

 

दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाची प्रसिध्दी जगभरात – मंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, दि. १६ (जिमाका): मराठीचा आवाज दिल्लीच्या तख्तावर पोहोचविण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने जे प्रयत्न केले त्याचे देखील मनापासून कौतुक करतो आणि त्यांनादेखील मनापासून धन्यवाद देतो. या संमेलनाला मराठी भाषेचा मंत्री म्हणून शुभेच्छा देतो आणि हे संमेलन जगभरामध्ये प्रसिध्द होईल, याची खात्री बाळगतो, अशा शब्दात मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी शुभेच्छा दिल्या.

मराठी भाषा मंत्री डॉ. सामंत म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदा दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. तमाम महाराष्ट्राच्यावतीने प्रधानमंत्री मोदी यांना मनापासून धन्यवाद देतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही आमची वर्षानुवर्षे असलेली मागणी त्यांनी पूर्ण केली. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये संमेलन होत आहे.

सुमारे 70 वर्षानंतर हे संमेलन होत आहे. मराठीचा आवाज दिल्लीच्या तख्तावर पोहोचविण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने जे प्रयत्न केले, त्याचे देखील मनापासून कौतुक करतो आणि त्यांनादेखील मनापासून धन्यवाद देतो. नियोजनामध्ये पुणे येथील सरहद संस्थेचे संजय नहार यांनीदेखील अतिशय चांगल्या पध्दतीने जबाबदारी खांद्यावर घेवून दिल्लीमध्ये मराठी भाषा आणि मराठी साहित्य संमेलन याचा दर्जा उंचाविण्यासाठी ते काम करतात त्यांचे देखील अभिनंदन आहे. या संमेलनाला मराठी भाषेचा मंत्री म्हणून शुभेच्छा देतो आणि हे संमेलन जगभरामध्ये प्रसिद्ध होईल याची खात्री बाळगतो.

०००

पुणे-दिल्ली प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर प्रथमच ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’

  • मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत स्वागताध्यक्ष, शरद तांदळे अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्षपदी वैभव वाघ

रत्नागिरी, दि. १६ (जिमाका): सरहद, पुणे आयोजित अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या दिल्ली येथे होत असलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर प्रवासी साहित्य संमेलन भरवावे, या संकल्पनेतून ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत होणारे हे मराठीतील पहिलेच आणि जगातील सर्वात मोठे आणि दीर्घ साहित्य संमेलन असणार आहे.

साहित्यरसिकांना पुण्यातून दिल्लीला घेऊन जाणाऱ्या रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव देण्यात येणार असून, प्रत्येक बोगीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची नावे दिली जाणार आहेत. मराठी भाषामंत्री डॉ. उदय सामंत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून, तेही ‘मराठी साहित्ययात्री संमेलनात’ सहभागी होत रेल्वेतून प्रवास करणार आहेत. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका डॉ. संगीता बर्वे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती सरहदचे विश्वस्त डॉ. शैलेश पगारिया, अनुज नहार, मिलिंद जोशी यांनी दिली.

दि. 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी, ताल कटोरा स्टेडियम येथे हे संमेलन होत आहे. या संमेलनात सहभागी होणाऱ्या साहित्य रसिकांसाठी पुणे ते दिल्ली अशी विशेष रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही विशेष रेल्वे दि. 19 रोजी दुपारी पुण्यातून निघणार असून, दि. 20 रोजी रात्री दिल्ली येथे पोहोचणार आहे.

‘मराठी साहित्ययात्री संमेलनात’ महाराष्ट्रातील विविध गावा-गावांमधून साहित्यिक, युवक, लोककलाकार, स्टँडअप कॉमेडियन्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स तसेच शाहिरी व भजनी मंडळांचा मोठ्या संख्येने समावेश असणार आहे. मोठ्या प्रमाणावर तरुणाईच्या सहभागामुळे हे संमेलन तरुणाईचे संमेलन ठरणार आहे. महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव असलेल्या या विशेष रेल्वेला 16 बोगी असणार असून, प्रवासारदम्यान प्रत्येक बोगीत विविध साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. युवा साहित्यिक व कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’ भरविण्यात येत आहे.

दि. 19 रोजी असलेल्या शिवजयंतीचे औचित्य साधून सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली जाणार आहे. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनानंतर पुण्यातून रेल्वे निघणार आहे. तत्पूर्वी पुस्तक दिंडीही काढली जाणार आहे. याच रेल्वे प्रवासात १२०० पेक्षा अधिक साहित्यिक येणार असून, जळगाव आणि ग्वाल्हेर येथे ही विशेष रेल्वे पोहोचल्यानंतर ग्वाल्हेर येथील स्थानिक नागरिक भव्य स्वागत करणार आहेत. रेल्वे दि. 20 रोजी दिल्लीत पोहोचणार असून, दिल्ली स्थानकावर पोहोचल्यानंतर पसायदानाच्या गायनाने ‘मराठी साहित्ययात्री संमेलना’ची व पहिल्या टप्प्यातील प्रवासाची सांगता होणार आहे. या वेळी दिल्लीतील मराठीजन मोठ्या संख्येने स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत. परतीच्या प्रवासात देखील हे संमेलन रंगणार असून, दि. 25 रोजी पुणे रेल्वे स्थानकावर या अनोख्या संमेलनाची सांगता होईल.

या अभिनव उपक्रमाची संकल्पना सरहद पुण्याचे अध्यक्ष संजय नहार यांची आहे. संमेलनाच्या निमित्ताने स्वतंत्र संयोजन समितीची स्थापना करण्यात आली आहे.  मराठी भाषामंत्री डॉ. सामंत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. तेही रेल्वेद्वारे प्रवास करणार असून, साहित्यिक, कलावंतांशी संवाद साधणार आहेत. रावण आंत्रप्रिन्युअर या पुस्तकांचे लेखक शरद तांदळे यांची संमेलनाध्यक्ष तर, वंदेमातरम् संघटनेचे अध्यक्ष व व्हायरल माणुसकी या पुस्तकाचे लेखक वैभव वाघ हे संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. डॉ. शरद गोरे (कार्याध्यक्ष), सचिन जामगे, (कार्यवाह), अॕड. अनिश पाडेकर, सोमनाथ चोथे, गणेश बेंद्रे (मुख्य समन्वयक), अक्षय बिक्कड, सागर काकडे (निमंत्रक) यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.

०००

जागतिक पटलावर देशाच्या खेळाडूंचा डंका अभिमानास्पद -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जळगाव दि.१६: सध्या जागतिक पटलावर देशाच्या विशेषत: महाराष्ट्रातील खेळाडू आपले नाव कमावत असून ही देशवासियांसाठी  अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आयोजित केलेल्या ‘नमो कुस्ती महा कुंभ -२’ अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, अनिल पाटील, संजय कुटे, चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, अमोल जावळे, अनुपभैय्या अग्रवाल यांच्यासह कुस्तीगीर संघटनेचे रामदास तडस, जामनेरच्या नगराध्यक्ष साधना महाजन आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ऑलम्पिक स्पर्धा, कॉमनवेल्थ, एशियन गेम अशा विविध स्पर्धांमध्ये देशातील खेळाडूंनी विशेषत: महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. मागील काळात मॅटवरील कुस्तीमुळे आपण थोडे मागे पडलो होतो. परंतु, मातीवरील कुस्ती स्पर्धेत आपल्या देशाचे खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. कुस्तीच्या माध्यमातून देशाला ऑलम्पिकमधील पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव हे कुस्तीपटू होते. आजही महाराष्ट्राचे खेळाडू विजय चौधरी, सोनाली मंडलिक, राजीव पटेल यांनी आपल्या खेळाची चमक दाखवून परदेशातील कुस्तीपटूवर मात केली, असे सांगून त्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

या स्पर्धेला नऊ देशातील जागतिक स्तरावरील कुस्तीपटू उपस्थित राहिल्याबद्दल या स्पर्धेची रंगत आणखीनच वाढल्याचे त्यांनी सांगितले.  आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन यांचेही त्यांनी यावेळी कौतुक केले. या स्पर्धेला नागरिकांचा मोठा सहभाग लाभला हेच या स्पर्धेचे यश असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतासह फ्रान्स, रोमानिया इस्टोनिया, उझेकिस्तान, जॉर्जिया आदी देशातील जागतिक विजेते ओलंपियन, हिंदकेसरी, रुस्तम ए हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आदी विजेत्या खेळाडूंनी सहभाग घेतला. अशा स्पर्धा जामनेरमध्ये होणे हे कुस्तीसाठी चांगले वातावरण असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी विजेत्या मल्लांना मान्यवरांच्या हस्ते चांदीची गदा प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी, विविध देशातून आलेले कुस्तीगीर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

