रविवार, ऑगस्ट 3, 2025
Home Blog Page 1534

दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती नको; सहकार्य मिळणे गरजेचे – राज्यपाल रमेश बैस 

मुंबई, दि. 26 :  दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी आपल्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने विधेयक आणले. पूर्वी केवळ ६ अपंगत्वांचा समावेश होता, परंतू नव्या विधेयकामध्ये मधुमेहासह ४२ अपंगत्वांचा समावेश केल्या गेला. मात्र आज देखील दिव्यांग व्यक्तींना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. भारतीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एका नेत्रहीन अधिकाऱ्याला पदस्थापना मिळण्यासाठी ७ वर्षे लढावे लागले होते. दिव्यांग लोकांना सहानुभूती नको परंतू समाजाकडून सहकार्य मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ७५ दिव्यांग गरजू व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने शिलाई मशीन व पिठाची चक्की समारंभपूर्वक भेट देण्याचा कार्यक्रम राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य मानवाधिकार अयोग्य, हेतू चॅरिटेबल ट्रस्ट, जिल्हा न्यायिक सेवा प्राधिकरण – मुंबई उपनगर व ‘सक्षम’ कोकण प्रांत या संथांनी केले होते.

जगात प्रत्येक आठवी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे दिव्यांग आहे, तर भारतात जवळ जवळ दोन टक्के लोक दिव्यांग आहेत. दिव्यांग व्यक्तींना शिक्षण, रोजगार प्रशिक्षण, सामान संधी व सुरक्षित वातावरण देणे समाजाचे कर्तव्य आहे असे सांगून अनुकूल वातावरण मिळाल्यास दिव्यांग लोक उत्कृष्ट कार्य करू शकतात असे राज्यपालांनी सांगितले.

अष्टावक्र मुनी, संत सूरदास, वैज्ञानिक  थॉमस अल्वा एडिसन व शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग दिव्यांग असून देखील त्यांची प्रतिभा पूर्णपणे उदयास आली होती असे सांगून दिव्यांग व्यक्तींसाठी शासकीय व खासगी कार्यालये, संकेतस्थळे व वाहतुकीची साधने सुगम असली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.  यावेळी दिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी कार्य करणाऱ्या हेतू चॅरिटेबल ट्रस्टला राज्यपालांनी ५ लाख रुपयांची देणगी जाहीर केली.

कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकास, पर्यटन व महिला आणि बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती ए. ए. सय्यद, राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. कमलकिशोर तातेड (नि.), ‘सक्षम’ कोकण प्रांताचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश सावंत, हेतू चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक सचिव रिखबचंद जैन, मणी लक्ष्मी तीर्थचे विश्वस्त दिनेश मणिलाल शाह, राज्य मानवाधिकार आयोगाचे सदस्य एम ए सईद व भगवंत मोरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मुंबई उपनगरचे सचिव न्या. सतीश हिवाळे  तसेच दिव्यांग व्यक्ती व समाजसेवक उपस्थित होते.

0000

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, पनवेल आयटीआय इमारतीचे राज्यपालांच्या हस्ते होणार भूमीपूजन

मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ व पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त संकुल इमारतीचे सोमवारी दि. २७ मार्च २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात येणार आहे.

या भुमीपूजन कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

राज्यातील युवक- युवतींना एकात्मिक आणि समग्र स्वरुपाचे कौशल्य प्रशिक्षण देण्याकरिता तसेच त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त कौशल्याधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगारक्षम करुन रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. विद्यापीठाचे कामकाज लवकरच सुरु करुन येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना दर्जेदार कौशल्य शिक्षण देण्याचा शासनाचा मानस आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण उपलब्ध होण्याकरिता ५ कौशल्य प्रशालांची (Schools) व त्याअंतर्गत अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.

कौशल्य विद्यापीठाचे मुख्य कार्यालय सध्या तात्पुरत्या स्वरुपात एल्फिस्टन तांत्रिक महाविद्यालय, मुंबई येथे सुरु करण्यात आले आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल येथील १० एकर जागा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालयाकरिता उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे मुख्यालय आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल यांचे एकत्रित बांधकाम (Integrated Campus) करण्याचे प्रस्तावित आहे. हा परिसर ग्रीन कॅंपस तसेच  नेट झीरो अशा पद्धतीचा असेल. पर्यावरणपुरक इमारत बांधकाम करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.

0000

भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत अमर शहीद हेमू कलानी यांचे अभूतपूर्व योगदान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २६ : अमर शहीद हेमू कलानी यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत दिलेले योगदान मोठे आहे. महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन सुरू केले तेव्हा शहीद हेमू कलानी यांनी सहभाग घेतला होता. खूप हिंमतीने या चळवळीत आपले योगदान त्यांनी दिले. इंग्रजांनी त्यांना पकडले तेव्हा त्यांनी एकाही सहकाऱ्याचे नाव उघड केले नाही. भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत अमर शहीद हेमू कलानी यांचे अभूतपूर्व असे योगदान आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आज फाईन आर्ट, कल्चरल सेंटर, चेंबुर येथे अमर शहीद हेमू कलानी यादगार मंडळ विवेकांनद एज्युकेशन सोसायटी आणि भारतीय सिंधू सभा यांच्या वतीने अमर शहीद हेमू कलानी यांचा जन्म शताब्दी सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमास इंदौरचे खासदार शंकर लालवाणी, खासदार राहूल शेवाळे, अमर शहीद हेमू कलानी यादगार मंडळाचे सचिव बन्सी वाधवा, विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुरेश मलकानी, भारतीय सिंधू सभेचे सचिव लधाराम नागवानी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंचप्राण दिला आहे. त्याअनुषंगाने स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणाऱ्या शूरवीरांची आठवण सर्वांना व्हावी यासाठी संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमही राबविण्यात येत आहेत.

इतिहास वाचून तरुणांनी प्रेरणा घेतली पाहिजे. इतिहासाच्या आठवणी जागविण्यासाठी आणि गुलामीला मोडून काढण्यासाठी अमर शहीद हेमू कलानी यांचे कार्य प्रेरणा देणारे होते. अमर शहीद हेमू कलानी यांचे कार्य तरुणांपर्यंत पोहोचावे यासाठी अभ्यासक्रमात त्यांच्या इतिहासाचा समावेश करण्यासाठी शिफारस करण्यात येईल. सिंधू संस्कृती ही जगातील अतिप्राचीन संस्कृती आहे. जगातील सर्व देश आपल्या संस्कृतीला आदर्श मानतात ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे जगाला विचारांची ताकद देण्याची शक्ती भारतात आहे. असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

00000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले शिर्डी येथील श्री साईबाबा समाधीचे दर्शन

शिर्डी, दि. 26 (उमाका वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनीही श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, शिर्डी संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव आदी उपस्थित होते.

00000

शिर्डीत ‘थीम पार्क’ उभारण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महापशुधन एक्सपो २०२३’ चा समारोप व बक्षिस वितरण

 महापशुधन एक्स्पोला तीन दिवसांत ८ लाख लोकांनी दिली भेट

शिर्डी, दि.२६ (उमाका वृत्तसेवा) – शेतकरी केंद्रबिंदू ठेवून शासन काम करीत आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिर्डी येथील महापशुधन प्रदर्शन समारोप कार्यक्रमात दिली.  श्री साईबाबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या शिर्डीत ‘थीम पार्क’ उभे करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही‌. नगरविकास विभागाच्या माध्यमातून यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिर्डीकरांना आश्वस्त केले.

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या वतीने शिर्डी येथे आयोजित तीन दिवसीय ‘महापशुधन एक्सपो २०२३’ चा समारोप व बक्षिस वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर महसूल, पशुसंवर्धन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार सर्वश्री जयकुमार गोरे, बबनराव पाचपुते, राहूल कूल, मोनिका राजळे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन‌ शिवाजीराव कर्डीले, ‘महानंदा’ चे चेअरमन राजेश परजणे, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जगदीश प्रसाद गुप्ता आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, ‘पशुधन हिताय, बहुजन सुखाय ब्रीद’ जपत शेतकरी, पशुपालकांसाठी काम करणारे हे शासन आहे. ‘लम्पी’ नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. सप्टेंबर २०२३ पर्यंत ‘लम्पी’ लस निर्मिती करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरणार आहे.  सरकारने सादर केलेल्या पंचामृत अर्थसंकल्पात शाश्वत शेतीला प्राधान्य देण्यात आले आहे.  ‘पशुधन’ हा शेतीला पूरक असा व्यवसाय आहे. पशुधन वाढले पाहिजे, जोपासले पाहिजे, यासाठी नवनवीन प्रजातींची माहिती प्राप्त करून घेण्याची गरज आहे. ‘महापशुधन एक्स्पो’ च्या माध्यमातून शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने शेती व पशुपालन करण्याचे ज्ञान मिळत असते. त्यामुळे ‘महापशुधन एक्स्पो’ शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, शेतकरी सन्मान योजनेत केंद्र व राज्य शासन मिळून १२ हजार रूपयांची व दुष्काळी जिल्ह्यात २१ हजार रूपयांची वार्षिक मदत दिली जाणार आहे. शेळी-मेंढी विकास महामंडळासाठी बिनभांडवली कर्जासाठी शासनाने १० हजार कोटींची तरतूद केली आहे. महिलांसाठी एस.टी बसमध्ये ५० टक्के तिकिट सवलत, मुलींसाठी लेक लाडकी योजना राबवित आहे. सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन विकास साधणारे हे सर्वसामान्यांचे सरकार आहे.

केंद्राच्या सहकार्यामुळे विकासाला वेग

महाराष्ट्रातील साखर उद्योग अडचणीत असताना केंद्र सरकारने एका बैठकीतच १० हजार कोटींचा आयकर माफ करण्याचा निर्णय घेतला. राज्याच्या पायाभूत सुविधा, शहर विकासासाठी केंद्र सरकार राज्याला हजारो कोटी रूपये देत आहे‌. रेल्वे, रस्त्याच्या प्रलंबित प्रकल्पासाठी केंद्राने साडेतेरा हजार कोटी रूपये दिले असल्याचेही  मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी सांगितले.

दूध भेसळ न करण्याचे पशुसंवर्धनमंत्र्यांचे आवाहन

पशुसंवर्धनमंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले की, तीन दिवसीय महापशुधन प्रदर्शनात आतापर्यंत ८ लाख लोकांनी भेट दिली आहे. राज्य सरकार दूध उत्पादकांना सर्वाधिक दर देत आहे. मात्र दूध भेसळ करू नका असे. आवाहन करत पशुसंवर्धनमंत्री म्हणाले, लम्पी आजारावर मोफत लस देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. निळवंडे प्रकल्पास ५५० कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला. वाळू माफियांच्या बंदोबस्त करत सर्वसामान्यांना ६०० रूपये ब्रासने घरापर्यंत वाळू उपलब्ध करून देणारे हे सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आहे.

ग्रामविकास मंत्री श्री. महाजन  म्हणाले की, अहमदनगर जिल्हा सहकार , शिक्षण, कारखानदारी, बॅकिंग या क्षेत्रात अग्रेसर आहे. निसर्ग चक्र बदले असून अवकाळी, गारपीटने शेती पिकांचे अतोनात नुकसान होते. अशावेळेस शेतीला पूरक असा जोडधंदा करणे गरजेचे आहे.

शिर्डीचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त यावेळी केले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पशुधन स्पर्धत प्रथम पुरस्कार प्राप्त काही पशुपालकांना शाल, श्री‌फळ, सन्मानचिन्ह व बक्षिस रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्रातील धाराशिव या आकांक्षित जिल्ह्यामध्ये पशुवैद्यकीय सेवांच्या बळकटीकरणासाठी (A –  HELP अंतर्गत ) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), पशुसंवर्धन विभाग व भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड यांच्यातील सामंजस्य करार यावेळी करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अहमदनगर जिल्हा नियोजन निधी अंतर्गत ‘ई-ऑफीस’ प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला.

प्रास्ताविक खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले. आभार पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी मानले.

000000

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ‘आनंदाचा शिधा’ वितरणास प्रारंभ

अंत्योदय, प्राधान्य कुटुंब, एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना लाभ

जालना, दि. 26 (जिमाका) :- शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ वितरीत केला जाणार आहे. जिल्ह्यातील सुमारे 3 लाख 45 हजार 662 कुटुंबांना याचा लाभ मिळणार असून जालना येथे आज केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री  रावसाहेब पाटील दानवे व सहकार, इतर मागास बहुजन कल्याण  मंत्री तथा जालना जिल्ह‌्याचे पालकमंत्री अतुल सावे  यांच्या उपस्थितीत आज ‘आनंदाचा शिधा’ वितरणास प्रारंभ झाला.

जालना शहरातील कन्हैय्यानगर येथील रास्त भाव दुकानाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी रिना बसैय्ये, तहसीलदार छाया पवार, भास्कर दानवे, शहरातील रास्त भाव दुकानदार व लाभार्थी, नागरिक उपस्थित होते.

शासनाने राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांना गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरीत करण्याबाबतचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जालना जिल्हयातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटूंब तसेच केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वितरणास आज प्रारंभ झाला.

यावेळी केंद्रीय रावसाहेब पाटील म्हणाले की, गोरगरीबांना  सणउत्सव आनंदात साजरा करता यावा, यासाठी  शासनाने शिधापत्रिकाधारकांसाठी आनंदाचा शिधा हा उपक्रम सुरु केला आहे. गुढी पाडवा ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या कालावधीत  जिल्हयातील  3 लाख 45 हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांना हा आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. गरीबाची चिंता करणारे हे शासन असून लाभार्थ्यांनी या उपक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा.

पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की,  सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण होण्यासाठी राज्य शासनाने मागील दिवाळीत शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप केला. त्याच पध्दतीने गुढी पाडवा व  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपल्या जिल्हयातील  शिधापत्रिकाधारकांना केवळ शंभर रुपयात आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे. याचा लाभ शिधापत्रिकाधारकांनी घ्यावा.

कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरुपात पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधाचे वाटप करण्यात आले.  शिधामध्ये रवा,साखर, चनाडाळ व खाद्यतेलाचा समावेश आहे.

जालना तालुक्यातील 68 हजार 55, बदनापूर तालुक्यातील 31 हजार 425, भोकरदन तालुक्यातील 59 हजार 604, जाफ्राबाद तालुक्यातील 34 हजार 505, परतूर तालुक्यातील 31 हजार 494, मंठा तालुक्यातील 30 हजार 844, अंबड तालुक्यातील 48 हजार 605, घनसावंगी तालुक्यातील 41 हजार 130 शिधापत्रिकाधारकांना आनंदाच्या शिधाचे वितरण होणार आहे.

-*-*-*-*-*-

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी प्रगती करावी – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

शेतीला व्यवसायाची जोड देत आधुनिक पद्धतीने शेती करावी – पालकमंत्री अतुल सावे

जालना, दि. 26 (जिमाका) :- शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची तसेच नवनवीन अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभावे आणि विविध भागातून आलेल्या शेतकऱ्यांमध्ये सुसंवाद घडावा यासाठी आपल्या जिल्ह्यात कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून याचा शेतकऱ्यांनी अवश्य लाभ घ्यावा. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी प्रगती करावी, असे आवाहन केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना जिल्हा कृषी महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी केले. तर राज्य शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शासनाने शेतकऱ्यांसाठी अनेकविध योजना जाहीर केल्या आहेत, त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड देत आधुनिक पद्धतीने शेती  करावी, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.

जालना येथील पांजरपोळ संस्थानच्या गौरक्षण मैदानावर जालना जिल्हा कृषी महोत्सव-2023 चे उदघाटन आज थाटात पार पडले. केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे  व पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते कृषी महोत्सवाचे उद‌्घा‌टन झाले. कार्यक्रमास आमदार कैलास गोरंट‌्याल, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, विभागीय कृषी सहसंचालक डी.एल.जाधव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे,  आत्माच्या प्रकल्प संचालक शितल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे म्हणाले की, शेतीच्या उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांमध्ये माहितीची देवाण-घेवाण व्हावी हा  सुध्दा कृषी महोत्सवाचा उद्देश आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या पिकाचे जास्त उत्पादन होते याचा अभ्यास करुन केंद्र शासनाने त्या पिकाच्या वाढीसाठी आणि त्यावर प्रक्रीया करुन अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन मिळावे याकरीता जिल्हानिहाय पिकांची निवड केली आहे. आपल्या जालना जिल्हयात मोसंबीचे जास्त उत्पादन होते. मोसंबीवर आधारीत प्रक्रिया उद्योग करण्यासाठी सबसिडीही उलपब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ शेती करुन फायदा होणार नाही तर शेतीसोबतच अन्न प्रक्रिया उद्योग उभारुन शेतकरी सधन होण्यास मदत मिळणार आहे. पोकरा योजनेत जालना जिल्ह्याने कौतूकास्पद काम केले आहे.  शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन शास्त्रोक्त पध्दतीने शेती करण्यावर शेतकऱ्यांचा भर असायला हवा. शेतकऱ्यांनी प्राधान्याने माती परिक्षण करुन घ्यावे व कृषी तज्ज्ञांनी ठरवलेल्या मात्राप्रमाणेच खताची मात्रा पिकांना द्यावी. कृषी अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात राहावे, असे सांगून जिल्हा कृषी महोत्सवात कृषीतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

 पालकमंत्री  अतुल सावे म्हणाले की,   महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य असून शेतकऱ्यांच्या आर्थिक समृध्दीसाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. अचानक आलेल्या नैसर्गिक संकटावर मात करता यावी आणि कर्जबाजारीपणातून बाहेर येण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना बी-बियाणे खरेदी करता यावे याकरीता 6 हजार रुपये अतिरिक्त देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी निराश होऊ नये. शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड देत आधुनिक पध्दतीने शेती करावी. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी कृषी विभागाने सातत्याने अभ्यास दौरे आयोजित करावे. राज्य शासन यासाठी निश्चितपणे आवश्यक निधीची तरतूद करेल.

 कृषी प्रदर्शनात महिला बचत गटाच्या सदस्यांनी  अत्यंत चांगली उत्पादने तयार करुन विक्रीसाठी ठेवली आहेत, असे कौतुक करुन पालकमंत्री पुढे म्हणाले की, शेतकरी बांधव हा आमचा प्राण आहे त्यामुळे त्यांना कसे आर्थिक सक्षम करता येईल यावर शासन भर देत आहे. शेतकऱ्यांच्या अनुषंगाने महत्वाचे विविध निर्णय अधिवेशनात जाहीर केल्या गेले आहेत. शेतकऱ्यांनी  जिल्हा कृषी प्रदर्शनात सक्रीय सहभाग नोंदवून शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी नवनवीन प्रयोग करावेत.

आमदार कुचे म्हणाले की, शेतकऱ्यांना नजरेसमोर ठेवून राज्य शासनाने विविध योजना जाहीर केल्या आहेत. अर्थसंकल्पातही शेतकऱ्यांसाठी मोठया प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेती करावी.  यावेळी  विभागीय कृषी सहसंचालक डी.एल.जाधव यांनीही मार्गदर्शन केले.

प्रास्ताविकात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे यांनी कृषी प्रदर्शनाचा उद्देश स्पष्ट करत असतांना प्रदर्शनात एकुण 200 स्टॉलची उभारणी करण्यात आले असल्याचे सांगून कृषी उत्पादने, शेतीनिगडीत औजारे, शेतीसंबंधी उद्योग, मविमच्या महिला बचतगटांची उत्पादने यांच्यासह दररोज तीन चार कृषीतज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.  यावेळी विविध योजनांच्या घडीपुस्तिकांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. सुत्रसंचालन प्रवीण कन्नडकर यांनी केले. आभार माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी उमेश कहाते यांनी मानले. कृषी महोत्सवाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. कार्यक्रमात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे यांनी आपल्या सेवा काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल व ते नियत वयोमानानूसार 31 मार्च 2023 रोजी सेवानिवृत्त होत असल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी सर्व मान्यवरांनी  कृषी प्रदर्शनातील सर्व स्टॉल्सना भेट दिली. यावेळी ड्रोनव्दारे फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.  कार्यक्रमास मोठया संख्येन शेतकरी, महिला, नागरिक, यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

दि. 30 मार्चपर्यंत चालणाऱ्या या कृषी महोत्सवात शासकीय दालन, विविध शेतीशी संबंधीत कंपन्यांचे स्टॉल्स, बचतगटाचे स्टॉल्स, खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे स्टॉल्स, प्रात्यक्षिके यांचा समावेश आहे. कृषी आणि पूरक व्यवसायाशी निगडित एकात्मिक शेती पद्धती संकल्पनेवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कृषी संबंधित कृषी तंत्रज्ञान विभाग, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, संबंधित विविध कृषी महामंडळे यांचाही सक्रिय सहभाग आहे.

-*-*-*-*-

वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

पुणे, दि. २६: जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला उपयोगात येणाऱ्या वृक्षांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वनविभाग वृक्ष संवर्धनासाठी नागरिकांसोबत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

राज्यातील वनेतर क्षेत्रातील वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना देण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’च्या २०१८ व २०१९ या वर्षीच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचा वितरण सोहळा यशदा येथे वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रधान सचिव (वने) बी. वेणूगोपाल रेड्डी, सामाजिक वनीकरणाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक  डॉ. सुनिता सिंग, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, वन अकादमी चंद्रपूरचे संचालक श्रीनिवास रेड्डी आदी उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले, वनश्री पुरस्कार पाहिल्यावर वृक्ष लावण्याची ऊर्जा प्राप्त होईल आणि इतरांना कर्तव्याची जाण होईल. संपूर्ण जगात जागतिक तापमान वाढ आणि पर्यावरणाविषयी चिंता व्यक्त होत आहे. पर्यावरणाने भरभरून दिले असतानाही माणूस वसुंधरेचे शोषण करीत आहे. जन्म झाल्यापासून माणसाला निसर्गापासून प्राणवायू मिळतो. अंत्यसंस्कारालाही झाडाची लाकडे उपयोगात येतात. जीवन या शब्दातच वन समाविष्ट आहे. माणसाला जगविण्याची क्षमता निसर्गात आहे.

एकविसाव्या शतकात माणूस सामाजिक होण्याऐवजी स्वार्थाचा विचार करीत असताना पुरस्कार विजेत्यांनी सामाजिक जाणिवेतून आपापल्यापरीने निसर्ग संवर्धन करण्याचा प्रयत्न केला. या सर्वांच्या मदतीने महाराष्ट्रात २०१४ नंतर २ हजार ५५० वर्ग किलोमीटरने हरित आच्छादन वाढविले आणि तीवरांच्या जंगलामध्ये १०४ वर्ग किलोमीटरने वाढ केली. जगात वृक्षतोडी संदर्भात चर्चा सुरू झाली असताना आपल्या लोकसंख्येच्या तुलनेत उत्सर्जित होणारा कार्बन कमी आहे. अशा वातावरणात पर्यावरणप्रेमी आणि पुरस्कार विजेते एकत्रितपणे मानवाची सेवा करीत आहेत.

आपण एकटे विश्वाचे पर्यावरण बदलू शकत नसलो तरी त्यासाठी आपला वाटा, योगदान देऊ शकतो हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणून वृक्ष लावण्याची विचारगंगा लोकांपर्यंत जावी, वृक्ष तोडणारे हात कमी होऊन वृक्ष लावणारे हात वाढावेत, वृक्ष संवर्धन संस्कृती वाढावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वर्ष साजरे करत असताना त्यांच्या विचारांचा जयघोष करतानाच आपण एक पाऊल कृतीच्या मार्गावर पुढे न्यायचे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे निसर्गसंवर्धनासाठीच्या कार्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहनही श्री. मुनगंटीवार यांनी केले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, उच्च व तंत्र शिक्षण विभागाने युनिसेफ समवेत सामंजस्य करार केलेला आहे. त्यानुसार राज्यातील ३३ लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या अनुषंगाने जलसंधारण, पर्यावरण रक्षण आदी कार्यासाठी प्रेरित करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत एक व्हर्चुअल प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यात या विषयाच्या अनुषंगाने दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पर्यावरण रक्षण, वृक्ष वाचविणे आणि संवर्धन यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. सयाजी शिंदेंसारख्या अभिनेत्याने वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. वनश्री पुरस्कार मिळवलेल्यांनी देखील या प्रयत्नांना पुढे नेण्याचे काम केले आहे.

यावेळी संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत पुरस्कारांचेही संयुक्त व्यवस्थापन समित्यांना प्रदान करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार १ लाख रुपये, द्वितीय ७५ हजार रुपये, तृतीय पुरस्कार ५० हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन २०१८

संवर्ग १- व्यक्ती : प्रथम पुरस्कार- रघुनाथ मारुती ढोले, घोरपडी, पुणे, द्वितीय पुरस्कार- सुधाकर गुणवंतराव देशमुख, मु. ममदापूर, पो. पाटोदा, ता. अंबाजोगाई, जि. बीड, तृतीय पुरस्कार- रोहित शंकर बनसोडे, गोंदवले खुर्द, ता. माण (जि. सातारा)
संवर्ग २- शैक्षणिक संस्था: प्रथम पुरस्कार- म. वि.प. समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव (जि. नाशिक), द्वितीय पुरस्कार- एस.एम. इंग्लिश स्कूल, वाशिम, तृतीय पुरस्कार-शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कन्नड (जि. औरंगाबाद)
संवर्ग ३- सेवाभावी संस्था: प्रथम पुरस्कार- आधार फाऊंडेशन, मु.पो.रुकडी, ता. हातकणंगले (जि. कोल्हापूर), द्वितीय पुरस्कार- मराठवाडा जनविकास संघ, पिंपळे गुरव, पुणे – २७, तृतीय पुरस्कार- श्री अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, जळगाव (जि. जळगाव)
संवर्ग ४- ग्रामपंचायत: प्रथम पुरस्कार- ग्रामपंचायत मौ. बिदाल, ता. माण (जि. सातारा), द्वितीय पुरस्कार- ग्रामपंचायत पुणतांबा- रस्तापूर, ता. राहता, (जि. अहमदनगर), तृतीय पुरस्कार- ग्रामपंचायत मौ. चिंचणी, ता. पंढरपूर (जि. सोलापूर)
संवर्ग ५- ग्राम/जिल्हा/विभाग: प्रथम पुरस्कार- जिल्हा परिषद कोल्हापूर, द्वितीय पुरस्कार- पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा.

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन २०१९

संवर्ग १- व्यक्ती: प्रथम पुरस्कार- किसन धोंडीबा गारगोटे, पंचवटी, पाषाण रोड, पुणे, द्वितीय पुरस्कार- सुशांत प्रकाश घोडके, समर्थ स्वातंत्र्यवीर सावरकर कॉलनी, साईनगर, मु.पो. ता. कोपरगांव (जि. अहमदनगर), तृतीय पुरस्कार- सुनिल रामदास वाणी, श्रीकृष्ण कॉलनी, जळगाव.
संवर्ग २- शैक्षणिक संस्था: प्रथम पुरस्कार-मुधोजी महाविद्यालय, फलटण (जि. सातारा), द्वितीय पुरस्कार- कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड (जि. नाशिक), तृतीय पुरस्कार- स्वा. दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, उंडाळे, ता. कराड (जि. सातारा).
संवर्ग ३- ग्रामपंचायत: प्रथम पुरस्कार- ग्रामपंचायत गमेवाडी, ता. कराड (जि. सातारा), द्वितीय पुरस्कार-ग्रामपंचायत साबुर्डी, ता. खेड (जि. पुणे), तृतीय पुरस्कार-ग्रामपंचायत लोहसर, पाथर्डी (जि. अहमदनगर).
संवर्ग ४- सेवाभावी संस्था: प्रथम पुरस्कार- ज्ञानशक्ती विकास वाहिनी, मंचर, ता.आंबेगाव (जि.पुणे), द्वितीय पुरस्कार-शिवराज मित्र मंडळ, भैरवनगर, धानोरी रोड,पुणे-१५, तृतीय पुरस्कार- वसुंधरा अभियान, बाणेर, पुणे ४११०४५.
संवर्ग ५- ग्राम/जिल्हा/विभाग: प्रथम पुरस्कार-वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड, पुणे, द्वितीय पुरस्कार-पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना.
0000

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील नाट्यगृहे सुसज्ज करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार

मुंबई, दि. २६ :  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त राज्यातील ५२  नाट्यगृहे सर्व सोयीसुविधांसह सुसज्ज व्हावेत, रसिक प्रेक्षक आणि नाट्य कलावंत यांचा विचार करुन मराठी नाट्य चळवळ मोठी व्हावी, यासाठी राज्याचा सांस्कृतिक विभाग कटिबद्ध असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच जागतिक रंगभूमी दिननिमित्त राज्यातील सर्व रंगकर्मी तसेच या क्षेत्रात काम करणारे अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व रंगभूमीशी नातं असलेल्या सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, येणाऱ्या काळात नाट्य मंदिराचे नाट्यचित्र मंदिर करता येईल का याबाबत नाट्यगृह बांधताना किंवा नूतनीकरण करताना तज्‍ज्ञ लोकांचा सल्ला घेण्यात येणार आहे. यासाठी ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे.

राज्यातील नाट्यगृहांची स्थिती आणि उद्भवणाऱ्या अडचणी याबाबत बैठका घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. ५२ पैकी रविंद्र नाट्यगृह सांस्‍कृतिक विभागाकडे असून इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आहेत. यासंदर्भातील अडचणी दूर करुन नाट्यगृह अधिक उत्तम व आदर्श करण्याच्या दृष्टीने सूचना देऊन यासंदर्भातील तज्‍ज्ञ व कलावंत यांच्यासोबत देखील चर्चा झाली. नाट्यगृहात सोलर व्यवस्था व्हावी यासाठी विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. नाट्य चळवळ सुरू राहावी याकरिता राज्यातील नाट्यगृह आधुनिक करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. नाट्यगृहाचे आधुनिकीकरण करताना नाट्यगृहांमध्ये सोलर, एअर कंडीशन व्यवस्था, साऊंड सिस्टीम, नाट्यगृहाच्या खुर्च्या, मेकअप रूम, प्रकाश व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृह, पार्किंग या सगळ्या बाबींचा समावेश असणे आवश्यक असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

कोरोनाच्या काळात मराठी नाटक आणि कलावंत यांच्यावर देखील इतर क्षेत्रांप्रमाणे आर्थिक संकट कोसळले. आता हे क्षेत्र रुळावर येऊ लागले आहे, तरी देखील मुंबईतील नाट्यगृहे जून 2023 पर्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध व्हावी यासाठी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इकबालसिंग चहल यांच्याशी चर्चा केली आहे. अल्प दरात हौशी कलावंतांना नाट्यगृह उपलबद्ध व्हावेत असाही प्रयत्न असणार आहे. नाट्यस्पर्धेच्या परीक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय आणि स्पर्धेतील विजेत्या संघातील प्रत्येक कलाकाराला प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

0000

मातंग समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 25 : राज्यातील मातंग समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले.

            मातंग समाजाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक झाली.

या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे सचिव डॉ. सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, मातंग समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले.

            मातंग समाज योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी जिल्ह्यांमध्ये जनजागृती शिबीरे आयोजित करावी. समाजाच्या विविध मागण्यांबाबत संघटनांसोबत जिल्हानिहाय बैठका घेवून समस्या सोडवाव्यात. योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्यांची यादी तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक न्याय विभागाला दिले.

            सद्यस्थितीत मातंग समाजाच्या विकासाच्या योजनांसाठी निधी उपलब्ध आहे. शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, रोजगार व स्वयंरोजगार, कर्ज पुरवठा आदी सोयीसुविधा मातंग समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी विभागाला दिल्या.

०००००

पवन राठोड/स.सं

ताज्या बातम्या

दिल्लीत क्रांतिसिंह नाना पाटील जयंती साजरी

0
नवी दिल्ली, ३ : स्वातंत्र्यसंग्रामातील महान सेनानी, ‘परदेशी नव्हे, स्वराज्य हवे’ या विचारांचा पुरस्कार करणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद...

अवयवदान पंधरवड्यास सुरुवात; आजपासून राज्यात जनजागृतीपर विविध उपक्रम

0
मुंबई, दि. ३ : राज्यातील अवयवदानाचे प्रमाण वाढावे व अवयवदानाच्या प्रतीक्षेतील रुग्णांना नवजीवन मिळावे यासाठी आजपासून विविध उपक्रमांनी अवयवदान पंधरवडा साजरा होत आहे. सार्वजनिक आरोग्य...

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महसूल विभाग अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर दि.३ : महसूल विभाग राज्याच्या आर्थिक विकासाचा कणा असून गतिमानता, पारदर्शकता व तत्परतेने सेवा देणारा विभाग म्हणून याची ओळख आहे. सध्या राज्यातील जनतेला सर्वाधिक...

‘संपूर्णता’ अभियानात उत्कृष्ट कामगिरीबद्दल चंद्रपूर जिल्हाधिकारी सन्मानीत

0
चंद्रपूर दि. ३ : ‘आकांक्षित जिल्हे व तालुके’ कार्यक्रमांतर्गत १ जुलै २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविण्यात आलेल्या संपूर्णता अभियान मधील उल्लेखनीय...

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

0
मुंबई, दि 3 – क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून...