बुधवार, जुलै 9, 2025
Home Blog Page 203

‘क्रिएटिव्ह एंटरटेनमेंट इकॉनॉमी’चे नेतृत्व भारत करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दृढ विश्वास

मुंबई, दि. ११ :- मुंबईत १ ते ४ मे दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट ‘वेव्हज २०२५’ च्या निमित्ताने क्रिएटिव्ह एंटरटेनमेंट क्षेत्रातील जगातील सर्वात मोठा इव्हेंट होणार आहे. जागतिक दर्जाच्या या परिषद आयोजनाचा मान महाराष्ट्राला मिळाला असून यामुळे जगातील ‘क्रिएटिव्ह एंटरटेनमेंट’ क्षेत्र मुंबईकडे आकर्षित होणार आहे. यामुळे भविष्यात ‘क्रिएटिव्ह एंटरटेनमेंट इकॉनॉमी’चे नेतृत्व भारत करेल, असा दृढ विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

‘वेव्हज २०२५’च्या निमित्ताने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ कन्व्हेंशन सेंटर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्य सचिव सुजाता सौनिक तसेच केंद्रीय सचिव उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने मुंबईमध्ये ऑडीओ व्हिज्युअल एंटरटेंटमेंट समिट (वेव्हज) २०२५ या मनोरंजन क्षेत्रातील जागतिक परिषदेचे आयोजन १ ते ४ मे २०२५ दरम्यान ‘जिओ कन्व्हेक्शन सेंटर’ येथे होणार आहे. जगाला भारताच्या मनोरंजन विश्वातील कला गुण, सृजनशीलता दाखविण्याची संधी आहे. या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य करेल. जगाला भारताची नवी ओळख करून देण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी संकल्पना आहे. ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी या परिषदेच्या आयोजनाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे.

करमणूक क्षेत्राची अर्थव्यवस्था अतिशय जलदगतीने विकसित होत आहे. यात भारताने देखील अग्रेसर असले पाहिजे ही भूमिका आहे. ‘वेव्हज २०२५’च्या निमित्ताने शंभर पेक्षा अधिक देश भारतात सहभागी होणार आहेत. पाच हजार पेक्षा अधिक सहभागींची नोंद होणार असून ही परिषद दरवर्षी मुंबईत होणार आहे. त्यामुळे मुंबईचे महत्व जागतिक पातळीवर वाढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण विभागाची मालाडला २४० एकर जागा आहे. या जागेवर जागतिक दर्जाच्या एंटरटेनमेंट हबची व्यवस्था उभी करण्यात येणार आहे. त्यामुळे जगातील करमणूक क्षेत्रातील नामवंत मुंबईकडे आकर्षित होतील. त्याचबरोबर आयआयसीटी म्हणजे इंडियन इंस्टिट्यूट ऑफ क्रिएटीव्ह टेक्नॉलॉजी नावाची संस्था मुंबईला दिली आहे. ही महत्त्वाची संस्था मुंबईत असल्याने या क्षेत्रात मुंबई जगाच्या एक पाऊल पुढे असणार आहे. करमणूक क्षेत्राची मुंबई ही जगाची राजधानी असेल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी आयआयसीटीबरोबर सामंजस्य करार करण्यात आला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, गोंदिया बल्लारशाह या रेल्वे मार्गिकाचे दुहेरीकरण करण्यासाठी ४,८१९ कोटी रूपये केंद्र शासनाने दिले आहे. या दुहेरीकरण प्रकल्पामुळे विदर्भाचा खूप मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोबर छत्तीसगड, तेलंगणा आणि मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश राज्यांबरोबर व्यापार-व्यवहार वाढणार आहे. तसेच राज्यात सर्व प्रकारच्या प्रवासासाठी एक कार्ड प्रणाली लागू करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

0000

संजय ओरके/विसंअ/

टंचाई सदृश्य गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी आराखडा करा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

सातारा दि. 11: यावर्षी चांगला पाऊस झाला असला तरी महाबळेश्वर, वाई व खंडाळा तालुक्यात संभाव्य टंचाई भासू शकते. याचा विचार करुन तालुकास्तरीय प्रशासनाने टंचाई आराखडा तयार करावा. टंचाई सदृश्य गावांमध्ये टँकरच्या माध्यमातून पिण्याचा पुरवठा करुन पाणी कमी पडून देऊ नका, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिले.

वाईच्या प्रशासकीय इमारतीमध्ये वाई, महाबळेश्वर व खंडाळा तालुक्यातील पाणीटंचाई परिस्थिती व प्रशासकीय कामकाज आढावा बैठक मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील  यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सोनाली मेटकरी, महाबळेश्वर तहसीलदार तेजस्विनी पाटील, खंडाळा तहसीलदार अजित पाटील यांच्यासह वाई, खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील गट विकास अधिकारी, पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी तसेच आदी कार्यान्वयन यंत्रणाच्या प्रमुखांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त प्रतिमेला पुष्पहार घालून  मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी अभिवादन केले. वाई, महाबळेश्वर, खंडाळा तालुक्यात तीव्र टंचाई भासणार नाही, असे सांगून मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील म्हणाले, गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला परंतु महाबळेश्वरला नेहमीपेक्षा कमी झाला. एकूणच उन्हाळ्याच्या वाढलेल्या तीव्रतेमुळे येथील तापमान मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आहे. उन्हाळच्या तीव्रतेमुळे पाण्याच्या समस्या निर्माण होतात.  विहिरीतील पाण्याची पातळी घटते व पाण्याचा उपसाही अधिक होतो. शेतीला अधिकचे पाणी द्यायला लागते. बाष्पीभवनामुळे व इतर वापरामुळे धरणांमधल्या पाण्याची पातळीही खाली जात असते. काही गावे टंचाईमध्ये येण्याची शक्यता असणाऱ्या गावांवर लक्ष ठेवून आणि त्या गावांना लागणाऱ्या उपाययोजना कराव्यात. या गावांची जर टँकरची मागणी असेल तर स्थळ पाहणी करून या गावांना टँकरने पाणी पुरवठा करून इतर उपाययोजना कराव्यात. तसेच पाणी पुरवठा व जल जीवन मिशनची प्रगती पथावर असणारी कामे टंचाईपूर्वी पूर्ण करावीत, अशा सूचनाही मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांनी अपुऱ्या पाणी पुरवठा योजनांबरोबर धोम डावा व उजवा कालव्याच्या पाण्याची आवर्तने, जललक्ष्मी, कवठेकेंजळ योजनेचा आढावा घेतला.  अपूर्ण कामे असलेल्या ठिकाणी कंत्राटदारांची बैठक घेऊन कामे वेळेत पूर्ण करा.गावांमध्ये करण्यात येणाऱ्या विकास कामांवर स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष ठेवावे. वाई, पाचगणी, महाबळेश्वर हा पर्यटनाचा भाग असल्याने  या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक  येत असतात त्यामुळे येथील विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी.  विद्युत जनित्रांच्या चोरीबरोबर इतर चोऱ्यांवर आळा बसवण्यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंग वारंवार करावे. त्याच बरोबर टंचाईच्या काळात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये . तसेच या काळात कोणत्याही परिस्थिती मोबाईल चालू असले पाहिजेत, अशा सूचना  यांनी बैठकीत केल्या.

यावेळी 100 दिवस कृती आरोखड्यानुसार महसूल विभागाने केलेल्या कामांचा आढावा घेऊन लक्ष्मीयोजना, गोपीनाथ मुंढे अपघात योजना, संजय गांधी निराधार योजना, अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेच्या कातकरी समाजातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे व दाखल्यांचे वाटप मदत व पुनर्वसन मंत्री  श्री.पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती व्हावी यासाठी कृषी विभागाने तयार केलेल्या क्युआर कोड ॲपचे अनावरणही मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले.

या बैठकील विविध गावाचे सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.

गोंदिया-बल्हारशाह रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, ₹४,८१९ कोटींचा प्रकल्प मंजूर

मुंबई, दि. ११ : विदर्भातील गोंदिया ते बल्हारशाह या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी ४,८१९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील रेल्वे जाळे अधिक मजबूत होणार असून मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व आंध्र प्रदेशाशी व्यापार-व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे.

जिओ कन्व्हेशन सेंटर, बीकेसी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची आज संयुक्त पत्रकार परिषद झाली.

महाराष्ट्रात रेल्वे विकासासाठी विक्रमी निधी देण्यात आला असून याद्वारे १३२ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचाही समावेश आहे. रेल्वेच्या पायाभूत विकासासाठी एकूण १.७३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केंद्र शासनाकडून करण्यात येत आहे. यावर्षी रेल्वे बजेटमधून महाराष्ट्राला २३,७०० कोटी रुपये प्राप्त झाले असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले..

रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून लवकरच छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सुरू होणार आहे. यामध्ये महाराजांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाचे किल्ले, सांस्कृतिक स्थळे यांचा समावेश असलेला १० दिवसांचा टूर आयोजित केला जाणार आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यास मदत होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

0000

संजय ओरके/विसंअ/

 

ऑरेंज गेट – मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगद्याच्या कामाला गती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ११ : मुंबईतील वाढत्या वाहतूक समस्यांवर ठोस उपाययोजना म्हणून पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्यक्रम देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यान नागरी रस्ता बोगदा प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस आवश्यक त्या सर्व परवानग्या आणि पूरक उपाययोजना करण्यात येत आहे. सध्या प्रारंभिक कामे प्रगतीपथावर आहेत. या प्रकल्पास अधिक गती देण्यासाठी कालबद्ध नियोजन करावे,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून प्रकल्प वेळेत पूर्ण करावा, असेही त्यांनी यावेळी निर्देश दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पी. डी’मेलो रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पूर्व मुक्तमार्ग व अटल सेतूसोबत अखंड जोडणी निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. सध्या प्रारंभिक कामे प्रगतीपथावर असून टनेल बोरिंग मशीनचे कार्य, जमीन हस्तांतरण व पाइल फाउंडेशनची कामे वेगाने सुरू आहेत. वाहतूक विभागासोबत सातत्याने समन्वय ठेवून सुधारित तांत्रिक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. एस. व्ही. पटेल रस्ता व मरीन ड्राईव्ह येथे आवश्यक त्या सुधारणा आणि विस्तारिकरणाची कामे नियोजनानुसार करण्यात यावीत.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. याशिवाय प्रदूषणाच्या पातळीत घट होऊन वाहतूक व्यवस्थेला शिस्तबद्ध दिशा मिळेल. दक्षिण मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत नवा आयाम देणारा आणि आर्थिक तसेच भौगोलिक दृष्टीने शहराच्या विकासाला वेग देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.  हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर मुंबईतील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होण्याबरोबर प्रवाशांच्या वेळ आणि खर्चात बचत होईल. हा प्रकल्प डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण  करण्याचे नियोजन करावे असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

0000

शैलजा पाटील/विसंअ/

‘ग्रंथ महोत्सव’चे रुपांतर आनंदसोहळ्यात व्हावे – पालकमंत्री संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर, दि. 11 (जिमाका): पुस्तक वाचनाचा फायदा माणसाला जीवनभरात नक्की होत असतो. समाजमन घडविण्या-या ग्रंथाच्या या महोत्सवाचे रुपांतर आनंद सोहळ्यात व्हावे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 7 ते 14 एप्रिल दरम्यान भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त विद्यापीठात पहिल्यांदाच 11 ते 14 एप्रिल दरम्यान इतिहास वस्तू संग्रहालयाच्या हिरवळीवर उभारलेल्या भव्य मंडपात ग्रंथ महोत्सव घेण्यात येत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र्याच्या हस्ते शुक्रवारी (दि.11) करण्यात आले. कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्र-कुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.भारत खंदारे, डॉ.योगिता पाटिल, ज्ञानस्त्रोत केंद्र संचालक डॉ.वैशाली खापर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच नंदकुमार घोडेले, राजेंद्र जंजाळ, अशोक पटवर्धन यांची ही मंचावर उपस्थिती होती. उद्घाटन प्रसंगीश्री.शिरसाट म्हणाले, विद्यापीठात पहिल्यांदाच मोठया प्रमाणावर ग्रंथ महोत्सव होत आहे. आजकाल वाचन संस्कृती लोप पावत असून  या प्रदर्शनात आलेल्या  प्रत्येकाने किमान एक पुस्तक विकत घेऊन वाचन करावे.

महोत्सवात देशभरातून 20 नामांकित प्रकाशक सहभागी झाल्याचे प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे यांनी प्रास्ताविकात सांगितले. प्रा.प्रराग हासे यांनी सूत्रसंचालन तर कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी, रोजदांरी कर्मचारी, विद्यार्थी व वाचक मोठया संख्येने उपस्थित होते.इतिहास वस्तू संग्रहालयच्या हिरवळीवर 14 एप्रिलपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या दरम्यान ग्रंथ प्रदर्शन व विक्री सुरु राहणार आहे.

वसतिगृहासाठी २५ कोटी देऊ : पालकमंत्री

विद्यापीठात आल्याचा मला मनस्वी आनंद असून वसतीगृहासाठी २५ कोटींचा निधी सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात येईल, असे आश्वासन श्री.शिरसाट यांनी दिले. विद्यापीठास आवश्यक ते सहकार्य राज्य शासनाकडून करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

‘नॅशनल बुक ट्रस्ट’ च्या वतीने पुढील वर्षी राष्ट्रीय दर्जाचे पुस्तक प्रदर्शन घेऊ, असे कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी अध्यक्षीय समारोपात घोषित केले.

 वीस प्रकाशंकाचा सहभाग

या ग्रंथ महोत्सवात देशभरातून २० प्रकाशक सहभागी झाले. यामध्ये ऑक्सफर्ड हाऊस, वायकिंग बुक, बुक एन्क्लेव्ह, अ‍ॅपेक्स पब्लिकेशन (सर्व जयपूर), करंट पब्लिकेशन (आग्रा), युनिव्हर्सल पब्लिक सिंग, एन.एम मेडिकल बुक्स, वक्रतुंड बुक्स, कवडवाल बुक्स, न्य एस इंटरनॅशनल (मबई), प्रशांत बुक्स, विज्ञान बुक्स राजकमल, आहुजा, टेक्निस् बुक्स (नवी दिल्ली) सुमन बुक्स, कैलास पब्लिकेशन (छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे.

अभ्युदयनगर पुनर्विकासात किमान ६२० चौ.फूटाची सदनिका; निविदा प्रक्रियेला गती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ११ : मुंबईतील अभुदयनगर येथील म्हाडा वसाहतींच्या पुनर्वसन सदनिकेचे चटई क्षेत्र किमान ६२० चौ.फूट प्रमाणे करुन नव्याने निविदा काढण्यात याव्यात व ही निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

अभ्युदयनगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार प्रविण दरेकर, अजय चौधरी, माजी आमदार बाळा नांदगावकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यासह अभुदयनगर रहिवासी फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

अभुदयनगर येथील म्हाडाच्या वसाहतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी यापूर्वी तीन वेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. निविदेमध्ये पुनर्वसन सदनिकेचे चटई क्षेत्रफळ 635 चौरस फूट असण्याबद्दल प्रमुख अट होती. मात्र, विकासकाकडून ही अट व्यवहार्य नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या निविदांना प्रतिसाद मिळत नव्हता. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी निविदेमध्ये पुनर्वसन सदनिकेचे चटई क्षेत्र 635 चौ.फूट ऐवजी किमान 620 चौ.फूट चटई क्षेत्र ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच निविदेमध्ये 620 चौ.फूटपेक्षा जास्त क्षेत्रफळ देणाऱ्या विकासकाचा विचार पुनर्विकासासाठी करण्याचे निर्देश दिले. या निर्णयास अभ्युदयनगर फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी अनुकुलता दाखविली.

या प्रकल्पासाठी पुनर्विकास विनियम 33(5) नुसार लागू असलेल्या 3 चटई क्षेत्र निर्देशांक हा अधिमूल्याच्या मोबदल्यात गृहसाठ्याच्या स्वरुपात वितरित करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले. पुनर्विकासादरम्यान रहिवाश्यांना देण्यात येणाऱ्या 20 हजार रुपये घरभाड्यामध्ये वाढ करण्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

म्हाडाचे उपाध्यक्ष श्री. जयस्वाल यांनी या प्रकल्पातील आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या निर्देशानुसार, पुनर्वसन सदनिकेचे क्षेत्रफळ 620 चौ. फू. नुसार तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल, असे सांगितले.

श्री. दरेकर, श्री. चौधरी व श्री. नांदगावकर यांनी अभ्युदयनगर पुनर्विकास हा एक दिशादर्शक प्रकल्प होईल, असे सांगून रहिवाशांना पुनर्विकासादरम्यान देण्यात येणारे घरभाडे वाढवून देण्याच्या मागणीसह विविध मागण्या केल्या.

अभ्युदयनगर फेडरेशनचे तुकाराम रासम, दिलीप शिंदे, निखिल दिक्षीत यांच्यासह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

 

 

तारळी धरणावरील उपसासिंचन योजनांची अपूर्ण कामे मे अखरे पूर्ण करावीत – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि. 11 : तारळी धरणावरील ज्या उपसा सिंचन योजनांची कामे अपूर्ण आहेत ती कामे येत्या मे महिन्यापर्यंत पूर्ण करावीत. तसेच ज्या उपसासिंचन योजना पूर्ण कायान्वीत आहेत परंतु तेथील ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्या आहेत, अशा ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावेत व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार उपसासिंचन योजनेतून शेतीला पाणी द्यावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री. देसाई यांनी तारळी धरणावरील उपसा सिंचन व मोरणा (गुरेघर) धरणांतर्गत सुरु असलेल्या बंदीस्त पाईपालईन कामांचा आढावा घेतला. या प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जयंत शिंदे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोपें यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
तारळी धरणावरील पूर्ण झालेल्या उपसासिंचन योजनेतून पूर्ण क्षमतेने शेतीसाठी पाणी मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत अशा उपसासिंचन योजनेच्या पहाणी प्रत्येक गावातील पाच शेतकरी घेऊन पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी पुन्हा सर्व्हे करावा. सर्व्हेक्षणात काही दुरुस्ती करावयाच्या आढळल्यास त्या तात्काळ कराव्यात. त्याचा सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.
बांबावडे उपसा सिंचन योजना टप्प 2 व तारळे उपसासिंचन योजना टप्पा 2 ची कामे 50 टक्के पूर्ण झाली आहेत. ही कामे येत्या मे महिन्याअखरे पूर्ण करावीत. तसेच नाटोशी उपसासिंचन योजनेची पंप हाऊस दुरुस्तीसह उपसा सिंचन योजनेत काही सुधारणा करावयाच्या असल्या त्या कराव्यात या उपसिंचन योजनेंतर्गत असणाऱ्या शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहचले पाहिजे.
मोरणा (गुरेघर) धरणांतर्गत येणाऱ्या बंदीस्त पाईपलाईनचे काम तातडीने पूर्ण करावे. तसेच ज्या शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये पाईपलाईन जात आहे अशा शेतकऱ्यांना आर्थिक मोबदल्यासह निर्वाह भत्ता येत्या 15 एप्रिलपर्यंत द्यावा. बंदीस्त पापलाईनच्या कामाला गती येण्यासाठी  पोलीस व महसूल विभागाची मदत घ्यावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

सातारा, दि. 11 :  महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात परिषद सभागृहात झालेल्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करावे : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

धुळे, दिनांक 11 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केल्या.

येथील शासकीय विश्रामगृह, गुलमोहर येथे शिक्षण विभागातील नाविण्यपूर्ण उपक्रम सादर करणाऱ्या शिक्षकांसोबत संवाद बैठक संपन्न झाली. यावेळी मंत्री भुसे बोलत होते. या संवाद बैठकीस आमदार मंजुळाताई गावित, अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनिष पवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ.किरण कुवर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक उपस्थित होते.

शिक्षणमंत्री श्री.भुसे म्हणाले की, राज्यातील विद्यार्थ्यांना आंनददायी, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे. यासाठी किमान 25 टक्के पटसंख्या वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. विद्यार्थ्यांना शाळेत भौतिक सुविधा जसे. इमारत, हवा खेळती वर्गखोली, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे, क्रीडांगण, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष आदी अद्ययावत ठेवावेत. शिक्षणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा (उदा. स्मार्ट बोर्ड, ऑनलाइन शैक्षणिक साहित्य) वापर करावा. शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक-शिक्षक संघाच्या नियमित बैठका आयोजित कराव्यात. पालकांशी नियमित आणि सकारात्मक संवाद साधणे, त्यांच्या शंकांचे निरसन करावे. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना शाळेच्या विकासात सहभागी करून घेणे. त्यांच्या अनुभवांचा आणि यशाचा उपयोग नवीन विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी करावा. येत्या शैक्षणिक वर्षांपासून पहिलीपासून विद्यार्थ्यांना सीबीएसई पॅटर्न राबविण्यात येणार आहे. त्यांचे प्रशिक्षण येत्या काळात सर्व शिक्षकांना देण्यात येणार आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण कसे देता येईल यासाठी प्रयत्न करावे.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रत्येक गावांमध्ये, नागरिकांमध्ये जाऊन पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. शाळेतील पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात यावे. शाळेत देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम करावा. जिल्हा वार्षिक योजनेत शालेय शिक्षणासाठी 5 टक्के निधी राखून ठेवण्यात आला असून त्या निधीतून विविध कामे करण्यात यावी. विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करावी. प्रत्येक विद्यार्थ्यांची आरोग्य पत्रिका तयार करावी. धुळे महापालिकेतील शाळेची संख्या तसेच विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. राष्ट्रगीतासोबत राज्यगीत रोज शाळेत घेण्यात यावे. विद्यार्थ्यांची सहल बॅकेत, दवाखाना, दुकान, शासकीय कार्यालयात काढण्यात याव्यात तसेच इतर माध्यमांच्या शाळेत मराठी सक्तीने शिकवावेत, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री भुसे पुढे म्हणाले की, यंदा शाळेतील पहिल्या दिवसापासून प्रत्येक विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या काळात शिक्षकांचे अशैक्षणिक कामे कमी करण्यात येणार आहे.  यंदापासून जिल्हा परिषद शाळेत स्नेहसंमेलन सक्तीने करण्यात येणार आहे. बालक पालक मेळावा बंधनकारक करण्यात येणार आहे. सर्व शाळेत तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर क्रीडा स्पर्धां घेण्याचे नियोजन, विद्यार्थींनीसाठी सायकल वाटप, आठवीच्या पुढील वर्गासाठी पींक रुम, 4 ते 7 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना तसेच विद्यार्थ्यांशी शैक्षणिक विषयांवर दररोज अर्धातास संवाद उपक्रम राबविण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांच्या मतदार संघातील किंवा नजीकच्या किमान एका शाळेत भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे नियोजन करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली.

यावेळी जिल्ह्यातील शाळेत नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आलेल्या शिक्षकांशी मंत्री श्री.भुसे यांनी संवाद साधला. शिक्षकांनी नाविण्यपूर्ण उपक्रम शिक्षण पद्धतीत राबविल्याबाबत सर्व शिक्षकांचे मंत्री भुसे यांनी कौतुक केले तसेच असे नाविण्यपूर्ण उपक्रम राज्यव्यापी घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

गुंतवणूक परिषद म्हणजे  जळगावच्या उज्ज्वल औद्योगिक भवितव्यासाठीचा निर्धार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जिल्ह्यात 1636 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार

जळगाव दि. 11 ( जिमाका वृत्तसेवा ) – उद्योग सुलभतेसाठी 21 कोटी रुपयांच्या निधीतून आधुनिक ‘उद्योग भवन’ उभारले जात असून, कुसुंबा व चिंचोली येथे 285 हेक्टर जागेचे भूसंपादन करून नवीन MIDC विकसित करण्याची प्रक्रिया सुरू असून  जागा उपलब्धते बाबत  जिल्हाधिकारी स्तरावर कार्यवाही सुरु आहे. जिल्ह्यात प्लास्टिक उद्योगांची वाढती संख्या लक्षात घेऊन ‘प्लास्टिक औद्योगिक समूहा’ साठी उद्योजकांनी यासाठी सहकार्य करावे. उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उद्योग मंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेणार आहे. “ही गुंतवणूक परिषद केवळ गुंतवणुकीची नाही, तर जळगावच्या उज्ज्वल औद्योगिक भवितव्यासाठीचा निर्धार आहे.  उद्योग केवळ नफ्यासाठी नसतात, ते समाज घडवण्यासाठी आणि भविष्य उभारण्यासाठी असतात. शेतीप्रधान जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जळगावने आता औद्योगिक प्रगतीचे पंख लावावे,” असे भावनिक उद्गारही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते चाळीस उद्योजकांशी करण्यात आलेल्या रु. 1636 कोटीचे सामंजस्य कराराचे वाटप करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील औद्योगिक प्रगतीला चालना देण्यासाठी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद जळगाव येथील हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या ऐतिहासिक परिषदेचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहराचे आमदार राजूमामा भोळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

परिषदेला संबोधित करताना पालकमंत्री म्हणाले, “भुसावळसारखं देशातील महत्त्वाचं रेल्वे जंक्शन, नाशिक व संभाजीनगरला जोडणारे महामार्ग, जलसंपन्नता, मेहनती तरुणाई आणि महिलाशक्तीमुळे जळगाव जिल्हा उद्योगविकासासाठी अत्यंत सक्षम आहे.” या परिषदेच्या निमित्ताने जिल्ह्यातील 40 उद्योगांमार्फत तब्बल 1636 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 2848 रोजगारनिर्मितीचे सामंजस्य करार करण्यात आले. मागील वर्षी झालेल्या परिषदेत 1126 कोटींच्या गुंतवणुकीसाठी करार झाले होते, त्यातील 9 उद्योगांनी प्रत्यक्षात उत्पादन सुरू केले असून, 142 कोटींची गुंतवणूक करत 839 रोजगार निर्माण केले असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून मागील वर्षी 663 कर्जप्रकरणांना मंजुरी मिळवून जिल्ह्याने 90% उद्दिष्ट पूर्ण केले असून, पंतप्रधान रोजगार योजनेत 112% यश प्राप्त केले आहे.

शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले की, जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासासाठी उद्योजकांचे योगदान हे महत्त्वाचे असून उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक विभागाच्या उद्योग सहसंचालिका वृषाली सोने यांनी केले. सूत्रसंचालन निवेदिका अपूर्वा वाणी यांनी केले.  तर आभार जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील यांनी मानले.

या गुंतवणूक परिषदेला चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, एमआयडीसी चे प्रादेशिक अधिकारी सुनील घाटे, लीड बँकेचे व्यवस्थापक  प्रणव झा, उद्योग सहसंचालिका वृषाली सोने, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील, व्यवस्थापक आर. आर. डोंगरे. लघु उद्योग भारतीचे व इतर औद्योगिक संघटनाचे  पदाधिकारी  तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी आणि  उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; एसडीआरएफ, एनडीआरएफ  यंत्रणा सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ९: मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य...

नाशिक ‘मनपा’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 8 : नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर वेतनाबाबत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल. संबंधित...

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर

0
मुंबई, दि. 8 : राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण...

महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक मुंबई, दि. ८ : बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतील शब्दांचा युनेस्कोमधील राजदूतांकडून सन्मान

0
मुंबई, दि. 8 : - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांचा गौरवपूर्ण उल्लेख हा तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रासाठी एक आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे. युनेस्कोमधील...