नाशिक रोड न्यायालयामुळे न्यायदान प्रक्रियेला गती – उपमुख्यमंत्री अजित पवार

  • नाशिक रोड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरीष्ठस्तर न्यायालयाचे उद्घाटन

नाशिक, दि. १६ (जिमाका) :  न्यायव्यवस्थेचा विस्तार आणि सुधारणा हा प्रगतीशील समाजाचा पाया आहे. लोकसंख्या आणि न्यायालयीन प्रकरणांच्या वाढत्या प्रमाणामुळे न्यायालयांवरील कामाचा ताण वाढत आहे. त्यासाठी राज्यातील न्याय व्यवस्थेचे बळकटीकरण करीत सुविधा पुरविण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. नाशिक रोडच्या नवीन न्यायालयामुळे न्यायदान प्रक्रियेला अधिक प्रभावी आणि गतिमान करेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे व्यक्त केला, तर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी न्यायालयाच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत त्याचे अधिकार पोहोचविण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.

नाशिक रोड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश, वरीष्ठस्तर या न्यायालयाचे उद्घाटन आणि ई सेवा केंद्र, ई ग्रंथालय आदींचे उदघाटन आज दुपारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या हस्ते झाले. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयातील स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा नाशिकचे पालक न्यायमूर्ती सारंग कोतवाल, न्यायमूर्ती संदीपकुमार मोरे, न्यायमूर्ती किशोर संत, न्यायमूर्ती मिलिंद साठे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सुदाम गायकवाड, जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. एम. दळवी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, नाशिक रोडच्या नवीन न्यायालय स्थापनेमुळे प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होऊन न्याय प्रक्रियेत गतिमानता येण्यास मदत होईल.

भारतीय न्याय संहिता, नागरिक संरक्षण संहिता आणि साक्ष संहिता या तीन नवीन फौजदारी कायद्यासंदर्भात राज्यातील अंमलबजावणीचा मुख्यमंत्री महोदयांकडून आढावा केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी नुकताच घेतला आहे. या तीन नवीन फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीमुळे राज्यात गतिमान आणि प्रगतिशील कायदा व सुव्यवस्था उभी करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले

राज्यात कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात 27 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कार्यान्वित केल्या आहेत. या व्हॅनच्या माध्यमातून घटनास्थळी न्याय वैद्यकीय परीक्षण केले जाणार आहे. त्यासाठी पोलिस दल प्रशिक्षित केले जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रे येथे साकारण्यात येणाऱ्या अद्ययावत इमारतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

न्यायमूर्ती कर्णिक म्हणाले की, सुदृढ समाजासाठी न्यायपालिका आवश्यक आहे. न्यायालयाच्या इमारत बांधकामांसाठी राज्य सरकारचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी उकृष्ट वास्तू रचनाकार उपलब्ध करून दिले आहेत. राज्यात न्यायालयीन इमारतीसाठी पाठपुरावा सुरू आहे. न्यायालयात आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. न्यायालयाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या माणसासाठी अधिकार पोहोचविण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी विधी सेवा समितीसह विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

न्यायमूर्ती कोतवाल यांनी सांगितले की, जनसेवेसाठी न्यायपालिकेला अधिकार दिले आहेत. सुदृढ समाज आणि खटल्यांची संख्या कमी करण्यासाठी न्यायाधीशांची संख्या वाढवून पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.

न्यायमूर्ती मोरे म्हणाले की, नाशिक रोड येथील न्यायालयामुळे वेळेची बचत होईल.

न्यायमूर्ती संत म्हणाले की, न्यायालय हा समाजाचा आधार असतो. सुसंस्कृत समाजात न्यायालयाचे महत्व आहे. न्याय जलद, सुलभ आणि कमी खर्चात मिळण्यासाठी नाशिकरोड येथील न्यायालय उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

न्यायमूर्ती साठे म्हणाले की, नाशिक शहरासाठी आणखी एक न्यायालय उपलब्ध झाले आहे. रेल्वे स्थानकापासून हे न्यायालय जवळ आहे. त्यामुळे पक्षकारांना न्याय लवकर मिळण्यास मदत होईल.

श्री. गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जगमलानी यांनी  प्रास्ताविक केले. यावेळी आमदार दिलीप बनकर, आमदार सरोज अहिरे यांच्यासह वकील संघाचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

 

कापूस खरेदी सुरू करण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जळगाव, दि. १६: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सीसीआयने बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा उत्पादित माल घरातच राहणार नाही, याची काळजी राज्य शासन घेईल. या परिसराचे चित्र बदलण्यासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य शासन करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

दी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त अमृत ग्रंथ प्रकाशन आणि नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील,  जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार संजय कुटे, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी  संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड  उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास राज्य शासनाचे प्राधान्य आहे. वीज आणि पाणी यासंदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याला शासनाने प्राधान्य दिले आहे. सौर पंपासाठी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना पुढच्या  १५ दिवसात आणि मागणी नोंदवल्या नंतर प्रत्येक शेतकऱ्याला दोन महिन्याच्या आत जोडणी देण्यात येईल.

शेतकऱ्यांना २०२६ पर्यंत दिवसाची वीज देण्यासाठी सौर फिडरचे काम वेगाने सुरू आहे. शेतकऱ्याचा माल कोणत्याही परिस्थितीत पडू दिला जाणार नाही, त्याची खरेदी करण्यात येईल. या भागाचे चित्र बदलण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, चक्रधर स्वामींचे वास्तव्य लाभलेली ही भूमी आहे. या ऐतिहासिक संस्थेत येण्याची संधी मिळाली. स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर ही शिक्षण संस्था स्थापन झाली. गावातल्या मुलामुलींना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी गजानन राव गरुड यांनी या संस्थेची स्थापना केली. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. संस्थेच्या समस्या सोडविण्याच्या प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी नावारूपाला आले. स्वतः बापूसाहेब गरुड यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते, विविध विषयांचा व्यासंग होता. या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वामुळे ते प्रसिद्ध झाले. सरपंच ते विधानसभा उपाध्यक्ष अशा अनेक भूमिकांना त्यांनी न्याय दिला. आज त्यांचे कार्य संस्था पुढे नेत आहे. नुकतीच पायाभरणी केलेली ही अतिशय सुंदर आणि पर्यावरण पूरक इमारत असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शेंदुर्णी नगरपंचायतीच्या नगरोत्थान योजनेंतर्गत मलनिस्सारण प्रकल्प आणि रस्ता कामाचे शुभारंभ करण्यात आला.  सुरुवातीला संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

 

ताज्या बातम्या

महाबीजकडून खरीप हंगामासाठी अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा

0
मुंबई, दि. २५ :- केंद्र सरकारच्या साथी पोर्टलच्या अंमलबजावणीत मोठी भूमिका बजावत महाबीज येत्या खरीप हंगामात "साथी" प्रणालीच्या क्यूआर (QR)कोडसह अडीच लाख क्विंटल प्रमाणित...

गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल येथील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका जाहीर – निवडणूक...

0
मुंबई, दि. २५ : भारत निवडणूक आयोगाने गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल येथील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघांमध्ये...

भारत चौथ्या क्रमांकाची जागतिक अर्थशक्ती

0
मुंबई, दि. 25: “भारताची अर्थव्यवस्था चार ट्रिलियन डॉलर्सच्या टप्प्यावर पोहोचली असून, आपला देश आज जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थशक्ती ठरला आहे, ही बाब...

मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्यामुळे राज्यात पावसात घट होणार

0
मुंबई, दि २५ : या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे तो २५ मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा १०...

‘उडान’ मुळे नागपूर जिल्ह्यात मानसिक आरोग्य सेवांचे सशक्तीकरण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. २५ : ‘उडान’ या जिल्हास्तरीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाने नागपूर जिल्ह्यात उल्लेखनीय यश मिळवले असून, या उपक्रमामुळे ग्रामीण भागात मानसिक आरोग्य सेवा अधिक...