सोमवार, ऑगस्ट 18, 2025
Home Blog Page 1679

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली दि.25: राज्यातील पुणे जिल्ह्याने निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कल्पनांचा अवलंब केल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवार्ड’ या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले.

दिल्ली छावणी परिसरातील मानेकशॉ सभागृहात 13 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे भारत निवडणूक आयोगाच्यावतीने आयोजन करण्यात आले. केंद्रीय विधि व न्याय मंत्री किरेन रिजीजू, केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री प्रा. एस. पी. बघेल, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे उपस्थित होते. यावेळी देशातील विविध भागांमध्ये निवडणूक मतदान प्रक्रियेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यांना, जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भारत निवडणूक आयोगाची यंदाची संकल्पना ‘मतदानाइतके अमूल्य नसे काही, बजावू हमखास मताधिकार आम्ही’, अशी आहे. यावेळी प्रख्यात निर्देशक सुभाष घई यांचे द्वारा निर्मित ‘मैं भारत हॅुं’ या गाण्याचे सादरीकरण करण्यात आले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. राजेश देशमुख यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राशी संवाद साधताना ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांमध्ये भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यासाठी आणि त्यातील त्रूटी दूर करण्यासाठी परिश्रम घेतले आहे. यामध्ये जवळपास सात लाखांपेक्षा जास्त जे निवासी मतदार आहेत त्यावर काम केले. त्याचप्रमाणे मतदार यादी सर्वसमावेशक करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष करून महिला मतदार, तृतीयपंथी मतदारांसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. विशेष शिबिरांचेही आयोजन करण्यात आले. १७ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदारांची नोंदणी करण्यासाठी २५ नोव्हेंबर आणि ५ डिसेंबर या दोन दिवशी ४४२ महाविद्यालयात महाशिबिरांचे आयोजन करून मतदार नोंदणी करण्यात आली. यातून ४८ हजारांवर युवकांची मतदार नोंदणी करण्यात आली, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

पुणे जिल्ह्यात युवकांचा मतदार नोंदणीतील सहभाग वाढविणे, महिलांची मतदार नोंदणी याकडे विशेष लक्ष देण्यात आले. वंचित घटकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवताना तृतीयपंथी मतदार, दिव्यांग मतदार, देह विक्री व्यवसायातील महिला यांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमध्ये आयोजित शिबिरांनाही युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासह सहकार्याने शाळा व महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळाच्या बळकटीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी तृतीयपंथी मतदार नोंदणीसाठी तसेच दिव्यांग मतदारांसाठी घेतलेल्या पुढाकाराचा निवडणूक आयोगाने विशेष गौरव केला आहे. औद्योगिक क्षेत्रातील मतदार नोंदणीसाठी विशेष पुढाकार जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील सुमारे अडीच हजार मोठे व लहान उद्योगांपर्यंत पोहोचून मतदार नोंदणी करण्यात आली. उद्योगांच्या ठिकाणी समन्वयक अधिकारी नेमून तसेच उद्योगांमध्ये मतदार जागृती संघ स्थापन करून मतदार नोंदणीसाठी प्रयत्न करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांना यापूर्वीदेखील जिल्ह्यात पीएम किसान योजनेतील चांगल्या कामगिरीसाठी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तर सातारा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी असतांना पीएम आवास योजना आणि स्वच्छ भारत अभियानातील चांगल्या कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला होता.

यावेळी ‘इलेक्टिंग द फर्स्ट सिटिजन- एन इलेस्ट्रेटेड क्रॅानिकल ऑफ इंडियाज प्रेसिडेंशियल इलेक्शन’ पुस्तकाची पहिली प्रत राष्ट्रपती यांना भेट स्वरूपात देण्यात आली. यावेळी राष्ट्रपती यांच्या हस्ते एकूण १३ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.

००००

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक सुधारित कार्यक्रमानुसार २६ फेब्रुवारी रोजी मतदान

मुंबई, दि. 25 : भारत निवडणूक आयोगाने 215- कसबा पेठ व 205 – चिंचवड (जि. पुणे) येथील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम 18 जानेवारी, 2023 रोजी प्रसिद्ध केला होता. यासंदर्भात आता सुधारित प्रसिद्धीपत्रक जाहीर केले असून, या निवडणूकीसाठी मतदान, रविवार, दिनांक 26 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे.

