‘लोकराज्य’ जून २०२५
राजधानीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
नवी दिल्ली, दि. ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आर.विमला यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपवार, श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह उपस्थित त्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळयास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी श्री. जानकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अतुलनीय कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला, सहायक निवासी आयुक्त, डॉ राजेश आडपावार, स्मिता शेलार यांच्यासह उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळयास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
000
विभागीय आयुक्तालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
अमरावती, दि. 31 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी अपर आयुक्त रामदास सिध्दभट्टी, अजय लहाने, उपायुक्त संतोष कवडे, राजीव फडके, सहायक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार प्रज्ञा काकडे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.
00000
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
मुंबई, दि. ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती दिनानिमित्त मंत्रालयात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी उपसचिव दिलीप देशपांडे, सहाय्यक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, नितीन राणे, विजय शिंदे, यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
00000
विभागीय आयुक्त दिलीप गावडे सेवानिवृत्त
छत्रपती संभाजीनगर : दि.30 (विमाका) :- मराठवाडयात विभागीय आयुक्त म्हणून काम करताना एक दिवस गावकऱ्यांसोबत, सस्ती अदालत, संवाद मराठवाडयाशी असे उपक्रम राबवून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. शासकीय सेवेत विविध पदावरून सर्वसामान्यांसाठी काम केल्याचा आनंद मिळाला अशी भावना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी व्यक्त केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून विविध उपक्रम लोकाभिमूख करणारे अधिकारी अशी ओळख असणारे श्री. गावडे आज (31 मे) रोजी नियत वयोमानानूसार सेवा निवृत्त होत आहेत.
विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात आयोजित निरोप समारंभात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, अपर आयुक्त विजयसिंह देशमुख, डॉ. अनंत गव्हाणे, अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, सहआयुक्त (नगर परिषद प्रशासन) देविदास टेकाळे, उप आयुक्त (आस्थापना) सुरेश बेदमुथा, विभागीय आयुक्त श्री. गावडे यांच्या पत्नी मनिषा गावडे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
श्री.गावडे म्हणाले, शासकीय सेवेत उपजिल्हाधिकारी पदावरून सुरूवात केली असून राज्यातील विविध विभागात 35 वर्ष सेवा केली आहे. सर्वसामान्य माणसासाठी काम करताना समर्मित भावनेने काम केले आहे. पुणे, सांगली, सातारा, अहिल्यानगर तसेच विदर्भातही काम करण्याची संधी मिळाली. सेवानिवृत्त् होताना मराठवाडयात सेवा करण्याची संधी मिळाली, व या सेवेत कामाचा मोठा आनंद मिळाला. विभागातील प्रश्न सोडविण्यासाठी कमी वेळेत ऑनलाईन उपक्रमातून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. सेवेत समवेत काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी तसेच नागरिकांनी सहकार्य केले असल्याचे सांगताना श्री. गावडे यांनी सेवा कालावधीतील प्रसंगानिहाय आपले अनुभव विषद केले.
यावेळी विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विभागनिहाय अधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी अपर आयुक्त सुरेश वेदमुथा यांनाही सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला. श्री वेदमुथा यांनी मराठवाडयात सर्व एकत्रितपणे काम करतात, याचा अनुभव आपल्याला आल्याचे सांगितले. पुणे जिल्हयातील गावडेवाडी सारख्या छोटे गाव ते विभागीय आयुक्त असा आयुक्तांचा प्रवास आमच्यसाठी प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक अपर आयुक्त श्री परदेशी यांनी केले, त्यांनी श्री गावडे यांच्या सेवाकालावधी व त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.
यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
******
नुकसानीचे पंचनामे तात्काळ पुर्ण करा; भरपाई आराखडे त्वरीत सादर करा – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा, दि.30: सातारा जिल्ह्यात 20 ते 28 मे या दरम्यान एकूण सरासरी 294 मिमी पर्ज्यनमान झाले, मे महिन्यातील पावसाची ही टक्केवारी सर्वसाधारण 880 टक्यांपेक्षा जास्त आहे. माण, खटाव, फलटण या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन घरे, रस्ते, पूल, पिके यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करुन भरपाईसाठीचे आराखडे त्वरीत सादर करावेत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, उपवनसंरक्षक आदीती भारद्वाज, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जयंत शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल अहिरे यांच्यासह पाटण, कराडचे उपविभागीय अधिकारी, विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
माहे मे मध्ये जिल्ह्यातील 50 महसूल मंडळांमध्ये 65 मिमीपेक्षा जास्त पर्ज्यन्यमान झाले आहे असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यानुसार या पावसाने 282 बाधित गावांमधील माण तालुक्यातील 27, फलटण तालुक्यातील 10 आणि महाबळेश्वर तालुक्यातील 1 अशा 38 घरांची पूर्णत: पडझड झाली आहे. तर जिल्ह्यातील 1826 घरांची अंशत: पडझड झाली असून 16 गोठे बाधित झाले आहेत. शेतपीकांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले असून 6 हजार 190 शेतकऱ्यांचे 1 हजार 860 हेक्टर बागायती पिकांखालील क्षेत्र तर 17 शेतकऱ्यांचे 8 हेक्टरहून अधिक फळपिकांखालील क्षेत्र बाधित झाले आहे. या कालावधीत माण येथील 1 व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून जावून मयत झाला आहे तर खटाव मधील एक व्यक्ती विद्युत शॉक लागून मयत झाला आहे. 18 लहान, 22 दुधाळ, ओढकाम करणारी 3 जनावरे मयत झाली आहेत. तर 150 कोंबड्याही मयत झाल्या आहेत. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्यापही सुरु असून यंत्रणांनी युध्दपातळीवर काम करुन पंचनामे त्वरीत पूर्ण करावेत. भरपाईसाठीचे प्रस्ताव सादर करावेत.
गावापासून वाडीवस्तीला जोडणारे रस्ते, पूल यांचे नुकसान झाले असून त्यांच्या दुरुस्तीचेही प्रस्ताव संबंधित यंत्रणांनी तात्काळ सादर करावेत, असे निर्देश देवून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे त्यांनाही शासन नियमानुसार भरपाई देण्यात यईल, जिथे जमीन खरवडून निघाली आहे त्या जमीनींसाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करावेत. आपत्तीच्या काळात दरडी कोसळून घाट रस्ते बंद होऊ नयेत यासाठी जेसीबी, पोकलॅन सारखी यंत्रणा तयार ठेवावी, असेही निर्देश श्री. देसाई यांनी दिले.
20 मे ते 28 मे या कालावधीत झालेल्या पावसाची आकडेवारी तालुका निहाय पुढीलप्रमाणे, सातारा 305 मि.मी., जावळी- 340.4 मि.मी., पाटण-286.9 मि.मी., कराड 246.9 मि.मी., कोरेगाव -338.4 मि.मी., खटाव-292.9 मि.मी., माण-270.8 मि.मी., फलटण-367.3 मि.मी., खंडाळा 257.1 मि.मी., वाई 279.6 मि.मी., महाबळेश्वर-297.6 मि.मी. एकूण जिल्ह्यात 294.1 मि.मी. सरासरी पाऊस या कालावधीत झाला आहे.
000