शनिवार, ऑगस्ट 16, 2025
Home Blog Page 1720

विधानसभा प्रश्नोत्तरे

महाड तालुक्यातील साकव बांधकामाचे काम प्रगतीपथावर – मंत्री रवींद्र चव्हाण

नागपूर, दि. 28 : “महाड तालुका, जिल्हा रायगड येथील सामाजिक न्याय विभागाच्या विशेष घटक योजनेत साकवाच्या बांधकामात अनियमितता व गैरव्यवहार याबाबत तपासणी केली असता या साकवचे काम प्रगतीपथावर असून ते अंतिम टप्प्यात आहे. हे काम लवकरच पूर्ण केले जाईल”, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत सांगितले.

महाड तालुका, जिल्हा रायगड येथे साकव बांधकामात झालेल्या गैरव्यवहाराबाबत प्रश्न भास्कर जाधव यांनी उपस्थित केला होता.

“कोकणात या प्रकारचे पूल बांधले जात असतात. या कामाची पाहणी करुन अहवाल सादर करण्याबाबत अधीक्षक अभियंता दक्षता व गुणनियंत्रण मंडळ, कोकणभवन, नवी मुंबई यांना कळविण्यात आले आहे. अहवालातील निष्कर्षानुसार पुढील कारवाई करण्याचे नियोजन आहे. याबाबत दोन पुलांसाठी प्रत्येकी 35 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या साकवाचे काम साकव पद्धतीने न होता इलिमेंटप्रमाणे केले आहे. साकव पद्धत पूर्वीप्रमाणे केल्यानंतर त्यावरुन छोटी-छोटी वाहने जाऊ शकतात”, असेही मंत्री श्री.चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

000

प्रवीण भुरके/स.सं.

 

अजनी पुलाच्या बांधकामासाठी शासन निधी उपलब्ध करून देणार – मंत्री उदय सामंत

नागपूर, दि. २८ : “नागपूर शहरातील अजनी रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी राज्य शासन निधी कमी पडू देणार नाही”, असे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत सांगितले.

नागपूर शहरातील ब्रिटिशकालीन अजनी रेल्वे पुलाबाबत सदस्य मोहन मते यांनी तारांकित प्रश्नाद्वारे मुद्दा उपस्थित केला होता. मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले की, अजनी पूल 1923 मध्ये बांधण्यात आला होता. मध्य रेल्वेने 15 जुलै 2019 रोजीच्या पत्रानुसार नागपूर महानगरपालिकेस कळविल्याप्रमाणे विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर यांनी या पुलाचे अंतरिम रचनात्मक लेखा परिक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) केले आहे. या अहवालानुसार सात डिसेंबर 2019 पासून हा पूल जड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केला आहे. या पुलावरून सध्या केवळ हलक्या वाहनांची वाहतूक सुरू आहे. अजनी पूल हा प्रकल्प महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून एक नोव्हेंबर 2022 रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन यांच्या स्तरावर निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या पुलासाठी शासनातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री नितीन राऊत, विकास ठाकरे, योगेश सागर यांनी सहभाग घेतला.

०००००

गोपाळ साळुंखे/ससं/

अहमदनगर जिल्ह्यात शिक्षकांच्या पदांना मान्यता देऊन बनावट आदेश काढल्याप्रकरणी कारवाई चालू – मंत्री दीपक केसरकर

नागपूर, दि. 28 : “अहमदनगर जिल्ह्यात शिक्षकांच्या पदांना मान्यता देऊन बनावट आदेश काढल्याप्रकरणी कारवाई चालू आहे ही कारवाई 1 महिन्याच्या आत पूर्ण केली जाईल”, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली.

अहमदनगर जिल्ह्यात शिक्षकांच्या पदांना मान्यता देऊन बनावट आदेश काढल्याबाबत  प्रश्न सदस्य ॲड. पराग अळवणी यांनी उपस्थित केला होता.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की,ज्या शिक्षण संस्थांमध्ये असे बनावट आदेश जारी करून शिक्षकांना  घेण्यात आले होते, त्यांना पदावरून कमी करण्याची कारवाई चालू आहे. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न होता जे शिक्षक शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, हिंदसेवा मंडळ,अगस्ती महाविद्यालय,अकोले,प्रवरा शिक्षण मंडळ अशा या संस्थेत 14 शिक्षकाच्या सुनावण्य घेऊन 9 शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता अयोग्य असल्याने रद्द करून त्याचे वेतन बंद केले आहे.

“हायकोर्टाने याबाबत स्टे दिला आहे. यामध्ये 675 प्राथमिक शिक्षक आहेत. यापैकी 442 जणांची सुनावणी चालू आहे. तर 659 माध्यमिक शिक्षका पैकी  259 शिक्षकाची सुनावणी चालू आहे. शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये ज्या अधिकाऱ्यांनी घोटाळा केला आहे त्यांच्यावर कारवाई चालू आहे. अशा प्रकारांवर नियंत्रण कसे करता येईल, यादृष्टीने शासन प्रयत्नशील आहे. काही संस्थांना चुकीची संच मान्यता दिली असेल, तर याची पडताळणी करून ती संच मान्यता रद्द करण्यात येईल. असे शिक्षक आढळून आल्यास त्यांना कमी करण्यात येईल.

विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री दिलीप वळसे पाटील, रवींद्र वायकर, बाळासाहेब पाटील, राहुल कुल यांनी प्रश्नाच्या चर्चेत सहभाग घेतला.

0000

प्रवीण भुरके/स.सं.

‘वीर बाल दिवस’ साजरा करण्याच्या निर्णयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विधानपरिषदेत अभिनंदन

नागपूर, दि. 28 :- देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 26 डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली, त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत प्रधानमंत्र्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या शौर्याला नमन करतानाच अंधारलेल्या इतिहासाला प्रकाशात आणण्याचे मोठे कार्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांचे अभिनंदन केले.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत मांडला. त्यावर बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, गुरु गोविंद सिंगजी यांचे पुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग या बालकांनी वीर मरण पत्करले. मोगलांसारख्या कट्टर धर्मांधांपुढे ते झुकले नाहीत. केवळ सहा आणि नऊ वर्षांच्या या बालकांनी मुघलांच्या अत्याचाराला जुमानले नाही. त्याची शिक्षा म्हणून त्यांना भिंतीत गाडून मारण्यात आले. हा बलिदानाचा इतिहास एकीकडे अंगावर काटा आणणारा आहे पण दुसरीकडे, त्यांच्यावर जे उच्च कोटीचे संस्कार झाले होते, त्यासाठी नतमस्तक करणारा आहे. एकीकडे क्रूरतेने सर्व मर्यादा तोडल्या, तर दुसरीकडे संयम, शौर्य आणि पराक्रमाचे उदाहरण होते. हे उदाहरण आम्हाला शतकानुशतके प्रेरणादायी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

“गुरु गोविंद सिंग हे शीख धर्मियांचे दहावे गुरु होते आणि त्यांनी खालसा पंथाची स्थापना केली. अन्याय, अधर्म आणि अत्याचाराविरोधात त्यांनी दिलेला लढा अजरामर आहे. त्यांच्यासारख्या निडर आणि देशाच्या स्वाभिमानासाठी जगणाऱ्या गुरूंच्या पुत्रांनी केलेले बलिदान, नवीन पिढीने विसरून जाऊ नये म्हणून ‘वीर बाल दिवस’ साजरा करण्याचा उद्देश आहे. दिल्लीत आयोजित केलेल्या या कार्यक्रमास मी स्वतः देखील उपस्थित होतो”, असे सांगतानाच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना ज्यांनी देशासाठी आपले जीवन समर्पित केले होते, त्या लोकांचा सन्मान  होत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

“आपल्या देशाच्या तरुण पिढीने भूतकाळात देश आणि धर्माचे कसे संरक्षण केले, त्याचा इतिहास नवीन पिढीला कळणे फार महत्त्वाचे आहे.  महाराष्ट्र आणि पंजाब यांचे एक नाते आहे. चाफेकर बंधू महाराष्ट्राचे होते, भगतसिंगाबरोबर असलेले राजगुरू महाराष्ट्राचे होते.  पंजाबच्या घुमानमध्ये संत नामदेवांचे निवासस्थान होते आणि नांदेडमध्ये गुरु गोविंद सिंग यांची समाधी आहे. ऑक्टोबर २००८  मध्ये नांदेडमध्ये आपण श्री गुरु गोविंद सिंग यांच्या ३०० व्या पुण्यतिथीनिमित्त गुरु-ता-गद्दी सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा केला होता. शेतीपासून ते सीमेवर रक्षण करण्यापर्यंत आणि संस्कृतीपासून राजकीय नेत्यांपर्यंत पंजाबी-मराठी संस्कृतीचा एकमेकांशी खूप घट्ट संबंध आहे”, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

“महाराष्ट्र हा देखील लढवय्यांचा प्रदेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या देशभक्तीसाठी आणि मुघलांविरुद्धच्या त्यांच्या अविस्मरणीय धाडसासाठी ओळखले जातात. गुरु गोविंद सिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांनाही धैर्य आणि संयमाची परीक्षा द्यावी लागली होती. छत्रपती संभाजी महाराजांनादेखील या अत्याचारांना सामोरं जावं लागलं होतं”, असं सांगून देश आणि धर्मासाठी बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग  यांच्या पराक्रमी बलिदानाचे स्मरण करुन त्यांना मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

नवीन लोकायुक्त विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर

नागपूर दि. २८; “महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक २०२२” हे नवीन लोकायुक्त विधेयक आज  विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. हे विधेयक आणल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तर एकमताने मंजूर केल्याबद्दल सभागृहाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले.

उपमुख्यमंत्री म्हणाले, “केंद्र सरकारने लोकपाल कायदा तयार केल्यानंतर विविध राज्यांनी लोकायुक्त कायदा तयार करणे अपेक्षित होते. या विधेयकासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांना आश्वासित केल्याप्रमाणे आणि अण्णा हजारे यांना विश्वासात घेऊन हे विधेयक तयार करण्यात आले आहे. यासाठी समिती तयार करण्यात आली होती. हे विधेयक परिपूर्ण व्हावे यासाठी अण्णा हजारे आणि तज्ज्ञ समितीने सुचविलेल्या सर्व शिफारशी मान्य करण्यात आल्या आहेत.”

“राज्याचा लोकायुक्ताचा यापूर्वीचा कायदा हा सन 1971 चा आहे. आताच्या आणि आधीच्या कायद्यात महत्त्वाचा फरक हा आहे की, त्या कायद्याच्या अंतर्गत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम समाविष्ट नव्हता. त्यामुळे विशेष प्रकरण म्हणून चौकशी करता यायची, मात्र आता हा कायदादेखील लोकायुक्तामध्ये आला आहे. यापूर्वीच्या कायद्यात मंत्री अथवा मुख्यमंत्री यांचा समावेश नव्हता. एखाद्या मंत्र्यावर तक्रार झाली तर विशेष प्रकरण (स्पेशल केस) म्हणून पडताळणी करा, असे राज्यपाल सांगू शकत होते. यात केवळ शिफारस करण्याचे अधिकार होते. मात्र आता भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याला लोकयुक्ताच्या कक्षेत आणले आहे. या कायद्यामुळे आता मुख्यमंत्री, मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांनाही  लोकायुक्ताच्या अंतर्गत  आहे.  एखादी भ्रष्टाचाराची घटना घडल्यास आता लोकायुक्त त्यावर थेट कारवाई करू शकणार आहेत.”

“ हे करत असताना या कायद्याचा गैरवापर होऊ नये, खोट्या तक्रारी होऊ नयेत यासाठी काही निकष ठेवले आहेत. केंद्रीय लोकायुक्त कायद्याप्रमाणेच निकष ठरवले आहेत.  आमदारांच्या संदर्भात अध्यक्षांना आणि मंत्र्यांच्या संदर्भात राज्यपालांना अधिकार देण्यात आले आहेत. या चाळणीतून गेल्याशिवाय ही तक्रार दाखल होणार नाही. योग्य तक्रार असेल तर ती दाखल करुन घ्यावीच लागेल आणि खोट्या तक्रारी आसतील तर त्या  दाखल करून घेता येणार नाहीत, अशा तरतुदी ठेवण्यात आल्या आहेत.”

“सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश यांना लोकायुक्त म्हणता येणार आहे. त्यांच्या अंतर्गत काही पदे असतील. केंद्रीय कायद्यानुसार जसे लोकपाल हे एक पॅनेल आहे तसेच हे लोकायुक्तांचे पॅनेल तयार करण्यात येणार आहे. या पॅनेलला दोन जणांच्या बेंचने काम करण्याचे अधिकार देण्यात आले आहे.”

“आज हे एक ऐतिहासिक विधेयक पारित होत आहे. या विधेयकामुळे पारदर्शकपणे काम करण्याचे आपल्या सर्वांवर बंधन येणार आहे.  लोकपाल कायद्यासारखे लोकायुक्त हे विधेयक इथे मंजूर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे”, असेही श्री फडणवीस म्हणाले.”

0000

विधानसभा/अर्चना शंभरकर

‘टीईटी’संदर्भात चौकशी करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. २८ : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घोटाळा अपात्र कंपन्यांना पात्र केल्याने झाला आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, यामध्ये दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले

याबाबत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन सदस्य संजय कुटे यांनी उपस्थित केला होता यावर उत्तर देताना श्री. फडणवीस बोलत होते.

००००

प्रवीण भुरके/ससं

मुंबईवर दावा सांगणे खपवून घेणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि.२८ : मुंबई ही महाराष्ट्राचीच असून मुंबईवर दावा सांगणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिला.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर ते बोलत होते. श्री.फडणवीस पुढे म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री व कर्नाटक सरकारला निषेधाचे पत्र पाठविण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत नव्याने दावे केले जाणार नाहीत असे ठरले होते. आता मुंबईसंदर्भात कर्नाटक सरकारने केले ते दावे बैठकीतील ठरावाच्या विसंगत प्रकारचे दावे आहेत.

सभागृह याचा निषेध करित आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री यांना पत्राद्वारे कळविले जाईल केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर जे ठरले आहे त्याचे उल्लंघन करणे हे खपवून घेणार नाही, असेही श्री फडणवीस यांनी सांगितले.

विधानसभा लक्षवेधी

अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी टास्क फोर्स उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 28 : अंमली पदार्थांची तस्करी रोखणे आणि युवा पिढीला यापासून दूर ठेवण्यासाठी राज्य शासनाने टास्क फोर्स तयार केला आहे. त्याबरोबरच अंमली पदार्थ विरोधी विभागाचं विकेंद्रीकरण करून त्याचे बळकटीकरण करण्याचा विचार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य सुनील प्रभू यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, युवा पिढी अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकू नये यासाठी देशात असे अंमली पदार्थ येण्यापूर्वीच त्याची तस्करी रोखणे यासाठी केंद्राचा नार्कोटिक्स विभाग आणि राज्याचा अंमली पदार्थ विरोधी विभाग प्रयत्न करीत आहे. जेएनपीटी येथे त्यासाठी तपासणी यंत्रणा तयार केली आहे, असे उपमुख्यमंत्री श्री.  फडणवीस यांनी सांगितले.

या वर्षात आपण ४९२८ कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करून ते नष्ट केले आहे. मेडिकल दुकानातून प्रिस्क्रीपशनशिवाय कफ सिरप देऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ड्रग तस्करीसाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या जातात. त्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

या चर्चेत सदस्य अतुल भातखळकर, संजय केळकर, मनीषा चौधरी, रवींद्र वायकर, योगेश सागर, चिमणराव पाटील आदी सदस्यांनी त्यात सहभाग घेतला.

000

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रसाधनगृह वाटप चौकशी अहवालातील त्रुटी उच्च नायालयाच्या लक्षात आणून फेरचौकशी करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 28 : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (वाशी) मधील प्रसाधनगृह वाटप आणि अनुषंगिक बाबींमध्ये चौकशी अहवालातील त्रुटी दूर करून नव्याने फेरचौकशी करण्यात येईल. ही बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ही कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य महेश शिंदे यांनी यासंदर्भात आज लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी येथे निविदा प्रक्रियेनुसार झालेले प्रसाधन गृह वाटप, निविदा प्रक्रियेविना झालेले नूतनीकरण, मुदतवाढ आदी प्रक्रियेमधील अनियमितता, भ्रष्टाचार आदीबाबत गुन्हा नोंद करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर याचिकाकर्त्याने याचिका मागे घेण्याबाबत न्यायालयास विनंती केली. मात्र, उच्च न्यायालयाने तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाची सहायक पोलिस आयुक्त यांच्यामार्फत तीन महिन्यात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आणि नंतर दोन आठवड्यात गृह विभाग सचिव यांच्यामार्फत तो उच्च न्यायालयास सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यावर हा अहवाल आणि त्यावरील कृती अहवाल न्यायालयास सादर करण्यात आला होता, अशी माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली. या अहवालात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी उच्च न्यायालयाचा निदर्शनास ही बाब आणून फेरचौकशी करण्याबाबत कार्यवाही करू, असेही त्यांनी सांगितले.

लक्षवेधी सूचनेवरील या चर्चेत सदस्य अजय चौधरी यांनी सहभाग घेतला.

000 

मुंबईतील समता गृहनिर्माण संस्थेची महिनाभरात स्वतंत्र चौकशी करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. २८ : “मुंबईतील परळ, शिवडी भागातील प्लॉट क्रमांक २०२ (पीटी), २४०, ४१६, ४१७ (पीटी) या भूखंडांवरील दोन इमारतींच्या बांधकामाची महिनाभरात स्वतंत्र चौकशी करण्यात येईल. तोपर्यंत काम थांबविण्याच्या सूचना देण्यात येतील”, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

“विधानसभेत सदस्य अजय चौधरी यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले, की मुंबईतील परळ, शिवडी विभागातील समता सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत अनियमितता झाल्याच्या तक्रारी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे प्राप्त झाल्या आहेत. वरील भूखंडांवर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने समता सहकारी गृहनिर्माण ही ‘झोपु’ योजना मंजूर केली आहे. सुधारित आशयपत्र ११ ऑक्टोबर २०२१ रोजी देण्यात आले”.

“या योजनेत चार इमारती प्रस्तावित केल्या असून दोन पुनर्वसन इमारती, एक संयुक्त इमारत (विक्री घटक व पुनर्वसन घटक) आणि विक्रीसाठी इमारत बांधण्याचे नियोजन आहे. सुप्रिम टॉवर विक्री घटकासाठी असून भव्य सुप्रिम एनएक्स ही संयुक्त इमारत ही विक्री घटक व पुनर्वसन घटकांसाठी अशा दोन इमारती मंजूर केल्या आहेत. या ठिकाणी कोणतेही अनधिकृत बांधकाम नाही. सुप्रिम एनएक्स ही २२ मजल्यांची इमारत प्रस्तावित असून सद्य:स्थितीत १४ मजल्यापर्यंत बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या इमारतीच्या १५ ते २२ मजल्यापर्यंतची बांधकाम परवानगी अद्यापपर्यंत देण्यात आलेली नाही”.

“बांधकामाची परवानगी दिलेल्या १४ मजल्यांचे काम पूर्ण झाले असल्याने त्यास भागश: भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यात योजनेतील सर्व २४४ झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. या ठिकाणी एका इमारतीचा फंजिबल एफएसआय दुसऱ्या इमारतीसाठी वापरलेला नाही”, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

००००

गोपाळ साळुंखे/ससं/

अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक यांच्यामार्फत चौकशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 28 : नाशिक जिल्ह्यातील अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्याविरुद्ध आलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक यांच्यामार्फत एका महिन्याच्या आत चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल आणि तेथे मुदत संपूनही कार्यरत असलेल्या पोलीस नाईक प्रशांत नागरे यांची बदली करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

विधानसभा सदस्य नितेश राणे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, यासंदर्भात सदस्यांनी सभागृहात व्यक्त केलेल्या भावना विचारात घेऊन त्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेण्यात आली आहे. एका महिन्यात याबाबत चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

ऑनलाईन लॉटरीच्या दुष्परिणामांविषयी नागरिकांमध्ये जाणीव जागृती करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 28 : “ऑनलाईन लॉटरीच्या दुष्परिणामांविषयी नागरिकांमध्ये जाणीव जागृती निर्माण होण्यासाठी व्यापक स्तरावर मोहीम राबविण्यात येईल. अवैध ऑनलाईन लॉटरीच्या प्रतिबंधासाठी कायद्यात सुधारणा करून त्यांना कायद्याच्या परिप्रेक्ष्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल”, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभेत सदस्य महेश लांडे यांनी लक्षवेधीद्वारे याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. त्यांनी सांगितले, की राज्यात उपसंचालक लॉटरी, नवी मुंबई यांच्यामार्फत पेपर लॉटरी चालविण्यात येते. महाराष्ट्रात ऑनलाईन पद्धतीची लॉटरी चालविण्यात येत नाही. महाराष्ट्र पोलिस दलातर्फे बेकायदेशीर ऑनलाइन लॉटरी सुरू असलेल्या आस्थापना व व्यक्तींविरुद्ध भारतीय दंडसंहिता, महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा व लॉटरी रेग्युलेशन कायद्यानुसार दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येते.

शासनाच्या महसूलात वाढीसाठी व बेकायदेशीर चालू असलेल्या ऑनलाईन लॉटरीवर आळा घालण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांकडून वेळोवेळी कायदेशीर कारवाई करण्यात येते. तसेच गुन्हे शाखेतील गुन्हे कक्षाकडून व समाजसेवा शाखेकडूनदेखील छापे मारुन कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात स्टील, ॲपेक्स, प्लॅटिनम या कंपन्यांविरुद्ध ऑनलाईन लॉटरीबाबत तक्रार नसल्याने गुन्हा दाखल नाही.

महाराष्ट्रात सन २०२० ते २०२२ पर्यंत एकूण २६७ गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण १०० आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात १३४ गुन्हे दाखल करण्यात आले असून ५५६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ऑनलाईन लॉटरीसाठी वापरण्यात येणारी माध्यमे व संगणकीय प्रणालीचा अभ्यास करून त्याबाबतीत पाठपुरावा करण्यात येत आहे. नागरिकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी सायबर पोलिस ठाणे विभाग, जिल्हा पोलिस व पोलिस आयुक्तालयातर्फे विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. मुंबईतील चांदिवली, साकिनाका व पवई या भागात सन २०२० ते २०२२ पर्यंत अनधिकृत ऑनलाईन लॉटरीसंदर्भात दोन गुन्हे दाखल करण्यात असून १० आरोपींना अटक करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री रईस शेख, राहुल आहेर आदींनी सहभाग घेतला.

००००

गोपाळ साळुंखे/ससं/

सोलापूर जिल्ह्यातील बांगलादेशी घुसखोरांबाबत उच्चस्तरीय चौकशी करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 28 : सोलापूर जिल्ह्यातील अवैध  कत्तल कारखान्यात गोहत्या होणे , या कारखान्यात  बांगलादेशी घुसखोर असल्याची बाब समोर येणे, प्रदूषण नियमाचे पालन न होणे याबाबत उच्चस्तरीय चौकशी एका महिन्याच्या आत केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

याबाबतची लक्षवेधी सूचना सचिन कल्याणशेट्टी उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, सन 2017 मध्ये बांगलादेशी नागरिक आले होते. याबाबत पोलिसांनी कारवाई केली होती. बांगलादेशी नागरिकांना बाहेर काढले होते. राज्यात सोलापूर जिल्ह्यातील अवैध  कत्तलखाने असल्याचे उघड होणे, कत्तलखान्याच्या बांधकामाबाबत योग्य परवानगी न घेणे,  कत्तलखान्यात बांगलादेशी घुसखोर असल्याची बाब समोर येणे, प्रदूषण नियमाचे पालन न होणे या  सर्व प्रकरणात माहिती तपासून पाहण्यात येईल व याबाबत उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, अशी माहिती  उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

सदस्य राम सातपुते यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

00000

औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता एस डी पानझडे प्रकरणी प्रधान सचिवांमार्फत चौकशी – मंत्री उदय सामंत

नागपूर, दि. 28 : औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये स्थापत्य पदविकेच्या आधारे नोकरी मिळवून शासकीय नियमांचे उल्लंघन करत शहर अभियंता पदापर्यंत पदोन्नती मिळाल्याप्रकरणी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी केली जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली

याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य प्रशांत बंब यांनी उपस्थित केली होती. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य हरिभाऊ बागडे, हसन मुश्रीफ यांनी सहभाग घेतला.

00000

प्रवीण भुरके/ससं/

साखर कारखान्यांची फसवणूक टाळण्यासाठी लवकरच बैठक – मंत्री अतुल सावे

नागपूर, दि. 28 : ऊस गाळप हंगामात ऊस तोड मजूर पुरविणे आणि वाहतुकीचे करार गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार मंडळाच्या माध्यमातून होण्यासाठी साखर कारखानदार, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत 9 जानेवारी 2023 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे सहकार मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभेत आज लक्षवेधी सूचनेद्वारे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. सावे बोलत होते. त्यांनी सांगितले, की राज्यात सद्यस्थितीत चालू गाळप हंगामात 96 सहकारी व 92 खासगी, असे एकूण 188 साखर कारखाने कार्यरत आहेत. राज्यातील साखर कारखान्यांची वाहतूकदार, मुकादम, ऊस तोडणी कामगारांकडून फसवणूक होऊ नये म्हणून साखर आयुक्तालयाने तयार केलेल्या महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार ॲपमध्ये गेल्या दोन वर्षातील माहिती संकलित केली आहे. एकच वेळी राज्यात 200 साखर कारखाने वेगवेगळ्या ठिकाणी गाळप करत असल्यामुळे प्रत्येक हंगामापूर्वी साखर कारखाने वाहतूकदारांबरोबर ऊस तोडणीसाठी करार करीत असल्यामुळे अन्य कारखान्यांमध्येसुद्धा तेच वाहतूकदार, मुकादम, ऊस तोडणी कामगार मोठ्या प्रमाणात उचलून घेऊन व रक्कम बुडवून कारखान्याची फसवणूक होत असल्याचे, साखर कारखान्यांच्या संकलित माहितीतून निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात 2004 ते 2020 पर्यंत सुमारे 40 कोटी रुपयांची फसवणूक मुकादमाकडून झाल्याची माहिती ॲपद्वारे प्राप्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर याबाबतच्या व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असेही मंत्री श्री. सावे यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री हसन मुश्रीफ, बबनराव शिंदे, विनय कोरे, प्रकाश आबिटकर यांनी सहभाग घेतला.

०००००

गोपाळ साळुंखे/ससं

शिक्षक भरतीमुळे शिक्षकांची रिक्त पदांची समस्या सुटणार – मंत्री दीपक केसरकर

नागपूर, दि. २८: राज्यात शिक्षक पदभरती प्रकिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे विविध शाळांमध्ये असणारी शिक्षकांच्या  रिक्त पदाबाबतची समस्या सुटण्यास मदत होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य रईस शेख यांनी, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या अनुषंगाने लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. केसरकर बोलत होते.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, महानगरपालिका हद्दीतील शाळांच्या शिक्षक संख्येबाबतचा विषय हा नगरविकास आणि शिक्षण विभागाशी संबंधित आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही विभागांची बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मंत्री श्री. केसरकर यांनी दिली.

मुंबईमध्ये जे शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत, त्यातील जे शिक्षक भिवंडीमध्ये जाण्यास तयार असतील त्यांना याठिकाणी पाठवले जाईल. भिवंडीमध्ये पर्यायी शिक्षक उपलब्ध होईपर्यंत यापुढे जिल्हा बदली केली जाणार नाही, अशी माहितीही मंत्री श्री. केसरकर यांनी दिली.

शिक्षण विभागात आपण अनेक चांगले निर्णय घेतले असून त्यामुळे पुढील वर्षीपासून सकारात्मक बदल दिसेल. पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद केल्या जाणार नाहीत. गुणात्मक आणि दर्जात्मक बदल निश्चितपणे दिसतील. व्यावसायिक अभ्यासक्रम मातृभाषेतून तयार करण्याचा निर्णय आपण घेतला असून ते काम सुरू असल्याची माहितीही मंत्री श्री. केसरकर यांनी दिली.

लक्षवेधी सूचनेवरील या चर्चेत विधानसभा सदस्य यशोमती ठाकूर, सुनील राणे, अबू आझमी, डॉ. भारती लव्हेकर आदींनी सहभाग घेतला.

0000

दीपक चव्हाण/विसंअ

शालेय पोषण आहार योजनेच्या तक्रारींची दखल घेऊन आवश्यक सुधारणा करणार – मंत्री दीपक केसरकर

नागपूर, दि. २८: शालेय पोषण आहार योजना केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येत आहे. या योजनेबद्दल कुठेही तक्रारी असतील तर त्याची तात्काळ दखल घेऊन आवश्यक त्या सुधारणा निश्चितपणे केल्या जातील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य समाधान आवताडे यांनी शालेय पोषण आहार योजनेसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. केसरकर बोलत होते.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, राज्यात यावर्षी शालेय पोषण आहार योजनेसाठी १६८२ कोटी रुपये मंजूर असून त्यापैकी या योजनेवर आतापर्यंत ८९२ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. अन्न महामंडळाकडून राज्याला तांदूळ पुरवठा करण्यात येतो. कडधान्ये खरेदी राज्य शासन करते. शालेय पातळीवर स्थानिक समितीमार्फत विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. विद्यार्थांना चांगला आहार देण्याबाबत आवश्यक ती काळजी घेतली जाते, असे मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

या योजनेसंदर्भात काही तक्रारी असतील अथवा काही प्रकार घडले असतील तर त्याची चौकशी करण्यात येईल. निश्चितपणे या योजनेत आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील, असे मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

लक्षवेधी सूचनेवरील या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य बबन शिंदे, अशोक पवार  यांनी सहभाग घेतला.

000

दीपक चव्हाण/विसंअ 

पर्जन्यमापक यंत्रांची संख्या वाढविण्याबाबत निश्चित धोरण तयार करणार – मंत्री शंभूराज देसाई

शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबातील विधवा महिलांसाठी गावपातळीवर समुपदेशन केंद्र सुरू करण्याबाबत विचार

नागपूर, दि. 28 : राज्यात मंडल स्तरावर असलेली पर्जन्यमापक यंत्रांची संख्या वाढवण्याबाबत काय धोरण असावे याबाबत निश्चितपणे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या जातील, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली. तसेच शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबातील विधवा महिलांसाठी गावपातळीवर समुपदेशन केंद्र सुरू करण्याबाबत निश्चितपणे विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य कुणाल पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. देसाई बोलत होते.

मंत्री श्री.देसाई म्हणाले की, अतिवृष्टीच्या निकषात न बसणारे परंतु सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मदत केली. यापुढे सततच्या पावसाचे निकष ठरवण्यासाठी प्रधान सचिव (नियोजन) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचा अहवाल येताच याबाबत निश्चित धोरण तयार करण्यात येईल आणि त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मंत्री श्री. देसाई यांनी दिली.

शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबातील विधवा महिलांसाठी  समुपदेशन केंद्र गावपातळीवर सुर करण्यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल. या महिलांना शेतकरी गट आणि महिला बचत गटाशी  जोडून काय लाभ देता येईल, याचाही विचार केला जाईल. याबाबत लवकरच बैठक आयोजित करून निश्चित धोरण तयार करण्यात येईल, असे मंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.

धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे मदतीबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती मागवली जाईल. बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नसेल तर त्याबाबत संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सदस्य डॉ. राहुल पाटील, भास्कर जाधव, यशोमती ठाकूर, डॉ.देवराव होळी, संजय गायकवाड आदींनी सहभाग घेतला.

000

दीपक चव्हाण/विसंअ

राजधानीत डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी

नवी दिल्ली,  27 : कृषी क्रांतीचे प्रणेते आणि शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली.

कॉपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त (अ.का.) डॉ. निधी पांडे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक(मा.)(अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.  याप्रसंगी माहिती अधिकारी  अंजु निमसरकर यांच्यासह कार्यालयातील उपस्थित कर्मचाऱ्यांनी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस  पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

000

महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक युवा खेळाडूंना सुवर्णसंधी

          महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.  पुणे जिल्हयातील म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे  2 ते  12 जानेवारी, 2023 या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

           राज्याचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनात या स्पर्धेचे आयोजन होत आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव आणि  क्रीडा आयुक्त सुहास दिवसे स्पर्धेच्या आयोजनासंबधी लक्ष ठेवून आहेत. पुण्यामध्ये ही स्पर्धा होणे हे गौरवशाली असून यानिमित्ताने पुण्याचे क्रीडा वैभव आणि क्रीडा क्षेत्राची ओळख देशपातळीवर पोहोचविण्याची मोठी संधी आहे. त्याबाबतचा हा लेख…

 

उपरोक्त कालावधीत पुणे जिल्हयातील म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात एकूण 39 खेळ प्रकारांचा स्पर्धेत समावेश असून बालेवाडी येथे 21 खेळ प्रकारांचे आयोजन होत आहे. तसेच नागपूर-4, जळगाव-4, नाशिक-2, मुंबई, बारामती, अमरावती, औरंगाबाद, सांगली व  पुणे परिसरात एमआयटी, विमाननगर व पूना क्लब येथे प्रत्येकी 1 याप्रमाणे खेळ प्रकारांचे आयोजन होत आहे.

महाराष्ट्र राज्याला क्रीडा संस्कृतीचा मोठा वारसा आहे. क्रीडा धोरण राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. तसेच क्रीडाविषयक पायाभूत सुविधा निर्माण व विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा जगतातील घडामोडीचा वेध घेवून भविष्यात करावयाच्या कार्यप्रणालीसंबंधात राज्य शासनाने क्रीडा धोरण आखले असून, 2012 सालापासून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

क्रीडा क्षेत्राचा विकास हा त्या देश-राज्याच्या प्रगतीचा एक टप्पा मानला जातो. त्यामुळे देश आणि राज्य पातळीवर खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन देण्याचे प्रत्येक शासनाचे धोरण असते, त्या धोरणाच्या माध्यमातून विविध योजना, उपक्रम शासन राबवित असते. महाराष्ट्र शासन देखील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण योजना, उपक्रम राबवित असून त्या माध्यमातून राज्यात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिले जात आहे.

मिनी ऑलिम्पिक

राज्यातील शहरी आणि विशेषत: ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्रातून आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसह विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी दर्जेदार क्रीडापटू तयार व्हावेत, या हेतूने राज्यात मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात तिरंदाजी, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, तलवारबाजी, फुटबॉल, जीम्नॅस्टीक्स्, हँडबॉल, हॉकी, ज्युडो (मुले व मुली), कबड्डी, खो-खो, लॉन टेनिस, मॉडर्न पेंटॅथलॉन, शुटींग, रोविंग, रग्बी, स्वीमिंग-वॉटरपोलो, टेबल टेनिस, तायक्वाँडो, ट्रायथलॉन, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टींग, रेस्टलींग, वु-शू, सायकलिंग (रोड व ट्रॅक), नेटबॉल, सेपक-टक्रॉ, स्क्वॅश, मल्लखांब, शुटींग बॉल, सॉफ्टबॉल, योगासने, सॉफ्ट टेनिस, रोलर स्केटींग, यॉटींग, गोल्फ आणि कॅनाईंग-कयाकिंग या क्रीडा प्रकारांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे.

सुमारे 7 हजार खेळाडूंसह, संघाचे व्यवस्थापक, प्रशिक्षक, तांत्रिक अधिकारी व पंच असे मिळून 10 हजार 456 जण स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र शासनाने या स्पर्धेसाठी 19 कोटी 7 लक्ष 94 हजार इतका निधी उपलब्ध करून दिला आहे. सदरहू स्पर्धा राज्यस्तरीय सर्वोच्च स्पर्धा असून ती राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या धर्तीवर पार पडणार आहे. त्या-त्या खेळांतील राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील प्रथम आठ स्थानावर आलेल्या संघातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

क्रीडा ज्योत

स्पर्धेच्या निमित्ताने क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रायगड किल्ला येथून क्रीडा ज्योत निघून पुणे येथे पोहोचेल. तसेच आठ विभागीय मुख्यालय येथून क्रीडा ज्योतींचे पुणे येथे आगमन होणार असून, पुणे येथे क्रीडा ज्योतींची भव्य रॅली काढण्यात येणार आहे.

क्रीडामंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तर आयोजन समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीच्या नियंत्रणात स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले असून खेळ प्रकारांचा स्पर्धेत समावेश करणे अथवा वगळणे याबाबत आयोजन समितीचा निर्णय अंतिम आहे.

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावर खेळाडूंना आपले क्रीडा नैपुण्य दाखवण्याची जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हावी याकरिता अशाप्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावरावरील खेळाडू निर्माण होतील. स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतील युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातून निश्चितच ऑलिंपिक पदक विजेते खेळाडू निर्माण होतील, असा विश्‍वास आहे.

०००

जयंत कर्पे,

सहायक संचालक (माहिती),

विभागीय माहिती कार्यालय, पुणे

टँकरमुक्त जिल्हा हेच जलजीवन मिशनचे यश – सचिव संजीवकुमार जयस्वाल

पालक सचिवांनी घेतला विविध विषयांचा आढावा

यवतमाळ, दि, २७ :- जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रत्येक गावात, प्रत्येक घरापर्यंत नळ देण्याचा संकल्प केंद्र शासनाने केला आहे. त्यासाठी जलजीवन मिशन राबविण्यात येत आहे. यावर्षी जिल्ह्यात भरपुर पाऊस झाला असून धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. त्यामुळे 2023 – 24 या वर्षात जिल्ह्यात एकही टँकर न लागल्यास जलजीवन मिशन यशस्वी झाल्याचा तो सर्वात सबळ पुरावा राहील, असे मत पालक सचिव तथा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीवकुमार जयस्वाल यांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आज पालक सचिव यांनी सर्व यंत्रणांची आढावा बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जिल्हाधिकारी अमोल येडगे,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन, तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.  पालक सचिव यांनी स्वच्छता व पाणी पुरवठा, जलजीवन मिशन, केंद्र शासनाच्या 13 फ्लॅगशिप योजना, जलसंधारण, कृषी पंप जोडणी, अतिवृष्टीमुळे झालेल्या शेत पिकाचे नुकसान, पोकरा योजनेची अंमलबजावणी, प्रधानमंत्री पिक विमा योजना, आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या योजना, आदींचा आढावा घेतला.   यावेळी आढावा घेताना ते म्हणाले, जल जीवन मिशन ही शासनाची महत्त्वकांक्षी योजना आहे.

सन 2024 पर्यंत प्रत्येक घराला नळ पाणीपुरवठा करण्याचे शासनाचे ध्येय आहे. त्याअनुषंगाने केंद्र शासन यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे या योजनेची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी व्हावी. भविष्यात जिल्ह्यात एकही टँकर लागणार नाही या दृष्टीने ही योजना यशस्वीपणे राबवावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.  जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत पिण्याचे पाणी, हॅन्डवॉश स्टेशन, शोष खड्डे आणि स्वच्छता इत्यादी व्यवस्था करण्यात यावी. जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रस्ताव शासन स्तरावर पाठवावे त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे श्री जयस्वाल  म्हणाले.  प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)च्या अंमलबजावणीमध्ये जिल्हा मागे आहे. शहरातील आवास योजनेच्या कामाला गती देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांची जेवढी मागणी आहे तेवढे सर्व प्रस्ताव पाठविण्यात यावे. यासाठी स्वतः पाठपुरावा करण्याची हमी त्यांनी यावेळी दिली.

प्रधानमंत्री आरोग्य योजनेतील गोल्डन कार्डसाठी आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक लिंक करण्यासाठी लोकांच्या सोयीनुसार शिबीर लावावे. तसेच पिक विमा योजनेचा वारंवार आढावा घेण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. यावेळी जिल्हाधिकारी यांनी जलजिवन मिशनचे सादरिकरण केले. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वऱ्हाडे, तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

खाजगी चित्रीकरण स्थळांची माहिती पाठविण्याचे चित्रनगरीचे आवाहन

मुंबई, दि. 27 : राज्यातील खाजगी मालकीच्या चित्रीकरण स्थळांची माहिती जास्तीत जास्त निर्मिती संस्थांना कळावी यासाठी संबधित चित्रीकरण स्थळांचे मालक  अथवा संस्थांनी गुगल ड्राईव्हवर स्थळांची विस्तृत माहिती, छायाचित्र, व्हिडीओ आणि संपर्क क्रमांक पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने (चित्रनगरी/फिल्मसिटी) केले आहे.

महाराष्ट्र हे मनोरंजन क्षेत्रातील नावाजलेले राज्य असून देश-विदेशातील निर्मिती संस्था येथे चित्रीकरण करण्यासाठी प्राधान्याने येत असतात. सध्या राज्यातील विविध ठिकाणी खाजगी चित्रीकरण स्थळ विकसित होत आहेत. ही चित्रीकरण स्थळे विविध निर्मिती संस्थांना माहिती व्हावीत यासाठी महामंडळ पुढाकार घेत आहे. यासाठी चित्रीकरणायोग्य अशा मालमत्ताधारकांनी महामंडळास संपर्क साधून आपल्या स्थळांची परिपूर्ण माहिती कळविल्यास, महामंडळ विविध प्रसिद्धीमाध्यमाद्वारे चित्रीकरण स्थळांची माहिती निर्मितीसंस्थांपर्यंत पोहोचविण्याचे काम करेल. याद्वारे नागरिकांना अधिकचे उत्पन्न प्राप्त होईल आणि त्यांच्या स्थळांची प्रचार-प्रसिद्धी होईल.

अधिक माहितीसाठी www.filmcitymumbai.orgwww.filmcell.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर भेट देता येईल.  गुगल ड्राईव्ह लिंक वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ताज्या बातम्या

शाहू महाराजांच्या समाजपरोपकारी कार्याला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून अभिवादन

0
समाधीस्थळाला भेट कोल्हापूर, दि. १६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. याप्रसंगी...

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
विविध विकासकामे, योजनांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत निर्देश सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : सांगली जिल्हा हा नेतृत्त्व करण्यास संधी देणारा जिल्हा आहे. या जिल्ह्याने...

चिमूर क्रांती दिनानिमित्त पालकमंत्र्यांकडून शहिदांना अभिवादन

0
स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या कुटुंबियांची भेट; नगरपरिषद येथे आढावा बैठक चंद्रपूर, दि. 16 : 16 ऑगस्ट 1942 रोजी झालेल्या चिमूर क्रांती दिनानिमित्त आज राज्याचे आदिवासी विकास विभागाचे...

‘दहीहंडी’द्वारे गोविंदा पथकांचा भारतीय सैन्य दलाच्या शौर्याला सलाम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 16 :- ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे भारतीय सैन्य दलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार आणि विचार प्रत्यक्षात उतरवला. पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणे नष्ट करून शत्रूला धडा...

मनपाच्या ‘पीएम श्री’ शाळेला मिळणार १० कोटी रुपये – तिरंगा रॅलीमध्ये पालकमंत्री डॉ. अशोक उईकेंनी...

0
बाबुपेठ येथील सावित्रीबाई फुले उच्च माध्य. व प्राथ. शाळेत आयोजन चंद्रपूर, दि. 16 : शहरातील बाबुपेठ येथे चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे चालविण्यात येणा-या पीएम श्री सावित्रीबाई...