सुधारित कार्यक्रमानुसार मंगळवारी, 31 जानेवारी 2023 रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. मंगळवार 7 फेब्रुवारी 2023 उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असेल. प्राप्त उमेदवारी अर्जांची बुधवार 8 फेब्रुवारी 2023 रोजी छाननी होईल. शुक्रवार 10 फेब्रुवारी 2023 उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. त्यानंतर रविवार, 26 फेब्रुवारी 2023 रोजी मतदान होईल. गुरुवार,  2 मार्च 2023 रोजी मतमोजणी होईल. शनिवारी, 4 मार्च 2023 रोजी निवडणुकिची प्रक्रिया पूर्ण होईल.

०००

आगामी आर्थिक वर्षात नवे महिला सन्मान धोरण जाहीर होणार – बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे

मुंबई दि.25 – आगामी आर्थिक वर्षात नवे  महिला  सन्मान धोरण लवकरच जाहीर होणार असून या धोरणाची अंमलबजावणी प्रभावी होण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे असे मत बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा 30 वा वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात बंदर व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे बोलत होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, महिला व अत्याचार प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक दीपक पांडे,इंटरनॅशनल जस्टिस मशीनचे संचालक येसुदास नायडू,फेसबुक  पॉलिसी लीड विभागाच्या प्रियांका जैन, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी,राज्य महिला आयोगाच्या  सदस्या अँड गौरी छाब्रिया, उत्कर्षा रुपवते, दीपिका चव्हाण हे उपस्थित होते.

मंत्री दादाजी भुसे म्हणाले,राज्य महिला आयोग गेल्या तीन दशकांपासून अत्यंत चांगले काम करत आहे.काही चांगल्या बाबी शासनस्तरावर प्रगतीपथावर आहेत.राज्यातील माता भगिनींना आनंद होईल असे महिला सन्मान धोरण प्रगतीपथावर आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे धोरण येत्या आर्थिक वर्षात अंमलबजावणी करताना दिसतील.महिला आयोगाने केलेल्या सुचनांवर शासन नक्की कारवाई करणार आहे.ओमानमध्ये अडकलेल्या महिलांसाठी केंद्र शासनासोबत चर्चा करून यावर नक्कीच तोडगा काढू.आरोग्य विभागाच्या पुढाकारातून “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात पाच कोटींहून अधिक महिलांची तपासणी झाली आहे.

कृषिमंत्री म्हणून देखील काम केले तेव्हा महिला शेतकऱ्यांना कृषीच्या योजना प्राधान्याने राबवल्यामुळे अनेक ठिकाणी महिलांचे नाव सातबाराला लावले गेले. हा अत्यंत सकारात्मक परिणाम होता त्यामुळे बऱ्याच ठिकाणी महिलांचे नाव सातबाराला लागले गेले. महिलांना शिक्षणामध्ये संधी आणि जगण्यामध्ये समान संधी  देण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे असे मत हे मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले.

संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी राज्य महिला आयोग सदैव तत्पर रुपाली चाकणकर

संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी राज्य महिला आयोग सदैव तत्पर असून. आयोगापुढे नवी आव्हाने  आहेत. कामाच्या ठिकाणी होणारा अत्याचार,सायबर गुन्हेगारी वाढली आहे त्यासाठी फेसबुकने सुरु केलेले ‘मिशन ई सुरक्षा’ कॅम्पेन महत्त्वाचे आहे. मागील पंढरपूरच्या वारीमध्ये राज्य महिला आयोगाने आरोग्य वारी आपल्या दारी उपक्रम सुरु केला. या  सॅनिटरी नॅपकिन प्रथमच पुरवले.गेल्या 13 ते 14 महिन्यात आयोगाने विविध समस्या साडेदहा हजार केसेस दाखल केल्या त्यातील 9 हजारांहून अधिक केसेस निकाली काढल्या असेही  श्रीमती रुपाली चाकणकर म्हणाल्या.

श्रीमती रुपाली चाकणकर म्हणाल्या,मानवी तस्करीचे प्रमाण वाढले आहे.पुणे, पिंपरी चिंचवड मधील 85 महिला व युवती ओमानमध्ये अडकल्या आहेत.महाराष्ट्रातील महिला व युवतींची संख्या अडीच ते तीन हजारावर आहे.

नोकरीचे अमिष दाखवत व्हिसा व पासपोर्ट काढून घेतले गेले आहेत.या महिलांवर लैंगिक अत्याचार केले गेले.भारतीय दुतावासासोबत संपर्क साधून पाठपुरावा करून या महिलांना सोडवणे गरजेचे आहे.श्रद्धा वालकर हत्याकांड सारख्या घटना घडू नयेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मिसिंग सेल अॅक्टीव्ह होणे गरजेचे आहे.शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी दामिनी पथक व बीट मार्शल शाळेच्या आवारात ठेवा. पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीय पंथीयांचे स्वतंत्र विभाग सुरु केले आहे. 25 खाटांचे हा विभाग लवकर सुरू केला जावा अशी सूचनाही श्रीमती रुपाली चाकणकर यांनी केली.

जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून काम करत असताना महिलांबाबतच्या खटल्यात संवेदनशीलतेने उल्लेखनीय कार्य केलेले पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे,पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख,विधवा प्रथा बंदीचा ठराव करत ऐतिहासिक पाउल उचलणारी हेरवाड ग्रामपंचाय तीचे सरपंच सूर गोंडा पाटील, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांचा यावेळी सन्मान  करण्यात आला.

राज्य महिला आयोग आणि मेटा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या सुरक्षिततेकरिता राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला, आयोगाच्या वर्ष २०२३ च्या कॅलेंडर व डायरीचे प्रकाशन, राज्य महिला आयोग आणि इंटरनॅशनल जस्टीस मिशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बिल्डिंग ब्रिज या टुलकिट पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी यांनी प्रास्ताविक केले.महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन,महिला व अत्याचार प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक दीपक पांडे,इंटरनॅशनल जस्टिस मशीन चे संचालक येसुदास नायडू,फेसबुक  पॉलिसी लीड विभागाच्या प्रियांका जैन, यांनी मनोगत व्यक्त केले.

000

संध्या गरवारे/विसंअ

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करणे प्रत्येकाचे कर्तव्य – विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्‌टे

अमरावती, दि. २५ : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते. या कर्तव्यपूर्तीसाठी मतदार यादीत नांव नसलेल्या १८ वर्षांवरील प्रत्येकाने मतदार नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्‌टे यांनी बुधवारी केले.

राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कुलगुरू विजयकुमार चौबे, प्र. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, सहायक जिल्हाधिकारी रिचर्ड यांथन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, धनुर्विद्यापटू मधुरा धामणकर आदी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी यावेळी मतदारदिनाची प्रतिज्ञा घेतली.

निवडणुकीच्या दृष्टीने मतदार नोंदणी महत्त्वाची असते. त्यामुळे वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाने मतदार यादीत आपले नांव असण्याची दक्षता घ्यावी व आपला मताधिकार बजावून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. पांढरपट्‌टे यांनी केले.

मतदार म्हणून कर्तव्य बजावण्याच्या शपथेचा उल्लेख करत कुलगुरू डॉ. चौबे म्हणाले की, मतदार प्रतिज्ञेचे पावित्र्य जाणून ती सर्वांनी ती आचरणात आणावी व मतदार म्हणून आपले कर्तव्य पूर्ण करावे.

मतदार नोंदणीसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी, स्वयंसेवक आदींचा यावेळी गौरव करण्यात आला. डॉ. व्यवहारे यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक राजेश बुरंगे यांनी सूत्रसंचालन केले. अमर कथोरे यांनी स्वागतगीत म्हटले. तहसीलदार संतोष काकडे यांनी आभार मानले. उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, तहसीलदार मदन जाधव, नायब तहसीलदार श्यामसुंदर देशमुख, क्रीडा प्रशिक्षक पवन तांबट आदी यावेळी उपस्थित होते.

०००

मराठी भाषेचे माधुर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवावा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई, दि. 25 : “मराठी ही सोपी आणि सरळ भाषा असून मराठी साहित्य श्रेष्ठ आणि समृद्ध आहे. या भाषेचे माधुर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविल्यास त्यांच्यामध्ये भाषेप्रती सार्थ अभिमान जागा होईल, साहित्यप्रती रुची वाढेल व त्यांच्या व्यक्तिमत्व विकास होईल”, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

‘मधुरव : बोरू ते ब्लॉग’ या मराठी भाषेच्या जन्माची 2000 वर्षांची संगीतमय कहाणी सांगणाऱ्या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

“जन्मापासून लहान मुलांना इंग्रजी भाषा शिकविण्याचा पालकांचा अट्टहास योग्य नाही. लहान मुलांना सुरुवातीला मातृभाषा आत्मसात करू द्यावी व त्यानंतर त्यांना इंग्रजीच नाही तर जर्मन, फ़्रेंच व इतर कुठलीही भाषा शिकणे शिकणे अवघड जाणार नाही. मराठी भाषा ही शिकण्यास सोपी असल्याचे आपण अनुभवातून सांगू शकतो असे नमूद करून आपण सार्वजनिक कार्यक्रमात आणि विशेषतः राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये दीक्षांत समारोह व इतर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन मराठीतून करण्याबाबत आग्रही राहिलो,’’ असे राज्यपालांनी सांगितले.

“भाषांचा एक कालखंड असतो. एकेकाळी प्रचलित असलेली ग्रीक भाषा आज नाममात्र शिल्लक आहे. परंतु भारतीय भाषा प्रवाही आहेत असे सांगून उज्वल भवितव्यासाठी वर्तमान काळात जगताना आपला वैभवशाली भूतकाळ स्मरणात ठेवणे गरजेचे ठरते आणि यासाठी भाषा जीवंत असणे महत्वाचे ठरते” असे त्यांनी सांगितले.

‘मधुरव : बोरू ते ब्लॉग’ या नाट्यकृतीमध्ये सातवाहन काळ, संत ज्ञानेश्वरांचा काळ, दक्षिण कर्नाटकातील राजांचा काळ येथपासून मराठी भाषेचा चांगला आढावा घेतला असून या नाट्याचे अधिकाधिक प्रयोग शाळा व महाविद्यालयांमधून व्हावे जेणेकरून मातृभाषेप्रती सार्थ अभिमान जागरूक होईल असे राज्यपालांनी सांगितले. या दृष्टीने आपण विद्यापीठे व महाविद्यालयांना नाट्यप्रयोगासाठी शिफारस करू, असे सांगताना राज्यपालांनी नाटकाला पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केली.

मधुरा वेलणकर, अभिजित साटम व डॉ समीरा गुजर यांच्या पुढाकाराने आयोजित या नाट्यप्रयोगाला ज्येष्ठ कलाकार शिवाजी साटम, प्रदीप वेलणकर, रजनी वेलणकर यांसह मराठी साहित्य, नाट्य व चित्रपट विश्वातील कलाकार व रसिक प्रेक्षक उपस्थित होते.  राज्यपालांच्या हस्ते यावेळी सहभागी कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

०००

 

Governor Koshyari witnesses musical play on

evolution of Marathi language

Mumbai Dated 25 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari witnessed the Marathi musical play ‘Madhurav : Boroo Te Blog’ at Raj Bhavan Mumbai on Tue (24). The musical play narrates the story of the evolution of the Marathi language during the last 2000 ears using song, dance and book reading.

Complimenting the cast and crew of the musical play on the history of Marathi language, the Governor said the play creates a feeling of pride about mother tongue. Lampooning the trend of teaching the English language to children ‘right from their birth’, the Governor said children will learn different languages once they learn their own mother tongue. The Governor said in his capacity as Chancellor of Universities, he encouraged public universities to conduct the proceedings of Convocations in Marathi.   The Governor announced a reward of Rs.5 lakh to the musical play on the occasion. The musical play has been produced by theatre personalities Madhura Velankar, Abhijit Satam and Dr Samira Gujar.

Theatre and film personalities Shivaji Satam, Pradeep Velankar, Rajani Velankar and people associated with art, theatre and literature were among those present. The Governor felicitated the artists on the occasion.

०००

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन दिनदर्शिकेचे प्रकाशन

मुंबई, दि. 25 : मुंबईतील नामवंत छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रांचा समावेश असलेल्या राजभवनाच्या 2023 वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले.

राजभवनातील ‘सौंदर्य स्थळे’ या विषयावर दिनदर्शिका तयार केल्याबद्दल राज्यपालांनी कला दिग्दर्शक व छायाचित्रकारांना कौतुकाची थाप दिली. कार्यक्रमाला राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यासाचे अध्यक्ष रवींद्र संघवी व सुचेता संघवी यावेळी उपस्थित होते.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते दिनदर्शिकेचे कला दिग्दर्शक अशोक दाभाडे व डिझाइनर रणजित रणशूर, भाषांतर कर्त्या डॉ. मंजुषा कुलकर्णी तसेच छायाचित्रकार प्रतीक चोरगे, अस्मिता माने, सचिन वैद्य, वैभव नडगावकर, राकेश गायकवाड, हृषीकेश परदेशी, नवीन भानुशाली, हनीफ तडवी, नागोराव रोडेवाड, संदीप यादव, दिलीप कवळी, पराग कुलकर्णी व कालिदास भानुशाली यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  यावेळी शासकीय मुद्रणालयाचे अधिकारी प्रमोद धामणकर यांचा देखील दिनदर्शिका देऊन सत्कार करण्यात आला.

छायाचित्रकार मुकेश पारपियानी यांच्या संकल्पनेनुसार साकारलेल्या या कॅलेंडरसाठी विविध छायाचित्रे काढली होती.  त्यातील निवडक छायाचित्रांचा समावेश दिनदर्शिकेमध्ये करण्यात आला आहे. दिनदर्शिकेचे मुद्रण शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय यांनी केले आहे.

०००

Governor Koshyari felicitates photographers

contributing to Raj Bhavan Calendar

           

Mumbai Dated 25 : The Annual Calendar of Raj Bhavan for 2023 containing beautiful photographs of various photographers from Mumbai was unveiled by Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai.

Congratulating the photographers for sharing their best pictures for the Raj Bhavan Calendar, the Governor presented a copy of the calendar to the photographers.

Chairman of Rashtriya Patrakarita Kalyan Nyas Ravindra Sanghvi, Smt Sucheta Sanghvi, photographers and designers were present.

The Governor felicitated Calendar designer Ashok Dabhade and Rajan Ranshoor and photographers Pratik Chorge, Asmita Mane, Sachin Vaidya, Vaibhav Nadgaonkar, Rakesh Gaikwad, Hrishikesh Tadvi, Navin Bhanushali, Hanif Tadvi, Nagorao Rodewad, Sandeep Yadav, Dilip Kawli, Parag Kulkarni and Kalidas Bhanushali on the occasion. The Calendar was conceptualized by Mukesh Parpiani and printed by the Government Printing Press.                                                                                     

000

राज्यात उद्यापासून ‘महाराजस्व’ अभियान

मुंबई, दि. 25 :  सर्वसामान्य जनता आणि शेतकरी यांचा महसूल विभागाशी दैनंदिन संबंध येत असतो. दैनंदिन प्रश्न निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी महाराजस्व अभियान 26 जानेवारी ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत राबविण्यात येणार असून महसूल व वन विभागाने याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित केला आहे.

एक महिन्याच्यावर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे व त्याकरिता मंडळ मुख्यालयी फेरफार अदालत घेणे, भूसंपादन  केलेल्या व अकृषिक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करुन गाव दप्तर अद्ययावत करणे, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या विविध कलमांची कार्यवाही करणे, गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते/ पाणंद/ पांधण/शेतरस्ते/ शिवाररस्ते/ शेतावर जाण्याचे मार्ग मोकळे करणे, मामलेदार न्यायालय अधिनियम, 1906 अंतर्गत मंजूर वहिवाटीचे रस्ते मोकळे आणि तयार करणे, गाव तिथे स्मशानभूमी/ दफनभूमी सुविधा उपलब्ध करुन देणे, लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 ची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच यासाठी प्रचार प्रसिध्दी करणे, निस्तार पत्रक व वाजिब-उल-अर्जच्या नोंदी अद्ययावत करणे, सप्टेंबर 2022 पर्यंतची मोजणी प्रकरणे मार्च 2023 पर्यंत निकाली काढणे, ई पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी करणे, ई चावडी प्रणालीची अंमलबजावणी करणे, भूसंपादन अधिनियम, 1894 अंतर्गत कार्यवाही करणे या घटकांची जिल्हाधिकारी कार्यालयापासून गावपातळीपर्यंत प्रभावीपणे जिल्हाधिकारी तसेच अपर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणार आहेत.

याशिवाय परराज्यातून आणलेल्या वाळूचा साठा व निर्गतीबाबतची कार्यपध्दती निश्चित करण्यात यावी, गौण खनिज ऑनलाईन प्रणाली वापराबाबतची माहितीही देण्यात यावी तसेच सन 2016 चा महाराष्ट्र अधिनियम क्र 1 अन्वये कुळकायद्याच्या कलम 63 मधील सुधारणा करणे,पोटहिस्सा/सामीलिकरण/ भूसंपादन/रस्ता सेटबॅक इत्यादी कारणामुळे नकाशामध्ये होणाऱ्या बदलाबाबत दुरुस्तीसह अद्ययावत नकाशा पुरविणे, नावीन्यपूर्ण योजना उपविभाग आणि तहसील कार्यालय येथे राबविणे महाराजस्व अभियाना घेण्यात आले आहे.

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांनी महाराजस्व अभियानाअंतर्गत आपल्या जिल्हयांमध्ये जिल्हा, तालुका आणि ग्रामपातळीवरक केलेली कामगिरीबाबतची माहिती मासिक प्रगती अहवालाद्वारे विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करणे आवश्यक राहील. तसेच जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख यांनी या अभियानाअंतर्गत त्यांच्या अधिनस्त कार्यालयात होणाऱ्या कार्यवाहीचा आढावा शासनाला देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महाराजस्व अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अभियानात अंतर्भूत विविध लोकाभिमुख आणि प्रशासकीय घटकांच्या निपटाऱ्यासाठी कालबध्द मोहिम आखून प्रलंबित कामांचा निपटारा करण्यावर भर देणे आवश्यक आहे. यासाठी सर्व विभागीय आयुक्तांनी घटकनिहाय कालबध्द कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करुन व्यवस्थापन पथकाची स्थापना करुन सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अनुपालनाचे निर्देश देण्यात यावेत अशा सूचना आज निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत.

०००

वर्षा आंधळे/विसंअ

राष्ट्रीय मतदार दिन-२०२३ : लोकशाहीत प्रत्येक मतदाराचे मत अमूल्य – मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे

मुंबई, दि.25 : “लोकशाहीमध्ये निवडणुका महत्त्वपूर्ण असून मतदार हा गाभा आहे. यात मतदाराचे मत मोलाचे आहे. प्रत्येक मतदाराचे मत किती महत्वाचे आहे, हे अधोरेखित करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो”, असे प्रतिपादन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी केले.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई तसेच मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन -2023 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, कुलसचिव विलास नांदवडेकर, उपसचिव मनोहर पारकर यांच्यासह मिलिंद बोकील, सोनाली नवांगुळ, श्रीगौरी सावंत, झैनब पटेल, डॉ.सान्वी जेठवाणी, प्रणित हाटे, डॉ.उज्ज्वला चक्रदेव आदी पाहुणे उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणूक कार्यात योगदान देणाऱ्याचा विशेष सत्कार करण्यात आला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय हे प्रसिद्धीसाठी नेहमीच अग्रेसर असते. राज्याच्या प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि त्यांच्या अधिनस्त कार्यालय हे निवडणूक कार्याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम प्राथम्याने करते. त्यामुळे माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या महासंचालक श्रीमती जयश्री भोज यांना विशेष संस्थात्मक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

निवडणूक कार्यात राज्यातील अधिकारी वर्गाचे योगदान लक्षात घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात आले. यात उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हा निवडणूक अधिकारी शण्मुगराजन एस. (वाशिम), रूचेश जयवंशी (हिंगोली), अशोक शिनगारे (ठाणे), डॉ.विपीन इटनकर (नागपूर), डॉ.राजेंद्र भोसले (अहमदनगर) आणि राजेश देशमुख (पुणे) यांना सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणारे उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन (वाशिम), दिलीप कच्छवे (हिंगोली), श्रीमती अर्चना कदम (ठाणे), श्रीमती मीनल कळसकर (नागपूर), जितेंद्र पाटील (अहमदनगर), पुण्याच्या श्रीमती आरती भोसले आणि श्रीमती मृणालिनी सावंत यांना विभागून पुरस्कार देण्यात आले.

त्याचप्रमाणे राज्यस्तरीय पुरस्कारात गणेश राठोड (मेहकर, जि.बुलडाणा), धीरज मांजरे (कारंजा, जि.वाशिम), डॉ.सचिन खल्लाळ (वसमत, जि.हिंगोली), श्रीमती क्रांती डोंबे (कळमनुरी, जि.हिंगोली), राहुल मुंडके (पनवेल, जि.मुंबई उपनगर), श्रीमती वैष्णवी बीष्वा (भाप्रसे)(तुमसर, जि.भंडारा), संदीप भस्के (ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर), श्रीमती ज्योती कावरे (सिन्नर, जि.नाशिक), डॉ.शशिकांत मंगरूळे (संगमनेर, जि.अहमदनगर), सुशांतकिरण बनसोडे (कागल, जि.कोल्हापूर) आणि गणेश मरकड (पलूस कडेगाव, जि.सांगली) या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचा समावेश होता.

सध्याचे युग हे समाजमाध्यमांचे असल्याने समाजमाध्यमावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडणूक कार्यालयाचा गौरव करण्यात आला. यात जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, मुंबई शहर, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा तसेच मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, शिवडी, जत आणि कोल्हापूर उत्तर यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे उत्कृष्ट मतदार मित्र पुरस्कारात किन्नर मॉ ट्रस्ट व कोरो इंडिया या सामाजिक संस्थाचा गौरव करण्यात आला. निवडणुकीचे वार्तांकन करून जनजागृती करणारे लोकसत्ताचे पत्रकार निखिल अहिरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात लोकशाही दिंडी, पथनाट्य, रांगोळी प्रदर्शन, मतदार जागृती दालन, ध्वनीचित्रफितीचे सादरीकरण, शपथ घेणे, ओळखपत्राचे वाटप, अहवाल प्रकाशन आदी करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबई शहरचे जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांनी केले, तर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी आभार मानले.

000

संजय ओरके/विसंअ

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मार्फत कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा १५ लाखापर्यंत

मुंबई,दि.२५ : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास  विकास महामंडळामार्फत  वैयक्तीक कर्ज व गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमार्फत मराठा प्रवर्गातील उमेदवारांना व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न शासनामार्फत केला जात आहे.  या योजनेची कर्ज मर्यादा रु. १० लाखाहून रु. १५ लाखापर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती महामंडळामार्फत प्रसिद्धीद्वारे देण्यात आली आहे.

मराठा प्रवर्ग व ज्या प्रवर्गाकरीता स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही, अशा प्रवर्गातील उमेदवारांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांमार्फत उद्योगधंदे  उभारण्याकरीता आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचा प्रयत्न या योजनांमार्फत केला जाणार आहे.

वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत (IR-I) उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. या योजनेकरीता वयोमर्यादा कमाल ६० वर्षे आहे.  या योजनेची मर्यादा रु. १० लाखाहून रु. १५ लाखापर्यंत वाढविण्यात आलेली असून, महामंडळामार्फत रु. ४.५  लाखाच्या व्याज मर्यादेत परतावा व व्याज परतावा कालावधी जास्तीत-जास्त ७ वर्ष व व्याजाचा दर जास्तीत जास्त द.सा.द.शे. १२% असेल. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी  उद्योगाच्या दृष्टीने बँकेमार्फत कर्ज घेतलेले असावे.

तसेच, गट कर्ज व्याज परतावा (R-II) योजने अंतर्गत किमान दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तीच्या गटास कर्ज देण्यात येते. दोन व्यक्तीसाठी कमाल रु. २५ लाखाच्या मर्यादेवर, किंवा तीन व्यक्तीसाठी रु. ३५ लाखाच्या,  चार व्यक्तीसाठी रु. ४५ लाखाच्या किंवा पाच व पाच पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास रु. ५० लाखापर्यंतच्या व्यवसाय उद्योग कर्जावर ५ वर्षापर्यंत १२ टक्के व्याज किंवा रु १५ लाखाच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास, हफ्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम गटाच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.

या योजनेमध्ये FPO गटांनी त्याच्या  शेतीपूरक व्यवसायाकरीता बँकेमार्फत घेतलेल्या कर्जावरील देखील व्याज परतावा नियमानुसार महामंडळ करेल.

महामंडळाच्या योजनांतर्गत लाभार्थ्यांनी त्यांच्या व्यवसायाकरीता बँकेमार्फत घेतलेल्या कर्जावरील व्याज परतावा हे महामंडळ नियमानुसार करीत आहे. सदर योजनांची अंमलबजावणी २ फेब्रुवारी, २०१८ पासून सुरु करण्यात आली असून, सद्यस्थितीत कालानुरूप व लाभार्थीभिमुख अनेक बदल योजनामध्ये केलेले आहेत.

000

प्रजासत्ताकदिनी राज्यभरात सकाळी ९.१५ वाजता होणार शासकीय ध्वजारोहण

मुंबई, दि. २५ – भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२३ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभरात एकाच वेळी सकाळी ०९.१५ वाजता आयोजित करण्यात यावा. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी  सकाळी ८.३० ते १०.०० च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ८.३० वाजेपूर्वी किंवा १० वाजेनंतर करावा, असे राजशिष्टाचार विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

या परिपत्रकानुसार मुंबईत शिवाजी पार्क, येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री ध्वजारोहण करतील. ज्या ठिकाणी पालकमंत्री उपस्थित राहू शकणार नाहीत त्या विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. तसेच, संबंधित प्रांत अधिकारी व तहसीलदार हे अनुक्रमे जिल्हा उपविभागीय व तालुका मुख्यालयात ध्वजारोहण समारंभाच्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान स्वीकारतील.  राज्यामध्ये सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवर, किल्ल्यांवर, तसेच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत.

राष्ट्रध्वजाला वंदन करताना ‘राष्ट्रगीत’ म्हणण्यात अथवा वाजविण्यात यावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बॅन्ड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजविण्यास हरकत नसावी. राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत  परिपत्रकानुसार सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल, याची दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना द्याव्यात. राष्ट्रध्वज सुस्थितीत असल्याबाबत व सूर्यास्तास उतरवला जाईल, याचीही दक्षता घेण्यात यावी.

प्रजासत्ताकदिनाच्या समारंभाला सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित रहातील याची दक्षता घ्यावी. उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावयाचा राष्ट्रीय पोषाख प्रजासत्ताक दिन समारंभ प्रसंगी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी व व्यक्तींनी परिधान करावा. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना व आई-वडील यांना निमंत्रित करावे. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा ऑनलाईन पाहता यावा, यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, असेही परिपत्रकात म्हटले आहे.

000

ताज्या बातम्या

जनसंवादद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या

0
नागपूर दि. १७: महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जनसंवाद कार्यक्रमात वृद्ध, महिला, विद्यार्थी, दिव्यांग, तृतीय पंथी अशा समाजाच्या सर्व थरातील जनतेच्या...

प्रस्ताव सादर करा, खंडपीठही लवकरच करू – सरन्यायाधीश भूषण गवई

0
शाहू महाराजांप्रमाणे समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन सर्किट बेंचच्या शुभारंभाला कोल्हापूरने अनुभवला सरन्यायाधीशांचा कृतज्ञता सोहळा कोल्हापूर, दि. १७: राज्याच्या सीमेवरील दुर्गम भागातील सर्वसामान्य...

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

0
जळगाव दि. १७ (जिमाका):  जळगाव- छत्रपती संभाजीनगर रोडवरील चिंचोली शिवारात 66.27 एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेल्या भव्य मेडिकल हबची पाहणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार...

येत्या बजेटमध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
जळगाव जिल्ह्यातील उद्योगांनाही मराठवाडा, विदर्भासारख्या सवलती देणार तीन दिवसातील अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे आदेश जळगाव दि. १७ (जिमाका वृत्तसेवा): आपण प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर त्या जिल्ह्यात जिल्हा...

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन

0
कोल्हापूर, दि. १७ (जिमाका): सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले. या ऐतिहासिक...