बुधवार, जुलै 2, 2025
Home Blog Page 1590

महाराष्ट्र डिजिटल विद्यापीठाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई दि. 12 : ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणारे महाराष्ट्र डिजिटल विद्यापीठ राज्यात सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, यामुळे ग्रामीण भागातील आणि व्यवसाय करत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या विद्यापीठाच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षणाचा लाभ होईल. तसेच रोजगारासाठी लागणारे कला व कौशल्याचे ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी ग्रामीण व शहरी भागात शैक्षणिक केंद्र सुरु करण्यात येईल. लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम (LMS) व  कॉम्पिटन्सी मॅनेजमेंट सिस्टिम (CMS) चा उपयोग करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यात येईल. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक प्रशिक्षण देण्यात येईल. यामुळे  राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

आज मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठात ऑनलाईन विद्यापीठ समिती (युनिव्हर्सिटी कमिटी) ने अहवाल सादर केला, यावेळी मंत्री श्री.पाटील बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, कोविड कालावधीत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेतले यामुळे त्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडला नाही. माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र डिजिटल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होईल. हे जगातील दुसरे ऑनलाईन विद्यापीठ असेल. प्रवेश प्रक्रिया, शिक्षणक्रम, परीक्षा, निकाल या सर्वबाबी ऑनलाईन पद्धतीने पूर्ण होतील. जगातील कोणताही विद्यार्थी या विद्यापीठात प्रवेश घेऊ शकेल. विद्यापीठ स्थापनेच्या कायद्याप्रमाणेच या विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी गठित समितीने अहवाल सादर करावा, असे निर्देशही मंत्री श्री. पाटील यांनी दिले.

दरम्यान, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील ऐतिहासिक दोलामुद्रिते, दुर्मिळ ग्रंथ, नियतकालिकांचे संच, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, हस्तलिखिते यांच्या डिजिटायझेशन, जतन, संरक्षण, संवर्धनासंदर्भात आढावा यावेळी घेण्यात आला.

तसेच, सहकारी सुतगिरण्यांच्या व यंत्रमाग संस्थांच्या अडचणीबाबतही मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी आमदार अमरिश पटेल, प्रकाश आवाडे, कुणाल पाटील, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव विरेंद्र सिंग, वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे आयुक्त पी. शिव शंकर आदी उपस्थित होते.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/

पैनगंगा नदीवरील बंधाऱ्यासह विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या १६ पुलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

मुंबई, दि. १२ : पैनगंगा, पूर्णा व कयाधू नद्यांवरील उच्च पातळीचे बंधारे आणि विदर्भ, मराठवाडा जोडणाऱ्या पुलांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. नांदेडसह यवतमाळ जिल्ह्यातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनासाठी लाभदायक ठरणाऱ्या या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने ही बैठक घेण्यात आली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव सोळंके, कार्यकारी संचालक गोदावरी खोरे विकास महामंडळ संतोष तिरमनवार आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

उर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर धरण ते निम्म पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रापर्यंत एकूण ०७ बंधारे प्रस्तावित असून हे ७ बंधारे पूर्ण झाल्यास १० हजार ६१० हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांचा सिंचनाचा व दोन्ही जिल्ह्यातील सुमारे १०० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाला एक महिन्यात राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडून मान्यता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संबंधित विभागाला दिले. या प्रकल्पाचा फायदा विदर्भातील पुसद, उमरखेड, महागाव या तालुक्यांना होणार असून मराठवाड्यातील कळमनुरी, हदगाव, हिमायतनगर, माहूर, किनवट या भागाला होणार आहे.

पूर्णा नदीवर पोटा, जोडपरळी, पिंपळगाव कुटे, ममदापूर याठिकाणी चार बंधारे बांधण्यास तांत्रिक मान्यता मिळाली आहे. त्याचा हिंगोली व परभणी जिल्ह्यातील अनेक गावांना फायदा होणार आहे. त्यामुळे ५६०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कयाधू नदीवर १२ बंधारे प्रस्तावित असून त्यापैकी सुमारे नऊ बंधाऱ्यांचे जलसंधारण विभागामार्फत काम करण्यात आले आहे. आज झालेल्या या बैठकीत या प्रकल्पांच्या कामांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

विदर्भ – मराठवाडा जोडणाऱ्या १६ पुलांच्या कामांना यावेळी मान्यता देण्यात आली. यामुळे यवतमाळ, नांदेड व हिंगोली हे जिल्ह्यांमधील गावे या पुलांमुळे जोडली जाणार आहेत. या भागातील ऊस, हळद उत्पादक शेतकऱ्यांचा या पुलांमुळे किमान ४० किलोमीटर फेरा वाचणार असून कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहण्यास मदत होणार आहे.

