शनिवार, ऑगस्ट 9, 2025
Home Blog Page 1708

कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा महाराष्ट्रात रुग्ण नाही – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

विधानसभा निवेदन, इतर कामकाज

नागपूर, दि. २२ : जगातील चीनसह अन्य देशांत कोरोना विषाणूचा बीएफ 7 हा नवा प्रकार आढळून आला आहे. या प्रकाराचा महाराष्ट्रात एकही रुग्ण आढळून आलेला  नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही. मात्र, दक्षता म्हणून मास्कचा वापर करीत गर्दीत जाताना सुरक्षित अंतर ठेवावे, असे निवेदन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत केले.

मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराच्या संसर्गाची तीव्रता ओमीक्रॉनपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी आज दुपारी आढावा बैठक घेतली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली. तसेच कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर चाचणी, पाठपुरावा, उपचार आणि लसीकरणावर भर देण्यात येईल. आरोग्य यंत्रणांनाही सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात आतापर्यंत 95 टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. तसेच येत्या सोमवारपासून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना नुसार आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्या दोन टक्के प्रवाशांची ताप चाचणी करण्यात येईल.

०००००

गोपाळ साळुंखे/स.सं.

वरळी नाका येथील महापालिकेच्या शाळेत शनिवारी रोजगार मेळावा

मुंबई, दि. २२ : रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई शहर यांच्यावतीने शनिवार दि. २४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत महानगर पालिका शाळा, डॉ. ऍनी बेझंट मार्ग, वरळी नाका, वरळी येथे “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” होणार आहे.

यामध्ये मुंबई शहर येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच या मेळाव्यामध्ये उद्योजकता मार्गदर्शन आणि करीयर समुपदेशन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या महारोजगार मेळाव्यामध्ये बी.व्ही.जी. इंडिया लि., आयसीजे, स्पॉटलाईट, स्मार्ट स्टार्ट, बझ वोर्क, टीएनएस इंटरप्रायझेस, युवाशक्ती इम्पेरेटीव्ह, हिंदू रोजगार, एअरटेल इ. कंपन्या सहभागी होणार असून दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलिटेक्नीक व इंजिनीअरींग पदवी इ. पात्रताधारक उमेदवारांसाठी मेळाव्यामध्ये बँकिग, आयटीआयएस, टुरिझम, हॉस्पीटीलिटी, एच आर, अॅप्रेंटीसशीप, डोमॉस्टिक वर्कर, इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट तसेच मिडीया ॲण्ड एन्टरटेंमेंट अशा प्रकारे विविध क्षेत्रातील पदे उपलब्ध असणार आहेत.

या मेळाव्यामध्ये स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलबध करून देणारी विविध शासकीय महामंडळे सहभागी होणार असून यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ इ. ची माहिती देणारी दालने असतील. याद्वारे विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचबरोबर विविध शासकीय व खाजगी क्षेत्रातील बँकांचाही यामध्ये समावेश असेल.

मुंबई शहर येथील बेरोजगार युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर कार्यालयाचे सहायक आयुक्त रविंद्र सुरवसे यांनी केले आहे.

000

कृषी विद्यापीठांना संशोधन कार्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करणार – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

नागपूर, दि. २२: शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य शासन कार्य करीत आहे. उत्पादन  खर्च कमी करून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी, या दिशेने शासनाचे प्रयत्न आहेत. यासाठी कृषी विद्यापीठांमध्ये सुरु असलेले संशोधन कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याकरिता शासन कृषी विद्यापीठांना सर्वतोपरी सहाय्य करेल, असे आश्वासन कृषीमंत्री तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रति कुलपती अब्दुल सत्तार यांनी दिले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागपूर स्थित कृषी महाविद्यालयाच्या (बजाजनगर) कृषी शास्त्रज्ञ निवास आणि वनस्पतीशास्त्र संशोधन प्रक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन श्री. सत्तार यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलगुरू डॉ. शरद गडाख, विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य मोरेश्वर वानखडे, केशव तायडे आदी उपस्थित होते.

श्री. सत्तार म्हणाले की, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन चांगले निर्णय घेत आहे. योजनांची प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. शेतकऱ्यांना उत्तम वाण व आधुनिक यंत्रसामग्री मिळावी यासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये संशोधनकार्य सुरु आहे. विदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानेही उत्तम कामगिरी करीत १७६ वाण आणि ४३ शेतकी यंत्र विकसीत केली आहेत. संशोधनाचे हे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याकरिता शासनाकडून कृषी विद्यापीठांना सर्वतोपरीत सहाय्य करण्यात येत आहे. याच श्रृंखलेत विद्यापीठाच्या नागपूर येथील ११६ वर्ष जुन्या कृषी महाविद्यालयाच्या आवारात कृषी शास्त्रज्ञ निवास आणि वनस्पतीशास्त्र संशोधन प्रक्षेत्र कार्यालयाची सुंदर इमारत उभी राहिली आहे. आता येथे देश-विदेशातील शास्त्रज्ञांना राहण्याची उत्तम सोय होईल. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शने आयोजित करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या जुन्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी  राज्य शासनाकडून आवश्यक मदत करण्यात येईल, असे आश्वासनही श्री. सत्तार यांनी दिले.

सिल्लोड येथील कृषी प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन

सन २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’म्हणून देशभर साजरे केले आहे. त्यानिमित्त सिल्लोड जि. औरंगाबाद येथे येत्या १ ते ५ जानेवारी  दरम्यान ‘कृषी प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. राज्यातील चार कृषी विद्यापीठ आणि महाबीजचे एकूण ६०० स्टॉल्स या प्रदर्शनात लावण्यात येणार आहेत. तसेच, कृषी संबंधीत विविध कंपन्याही सहभागी होणार आहेत. कमी उत्पादन खर्चात किफायतशीर शेती करण्यासाठी लागणारे सर्व मार्गदर्शन याठिकाणी उपलब्ध असेल. या प्रदर्शनात राज्यातील शेतकरी, संशोधक व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. सत्तार यांनी केले.

कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी कृषी विद्यापीठाच्या आजपर्यंतच्या कार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला.

अशी आहे वनस्पतीशास्त्र संशोधन प्रक्षेत्र कार्यालयाची वास्तू

येथील बजाजनगर भागात एकूण ८७७ चौ.मिटर परिसरात कृषी शास्त्रज्ञ निवास आणि वनस्पतीशास्त्र संशोधन प्रक्षेत्र कार्यालयाची इमारत आहे. यात ४ व्हीआयपी तर अन्य ८ असे एकूण १२ कक्ष आहेत. दोन वर्षांत ही इमारत पूर्णत्वास आली असून यासाठी राज्यशासनाकडून २ कोटी ६५ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते.

000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. २२:- ‘लोकमान्य टिळकांचा वारसा लाभलेलं एक लढवय्या नेतृत्व आपण आज गमावलं,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, “लोकमान्य टिळकांचा वारसा असला, तरी आपल्या कामातून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यामुळेच पुणे महापालिकेत सलग चार वेळा नगरसेविका, नंतर पुण्याच्या महापौर आणि आमदार हा प्रवास त्या करू शकल्या. कर्करोगाशी झुंज देत असतानाही राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून आपल्या कर्तव्यभावनेचा परिचय त्यांनी दिला. कर्तव्यनिष्ठ, लढवय्या नेतृत्व आपण गमावले आहे. आमदार मुक्ता टिळक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.”

मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

नागपूर, दि. 22 : पुण्याच्या माजी महापौर आणि भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले आहे, अशा शोकसंवेदना व्यक्त करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, मुक्ताताई या भारतीय जनता पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या होत्या. सुमारे 30 वर्ष त्यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले. पुण्याच्या महापौर म्हणून त्यांनी शहरात विविध विकासकामांना चालना दिली होती. विधानसभा सदस्य म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कर्तव्यांना प्राधान्य दिले. अलीकडेच झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी आजारपणातही मतदानात सहभाग नोंदवून लोकशाहीवरील आपली निष्ठा तसेच पक्षाचा उमेदवार जिंकलाच पाहिजे, यासाठी पक्षनिष्ठा दाखवून दिली होती. मी त्यांना या आजारपणात न येण्याची विनंती करूनसुद्धा त्या दोन्ही निवडणुकीत रुग्णालयातून मतदानाला आल्या होत्या. पुण्यात विविध सामाजिक कामे करताना सर्वसामान्य जनता आणि विशेषतः महिलांच्या जीवनात बदल घडवून आणण्याला त्यांचे प्राधान्य होते. या कठीण प्रसंगात आम्ही सारेच त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबियांना लाभो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

000

युवकांनी जनसामान्यांच्या मूलभूत समस्या घेऊन चळवळ उभी करावी – आमदार प्रणिती शिंदे

नागपूर, दि. 22 :- युवकांनी जनसामान्यांच्या मूलभूत समस्या घेऊन चळवळ उभी करावी, या चळवळीतूनच जनसामान्यांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी मदत होत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.

राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात आज ‘संसदीय कार्यप्रणाली व लोकशाही संवर्धनासाठी युवक चळवळींचे योगदान” या विषयावर आमदार प्रणिती शिंदे  यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार महादेव जानकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, अवर सचिव सुनिल झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित होते.

यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, देशातील सामान्य जनतेच्या विविध प्रश्नावर युवकांनी जागृत राहून चांगल्या भावनेतून काम करणे आवश्यक आहे. या कामातूनच आपले राजकीय भवितव्य घडवायचे आहे. यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. युवकांनी लोकशाहीसाठी मतदार नोंदणीमध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. महिला व युवकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी काम केले पाहिजे. देशात विविध विचारप्रणाली आहेत. आपल्या आवडीच्या व योग्य विचाराप्रणालीत सहभागी होऊन नागरिकांच्या समस्या सोडवून देशातील लोकशाहीसाठी काम करणे आवश्यक आहे. देशात विविध राजकीय पक्षाच्या माध्यमातून युवकांना राजकीय भवितव्य घडविण्यासाठी संधी मिळू शकते. महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण आहे. युवक-युवतींना राजकारणामध्ये येण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठी संधी आहे.

युवकांनी जनमत व कार्यप्रणाली याची सांगड घालून काम करावे. स्वावलंबी होण्यासाठी कठोर मेहनत घेवून सतत प्रयत्न केले पाहिजे. समुपदेशनाद्वारे वैयक्तिक समस्या सोडवाव्यात. त्यासाठी मदत घ्यावी, संकोच बाळगू नये. महिलांचा आदर केला पाहिजे. घरापासूनच महिलांचा सन्मान करणे आवश्यक आहे. समाजाच्या आशा आकांक्षा युवकांच्या हाती असतात. लोकशाही संवर्धनासाठी युवकांनी सतत जागरुक राहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अभ्यासवर्गात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आमदार श्रीमती शिंदे यांनी समर्पक अशी उत्तरे दिली.

यावेळी प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांनी श्रीमती शिंदे यांचा परिचय करुन दिला. अवर सचिव सुनिल झोरे यांनी आभार व्यक्त केले.

००००

दत्तात्रय कोकरे/जिमाअ/

संसदीय अभ्यासवर्गात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे उद्या मार्गदर्शन

नागपूर, दि. 22 : राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 49 व्या संसदीय अभ्यासवर्गात शुक्रवार, दि. 23 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. ‘द्विसभागृह पद्धतीमध्ये परस्परांतील समन्वय आणि संसदीय लोकशाहीतील वरिष्ठ सभागृहाचे महत्त्वपूर्ण योगदान’ या‍ विषयावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मार्गदर्शन करणार आहेत. तर सकाळी 9.30 वा. ‘आदर्श लोकप्रतिनिधी : अपेक्षा आणि वास्तव व संसदीय लोकशाहीत लोकशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ मार्गदर्शन करणार आहेत.

भारतातील संसदीय लोकशाही कशा पद्धतीने कार्यरत आहे, कार्यकारी मंडळावर विधानमंडळामार्फत कशाप्रकारे नियंत्रण ठेवले जाते, त्यासाठी कोणकोणत्या संसदीय आयुधांचा  वापर केला जातो, अर्थसंकल्पीय प्रक्रिया, विधिमंडळाची समिती पद्धती, कायदा तयार करण्याची प्रक्रिया इत्यादी बाबतची प्रत्यक्ष माहिती नामांकित संसदपटू व तज्ज्ञांच्या व्याख्यानांमधून तसेच सभागृहाच्या प्रत्यक्ष कामकाजाच्या अवलोकनद्वारे विद्यार्थ्यांना या व्याख्यानांतून मिळत असते.

००००

दत्तात्रय कोकरे/जिमाअ/22.12.22

 

 

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना – मंत्री शंभूराज देसाई

नागपूर, दि. 22 : “पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत. वेगावर नियंत्रण, लेन कटिंग टाळणे, अवजड वाहनांनी नियम पाळणे या बाबींकडे लक्ष देण्यात येईल”, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

विधानसभा सदस्य भीमराव तापकीर यांनी नियम ९४ अन्वये उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना मंत्री श्री. देसाई बोलत होते.

ते म्हणाले, “रस्ते सुरक्षेसंदर्भात सुधारित धोरण यापूर्वीच तयार करण्यात आले आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभाग, पोलिस, महामार्ग पोलिस, राष्ट्रीय रस्ते विकास यंत्रणा यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील”. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक १७ ऑक्टोबर, २०२२ रोजी बैठक घेऊन यंत्रणेला यासंदर्भात निर्देश दिले असल्याची माहिती मंत्री श्री. शंभूराज देसाई यांनी दिली.

“या महामार्गावर अपघात टाळण्यासाठी जे प्रयत्न करण्यात येत आहेत त्यामुळे सन २०१६ पासून अपघात संख्या आणि अपघातामुळे होणारे मृत्यू यात घट होत असल्याचे दिसून येत आहे. स्पीड गनची संख्या वाढवणे, अवजड वाहने डाव्या मार्गिके मधूनच जातील याकडे लक्ष देणे याबाबत परिवहन विभाग आणि महामार्ग पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, अधिक सुरक्षित प्रवासासाठी ज्या उपाययोजना आवश्यक आहेत त्या केल्या जातील”, असे मंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी विशेष तपास पथकामार्फत चौकशी करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. २२ : “अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूची चौकशी मुंबई पोलीस करत आहे. या विषयासंबंधी कोणाकडे अधिक पुरावे असल्यास सादर करावे. या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) करण्यात येईल”, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.

००००

अर्चना शंभरकर/विसंअ/

विधानसभा प्रश्नोत्तरे

मिशन वात्सल्य योजनेंतर्गत बालसंगोपन अनुदानात वाढ करणार 

– मंत्री मंगल प्रभात लोढा यांची विधानसभेत घोषणा

 

नागपूर, दि. २२ : राज्यात कोरोना कालावधीत विधवा झालेल्या महिलांची उपजीविका आणि अनाथ बालकांसाठीच्या बालसंगोपन योजनेच्या सहायक अनुदानामध्ये २ हजार ५०० रुपयांपर्यंत वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक असून येत्या तीन महिन्यांत सदरहू रक्कम वितरित करण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत दिली.

राज्यात मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत अनुदानात वाढ तसेच पंडिता रमाबाई व्याजमाफी योजना अंमलात आणण्याबाबत सदस्य ॲड.आशिष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री श्री. लोढा बोलत होते.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, कोरोना संसर्गाने कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने विधवा महिलांची उपजीविका आणि अनाथ बालकांच्या संगोपनासाठी मिशन वात्सल्य योजना सुरु करण्यात येणार आहे. बालसंगोपन आणि महिलांच्या रोजगारासाठी पंडिता रमाबाई व्याजमाफी योजना अंमलात आणून या योजनेअंतर्गत मिळणारे सहायक अनुदान १ हजार १०० रुपयांवरून २ हजार ५०० करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. त्यानुसार ही योजना अंमलात आणण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही सुरु आहे.

बालसंगोपन योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाबाबत वाढ करण्याच्या अनुषंगाने सर्व विभागांची सहमती मिळाली आहे. या योजनेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विभागाच्या वतीने राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये या योजनेबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विधवा महिलांचे बचत गट बनवून या गटांना १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येणार असून त्याचे व्याज शासनाच्या माध्यमातून अदा करण्यात येईल, असेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

सध्या राज्यात कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्यांचे आई-वडील मृत्यू पावले आहेत, अशी एकूण 847 प्रकरणे आहेत. तसेच माता किंवा पिता यांच्यापैकी एक मृत्यू पावले आहे अशी एकूण 23 हजार 533 प्रकरणे आहेत. एकूण 24 हजार 380 पैकी 1100 रुपये प्रमाणे 19 हजार प्रकरणात लाभ देण्यात आला आहे. उर्वरित प्रकरणे लवकरच निकाली काढण्यात येतील. कोरोनात ज्यांनी माता किंवा पिता गमावले आहेत  त्यांच्यासाठी बचत गट स्थापन  करण्यात येणार आहेत. कोरोना काळात ज्याचे माता किंवा पिता यापैकी कोणी मृत्यू पावला असेल अशा परिवारातील ज्यांनी बँकेकडून कर्ज घेतले आहे, त्यांच्या वरील व्याज कमी करण्याबाबत बँकेशी पत्रव्यवहार करण्यात येईल,  असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या चर्चेत सदस्य सर्वश्री संजय गायकवाड, मोहन मते, राम सातपुते यांनी सहभाग घेतला.

0000

प्रवीण भुरके/स.सं

राज्यातून गोवरचे समूळ उच्चाटन करणार – मंत्री डॉ.तानाजी सावंत

नागपूर, दि. 22 : राज्यातील 142 ठिकाणी तसेच शहरी भागात गोवर आजाराचा उद्रेक झाला आहे. ठाणे, भिवंडी, मालेगाव, वसई विरार अशा विविध ठिकाणी  उपाययोजना करण्यासाठी कृती दलाची (टास्क फोर्स) निर्मिती केली आहे. या माध्यमातून  विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आरोग्य विभागाने लसीकरणाला प्राधान्य दिले आहे. पुढील दहा ते पंधरा दिवसांत गोवर आजाराची रुग्ण संख्या 100 टक्के आटोक्यात आणू, असे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितले .

राज्यात साथ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपायोजनांबाबत सदस्य रमेश कोरगावकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री डॉ. सावंत बोलत होते.

मंत्री डॉ. सामंत म्हणाले की,आरोग्य विभाग धोरणात्मक निर्णय घेऊन गतीने काम करत आहे. संबंधित योजना जनतेपर्यंत पोहोचतात की नाही यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा सहभाग घेऊन त्या विभागातील तज्ज्ञांची समिती गठित करण्यात येईल. या समितीच्या मार्गदर्शनाखाली लोकांचे आरोग्य कसे सुधारेल, याबाबत उपाययोजनांसाठी महिनाभरात धोरण आणण्यात येईल.

या चर्चेत सदस्य सर्वश्री योगेश सागर, अबू आझमी, ॲड. आशिष शेलार, यामिनी जाधव, रइस शेख यांनी सहभाग घेतला.

००००

आरोग्य विभागात भरती प्रक्रिया

आरोग्य विभागात भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही.

बालकांच्या लसीकरणावर कृती दलाच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. या पथकाला गोवरचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे निर्दशनास येत आहे. तसेच घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी आरोग्य पथकांची संख्या वाढविण्यात आली आहे.

उंदीर मारण्यासाठी केलेल्या खर्चाची चौकशी

मुंबई महानगरपालिकेने उंदीर मारण्यासाठी केलेल्या खर्चाची बाब गंभीर असून याबाबत समिती नेमून चौकशी केली जाईल, असेही मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

0000

ताज्या बातम्या

पहिल्या स्मार्ट इंटेलिजंट सातनवरी या गावातील डिजिटल उपक्रमामध्ये ग्रामस्थानांचा सहभाग आवश्यक – विजयलक्ष्मी बिदरी

0
ग्रामस्थांसोबत संवाद, इंटरनेट, वायफाय सुविधेचा वापर करा; ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत विविध कंपन्यांचा सहभाग नागपूर, दि. 8: देशातील सर्वात स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून निवड झालेल्या...

गोडोली तळे सातारच्या सौंदर्यात भर घालेल – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा, दि.8 : सातारा येथील गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी करुन सातारा नगरपालिकेने अत्यंत चांगल्या...

ग्रामीण भागातील प्रत्येक भगिनी स्वयंपूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील – ग्राम विकास मंत्री जयकुमार...

0
सातारा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील प्रभाग संघांना आज रक्षाबंधन सणानिमित्त ऑनलाइन राज्यस्तरीय समुदाय निधी वितरण सोहळ्यामध्ये ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या...

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र व राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी – मंत्री...

0
नवी दिल्ली, 8:- शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय...

पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश; ८५९.२२ कोटी...

0
उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जल सिंचनासाठी महत्वपूर्ण निर्णय मुंबई, दि. ८:- अमळनेर तालुक्यातील (जि. जळगाव) पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत...