शनिवार, ऑगस्ट 2, 2025
Home Blog Page 146

‘न्यू एज’ अभ्यासक्रमांना चालना द्यावी – मंत्री मंगल प्रभात लोढा

नाशिक, दि. ३०: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी काळानुरुप बदल स्वीकारत नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित ‘न्यू एज’ अभ्यासक्रमांना चालना द्यावी. त्याविषयी विद्यार्थ्यांना अवगत करावे, अशा सूचना राज्याचे कौशल्य, उद्योजकता, रोजगार व नावीण्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले.

संत मीराबाई शासकीय मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज सकाळी मंत्री लोढा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, कौशल्य विकास विभागाचे सहसंचालक अनिल गावित, प्राचार्य दीपक बाविस्कार आदी उपस्थित होते.

मंत्री लोढा म्हणाले की, औद्योगिक क्षेत्रात बदल होत आहेत. त्यानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी न्यू एजवर आधारित अभ्यासक्रम सुरू करावेत. त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची उपलब्धता करावी. तसेच अद्ययावत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा. याबरोबरच अहिल्यानगर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १ ऑगस्टपासून अभ्यासक्रम सुरू होतील, असे नियोजन करावे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला ज्या व्यक्तीचे नाव दिले आहे, अशा व्यक्तीच्या जयंतीसह विशेष दिनी प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री लोढा यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामकरण, इमारत बांधकाम, जिल्हा वार्षिक योजना आदींचा सविस्तर आढावा घेतला. सहसंचालक गावित यांनी विभागाची सविस्तर माहिती दिली.

०००

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. ३० : प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्न करत असते. त्यानुसार इवे ट्रान्स प्रा. लि. कंपनीकडून 5150 ईलेक्ट्रीक बसेस भाडेतत्त्वावर घेण्याबाबत करार करण्यात आला. प्रवाशांना या बसेसच्या माध्यमातून सुविधा मिळण्यासाठी नवीन वेळापत्रकानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ई- बसेसचा पुरवठा करावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित बैठकीत परिवहन मंत्री सरनाईक बस पुरवठ्याबाबत आढावा घेताना बोलत होते. बैठकीस अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, कंपनीचे के. व्ही प्रदीप आदी उपस्थित होते.

बस पुरवठादार कंपनीने दिलेल्या वेळापत्रकानुसार बस पुरवठा करणे अपेक्षित असल्याचे सूचित करीत मंत्री सरनाईक म्हणाले, कंपनीने दिलेल्या बसेसचा चालनीय तोटा लक्षात घेता, राज्य शासनाकडून निधी मिळण्यासाठी व्यवहार्यता अंतर अर्थपुरवठ्यासाठी (viability gap funding) चा प्रस्ताव पाठविण्यात यावा. कंपनीने आतापर्यंत 220 बसेसचा पुरवठा केला आहे. उर्वरित पुरवठा सुधारित करारानुसार करण्यासाठी कंपनीने नियोजन करावे.

बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री सरनाईक म्हणाले, भाडेतत्वावर कंपनीने 5150 ईलेक्ट्रीक बसेस पुरवठा करण्याचा करार आहे. त्यापैकी 220 बसेसचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये 12 मीटर व 9 मीटर लांबीच्या बसेस आहेत. महामंडळाने विभागनिहाय नवीन खाते तयार करून इलेक्ट्रीक बसच्या उत्पन्नामधून कंपनीला बिलांची रक्कम देण्यात येत आहे. त्यानुसार 60 कोटी रूपये कंपनीला देण्यात आले आहे. उर्वरित 40 कोटी रक्कम देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महामंडळाला 12 मीटर बस चालविताना प्रति किलोमीटर 12 रूपये आणि 9 मीटर बस चालविताना 16 रूपये प्रति किलोमीटर तोटा ग्राह्य धरून पुढील काही वर्षात 3191 कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे.

यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

‘जय महाराष्ट्र’ मध्ये पिंपरी -चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची ३ जून रोजी विशेष मुलाखत

मुंबई, दि. ३० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात पिंपरी -चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात शंभर दिवसांच्या कृती आराखडा उपक्रमातील अंतिम मूल्यमापन आणि ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान’अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने केलेली सर्वोत्तम कामगिरी या विषयावर ही मुलाखत मंगळवार, 3 जून 2025 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार असून महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर देखील ही मुलाखत पाहता येणार आहे. ज्येष्ठ निवेदक प्रसाद मोकाशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

प्रशासनात सुलभता, लोकाभिमुखता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, कर संकलनात वाढ आणि नवनवीन उपक्रमांची अंमलबजावणी या बाबींमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तंत्रज्ञानाचा कामकाजात प्रभावी वापर करणे तसेच कर संकलन वाढीसाठी राबविलेल्या नवनवीन उपक्रम राबविणे, ऑनलाईन सुविधा, मालमत्ता जप्ती लिलाव, जिओ सिक्वेन्सिंग आणि यूपीआयसी आयडी अशा महत्त्वाच्या विषयांवर महापालिकेने भर दिला आहे. या उपक्रमांची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात आली याविषयी आयुक्त सिंह यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

महासंचालनालयाच्या खालील लिंकवरून ही मुलाखत पाहता येईल.

एक्स (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक: https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब: https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

०००

जयश्री कोल्हे/ससं/

‘दिलखुलास’मध्ये प्रा. डॉ. रेशम पाखमोडे यांची ३१ मे, २ व ३ जून रोजी मुलाखत

मुंबई, दि. ३० : ‘जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे’ औचित्य साधून, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’या कार्यक्रमात आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण माहिती देणारी विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. जी. टी. रुग्णालय, मुंबई येथील दंत वैद्यक विभागाच्या प्रमुख आणि सहायक प्रा. डॉ. रेशम पाखमोडे यांच्या मार्गदर्शनातून तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

ही विशेष मुलाखत शनिवार, 31 मे 2025 तसेच सोमवार, 2 जून आणि मंगळवार, 3 जून रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर आणि ‘न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल ॲपवर ऐकता येणार आहे. सहायक संचालक जयश्री कोल्हे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी 31 मे रोजी साजरा केला जातो. यामागील उद्देश तंबाखूच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणाऱ्या गंभीर परिणामांची जाणीव जनतेला करून देणे हा आहे. तंबाखूचा वापर अनेक घातक आजारांना आमंत्रण देतो. या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर ‘राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम’अंतर्गत राज्यात सातत्याने विविध जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. तंबाखू सेवनामुळे होणारे गंभीर आजार, त्यापासून बचावाचे उपाय, आणि आरोग्यविषयक काळजी याबाबत दिलखुलास’कार्यक्रमातून डॉ. पाखमोडे यांनी मार्गदर्शन केले आहे.

०००

जयश्री कोल्हे/ससं/

राज्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ४२.२ मिमी पाऊस

मुंबई, दि. ३०: राज्यात मागील २४ तासांमध्ये (३० मे रोजी सकाळपर्यंत) धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ४२.२ मिमी पाऊस झाला आहे, तर बीड २४ मिमी, जालना १३.९ मिमी, सोलापूर १२.१ मिमी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज ३० मे रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :

रायगड ०.३, रत्नागिरी ३.९,  सिंधुदुर्ग ११.२,  पालघर ०.१, नाशिक ०.६, धुळे ०.४,  जळगाव ०.१, अहिल्यानगर ०.५, सोलापूर १२.१,  सातारा १,  सांगली ०.९,  कोल्हापूर ०.८, छत्रपती संभाजीनगर ०.६, जालना १३.९, बीड २४, लातूर ५.१,  धाराशिव ४२.२, नांदेड ९.३,  परभणी ३,  हिंगोली ०.२, बुलढाणा २.२, अकोला ०.१, वाशिम ०.२, अमरावती ३.४, यवतमाळ ६.५,  वर्धा ८.७, नागपूर १.४, भंडारा ०.७, गोंदिया ३.९, चंद्रपूर १.२ आणि गडचिरोली २.५.

धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले. मात्र, पावसामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

आंबोली घाट मार्गावर वाहतूक सुरळीत सुरू

सिधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात रस्त्यावर दरड कोसळली राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने रस्त्यावरील कोसळलेली दरड हटवली असून या मार्गावर वाहतूक सुरळीतपणे चालू आहे.

इंडो अमाईन्स कंपनीतील वायू गळती बंद

महाड येथील इंडो अमाईन्स या कंपनीमध्ये वायू गळतीमुळे एक कामगार जखमी झाला आहे. सध्या वायू गळती बंद असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सांगण्यात आले.

दिनांक २९ मे २०२५ रोजी ठाणे जिल्ह्यात रस्ता अपघातात एक व्यक्ती, नांदेड जिल्ह्यात पाण्यात बुडून दोन व्यक्ती मृत पावल्या आहेत, तर सोलापूर जिल्ह्यात भिंत पडून चार व्यक्ती जखमी झाल्या आहेत.

राज्यात सर्व जिल्ह्यात पावसाची नोंद झाली आहे. सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात असून कुठेही पूरपरिस्थिती उद्भवलेली नाही. राज्य आपत्कालीन कार्य केंद्र सर्व जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रांच्या सातत्याने संपर्कात आहे. पूरपरिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफ पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

राज्यात २९ ते ३० मे २०२५ दुपारी ४ वाजेपर्यंत भिंत कोसळणे, झाड पडणे, वीज कोसळणे, पाण्यात बुडणे, आगीत जळणे, पुराचे पाण्यामुळे, रस्ते अपघात या घटनेत तीन व्यक्ती व तीन प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील एक आणि नांदेड जिल्ह्यातील दोन व्यक्तींचा समावेश आहे. तसेच सात व्यक्ती जखमी झाली असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती– एका आदर्श महिला नेतृत्वाला वंदन!

भारतीय इतिहासात मोठी युद्धे झाली, साम्राज्ये उभी राहिली आणि कोसळली. परंतु, या साऱ्या घडामोडींमध्ये ज्या व्यक्तींनी आपल्या कार्याने समाजहित, धर्मरक्षण आणि जनकल्याण या मूल्यांना सर्वोच्च मान दिला, त्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्थान अग्रभागी आहे. त्यांच्या जीवनकार्याने सिद्ध केलं की एका स्त्रीचं नेतृत्व केवळ राजसिंहासनापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचू शकतं. अहिल्याबाई होळकर या केवळ इंदूरच्या होळकर घराण्याच्या महाराणी नव्हत्या तर त्या एक द्रष्ट्या प्रशासक, न्यायप्रिय नेत्या, धर्मपरायण समाजसुधारक आणि स्त्री सक्षमीकरणाच्या आद्य पुरस्कर्त्या होत्या. त्यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त, त्यांचे स्मरण त्यांच्या विचारांमधून नव्याने प्रेरणा घेण्याचे निमित्त आहे!
प्रशासन आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर

अहिल्याबाईंचे नेतृत्व केवळ राज्यकारभारापुरते मर्यादित नव्हते, तर त्यात धर्म, न्याय, लोकसेवा आणि नीतीमूल्यांचे सखोल अधिष्ठान होते. त्यांनी महेश्वरला आपली राजधानी बनवली. ही राजधानी एक आदर्श प्रशासनाचे प्रमाण होते. येथे अहिल्याबाईंनी एक पारदर्शक, न्यायपूर्ण आणि लोकाभिमुख राज्यकारभार चालवला. तेव्हाच्या काळात एकराज्यकर्त्या महाराणी प्रत्यक्षपणे जनतेच्या तक्रारी ऐकून त्यावर तत्काळ निर्णय घेते, अशी कल्पनाही करवत नाही. पण अहिल्याबाई दररोज प्रजेसोबत संवाद साधत, त्यांच्या अडचणी समजून घेत आणि न्याय देत. हे त्यांचे कार्य आजच्या लोकशाही व्यवस्थेलाही मार्गदर्शक ठरावे असेच आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य धार्मिक स्थळांचे पुनरुज्जीवन आणि समाजकल्याण यासाठी वाहिले. काशी विश्वनाथ, गंगाघाट, रामेश्वरम, सोमनाथ, द्वारका अशा अनेक प्राचीन आणि पवित्र स्थळांचे जीर्णोद्धार करून त्यांनी भारतीय सांस्कृतिक एकात्मतेचे धागे पुन्हा मजबूत केले. याशिवाय देशभर त्यांनी शेकडो धर्मशाळा, घाट, कुंड, विहिरी, अन्नछत्रे आणि विश्रामगृहे उभारली. हे कार्य कोणत्याही जाती-धर्माचा भेद न करता सर्वसामान्य जनतेसाठी केले गेले. त्यांच्या या पुढाकारामुळे हजारो लोकांना निवारा, अन्न आणि आधार मिळाला.त्यांचे हे सामाजिक कार्य आजही संपूर्ण भारतात “लोककल्याणकारी राज्यशासनाचा” आदर्श नमुना मानले जाते. प्रशासन आणि समाजकारण यांचा असा सुरेख मिलाफ क्वचितच इतिहासात पाहायला मिळतो—आणि त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर!

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर – स्त्री सक्षमीकरणाचे आदर्श!
अठराव्या शतकातील भारतात स्त्रियांना घराच्या चार भिंतींपलीकडे जाण्याची मुभा नव्हती. पण अशा काळातही अहिल्याबाई यांनी स्त्रिया आत्मनिर्भर बनाव्या यासाठी पुढाकार घेतला. त्या काळात त्यांनी सुरू केलेला महेश्वरी साडी उद्योग केवळ व्यवसाय नव्हता तर तो एक सामाजिक क्रांतीचा भाग होता. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी काशी आणि इतर ठिकाणांहून कुशल विणकरांना महेश्वरला बोलावले. त्यांनी स्थानिक महिलांना हातमाग प्रशिक्षण दिले, आणि महिलांना घरोघरी बसून उत्पन्न मिळवण्याची संधी निर्माण केली. या उद्योगाने हजारो महिलांना केवळ रोजगारचं दिला नाही, तर स्वाभिमान, ओळख आणि आत्मसन्मानही दिला. आजही महेश्वर व आसपासच्या भागात महेश्वरी साड्या विणणाऱ्या हजारो महिला आपल्याला पहायला मिळतात. या साड्या केवळ पारंपरिक पोशाख नाहीत, तर त्या अहिल्याबाईंच्या द्रष्ट्या धोरणांचा आणि स्त्रीसन्मानाच्या तत्त्वांचा वस्त्ररूप अविष्कार आहेत. त्यांनी कोणत्याही जाती, धर्म, वर्ग यांचा भेद न करता सर्वांसाठी कार्य केले. १३ ऑगस्ट १७९५ रोजी या महान राणीने देहत्याग केला. धर्मशाळा, भजनमंडळे, सार्वजनिक पाणवठे आणि शिक्षणाच्या सुविधा त्यांनी महिलांसाठी खुल्या केल्या. त्या काळात जेव्हा स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान होते, तेव्हा त्यांनी महिलांना धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक निर्णयांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची मुभा दिली. अहिल्याबाईंच्या या कार्यामुळेच त्यांना ‘पुण्यश्लोक, ‘लोकमाता’ आणि ‘राजमाता’ अशा सन्मानार्थ उपाधी प्राप्त झाल्या. भारत सरकारने त्यांच्या स्मृतींना वंदन म्हणून टपाल तिकीट प्रकाशित करून त्यांच्या कार्याला उजाळा दिला आहे. इ.स. १७६७ साली त्यांनी महेश्वर येथे हातमाग उद्योग सुरू करून एक स्थायिक, गुणवत्ताधिष्ठित आणि बाजारपेठेचा विचार करणारा स्थानिक उद्योग उभारला. यामागील हेतू होता तो स्त्रियांना उपजीविकेचा मार्ग उपलब्ध करून देणे आणि महेश्वरला धार्मिक व पारंपरिक वस्त्रकलेचे केंद्र बनवणे. महेश्वरी साडी आणि अहिल्याबाई यांचे नाते केवळ वस्त्रनिर्मितीपुरते मर्यादित नाही, तर ते महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक वारसा आणि स्थानिक उद्योगाचा उत्कर्ष यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे.
महेश्वरी साड्यांची क्रेझ आजही कायम !
· महेश्वरी साड्या हलक्या आणि देखण्या
· सूती किंवा सिल्क-कॉटन मिश्र धाग्यांपासून तयार होतात, त्यामुळे साडी नेसण्यास हलकी
· साड्यांची किनारी (पट्टा) (झरी पट्टा) अतिशय आकर्षक आणि पारंपरिक नक्षीकामाने सजलेली
· “रिर्व्हसिबल बॉर्डर” म्हणजेच दोन्ही बाजूंनी वापरता येणारी साडी ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट
· भारतातच नाही तर विदेशात ही प्रसिद्ध
· हस्तकला आणि महिला उपयोजनता याचे प्रतीक
· पारंपारिक पण मोहक रंगसंगती गडद जांभळा, हिरवा, पिवळा, राखाडी यांसारखे रंग
अहिल्याबाईंनी त्याकाळी फक्त उद्योग उभारला नाही, तर महिलांना कामात समाविष्ट करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवले. आजही महेश्वर येथील अनेक महिलांचे कुटुंब महेश्वरी साड्या विणण्यावर अवलंबून आहेत. महेश्वरी साडी म्हणजे केवळ एक पारंपरिक वस्त्र नाही, तर ती आहे अहिल्याबाईंच्या दूरदृष्टीची, सामाजिक जाणिवेची आणि स्त्री सन्मानाच्या विचारांची एक जिवंत आठवण म्हणता येईल.
अहिल्याबाईंची दूरदृष्टी – आजच्या ‘स्टार्टअप’ महिला उद्योजिकांसाठी प्रेरणास्रोत!
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्रिशतकी जन्माेत‌्सव साजरा करताना त्यांच्या दूरदृष्टीने घडवलेल्या उपक्रमांचा आजच्या काळातही प्रभाव दिसतो. महेश्वरी साडी उद्योग हे त्याचे अत्यंत प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी स्थापलेला हा स्थानिक उद्योग आजही महिला सक्षमीकरणाचा आदर्श मॉडेल मानला जातो. त्यांच्या विचारांतून निर्माण झालेल्या या व्यवसायाचे स्वरूप केवळ आर्थिक नव्हते, तर ते सामाजिक समावेश, कौशल्यविकास आणि स्वावलंबनाच्या मूल्यांवर आधारित होते.आज अनेक स्वयंसेवी संस्था आणि शासनाच्या योजनांद्वारे महेश्वरी साडी उद्योगातून ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. अहिल्याबाईंच्या कार्यातून मिळणारा मूलभूत धडा म्हणजे – कोणताही व्यवसाय फक्त नफा मिळवण्यासाठी नसावा, तर तो समाजातील दुर्बल घटकांना सक्षम करण्याचे साधन असावे. त्यांची ही दूरदृष्टी आजच्या स्टार्टअप महिला उद्योजिकांसाठी मार्गदर्शक ठरते.
महिला उद्योजिकांनी सामाजिक संवेदना, स्थानिक कौशल्यांचा विकास आणि सांस्कृतिक मूल्यांचा समावेश करताना, व्यवसाय कसा दीर्घकालीन आणि समर्पित बनवावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे अहिल्याबाईंचा साडी उद्योग.
आज महेश्वरी साडी जगभरात प्रसिद्ध आहे, पण तिच्या प्रत्येक धाग्यामागे पुण्यश्लोक अहिल्याबाईंचे स्वप्न, दूरदृष्टी आणि स्त्रीच्या सन्मानासाठी दिलेले योगदान विणलेले आहे.
या ऐतिहासिक वारशाला आदरांजली वाहत, राज्य सरकारने ७ मे २०२५ रोजी अहिल्याबाईंच्या जन्मस्थळी – चौंडी (जि. अहमदनगर) – पार पडलेल्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीत महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी “आदिशक्ती अभियान” राबविण्याचा निर्णय घेतला. या अभियानाचा उद्देश म्हणजे महिलांना आरोग्य, पोषण, शिक्षण, आर्थिक सबलीकरण, सामाजिक सहभाग आणि नेतृत्व विकासाच्या माध्यमातून सशक्त करणे आहे. तसेच बालमृत्यू व मातामृत्यू कमी करणे, महिलांचा पंचायतराजमध्ये सहभाग वाढवणे, बालविवाह व कौटुंबिक हिंसाचारास प्रतिबंध करणे, अशा अनेक महत्त्वपूर्ण बाबी यामध्ये समाविष्ट आहेत.
ग्रामपातळीपासून राज्यस्तरापर्यंत विशेष समित्या स्थापन करून त्यांचे वार्षिक मूल्यमापन केले जाईल. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समित्यांना “आदिशक्ती पुरस्कार” देण्यात येणार असून, हे पुरस्कार दरवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित होतील. या उपक्रमासाठी दरवर्षी अंदाजे १०.५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
या अभियानाचे मूळ बीज पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या विचारांमध्येच आहे – स्त्री ही केवळ कुटुंबाचा आधार नसून, ती समाजाच्या पुनर्बांधणीची शक्ती आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राबवले जाणारे ‘आदिशक्ती अभियान’ हे स्त्रीसन्मान, स्त्रीसशक्तीकरण आणि सामाजिक परिवर्तनाचे आधुनिक रूप आहे.
०००
– वर्षा फडके-आंधळे, उपसंचालक (वृत्त)

निधी वळविल्याचा अपप्रचार थांबवा – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

चंद्रपूर, दि. २९: आदिवासी विकास विभागाच्या निधीविषयक अपप्रचाराला पूर्णविराम देण्याचे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी आदिवासी विभागाला शासनामार्फत एकूण 17,000 कोटी रुपये वितरित करण्यात आले होते. मात्र, चालू वर्षाच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने विभागासाठी 21,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

या अनुषंगाने, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आदिवासी विभागाच्या योजनांसाठी निधीमध्ये स्पष्टपणे वाढ करण्यात आली असून, त्यामुळे आदिवासी विभागाच्या कोणत्याही योजनेस निधीअभावी खंडित करावे लागणार नाही, असेही मंत्री डॉ. वुईके यांनी स्पष्ट केले.

लाडकी बहीण ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून तिची प्रभावी अंमलबजावणी ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. शासनाच्या आदिवासी विभागाच्या योजनांसाठी निधीची कमतरता भासणार नाही. केंद्र सरकारकडूनही आदिवासी विभागास 100 टक्के पाठिशी असून केंद्र शासनाच्या आदिवासी विभागाच्या विविध योजनासाठी देखील अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात येत आहे.

“त्यामुळे निधी कमी केल्याचा किंवा योजना बंद केल्याचा कुठलाही अपप्रचार चुकीचा असून, तो तत्काळ थांबवावा,” असे आवाहन डॉ. वुईके यांनी यावेळी केले.

०००

पालकमंत्र्यांकडून दिग्रस तालुक्यातील प्रलंबित तक्रारींचा आढावा

यवतमाळ, दि.२९ (जिमाका) : दिग्रस तालुक्यातील प्रलंबित तक्रारींचा पालकमंत्री संजय राठोड यांनी आज आढावा घेतला. तक्रारदार, निवेदनकर्त्यांसोबत संवाद साधत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तेथेच संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना केल्या.

यावेळी उपवनसंरक्षक डॉ.बी.एन.स्वामी, उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, बांधकामचे कार्यकारी अभियंता महेश माथुलकर, तहसीलदार मयुर राऊत, गटविकास अधिकारी श्री.खरोडे, नगर परिषद मुख्याधिकारी अतुल पंत, उपविभागीय कृषी अधिकारी एस.एच.गोसावी, तालुका कृषी अधिकारी एस.एस.राजपूत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशिष पवार, अरुणावती प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता अखिल चव्हाण, जलसंधारण अधिकारी प्र.ह.सैनी यांच्यासह उपविभाग व तालुकास्तरीय सर्व अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री कार्यालयाकडे ऑनलाईन दाखल झालेल्या परंतू विभागांद्वारे त्यावर वेळेवर योग्य कार्यवाही न झालेल्या तक्रारी, निवेदनांवर पालकमंत्र्यांनी तक्रारदारांसमक्ष विभागांसोबत चर्चा करून कालमर्यादेत योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले. यावेळी पालकमंत्र्यांनी जवळजवळ ५० पेक्षा अधिक तक्रारदार, निवेदनकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांच्या तक्रारी, समस्या जाणून घेतल्या.

भजनी मंडळांना साहित्य, घरकुल निधी हप्ता, सुरळीत पाणी पुरवठा, नाला खोलीकरण व रुंदीकरण, अतिक्रमण जमीनीवर घराचे बांधकाम, नवीन विहीर, बॅकेद्वारे परस्पर रक्कमेची कपात, स्मशानभूमीसाठी जागा, रस्ता, योग भवन बांधकाम, ग्रामसभा नियमित घेतली जात नाही, पांदन रस्त्यांची दुरुस्ती, अनुकंपा तत्वावर नियुक्ती, स्वयंरोजगारासाठी बिज भांडवल, सातबारावर क्षेत्र दुरुस्ती, अतिक्रमण जागेवरील बांधकाम थांबविणे, वीज कनेक्शन, लिंगा वाई येथे विकास कामे, सभामंडपाचे बांधकाम, टिनशेड बांधकाम आदी विषयांवरील प्राप्त तक्रारी, निवेदनावर कारवाईच्या पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

०००

महाराणा प्रताप सिंहांचे जीवन म्हणजे स्वाभिमान, त्याग व स्वराज्यासाठीचा झुंजार लढा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

अमळनेर, दि. २९ (जिमाका): महाराणा प्रताप सिंह हे केवळ राजे नव्हते, तर स्वराज्यासाठी लढणारे असामान्य योद्धा होते. त्याग, स्वाभिमान आणि मातृभूमीप्रेम ही त्यांची ओळख असून युवा पिढीने त्यांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

अमळनेर येथे महाराणा प्रताप सिंह जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, जि.म.स. बँकेचे चेअरमन संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी प्रतिमापूजन करून महाराणा प्रतापांना अभिवादन केले.

स्वाभिमानासाठी त्यांनी कधीही तडजोड केली नाही, हे त्यांच्या संघर्षमय जीवनातून स्पष्ट होते, असे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. जिद्द, निष्ठा आणि देशप्रेम या गुणांचे महत्त्व आजच्या तरुणांनी आत्मसात करावे, असे आमदार अनिल पाटील यांनी नमूद केले.

०००

‘एक जिल्हा एक नोंदणी’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सोलापूर, दि. २९ (जिमाका): जिल्ह्यातील नागरिकांना नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वतीने जिल्ह्याच्या कोणत्याही भागातून ‘एक जिल्हा एक नोंदणी’ मोहिमे अंतर्गत उपनिबंधक कार्यालयात नोंदणी करता येणार आहे. याच योजनेच्या अनुषंगाने पुढील काळात शासन संपूर्ण राज्यासाठी ‘एक राज्य एक नोंदणी’ हा उपक्रम सुरू करणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

नियोजन समितीच्या सभागृह येथे आयोजित नोंदणी व मुद्रांक तसेच भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा आढावा बैठकीत मंत्री बावनकुळे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आमदार सर्वश्री समाधान आवताडे, देवेंद्र कोठे, उत्तम जानकर, रणजीत सिंह मोहिते पाटील, राजू खरे, अभिजीत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी महसूल संतोषकुमार देशमुख, सह जिल्हा निबंधक श्री. खोमणे, जिल्हा भूमी अभिलेख अधिक्षक सचिन भंवर, यांच्यासह नोंदणी व मुद्रांक विभागाचे तसेच भूमी अभिलेख विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

एक जिल्हा एक नोंदणी अंतर्गत जिल्ह्याच्या कोणत्याही भागातून नागरिकांना आपल्या प्रॉपर्टीची नोंदणी करता येते. आज रोजी पर्यंत जिल्ह्यातील ६०२ नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला असून जास्तीत जास्त नागरिकांनी  या उपक्रमात सहभागी व्हावे. तसेच मंत्रिमंडळाने 500 रुपयात शेतकऱ्यांचे जमीन वाटपाची नोंदणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचीही जिल्ह्यात योग्य अंमलबजावणी करावी. नोंदणी व मुद्रांक कार्यालयाकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे तसेच प्रत्येक महिन्यातून या कार्यालयाची एक बैठक घेऊन त्यांनी केलेल्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन या अंतर्गत नागरिकांना योग्य सुविधा उपलब्ध होतात का याबाबत खात्री करावी अश्या सूचना मंत्री बावनकुळे यांनी दिल्या.

नोंदणी व मुद्रांक कार्यालयाने शासनाची भूमिका लक्षात घेऊन आपल्या कामात सुधारणा कराव्यात तसेच नागरिकांच्या दस्त नोंदणी प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची गडबड होणार नाही याची काळजी घ्यावी. सर्वसामान्यांची अडवणूक होणार नाही या अनुषंगाने उपाययोजना कराव्यात असेही निर्देश मंत्री बावनकुळे यांनी दिले.

प्रारंभी सह जिल्हा निबंधक खोमणे यांनी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वतीने जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती दिली.

स्वामीत्व योजना टप्पा -२ अंतर्गत गावठाणाबाहेरील घरांची मोजणी करण्यात येणार – मंत्री बावनकुळे

केंद्र सरकारच्या स्वामीत्व योजना टप्पा एक अंतर्गत ड्रोनद्वारे गावातील घराची मोजणी करण्यात येत आहे यातील बहुतांश काम पूर्ण झालेले असून प्रत्येक गावात गावठाणा बाहेर असलेल्या घरांची मोजणी करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने स्वामीत्व योजना टप्पा क्रमांक दोन सुरू करण्यात येणार आहे. तरी या अनुषंगाने भूमी अभिलेख विभागाने गावठाणाबाहेरील घरांची मोजणी करण्याच्या अनुषंगाने माहिती तयार ठेवावी, असे निर्देश मंत्री बावनकुळे यांनी दिले.

केंद्र सरकारच्या नक्शा उपक्रमांतर्गत राज्यातील दहा शहरांचा समावेश असून त्यापैकी पंढरपूर हे एक शहर आहे. भूमी अभिलेख विभागाने पंढरपूर नगरपालिकेच्या हद्दीतील सर्व घरांची ड्रोनद्वारे मोजणी करून प्रॉपर्टी कार्ड तयार करून ठेवावे. पंढरपूर येथील काम हे एक पायलट प्रोजेक्ट म्हणून करावे व हाच उपक्रम पुढे राज्यासाठी लागू करण्यात येईल, असेही मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. भूमी अभिलेख विभागानेअत्यंत पारदर्शकपणे काम करावे सर्वसामान्य नागरिकांच्या या विभागाविषयी खूप तक्रारी आहेत त्या तक्रारी येणार नाहीत या अनुषंगाने कार्यपद्धतीत बदल करावा, असेही त्यांनी निर्देशित केले.

राज्य मंत्रिमंडळाने नुकताच पोट हिस्सा मोजणीसाठी शेतकऱ्याकडून फक्त दोनशे रुपये घेण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने जिल्ह्यात त्याची प्रभावीपणे अंमलबजवणी करावी. सर्व मोजणी प्रकरणे तात्काळ निकाली काढावेत. आपल्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी संबंधित आमदार यांच्याशी संपर्क करून त्यांना विभागाच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती दर तीन महिन्याला द्यावी असेही मंत्री बावनकुळे यांनी सुचित केले.

प्रारंभी जिल्हा भूमी अभिलेख अधिक्षक सचिन भंवर यांनी विभागाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती दिली. यामध्ये स्वामीत्व योजना अंतर्गत ड्रोनद्वारे 643 गावाची मोजणी पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले. काही गावांचा विरोध होता परंतु समुपदेशन करून बहुतांश गावांचे ड्रोन फ्लाय पूर्ण झालेले आहे असे सांगून भूमी अभिलेख विभागाच्या वतीने पारदर्शकपणे कारभार करून लोकाभिमुख प्रशासन देण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येतील असे सांगितले.

०००

ताज्या बातम्या

“सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख – डॉ. नीलम गोऱ्हे”

0
पुणे, दि. २ ऑगस्ट २०२५ : महिलांच्या समस्यांवर गेल्या ४० वर्षांपासून काम करणाऱ्या स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या...

पिंपळस ते येवला रस्त्याच्या कामास अधिक गती द्या –मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. २ ऑगस्ट,(जिमाका वृत्तसेवा): पिंपळस ते येवला चौपदरी रस्ता काँक्रीटीकरण कामास अधिक गती देण्यात येऊन काम नियोजित वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना राज्याचे...

आगामी काळात धुळे जिल्ह्याला अधिक गतीने विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न सुरू – पालकमंत्री...

0
धुळे, दि ०२ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्याचा मागील काळातील विकासाचा अनुशेष भरून काढून धुळे जिल्ह्याला अधिक वेगाने विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे...

विश्वविजेती दिव्या देशमुखचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचेकडून अभिनंदन

0
नागपूर, दि. ०२ : जॉर्जिया येथे नुकत्याच पार पडलेल्या फिडे महिला बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत दिव्या देशमुख हीने इतिहास रचला  असून विश्वविजेती ठरली आहे....

प्रदुषण मुक्त व पर्यावरण संतुलित हरित नाशिकसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार – मंत्री पंकजा मुंडे

0
नाशिक, दि. ०२ : नाशिकला स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपुरक  नैसर्गिक सौंदर्ययुक्त वातावरण लाभले आहे.  हे वातावरण अबाधित राखण्यासाठी  सर्वांचे सहकार्य आवश्यक असून प्रदुषण मुक्त...