शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
Home Blog Page 1699

माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याचे कौशल्य आत्मसात करा – संचालक हेमराज बागूल

नागपूर, दि. २७ : “माध्यमांचा परिघ वेगाने विस्तारतो आहे. त्यांचे प्रवाह बदलत आहेत. या परिस्थितीत विश्वासार्ह, अधिकृत, प्रमाणित माहितीला महत्व प्राप्त झाले आहे. अशा माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याचे कौशल्य आत्मसात करा”, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक(प्रशासन) हेमराज बागूल यांनी विद्यार्थ्यांना केले.

संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयमार्फत आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ आणि प्रिमिअर ॲकॅडमी, नागपूर येथील विद्यार्थ्यांची विधान भवन, नागपूर येथे अभ्यास  भेट आयोजित करण्यात आली होती. यावेळी माहिती व जनसंपर्क शिबिर कार्यालयात आयोजित ‘शासन आणि जनसंपर्क’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे उपसचिव विलास आठवले, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने, प्रा. सुरेश जाधव, प्रा. विभा जाधव, प्रा.श्रृती इंगोले उपस्थित होते.

संचालक श्री. बागूल म्हणाले, “माध्यम क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. मुद्रित, दृकश्राव्य, समाजमाध्यमांचा प्रभाव वाढतो आहे. या बदलत्या काळात  अधिकृत, प्रमाणित माहितीला महत्व प्राप्त झाले आहे. या माहितीवर प्रक्रिया केल्याशिवाय माहितीचे ज्ञानात रूपांतर होत नाही. बाजारप्रधान जगात, प्रतिमानिर्मितीच्या युगात तुम्हाला स्वत:चे भवितव्य घडवायचे आहे. साहित्य, अुनभूती, चिंतनाच्या माध्यमातून मानसिक जडणघडण होत असते. विद्यार्थ्यांचा मानसिक विकास महत्वाचा असून त्यांचे सृजन आणि सर्जन विकसित झाले पाहिजे. त्यासाठी वाचनाबरोबर स्वत:शी बोला”.

“विस्तारलेल्या साधनांचा उपयोग योग्य पद्धतीने करा. मुद्रित, दृकश्राव्य माध्यमे, समाज माध्यम, जनसंपर्क क्षेत्र, संशोधन, संवाद या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. संयम ठेवून स्वत:ची कौशल्ये विकसित करा. त्यामुळे तुम्हाला या नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच समाज माध्यमांचा अतिरेकी वापर टाळावा”, असेही श्री. बागूल यांनी सांगितले.

‘विधिमंडळ समिती पद्धती’ या विषयावरील व्याख्यानात विधानमंडळ सचिवालयातील उपसचिव विलास आठवले म्हणाले की, विधिमंडळ समिती म्हणजे विधानमंडळाची प्रतिकृती असते. समित्यांचे विविध प्रकार आहेत. सार्वजनिक हितासाठी समित्यांचे कामकाज सुरू असते.  लोकलेखा समिती, अंदाज समिती, सार्वजनिक उपक्रम समिती अशा विविध समित्यांच्या माध्यमातून प्रशासनावर अंकुश ठेवला जातो. विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून सभागृहाचे कामकाज सुरू असते. प्रशासनावरील नियंत्रणासाठी समिती कार्यपद्धती महत्त्वाची समजली जाते.

‘विधिमंडळ कामकाज आणि प्रसार माध्यमांची भूमिका’ या विषयावरील व्याख्यानात वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने म्हणाले की, लोकशाही मजबूत करण्यात प्रसारमाध्यमांचे मोठे योगदान आहे. माध्यमे अनेक घटनांचे साक्षीदार आहेत. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, समाजसुधारक आगरकर, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेत मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या लेखणीला नैतिक अधिष्ठान होते. राज्यघटनेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. त्याप्रमाणे पत्रकारिता अभिव्यक्तीचे कार्य करते आहे. माध्यमे आणि शासन परस्परांशी मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात. त्यामुळे लोकशाही टिकून राहण्यास मदत होते.

लोकानुरंजन न करता लोकप्रबोधनात्मक बातम्या देण्यासाठी पुढाकार घ्यावा. सनसनाटीशरण न होता लोकप्रबोधनात्मक पत्रकारिता करा, असे आवाहनही श्री. मदाने यांनी विद्यार्थ्यांना केले.

यावेळी अरफान पठाण, कीर्ती जाधव, कल्याणी वरकुडे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

००००

नागपूर विधानभवन मध्यवर्ती सभागृहासाठी जमीन अधिग्रहणाबाबत त्वरित कार्यवाही करावी

नागपूर, दि. 27 : नागपूर येथील विधानभवन येथे मध्यवर्ती सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी जमीन अधिग्रहण करणे तसेच मुंबईतील मलबार हिल येथील अजंठा शासकीय निवासस्थान व त्या अखत्यारितील मोकळी जागा ही महाराष्ट्र विधिमंडळास वर्ग करण्याबाबत आज विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यासंदर्भात पुढील एक महिन्यात कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असे निर्देश यावेळी अध्यक्ष श्री. नार्वेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

विधानभवन येथे झालेल्या या बैठकीस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, नागपूर जिल्हाधिकारी विपिन इटनकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अध्यक्ष श्री. नार्वेकर म्हणाले की, नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशन घेण्यासाठी जागा अपुरी पडते. या ठिकाणी विधिमंडळाची संयुक्त बैठक घ्यायची असल्यास अडचण होते. त्यामुळे येथे मध्यवर्ती सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी बाजूच्याच शासकीय मुद्रणालयाची अतिरिक्त जमीन घेणे प्रस्तावित आहे. ही जमीन अधिग्रहण करण्याबाबत त्वरित आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. तसेच मुंबई येथील अजिंठा शासकीय निवासस्थान हे मोडकळीस आले असून या ठिकाणी विधिमंडळ पिठासीन अधिकारी म्हणजेच विधान परिषद सभापती, उपसभापती, विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते यांच्यासाठी निवासस्थान बांधणे शक्य होईल. ही जागा महाराष्ट्र विधिमंडळास वर्ग करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. यासंदर्भात पुढील एक महिन्यात योग्य ती कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असे निर्देश श्री. नार्वेकर यांनी यावेळी दिले.

0000

राजू धोत्रे/विसंअ

राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गाचा समारोप

नागपूर, दि. 27 :- राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने 49 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे विधानभवन नागपूर येथे 20 ते 27 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले. या संसदीय अभ्यासवर्गाचा आज विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, अवर सचिव सुनील झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते यांच्या उपस्थितीत समारोप झाला.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते अभ्यासवर्गात सहभागी झालेल्या विद्यार्थी व प्राध्यापकांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या प्रा.डॉ.विद्या चौरपगार यांनी राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेने या अभ्यासवर्गाचे आयोजन केल्‍याबद्दल आभार व्यक्त केले. अवर सचिव सुनील झोरे यांनी अभ्यासवर्ग यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

००००

दत्तात्रय कोकरे/जि.मा.अ.

स्वातंत्र्य, मजबूत संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांमुळे संसदीय लोकशाहीवरील विश्वास वाढेल – अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

नागपूर, दि. 27 :- नागरिकांचे स्वातंत्र्य, मजबूत संविधान आणि त्यावर विश्वास ठेवणारे नागरिक यामुळे संसदीय लोकशाहीवरील विश्वास वाढत असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर  यांनी केले.

राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘विधिमंडळ : जनतेच्या इच्छा आकांक्षांच्या अभिव्यक्तीचे व्यासपीठ’ या विषयावर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महादेव जानकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, अवर सचिव सुनिल झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित होते.

 

ॲड. नार्वेकर म्हणाले, “संसदीय लोकशाही प्रणालीत लोकप्रतिनिधी सभागृहात जनतेच्या भावना मांडत असतात. त्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. जनतेचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याला लोकप्रतिनिधींचे प्राधान्य असते. राज्य व देशहिताच्या प्रश्नांवर चर्चा होत असते. सामूहिकपणे राज्याच्या हिताचे निर्णय घेतले जातात. विधिमंडळे संविधानाने दिलेल्या तरतुदीनुसार काम करीत असतात. कायदा संविधानाच्या विरुद्ध असेल तर न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. त्यामुळे संविधानाने दिलेल्या अधिकारातच विधिमंडळे कामकाज करीत असतात. विधिमंडळ हे जनतेच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा व्यक्त करण्याचे व कायदे करण्याचे व्यासपीठ आहे”.

“नागरिकांनी स्वातंत्र्य उपभोगताना घटनेने दिलेल्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये पार पाडावीत, तरच आपली लोकशाही सुरक्षित राहील. लोकशाहीचे महत्त्व अनुभवण्यासाठी अधिकार व कर्तव्ये माहिती असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी शिक्षण हे महत्वाचे आहे. देशातील सर्व नागरिकांना शिक्षित करण्यासाठी कायदा केलेला आहे. भारत हा प्रबळ देश बनविण्यासाठी शिक्षित नागरिक असणे आवश्यक आहे. पारदर्शकता ही लोकशाहीत महत्त्वाची असते. आपल्या संसदीय लोकशाहीला असलेली गौरवशाली परंपरा सुरु राहील आणि विधिमंडळावर विश्वास वाढेल, असे कार्य आपल्या युवा पिढीकडून व्हावे”, अशी अपेक्षाही ॲड.नार्वेकर यांनी व्यक्त केली.

यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना ॲड.नार्वेकर यांनी समर्पक अशी उत्तरे दिली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थिनी कु.प्रेरणा चौधरी यांनी आभार व्यक्त केले.

००००

दत्तात्रय कोकरे/जिमाअ.

सीमा भागातील मराठी बांधवांसाठी घेतलेल्या निर्णयांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घोषणा

नागपूर, दि. २७ : कर्नाटक शासनाच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. सीमा भागातील मराठी बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयांचा आणि सुरू केलेल्या योजनांविषयी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी माहिती दिली.

      सीमा भागातील मराठी बांधवांना संरक्षण मिळावे व त्यांची प्रगती व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाकडून करण्यात येत असलेल्या विशेष प्रयत्नांबाबतची माहिती :

  • महाराष्ट्र – कर्नाटक सीमा आंदोलनामध्ये ज्या व्यक्तींनी बलिदान दिले आहे, त्या व्यक्तींना “हुतात्मा” म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांच्या जवळच्या एका नातेवाईकास स्वातंत्र्य सैनिकाप्रमाणे दरमहा २० हजार निवृत्ती वेतन लागू करण्याचा निर्णय उच्चाधिकार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
  • सद्यस्थितीत कोल्हापूर येथे ८, मुंबई व मुंबई उपनगर येथे ३, पुणे व रत्नागिरी येथे प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण १३ लाभार्थी निवृत्तीवेतन घेत आहेत.
  • सीमावादीत ८६५ गावांतील मराठी भाषिक उमेदवारांना सेवाभरती नियमातील सर्व अटींची पूर्तता करीत असल्यास महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी अर्ज करण्यास व गुणानुक्रमे निवड होत असल्यास नेमणुकीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. महाराष्ट्रात सलग १५ वर्षे वास्तव्याची छाननी करताना ८६५ गावांतील १५ वर्षांचे वास्तव्य विचारात घेऊन वास्तव्याचा विहित नमुन्यातील दाखला सक्षम अधिकाऱ्‍यास सादर करणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्रातील गृहनिर्माण मंडळामार्फत गाळेवाटपाचे अर्ज करताना कर्नाटक राज्यात असलेल्या व महाराष्ट्र शासनाने दावा केलेल्या सीमावादीत ८६५ गावांतील १५ वर्षे वास्तव्य हे त्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य असल्याचे समजण्याबाबत गृहनिर्माण विभागाला सूचना दिल्या आहेत.
  • पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य उपविभागामार्फत दरवर्षी प्रयोगात्मक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सीमाभागातील नोंदणीकृत संस्था शासन निकषानुसार सहाय्यक अनुदान मिळण्यास पात्र होतील.
  • डी.एड., पदविका अभ्यासक, डी.एड. शिक्षक, कर्नाटकातील मराठी माध्यमाच्या टी.सी.एच. अर्हता धारकास शिक्षणसेवक पदासाठी गुणवत्तेनुसार पात्र ठरविण्याबाबत, शालेय शिक्षण विभागाकडून सीमावादीत भागातील उमेदवारांना सवलती देण्यात आलेल्या आहेत.
  • सीमावादीत भागातील मराठी भाषिक उमेदवारांना इतर मंत्रालयीन विभागांकडूनही सवलती देण्यात येतात. उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत या भागातील उमेदवारांसाठी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) पूर्व प्रशिक्षण केंद्रात ५ टक्के राखीव जागा व अभियांत्रिकी पदवी परिक्षेसाठी २० जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
  • वैद्यकीय शिक्षण विभागाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत ८ जागा, दंत महाविद्यालयांत २ जागा व शासकीय अनुदानित आयुर्वेदिक महाविद्यालयांत ५ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
  • सीमाभागातील अल्पभाषिक नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणे व घटनेनुसार द्यावयाच्या सुविधा/ सवलती यांचा आढावा घेऊन सवलती प्रस्तावित करण्यासाठी अपर मुख्य सचिव (अल्पसंख्याक विकास विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे.
  • महाराष्ट्र – कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी भाषेचा विकास, संवर्धन, संगोपन आणि अभिवृध्दी होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागातील ८६५ गावांमध्ये मराठी भाषिकांसाठी कार्य करणाऱ्‍या मराठी संस्थांना/ मंडळांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर उपक्रम राज्य मराठी विकास संस्थेमार्फत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • मराठी भाषेचा विकास, संवर्धन, संगोपन आणि अभिवृध्दी होण्याच्या दृष्टीने प्रत्येक उपक्रमास कमाल १ लाख रुपयांच्या मर्यादेत अनुदान मंजूर करण्यात येणार आहे. एका मराठी भाषिक संस्थेने/ मंडळाने एकापेक्षा जास्‍त उपक्रम राबविल्यास अशा उपक्रमांसाठी मिळून १ कोटीच्या कमाल मर्यादेत अनुदान मंजूर करण्याचा निर्णय
  • महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक जनतेवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबत, ७/१२ उतारे तसेच कार्यालयातील सूचना फलक मराठी भाषेत लावणे, मराठी भाषेचा सर्व स्तरावर उपयोग करणे तसेच कन्नड भाषेची मराठी भाषिक जनतेवर सक्ती न करणे यासाठी कर्नाटक शासनाशी समन्वय साधण्याचा निर्णय.
  • मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या बैठकीत महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागातील ८६५ गावांत महात्मा फुले जन आरोग्य योजना राबविण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागास निर्देश.
  • मुख्यमंत्री सहायता देणगी या योजनेत सीमाभागातील ८६५ गावांचा पुन्हा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेवटच्या घटकाला समोर ठेवून अर्थसंकल्प सादर होणे गरजेचे – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. २७ : राज्याची सर्वांगीण प्रगती व्हावी तसेच कल्याणकारी राज्याची निर्मिती करत असताना त्याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, गरीबी, निरक्षरता दूर व्हावी याअनुषंगाने अर्थसंकल्पाची आखणी होणे गरजेचे असते. शासनाचा प्रत्येक पैसा हा सर्वसामान्यांच्या इच्छा-आकांक्षांच्या पुर्ततेसाठी खर्च व्हावा यासाठीचे सर्वात महत्त्वाचे आयुध म्हणजे अर्थसंकल्प होय, असे प्रतिपादन वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.

राज्यातील विविध विद्यापीठांच्या राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विषयातील विद्यार्थ्यांसाठी विधानभवन येथे राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत आयोजित संसदीय अभ्यासवर्गात ‘अर्थसंकल्पाची प्रक्रिया – कल्याणकारी राज्यनिर्मितीचे महत्वपूर्ण साधन’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, अवर सचिव सुनिल झोरे यांच्यासह विविध विद्यापीठांचे विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, देशाच्या जीडीपीमध्ये १५ टक्के योगदान महाराष्ट्राचे आहे. देशातील १०३ पैकी २७ युनिकॉर्न्स महाराष्ट्रात आहेत. देशात आणि राज्यात अर्थसंकल्पातून याला चालना देण्यात आली आहे. अर्थसंकल्प सादर करताना हा जनतेचा पैसा आहे, हा दृष्टीकोन असायला पाहिजे. प्रत्येक पैशाचा वापर हा कल्याणकारी राज्याच्या दिशेने व्हायला पाहिजे. भविष्याचा द्रष्टीकोन, तत्कालीन प्रश्न आणि आर्थिक द्रष्टीकोनातून अर्थसंकल्पाची मांडणी व्हायला हवी. त्याचबरोबर मर्यादीत साधनसामुग्री आणि अमर्यादित गरजा यांचा तोल राखून अर्थसंकल्प मांडणे गरजेचे असते, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील प्रश्नांचा वेध घेत त्याचबरोबर बदलत्या जगाचा वेध घेत अर्थसंकल्प सादर करावा लागतो. भुकमुक्त समाज, विषमतामुक्त समाज निर्माण करण्याचे उद्दीष्ट असावे. त्याचबरोबर भविष्याचा वेध घेत विचारपूर्वक अर्थसंकल्प मांडावा. निवडणुकीचा वेध घेत अर्थसंकल्प मांडल्यास त्याचे वाईट परिणाम होतात. ग्रेट ब्रिटन, श्रीलंका यांच्यासह युरोपातील अनेक देश याचे दुष्परिणाम भोगत आहेत. त्यामुळे कल्याणकारी राज्यनिर्मितीसाठी शेवटच्या घटकाला समोर ठेवून अर्थसंकल्प सादर होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची विद्यार्थिनी दर्शना खंडीझोड हिने आभार मानले.

००००

इरशाद बागवान/विसंअ/

डॉ. पंजाबराव देशमुख यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

नागपूर, दि.२७ : डॉ. पंजाबराव देशमुख ऊर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाऊसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

येथील शासकीय निवासस्थान रामगिरी येथे झालेल्या या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार सर्वश्री प्रतापराव जाधव, कृपाल तुमाने, भावना गवळी, आमदार कृष्णा खोपडे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनीसुद्धा पुष्प अर्पण करुन भाऊसाहेबांना अभिवादन केले.

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

ठाणे, पालघर जिल्ह्यांतील बुलेट ट्रेन प्रकल्प भू संपादन प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 

नागपूर, दि. २७ : “ठाणे, पालघर जिल्ह्यांतील जमिनी प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी संपादित करण्यात येत आहेत. या भूसंपादनात शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व तक्रारींची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल”, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

ठाणे व पालघर जिल्ह्यांत समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन मार्ग, मुंबई-बडोदा महामार्ग अशा अनेक विकास प्रकल्पांचे काम सुरु आहे. या प्रकल्पांसाठी जमीन संपादन करताना उपविभागीय कार्यालय, भिवंडी या कार्यालयाकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासंदर्भात  विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री विखे पाटील यांनी ही माहिती दिली.

भिवंडी तालुक्यातील जमीन मोबदल्यामध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या फसवणूक प्रकरणी भिवंडीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी आणि विद्यमान उपविभागीय अधिकारी यांना निलंबित करण्याची घोषणा यावेळी महसूल मंत्री श्री विखे पाटील यांनी केली.

तसेच अंजूरगाव येथील शेतकरी उंदऱ्या दोडे यांच्या मृत्यूची विभागीय आयुक्तमार्फत चौकशी करण्यात येईल. या चौकशीमध्ये शेतकऱ्यांच्या मृत्यूस संबंधित अधिकारी जबाबदार असतील तर त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

भूसंपादनामध्ये ज्या शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही त्यांना लाभ देण्याची तात्काळ कार्यवाही करण्यात येईल, असेही श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

शेतकरी दोडे यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना आकस्मिक मदत करण्याचे तसेच त्यांच्या जमिनीचा मोबदला संबंधितांना मिळेल, या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

राष्ट्रीय प्रकल्पास रेडिरेकनरनुसार जमिनीचा मोबदला देण्यासाठी शासन सकारात्मक – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नागपूर, दि. २७ : राज्यातील राष्ट्रीय प्रकल्पांना चालना मिळावी, प्रकल्पाची किफायतशीर किंमत असावी यासाठी शासन विद्यमान अधिसूचनेनुसार  राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांलगत असलेल्या जमिनी भूसंपदित करताना त्याचा मोबदला बाजारभावाने देण्यात येतो. तथापि, या रेडीरेकनरच्या मूलभूत प्रक्रियेत बदल करण्यासाठी शासनाची भूमिका सकारात्मक असेल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

राष्ट्रीय, राज्य महामार्ग लगत असलेल्या जमिनीचा रेडिरेकनरचा दर तसेच कृषक दर वेगवेगळा असतो. त्यामुळे जमिनी संपादित करताना वेगवेगळा दर निश्चित केला जातो. महामार्ग प्रकल्पासाठी भूसंपादन करताना त्याचा दर वेगवेगळ्या ॲथॉरिटीकडून केला जातो. त्यामुळे या वेगवेगळ्या किमतीसाठी धोरण ठरविले जाईल, असे मंत्री श्री.विखे पाटील यांनी सांगितले.

विधानपरिषद सदस्य जयंत पाटील, एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे यांनीही यासंदर्भातील प्रश्न विचारला होता.

000

सप्टेंबर २०२३ पर्यत लम्पी आजाराची लस महाराष्ट्रात तयार होणार – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची विधानपरिषदेत माहिती

 

नागपूर, दि. २७ : राज्यातील 33 जिल्ह्यात एक लाख 78 हजार 72 गोवर्गीय जनावरे लम्पी चर्मरोगाने बाधित झाले होते. मात्र वेळेत 100 टक्के लसीकरण केल्याने पशुधनाचा मृत्यू कमी झाला आहे. सप्टेंबर 2023 पर्यंत लसीकरणात महाराष्ट्र स्वयंपूर्ण होणार असून राज्यात ही लस तयार होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लम्पी चर्मरोगाबाबत प्रश्न उपस्थित केला होता, प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री विखे-पाटील बोलत होते.

श्री. विखे-पाटील यांनी सांगितले की, राज्यातील काही जिल्ह्यात लम्पी आजार बळावला होता. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार तातडीने लसीकरणाचा निर्णय घेतला. राज्य शासनाने 100 टक्के लसीकरण गतीने केल्याने पशुधनाचा मृत्यू दर कमी झाला. यामध्ये राज्याने विशिष्ट पद्धती अवलंबल्याने लसीकरण पूर्ण झाले. प्रत्येक जिल्ह्यात औषध बँक आणि तीन कोटी रुपये दिले. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने स्वीकारल्या आहेत.

आर्थिक मदतीबाबत शासन सकारात्मक

पशुधनाचा मृत्यू झाल्यास राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषानुसार अर्थसाहाय्य देण्यात येत आहे. यामध्ये मृत गाय 30 हजार, बैल 25 हजार आणि वासराला 16 हजार रुपये देण्यात येत आहे. मात्र यामध्ये आणखी वाढ करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असेही श्री विखे पाटील यांनी सांगितले.

कायमस्वरूपी विमा योजना सुरू करणार

राज्यात पशुधनाला अनेक आजरांचा सामना करावा लागतो. यात लाखो रुपयांचे पशुधन दगावण्याची शक्यता असते. यामुळे पशुपालकाचे नुकसान होऊ नये यासाठी कायमस्वरूपी मदत व्हावी म्हणून सर्व जनावरासाठी व्यापक स्वरूपात विमा योजना सुरू करण्याचा विचार असल्याचे श्री विखे पाटील यांनी उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

आतापर्यंत 3383.85 लाख रुपयांचा निधी मृत पशुधनाच्या पशुपालकांना वाटप केला आहे. उर्वरित पशुपालकांना 15 दिवसात मदत देण्यात येईल. पशुवर स्वतः उपचार केले असल्यास शेतकऱ्यांना योग्य परतावा दिला जाईल. शिवाय पशुसंवर्धन दवाखान्यातील रिक्त जागा येत्या दोन महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतील, असेही उप प्रश्नाला उत्तर देताना श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सतेज पाटील, गोपीचंद पडळकर, अमोल मिटकरी, प्रवीण दराडे, महादेव जानकर, एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.

०००

संजय ओरके/विसंअ/

विधानसभा प्रश्नोत्तरे

मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर अधिसंख्य पदनिर्मिती; उर्वरित उमेदवारांसाठीही अधिसंख्य पदे निर्माण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

नागपूर, दिनांक २७: मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्यामुळे उमेदवारांना आर्थिक मागास गटातून नियुक्ती दिली. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आल्यानंतर अधिसंख्य पदे निर्माण केली. उर्वरित उमेदवारांसाठीही अधिसंख्य पदे निर्माण करू, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  आज विधानसभेत दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अभियांत्रिकी  (स्थापत्य) सेवा परीक्षा सन २०१९ मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या अनुषंगाने सदस्य धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उप मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री म्हणाले की, मराठा आरक्षण कायदा  झाल्यानंतर राज्याने आर्थिक मागास निकषानुसार उमेदवारांना नियुक्ती दिली. दरम्यानच्या काळात हा कायदा रद्द झाला. त्यामुळे या निवड झालेल्या उमेदवारांना अधिसंख्य पद निर्मिती करून नियुक्ती देण्यात आली. स्थापत्य सेवेतील काही उमेदवारांना आपण नियुक्ती दिली. मात्र इतर उमेदवारांनी मॅट मध्ये दाद मागितली. याप्रकरणी कोणावर अन्याय होऊ नये अशी राज्य शासनाची भूमिका असल्याने या प्रकरणात चांगला वकील लावून न्यायालयात भूमिका मांडणे आणि या उमेदवारांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करून त्यांना सामावून घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

या वेळी सदस्य अशोक चव्हाण यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

000

दीपक चव्हाण/विसंअ

खडखड नळ पाणीपुरवठा योजना मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे कंत्राटदारास आदेश – मंत्री उदय सामंत

नागपूर, दिनांक २७: जव्हार (जि. पालघर) शहराला पाणीपुरवठा करणारी खडखड नळपाणी पुरवठा योजना मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत. मुदतीत योजना पूर्ण नाही केल्यास प्रतीदिन दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य सुनील भुसारा यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात या संदर्भात प्रश्न मांडला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. सामंत बोलत होते.

श्री.सामंत म्हणाले की, योजना गतीने मार्गी लागावी यासाठी काही अटींवर या योजनेला मान्यता देण्यात आली. आता या योजनेतील पाण्याचा उपसा करणे, शुद्धीकरण आदींसाठी आवश्यक जागा ताब्यात आल्या आहेत आणि काम सुरू करण्यात आले आहे. या योजनेसाठी १७ कोटी ३६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री श्री. सामंत यांनी दिली.

या प्रश्नावरील चर्चेत सदस्य श्रीमती  मनीषा चौधरी, सर्वश्री प्राजक्त तनपुरे, बच्च कडू, संदीप क्षीरसागर आदींनी सहभाग घेतला.

000

दीपक चव्हाण/विसंअ

अनियमित वाहन नोंदणी प्रकरणी ५ कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू – मंत्री शंभूराज देसाई

 

नागपूर, दि. २७ : “उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सन २०१७ ते २०२० या कालावधीत शुल्क व कराचा भरणा न करता एकूण ११६ वाहनांची अनियमित नोंदणी झाल्याचे निदर्शनास आले असून ही वाहने संगणक प्रणालीवर ब्लॅक लिस्ट करण्यात आली आहेत. याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे”, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभेत आज सदस्य वैभव नाईक यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. देसाई बोलत होते. त्यांनी सांगितले, की उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सन २०१७ ते २०२० या कालावधीत शुल्क व कराचा भरणा न करता ११६ वाहनांची नोंदणी प्रकरणी परिवहन कार्यालयातील एकूण पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. तसेच चार खासगी व्यक्तींच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. निलंबित कर्मचाऱ्यांना आयुक्त, परिवहन यांनी सेवेत पुन:र्स्थापित केले आहे. त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भास्करराव जाधव यांनी सहभाग घेतला.

०००००

गोपाळ साळुंखे/स.सं.

विधानसभा लक्षवेधी

पर्यावरणाचा समतोल राखून त्र्यंबकेश्वरचा विकास करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दि. 27 : “पर्यावरणाचा समतोल राखून त्र्यंबकेश्वरचा विकास केला जाईल,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत एका लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील पाण्याची मागणी वाढली आहे. या वाढीव पाण्याच्या मंजुरीसाठी तसेच इतर सोयीसुविधांसाठी लवकरच जिल्हाधिकारी आणि संबंधित यंत्रणांच्या सोबत बैठक घेतली जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लक्षवेधीच्या एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

सदस्य  हिरामण खोसकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षावेधीवरील चर्चेत  छगन भुजबळ यांनी सहभाग घेतला.

००००

अर्चना शंभरकर/विसंअ

 

रेल्वे नजीकच्या झोपडपट्टीसंदर्भात कायमस्वरुपी तोडगा काढणार –  मंत्री उदय सामंत

नागपूर दि. 27; मुंबईतील रेल्वे नजीकच्या झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासंदर्भात कायमस्वरुपी तोडगा काढण्याची शासनाची भूमिका असून, आवश्यकता भासल्यास मुंबईतील सर्व आमदारांची मा. मुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक बोलावू आणि या बैठकीला रेल्वे तसेच इतर संबधित यंत्रणांना निमंत्रण देण्यात येईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एका लक्षवेधीला उत्तर देतांना सांगितले.

यासंदर्भात सदस्या श्रीमती मनिषा चौधरी, ॲड. पराग अळवणी यांनी लक्षावेधी उपस्थित केली होती.

श्री. सामंत पुढे म्हणाले, “रेल्वे नजिकच्या झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासंदर्भात सध्या न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही केली जाईल. यासाठी रेल्वे बोर्डाने या विषयावर सहानुभूतीपुर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे.  झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, एम एम आर डी ए आणि रेल्वे बोर्ड यांची एकत्रित बैठक घेऊन सूचना देण्यात येतील” असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

००००

अर्चना शंभरकर/विसंअ

 

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या विविध रस्त्यांच्या विकासकामांची चौकशी करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

 

नागपूर, दि. २७ : नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या जिल्हा परिषदेच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध रस्त्याची विकास कामांबाबत एक महिन्यात चौकशी समिती नियुक्त करून  योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत दिली.

याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य जयकुमार रावल यांनी उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना श्री. चव्हाण बोलत होते.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, मे. निलेश इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीला कामे दिली गेली आहेत, ती वेगवेगळ्या विभागाची कामे आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, व इतर कामे आहेत. ज्या कामाची सुरुवात झाली नसेल अशा कामांचे  कार्यादेश दिले जाणार नाहीत. हे काम करत असताना कंपनीने चुकीचे कागदपत्रे सादर केल्याबाबत इतर विभागातून अहवाल मागविण्यात आला आहे. चुकीच्या पद्धतीने काम झाली असल्यास, समितीमार्फत अभियंता सार्वजनिक बांधकाम, अभियंता नांदेड व अभियंता धुळे यांची सर्व कागदपत्रे तसेच नियमाप्रमाणे कामकाज झाले आहे का नाही हे तपासण्यात येईल.  या कामात हलगर्जीपणा झाला आहे का, हे तपासून दोषीवर कारवाई केली जाईल.

या लक्षवेधी सूचनेवरील सर्चेत सदस्य राजेश पाडवी, यशोमती ठाकूर यांनी सहभाग घेतला होता.

गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी उपलब्ध करून देणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

 

नागपूर, दि. २७ : मुख्यमंत्र्यांनी दि. १७ सप्टेंबर २०२२ रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात गुप्तेश्वर मंदिराच्या संवर्धनाबाबत घोषणा केली आहे. या मंदिराच्या जतन व दुरुस्तीसाठी रु.२१ कोटी ०२ लाख ७० हजार ७४६/- इतक्या रकमेचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. हा निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली.

मुख्यमंत्री यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात पुरेसा निधी देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी असलेला आवश्यक २१ कोटी रुपयाचा निधीचा प्रस्ताव अर्थ विभागाकडून सांस्कृतिक विभाग प्रलंबित असल्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य रत्नाकर गुट्टे यांनी उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, गड किल्ले संरक्षित स्मारकासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समिती मधून तीन टक्के निधी याप्रमाणे पुढील तीन वर्षा करीत या विकास कामासाठी 1 हजार कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने तरतूद केली आहे.

श्री. महाकाली, श्री. मार्कंडेश्वर यांची देखभाल दुरुस्तीचे काम भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे होते. हे काम राज्य सरकार च्या अखत्यारीत करण्याची मागणी केंद्रसरकार कडे केली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गुप्तेश्वर मंदिर हे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात धारासूर या गावात आहे. हे शिवमंदिर असून गोदावरी नदीच्या काठावर आहे. या मंदिराची निर्मिती यादव कालखंडात १२-१३ व्या शतकात झाली आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून पूर्वेस मुखमंडप, दक्षिण व उत्तर बाजूस अर्धमंडप, सभामंडप अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिर २.४५ मी. उंच अधिष्ठानावर स्थित असून मंदिराचे बांधकाम काळ्या दगडातील सुष्कसांधी व शिखर विटांमध्ये असून ते चुन्याच्या बांधकामातील आहे. अधिष्ठानाला सुंदर अशी हत्तीका व गर्भगृहाच्या बाह्य बाजूने ३७ कोरीव मुर्त्या आहेत. यामध्ये विष्णु, गणपती व सुरसुंदरीच्या प्रतिमा आहेत. हे मंदिर शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. गुप्तेश्वर मंदिराच्या संवर्धनासाठी अंदाजपत्रक  रू. १५.०० कोटीपेक्षा अधिक रकमेचे असल्याने त्यास उच्चस्तर सचिव समितीची मान्यता घेण्यात येत आहे.

तसेच १५ व्या वित्त आयोगांतर्गत गुप्तेश्वर मंदिराच्या संवर्धनासाठी रु.८.०० कोटीची तरतूद प्रस्तावित करण्यात आली होती. तथापि, १५ व्या वित्त आयोगांतर्गत केंद्र शासनाकडून यासाठी निधी मंजूर झालेला नाही.

सदस्य श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर, देवराव होळी, मनीषा चौधरी या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सहभाग घेतला.

00000

 

चेंबूर येथील भूखंडावर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे सर्वेक्षण करणार – मंत्री शंभूराज देसाई

नागपूर, दि. २७ : चेंबूर  येथील भूखंडावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना संपूर्ण क्षेत्राचे सर्वेक्षण करुन तिथे वास्तव्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे योग्य व कायदेशीर पुनर्वसन करण्यासाठी तसेच या संपूर्ण क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी वस्तुस्थितीदर्शक सर्वेक्षण होणे गरजेचे आहे, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.

तसेच येथील शिल्लक जमीन, हस्तांतरण केलेली जमीन, एकूण आकडेवारी याची सविस्तर तपासणी करून निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

चेंबूर येथील भूखंडावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याच्या दृष्टीने सदस्य प्रकाश फातरपेकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना मंत्री श्री. देसाई बोलत होते.

मंत्री श्री देसाई म्हणाले की, पाकिस्तानातून आलेल्या विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी राज्यात विविध ठिकाणी ३१ वसाहती निर्माण करण्यात आल्या. त्यापैकी एक वसाहत मौजे वाढवली, चेंबूर येथे आहे. झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून दि. २४ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु, झोपडपट्टी धारकांनी विरोध केल्याने सर्वेक्षणाचे काम थांबविण्यात आले होते. त्यानंतर झोपडीधारकांसोबत या कार्यालयात सर्वेक्षणाबाबत तीन वेळेस बैठक घेण्यात आली. ही सर्व कामे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाशी निगडीत आहेत. मदत व पुनर्वसन विभाग आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या एकत्रित सहाय्याने हा प्रकल्प राबविणे गरजेचे असल्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणास विनंती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. या जमिनी फ्री होल्ड करण्याबाबतची बाब महसूलमंत्री  यांच्या निर्दशनास आणून  व याबाबत लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेतली जाईल, असेही श्री. देसाई यांनी सांगितले.

या चर्चेत सदस्य आशिष शेलार, योगेश सागर आदींनी सहभाग घेतला.

00000

समृद्धी महामार्गालगतच्या २८ शेतकऱ्यांना १० लाख ५३ हजार रुपयांची नुकसान भरपाई – मंत्री शंभूराज देसाई

 

नागपूर, दि. २७ : “समृद्धी महामार्गाच्या बांधकामादरम्यान कंत्राटदारांच्या वाहनांची वाहतूक असलेल्या परिसरातील शेती पिकांचे धुळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी २८ शेतकऱ्यांना १० लाख ५३ हजार ५३५ रुपयांची भरपाई कंत्राटदारामार्फत अदा करण्यात आली आहे. याबाबत शेतकऱ्यांचे अन्य प्रश्न सोडविण्यासाठी विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर बैठकीचे आयोजन करण्यात येईल”, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभेत सदस्य दादाराव केचे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता, त्यावेळी मंत्री श्री. देसाई बोलत होते. त्यांनी सांगितले, की उपविभागीय अधिकारी, आर्वी यांच्यामार्फत कळविण्यात न आलेल्या, ईपीसी कंत्राटदाराने त्यांच्या पातळीवर चार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची भरपाई अदा करण्यात आली आहे. प्रमाणित नुकसान भरपाईच्या मोबदल्याची खबरदारी म्हणून कंत्राटदाराच्या माहे ऑक्टोबर २०२१ च्या देयकातून दहा लाख रुपयांचा निधी रोखण्यात आला आहे. या महामार्गाच्या संरक्षण भिंतीमुळे भिंतीलगतच्या शेतात पाणी साचू नये म्हणून संरक्षण भिंतीलगत आवश्यक तेथे पाणी प्रवाह सुरळीत करण्यासाठी नाली देण्यात आली आहे. संरक्षण भिंतीमुळे पावसाचे पाणी शेतात जमा होत असल्यास त्या पाण्यास संरक्षण भिंतीखालून मार्ग काढून महामार्गाच्या हद्दीत येवू देण्याच्या सूचना संबंधित शेतकऱ्यांना ईपीसी कंत्राटदारांमार्फत देण्यात आल्या  आहेत. महामार्गालगतच्या शेतकऱ्यांना वहिवाटीचे रस्ते, पाइप टाकून रस्ता सुरळीत करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागास देण्यात आल्या आहेत. येत्या सहा महिन्यांत याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत राम सातपुते, यशोमती ठाकूर आदींनी सहभाग घेतला.

०००००

गोपाळ साळुंखे/स.सं.

 

जालना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे निलंबन करून चौकशी – मंत्री डॉ. तानाजी सावंत

नागपूर, दि. २७ : “जालना येथील जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निलंबित करून त्यांची सचिव आणि महिला डॉक्टरांचा समावेश असलेल्या समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यात येईल. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत करार तत्त्वावरील डॉ. अर्चना पाटील आणि डॉ. सतिश पवार या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा संपुष्टात आणण्यात येत आहे”, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभेत आज सदस्य नारायण कुचे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले, की कोरोना विषाणूचा प्रतिबंध आणि उपचारात्मक कार्यवाहीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीस तांत्रिक आणि प्रशासकीय खरेदीबाबत अधिकार देण्यात आले होते.

कोरोना काळात अत्यावश्यक परिस्थितीत सर्व रुग्णांना उपचार मिळण्यासाठी खरेदीचे अधिकार जिल्हास्तरावर देण्यात आले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गरजेनुसार समितीच्या मान्यतेने खरेदी करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषद, जालना यांच्याकडून कोरोना कालावधीत जिल्हा स्रोतातून (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व जिल्हा नियोजन समितीकडून) नऊ कोटी 66 लाख 16 हजार 959 रुपये एवढा निधी प्राप्त झाला होता. या निधीपैकी नऊ कोटी एक लाख 55 हजार रुपये एवढा निधी खर्च झालेला आहे. याबाबत आरोग्य विभागाच्या औरंगाबाद येथील उपसंचालक यांच्या स्तरावर चौकशी समितीची नेमणूक केलेली असून चौकशी सुरू आहे, असेही मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सुनील टिंगरे यांनी सहभाग घेतला.

०००००

गोपाळ साळुंखे/ससं/

 

 

ताज्या बातम्या

क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...

0
सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि. कुंडल येथे क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतिअग्रणी डॉ....

नागरिकांच्या सोयीसुविधा निर्माण कार्यात लोकसहभाग महत्वाचा – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. ७ : नागरिकांच्या विविध सोयी सुविधांचा विकास होण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी...

बीड जिल्ह्याला हरित, समृद्ध बनविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार

0
एकाच दिवशी जिल्ह्यात विविध ठिकाणी ३० लाखांहून अधिक रोपांची लागवड आकांक्षित तालुका कार्यक्रमात वडवणी तालुक्याची लक्षणीय कामगिरी बीड, दिनांक ०७ (जिमाका) :  हवामान बदल,...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन

0
बीड, दिनांक ०७ (जिमाका) :  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व टाटा टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने बीड शहरात कौशल्यवर्धन केंद्र (CIIIT) प्रकल्प उभारला जात आहे....

बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बीड, दिनांक ७ (जिमाका) : जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून, जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत पत्रकार बांधवांचे सहकार्य महत्वाचे...