मंगळवार, जुलै 1, 2025
Home Blog Page 1342

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश 

आक्षेपार्ह मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे मुख्य सचिवांना निर्देश

मुंबई, दि. ३१ – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत, याबद्दल अनेक राजकीय संघटना, सामाजिक संस्थांनी शासनाकडे आक्षेप नोंदवले. या आक्षेपांची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेबसाईटवरील मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

महापुरुषांच्या बाबतीत लिखाण करताना ते अत्यंत अभ्यासपूर्ण असायला हवे, तसेच त्यामधून त्यांचा अवमान होणार नाही याची दक्षता लेखक किंवा प्रकाशन संस्थांनी घेणे गरजेचे आहे. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची शासन गय करणार नाही, असा इशारा देतानाच  ‘इंडिक टेल्स’ वरील लेखात आक्षेपार्ह बाबी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

०००

प्रत्येक शहरात वंडर्स पार्क, सेंट्रल पार्कसारखी उद्याने निर्माण होणे आवश्यक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. 30 (जिमाका) –  फक्त मोठमोठ्या इमारती उभारणे म्हणजे विकास नव्हे, तर त्याबरोबरच उद्याने, ग्रंथालये उभारणेही आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक शहरामध्ये वंडर्स पार्क, सेंट्रल पार्कसारखी उद्याने निर्माण होणे आवश्यक आहे. या सुविधांचा लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यत सर्वांना आनंद घेता येईल व त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आपल्याला पाहता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

नवी मुंबर्ई महानगरपालिकेच्या वंडर्स पार्कचे नूतनीकरणानंतर लोकार्पण, कोपरखैरणे व ऐरोली येथील टर्शरी ट्रीटमेंट प्लांट, वाशीतील महात्मा फुले बहुद्देशीय इमारतीचे लोकार्पण तसेच सानपाडा येथील मध्यवर्ती ग्रंथालयाचे भूमिपूजन दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

वंडर्स पार्क येथील अँम्पी थिएटरमध्ये झालेल्या कार्यक्रमास पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री व आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, माजी महापौर जयवंत सुतार, स्थानिक माजी नगरसेवक रवींद्र इथापे आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी वंडर्स पार्कमधील नवीन खेळण्यांची पाहणी केली. विकास कामे केलेल्या अभियंता व इतर संबंधितांचा यावेळी गौरव करण्यात आला. महापालिका आयुक्त श्री. नार्वेकर व शहर अभियंता संजय देसाई यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पार्कमधील लेझर शो चे उद्घाटन करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. मुंबई व महामुंबई क्षेत्रातील ठाणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळे विणले जात आहे. यामुळे या भागातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होऊन नागरिकांचा वेळ व पैसा वाचेल आणि प्रदूषण कमी होईल. समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. देशातील सर्वात मोठा समुद्रातील महामार्ग असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडमुळे मुंबई ते नवी मुंबई, रायगड हा परिसर जवळ येणार आहे.

राज्य शासन लोकांसाठी काम करत असून सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. राज्यात एकाच वेळी ७०० ‘आपला दवाखाना’ सुरु करण्यात आले आहेत. आजच शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्यासाठी नमो सन्मान योजना व एक रुपयात विमा देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, नवी मुंबईत अनेक विकास प्रकल्प सुरू असून नागरिकांना अनेक सुविधा उपलब्ध होत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकाही चांगले काम करत आहे. नवी मुंबईच्या विकासासाठी राज्य शासन कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही देत आहे. येथील प्रलंबित प्रश्नांसाठी मंत्रालयात बैठक घेऊ, असेही मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले.

आमदार व माजी मंत्री श्री. नाईक म्हणाले की, सिडको व औद्योगिक विकास महामंडळाला जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी या व इतर मागण्यासाठी मंत्रालयात बैठक घेण्यात यावी.

आमदार श्रीमती म्हात्रे म्हणाल्या की, नवी मुंबईतील सर्व अधिकाऱ्यांनी मनापासून कामे केल्यामुळे येथील विकास कामे झाली आहेत. नवी मुंबईत स्वतःचे सुपरस्पेशालिटी रुग्णालयासाठी राज्य शासनाने मदत करावी. तसेच प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरीचा निर्णय घेण्यात यावा.

आयुक्त श्री. नार्वेकर यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रस्ताविक केले.

 

नूतनीकृत वंडर्स पार्कची वैशिष्ट्ये

  • प्रवेश तिकिटे व राईडची तिकिटे स्मार्ट कार्ड पद्धतीने देणार
  • पाच खेळण्यांच्या जागी 7 खेळण्यांचा समावेश
  • सीसीटीव्हीची सुविधा
  • एलईडी लाईटची व्यवस्था
  • खुल्या तळ्यातील मल्टिमीडिया लेझर शो प्रमुख आकर्षण

 

टर्शिअरी ट्रिटमेंट प्लांट

  • अमृत मिशन प्रकल्पाअंतर्गत टर्शिअरी ट्रिटमेंट प्लांटची उभारणी
  • ऐरोली व कोपरखैरणे येथील मलप्रक्रिया केंद्रात प्रत्येकी 20 दललि क्षमतेचे प्लांट
  • केंद्र, राज्य व महापालिका यांच्यामार्फत एकत्रितपणे हा प्रकल्प राबविण्यात येत आहे
  • या प्रकल्पामध्ये अल्ट्राफिल्ट्रेशन व अल्ट्रा व्हायोलेट या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर
  • पुनर्प्रक्रिया केलेले पाणी औद्योगिक संस्थाना देण्यात येणार
  • औद्योगिक संस्थांना देण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्यामध्ये बचत

वाशी बहुद्देशीय इमारत

  • गरीब व गरजू लोकांसाठी वाशी सेक्टर 3 मध्ये बहुद्देशीय मंगल कार्यालयाची उभारणी
  • यामध्ये पार्किंग व्यवस्था, स्टोअर रुम, किचन रुम, तीन वातानुकुलित सभागृहे
  • स्पोर्ट क्लब, नगरवाचनालय, मुक्ती संघटना रुम, एनएममंडळ रुमची व्यवस्था

मध्यवर्ती ग्रंथालय

  • वाचन संस्कृती वाढविण्यासाठी मध्यवर्ती ग्रंथालयाची निर्मिती
  • तळमजला अधिक चार मजल्यांची पर्यावरण पूरक हरित इमारत
  • पुस्तकांचा प्रवास दर्शविणारे लक्षवेधी प्रदर्शन
  • ग्रंथविषयक उपक्रमांसाठी 130 आसन क्षमतेचे सभागृह
  • दृष्टिहीन वाचकांसाठी ब्रेल विभाग
  • भाषा प्रयोगशाळा
  • व्ह्युईंग गॅलरीची आकर्षक रचना
  • मराठी, हिंदी, इंग्रजीसह विविध भाषांतील साहित्यकृती उपलब्ध होतील.

खासदार सुरेश धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक; चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 30 : चंद्रपूर, आर्णी व वणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त दु:खद व धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे,अशी शोकसंवेदना राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

‘खासदार धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. लोकहितासाठी आक्रमक भूमिका घेणारे, अशी खासदार धानोरकर यांची ओळख होती. दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तीनच दिवसांपूर्वी म्हणजे २७ मे रोजी खासदार धानोरकर यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली. त्यानंतर आज धानोरकर यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या परिवारावर जो दु:खाचा डोंगर कोसळला आहे, त्यातून त्यांना सावरण्याची प्रार्थना करतो’, अशा शब्दात मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी धानोरकर यांच्याप्रति श्रद्धांजली व्यक्त केली.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

लोकसेवा हक्क आयोगाच्या सेवा जनसामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक- आयुक्त दिलीप शिंदे

पुणे, दि. 30 :- राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सेवा राज्यातील सामान्य माणसापर्यंत तत्परतेने, सहज व सुलभपणे पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य हक्क अधिनियम 2015 अंमलात आहे. या कायद्यातील  तरतूदींचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून त्यासाठी विविध माध्यमांतून लोकजागृती करावी, असे आवाहन राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यांनी केले.

राज्य हक्क अधिनियम 2015 मधील तरतूदी, कार्यपद्धती व अधिसूचित सेवा ऑनलाईन पद्धतीने घेण्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत आयुक्त श्री. शिंदे बोलत होते. यावेळी  आयोगाच्या उप सचिव अनुराधा खानविलकर, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, पुणे मनपाचे उप आयुक्त सचिन इथापे, श्यामला देसाई, विक्रम महिते आदी उपस्थित होते.

या अधिनियमांतर्गत 511 सेवा अधिसूचित करण्यात आल्या असून त्यापैकी 387 सेवा ऑनलाईन पद्धतीने दिल्या जात असल्याचे सांगून श्री. शिंदे म्हणाले अधिनियमामध्ये पदनिर्देशित अधिकाऱ्याने पात्र व्यक्तींना कालबद्ध लोकसेवा देणे बंधनकारक असून सेवा देण्यासाठी निश्चित कालमर्यादा आहे. कालमर्यादेत माहिती देण्यास कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना 5 हजार रुपयांपर्यंत दंड लावण्याची तसेच शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. शिंदे म्हणाले, आयोग स्थापन झाल्यापासून 13 कोटी 62 लाख इतके अर्ज प्राप्त झाले असून 12 कोटी 94 लाख अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. तर पुणे विभागात एप्रिल 2023 पासून 7 लाख 27 हजार 471 अर्ज प्राप्त झाले असून 6 लाख 28 हजार 650 असे एकूण 86 टक्के अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.  आयोगांतर्गत देण्यात येणाऱ्या सेवांचा लाभ आपले सरकार पोर्टलद्वारेही घेता येतो. सध्या पुणे शहरामध्ये 586 आपले सरकार सेवा केंद्रचालक असल्याचे सांगितले.

या कायद्यान्व्ये जिल्हाधिकारी यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. लोकसेवा हक्क अधिनियमाची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आठवडी बाजार, भित्तीपत्रके, शिबीरे, जाहिरात आदींच्या माध्यमातून प्रसिद्धी व लोकजागृती होणे आवश्यक आहे, असे श्री. शिंदे म्हणाले. पुणे जिल्ह्याने सेवा देण्यामध्ये चांगले काम केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी आयोगाची संरचना, अधिनियमाची उद्दिष्ट्ये, महत्त्वाच्या तरतूदी, आयोगाचे अधिकार, जिल्हाधिकारी यांची जबाबदारी,आपले सरकार पोर्टलमार्फत ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध असलेल्या सेवा, दैनंदिन वापरासाठी देण्यात येणाऱ्या पदनिर्देशित अधिकारी, नाविन्यपूर्ण उपक्रम याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

बैठकीला आयोगाचे अधिकारी- कर्मचारी, नागरिक, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

****

‘सारथी’मार्फत प्रशिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ उपसमितीकडून अभिनंदन

मुंबई, दि. 30 : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी)कडून प्रशिक्षण घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीकडून अभिनंदन करण्यात आले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात झाली.

यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार नरेंद्र पाटील,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, सारथी संस्थेच्या १०३ गुणवंत विद्यार्थ्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून निवड झाली.आणि  सारथी संस्थेच्या एकूण ३९ विद्यार्थ्यांपैकी १७ विद्यार्थ्यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम यादीत निवड झाली आहे. ही अभिमानाची बाब आहे. या विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सत्कार समारंभ आयोजित करावा, अशा सूचना मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे  प्रलंबित असणारी प्रकरणे  व्याज परतावा प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. आवश्यक निधीची तरतूद करावी, असे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी दिले.

मा. सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका संदर्भातील प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.असेही या बैठकीत सांगितले. तसेच मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता येण्यासाठी यावर अभ्यास करून अहवाल देण्यासाठी अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

00000

काशीबाई थोरात/विसंअ/

शेती महामंडळाच्या जागांचा जनहितार्थ वापर करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील विनावापर जमिनी विविध सार्वजनिक प्रयोजनासाठी हस्तांतरित करुन त्याठिकाणी भविष्यात जनहितार्थ प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक असलेला जागा हस्तांतरण करण्याचा ठराव आज मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील सुमारे ४७ हेक्टर क्षेत्र असलेल्या जमिनी शिर्डी, साकुरी, निमगाव, कोऱ्हाळे, शिरसगाव या गावात उपलब्ध असून तसेच त्या विनावापर आहेत. शिर्डी आणि आसपासच्या परिसरात असलेल्या शेती महामंडळाच्या जागांचा जनहितार्थ वापर व्हावा या स्थानिकांच्या मागणीचा आणि भविष्यातील नियोजनाचा धोरणात्मक विचार करून मंत्री विखे पाटील यांनी सदर प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर केला होता.या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महसूल मंत्री श्री. विखे- पाटील यांनी आभार मानले आहेत.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे धार्मिकस्थळ व सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या शिर्डी व परिसरात भविष्यकालीन दृष्टीने उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करण्यावर  महसूल मंत्री श्री. विखे पाटील यांचा भर असणार आहे. शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल आणि इतर भाविकांच्या सोयी सुविधांसह अम्युझमेंट पार्क/लेझर तथा फाऊंटन शो/गार्डनची उभारणी करणे, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी वापर करणे, बाजर समिती, ग्रामपंचायत साकुरी, नगरपरिषद राहाता, ग्रामपंचायत निमगाव कोऱ्हाळे, ग्रामपंचायत बेलापूर वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी, मध्यवर्ती प्रशासकीय संकुल तसेच विविध शासकीय कार्यालय, अधिकारी/कर्मचारी यांच्या निवासस्थानासाठी सदर जागेचा सुयोग्य व सुनियोजित वापर करण्याचा सादर केलेल्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिल्याचे मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

०००००

वर्षा फडके- आंधळे

‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत एका दिवसात १ लाख ८१ हजार नागरिकांना विविध सेवा व योजनांचा लाभ

पुणे, दि. 30: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एकाचवेळी ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत शिबिरांचे  आयोजन करण्यात आले. या अभियानाअंतर्गत एका दिवसात 1 लाख 81 हजार 376 नागरिकांना शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ देण्यात आला. जिल्ह्याला दिलेल्या उद्दीष्टापेक्षा दुप्पट  नागरिकांना अभियानांतर्गत लाभ देण्यात आल्याने अनेकांना समाधानाचे क्षण अनुभवता आले.

अभियानांतर्गत जिल्ह्याला 75 हजार नागरिकांना विविध सेवा व योजनांचा लाभ देण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी हे अभियान यशस्वीपणे राबविण्याच्यादृष्टीने महसूल तसेच विविध शासकीय यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. जिल्ह्याला मिळालेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिक नागरिकांना शासनाच्या विविध योजना व सेवेचा लाभ देण्याचा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. त्यादृष्टीने यंत्रणांनी विविध योजनांचा लाभ देण्यासाठी नागरिकांनाकडून अर्जही भरुन घेतले.

आज तालुकास्तरावरील शिबिराच्या माध्यमातून  नागरिकांना शासकीय योजना व सेवेचा लाभ देण्यात आला. या  सकाळी 11 वाजता शिबिरांना लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली. काही ठिकाणी सभागृह तर काही ठिकाणी मंडप उभारून विविध यंत्रणांचा कक्ष स्थापन करण्यात आला होता. जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आशेने आलेले नागरिक समाधानी होऊन परततांना दिसले. एकूण 1 लाख 81 हजार 376 नागरिकांना विविध सेवा व योजनांचा लाभ देण्यात आला.

 पुणे शहरात 10 हजार 929, हवेली 27 हजार 419, मुळशी 3 हजार 950, भोर 28 हजार 442, मावळ 3 हजार 68, वेल्हे 8 हजार 390, जुन्नर 3 हजार 523, खेड 10 हजार 837, आंबेगाव 24 हजार 203 शिरुर 33 हजार 223, बारामती 21 हजार 431, पुरंदर 5 हजार 517 आणि अपर तहसील कार्यालय पिंपरी चिंचवड येथे 442 लाभार्थ्यांना शिबिराचा लाभ झाला.

शिबिरात महसूल, कृषि, आरोग्य, जलसंपदा,  पशुसंवर्धन, पोस्ट, पंचायत समिती, निवडणूक शाखा, भूमी अभिलेख, सामाजिक वनीकरण, वन विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, एकात्मिक बालविकास विभाग, दुय्यम निबंधक सहकारी संस्था कार्यालय आदी विविध विभागांनी सहभाग घेतला. नागरिकांना शिधापत्रिका, दिव्यांग प्रमाणपत्र,  विविध दाखले, मतदार नोंदणी, नवीन वीज जोडणी, आधारकार्ड अद्ययावत करणे या सेवांसह संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री सन्मान निधी योजना, मनरेगा, दिव्यांगांना आधार कार्ड,  निर्वाह भत्ता, आदी शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला.  यावेळी  नागरिकांना शासकीय योजनांची माहितीदेखील देण्यात आली.

सूक्ष्म नियोजनावर भर

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी शिबिराचे सूक्ष्म नियोजन केले होते. तालुक्यातील विविध शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून त्यांच्याकडील योजना, सेवा व लाभार्थ्यांची माहिती संकलीत करण्यात आली. तालुकास्तरावरील बैठकांमध्ये नियोजनाला अंतिम रूप देण्यात आले. उद्दीष्टापेक्षा अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी सर्व यंत्रणांनी गेला आठवडाभर परिश्रम घेतले.

जागेवरच सेवा मिळाल्याचा आनंद

‘शासन आपल्या दारी’ अभियांनाअंतर्गत भोर तालुक्यातील देगावच्या नाईलकर कुटुंबांना प्रथमच महादेव कोळी जातीचा दाखल्याचे वाटप करण्यात आले. याबद्दल नाईलकर कुटुंबानी समाधान व्यक्त करत शासनाचे आभार मानले. हितेश खुटवळ यांच्या बाळाचे आधार कार्ड तात्काळ तयार झाल्याने त्यांना वेळ वाचल्याचे समाधान होतो. अशा अनेक समाधानाच्या प्रतिक्रीया शिबिरात ऐकायला मिळाल्या.  ‘शासन आपल्या दारी उपक्रमात सर्व योजना एकाच छताखाली मिळत हायती..’ ही मांगदरीच्या लक्ष्मण मांगडे प्रतिक्रीया आणि पत्नीला दिव्यांगाचे कार्ड तात्काळ मिळाल्याने ‘शासनाचा उपक्रम लय भारी’ ही संपत मोहिते यांची प्रतिक्रीया शिबिराचे यश सांगणारी आहे.

डॉ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी- शिबिराच्या माध्यमातून अधिक संख्येने  नागरिकांना  लाभ देण्याच्या आनंदाएवढेच ज्यांना लाभ मिळाला त्या सामान्य  ग्रामीण भागातील नागरिकांचे कष्ट वाचले याचे समाधान जास्त आहे. सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी प्रयत्नपूर्वक चांगले नियोजन केले. यापुढेही असेच मोहिम स्तरावर सामान्य नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न असतील.

****

महामानवांच्या संयुक्त जयंतीचा उपक्रम कौतुकास्पद – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 30 : छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवांनी महाराष्ट्र घडविला. त्यांनी महाराष्ट्रासह देशाला दिशा दिली. अशा महामानवांच्या जयंतीचा संयुक्त उपक्रम कौतुकास्पद आहे, असे उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

अनु. जाती/जमाती/विजा – भज/ इमाव/विमाप्र शासकीय/ निमशासकीय अधिकारी/कर्मचारी संघटनेतर्फे छ्त्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती सोहळा आज दुपारी मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार भरत गोगावले, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे, उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत ढोके, सविता शिंदे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा,  आमदार भरत गोगावले, आमदार संतोष बांगर, माजी आमदार शिरीष चौधरी आदींनी या सोहळ्यास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. अशाच प्रकारचा हा उपक्रम आहे. संघटनेच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, अनु. जाती/जमाती/विजा – भज/ इमाव/विमाप्र शासकीय/ निमशासकीय अधिकारी/कर्मचारी संघटनेतर्फे दरवर्षी प्रबोधनपर उपक्रम राबविले जातात. या संघटनेचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. यावेळी व्याख्याते रवींद्र शिवाजी केसकर यांनी ‘माणसाची एकच जात, दोन पाय- दोन हात’ याविषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर संगीतकार जॉली मोरे, शाहीर सीमा पाटील यांनी ‘भारतीय संविधानाची गौरवगाथा’ या विषयावर प्रबोधनपर गीते सादर केली.

संघटनेतर्फे देण्यात येणारा सन २०२३ चा डॉ. बी. आर. आंबेडकर राज्यस्तरीय उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पाच हजार ५१ रुपये रोख, सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी शासकीय अधिकारी, कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००

गोपाळ साळुंखे/ससं/

मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचा १ आणि २ जूनला ‘जनतेशी सुसंवाद’!

मुंबई दि. 30 : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर ‘शासन आपल्या दारी’, ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून येत्या गुरूवार आणि शुक्रवारी नागरिकांशी संवाद साधणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमात नागरिकांनी शासकीय योजना, आपल्या प्रभागातील विकासकामांबाबत सूचना व इतर समस्यांबाबतच्या निवेदन अथवा अर्जासह उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

केव्हा आणि कुठे होईल संवाद

गुरूवार दि 1 जून रोजी महानगरपालिकेच्या ‘ए आणि बी वॉर्ड’ मध्ये इंडियन रेडक्रॉस सोसायटी हॉल, 141, शहीद भगतसिंह मार्ग, फोर्ट, मुंबई येथे तसेच शुक्रवार दि. 2 जून रोजी ‘जी उत्तर वॉर्ड’ मध्ये कॉन्फरन्स हॉल, जी उत्तर विभाग कार्यालय, मुंबई येथे दुपारी 3 ते 5 या वेळेत तर ‘जी दक्षिण वॉर्ड’ मध्ये कॉन्फरन्स हॉल, जी दक्षिण विभाग कार्यालय, मुंबई येथे सायंकाळी 5 ते 7 वेळेत पालकमंत्री श्री.केसरकर नागरिकांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे ‘जनतेशी सुसंवाद’ या कार्यक्रमास पालकमंत्री यांच्यासोबत संबंधित भागातील लोकप्रतिनिधी, सर्व विभागांचे शासकीय अधिकारी तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

मुंबईत ठिकठिकाणी ‘हिरकणी कक्ष’ सुरू करणार – मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 30 – रेल्वे स्थानक, बस स्थानक, रुग्णालये, पोलिस स्टेशन अशा गर्दीच्या ठिकाणी स्तनदा माता बालकांना स्तनपान करू शकत नाही. हे लक्षात घेऊन मुंबई शहरामध्ये माता आणि बालकांच्या सोयीसाठी अद्ययावत हिरकणी कक्ष सुरू करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

बाळांना दूध पिण्याच्या मूलभूत अधिकारापासून त्यांना वंचित राहावे लागू नये, यासाठी मुंबई शहर जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन समिती मार्फत 17 हिरकणी कक्ष स्थापन करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्या अंतर्गत पहिल्या हिरकणी कक्षाचा शुभारंभ मुंबई सेंट्रल बसस्थानक येथे मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राजीव निवतकर, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, महाव्यवस्थापक (वाहतूक) शिवाजी जगताप, जिल्हा नियोजन अधिकारी श्री.सुपेकर, मुंबई जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्रीमती शोभा शेलार आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी तीन टक्के निधी खर्च करण्यात येतो. त्याअंतर्गत मुंबईतील विविध बस स्थानकांमध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्यात येतील. हे सर्व कक्ष वातानुकुलित केले जातील. या कक्षांमध्ये महिला आणि बालकांना विश्रांती घेता येईल. प्रत्येक जिल्ह्याला अशी सुविधा असावी, यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बस चालक तसेच वाहकांसाठी सुद्धा मागणीनुसार अद्ययावत विश्रांती कक्ष बनविण्यात येथील अथवा त्यांचे नूतनीकरण करण्यात येईल, असेही मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले. कामा हॉस्पिटल येथे मुंबईत येणाऱ्या निराश्रीत महिलांसाठी कक्ष उभारण्यात आला असल्याचे ते म्हणाले. कामगारांसाठी देखील सुविधा निर्माण करण्यात येत असल्याचे सांगून कामगार केंद्र अत्याधुनिक करून तेथे स्विमिंग पूल, रेस्टॉरंट, जीम, नेमबाजी सुविधा, ॲस्ट्राटर्फ तयार केले जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असल्याने येथील सोयी-सुविधा देखील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असाव्यात असा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

ताज्या बातम्या

आर्थिक अडचणीतील जिल्हा बँकांसाठी निधीची गरज

0
नवी दिल्ली, दि. ३०: राज्यातील आर्थिक अडचणीत असणाऱ्या सात जिल्हा बँकांना शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी वर्ष 2004 प्रमाणे किंवा वर्ष 2014 मध्ये केंद्र...

विकिरण केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवण्यासाठी नियोजन करा – पणन मंत्री जयकुमार रावल

0
मुंबई, दि. ३०: निर्यातीला चालना देण्यासाठी वाशी येथील विकिरण सुविधा केंद्रात अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर आणि आवश्यक मनुष्यबळ या माध्यमातून गतीने चालवण्यात यावे. अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय...

सर्वांच्या सहकार्याने विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार – मुख्य सचिव राजेश कुमार

0
मुंबई, दि. ३०: महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून 2047 च्या विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या संकल्पनेच्या दिशेने सर्वांच्या सहकार्याने काम...

नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पदभार स्वीकारला

0
मुंबई, दि. ३०: शासनाने राज्याच्या मुख्य सचिवपदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य...

पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते बोरी येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण

0
यवतमाळ, दि.३० (जिमाका): दारव्हा तालुक्यातील बोरी अरब गावाजवळ अडान नदीच्या पुलावर बांधण्यात आलेला उड्डाणपूल व पोहोच मार्गाच्या कामाचे लोकार्पण पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण...