गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 1659

महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा राज्य शासनाचा संकल्प – पालकमंत्री उदय सामंत

अलिबाग, दि.9(जिमाका) : शेतकरी बांधवांचे जीवन सुसह्य होण्यास्तव राज्य शासन कटिबद्ध असून महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करणे, हा राज्य शासनाचा संकल्प असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले.
सिडको मैदान, खांदेश्वर रेल्वे स्टेशन जवळ, कामोठे, पनवेल येथे रायगड जिल्हा कृषी महोत्सव 2022-23 चे उद्घाटन आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी विधानपरिषद शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर,जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले, पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके, तहसिलदार विजय तळेकर, विविध शासकीय विभागांचे जिल्हास्तरीय प्रमुख, शेतकरी बांधव व सर्व संबंधित उपस्थित होते.
श्री. सामंत पुढे म्हणाले, स्थानिक पातळीवरच्या उत्पादनास चांगली बाजापेठ मिळण्याकरिता सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे. या भागातील शेतकऱ्यांसाठी काजू बोर्ड आणि आंबा बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळणार आहे.

ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारे हे सरकार शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे सरकार आहे. सरकारने अवघ्या काही महिन्यांच्या कालावधीत शेतकरी बांधवांच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत आणि यापुढेही घेतले जातील.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ( CMEGP ) योजनेत समाविष्ट होणाऱ्या शहरी भागातील घटकांना २५% तर ग्रामीण भागातील घटकांना ३५% देय अनुदानाचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत कर्ज उपलब्ध होण्याकरिता सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील बँकासह आता राज्यातील सहकारी क्षेत्रातील १४ बँकांना प्रमुख सहयोगी संस्था म्हणून मान्यता देण्यात आली आहे. सहकारी बँकांकडून कर्ज उपलब्ध होण्याची व्यवस्था केल्यामुळे घटकांना जलदगतीने कर्ज मिळणे अधिक सोयीचे होणार आहे. कर्ज मिळण्यासाठी कोणत्याही तांत्रिक अडचणी येणार नाहीत, यासाठी बँकांना सूचित केले असल्याचेही श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने भात पीक स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक शेतकरी बांधवांना पालकमंत्री श्री.सामंत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

या महोत्सवात कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या अनेक संस्था सहभागी झालेल्या आहेत. हा कृषी महोत्सव पाच दिवस चालणार असून जिल्ह्यातील हजारो शेतकरी यामध्ये सहभागी होणार आहेत.

000

मागासवर्गीय कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक: दिनांक 09 फेब्रुवारी, 2023 (जिमाका वृत्तसेवा): जिल्हा परिषदेच्या 20 टक्के मागासवर्गीय सेस मंजूर निधीतून महिला, बेरोजगार युवक व विद्यार्थिनींना विविध साहित्याचे वाटप पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते आज करण्यात आले. मागसवर्गीयांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे प्रतिपादन राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत 80 मागासवर्गीय बेरोजगार युवकांना 1 कोटी 60 लाख निधी सेस निधीतून मालवाहतूक व्यवसायासाठी चारचाकी वाहनांचे वाटप करण्यात आले. तसेच 12 लाख 90 हजार निधीतून 30 महिला लाभार्थ्यांना मसाला कांडप यंत्राचे वाटप आणि  3 लाख 85 हजार निधीतून 700 सायकली मागसवर्गीय विद्यार्थिंनींना देण्यात आल्या आहेत. त्यातील प्रातिनिधीक स्वरूपात 59 विद्यार्थींनींना सायकलींचे वाटप व 30 बेरोजगार युवकांना चारचाकी वाहनांचे वाटप पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्हा परिषदेला देण्यात आलेल्या 9 रूग्णवाहिकांचे लोकार्पण सुद्धा पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

000

विकास कामे दर्जेदार करुन ती गतीने पूर्ण करा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या सूचना

सांगली दि. 9 (जिमाका) :- ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र सरकार व राज्य शासनाच्या अनेकविध योजना आहेत. या योजनेतून जिल्ह्यात करण्यात येत असलेली विकास कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्याबरोबरच ती गतीने पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज जिल्हा परिषद येथील आढावा बैठकीत दिल्या.

जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दीपक चव्हाण यांच्यासी जिल्हा परिषदेमधील सर्व खात्यांचे प्रमुख उपस्थित होते.

विकास योजनांचा लाभ सामान्य माणसाला झाला पाहिजे. विकास योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी  काम करावे. विकास योजनांवरील मंजूर निधी त्या-त्या योजनांवर पूर्णपणे खर्च व्हावा. तसेच निधी परत जावू नये याची दक्षता घ्यावी. मंजूर विकास कामे, पूर्ण झालेली कामे, प्रगती पथावरील कामे आणि अपूर्ण कामे याचा अधिकाऱ्यांनी नियमित आढावा घ्यावा. विकास कामांची माहिती स्‍थानिक लोकप्रतिनिधींना द्यावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी आढावा बैठकीत दिल्या.

ग्रामपंचायतीलकडील जनसुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना करुन पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले 2024 पर्यंत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे.  देशाच्या  प्रधानमंत्री महोदयांची ही महत्वाकांक्षी योजना असून प्रत्येक गावात ही योजना प्राधान्याने राबवावी. या बरोबरच घरकुलांच्या योजनांची कामे, बांधकाम विभागाकडील कामे, पाणी पुरवठा योजनांची कामे, महिला व बाल विकास विभाग यासह सर्वच विभागांनी त्यांच्यकडील कामे गतीने पूर्ण करण्यासाही प्राधान्य द्यावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी यावेळी दिल्या.

000

संकेत सरगरच्या शासकीय नोकरीसाठी पाठपुरावा करणार – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 9 (जिमाका) :- संकेत सरगर यांने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंग मध्ये रौप्य पदक पटकावून क्रीडा क्षेत्रात सांगली जिल्ह्याचा लौकिक वाढविला आहे. संकेत सरगर याला शासकीय नोकरी मिळावी यासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपण पाठपुरावा करु, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज दिली.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करून रौप्य पदक पटकाविणाऱ्या संकेत महादेव सरगर यास जिल्हा परिषदेच्या वतीने 5 लाख रुपये पारितोषिक आणि प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात संपन्न झाला. या पारितोषिकाचे वितरण संकेत सरगरचे आई-वडील यांना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख उपस्थित होते.

संकेत सरगरच्या  क्रीडा क्षेत्रातील यशाच्या पाठीमागे आई-वडील राजश्री सरगर व महादेव सरगर यांचे योगदान मोलाचे आहे. संकेतला क्रीडा क्षेत्रात चांगले घडविल्याबद्दल व प्रोत्साहन दिल्याबद्दल पालकमंत्री डॉ. खाडे यांनी संकेतच्या आई-वडिलांचे अभिनंदन केले.

कृषी पांढरी म्हणूनओळख सांगली जिल्ह्याची असून आता जिल्हा क्रीडा पंढरी म्हणून ओळखला जाईल, अशा भावना संकेत सरगरचे वडील महादेव सरगर यांनी यावेळी व्यक्त केल्या. शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी आभार मानले

000

विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वासाने काम करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे, दि.९ : प्रत्येक क्षेत्रात सराव आणि अभ्यासाने माणूस परिपूर्ण बनत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणत्याही कामाला कमी न लेखता आत्मविश्वासाने काम  करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

किवळे येथील सिम्बॉयसिस कौशल्य आणि व्यावसायिक शिक्षण विद्यापीठाच्या तिसऱ्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलपती डॉ. एस. बी. मुजुमदार, फियाट इंडिया ऑटोमोबाईल्सचे अध्यक्ष राजेश खत्री, विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार आणि प्रभारी कुलगुरू डॉ. गौरी शिउरकर आदी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले की, शासन कौशल्य विकासासाठी अनेक योजना राबवत आहे आणि त्यासाठी सुविधादेखील उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. देशाला स्वावलंबी बनविण्यासाठी कौशल्य विकास मंत्रालय स्थापित करण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारत स्वावलंबी बनेल.

केवळ महत्वाकांक्षा बाळगून यशस्वी होता येत नाही तर श्रद्धेने आणि आत्मविश्वासाने परिश्रम करण्याची गरज असते.  हे गुणच स्नातकांना यशाच्या शिखरावर पोहोचवतील. विद्यापीठातून पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यापीठाचा लौकीक उंचावेल असे काम विद्यार्थ्यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

आजची पिढी नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेकडे वळत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून कुलपती डॉ. मुजूमदार म्हणाले, तरुणांना पुस्तकी ज्ञानापेक्षा कौशल्य आवश्यक आहे  हे ओळखून सिम्बॉयसिस संस्थेने पहिले कौशल्य विकास विद्यापीठ सुरु केले.  या विद्यापीठातून बाहेर  पडणारा विद्यार्थी आत्मविश्वास सोबत घेवून यशस्वी उद्योजक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राजेश खत्री यांनी फियाट- सिम्बॉयसिस या उपक्रमातील अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल  मुलींचे अभिनंदन केले. फियाट इंडिया आणि सिम्बॉयसिस विद्यापीठ यांच्यातील हा संयुक्त प्रकल्प आर्थिकदृष्ट्या वंचित मुलींना उत्पादन  क्षेत्रात प्रशिक्षण घेण्याची संधी देतो, असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठातील कौशल्ये आत्मसात करून यशस्वीपणे करियर सुरु करणाऱ्या स्वप्नील मखरे आणि स्वाती पांचाळ या  विद्यार्थ्यांना कुशल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समारंभाला विद्यापीठाचे प्राध्यापक, कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

000

जर्मनी येथील प्रशिक्षणासाठी सांगलीच्या खेळाडूंनी स्थान मिळवावे – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 9 (जिमाका) :- एफ. सी. बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करावी. या स्पर्धेतून निवडलेल्या खेळाडूंना जर्मनी येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार असून निवड होणाऱ्या खेळाडूंच्या चमुमधे सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी स्थान मिळवावे, अशी अपेक्षा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केली.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सांगली यांच्या वतीने आयोजित 14 वर्षाखालील जिल्हास्तरावरील एफ.सी.बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा उद्घाटन सोहळाप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांच्यासह क्रीडा शिक्षक, विद्यार्थी व  क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, विद्यार्थ्यांमधील क्रीडा नैपुण्याचा शोध घेऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्यांना आवश्यक प्रशिक्षण मिळावे यासाठी राज्य शासनाच्यावतीने या फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेतून 20 खेळाडूंची निवड करून त्यांना पुढील प्रशिक्षणासाठी जर्मनी येथे पाठविण्यात येणार आहे.  खेळाडूंनी या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करुन क्रीडा क्षेत्रात लौकिक मिळवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या

या फुटबॉल स्पर्धेत जिल्ह्यातील 17 संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतील विजेता संघ आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या संघातील 5 खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी यावेळी दिली.

000

जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार – उद्योग विभागाचे विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह

नाशिक: दिनांक 09 फेब्रुवारी, 2023 (जिमाका वृत्तसेवा): उद्योग आणि व्यवसाय वृद्धीसाठी नाशिक शहरात पूरक व पोषक वातावरण आहे. जिल्ह्यात उद्योगांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर प्रयत्न करणार, असे प्रतिपादन उद्योग विभागाचे विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित औद्योगिक गुंतवणूक परिषदेत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, नाशिक विभागाचे उद्योग सह संचालक एस. आर. लोंढे, उद्योग सहसंचालक (निर्यात) शैलेश राजपूत, मैत्रीच्या अधिक्षकीय उद्योग अधिकारी मृणालिनी देवराज, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, वित्तीय सल्लागार समितीचे सदस्य श्रीकांत बडवे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदिप पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, कामगार आयुक्त विकास माळी यांच्यासह औद्योगिक संघटना, उद्योजक, बँक अधिकारी उपस्थित होते.

उद्योग विभागाचे विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह म्हणाले की, जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वसमावेशक धोरण शासन स्तरावर प्रस्तावित आहे. उद्योग विभागाने उद्योगांसाठी घेतलेले महत्वाचे निर्णय व त्याचा उद्योगांवर होणारा दुरगामी परिणाम, उद्योग क्षेत्रातील अडचणी, मागदर्शक सूचना  याबाबत संवादात्मक चर्चा आयोजित परिषदेत केली जाणार आहे. महाराष्ट्र  हे देशातील पुरोगामी राज्‍य असून राज्याचा जी. डी. पी. मधील सहभाग, निर्यात, गुंतवणूक, पायाभूत सुविधा, इज ऑफ डुईंग बिजनेस व स्टार्टअप या सर्वच बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. हे स्थान टिकविण्यासाठी उद्योजकांची कामगिरी भविष्यात महत्वाची ठरणार असल्याचेही उद्योग विभागाचे विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह यांनी सांगितले.

मुंबई, पुणे या शहरांच्या तुलनेत नाशिक हे शेती, पर्यटन, उद्योग, संरक्षण या क्षेत्रात नावारूपास येत आहे. नाशिकमध्ये जास्तीत जास्त उद्योगांची स्थापना व्हावी व जे उद्योग येथे कार्यरत आहेत, त्यांच्या अडचणी व धोरणात्मक विषयांचा निपटारा जिल्हा, विभाग व शासन स्तरावर करण्यात येणार आहे. उद्योग वाढीतून रोजगाराच्या संधी यासोबतच उत्पन्न व महसूल देखील वाढणार आहे. उद्योग संदर्भातील धोरणांमध्ये कालानुरूप सुधारणा करण्यात येत असून नवनवीन सर्वसमावेशक धोरण शासनस्तरावर आखले जात आहेत. आज परिषदेच्या माध्यमातून याबाबत उद्योजकांच्या प्रतिक्रिया व अनुभव जाणून घेवून त्यांचा समावेश नवीन उद्योग धोरणांमध्ये करण्यात येणार आहे. एक खिडकी योजनेसंदर्भात मंत्रिमंडळात निर्णय घेतला जाणार असून त्यांची अंमलबजाणी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हापातळीवर केली जाणार आहे. एक खिडकी योजनेच्या माध्यमातून नवउद्योजकांना उद्योगांसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या परवानग्या एकाच ठिकाणाहून 30 दिवसांच्या मुदतीत प्राप्त होणार आहेत, अशी उद्योग विभागाचे विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह यांनी उपस्थितांना यावेळी दिली.

जिल्ह्यातील औद्योगिक पर्यटन विकासाच्या दृष्टीने नियोजनबद्ध

आराखडा तयार करावा –  विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

उद्योगांसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा व पाण्याचे स्त्रोत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्राचा विकास हा जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता विभागातील इतर जिल्ह्यातील औद्योगिक विकासाच्या दृष्टीने नियोजन गरजेचे आहे. नाशिक जिल्ह्यात कृषीपूरक उद्योगांना चांगली संधी उपलब्ध आहे. उद्योगवाढीच्या दृष्टीने दळणवळणाच्या सुविधा चेन्नई- सुरत महामार्ग, रेल्वे, हवाई मार्ग विकसित होत आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या दृष्टीने रिंगरोडचे नियोजन सुद्धा करण्यात येत आहे. त्यामुळे उद्योग व रोजगाराच्या संधी भविष्यात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत. त्यादृष्टीने उद्योगासाठी जागेंची उपलब्धता करावी लागणार आहे. जिल्ह्यात धरणांची संख्या जास्त आहे. धरण क्षेत्रालगत पर्यटन उद्योग वाढले पाहिजेत. यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात यावा, असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, वित्तिय सल्लागार समितीचे सदस्य श्रीकांत बडवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक विभागाचे उद्योग सह संचालक एस. आर. लोंढे यांनी तर सुत्रसंचलन जयंत ठोंबरे यांनी केले.

000

विविध शासकीय इमारतींच्या निर्मितीतून कामकाज गतीमान होणार – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दिनांक 9 फेब्रुवारी 2023 (जिमाका वृत्त) : जेवढा दुर्गम भाग असेल तेवढ्या आरोग्याच्या समस्या जटील असतात; अशा परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेताना जे ज्ञान विद्यर्थ्यांना मिळेल ते जगाच्या पाठीवर कुठेही मिळू शकत नाही त्यामुळे नंदुरबार सारख्या दुर्गम जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाच्या अमर्याद संधी आहेत. तसेच जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवी वर्षात विविध विभागांच्या निर्माण होणाऱ्या स्वतंत्र इमारतींमुळे प्रशासकीय कामगाज गतीमान व अधिक सुविधांनीयुक्त होईल, असा विश्वास आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्य्यक्त केला आहे.

ते आज नंदुरबार शहरात माता व बाल संगोपन रूग्णालय, अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र समिती, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतींच्या पायाभरणी समारंभ प्रसंगी बोलत होते. यावळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, आमदार आमश्या पाडवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकरे जिल्हा आरोग्य डॉ. गोविंद चौधरी तसेच जात पडताळणी समितीचे सहआयुक्त गिरीष सरोदे, अन्न व औषध प्रशासनाचे सह-आयुक्त विभागीय गणेश परळीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली पाटील, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, विवध यंत्रणांचे अधिकारी व नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, या जिल्ह्याची निर्मिती अत्यंत आग्रहपूर्वक व दूरदृष्टिकोनातून केली करण्यात आली आहे. पालकमंत्री या नात्याने विवध उपक्रम, योजना, संसाधनांची निर्मिती करून जिल्ह्याच्या पालन-पोषणाच्या जबाबदारीचे निर्वहन अत्यंत सुक्ष्म नियोजन व दृष्टिकोनातून केले जाईल, असाही विश्वास त्यांना यावेळी उपस्थितांना दिला. तसेच पुढे ते म्हणाले, गुजरात, मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या या भागाचा  विकास केवळ स्वतंत्र जिल्हा निर्मितीमुळे आपण करू शकलो. नंदुरबार जिल्ह्यासोबत व त्यानंतरही ज्या जिल्ह्यांची निर्मिती झाली त्या जिल्ह्यांच्या तुलनेत नंदुरबार चा विकास अत्यंत वेगाने व शाश्वत स्वरूपात आपण करतो आहोत. लवकरच वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी घेतलेली पहिली बॅच बाहेर येणार असून या महाविद्यालयातून शिक्षण घेवून बाहेर पडणारे विद्यार्थी नक्कीच स्वत:ला भाग्यशाली समजतील एवढ्या क्लिष्ट स्वरूपाची रुग्णसेवा त्यांच्या हातून शिक्षण घेतानाच होते आहे. त्यामुळे जगातील कुठल्याही आरोग्य समस्येला सहज उपाय करणारे विद्यार्थी येथे घडलेले आपल्याला दिसतील. लवकरच वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतींचा पायाभरणी समारंभ होणार असून 41 एकर च्या परिसरात सुसज्ज, सर्व सुविधांनीयुक्त असे वैद्यकीय शिक्षण संकुल आपल्याला पहावयास मिळणार आहे. त्याचबरोबर लवकरच येथे वैद्यकीय शिक्षणाचे पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. गावित यांनी देवून विविध इमारतींच्या पायाभरणीस शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत.

जिल्ह्यातील प्रत्येक बालकाचे पोषण करणार – डॉ. सुप्रिया गावित

जिल्ह्यातील कुठलेही बालक पोषणापासून वंचित राहणार नाही याची काळजी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेतली जात आहे. कामाच्या निमित्ताने परराज्यात स्थालांतरित होणाऱ्या मजूराच्या मुलांना ट्रॅक करून ते ज्या राज्यातील गावात स्थलांतरित होत आहेत तेथे अंगणवाडी व प्रशासनाच्या समन्वयातून पोषण आहार दिला जात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक बालकाचे पोषण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वचनबद्ध असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी सांगितले.

कुपोषणमुक्त जिल्हा म्हणून ओळख निर्माण करणार – डॉ. हिना गावित

कुपोषण आणि बालमृत्युचा शिक्का आपल्या जिल्ह्याला बसला असून हा शिक्का पुसून काढण्याची पायाभरणी म्हणजे हे माता व बाल संगोपन रूग्णालय असून जिल्ह्यातील प्रत्येक माता व जन्माला येणारे बालक हे सुदृढ व निरोगी राहील यासाठी देशातील उपलब्ध सर्वोच्च साधन-सामुग्री व सुविधा या रूग्णालयात केल्या जाणार आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून या रूग्णालयाची निर्मिती केली जात असून त्यासाठी कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन यावेळी खासदार डॉ. हिना गावित यांनी दिले.

 

000

बृहन्मुंबईत १९ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी आदेश लागू

मुंबई, दि. ९ : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील अधिकारानुसार पोलीस उपायुक्त (अभियान) यांनी संपूर्ण बृहन्मुंबई शहरात १९ फेब्रुवारी २०२३ पर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे.

या आदेशानुसार पाच किंवा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलन, मिरवणूक, कोणत्याही मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाद्ये, बँड आणि फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

सर्व प्रकारचे विवाह समारंभ इ., अंत्यसंस्कार सभा आणि स्मशानभूमी/ दफनभूमी स्थळांच्या मार्गावर मिरवणूक, कंपन्या, क्लब, सहकारी संस्था, इतर संस्था आणि संघटनांच्या कायदेशीर बैठका, सामाजिक मेळावे, क्लब, सहकारी संस्था, इतर सोसायट्या आणि संघटना यांचे सामान्य व्यवहार करण्याच्या बैठकांना या बंदीतून वगळण्यात आले आहे.

चित्रपटगृहे, नाटकगृहे किंवा सार्वजनिक करमणुकीच्या कोणत्याही ठिकाणी किंवा त्याभोवती चित्रपट, नाटक किंवा कार्यक्रम पाहण्याच्या उद्देशाने भरविलेले संमेलन, सरकारी किंवा निमशासकीय कार्ये पार पाडण्यासाठी सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची कायदे न्यायालये आणि कार्यालयांमध्ये किंवा त्याभोवती लोकांचे संमेलन, शैक्षणिक उपक्रमांसाठी शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा त्यांच्या आसपासची संमेलने, कारखाने, दुकाने आणि आस्थापनामध्ये सामान्य व्यापार, व्यवसाय आणि आवाहनासाठी संमेलने, अशी इतर संमेलने आणि मिरवणुकी, ज्यांना विभागीय पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई आणि त्यांचे पर्यवेक्षक अधिकारी यांनी परवानगी दिली आहे, अशा बाबींना या जमावबंदीतून सूट देण्यात आली आहे, असे आदेश बृहन्मुंबई पोलीस उप आयुक्त (अभियान) विशाल ठाकूर यांनी काढले आहे.

000

पवन राठोड/ससं/

शासकीय सेवेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात – पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक, दिनांक: 9 फेब्रुवारी 2023 (जिमाका वृत्तसेवा): भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाच्या शासकीय विभागांतील 75 हजार पदांची भरती करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने अनुकंपा भरती अंतर्गत नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांनी शासकीय सेवेत काम करतांना नियमांचे पालन करून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे अनुकंपा भरती 2023 नियुक्ती आदेश वाटपाच्या आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उप वनसंरक्षक पंकज गर्ग, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सागर शिंदे, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, जिल्ह्यातील विविध विभागांच्या अनुकंपा प्रतिक्षासूचीतील पात्र उमेदवारांना देण्यात आलेले नियुक्ती आदेश म्हणजे त्यांना जनसेवा करण्याची मिळालेली संधी आहे. शासकीय सेवेत काम करतांना नियम, कायद्यांचे पालन करून सामान्य नागरिकांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून राज्याची प्रगती झाली पाहिजे या दृष्टिने काम करणे अपेक्षित आहे, असेही पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

राज्यात विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून नोकर भरतीची प्रक्रीया प्रगतीपथावर आहे. याच धर्तीवर जिल्ह्याने राबविलेला अनुकंपा भरतीचा पॅटर्न राज्यात उत्स्फूर्तपणे स्वीकारला जाईल. तसेच अनुकंपा भरती प्रक्रीया राबवत असतांना अनुकंपा तत्वावरील पात्र लाभार्थ्यांना नोकरी देण्यासाठी असणारे नियम लक्षात घेवून जिल्ह्यातील सर्व विभागांनी मोहिमस्तरावर केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे. त्यामुळे अनुकंपा तत्वामधील पात्र उमेदवारांना न्याय मिळाला आहे. याचप्रमाणे येत्या काळात इतर शासकीय यंत्रणांनी देखील त्यांच्या विभागातील पात्र असणाऱ्या अनुकंपा उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करावे, अशा सूचनाही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी विभाग प्रमुखांना दिल्या आहेत.

पात्र उमेदवारांना अनुकंपाच्या माध्यमातून नोकरी मिळाली आहे, त्यांनी आपल्या कुटुंबियांचा आदरपूर्वक सांभाळ करण्याची जबाबदारी देखील पार पाडावी. व्यसनांपासून स्वत:सोबतच इतरांनाही दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून सर्व नियुक्ती आदेश मिळालेल्या उमेदवारांना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाच्या सुरूवातीला पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते 50 उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्ती आदेशांचे वाटप करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील 37 विभागातील 275 पात्र अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वाटप यावेळी केले. जिल्हा परिषदेतील सर्वाधिक म्हणजे 127 अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले. त्यासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, रवींद्र परदेशी व अनुकंपा भरती प्रक्रीयेत समन्वय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार विजय कच्छवे यांनी पार पाडलेली जबाबदारी उल्लेखनीय असल्याने पालकमंत्री श्री. भुसे यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. व जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी मनोगत व्यक्त करत सर्व नवनियुक्त उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

या विभागांनी दिले अनुकंपा नियुक्ती आदेश.

.क्र. कार्यालय आदेश वाटप संख्या
1 जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक 7
2 जिल्हा परिषद, नाशिक 127
3 उप संचालक (आरोग्य सेवा), नाशिक 17
4 महानगरपालिका, नाशिक 16
5 महानगरपालिका, मालेगाव 9
6 अधिक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक 11
7 सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, नाशिक 9

 

 

8 मुख्य वनसंरक्षक, (प्रादेशिक), नाशिक 8
9 विभागीय सह निबंधक सहकारी संस्था लेखा परिक्षण, नाशिक 7
10 अपर आयुक्त आदिवासी विकास, नाशिक 6
11 विभागीय कृषी सह संचालक,नाशिक 6
12 पोलीस अधिक्षक, नाशिक ग्रामिण, नाशिक 5
13 विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था,नाशिक 4
14 प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक 4
15 प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण 4
16 अधिक्षक अभियंता, यांत्रिकी मंडळ, नाशिक 3
17 कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक 3
18 सहसंचालक, तंत्र शिक्षण, नाशिक 3
19 मा.पोलीस आयुक्त, नाशिक शहर,नाशिक 3
20 अधिक्षक अभियंता, धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, धुळे 3
21 प्रादेशिक सह आयुक्त, पशुसंवर्धन, नाशिक 2
22 अपर राज्यकर आयुक्त, वस्तु व सेवाकर नाशिक 2
23 अधिक्षक अभियंता, धरण सुरक्षितता, नाशिक 2
24 जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नाशिक 1
25 जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), नाशिक 1
26 उपसंचालक (भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा) नाशिक 1
27 जिल्हा शल्य चिकित्सक, नाशिक 1
28 उपसंचालक (माहिती ), नाशिक 1
29 अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, नाशिक 1
30 अधिक्षक अभियंता, (प्रशासन) मध्यवर्ती संकल्प चित्र संघटना, नाशिक 1
31 अधिक्षक अभियंता, आधार सामग्री पथ:करण मंडळ, नाशिक 1
32 सहसंचालक, स्थानिक निधी लेखा परिक्षण, नाशिक 1
33 अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ नाशिक 1
34 उप संचालक, क्रिडा व युवक सेवा, नाशिक 1
35 सहजिल्हा निबंधक, वर्ग 1 नाशिक 1
36 जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक 1
37 अधिक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, अहमदनगर 1
एकुण 275

 

000

ताज्या बातम्या

पायाभूत विकास प्रकल्पांसाठी युनिक आयडी पोर्टल प्रशिक्षण कार्यशाळा

0
छत्रपती संभाजीनगर, दि.२० (विमाका): राज्यातील प्रत्येक पायाभूत प्रकल्पासाठी युनिक पायाभूत सुविधा आयडी (Infra ID Portal) संदर्भात प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या...

यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानांतर्गत गुणवंतांचा गौरव

0
छत्रपती संभाजीनगर, दि. २० :“प्रामाणिकपणे, जबाबदारीने आणि कार्यतत्परतेने काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव हा इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो,” असे प्रतिपादन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले. यशवंतराव...

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – पालकमंत्री संजय राठोड

0
 पंचनाम्यातून नुकसानग्रस्त सुटणार नाही याची दक्षता घ्या संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश यवतमाळ, दि. २० (जिमाका): गेले दोन दिवस जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी – प्रभावी सामाजिक कल्याण योजना

0
मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही राज्य शासनाची एक प्रभावी सामाजिक कल्याण योजना असून, ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गंभीर आजारांनी ग्रस्त व आपत्तीग्रस्त नागरिकांना वेळेवर मदत पोहोचवण्याच्या...

रुग्णांना उपचारासाठी मिळतोय मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा भक्कम आधार !

0
३० रुग्णांना उपचारासाठी २३ लक्ष रुपयांचा निधी वितरीत राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवन जगता यावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागर्दशनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता...