सोमवार, ऑगस्ट 18, 2025
Home Blog Page 1647

तरुणाईने जिल्ह्यात येणाऱ्या चांगल्या प्रकल्पांचे स्वागत करण्याची भूमिका घ्यावी – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी, दि.१२ (जिमाका): जिल्ह्यातच नोकरी उपलब्ध होण्यासाठी भविष्याचा विचार करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या चांगल्या प्रकल्पांचे स्वागत करण्याची भूमिका येथील तरुणाईने घेतली पाहिजे, असे मत राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे व्यक्त केले.

श्री. सामंत यांच्या हस्ते आज शहरातील रा.भा. शिर्के प्रशाला, माळनाका येथे महाराष्ट्रातील पहिल्या भव्य रोजगार महामेळाव्याचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उद्योग विभागाचे सहसंचालक सतीश भामरे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, रायगड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जीएस हरळय्या, पालघर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उद्धव माने, बँक प्रतिनिधी, अण्णा सामंत, युवा हब चे संचालक किरण रहाणे, राहुल पंडित, शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी महोत्सव घेण्याचे निश्चित करण्यात आले. माझ्याकडे उद्योग खाते असल्याने त्याची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यातून करण्यात आली. या नोकरी महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून यासाठी ऑनलाईन ७ हजार ८०० अर्ज प्राप्त झाले तसेच ऑफलाईन अर्जही मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाल्याचे ते म्हणाले. राज्यासह राज्याबाहेरील, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तब्बल १३० कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी झाल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

पालकमंत्री श्री.सामंत पुढे म्हणाले की, रत्नागिरीच्या समुद्रकिनारी स्टील इंडस्ट्रीज उभारुन येथील हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची इच्छा उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी एका भेटीत व्यक्त केली. तर इलेक्ट्रॉनिक मोटर्स हब रत्नागिरी मध्ये उभारण्याची इच्छा सज्जन जिंदाल यांनी व्यक्त केल्याचेही ते म्हणाले. परंतु येथील जनतेने मानसिकता बदलणे फार गरजेचे असल्याचे आहे, जिल्ह्यातच नोकरी उपलब्ध होण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या चांगल्या प्रकल्पांचे स्वागत करण्याची भूमिका येथील तरुणाईने घेतली पाहिजे.

कोकणातील तरुणाईने नोकरीसाठी जिल्ह्याबाहेर जाण्याची मानसिक आणि शारीरिक तयारी ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येकाच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत.

अशा प्रकारचे मेळावे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येणार आहेत. येत्या १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील तरुण-तरुणींसाठी ऐतिहासिक नोकरी मेळावा सीमा भागात घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत कर्ज मंजूरी पत्र वाटप करताना मंत्री श्री. सामंत नोकरी करण्यापेक्षा आपण नोकरी देणारे बनावे. स्वतःचे उद्योग उभारावेत असे आवाहन उपस्थित तरुण-तरुणींना केले.

पुणे जिल्ह्यातील तळेगांव येथील महिलांनी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण नर्सरीचे त्यांनी उदाहरण दिले. या महिलांसारखेच कोकणातील महिलांनी-युवतींनीही नाविन्यपूर्ण उद्योग करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

या रोजगार महामेळाव्याच्या माध्यमातून ज्या युवक युवतींची नोकरीसाठी अंतिम निवड झालेली आहे अशांना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी ज्या बँकांनी उल्लेखनीय कामगिरी केली अशा बँ व्यवस्थापकांचाही सन्मान करण्यात आला. मिलिंद गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले. सतीश भामरे यांनी प्रस्तावना केली. विद्या कुलकर्णी यांनी आभार मानले.

मूकबधीर युवकांच्या रोजगारासाठी पालकमंत्री श्री. सामंत यांनी घेतला पुढाकार

दरम्यान महामेळाव्यानिमित्त काही मूकबधीर युवक या ठिकाणी आल्याचे पालकमंत्र्यांना समजले. अशा युवकांना कोणते काम, नोकरी द्यायची हा यक्ष प्रश्न सर्वांसमोर उभा असल्याचे पालकमंत्र्यांच्या लक्षात येताच त्यांनी अतिशय संवेदनशीलतेने या युवकांसाठी तात्काळ तिथेच बैठक आयोजित केली. त्या सर्व युवकांची व त्यांच्यासह आलेल्या पालकांची मंत्री श्री. सामंत यांनी आस्थेने विचारपूस करून संवाद साधला. या युवकांना कशा प्रकारे नोकरी देता येईल, त्यांच्या कायमस्वरूपी उपजीविकेसाठी काय करता येईल, यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा केली.

मूकबधीर युवकांकडे कौशल्य,बुद्धी असूनही त्यांना योग्य संधी मिळत नाही. त्यामुळे आता या युवकांना योग्य ती संधी मिळण्यासाठी नेमके काय करता येईल, यासाठी येत्या काही दिवसातच स्वतंत्र बैठक घेऊन पुढील एक महिन्याच्या कालावधीत या युवकांच्या उपजीविकेसाठी कायमस्वरूपी पर्याय उपलब्ध करून दिला जाईल, असा निर्णय पालकमंत्र्यांनी घेतला.

रत्नागिरीच्या रोजगार महामेळाव्यात २ हजार १४० जणांना मिळाली नोकरी

आजच्या रोजगार महामेळाव्यात नोंदणी झालेल्या जवळपास १० हजार उमेदवारांपैकी ४ हजार ४२८ जणांच्या मुलाखती आज पार पडल्या. त्यातील २ हजार १४० जणांना नोकरीचे देकार (ऑफर) प्रमाणपत्र तात्काळ अदा करण्यात आले. तसेच २ हजार ८८ उमेदवारांना कौशल्य विकास विभागाकडे कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी संदर्भित करण्यात आले आहे. या २ हजार ८८ उमेदवारांना आवश्यक ते प्रशिक्षण देऊन भविष्यात त्यांनाही नोकरी मिळवून देण्यात येणार आहे.

000

वेरुळ येथील शहाजीराजे भोसले स्मारक व मालोजीराजे भोसले गढीचा सर्वांगिण विकास करणार –  केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

औरंगाबाद, दि.१२, (विमाका) : जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी व पर्यटनाला चालना मिळण्यासाठी निधी मिळवून देण्यात येईल. अशी ग्वाही केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली. वेरुळ येथे शहाजीराजे भोसले स्मारक व मालोजीराजे भोसले गढीचा सर्वांगिण विकास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वेरुळ येथे शहाजीराजे भोसले स्मारक व मालोजीराजे भोसले गढीच्या नूतनीकरण शुभारंभ प्रसंगी डॉ.कराड बोलत होते.

कार्यक्रमास माजी महापौर नंदकुमार घोडेले, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन कराड, वेरुळचे सरपंच प्रकाश पाटील, अभिजित देशमुख, अनिल मानकापे, किशोर चव्हाण आदी उपस्थित होते.

डॉ.कराड म्हणाले की, औरंगाबाद ऐतिहासिक शहर आहे. या शहराला राज्य शासनाने पर्यटनाची राजधानी असे संबोधले आहे. जगप्रसिद्ध वेरुळ, अजिंठा लेण्यांमुळे पर्यटक आकर्षित होतात. त्यादृष्टीने पर्यटन वाढीसाठी तसेच पर्यटकांना सोईसुविधा तसेच या परिसराच्या सर्वागीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहाजीराजे स्मारक व मालोजीराजे गढीच्या सर्वांगिण विकासासाठी सीएसआरमधून ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. विकासासाठीचा आराखडा तयार करण्यात आला असून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय  पातळीवर साजेसे काम होणार आहे. यामध्ये नाईट टुरिझम, आकर्षक वीज रोषणाई व पर्यटक आकर्षित होतील असा विकास करण्यात येईल. गढीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही डॉ. कराड म्हणाले.

जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणांची जपणूक, संवर्धन, सौंदर्यीकरण करुन पर्यटनाला चालना देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव असून अनेक कामांना निधी मिळवून देण्याबाबत आपला पाठपुरावा सुरू असुन लवकरच ही कामे गती घेतील, असा विश्वास डॉ. कराड यांनी व्यक्त केला.

शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन कराड यांनी शिवजयंती उत्सवाबाबत माहिती दिली. शिवजयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धा व महिलांसाठी दीपोत्सव अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा,असे आवाहन त्यांनी केले. माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी युवक, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

०००

दिवंगत शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून २५ लाखांची मदत – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी,दि.१२(जिमाका) : दिवंगत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल व त्यांच्या मुलाच्या कायमस्वरुपी नोकरीची जबाबदारी घेतली जाईल, असे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबातील त्यांचा एक मुलगा आणि आजी यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून संपूर्ण महाराष्ट्रातून करण्यात येत होती.

आज रत्नागिरीत रोजगार महामेळाव्या निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत येथील पत्रकारांनीही पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, ही मागणी मंत्री श्री. सामंत यांच्याकडे पुन्हा केली. पत्रकारांच्या या मागणीची दखल घेत मंत्री श्री. सामंत यांनी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाख व इतर माध्यमातून १५ लाख अशी मदत पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. याची घोषणा पालकमंत्री श्री. सामंत यांनी आज येथे केली. याशिवाय वारिसे यांच्या मुलाला कायमस्वरुपी नोकरी देण्याची जबाबदारीही श्री. सामंत यांनी स्वीकारली आहे.

000

सर्वसमावेशक मतदार नोंदणीसाठी पुणे जिल्ह्याने केलेले काम वाखाणण्याजोगे- स्वीप संचालक

पुणे दि.11: जिल्ह्याने सर्वसमावेशक मतदार नोंदणीसाठी केलेले काम वाखाणण्याजोगे असून महाविद्यालयात राबविण्यात आलेली मतदार नोंदणी मोहीम ही देशपातळीवर मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे स्वीप संचालक संतोष अजमेरा यांनी केला.

जिल्हाधिकारी कार्यालयात कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, उपजिल्हाधिकारी अजय पवार, केंद्रीय संचार ब्युरोचे उपसंचालक निलेश देशमुख, उप जिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले आदी उपस्थित होते.

श्री.अजमेरा म्हणाले, जिल्ह्यात मतदार यादी शुद्धीकरणाचे कामही चांगल्याप्रकारे झाले आहे. प्रत्येक मतदान केंद्र क्षेत्रात मतदार मार्गदर्शिका वितरित करावी. छायाचित्र मतदार ओळखपत्र नसले तरी इतर 12 पुराव्यापैकी एक दाखवून मतदान करता येते याबाबत त्यांना माहिती द्यावी. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मतदान प्रक्रियेविषयी माहिती द्यावी. विशिष्ट भागात मतदान कमी होण्याची कारणे लक्षात घेऊन त्यास अनुसरून जनजागृती संदेश देण्यात यावे.

उद्योग संघटनांच्या मदतीने कामगारांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे. कमी मतदान असलेल्या भागात मतदारांना मतदान करण्यासाठी पत्राद्वारे आवाहन करण्यात यावे. विविध माध्यमातून चांगले उपक्रम राबविल्याने जिल्ह्यात दिव्यांग मतदारांच्या संख्येत चांगली वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्याने मतदार नोंदणी आणि मतदार यादी शुद्धीकरणासाठी राबविलेल्या उपक्रमांचे सादरीकरण राज्यस्तरावर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी म्हणाले, दोन्ही मतदारसंघात कमी मतदान असलेल्या मतदान केंद्रांची माहिती संकलित करण्यात आली आहे. या मतदान केंद्र परिसरात मतदार जागृतीवर भर देण्यात येत आहे. मतदार यादी सर्वसमावेशक करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनातर्फे नियोजनबद्ध जनजागृती उपक्रम राबविण्यात  येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री.पवार यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या जनजागृती उपक्रमांची माहिती दिली.

स्वीप संचालकांची माध्यम केंद्राला भेट

स्वीप संचालक श्री.अजमेरा यांनी बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापित करण्यात आलेल्या माध्यम केंद्राला भेट दिली. त्यांनी केंद्रातील माध्यम संनियंत्रण कामाबाबत समाधान व्यक्त केले. अत्यंत सुनियोजित पद्धतीने माध्यम संनियंत्रणाचे काम करण्यात येत असल्याचे श्री.अजमेरा म्हणाले. समाजमाध्यमाद्वारे करण्यात येत असलेल्या मतदार जनजागृती आणि समाजमाध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठीची यंत्रणेबाबत त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले.

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्र तिसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदाचा मानकरी ठरला

मुंबई,दि.11 : “महराष्ट्राच्या खेळाडूंनी क्रीडा क्षेत्र आपलेसे केले आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी छाप पाडली, तर आता खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राने तिसऱ्यांदा विजेतेपदाची कामगिरी केली. या कामगिरीने महाराष्ट्राचे क्रीडा क्षेत्रातील एक पाऊल पुढे पडले आहे. भविष्यातही महाराष्ट्राचे खेळाडू असेच चमकदार कामगिरी करतील आणि ऑलिम्पिक स्पर्धेतील आपला टक्का वाढवतील यात शंका नाही. याची ही चाहूल आहे. महाराष्ट्र सरकार खेळाडूंच्या सतत पाठिशी उभे राहिल. खेळाच्या विकासासाठी आणि खेळाडूला काही कमी पडणार नाही. सगळ्या सुविधा महाराष्ट्रात कशा उपलब्ध होतील, यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. खेळाडूंनी कामगिरीत असेच सातत्य राखावे, सरकार त्यांच्या पाठिशी नाही, तर बरोबरीने उभे राहिल असा मी विश्वास देतो,” अशा शब्दात राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले.

महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या पर्वात १६१(५६, ५५, ५०) पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. महाराष्ट्राने तिसऱ्यांदा या स्पर्धेत विजेतेद पटकावले. यापूर्वी २०१९ पुणे आणि २०२० आसाम येथेही महाराष्ट्र विजेते ठरले होते. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी तीन सुवर्ण आणि प्रत्येकी एका रौप्य, तसेच ब्रॉंझपदकाची कमाई केली. कुस्तीत नरसिंग पाटील ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला.

स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी अपेक्षाने ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक शर्यत ३३.९२ सेकंदात जिंकली. मुलांच्या ५० मीटर फ्री-स्टाईल शर्यतीत जयवीर मोटवानीने २४.३२ सेकंद वेळ देत सोनेरी कामगिरी केली. याच स्पर्धा प्रकारात अर्जुनवीर गुप्ता रौप्यपदकाचा मानकरी ठरला. महाराष्ट्राला आजचे आणि स्पर्धेतील अखेरचे सुवर्णपदक ४ बाय १०० मीटर फ्री-स्टाईल रिले शर्यतीत मुलांनी मिळवून दिले. या संघात ऋषभ दास, अर्जुनवीर गुप्ता, शुभंकर पत्की, वेदांत माधवन यांचा समावेश होता. त्यांनी ३ मिनिट ३७.६५ सेकंद अशी वेळ दिली. मुलींच्या २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात धृती अग्रवाल तिसरी आली. तिने २ मिनिटे २८.६७ सेकंद अशी वेळ दिली.

कुस्तीत नरसिंग पाटील ला ब्रॉंझ

महाराष्ट्राला खेलो इंडिया स्पर्धेतील कुस्तीमध्ये शेवटच्या दिवशी एका ब्रॉंझपदकाची कमाई झाली. कोल्हापूरच्या नरसिंग पाटील याने फ्री स्टाईल विभागातील ५५ किलो गटात हे यश संपादन केले. त्याने राजस्थानच्या अनुज कुमार याच्यावर शानदार विजय मिळविला. उपांत्य फेरीत त्याला राजस्थानच्या ललित कुमार याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. नरसिंग हा बेळगाव येथील आर्मी बॉईज इन्स्टिट्यूटमध्ये सराव करीत आहे.‌

महाराष्ट्राला कुस्तीमध्ये यंदा येथे दोन सुवर्ण, तीन रौप्य व तीन कांस्यपदकांची कमाई झाली. स्पर्धेत महाराष्ट्राला योगासन, तलवारबाजी या क्रीडाप्रकारात घवघवीत यश मिळाले. मल्लखांबमध्येही महाराष्ट्राचे खेळाडू चमकले. जिम्नॅस्टिकमध्ये संयुक्ता काळेने आपली छाप पाडली. सायकलिंगमध्ये पूजा दानोळेने आपला ठसा उमटविला. टेबल टेनिस, बॅडमिंटन, कबड्डी, कुस्ती, नेमबाजी या प्रकारातही यश मिळविले.

 

वीस क्रीडा प्रकारात पदक

महाराष्ट्राने स्पर्धेत २२ क्रीडा प्रकारात सहभाग घेतला होता. यापैकी वीस क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने किमान एक तरी पदक कमावले. केवळ कलरीपटायु आणि गतका या दोन खेळात महाराष्ट्र पदक मिळवू शकला नाही.

 

अतिशय भूषणावह कामगिरी, महाराष्ट्राची शान उंचावली- देओल

महाराष्ट्राने खेलो इंडिया स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकून अतिशय भूषणावह कामगिरी केली आहे. या कामगिरीमुळे महाराष्ट्राची शान उंचावली आहे आणि महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंच्या पुढे त्यांची ही कामगिरी आदर्श ठरली आहे असे राज्याच्या क्रीडा व युवक खात्याचे सचिव श्री रणजीत सिंह देओल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले,”महाराष्ट्र संघाच्या या विजयामध्ये संघातील सर्व खेळाडू त्यांचे प्रशिक्षक सर्व जिल्हा व राज्य संघटक खेळाडूंचे सर्व पालक यांचा मोठा वाटा आहे. ”

नेत्रदीपक कामगिरीने भारावून गेलो- डॉ. दिवसे

“आमच्या खेळाडूंनी सर्वसाधारण विजेतेपद पटकावीत महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावला आहे.‌ खेळाडूंच्या या कामगिरीने मी अतिशय भारावून गेलो आहे.‌ हरियाणाच्या तुलनेत आमच्या पथकात कमी खेळाडू होते तरीही आमच्या खेळाडूंनी क्षमतेच्या 100% कामगिरी करीत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद मिळवून दिले. महाराष्ट्राचे हे यशस्वी खेळाडू आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमक दाखवतील आणि ऑलिंपिक सारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतही महाराष्ट्राची पताका उंचावतील,” अशा शब्दात महाराष्ट्राचे क्रीडा आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांनी महाराष्ट्राच्या खेळाडूंचा गौरव केला.

राष्ट्रीय संस्कृती महोत्सवातून देशाच्या संस्कृतीचे जतन होण्यासह तिला प्रोत्साहन मिळेल- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

            मुंबईदि. 11 : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. या देशात अनेक जातीधर्मप्रांतभाषा बोलल्या जातात. परंतुया देशाची संस्कृती भारताला सदैव एकसंघ ठेवते असे सांगत “राष्ट्रीय संस्कृती महोत्सव” देशाच्या संस्कृतीला जतन आणि प्रोत्साहन देण्याचे कार्य करेल असा आशावाद राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.

            केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव चर्चगेट येथील आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. जी किशन रेड्डीपर्यटनकौशल्य विकास व उद्योजकता,महिला व बालविकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढाकेंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या सह सचिव अमिता प्रसाद साराभाईसांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खरगे आदी मान्यवर उपस्थित होते.

            राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुढे म्हणाले कीभारताला श्रीमंत पुरातन संस्कृती लाभली आहे. या देशामध्ये नालंदातक्षशिलायांसारखे विद्यापीठ होती. परदेशी विद्यार्थी भारतात विद्या ग्रहण करण्यासाठी येत असे. याच पार्श्वभूमीवर भारत देश येत्या काळात कलानाटकक्रीडा यांसह इत्यादी कला प्रकारांना प्रोत्साहन देणारा व नेतृत्व करणारा देश बनेल. “राष्ट्रीय संस्कृती महोत्सव” याचा आरंभ असून येत्या काळात हा महोत्सव देशाच्या संस्कृतीला गौरवाच्या शिखरावर नेईल.

            याप्रसंगी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. जी किशन म्हणाले कीभारताप्रमाणे मुंबई शहराला प्राचीन वारसासांस्कृतिक समृद्धीआधुनिकतेचा गौरवशाली इतिहास इतिहास लाभला आहे. राष्ट्रीय संस्कृती महोत्सव भारताच्या याच महान परंपरेला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करेल. मुंबईत गणेश उत्सवनवरात्री यांसारखे विविध उत्सव साजरे केले जातात. या उत्सवांना सांस्कृतिकअध्यात्मिकसामाजिक महत्त्व आहे. राष्ट्रीय संस्कृती महोत्सवात सादर केल्या जाणाऱ्या सर्व कला भारताच्या युवकांना जोडतील. हे महोत्सव लुप्त होणाऱ्या कलांना व्यासपीठ उपलब्ध करून देईल तसेच भारतीय कला कौशल्य कार्यगिरी ग्रामीण उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येईल.

            श्री. जी किशन पुढे म्हणाले कीकेंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून देशातले प्राचीन ऐतिहासिक स्थळेतीर्थक्षेत्र यांना जतन करण्याचे कार्य सुरू आहे. महाराष्ट्र ही महामानवभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याची व्याप्ती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून दिनांक 14 एप्रिल 2023 पासून आंबेडकर सर्किट नावाने ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. ही ट्रेन भारतासह परदेशी अभ्यासकांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थानकर्मस्थानअंत्यसंस्कार झाले अशी चैत्यभूमी घडवणार असल्याचे श्री. जी किशन यांनी सांगितले.

            सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले कीभारताला समृद्ध असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. आज मुंबईत आयोजित करण्यात आलेला राष्ट्रीय संस्कृती महोत्सव हा राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मतेला प्रोत्साहन देण्यासाठी गरजेचा आहे. संयुक्त राष्ट्र संघाने देशाचे आकलन मूल्यांकन पर कॅपिटा इन्कम वर नसून हॅपिनेस इंडेक्स वर करणे सुरू केले आहे. धनाद्वारे भौतिक संसाधने विकत घेता येतात. परंतु मनःशांती आणि सुख विकत घेता येत नाही. मनशांती प्राप्त करण्यासाठी सांस्कृतिक विभाग महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो कारण हा विभाग आपल्यामध्ये नवचैतन्य ऊर्जा उत्साह निर्माण करतो असे श्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

            भारतीय सांस्कृतिक वारसा महोत्सव 11 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2023 या दरम्यान आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाअंतर्गत पारंपारिक आदिवासी व लोकनृत्यशास्त्रीय -गायन संगीत तसेच सुप्रसिद्ध कलाकारांचे सादरीकरण संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत असणार आहे. हस्तकला हस्तक्षेप तसेच पारंपरिक खाद्य महोत्सव सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत असणार आहे.

            हा महोत्सव भारताचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करण्याची संधी आहे. सांस्कृतिक देवाणघेवाणीद्वारे राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मतेला प्रोत्साहन देणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे. मंत्रालयाच्या वतीनं दरवर्षी भारतातील विविध राज्यांमध्ये या महोत्सवाचे आयोजन केले जाते. हा महोत्सव 2019 मध्ये मध्य प्रदेशात, 2022 मध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये आयोजित करण्यात आला होता.

‘राष्ट्रीय संस्कृती महोत्सवा’मध्ये ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चा नारा अधिक मजबूत होईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

             मुंबईदि. 11 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ चा नारा दिलेला आहे. राष्ट्रीय संस्कृती महोत्सवामध्ये हा नारा अधिक मजबूत होईल. कारण कला हीच अशी गोष्ट आहे की सर्व लोकांना एकत्र जोडत असते. आपण नव्या पिढीपर्यंत या महोत्सवाच्या माध्यमातून कला पोहोचवण्याचे काम करू, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

            आझाद मैदान येथे राष्ट्रीय संस्कृती महोत्सव – 2023’ भारतीय सांस्कृतिक वारसा महोत्सव हा केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित केला आहे. हा महोत्सव दि. 11 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डीसांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, केंद्रीय सांस्कृतिक विभागाच्या सह सचिव अमिता प्रसाद साराभाई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

             मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, आजपासून सुरू झालेला ‘राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव’ महाराष्ट्रात आयोजित केल्याबद्दल मी सर्वप्रथम केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डीजी यांना धन्यवाद देतो. आजपासून सुरु होणाऱ्या या महोत्सवाच्या निमित्ताने सगळ्या देशातील कला इथे सादर होणार आहेत. खरंतर आझाद मैदान येथे अनेक वेळा राजकीय कार्यक्रम होतात, रॅली येतात किंवा खेळाच्या स्पर्धा होतात, मात्र आझाद मैदानावर प्रथमच अशा प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना एक लाखापेक्षा जास्त कार्यक्रम देश – विदेशात घेतले आहेत. हा केवळ शासनाचा कार्यक्रम नसून तो जनतेचा कार्यक्रम आहे. महाराष्ट्र शासनाने संस्कृती आणि कलेला नेहमी प्रोत्साहन दिलेले आहे. नुकतेच महारार्ष्ट शासनाने ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्य गीत म्हणून स्वीकारले आहे. पर्यटन वाढीसाठी चालना देणारे उपक्रम राज्यात सुरू आहेत. राज्यात अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण नुकतेच प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. विकासाची घौडदौड अशीच सुरु राहणार आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे वातावरण देखील हलकेफुलके होते. महाराष्ट्रात असा कार्यक्रम होत आहे याचा मला खूप आनंद आहे. भारत देश हा विविध संस्कृतीने समृद्ध असलेला देश आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या देशातील कला नव्या पिढीला समजतील. या कार्यक्रमासाठी लागणारे सर्व सहकार्य केंद्र शासनाला केले जाईल असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

लोकसेवा हेच खरे अध्यात्म असल्याची शिकवण गुरुमाऊलींच्या विचारातून मिळते-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे दि.11: लोकसेवा हेच खरे अध्यात्म आहे, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो यासाठी काम करायला हवे ही शिकवण गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या महासत्संग सोहळ्यातून मिळते. शासनाच्या जनहिताच्या योजना अशा सोहळ्याच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचतात आणि जनतेला त्याचा लाभ मिळतो, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मोशी येथे आयोजित महासत्संग सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, संजय शिरसाठ, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, देहू संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. नितीन महाराज मोरे, आळंदी संस्थानचे विश्वस्त ॲड. विशाल ढगे पाटील, जेजुरी संस्थानचे विश्वस्त तुषार साने, पिंपरी चिंचवड संस्थानचे विश्वस्त तांबे महाराज, दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे ॲड. शिवराज कदम आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, गुरुमाऊलींचे लोककल्याणाचे कार्य अविरतपणे सुरू आहे. दिंडोरी येथे सात दशकापासून सामाजिक सुधारणेसाठी सेवामार्ग, व्यसनमुक्ती, बालसंस्कार, महिला सक्षमीकरण, आयुर्वेद, स्वयंरोजगार, बिना हुंडा सामुहिक विवाह असे अनेक समाजाच्या हिताचे उपक्रम ते राबवितात. सामाजिक विकासाचे व्रत अंगिकारताना हजारो सेवा केंद्राच्या माध्यमातून विश्वशांतीचा संदेश देत भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा गौरव जगभरात पसरवत आहेत.

गुरुमाऊलींच्या माध्यमातून जनतेच्या हितासाठी शासन जनतेच्या समस्या सोडविण्याचे कार्य केले जाते. इथे येणारा प्रत्येक माणूस प्रत्येकाला काही तरी देऊन जाणारा आहे. म्हणून असा सोहळा ही समाजाची गरज आहे. परमेश्वराशी समाजाच्या उन्नतीसाठी इथे संवाद साधला जात असल्याने हा सोहळा खऱ्या अर्थाने महासत्संग ठरतो, अशा शब्दात श्री.शिंदे यांनी सोहळ्याच्या आयोजनाचे कौतुक केले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गुरुमाऊली सांगत असलेला परमार्थ मार्ग जनतेच्या हिताचा, उन्नतीचा मार्ग आहे. दुसऱ्यासाठी जगण्यासाठी वेगळा आनंद असतो ही भावना सोहळ्यात सहभागी होऊन मिळते. आध्यात्माची जोड समाजाच्या उन्नतीसाठी घालण्याचा आदर्श प्रस्तूत करणारे हे कार्य असेच सुरू रहावे, अशा शब्दात त्यांनी सोहळ्याला शुभेच्छा दिल्या.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, आध्यत्मिकतेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून माऊलींकडे बघितले जाते. माणसाची सेवा हाच परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग असल्याची शिकवण ते देत आहेत. कोरोना काळात त्यांनी केलेल्या सेवाकार्याने याची प्रचिती आली आहे. सत्संगाच्या माध्यमातून युवकांना रोजगार देण्याचे कार्य करण्यात येत आहे.

माऊली अण्णा साहेब मोरे म्हणाले, संतांनी, महापुरुषांनी दुसऱ्यासाठी जगण्याची शिकवण आपल्याला दिली असून ही शिकवण नवीन पिढीपर्यंत पोहचविण्याचे काम करावे. घरातघरात आदर्श नागरिक तयार झाले पाहिजे, निर्व्यसनी पिढी तयार झाली पाहिजे. निसर्गाचे संरक्षण करुन त्यांचे संवर्धन करावे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत प्राप्त पात्र कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करावीत- उद्योगमंत्री उदय सामंत

सोलापूरदि. 11 (जि. मा. का.) : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ही गरीबांच्या हाताला काम देणारी योजना आहे. या योजनेत इतर मागास वर्गअल्पसंख्याक अशा घटकांना नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. या योजनेमधून रोजगार निर्मितीसाठी बेरोजगार तरुणांनी जी प्रकरणे बँकांकडे दाखल केलेली आहेतत्यातील पात्र प्रकरणांना संबंधित बँकांनी तात्काळ मंजुरी द्यावीअशा सूचना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

जिल्ह्याच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) व उद्योग विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. नियोजन भवन येथे आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरएमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा जाधवजिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलतेमहानगरपालिकेचे अतिरीक्त आयुक्त संदीप कारंजेमहावितरणचे अधीक्षक अभियंता एस. के. सांगळेएमआयडीसीचे अधीक्षक अभियंतास आर गावडेकार्यकारी अभियंता एस एस गांधीले, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे  विभागीय व्यवस्थापक आर आर खाडे,  यांच्यासह बँकांचे प्रतिनिधी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनांसाठीच्या अर्जदारांना लाभ मिळवून द्यावाअशा सूचना करून उद्योगमंत्री उदय सामंत म्हणालेमुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे उद्दिष्ट व मंजूर प्रकरणे यातील तफावत दूर करण्यासाठी प्राप्त पात्र कर्ज प्रकरणे बँकांनी तात्काळ मंजूर करावीत. शासनाने कर्जाची हमी घेतल्यानंतरही झिरो रिजेक्शनवर सर्व कर्जप्रकरणे मंजूर झाली पाहिजेत. जिल्ह्यात जवळपास एक हजारहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. ती प्रकरणे मार्गी लावाव्यात. यासाठी नोडल अधिकारी नेमावाअशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

सोलापूर जिल्ह्यातील प्रस्तावित पाच एमआयडीसीचा आढावाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतला. कुंभारी अक्कलकोट पंढरपूर या प्रस्तावित औद्योगिक तसेच चिंचोली अतिरीक्त औद्योगिक क्षेत्रासाठी भू निवड समितीकडून पुढील 15 दिवसांत पाहणी करण्यात येणार आहेअशी माहिती प्रादेशिक अधिकारी वसुंधरा जाधव यांनी दिली.

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणालेकरमाळा एमआयडीसीला पाणीपुरवठ्याची योजना राबविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही जलसंपदा विभागाने करावी. तसेच कुंभारी औद्योगिक क्षेत्रासाठी जलसंपदा विभागाचे आरक्षण असलेल्या जमिनीचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असून त्याबाबतही तात्काळ कार्यवाही करावी. चिंचोली औद्योगिक क्षेत्रात उद्योग सुरू करण्यासाठी उद्योजकांची मोठ्या प्रमाणात मागणी असून सदर ठिकाणी जागा कमी असल्याने खाजगी जागेची उपलब्धता करावीअशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

वकील आणि भविष्यातील न्यायाधीशांनी आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये संविधानात्मक मूल्यांचा अंगीकार करावा- सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांचे आवाहन

        नागपूर, दि. 11 :  विधि शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या वकील आणि भविष्यातील न्यायाधीशांनी आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये संविधानात्मक मूल्यांचा अंगीकार करावा, त्यामुळे त्यांना कधीच अपयश येणार नाही. कायदा आणि समाजाला, न्यायाच्या समांतर आणण्यासाठी वकील आणि न्यायाधीशांनी संविधानात्मक मुल्यासह पुढाकार घेणे आवश्यक आहे. समाजातील विषमता आणि जातीभेद यांच्यावर मात करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण विश्वात एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून ख्याती प्राप्त केली. त्यांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या दस्ताऐवजात परिवर्तनात्मक क्षमता असून प्रास्ताविकेत संविधानाचे तत्त्व अंगीकृत केलेले आहेत. त्यामुळे आपण विधिज्ञ म्हणून आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय सर्वांना देण्याचे वचन घेतले पाहिजे, असे आवाहन भारताचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत सोहळ्याला संबोधित करताना केले.

            याप्रसंगी त्यांनी ‘दया आणि न्याय’ यांच्यातील फरक सुद्धा अधोरेखित केला. न्यायामुळे समाज हा सक्षम आणि स्वयंपुर्ण होतो तर दयेमुळे केवळ काही क्षणासाठी अन्यायाचे दुःख दुर होते . केवळ दयादानाचे काम न करता न्यायादानाला अनुकूल असे वातावरण आपण निर्माण केले पाहिजे.  न्यायदानाचे लक्ष्य प्राप्त करतांना न्यायाची दये सोबत गफलत करू नये असेही त्यांनी स्पष्ट केले.

            नागपूरच्या वर्धा रोड स्थित वारंगा येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत सोहळ्याला माजी सरन्यायाधीश शरद बोबडे, सर्वोच न्यायालयाचे न्यायाधीश आणि वीधी विद्यापीठाचे कुलपती न्यायमूर्ती भूषण गवई आणि कार्यवाहक मुख्य न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय आणि प्र- कुलगुरू संजय गंगापूरवाला, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ . विजेंदर कुमार याप्रसंगी उपस्थित होते.

            दीक्षांत सोहळ्यात 2016 आणि 2017 च्या तुकडीच्या 220 विद्यार्थांना पदवी प्रदान करण्यात आल्या. त्यामध्ये 158 पदवीपूर्व पदवी बीए एलएलबी (ऑनर्स) आणि 2016 ते 2020 पर्यंच्या पाच तुकडीमधील 56 एलएलएम पदव्युत्तर पदवींचा समावेश होता. या दीक्षांत सोहळ्यात संवैधानिक कायदा, व्यावसायिक कायदा, यासारख्या विविध विषयात विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या 26 विद्यार्थ्यांना यावेळी सुवर्ण पदकही प्रदान करण्यात आले तसेच 6 विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी देण्यात आली.

            महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूरची स्थापना महाराष्ट्र सरकारने 2016 मध्ये उत्कृष्ट आणि सर्वांगीण कायदेशीर शिक्षण देण्याच्या दृष्टीकोनातून केली असून हेहे विद्यापीठ B.A.LL.B (ऑनर्स), B.A.LL.B (ऑनर्स इन ज्युडिकेशन अँड जस्टिसिंग), BBA.LL.B (ऑनर्स), LL.M आणि PhD हे अभ्यासक्रम राबवित आहे. ज्यात B.A.LLB (ऑनर्स इन अॅडज्युडिकेशन अँड जस्टिसिंग) हा अभ्यासक्रम राबविणारे हे देशातील पहिले आणि एकमेव विद्यापीठ आहे.

            दीक्षांत सोहळ्याच्या सुरुवातीला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजेंदर कुमार यांनी स्वागत भाषणात राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या गेल्या सहा वर्षातील कामगिरीचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. विद्यापीठाचे कुलपती न्यायमूर्ती भूषण गवई यांनी कोविड काळातही विद्यापीठाच्या वारंगा येथील इमारतीचे बांधकाम पूर्ण केल्याबद्दल राज्य शासनाचे तसेच उच्च शिक्षण तंत्रज्ञान विभागाचे आभार मानले.

            या कार्यक्रमात विद्यापीठाचे विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

जनसंवादद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या

0
नागपूर दि. १७: महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जनसंवाद कार्यक्रमात वृद्ध, महिला, विद्यार्थी, दिव्यांग, तृतीय पंथी अशा समाजाच्या सर्व थरातील जनतेच्या...

प्रस्ताव सादर करा, खंडपीठही लवकरच करू – सरन्यायाधीश भूषण गवई

0
शाहू महाराजांप्रमाणे समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन सर्किट बेंचच्या शुभारंभाला कोल्हापूरने अनुभवला सरन्यायाधीशांचा कृतज्ञता सोहळा कोल्हापूर, दि. १७: राज्याच्या सीमेवरील दुर्गम भागातील सर्वसामान्य...

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

0
जळगाव दि. १७ (जिमाका):  जळगाव- छत्रपती संभाजीनगर रोडवरील चिंचोली शिवारात 66.27 एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेल्या भव्य मेडिकल हबची पाहणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार...

येत्या बजेटमध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
जळगाव जिल्ह्यातील उद्योगांनाही मराठवाडा, विदर्भासारख्या सवलती देणार तीन दिवसातील अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे आदेश जळगाव दि. १७ (जिमाका वृत्तसेवा): आपण प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर त्या जिल्ह्यात जिल्हा...

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन

0
कोल्हापूर, दि. १७ (जिमाका): सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले. या ऐतिहासिक...