सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 212

जागतिक आरोग्य दिनी विविध आरोग्य योजनांचा शुभारंभ

मुंबई, दि.: जागतिक आरोग्य दिनानिमित्त उद्या ७ रोजी महाराष्ट्र आरोग्य सन्मान सोहळा – २०२५ व विविध आरोग्य सेवा योजनांचा शुभारंभ यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट मुंबई येथे होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या मुख्य उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती, प्रा. राम शिंदे, कौशल्य रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यासह सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, विरेन्द्र सिंह, आरोग्य सेवाचे आयुक्त तथा मुंबई राष्ट्रीय अभियानाचे संचालक अमगोथ रंगा नायक, राज्य कामगार विमा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब चव्हाण, मुंबई आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान संचालक डॉ. स्वप्नील लाळे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

‘आरोग्यदायी सुरुवात, आशादायी भविष्य’ या जागतिक आरोग्य संघटनेच्या घोषवाक्यानुसार, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून राज्यातील जनतेला अधिक पारदर्शक, जलद, सक्षम आणि उच्च दर्जाची आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे त्यादृष्टीने सार्वजनिक आरोग्य विभाग नवीन आरोग्य सेवा योजनांचा शुभारंभ करत आहे. यावेळी आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा महाराष्ट्र आरोग्य सन्मान व पारितोषिक देऊन गौरव करण्यात येणार आहे.

खालील आरोग्य सेवा योजनांचा होणार शुभारंभ

  • e-Sushrut (HMIS System) संकेतस्थळाचे विस्तारीकरण शुभारंभ.
  • महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी प्रणालीचे (Bombay Nursing Home Act) ऑनलाईन प्रमाणपत्र वितरण शुभारंभ.
  • राज्यातील 6 जिल्ह्यांत 6 आरोग्य संस्थांमध्ये डायलिसीस युनिटचा शुभारंभ.
  • राज्यातील आरोग्य संस्थांच्या बांधकामाच्या ऑनलाईन संनियंत्रण व पाठपुरावा सॉफ्टवेअरचे उद्घाटन.
  • गर्भाशयमुख कर्करोग जनजागृती (9 ते 14 वर्षे वयोगट) अभियान – कर्करोगासंबंधी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांची प्रभावी अंमलबजावणी.
  • महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा शुभारंभ – आता कामगारांसहित सर्वसामान्य जनतेसाठीही खुली.
  • महाराष्ट्र राज्यात सीपीआर प्रशिक्षणाचे उद्घाटन व प्रात्यक्षिकांचे सादरीकरण.
  • आरोग्य सेवा निरीक्षण प्रणालीचा शुभारंभ.
  • महाराष्ट्र आरोग्य सन्मान 2025 पारितोषिक वितरण आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या आरोग्य संस्थांचा सन्मान.

०००

शेतकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात-उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि. ०६: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ कोषोत्तर प्रक्रिया पथदर्शक तथा प्रशिक्षण केंद्रात शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर द्यावा, या सुविधांचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होईल यादृष्टीने कामे करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री पवार यांनी शहरातील रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ कोषोत्तर प्रक्रिया पथदर्शक तथा प्रशिक्षण केंद्र, शारदा प्रागंण शाळा, वसंतराव पवार नाट्यगृह, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ विश्रामगृह येथील विकास कामांची पाहणी करुन संबंधित अधिकांऱ्याकडून माहिती घेतली.

यावेळी प्रादेशिक रेशीम सहायक संचालक कविता देशपांडे, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार,जिल्हा रेशीम अधिकारी संजय फुले, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, मुख्याधिकारी पंकज भुसे आदी उपस्थित होते.

वसंतराव नाट्यगृह परिसरातील नागरिकांची वर्दळ लक्षात घेता  सुरक्षिततेच्यादृष्टीने विद्युत रोहित्र आणि संरक्षक भिंतीचे कामे करावीत. परिसरातील बैठक व्यवस्था, पायऱ्या, वाहनतळ तसेच ज्येष्ठ नागरिक, लहान बालके यांचा विचार करुन फरशा बसवाव्यात.

शारदा प्रागंण शाळेचे काम करतांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या नियमांचे पालन करावे.  विद्यार्थ्यांना लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा विचार करण्यात यावा.

एमआयडीसी विश्रामगृहाच्या दर्शनी भागात विभागाचा लोगो लावावा. लाकडी साहित्याला वाळवी प्रतिबंधक कीटकनाशकाचा वापर करण्यात यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.

तालुक्यात विविध विकास कामे सुरु असून ही सार्वजनिक विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना पाहणीप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

०००

दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता प्रयत्नशील -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.०६: दिव्यांगांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पातील १ टक्के निधी राखून ठेवण्याची तरतूद करण्यात आली असून आगामी काळात दिव्यांगांना सोई-सुविधेकरीता लागणाऱ्या निधीची कमतरता पडू देणार नाही; या माध्यमातून दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता राज्यशासन प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

पंचायत समिती बारामती येथे पुणे जिल्हा परिषद अंतर्गत तालुक्यातील दिव्यांग बंधू-भगिणींना तीन चाकी इलेक्ट्रिक सायकल वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, अष्टावधानी संतुलन फाउंडेशनचे भाऊसाहेब जंझिरे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, दिव्यांग बंधू-भगिणी आज प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. दिव्यांगांना स्वावलंबनासाठी लागणारी संसाधने आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्यास ते देखील समाजाच्या मुख्य प्रवाहात आपले योगदान देवू शकतात. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात सर्व जिल्ह्याकरीता जिल्हा वार्षिक योजनेसाठी २२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी १ टक्के रक्कम दिव्यांगांकरिता खर्च करण्याचे या वर्षापासून बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने शिष्यवृत्ती सुरु करण्यासाठी, कृत्रिम अवयव, साधने विकत घेण्यासाठी आणि स्वयंरोजगार अर्थसहाय्य योजना राबविण्याकरीता प्रयत्न करण्यात येईल. राज्यातही केंद्राप्रमाणे दिव्यांगांना पदोन्नतीत आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांगाना अधिक सोई-सुविधा मिळण्याच्यादृष्टीने विधायक सूचना कराव्यात, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.

दिव्यांगांना सुलभरित्या दळणवळणाची सोय व्हावी, त्यांचे दैनंदिन जीवन सुखर करण्याकरिता अष्टावधानी संतुलन फाउंडेशनच्यावतीने १०० दिव्यांग नागरिकांना तीन चाकी इलेक्ट्रिक सायकलींचे वाटप करण्यात येत आहे. या माध्यमातून जंझिरे कुटुंबिय आपली सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग बांधवाना मदत करीत आहे, याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. दिव्यांगांनी या सायकलीचा आपल्या व्यवसायात उपयोग करुन आर्थिकदृष्टया स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करावा.

तालुक्यात विविध विकासकामे सुरु असून त्याच्या देखभाल दुरुस्तीची व्यवस्था करणे गरजेचे आहे. ही विकासकामे सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी बारामतीकरांची आहे. शहरात विविध ठिकाणी गाळे उभारण्यात आले असून त्यापैकी काही दिव्यांगांना देण्याचा विचार आहे. यातून त्यांना व्यवसाय उभारता येईल.

नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, कायद्याचे पालन न करणाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

०००

अ‍ॅड. एस. के. जैन यांचे विविध क्षेत्रातील कार्य पुण्याच्या सामाजिक विकासाला पूरक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

पुणे दि.५: समाजाचं समाजाला परत देण्याची भावना नेहमी अंगीकारणारे नामवंत ज्येष्ठ वकील एस. के. जैन यांचे कार्य पुण्याच्या सामाजिक विकासाला पूरक आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

ज्येष्ठ वकील अ‍ॅड. एस. के. जैन यांच्या अमृत महोत्सवानिमित्त शिवाजीनगर येथील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

या कार्यक्रमास केंद्रीय सहकार तथा नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च तंत्र शिक्षण मंत्री, चंद्रकांत पाटील, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, नगर विकास व सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, महाराष्ट्राचे महा अधिवक्ता बिरेंद्र सराफ, सौ. पुष्पा जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, एस. के. जैन यांनी वकिली क्षेत्रात मोठा नावलौकिक मिळविला आहे. वकिली करीत असताना त्यांनी अनेक वकील घडविले.  आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास टाकून त्यांना अधिकार आणि जबाबदाऱ्या देऊन मोठे केले आहे. त्यामुळे त्यांच्या चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. वकिलीसोबतच त्यांनी अनेक क्षेत्रात काम करत असताना विश्वस्ताची भावना कधीही सोडली नाही, आपण मालक नसून विश्वस्ताची जबाबदारी पार पाडत आहोत असे मानून, आपल्याला जी जबाबदारी दिली ती लोकाभिमुख कशी करता येईल या दृष्टीने त्यांनी काम केले. श्री जैन यांचा संपर्क व्यापक असून त्यांनी गरजूंना नेहमी मदतीची केली आहे.

याप्रसंगी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी अ‍ॅड.एस के जैन यांच्या कार्याविषयी आपले विचार व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एस के जैन यांना सन्मानपत्र देऊन गौरव  करण्यात आले.

श्री. जैन मनोगतात म्हणाले, हा सत्कार माझा नसून सर्व समाजसेवकांचा सत्कार आहे. समाजाने मला खूप दिलं आहे ते कधीही विसरण्यासारखं नाही. त्यामुळे मी सर्वांचा ऋणी आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. जैन यांच्या कार्याची चित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, विधीज्ञ, समाज बांधव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, नाविन्यतेला प्रोत्साहन देण्याकरिता राज्य शासनाच्या वतीने सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. 5 :  कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या माध्यमातून नवकल्पनांना चालना देण्यासाठी इन्यक्युबेशन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. अशा कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी भांडवल पुरविण्याच्या दृष्टीने राज्याने भारतीय लघु उद्योग विकास बँकेसोबत 100 कोटी रुपयांच्या निधीअंतर्गत निधी तयार केला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विद्यार्थ्यांनो, आपल्या प्रकल्पांपुरते मर्यादित न राहता कल्पनामधील त्रुटी शोधा, यशस्वी उद्योजकांशी संवाद साधून त्यांच्या मागणीप्रमाणे व्यवसायिक आणि कौशल्याधिष्ठित मॉडेल तयार करा, याकरिता केंद्र व राज्य शासन आपल्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ मैदान, शिवाजीनगर येथे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, सीओईपी विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र व गोवा आणि सृजन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘डीपेक्स-२०२५’ राज्यस्तरीय चलप्रतिकृती प्रदर्शनाला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उच्च तंत्र व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार सुनील कांबळे आदी उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, गेल्या दशकापासून तरुणांमधील ज्ञान, कौशल्य आणि त्यांच्यामधील नाविन्यता एकत्रित मांडण्याची संधी ‘डीपेक्स’च्या माध्यमातून मिळत आहे. या मंचावरील संकल्पना विविध प्रयोगामध्ये रूपांतरित झाल्या आहेत.

महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप राजधानी

तुमच्या मनातील कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याची संधी तंत्रज्ञानाने उपलब्ध होत आहे. आज छोटीशी कल्पना व्यवसायिक संधीमध्ये परावर्तित होत असल्याचे आपल्याला बघायला मिळते. महाराष्ट्र ही स्टार्टअप जननी आहे. तसेच स्टार्ट अप इंडियाचा अहवालानुसार देशात सर्वाधिक स्टार्टअप आणि त्यामाध्यमातून होणारी गुंतवणूक असल्यामुळे देशाची स्टार्ट अप राजधानी ही महाराष्ट्र आहे.

‘विकसित भारत -2047’ या संकल्पेच्या मुळाशी देशातील युवाशक्ती व नवोन्मेषक

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘विकसित भारत -2047’ या संकल्पेच्या मुळाशी देशातील युवाशक्ती व नवोन्मेषक होते. हीच युवाशक्ती देशाला विकासाकडे नेईल. ‘मेक इन इंडिया-मेक फॉर वर्ड’ च्या माध्यमातून इतर कुठल्याही देशाकडे नसलेले विविध उच्च प्रतीचे साहित्य आपल्या देशात तयार होत आहे. संरक्षण क्षेत्रात सुमारे ३० ते ३५ हजार कोटी रुपयांचे संरक्षण साहित्य भारत देश जगाला निर्यात करीत आहे. त्यामुळे विकसित भारताचे स्वप्न बघतांना स्वावलंबी भारत, स्वयंपूर्ण भारत आणि आत्मनिर्भर भारत अत्यंत महत्वाचा आहे. आत्मनिर्भर भारताकडे जात असताना तंत्रज्ञानयुक्त स्टार्टअप आणि त्यामाध्यमातून नाविन्यता महत्त्वाची आहे. यामुळे  देशात आज विविध यशस्वी स्टार्टअप बघायला मिळतात. प्रत्येक टाकाऊ वस्तू ही उर्जा निर्मितीचे साधन आहे, त्यामुळे  विविध नवनवीन प्रयोग,  र्स्टाट अप आणि तंत्रज्ञानाद्वारे त्यावर प्रकिया करुन ऊर्जा निर्मिती भर देण्यात आहे, यामुळे रोजगाराला चालना मिळत आहे. टाकाऊ वस्तूपासून पुनर्वापर त्यामाध्यमातून शाश्वत विकास हेच विकसित भारताचे उद्दिष्ट आहे.

स्टार्टअपच्या परिसंस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा नाविन्यतेवर भर

आज टियर 2 आणि टियर 3 शहरामधील औद्योगिक संस्था, पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी शाखेत विद्यार्थी मोठ्याप्रमाणात स्टार्टअप परिसंस्थेच्या माध्यमातून नाविन्यतेवर भर देत आहे. ते गटस्वरुपात कल्पना उदयास आणून इज ऑफ लिव्हिंग, इज ऑफ बिझिनेस तयार होतात. इज ऑफ लिव्हिंगसोबतच व्यवसायिक कल्पनेत परिवर्तन केल्यास स्वत:सोबतच अनेकांना रोजगार उपलब्ध करुन देता येते.

ऊर्जा सुरक्षिततेकडे भारताची वाटचाल

इथेनॉल, सौर उर्जेच्या माध्यमातून ऊर्जा सुरक्षिततेकडे भारताची वाटचाल सुरु आहे. सौर उर्जेकरिता लागणारे सर्व साहित्य देशात निर्माण होत आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याकरिता राज्य शासन प्रयत्नशील आहे, पुढच्या वर्षापर्यंत शेतकऱ्यांना लागणारी १६ हजार मेगावॅट वीज सोलरच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज मिळाल्यामुळे त्यांच्या पैशांची तसेच अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या शासनाच्या अनुदानातही बचत होणार आहे. यातून दरवर्षी विजेच्या दरात होणारी वाढ कमी करून नागरिकांना दिलासा देण्याच्या प्रयत्न करीत आहोत. नाविन्यतेच्या माध्यमातून स्वच्छ उर्जा, हरीत उर्जेकडे वाटचाल होत आहे.

उर्जा क्षेत्रात ‘नेट झिरो’कडे जाण्याचा शासनाचा प्रयत्न

पारंपरिक स्त्रोतातून  निर्माण होणाऱ्या वीजेमुळे मोठ्याप्रमाणात प्रदूषण होत आहे. वातावरणीय बदलामुळे होणाऱ्या परिणाम लक्षात घेऊन हरीत उर्जेद्वारे कार्बन उत्सर्जन शून्यापर्यंत आणायचे आहे.  राज्याला लागणाऱ्या विजेपैकी सन 2030 पर्यंत 52 टक्के वीज अपारंपारिक स्त्रोतून निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. हरित ऊजेच्या माध्यमातून २०४७ पर्यत ऊर्जा क्षेत्रात ‘नेट झिरो’कडे जाण्याचा प्रयत्न आहे,असेही श्री. फडणवीस म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘डीपेक्स-२०२५- प्रोजेक्ट डिरेक्टरी’चे विमोचन करण्यात आले. तसेच त्यांनी प्रत्यक्ष दालनात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रोजेक्टबाबत माहिती घेत आहेत.

सृजनचे विश्वस्त डॉ. भरत अमळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

यावेळी ‘डीपेक्स २०२५’ स्वागत समिती अध्यक्ष डॉ. प्रकाश धोका, सचिव प्रसेनजीत फडणवीस, निमंत्रक संकल्प फळदेसाई, अथर्व कुलकर्णी महाविद्यालयांचे कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

प्रभू श्रीरामांनी माणसांना जीवन जगण्याचे मूल्य दिले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. ५  :  प्रभू श्रीरामांना आपण सर्वजण ईश्वररुपी मानतो. त्यांनी देवत्वाचा वापर न करता पशु, पक्षी व वानर यांची मदत घेऊन विश्वातील मोठी आसुरी शक्ती असणाऱ्या रावणाचा नि:पात केला. सर्वसामान्य माणूस सत्यासाठी लढला तर त्याचा विजय निश्चित आहे हे प्रभु श्रीरामांनी करुन दाखविले आहे. प्रभू श्रीरामांनी खऱ्या अर्थाने माणसांना जीवन जगण्याचे मूल्य दिले असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सखी गीतरामायण व सीता स्वयंवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे पुजन केले. या प्रसंगी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार  भीमराव तापकीर, हेमंत रासने, सद्‌गुरु शंकर महाराज मठाचे अध्यक्ष डॉ. मीहिर कुलकर्णी, चित्रा देशपांडे आदी उपस्थित होते.

युगपुरुषांमध्ये  प्रभू श्रीराम यांना अनन्य साधारण महत्व आहे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, श्रीरामांचे आयुष्य हे वेगवेगळ्या स्वरुपाचे राहिले आहे. त्यांच्यामध्ये बुद्धीमत्ता, स्थिरता, संस्कार, उत्कृष्ट शासक असे अनेक गुण होते. त्यांनी घालून दिलेल्या मुल्यांवर आपण जीवन जगले पाहिजे, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

गीत रामायण हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे. रामायणातील रामचरित्रातील विविध प्रसंगांवर ग.दि. माडगूळकर यांनी रचना केल्या आहेत व त्याला तितक्याच सुमधूर चाली सुधीर फडके बाबुजींनी दिल्या आहेत. या गीतरामायणामध्ये आनंद, दुख, अश्रु व हास्य यासह विविध भावना पहायला मिळतात. रामनवमीच्या पूर्वसंध्येला पुण्यात गीतरामयणाचा कार्यक्रम होत असल्याचा आनंदही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  डॉ. मिहिर कुलकर्णी  यांनी केले तर सूत्रसंचालन सुप्रिया गोडबोले यांनी केले. या गीतरामायण कार्यक्रमास नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मेरीटाइम दिनानिमित्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून महायुद्धात बलिदान दिलेल्या नौसैनिकांना श्रद्धांजली

मुंबई, दि. ५ – राष्ट्रीय मेरीटाइम दिनानिमित्त राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज इंडियन सेलर्स होम, मस्जिद बंदर, मुंबई येथे भेट देऊन प्रथम व द्वितीय महायुद्धात बलिदान दिलेल्या नौसैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. मुख्य सचिवांनी यावेळी संपूर्ण परिसराची पाहणी करून नौसैनिकांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांचे कौतुक केले. तसेच त्यांनी समुद्री क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधून नौसैनिक व शिपिंग उद्योगाशी संबंधित विविध समस्यांविषयी जाणून घेतले.

राष्ट्रीय मेरीटाइम दिन समारंभ (केंद्रीय) समितीच्या वतीने ६२ व्या राष्ट्रीय मेरीटाइम दिनानिमित्त पुष्पचक्र अर्पण समारंभ आयोजित करण्यात आला होता. महासंचालक (शिपिंग) आणि केंद्रीय मेरी टाईम दिन समारंभ समितीचे अध्यक्ष श्याम जगन्नाथन, उप महासंचालक (शिपिंग) व समितीचे सदस्य सचिव डॉ. पी.के. राऊत आदी या समारंभास उपस्थित होते. शिपिंग क्षेत्रातील प्रतिनिधींनी यावेळी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. डॉ. राऊत यांनी यावेळी इंडियन सेलर्स होम सोसायटी व स्मृती सभागृहाविषयी माहिती दिली.

वाढवण बंदराच्या विकासासाठी महाराष्ट्र शासन सहकार्य करीत असल्याचे सांगून मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी उपस्थितांना मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या अधिपत्याखालील परिसराच्या भविष्यकालीन विकासासाठी नव्या कल्पना देण्याचे आवाहन केले. मुंबई परिसरात जहाज बांधणीसाठी सुविधा निर्माण करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने दिला आहे, या उपक्रमात समुद्री उद्योगाने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. समुद्री शिक्षणाबद्दल जनजागृती वाढवण्याच्या उपक्रमांचे कौतुक करून मुंबईत कार्यरत असलेल्या विविध विदेशी दूतावासांना समुद्री उद्योगासोबत चर्चा करण्यासाठी एका व्यासपीठावर आणण्याची त्यांनी तयारी दर्शवली.

इंडियन सेलर्स होम विषयी

इंडियन सेलर्स होम सोसायटी, मुंबई हे भारताच्या नौदलातील सागर वीरांच्या स्मरणार्थ उभारण्यात आले आहे, ज्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये आपल्या प्राणांची आहुती दिली. ही इमारत मस्जिद बंदर सायडिंग रोड आणि ठाणे स्ट्रीट यांच्या दरम्यान असलेल्या जागेवर बांधण्यात आली आहे.

या ‘होम’चा मुख्य भाग म्हणजे स्मृती सभागृह. या सभागृहाच्या भिंतींवर १२ कांस्य (ब्रॉन्झ) चे फलक लावलेले असून या फलकावर पहिल्या महायुद्धात प्राणत्याग केलेल्या भारतीय खलाशांची नावे दर्शविलेली आहेत.

या फलकांच्या वर खोदकाम केलेला एक कांस्य लेख आहे, ज्यात ‘येथे शाश्वत सन्मान आणि स्मरणार्थ २२२३ नौसैनिकांची नावे नोंदवली गेली आहेत  – रॉयल नेव्ही, रॉयल इंडियन मरीन व मर्चंट नेव्ही- जे ग्रेट वॉरमध्ये वीरमरण पावले आणि ज्यांचे समाधीस्थळ म्हणजे समुद्र आहे.’ १९१४-१९१८.

हा फलक इंग्लंडमध्ये तयार करण्यात आला असून इंपीरियल वॉर ग्रेव्ह्ज कमिशन (आताचे कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्ह्ज कमिशन) यांनी प्रदान केला आहे.

या ‘होम’चे बांधकाम नोव्हेंबर १९३० मध्ये सुरू झाले आणि १४ जानेवारी १९३१ रोजी तत्कालीन मुंबईचे राज्यपाल सर फ्रेडरिक ह्यू सायक्स यांच्या हस्ते पायाभरणी झाली.

कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्ह्ज कमिशन ने १९६२ मध्ये हॉलमध्ये एक नवीन स्मारक जोडले, जे १९३९-४५ च्या दुसऱ्या महायुद्धात समुद्रात मृत्यू पावलेल्या रॉयल इंडियन नेव्हीचे ४३८ व भारतीय मर्चंट नेव्हीचे ६,०९३ अशा एकूण ६,५३१ खलाशांचे स्मरण करते. हे स्मारक हॉलच्या मध्यभागी काच झाकलेल्या कांस्य पेटीच्या स्वरूपात आहे. यामध्ये नावांचे पुस्तक आहे, जे मार्बलच्या पायथ्यावर ठेवलेले आहे. हे पुस्तक हिंदी भाषेत मुद्रित आहे. त्यावरील समर्पणात लिहिले आहे: ‘हे पुस्तक त्या ६५०० नौसैनिकांची व मर्चंट नेव्हीतील खलाशांची नावे धारण करते, जे आपल्या मातृभूमीसाठी सेवा करताना मृत्युमुखी पडले व ज्यांचे समाधीस्थळ केवळ समुद्र आहे.’

दुसऱ्या महायुद्धात मरण पावलेल्या ६५३१ खलाशांचे स्मरण करण्यासाठी भारत सरकारने होम बिल्डिंगच्या समोर एक तीन मजली इमारत उभारली, जी ७०० खलाशांच्या निवासासाठी आहे. ही इमारत सीमन्स हॉस्टेल म्हणून ओळखली जाते. निवास भाग दोन विंग्समध्ये विभागलेला असून दोन्ही इमारती मिळून १०१५ सागरी कामगारांना निवास देण्याची क्षमता आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला श्रीरामनवमीच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 5 :- मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या आदर्शमय जीवनातून प्रेरणा घेऊन समाजात सौहार्द, सहिष्णुता आणि सत्याची मूल्ये अधिक बळकट करण्याचे आवाहन करीत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रामनवमीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, “श्रीराम नवमी हा मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या जन्माचा उत्सव असून, हा दिवस त्यांच्या आदर्श जीवनमूल्यांची आठवण करून देतो. श्रीरामांनी दाखवलेली प्रजाहितदक्षता, सत्यनिष्ठा आणि निःस्वार्थ सेवा ही आजही आपल्यासाठी प्रेरणादायी ठरतात. त्यांच्या जीवनातून आपण एकता, शांती आणि समरसतेची शिकवण घेणे आवश्यक आहे. श्रीरामनवमीचा उत्सव सर्वांनी शांततेत, उत्साहात, सौहार्दपूर्ण वातावरणात आणि सलोख्याने साजरा करावा,” असे आवाहन करीत उपमुख्यमंत्री अजित पवार केले प्रभू श्रीरामांच्या चरणी वंदन केले आहे.

महसूलविषयक सुधारित कार्यपद्धतींची अंमलबजावणी १५ ऑगस्टपासून- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. 5: महसूल विभागातील विविध बाबी, रचना, कार्यपद्धती, महसूली कायदे आदींमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विविध अभ्यासगट स्थापन करण्यात येणार आहेत. त्यांच्या शिफारशींवर चर्चा करुन त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी येत्या 15 ऑगस्टपासून करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज येथे म्हणाले. जनतेचे सेवक आहोत अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन अधिकाऱ्यांनी काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

महसूल विभागाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने येथील हॉटेल ऑर्चिड येथे आयोजित दोन दिवसीय महसूल क्षेत्रीय अधिकारी कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी महसूल राज्यमंत्री योगेश कदम, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे, नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, राज्याचे जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख डॉ. सुहास दिवसे, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे आदी उपस्थित होते.

महसूल विभाग हा शासनाचा चेहरा आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नागरिकांशी सर्वाधिक जोडलेला गेला असल्याने या विभागाच्या कार्यक्षमतेवर, पारदर्शकतेवर आणि उत्तरदायित्वावर शासनाचे मूल्यमापन केले जाते.

महसूल विभाग आपल्या अतिशय प्राचीन अशा राज्य पद्धतीमध्ये देखील अत्यंत महत्त्वाचा मानलेला गेला आहे. पावणेदोन हजार वर्षापूर्वीच्या चाणक्याचे अर्थशास्त्रात या विभागाची रचना आणि महत्त्व पाहायला मिळते. छत्रपती शिवरायांनी देखील महसूलची चांगल्या प्रकारची रचना केली होती. आज्ञापत्राच्या माध्यमातून महसूल जमा करणे, त्याचे व्यवस्थापन, जमिनीचे अभिलेख जतन करणे या संदर्भात अतिशय सुंदर अशा आज्ञावली त्यांनी तयार केल्या होत्या. नंतरच्या काळामध्ये राज्यकर्त्या इंग्रजांनी एक मोठी जमीन महसूलाची पद्धत उभी केली. ज्यातून आपली महसूल पद्धती निर्माण झालेली आहे. अर्थात आपली पारंपरिक पद्धतीतील अनेक बाबींचा समावेशही यात दिसून येतो.

शासनामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांचा जमिनीवर काम करण्याचा अनुभव एकत्रितपणे मांडण्याचे काम केले तर अधिक चांगल्या प्रकारे काम होऊ शकते. कारण हे करताना आपल्याला समस्या आणि त्यावरील उत्तरे देखील माहिती असतात. या कार्यशाळेत विभागाकडून सादर करण्यात आलेल्या विविध नियमावली, स्मार्ट डॉक्युमेंट, डॅशबोर्ड, संकेतस्थळे, त्यावर नवीन प्रणालींवर हे दिसून येते. हे तयार केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. या रुपाने व्यवसाय सुलभीकरण अर्थात ‘ईज ऑफ डूईंग बिझनेस’ आणि जीवनशैलीतील सुलभीकरण (ईज ऑफ लिव्हींग) या दोन्ही गोष्टींसाठी निश्चित काय कराचये यासाठीची प्रमाणीत अशी गीता तयार करण्याचे काम मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब करुन विभागाने केले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शंभर दिवसाचा कार्यक्रम सर्व विभागांनी चांगल्या प्रकारे मनावर घेतला. पुढील पाच वर्षे आपल्याला कुठल्या दिशेला काम करायचा आहे त्याचा वास्तुपाठ किंवा त्याची मुहूर्त वेळ करण्याकरता शंभर दिवसाचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला होता. पण ज्या कार्यक्षमतेने आणि ज्या गांभीर्याने महसूल विभाग किंवा अन्य विभाग असेल यांनी ज्या प्रकारे तो हातामध्ये घेतला ते पाहता आपले लक्ष्यांक पूर्ण करण्यात हे सर्व विभाग यशस्वी ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

नागरिकांना माहितीसाठी अर्जच करण्याची गरज लागणार नाही अशी व्यवस्था करा

विभागाने आपले संकेतस्थळ अद्ययावत केले आहे. ते नागरीक स्नेही तसेच त्याच्यावर स्वयंप्रेरणेने करावयाचे प्रकटीकरण असले पाहिजे. माहितीच्या अधिकारात नागरिेकांना माहिती मागण्याची गरजच पडू नये यासाठी पुढील चार सहा महिन्यात जेवढी माहिती मागितली जाते ती सर्व या संकेतस्थळावर असेल असा प्रयत्न स्वयंस्फूर्तीने करावा, असेही निर्देश त्यांनी दिले. नव्याने तयार केलेल्या संकेतस्थळाच्या सुरक्षेवर भर दिला असेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कार्यालयातील स्वच्छतेच्या दृष्टीनेही काम होत आहे. जुने अभिलेख निंदणीकरण करुन त्यापैकी अनावश्यक असलेले नष्टीकरण करणे तर आवश्यक अभिलेख चांगल्या प्रकारे जतन करायचे होते. जुने फर्निचर, जुनी वाहने, जुन्या पडलेल्या वस्तू यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लाऊन कार्यालये चांगली दिसतील अशी कामे व्हावीत. याबाबत ज्यांचे काम राहिले असेल त्यांनी ते पूर्ण करावे, अशा सूचना श्री. फडणवीस यांनी दिल्या.

येणाऱ्या लोकांना पिण्याचे पाणी, शौचालये, महिलांसाठी शौचालये, प्रतिक्षालय, सूचना फलक आदी सुविधांसाठी काम सुरू झाले आहे. काही कार्यालयात अतिशय चांगले काम होत असल्याचे दिसून येत आहे. कार्यालयातील वातावरण व सुविधा चांगल्या असतील तर आपल्या कामाच्या आशा, अपेक्षा तसेच चिंतांसह येणाऱ्या नागरिकांना योग्य ठिकाणी आल्यासारखे वाटते. तक्रार निवारण व्यवस्था असली पाहिजे. भेटीच्या वेळा निश्चित केलेल्या असल्या पाहिजेत व त्यावेळी उपलब्ध असले पाहिजे. आपले सरकार पोर्टलवर आलेल्या प्रलंबित प्रकरणांवरील सूचनांवर, लोकशाही दिनाबाबत योग्य काम व्हावे, असेही ते म्हणाले.

समस्यांवरील उपाययोजना समजण्यासाठी क्षेत्रीय भेटी द्याव्यात

प्रत्यक्ष जमिनीवर लोकांमध्ये गेल्याशिवाय, समस्येचा थेट सामना केल्याशिवाय, त्याची उपाययोजना समजत नाही, जाणीव होत नाही तसेच आपल्या कर्तव्याचा बोध होत नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्यातून दोन वेळा क्षेत्रीय भेटी द्याव्यात. वरिष्ठ अधिकारी जेव्हा प्रत्यक्ष भेटी देतात तेव्हा कामांमध्ये काही अपारदर्शकता असल्यास ती दूर होण्यासह उत्तरदायित्व निर्माण होते.

गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळावे यासाठी अनेक जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष तयार केला आहे. त्यातून गुंतवणूकदारांना जमिनीची माहिती चांगल्या प्रकारे मिळते. या व्यवस्थेच्या आणि संकेतस्थळांच्या फायद्याचे उदाहरण म्हणजे कृषी उपकेंद्रांच्या जवळची 90 टक्के शासनाची जमीन केवळ 9 महिन्यात जमीन ताब्यात घेतली. केंद्र शासनाच्या कुसुम योजनेंतर्गत या जमिनीवर सौर प्रकल्प स्थापन करुन 16 हजार मेगावॅट वीज सौर कृषी वाहिनीद्वारे शेतीपंपाला मिळण्याची व्यवस्था केली आहे. आतापर्यंत केवळ महाराष्ट्राने हे साध्य केले असून या योजनेंतर्गत केंद्र शासनाकडे 4 हजार कोटी रुपयांची मागणी सादर केली आहे. यामुळे पुढील पाच वर्षात अजून विजेचे दर कमी करत आहोत. दोन हजार पेक्षा जास्त ठिकाणी नऊ महिन्यात जागा मिळवणे हे नवीन तंत्रज्ञानामुळेच शक्य झाले आहे.

उद्योगांशी समन्वय साधण्यासाठी समन्व्य अधिकारी नेमावा

मोठ्या उद्योगातील रिलेशनशीप मॅनेजरप्रमाणे काम करणारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक समन्वय अधिकारी असावा. जेणेकरुन आपल्या जिल्ह्यात उद्योग विभाग आणि उद्योगांमध्ये झालेल्या सामंजस्य करारांविषयी माहिती हा समन्वय अधिकारी घेईल आणि त्यातील अडचणी जाणून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करेल. त्याचा फायदा सामंजस्य कराराची प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी होऊ शकेल. गुंतवणुकीला चालना देण्यासाठी एक समर्पित व्यवस्था करावी लागेल, असेही ते म्हणाले.

राज्यातील 12 हजार 436 कार्यालयात हा 100 दिवसांचा कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात कोकण विभागातील 2 हजार 427 कार्यालये, छत्रपती संभाजीनगर 2 हजार 379, पुणे 1 हजार 984, नागपूर 1 हजार 945, नाशिक 1 हजार 925 तर अमरावती विभागातील 1 हजार 776 कार्यालयांचा 100 दिवसात चेहरा मोहरा बदलण्याचे काम सुरू आहे. ज्यांचे काम बाकी राहिल त्यांना सुधारणा करण्यासाठी संधी दिली जाईल. 1 मे पर्यंत हा संपूर्ण कार्यक्रम संपल्यानंतर या कार्यालयांचे क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियामार्फत त्रयस्त मूल्यमापन होणार आहे. त्यानुसार सर्वोत्तम कामगिरी करणारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच विभागातील कनिष्ट स्तरावरील चांगले काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

डिसेंबर २०२५ पर्यंत सर्व कार्यालयांचे सौर ऊर्जीकरण करण्यात यावे, असे केंद्र शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार आपली सर्व कार्यालये सौर ऊर्जीकरण करावयाची आहेत. त्यासाठी आवश्यक तेथे जिल्हा नियोजन समितीकडील निधी, विविध विभागांना यासाठी राखून ठेवलेला निधी वापरण्यात यावा. प्रत्येक जिल्ह्यात किमान २ पर्यटन स्थळे तेथे येणाऱ्यांची संख्या, महत्त्व लक्षात घेत निवडून त्या ठिकाणी विविध सुविधा निर्माण करणे, त्या माध्यमातून पुढील काळात पर्यटन वाढविण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. याबाबतही सर्वोत्तम काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात करण्यात येईल, असेही ते म्हणाले. त्यामुळे पर्यटनवृद्धीसाठी अशा प्रकारचा कार्यक्रम पुढील काळात मोठ्या प्रमाणात राबविता येईल.

आताच्या विकासाच्या प्रक्रियेत भूसंपादन ही महत्त्वाची बाब असून ही प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि अचूक करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. भूसंपादनात जमिनीचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी तंत्रज्ञान, उपग्रह, ड्रोन, उपग्रहीय छायाचित्रांचा वापर करावा. हे करत असताना केंद्र शासनाच्या पीएम गतीशक्ती पोर्टलचा प्रभावी वापर करावा. भूसंपादन प्रकरणांचा आढावा विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दरमहा घेतला पाहिजे. यामुळे मोबदला निश्चित करताना अकारण चुकीच्या बाबी होणार नाहीत आणि भूसंपादन प्रकारांतील गैरप्रकार रोखले जातील.

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात येणार

महसूल विभागाशी निगडित विविध बाबींचा अभ्यास आणि शिफारशी करण्यासाठी सहा विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सहा अभ्यासगट स्थापन करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यासगट जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समित्यांच्या संदर्भात सुधारणा सुचवेल. अमरावती विभागीय आयुक्तांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी प्रमुख कामगिरी निर्देशांक (केपीआय) तयार करावेत. विभागीय आयुक्त नागपूर यांनी विभागातील उत्कृष्ट कामगिरींचे (बेस्ट प्रॅक्टिसेस) संकलन करून त्यांचे मूल्यमापन करावे व त्यांचे प्रमाणीकरण करावे. जेणेकरुन त्यातील चांगल्या गोष्टी संपूर्ण राज्यभरात राबविता येतील.

इज ऑफ लिव्हिंग बाबत शिफारशीसाठी विभागीय आयुक्त पुणे यांचा गट करण्यात येईल. ज्यामध्ये नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी कसे प्रयत्न करता येतील. महसूली कायदे, नियम आणि प्रक्रियेत आवश्यक बदल सुचविण्याचे काम या गटाने करावे. विभागीय आयुक्त कोकण यांनी जिल्हा नियोजन समितीला अधिक परिणामकारक कसे करता येईल. त्याबाबतच्या आदर्श कार्यपद्धती आदी शिफारसी कराव्यात. नाशिक विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यासगटाने जिल्हाधिकारी कार्यालयाची रचनेचा अभ्यास करावा तसेच संस्था बांधणी आणिय क्षमता वृद्धी, भरती प्रक्रिया सुटसुटीत करणे, अधिकारांचे विकेंद्रीकारण आदी बाबत अभ्यासक्रम कराव्यात. यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच नागरिक केंद्रित २ सेवांमध्ये सुलभता कशी आणता येईल असे काम प्रत्येक विभागीय आयुक्तांनी करायचे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महसूलविषयक सुधारित कार्यपद्धतींची अंमलबजावणी 15 ऑगस्टपासून

नागरिकांकडून मागवायची कागदपत्रे कमीत कमी करणे, सर्वत्र कार्यपद्धती समान असली पाहिजे आणि संपूर्ण प्रक्रिया डिजिटाईज्ड तसेच अर्ज केल्यापासूनची उत्तर मिळेपर्यंत सर्व प्रकिया स्वयंचलित अर्थात ऑटोमेटेड करून हे काम पूर्ण करायचे आहे. या संदर्भातील सर्व अभ्यासगटांनी आपला अहवाल 30 जूनपर्यंत सादर करावा. जेणेकरुन त्यावर चर्चा करून त्यातील आवश्यक शिफारशी 15 ऑगस्टपासून लागू करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

काम करताना सद्हेतूने चुका झाल्या तरी निश्चितपणे पाठिशी उभे राहू. परंतु, जाणीवपूर्वक चुकीचे काम करणाऱ्यांना पाठिशी घातले जाणार नाही. सामान्य माणसाला सोप्या शब्दात जमिनीबाबत शिक्षित करण्यासाठी महसूल विभागाने आपल्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर एक चॅनेल काढले पाहिजे. त्यावर आठ अ, सात बारा, फेरफार आदींबाबत माहिती मिळण्यासाठी छोटे छोटे व्हिडीओ, शॉर्ट्स टाकावेत. अधिकाधिक तंत्रज्ञान स्वीकारून त्यावर आधारित बेस्ट प्रॅक्टिसेसचा अवलंब करावा. महसूल विभागाने एखादी हॅकेथॉन करावी. ज्यातून चांगल्या उपाययोजना मिळतात. जनतेचे सेवक म्हणून अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन काम करावे, असेही ते म्हणाले.

महसूल राज्यमंत्री म्हणाले, महसूल विभाग हा महाराष्ट्र शासनाच्या पाठीचा कणा आहे. सर्वाधिक ताण तसेच जबाबदारी असलेला हा विभाग आहे. महसूल विभागाचे अधिकारी अनेक वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. प्रशासन आणि शासन एकत्र आल्यावर आपण आपल्या विभागाचा विकास करू शकतो. आपल्यावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी वरीष्ठ ते कनिष्ट स्तरापर्यंत तंत्रज्ञानाचा, कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करावा, असेही ते म्हणाले.

राजेश कुमार म्हणाले, या कार्यशाळेत 114 अधिकारी सहभागी झाले. त्यापैकी अनेकांनी त्यांच्या स्तरावर राबविलेल्या उपक्रमांचे, प्रणालींचे सादरीकरण केले. कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून विभागाची नियम पुस्तिका तयार करण्यात आली असून त्यात आवश्यक ती सुधारणा करण्यात येणार आहे. राज्यात 4 हजार 500 च्या वर तलाठी कार्यालयांचे बांधकाम सध्या सुरू आहे. पुढील पीक पाहणी संपूर्णत: उपग्रह छायाचित्रांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आभार डॉ. पुलकुंडवार यांनी मानले.कार्यक्रमात महसूल विभागाच्या महसूल अधिकारी नियमपुस्तिकेचे प्रकाशन तसेच विभागाच्या विविध उपक्रमांचे, संगणक प्रणालींचे उद्घाटन करण्यात आले.कार्यशाळेस राज्यातील जिल्हाधिकारी, सहायक जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री संत बाळूमामांचे दर्शन

कोल्हापूर, दि. ५ (जिमाका): जिल्ह्यातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र आदमापूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री संत बाळूमामांचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी मंदिर परिसरातील विविध विकासकामांची पाहणी केली आणि देवस्थानच्या विश्वस्त मंडळाशी संवाद साधला.

या वेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार जयश्री जाधव, सरपंच विजयराव गुरव, प्रांताधिकारी हरेश सुळ, देवस्थानचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष रागिणी खडके यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री संत बाळू मामा देवालयाच्या वतीने विकास आराखडा संदर्भात निवेदन देण्यात आले. दर्शनानंतर उपमुख्यमंत्र्यांनी संत बाळूमामांच्या कार्याचा गौरव करत या धार्मिक स्थळाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले.

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कागल बिद्री श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना कॉलेज ग्राउंड येथे हेलिकॉप्टरने आगमन झाले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके, जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार सुजित मिंचेकर, रवींद्र माने, वीरेंद्र मंडलिक, आजरा -भुदरगड उपविभागीय अधिकारी  हरेश सूळ, राधानगरी कागल उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, कागल तहसीलदार अमरदीप वाकडे उपस्थित होते.

ताज्या बातम्या

विधानसभा प्रश्नोत्तरे

0
पीएमजीपी इमारतींच्या पुनर्विकासाबाबत एक महिन्याच्या आत बैठक - मंत्री शंभूराज देसाई मुंबई, दि. ७: पीएमजीपी (प्रधानमंत्री गृह प्रकल्प) योजनेतील इमारतींच्या पुनर्विकासाबाबत येत्या एक महिन्याच्या आत...

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
बांधकामापूर्वी रक्कम अदा केल्याप्रकरणी शाखा अभियंता आणि  कार्यकारी अभियंत्याचे निलंबन - ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे मुंबई, दि. ७ : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मौजे लासूर येथील...

पंढरपूरची वारी जगातील अद्भुत परंपरा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
मुंबई, दि.७ :  राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आषाढी एकादशी निमित्त चेंबूर येथील श्री शृंगेरी शंकर मठ शारदा मंदिराला भेट देऊन मंदिरातर्फे रविवारी (दि. 6...

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...