०००००

डाव्होसमधील जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री सहभागी होणार; महाराष्ट्राचे व्हिजन मांडणार

मुंबई, दि. 12 : स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिष्टमंडळासमवेत सहभागी होणार आहेत. जवळपास 20 उद्योगांसमवेत सुमारे 1 लाख 40 हजार कोटींचे करार होणार असून आजपर्यंत डाव्होस येथे इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच महाराष्ट्राचे  सामंजस्य करार होत आहेत. याशिवाय पायाभूत सुविधा व इतर महत्त्वाच्या क्षेत्रात महाराष्ट्राच्या प्रगतीविषयी जगभरातील मान्यवर, गुंतवणूकदार, तसेच उद्योगांच्या प्रमुखांशीही मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत. 16  आणि 17 जानेवारी असे दोन दिवस मुख्यमंत्री या परिषदेत उपस्थित राहतील. मुख्यमंत्र्यांसमवेत शिष्टमंडळात उद्योग मंत्री उदय सामंत तसेच वरिष्ठ अधिकारी असतील. ही परिषद 20 जानेवारीपर्यंत चालणार आहे.

महाराष्ट्रात नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर पायाभूत सुविधासह विविध क्षेत्रात झपाट्याने घोडदौड सुरू आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्राची नवी बलस्थाने संपूर्ण जगाला कळून राज्याकडे जगाचा ओढा कसा वाढेल यावर या जागतिक महत्त्वाच्या परिषदेत लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.

अशी आहे डाव्होसमधील रूपरेषा

मुख्यमंत्री रविवारी 15 तारखेस मुंबईहून झुरिचसाठी रवाना होतील. सोमवारी 16 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. हे सुसज्ज आणि आकर्षक पॅव्हेलियन डाव्होस येथे प्रमुख ठिकाणी आणि भारताच्या पॅव्हेलियनसमोरच असणार आहे. त्यानंतर काही महत्त्वाच्या उद्योगांसमवेत सामंजस्य करार केले जातील. जागतिक आर्थिक परिषदेच्या न्यू इकॉनॉमी एंड सोसायटी या केंद्राचे तसेच अर्बन ट्रान्स्फॉरमेशनचे प्रमुख देखील मुख्यमंत्र्यांना भेटतील.

सायंकाळी 7.15 वाजता मुख्यमंत्री हे मुख्य स्वागत समारंभासाठी काँग्रेस सेंटर येथे दाखल होतील.

मंगळवार 17 जानेवारी रोजी लक्झमबर्गचे पंतप्रधान, जॉर्डनचे पंतप्रधान, सिंगापूरचे माहिती व दूरसंचार मंत्री, जपान बँक, सौदी अरबचे उद्योग व खनिकर्म मंत्री, स्विस इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी आहेत. विविध क्षेत्रातील नामवंत उद्योगांसमवेत सामंजस्य करारही महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये  करण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचे संबोधन

मंगळवारी 3.45 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काँग्रेस सेंटर येथे संबोधन होणार आहे. यावेळी ते बदलत्या पर्यावरणाचे शहरांच्या विकासापुढील आव्हान आणि पर्यावरणपूरक शाश्वत विकास यावर बोलतील.

स्नेहभोजनासाठी मान्यवर आमंत्रित

मंगळवारीच रात्री 8 वाजता महाराष्ट्राच्या वतीने स्नेहभोजन आयोजित करण्यात आले असून यासाठी उद्योग, राजकीय, तसेच इतर क्षेत्रातील 100 ते 150 मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री देखील यात सहभागी असतील. यावेळी खास महाराष्ट्रीयन भोजनाचा बेत असेल.

कोरोनामुळे  वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मागील दोन बैठक ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. तर 2022 या वर्षातली बैठक जानेवारी ऐवजी मे मध्ये घेण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर आता होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्राची चांगली छाप पडावी म्हणून उद्योग विभागाने जय्यत तयारी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तयारीचा वेळोवेळी आढावा घेऊन महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या आहेत.

असे असेल पॅव्हेलियन

संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या या डाव्होस बैठकीसाठी येणारे जगभरातील अनेक प्रतिनिधी या पॅव्हेलियनला भेट देतील अशी अपेक्षा आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या प्रगतीचे अत्याधुनिक पद्धतीने आणि प्रभावी असे प्रदर्शन केले जाणार आहे. त्यात विशेषत: गेल्या तीन ते चार महिन्यात मेट्रो, कोस्टल रोड, एमटीएचएल, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे मिसिंग लिंकसाठी  सर्वात मोठा बोगदा तसेच ईलेक्ट्रिक वाहनांचा सार्वजनिक वाहतुकीत करण्यात येत असलेला उपयोग, पर्यावरण संरक्षणासाठी उचलण्यात आलेली पाऊले अशा अनेक बाबी दाखविण्यात येतील.

डाव्होस परिषद नेमकी काय आहे ?

जागतिक आर्थिक परिषद (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) ही एक खाजगी संस्था आहे. तिची  स्थापना 1971 साली करण्यात आली होती. या संस्थेचे मुख्यालय स्वित्झर्लंडची राजधानी जिनेव्हामध्ये आहे. या संस्थेला आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून मान्यता मिळालेली आहे. या संस्थेचे ध्येय जागतिक व्यवसाय, राजकारण, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणून जागतिक क्षेत्रिय आणि औद्योगिक विकासाला चालना देणे आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने निमंत्रण दिलेल्यांना यामध्ये सहभागी होता येते. या परिषदेत जवळपास 2500 व्यक्ती सहभाग घेतात. त्यात जगभरातील मोठे उद्योगपती, व्यावसायिक आणि अर्थशास्त्रज्ञ यांचा समावेश असतो.

००००

एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य

भारतात येत्या सप्टेंबर महिन्यात ‘जी-20’ देशांच्या राष्ट्रप्रमुखांची परिषद होणार आहे. त्यानिमित्ताने देशभरात विविध 200 बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी चार बैठका पुण्यात होणार आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारताकडे जी-20 चे अध्यक्षपद येणे विशेष गौरवाची बाब आहे. विकासाच्या विविध क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळविण्याच्या दृष्टीने देखील परिषदेला महत्त्व आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर विकासाच्यादृष्टीने जे करार होतात त्यासाठी पोषक वातावरण अशा बैठकांमधून तयार होत असते. त्यादृष्टीने पुण्यात होणाऱ्या बैठकांकडे पहायला हवे. पुणे शहर आणि जिल्हा अनेक क्षेत्रांमध्ये टेकऑफ घ्यायच्या तयारीत असताना, असे आयोजन आणखी महत्त्वाचे ठरते. इथली संस्कृती, विकासाला पूरक वातावरण, शैक्षणिक विकास, पायाभूत सुविधांचा विकास लक्षात घेता आपल्या प्रगतीला आणखी गती देण्याचे कार्य या परिषदेच्या माध्यमातून होणार आहे.

अत्याधुनिक उच्च शिक्षणाच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत असल्याने पुण्यातील औद्योगिक विकासही वेगाने होत आहे. जिल्ह्यात अनेक नामांकित उद्योग आहेत. इथले माहिती तंत्रज्ञान क्षेत्रही वेगाने प्रगती करते आहे.  रेल्वे, महामार्ग, हवाई वाहतूक आणि जवळच असलेले मुंबई बंदर ही पुण्याची जमेची बाजू आहे. इथला इतिहास, संस्कृतीदेखील परदेशातील प्रतिनिधींना आकर्षित करते. एका बाजूला उद्योग-व्यवसाय आणि दुसऱ्या बाजूला त्यासाठी  लागणारे मनुष्यबळ आणि अनुकूल वातावरण पुण्यात असल्याने अनेक देशांचे लक्ष पुण्याकडे आहे. त्यामुळे पुण्यामध्ये ही महत्त्वाची आंतरराष्ट्रीय परिषद होणे ही आपल्यासाठी मोठी संधी आहे.

भारताच्या जी-20 अध्यक्षकाळाची संकल्पना  ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजेच ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही संकल्पना स्वीकारण्यात आली आहे. ही संकल्पना जीवसृष्टीतील परस्पर संबंध आणि त्यांच्याशी संबंधीत  पर्यावरणदृष्ट्या शाश्वत विकासावर भर देणारी आहे.  पुणे ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वरांनी ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ म्हणत विश्वकल्याणाचा संदेश दिला, संत तुकाराम महाराजांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे…’ म्हणताना पर्यावरणाचे महत्त्व मांडले आहे. संतांचा हा वैश्विक विचार जी-20 बैठकांमध्ये चर्चिला जाणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.

पुण्यातील पहिली बैठक ‘इन्फ्रास्ट्रक्चर वर्कींग ग्रुप’ची असणार आहे. या बैठकांच्या ठिकाणी विविध दालनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रमुख उत्पादन, इथल्या पायाभूत सुविधा, वेगाने होणारा शहराचा आणि शहरातील सुविधांचा विस्तार, औद्योगिक विकास, पर्यटन, आदिवासी संशोधन व विकास संस्था, सामाजिक वनीकरण आदींची दालने ठेवण्यात येणार आहेत. त्याविषयीची माहिती आलेल्या प्रतिनिधींना देण्यात येईल. उदाहरणार्थ एखादा बचत गट जर उत्तम उत्पादन करत असेल किंवा स्टार्टअपचा नाविन्यपूर्ण प्रकल्प असेल तर तेदेखील प्रदर्शित केले जाईल.

एकदा शहरात आपल्यासाठी काय उपयुक्त आहे हे प्रतिनिधींच्या लक्षात आले की पुढील चर्चेचा मार्ग त्यातून निघत असतो. विकासाची प्रक्रिया यातून गती घेते.  त्यामुळे या दोन दिवसांचा पुरेपूर उपयोग करीत आपल्या चांगल्या बाबी जगातील प्रमुख राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमोर मांडण्याचा प्रयत्न आहे. पुणे शहर एक एज्युकेशन हब, कल्चरल सिटी, स्टार्टअपचे केंद्र, औद्योगिक नगरी, आयटी सेंटर अशी बहुआयामी ओळख प्रस्थापित व्हावी यादृष्टीने आवश्यक बाबींवर लक्ष देण्यात येत आहे. त्यासोबत जी-20 परिषदेविषयी विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना माहिती देण्यात येत आहे.

जी-20 अध्यक्षपदाच्या कालावधीत प्रथमच स्टार्टअप जी-20 गटाची स्थापना करण्यात आली आहे. नवोन्मेषाला चालना देण्यासाठी या गटाची चर्चा महत्त्वाची ठरणार आहे. पुणे हे स्टार्टअप्सचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे भारतात होणारी ही परिषद पुण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण आणि तितकीच महत्त्वाची ठरेल यात शंका नाही. पृथ्वीच्या उज्ज्वल भविष्याच्यादृष्टीने एक सकारात्मक संदेश पुण्यातून जावा आणि यानिमित्ताने आपल्या क्षमता जगातील प्रमुख राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमोर प्रदर्शित व्हाव्यात, यापेक्षा अभिमानास्पद आणि समाधानाची बाब ती कोणती?

-जिल्हा माहिती कार्यालय पुणे

युवकांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करावे – राज्यपाल भगत सिंग कोश्यारी

मुंबई, दि. १२ : युवाशक्तीसाठी स्वामी विवेकानंदांचे जीवन आणि विचार मार्गदर्शक ठरणारे आहेत. विवेकानंद जीवनचरित्र मराठी, हिंदी, बंगाली अशा विविध भाषेत उपलब्ध आहे, युवकांनी हे चरित्र आत्मसात करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी केले.

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विवेकानंद युथ कनेक्ट संस्थेच्यावतीने मुंबई शाश्वत शिखर परिषदेचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते.

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार ॲड. आशीष शेलार, विवेकानंद युथ कनेक्ट संस्थेचे डॉ. राजेश सर्वज्ञ, गोपाल आचार्य, नानक रूपानी आदी उपस्थित होते. विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना यावेळी स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशात सर्वत्र युवा दिन साजरा होत आहे. तर, मॉ जिजाऊ यांची जयंती साजरी होत आहे. स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमध्ये पहिल्या भाषणात ‘मेरे भाई और बहिनो’ या वाक्यांनी सुरुवात करून विश्वबंधुत्वाची भावना जगाला दाखवून दिली. आपल्या विद्वत्तेतून जगाला भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले. विश्वकल्याण आणि प्रखर राष्ट्रभक्ती यांबाबत त्यांनी परखडपणे मांडणी केली. युवकांना जागृत करण्याचे काम त्यांनी केले.

बदलत्या वातावरणामुळे वातावरणीय बदल, पर्यावरण, विकास याबाबत देशात सर्वांगीण विचार होत आहे. प्रगती, विकास आणि पर्यावरण यांच्यात संतुलन राहावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विवेकानंद युथ कनेक्ट संस्थेचे कार्य युवकांना एकत्र करून त्यांना वर्तमान आणि भविष्यात एकत्र ठेवणे अशा प्रकारचे आहे.

शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, जगाला विश्वबंधुत्वाचा मार्ग दाखवण्याचे कार्य स्वामी विवेकानंद यांनी केले. त्यांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न आम्ही करू असे सांगून ते पुढे म्हणाले की, मुंबईत आज बऱ्याच पायाभूत सुविधा होत आहेत मेट्रो, कोस्टल रोड व पर्यावरणाच्या दृष्टीने अनेक कामे चालू आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सौर उर्जेचे विविध स्रोत तयार करणे, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे, वाहतूक सिग्नलमध्ये सुसुत्रता आणणे, असे काम चालू आहे. देशाच्या जीडीपीमध्ये मुंबईचा ३० टक्के वाटा आहे. मुंबईच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहन मंत्री श्री. केसरकर यांनी केले.

000000

प्रवीण भुरके/ससं

मुंबईसाठी डबलडेकर टनेलचा पर्याय काळाची गरज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १२ : वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका व्हावी यासाठी मुंबई एकात्मिक वाहतूक व्यवस्थापनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. मुंबईसाठी डबलडेकर टनेलचा पर्याय अवलंबण्यासाठी वरिष्ठ सनदी अधिकारी आणि एकात्मिक वाहतूक प्रणाली यंत्रणा तयार करणाऱ्या तंत्रज्ञांनी बैठक घ्यावी, त्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

वर्षा निवासस्थानी यासंदर्भात आज झालेल्या बैठकीत मुंबईतील वाढती वाहतूक आणि त्यावरील उपाय, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. मल्टी मॉडेल इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क टनेलच्या माध्यमातून साकारण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच सादरीकरण करण्यात आले.

एमएमआरडीए क्षेत्र एकात्मिक वाहतूक प्रणालीद्वारे जोडून वाहतूक कोंडी कमी करण्याबाबतच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. मुंबईसाठी मल्टीडेक टनेल काळाची गरज असून, त्याचा अभ्यास करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन, मुंबई महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी तांत्रिक टीम सोबत बैठक घेऊन या एकात्मिक वाहतूक प्रणालीबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी आमदार राजेंद्र पटणी, महापालिका आयुक्त आय. एस. चहल, एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन, मुंबई महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलारासू आदी उपस्थित होते.

००००

राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. १२ :- राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मंत्रालयातील प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला उपस्थित सामान्य प्रशासन विभाग (प्रशासकीय सुधारणा) च्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, उपसचिव ज.जी.वळवी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यांनीही राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

००००

धोंडिराम अर्जुन/ससं.

राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन

मुंबई, दि. १२ :- राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

मंत्रालयात तसेच ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी हे अभिवादन करण्यात आले. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. अभिवादन कार्यक्रमास आमदार राजेंद्र पटणी आदी मान्यवर उपस्थित होते.

0000

नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी घेतला चित्रीकरणाचा आनंद

व्यवस्थाकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे यांच्याकडून विद्यार्थ्यांचे स्वागत; पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

मुबई दि.11: नक्षल प्रभाव असलेल्या गोंदिया जिल्ह्यातल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या समूहाने बुधवारी गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रगरीत सुरु असलेल्या चित्रीकरणाचा प्रत्यक्ष आनंद घेतला. प्रत्यक्ष चित्रीकरणासह, मालिकांचे सेट,आणि कलाकारांना भेटून हे सर्व विद्यार्थी भारावून गेले. दरम्यान महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांनी या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

राज्य शासनामार्फत नक्षल प्रभावित जिल्ह्यामधील किशोरवयीन मुला-मुलींच्या उन्नतीसाठी “आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती योजना” राबवली जाते. या योजनेतर्गत गोंदिया जिल्ह्यातील १४ ते १८ वयोगटातील मुला-मुलीच्या उज्वल भविष्यासाठी व त्यांच्या मनातील नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी होण्यासाठी, त्यांना महाराष्ट्र राज्याची औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, व शैक्षणिक प्रगतीची माहिती व्हावी, या दृष्टीने गोंदिया पोलीस विभागामार्फत मुंबई दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.

या सहलीनिमित्ताने आलेल्या विद्यार्थ्यांना चित्रनगरीतील तारक मेहता का उलटा चष्मा आणि द कपिल शर्मा शो चा सेट दाखविण्यात आला.   त्याचबरोबर सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेचे प्रत्यक्ष चित्रीकरण आणि मालिकेतील कलाकारांना भेटण्याची, त्यांच्यासोबत फोटो काढण्याची संधी मिळाली. त्यामुळे सर्वच विद्यार्थी भारावून गेले होते.

कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

निधी समिती मदत व पुनर्वसन विभागास हस्तांतरीत करणार

मुंबई,दि. ११ : कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी निधी समितीच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. ही समिती मदत व पुनर्वसन विभागाकडे हस्तांतरीत करण्याबाबत निर्देश देतानाच समितीसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार मकरंद पाटील, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते तर आमदार पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील हे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

या समितीच्या मार्फत कोयना भूकंपप्रवण क्षेत्रामध्ये येणाऱ्या आठ तालुक्यांच्या दुर्गम भागात वसलेल्या गावांच्या विकासासाठी भूकंप पिडितांना अर्थसहाय्य देण्यात येते. समितीमार्फत सन २०२२-२३ मध्ये विकासकामांसाठी प्रस्तावित ३० कोटी रुपये यावेळी मंजूर करण्यात आले. त्याचबरोबर महाजेनकोने मार्च पर्यंत ३५ कोटी रुपये देण्याचा निर्णय यावेळी झाला.

ही समिती सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारीत येत असून ती मदत व पुनर्वसन विभागास हस्तांतरीत करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. त्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता देतानाच समितीसाठी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देश दिले.

०००

ताज्या बातम्या

विधानपरिषद इतर कामकाज

0
अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारी दाखल करण्यासाठी लवकरच टोल फ्री क्रमांक - मंत्री नरहरी झिरवाळ मुंबई, दि. १ : राज्यात अन्नपदार्थांची घरपोच सेवा...

शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरतील – कृषी आयुक्त सूरज मांढरे

0
मुंबई दि. १: शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी हातभार लावणाऱ्या आहेत. 'महाकृषी एआय धोरण शेतीमध्ये अचूकता आणून शेतीची उत्पादकता ते विक्रीमध्ये आमूलाग्र बदल घडवेल,...

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

0
एनडीआरएफच्या पथकांनी पर्यटकांना तत्काळ मदत करत सुरक्षित ठिकाणी हलवले मुंबई, दि. १: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मदतीचा हात...

महाराष्ट्र सदन येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन

0
नवी दिल्ली, दि. १ : महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी त्यांना विन्रम अभिवादन...

‘विकसित भारत युवा कनेक्ट’ कार्यक्रम १२ ऑगस्टपासून

0
मुंबई, दि. १: विकसित भारत अभियानात युवकांना सक्रीय सहभागी करून घेण्यासाठी केंद्र सरकारने ‘विकसित भारत युवा कनेक्ट’ हा व्यापक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे....