गुरूवार, ऑगस्ट 14, 2025
Home Blog Page 1567

महाराष्ट्रातील ६ मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान

नवी दिल्ली, दि. २२ : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’चे वितरण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्रातील ६ मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.

राष्ट्रपती भवनातील एका शानदार समारंभात पद्म पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनकड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला तसेच अन्य केंद्रीय मंत्रीगण उपस्थित होते. आज प्रथम टप्प्यात पार पडलेल्या पद्म पुरस्कार समारंभात राज्यातील ६ मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रख्यात उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला आणि सुमन कल्याणपूर यांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ तर भिकू रामजी इदाते, राकेश राधेश्याम झुनझुनवाला (मरणोत्तर) व्यापार आणि उद्योग, डॉ. प्रभाकर भानुदास मांडे आणि रमेश पतंगे साहित्य व शिक्षण क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कुमार मंगलम बिर्ला यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल  पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. ते आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष आहेत. या समूहाला शंभर वर्षांहून अधिक जुना वारसा आहे.

प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायिका श्रीमती सुमन कल्याणपूर यांना कला क्षेत्रातील पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय संगीत उद्योगातील शीर्ष ३ महिला पार्श्वगायिकांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात, त्यांनी अनेक भाषांमध्ये असंख्य लोकप्रिय गाणी गायिली आहेत.

४ मान्यवरांना आज पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला

राकेश राधेश्याम झुनझुनवाला (मरणोत्तर) यांना व्यवसाय आणि उद्योग शेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार श्रीमती रेखा झुनझुनवाला यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला.

भिकू रामजी इदाते हे ‘दादा इदाते’ या नावाने प्रसिद्ध असलेले एक महान विचारवंत, वक्ते, लेखक, नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. जे डीएनटी समुदायांच्या उत्थानासाठी आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या शोषित लोकांच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदानासाठी ओळखले जातात.

डॉ. प्रभाकर भानुदास मांडे हे लोककथा, लोक संस्कृती आणि साहित्यातील आघाडीचे  विद्वान समजले जातात. डॉ मांडे यांना अनेक राज्य आणि राष्ट्रीय  चर्चासत्रांचे आयोजन केले आहे. त्यांच्या ‘गावगाड्या बाहेर’ आणि ‘सांकेतिक गुप्त भाषा: परमार आणि स्वरूप’ या पुस्तकांसाठी त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 1991 मध्ये डी. लिट. देऊन सन्मान केला आहे.

रमेश रघुनाथ पतंगे हे नामवंत लेखक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते मुंबईतील हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्याशिवाय, सामाजिक समरसता मंच, भटके विमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद आणि समरसता अध्ययन केंद्र आणि विवेक व्यासपीठ अशा संस्थांचेही ते सहसंस्थापक आहेत. त्यांनी सामाजिक समता आणि देशभक्तीचा प्रचार करणारी 52 पुस्तके लिहिली आणि प्रकाशित केली आहेत.

राष्ट्रपती यांनी राष्ट्रपती भवन येथे आयोजित नागरी पुरस्कार समारंभ-I मध्ये 2 पद्मविभूषण, 4 पद्मभूषण आणि 2023 साठी 47 पद्मश्री पुरस्कार प्रदान केले.

०००

 

 

 

पार्ले ही मुंबईची सांस्कृतिक राजधानी -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २२: लोकमान्य सेवा संघांने आपली मराठमोळी संस्कृती, संस्कार, धर्म यांची जपणूक केली आहे. संस्कृती, संस्कार विसरता कामा नयेत, याठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी होत असून त्यांची जपणूकही होत असल्याने पार्ले ही मुंबईची सांस्कृतिक राजधानी असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

लोकमान्य सेवा संघ, पार्ले शताब्दी सांगता व पार्ले येथील गुढीपाडव्याची हिंदू नववर्ष स्वागत स्फूर्तीयात्रा कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार पूनम महाजन, आमदार आशिष शेलार, आमदार पराग आळवणी, माजी मंत्री विनोद तावडे, डॉ. दीपक सावंत, लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळे, डॉ. रश्मी फडणवीस यांच्यासह पार्लेकर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नूतन मराठी वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देत म्हणाले की, लोकमान्य सेवा संघाने १०० वर्षे अविरतपणे शिक्षण, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य केले. लोकमान्यांच्या नावाने बाणेदारपणे संघ चालतोय हे कौतुकास्पद आहे. संघाने पुढच्या १०० वर्षांची तयारी करावी.

प्रत्येकांनी इतिहासाच्या संस्कृतीचा अभिमान बाळगून  वाईटाचा त्याग करायला हवा. स्फूर्तीयात्रा, शोभायात्रा यातून समाजाचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न होतो. आपण मराठी नववर्ष आनंदाने साजरे करतो, ३१ डिसेंबर पण साजरे करा, मात्र संस्कृती जपून करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पार्ले येथे अत्याधुनिक कलादालन

पार्ले येथे अत्याधुनिक कलादालन करण्याचा प्रयत्न करू. तसेच विविध संस्थांना धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या परवानग्या मिळण्यात अडचणी येत आहेत. यासाठी कायद्यात बदल करून सर्व परवानग्या ऑनलाईन करू, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी श्री. फडणवीस यांच्या हस्ते मल्लखांब, जिमनॅस्टिकमध्ये विजेत्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. शिवाय लोकसेवा सेवा संघाच्या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या  यांच्या हस्ते झाले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शोभायात्रा व  सहभागी कलाकार, ढोल-ताशांवर फुलांचा वर्षाव केला. अध्यक्ष मुकुंद चितळे यांनी प्रास्ताविक केले.

०००

वृत्त/अर्जून धोंडीराम, ससं

निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनासाठी ‘सीबा’ करार मैलाचा दगड ठरेल -मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि २२ : महाराष्ट्रामध्ये निमखाऱ्या पाण्यातील मत्स्य संवर्धनाच्या दृष्टीने तसेच  मत्स्यव्यवसाय क्षेत्रात रोजगार आणि उद्योग वाढीसाठी केलेला ‘सीबा’करार मैलाचा दगड ठरेल असा विश्वास वन, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

विधानभवन येथे मंगळवारी मत्स्य विभाग,महाराष्ट्र शासन आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिश वॉटर अँक्वाकल्चर (CIBA ) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव अतुल पाटणे आणि सीबा चेन्नई चे संचालक कुलदीप कुमार, वैज्ञानिक पंकज पाटील हे उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, देशाला फार मोठा सागरी किनारा लाभला असून मच्छीमार बांधवांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रात विशेष करुन मत्स्यव्यवसाय मंत्रालय स्थापन केले आहे. केंद्र सरकारच्या आय.सी.ए.आर या सर्वोच्च संस्थेअंतर्गत काम करणाऱ्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिश वॉटर अँक्वाकल्चर सोबत करार झाल्याचा विशेष आनंद होत आहे. राज्यातील सातारा, सांगली, अकोला आणि अमरावती या भागातील खारपान पट्ट्यातील मत्स्यसंवर्धनाचे प्रश्नदेखील यामुळे सोडविण्यास मदत होणार आहे.

नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करुन विविध प्रकारचे मत्स्यबीज निर्माण करणे, पालन, संसाधनांचा उपयोग करून घेणे यासाठी ही संस्था राज्याला मार्गदर्शन करणार आहे. मच्छीमार बांधवांच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध असून या सरकारने डिझेल परतावा, जाळीचे अनुदान, मच्छी मार्केट अश्या अनेक विषयांवर सकारात्मक तोडगा काढला असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

केंद्र सरकारच्या मत्स्यसंपदा योजनेत निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यपालन याकडे लक्ष वेधण्यात आले आहे असे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिश वॉटर अँक्वाकल्चरचे संचालक श्री. कुलदीप कुमार यांनी यावेळी सांगितले.

०००

दोन दिवसांत नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करा – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

जळगाव, दि. २२ (जिमाका): अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जळगांव जिल्ह्यासह राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे सादर करण्याचे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित यंत्रणांना दिले. शासनाच्या मदतीपासून नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, तसेच शेतकऱ्यांना पिकनिहाय योग्य भरपाईची घोषणा शासनातर्फे अधिवेशन काळातच केली जाईल, असा विश्वास देखील त्यांनी आज शेतकऱ्यांना दिला.

अमळनेर तालुक्यातील कुऱ्हे, टाकरखेडा, धरणगाव तालुक्यातील भोज व एरंडोल या गारपीटग्रस्त व अवकाळीग्रस्त भागातील नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देताना कृषी मंत्री श्री. सत्तार बोलत होते. यावेळी त्यांचेसमवेत विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, अमोल पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, उपविभागीय कृषी अधिकारी जाधवर,  यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

कृषी मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, अवकाळी व गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कुठल्याही परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे. त्यासाठी अधिवेशन काळातच नुकसानीचा आढावा घेवून पिकनिहाय समाधानकारक भरपाई देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

सहा महिन्यात १२ हजार कोटींची सर्वाधिक मदत

गेल्या सहा महिन्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुमारे १२ हजार कोटींची मदत शासनाने केली आहे. आतापर्यंतच्या कुठल्याही सरकारने एवढी मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केलेली नाही. यावेळीही शेतकऱ्यांना मदत करताना शासन एनडीआरएफ च्या निकषापेक्षा अधिक दराने मदत करू इच्छिते, असेही यावेळी कृषी मंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

अधिवेशनात भरपाईची घोषणा करणार

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महसूल व कृषी विभागामार्फत तात्काळ पंचनामे करण्याबाबत यापूर्वीच प्रशासनाला आदेश दिले असून पंचनामे झाल्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पिकनिहाय नुकसानीचा आढावा घेवून शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाईची घोषणा विधानसभ व विधानपरिषदेत करणार आहेत, असेही कृषी मंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

थेट बांधावर जाऊन पाहणी

कुऱ्हे, टाकरखेडा, भोज, एरंडोल आदि ठिकाणी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी मंत्री श्री. सत्तार यांनी आज पाहणी करुन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

०००

गरीब, कष्टकऱ्यांचा सणातील आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘आनंदाचा शिधा’ – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दि. २२ (जिमाका):  गरीब, कष्टकरी, शेतकऱ्यांचा सणांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी शासनामार्फत ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्यात येत असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

नंदुरबार व चौपाळे येथे गुढीपाडव्यानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरणावेळी पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषद कृषी सभापती हेमलता शितोळे, माजी. जि.प.सदस्य सागर तांबोळी, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, सरपंच नामदेव भिल (चौपाळे ) आदी उपस्थित होते.

मंत्री डॉ. गावित म्हणाले की, राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त “आनंदाचा शिधा” वितरीत करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. याचे वितरण गुढीपाडव्यापासून करण्यात येणार आहे. शासन वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून गोरगरीब, कष्टकरी व शेतकऱ्यांना मदत करत आहे. नुकतेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या रक्कमेत वाढ केली आहे. तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘महिला सन्मान योजना’ सुरु केली असून या योजनेतंर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवास भाड्यात महिलांना 50 टक्के सवलत देण्यात आली असून या योजनेला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महिलासाठी लवकर स्वतंत्र महिला धोरण राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पूर्वी खेड्यापाड्यात महिलांना दूरवर पाणी घेण्यासाठी जावे लागत होते. परंतु, जल जीवन मिशनच्या माध्यमातुन प्रत्येक घरात पाणी देण्यात येत आहे. शासन महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवित असून या योजनेचा लाभा घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

खासदार डॉ. हिना गावित म्हणाल्या की, गुढीपाढवा व आगामी येणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती हे सण गोरगरीबांना आनंदाने साजरे करता यावे या सण उत्सवांच्या काळात गोरगरिबांना गोड करता यावे यासाठी शासनाने आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारमार्फत गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून मोफत अन्न धान्य देण्यात येत असून  हे कोरोना काळापुरताच मर्यादित न ठेवता जोपर्यंत गोरगरिबांचे कोरोनाकाळातील संकट दूर होत नाही तोपर्यंत गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत रेशन धान्य देणार येणार आहे. केंद्र शासनाच्या विविध योजना प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी  सांगितले.

असा असेल “आनंदाचा शिधा”…

जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटूंब तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्रय रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व एक लिटर या परिमाणात पामतेल हा शिधा देण्यात येणार आहे. हा “आनंदाचा शिधा” गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी गुढीपाडवा या मराठी नवीन वर्षापासून ई-पॉस प्रणालीद्वारे 100 रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यात येणार आहे. सर्व अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांना जोडून दिलेल्या रास्तभाव दुकानात जावून ई-पास मशीनवर आपला अंगठा प्रमाणित करुन शिधा संच प्राप्त करावा.

०००

नागपुरातील आदरातिथ्याच्या आठवणी घेऊन जी -२० चे देश विदेशातील पाहुणे रवाना

नागपूर दि. २२ : जी -२० परिषदेअंतर्गत नागपुरात झालेल्या नागरी संस्थांच्या प्रारंभिक बैठकीत सहभागी झालेले देश विदेशातील बहुतेक पाहुणे आज मायदेशी रवाना झाले. दोन दिवसांच्या विचार मंथनानंतर आज पाहुण्यांनी पेंच प्रकल्पात व्याघ्र दर्शनाचा व देवलापार येथे संस्कृती दर्शनाचा लाभ घेतला.

जी -२० परिषद अंतर्गत झालेल्या सी -२० च्या प्रारंभिक बैठकीचा शानदार समारोप मंगळवारी झाला. त्यानंतर आज पहाटेच काही विदेशी पर्यटकांनी पेंच प्रकल्पात जाऊन व्याघ्रदर्शन घेतले तर अनेकांनी देवलापार येथील गौरक्षा केंद्रामध्ये विविध संस्कृती सोहळ्यात सहभाग घेतला.

विमानतळावर या बैठकीच्या अध्यक्ष माता अमृतानंदमयी यांना दुपारी तीन वाजताच्या सुमारास विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निरोप देण्यात आला. माता अमृतानंदमयी यांच्यासोबत देश विदेशातील अनेक मान्यवर यावेळी विमानतळावर उपस्थित होते. नागपूर शहराने केलेले आदरातिथ्य एक सुखद आठवण असल्याचे यावेळी पाहुण्यांनी सांगितले.

गेल्या अनेक दिवसापासून प्रशासनाने या बैठकीची तयारी केली होती. विविध सामाजिक संघटनामार्फत होत असलेल्या या आयोजनात कोणतीही कमी राहू नये यासाठी प्रशासन झटत होते. विमानतळावर विविध सामाजिक संघटनातील पदाधिकारी, आयोजन समितीतील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागपूरमध्ये 20 व 21 मार्च रोजी जी -20 अंतर्गत सी -20 च्या प्रारंभिक बैठकीचे स्थानिक रॅडिसन ब्लू हॅाटेल येथे आयोजन करण्यात आले होते. विदेश मंत्रालयाच्या अंतर्गत स्थानिक सामाजिक संस्थांनी आयोजित केलेल्या या जागतिक स्तरावरील बैठकीच्या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर समारोप सत्राला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. याशिवाय, सी -20 परिषदेच्या उदघाटक माता अमृतानंदमयी, नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी, जी-20 चे शेरपा तथा भारताचे माजी राजदूत विजय नांबियार, जी -20 चे शेरपा तसेच विदेश मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अभय ठाकूर, सी-20 सचिवालयाचे संरक्षक डॅा. विनय सहस्त्रबुद्धे, कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा निवेदिता भिडे, सुप्रसिद्ध व्यावसायिक तथा स्थानिक आयोजन समितीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांच्यासह नागरी संस्थांचे प्रतिनिधी दोन दिवसांमध्ये विविध कार्यक्रमात सहभागी झाले होते.

०००

युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून लवकरच भरपाईची घोषणा – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

धुळे, दि. २२ : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे धुळे जिल्ह्यासह राज्यातील काही जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, तसेच येत्या दोन दिवसात युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना पिकनिहाय योग्य भरपाईची घोषणा अधिवेशन काळातच दोन्ही सभागृहात केली जाईल, असा विश्वास राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे शेतकऱ्यांना दिला.

धुळे तालुक्यातील आनंदखेडे, साक्री तालुक्यातील काळटेक, सिरबेन,  शिंदखेडा तालुक्यातील बेटावर या गारपीटग्रस्त व अवकाळीग्रस्त भागातील नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देताना कृषी मंत्री श्री. सत्तार बोलत होते. यावेळी आमदार मंजुळा गावित, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एस. डी. मालपुरे, तहसिलदार गायत्री सैंदाणे, सतिश महाले यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

कृषी मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, कांदा, मका, गहू, बाजरी, पपई, कलिंगडासह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कुठल्याही परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे. त्यासाठी अधिवेशन काळातच नुकसानीचा आढावा घेवून पिकनिहाय समाधानकारक भरपाई देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

सहा महिन्यात १२ हजार कोटींची सर्वाधिक मदत

गेल्या सहा महिन्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुमारे १२ हजार कोटींची मदत शासनाने केली आहे. आत्तापर्यंतच्या कुठल्याही सरकारने एवढी मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केली नाही. यावेळीही शेतकऱ्यांना मदत करताना शासन एनडीआरएफ च्या निकषापेक्षा अधिक दराने मदत करू इच्छिते, असेही यावेळी कृषी मंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

एक लाख ३९ हजार हेक्टरवर नुकसानीचा अंदाज

यावेळीच्या गारपीट व अवकाळी पावसामुळे सुरूवातीला १३ हजार हेक्टर, नंतर ४० हजार हेक्टर व आताच्या क्षणाला सुमारे १ लाख ३९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज असल्याचेही यावेळी कृषिमंत्र्यांनी सांगितले.

आंदोलनात असूनही कर्मचाऱ्यांनी केले पंचनामे

धुळे, नंदुरबार जिल्ह्यात शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाच्या आंदोलन काळातही शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले असल्याची सकारात्मक बाब खुद्द शेतकऱ्यांनीच आपल्याला सांगितले असल्याचे सांगून शेतकऱ्यांप्रती सर्वांच्या भावना संवेदनशील असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांचे कौतुकही यावेळी कृषी मंत्र्यांनी केले.

अधिवेशनात भरपाईची घोषणा करणार

धुळ्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनीही यापूर्वीच नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन जिल्हा प्रशासनाशी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्याशी चर्चा करून महसूल व कृषी विभागामार्फत तात्काळ पंचनामे करण्याबाबत यापूर्वीच प्रशासनाला आदेश दिले असून पंचनामे झाल्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पिकनिहाय नुकसानीचा आढावा घेवून शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाईची घोषणा करणार आहेत, असेही कृषी मंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

थेट बांधावर जावून पाहणी

आनंदखेडे, काळटेक, सिरबेन, बेटावर आदि ठिकाणी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिवसभर कृषी मंत्री श्री. सत्तार यांनी पाहणी केली.

०००

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाविषयी सुरू असलेले आंदोलन मागे घेण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन

सातारा दि. २२:  कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाविषयी सुरू असलेले कोयना प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आंदोलनाचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर यांना आज दूरध्वनीद्वारे केले.

जिल्ह्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांचा अनेक वर्षांचा पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न   सोडविण्यासाठी अधिवेशन संपल्यानंतर तात्काळ उच्चस्तरीय समन्वय समितीची बैठक घेऊन योग्य तोडगा काढण्यात येईल, असेही पालकमंत्री तथा कोयना प्रकल्पग्रस्त संदर्भातील उच्चस्तरीय समन्वय समितीचे अध्यक्ष श्री. देसाई म्हणाले.

या पुनर्वसनाच्या कामी किती निधीची आवश्यकता आहे. तसेच या करिता काय करता येईल याची माहिती घेण्याचे आदेश समितीच्या सदस्यांना देण्यात आले आहेत. अधिवेशनानंतर तात्काळ बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात येईल असेही श्री. देसाई यांनी सांगितले.

०००

समाजाच्या उत्तम भविष्यासाठी नव्या पिढीला संस्कृतीची माहिती आवश्यक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. २२ : ज्या समाजाला स्वतःच्या देदीप्यमान इतिहासाचा विसर पडतो. त्याला उत्तम भविष्य नसते. आपली प्राचीन सभ्यता व संस्काराला न विसरता वाटचाल असली पाहिजे. नागपूरमध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सार्वजनिक स्वरूपात नववर्ष साजरे करण्याच्या सुंदर सोहळ्याचे समाधान असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

गुढीपाडव्यानिमित्त नागपूर येथे लक्ष्मीनगर परिसरातील तात्या टोपे गणेश मंदिर येथून निघालेल्या शोभायात्रेमध्ये श्री. फडणवीस सहभागी झाले. या उत्सवात सहभागी झालेल्या नागरिकांना ते संबोधित करत होते. शोभायात्रेत अभिनेत्री गिरिजा ओक, मृणाल देव,  माजी महापौर संदीप जोशी यांची उपस्थिती होती.

अभिनव पद्धतीने हिंदू नववर्षाचा महोत्सव नागपुरात होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. श्रीरामाच्या जयघोषात, मंगलमय वातावरणात नूतन वर्षाचा हा उपक्रम स्तुत्य असून उत्तरोत्तर यामध्ये भर पडत जावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. नववर्षाचा आनंद हा कसा मंगलमय वातावरणात साजरा करावा, याचा वस्तूपाठ आज या कार्यक्रमाने घालून दिला आहे, असे ते म्हणाले.

०००

मॅरेथॉनमुळे मुंबईची दातृत्व संस्कृती अधोरेखित – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. २२ : मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, तसेच दानशूर लोकांचे शहर देखील आहे.  मुंबई मॅरेथॉनच्या  माध्यमातून देशभरातील विविध सामाजिक उपक्रमांकरिता मोठ्या प्रमाणात निधी जमा झाल्यामुळे मुंबईची दातृत्व संस्कृती पुनश्च अधोरेखित झाली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले आहे.

जानेवारी महिन्यात झालेल्या टाटा मुंबई मॅरेथॉनच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यासाठी अधिकाधिक निधी संकलन करणाऱ्या अशासकीय व सेवाभावी संस्था तसेच वैयक्तिक निधी संकलकांचा ‘टाटा मुंबई मॅरेथॉन फिलांथ्रोपी नाईट अवॉर्ड्स २०२३’ या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

पुरस्कार सोहळ्याला विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार आशिष शेलार, अमृता फडणवीस, टाटा सन्सचे ब्रँड कस्टोडिअन हरीश भट्ट, प्रोकॅम इंटरनॅशनलचे अनिल सिंह आणि विवेक सिंह,  युनायटेड वे मुंबईचे मुख्याधिकारी जॉर्ज आईकरा व इतर निमंत्रित उपस्थित होते.

केवळ २० वर्षांमध्ये मुंबई मॅरेथॉन देशातली सर्वात लोकप्रिय मॅरेथॉन झाली असून यंदाच्या मॅरेथॉनमध्ये ५५ हजार स्पर्धकांनी भाग घेणे ही स्पर्धेच्या लोकप्रियतेची पावती आहे, असे सांगताना मुंबई मॅरेथॉनमुळे भारताचे नाव जगातील मॅरेथॉनच्या नकाशावर आले आहे, असे राज्यपाल श्री. बैस यांनी सांगितले. मॅरेथॉनच्या माध्यमातून देशाला उत्तम धावपटू, खेळाडू मिळतील आणि ते देशाचे नाव मोठे करतील, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

मॅरेथॉनच्या माध्यमातून यंदा आरोग्य, शिक्षण, प्राणी कल्याण, पर्यावरण, महिला सबलीकरण आदी क्षेत्रातील सामाजिक कार्यासाठी ४०.६८ कोटी रुपये जमा झाले. तसेच या मॅरेथॉनच्या पहिल्या आवृत्तीपासून आजवर ३५७ कोटी रुपये जमा झाले, याबद्दल आनंद व्यक्त करताना निधीच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातील अज्ञात दिव्यांग, अपंग, निराधार व इतर गरीब, गरजू लोकांच्या जीवनात प्रकाशाची ज्योत तेवेल असे राज्यपालांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते सेवाभावी संघटनेसाठी अधिकाधिक निधी संकलित केल्याबद्दल श्रीमद राजचंद्र लव्ह अँड केअर, ‘युनायटेड वे मुंबई’ व सेंट्रल चिन्मय मिशन ट्रस्ट या संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.  याशिवाय वैयक्तिक निधी संकलनाकरिता श्याम जसानी, मनीषा खेमलानी, सदाशिव राव व नव्या आणि गगन बंगा यांना ‘चेंज लेजंड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावर्षी २५२ सेवाभावी संस्था, १७७ कॉर्पोरेट्स, १००० वैयक्तिक निधी संकलक, १७ हजार दानशूर व्यक्ती यांसह १० हजार स्पर्धकांनी विविध समाजकार्यांकरिता निधी संकलित केला.

०००

ताज्या बातम्या

शासनाच्या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी – राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर

0
हिंगोली(जिमाका), दि. 13: शासन सर्वसामान्य जनतेसाठी अनेकविध योजना राबवित आहे. या सर्व योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावेत, असे निर्देश राज्याच्या सार्वजनिक आरोग्य...

उद्योग मंत्री उदय सामंत यांची कौशल्य विकास केंद्रास भेट

0
अमरावती, दि. 13 (जिमाका) : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज नांदगाव पेठ येथील एमआडीसीच्या कौशल्य विकास केंद्रास आज भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रामधील...

आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध – आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक...

0
छत्रपती संभाजीनगर, दि.13, (विमाका) :- आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहास आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले. आदिवासी...

‘महाज्योती’कडून मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी

0
पुणे, दि. १३ : महाराष्ट्र शासनाच्या समान धोरणांतर्गत कार्यरत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर येथे सन २०२५-२६ साठी मोफत स्पर्धा...

शंकरबाबाची मानसकन्या माला होणार जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले अभिनंदन

0
अमरावती, दि. 13 (जिमाका) : जिल्ह्यातील वझ्झर येथील पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या सानिध्यात वाढलेल्या माला हिला जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहायक म्हणून नियुक्त देण्यात आली...