बुधवार, जुलै 2, 2025
Home Blog Page 131

स्पर्धात्मक युगात ‘एआय’चा वापर गरजेचा

मुंबई, दि. ०३ : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (ए.आय.) टूल्सचा आता प्रत्येक क्षेत्रात वापर होत आहे. एआय टूल्स शिकण्यास अतिशय सोपे असून यापुढे प्रत्येक क्षेत्रात ‘एआय’चा वापर केल्यास आपल्या क्षेत्रात काम करणे सोपे जाईल, असे मत चित्रपट निर्मितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्या निर्मात्यांच्या चर्चासत्रामधे व्यक्त करण्यात आले.

जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित ‘वेव्हज् परिषदे’मध्ये ‘चित्रपट निर्मितीमध्ये एआय घडवित असलेले परिवर्तन’ या विषयावर चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्रात व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष चैतन्य चिंचलीकर, न्यूरल गॅरेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार नाटेकर, चित्रपट निर्माता राघवेंद्र नाईक यांनी सहभाग घेतला.

चर्चासत्रात ‘एआय’चा चित्रपट निर्मितीतील वापराबाबत चर्चा करण्यात आली. ‘एआय’च्या सहाय्याने पटकथा, संवाद लिहिणे अधिक वेगवान बनले आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व्हिज्युअल इफेक्ट्स अधिक वास्तवदर्शी आणि कमी खर्चात तयार करता येतात. ‘एआय’ च्या मदतीने संपादन प्रक्रिया, ऑडिओ आणि व्हिज्युअल डबिंग अतिशय सुलभ झाले असून अधिक भाषांमध्ये डबिंग करणे सुद्धा सहज शक्य झाले असल्याचे सहभागी निर्मात्यांनी सांगितले.

‘एआय’च्या कोणत्या टूलचा वापर करावा, याबाबत श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना चिंचलीकर यांनी अनेक टूल्स उपलब्ध असून ‘ए.आय.’चा वापर करताना सुरुवातीला मोफत उपलब्ध असलेल्या विविध टूल्सचा वापर करावा त्यातून आपल्याला सुलभ असणारी टूल्स विकत घ्यावे, असा सल्ला दिला.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

 

आशय निर्मितीत भारत जागतिक स्तरावर उत्कृष्ट व्यावसायिक भागीदार बनण्यास सज्ज

मुंबई, दि ०३ : जागतिक स्तरावर आशय निर्मितीच्या क्षेत्रात भारत एक उत्कृष्ट व्यावसायिक भागीदार म्हणून सज्ज असल्याचे प्रतिपादन  एव्हीजीसी-एक्सआर मंच, फिक्कीचे माजी अध्यक्ष अशिष कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित वेव्हज्‌ २०२५, दृकश्राव्य मनोरंजन समिट मध्ये ‘लाईट्स, कॅमेरा, एक्सआर: व्हर्च्युअल प्रॉडक्शन इज रिशेपिंग ग्लोबल सिनेमा’ (Lights, camera,xr how virtual production is reshaping global cinema ) या विषयावर आयोजित परिसंवादात कुलकर्णी बोलत होते.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जागतिक सिनेमा कशा पद्धतीने बदलत आहे या विषयावर चित्रपट दिग्दर्शक केतन मेहता, अशिष कुलकर्णी माजी अध्यक्ष, एव्हीजीसी-एक्सआर मंच, फिक्की यांच्यासह लायटस स्टुडिओ आणि ओटीटी अमेरिकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव खेरोर आणि ब्रायन निट्झकिन – सह-संस्थापक, ऑर्बिटल स्टुडिओज या तज्ज्ञांनी आपली मते मांडली. सत्राचे सूत्रसंचालन मीडिया तंत्रज्ञान नवोपक्रमक, लोनाकोचे संस्थापक सायमन इंग्रॅम यांनी केले.

सिनेसृष्टीत तंत्रज्ञानाचा झपाट्याने होणारा वापर सिनेमा निर्मितीच्या प्रत्येक टप्प्याला नवे वळण देत आहे. व्हर्च्युअल प्रॉडक्शन ही केवळ एक संकल्पना राहिली नसून, ती आता सर्जनशीलता, कार्यक्षमता आणि जागतिक सहकार्याचा नवा मार्ग ठरत असल्याचा सूर व्यक्त करत या विशेष सत्रात, जगभरातील तंत्रज्ञान आणि सिनेसृष्टीतील अग्रणी तज्ज्ञ राजीव खेरोर, ब्रायन निट्झकिन, आणि सायमन इंग्रॅम या वक्त्यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. यावेळी हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात कसे कार्य करते आणि ते सिनेमा निर्मितीला कशी दिशा देत आहे  यादृष्टीने व्हर्च्युअल प्रॉडक्शनच्या भविष्याच्या अनुषंगाने वक्त्यांनी आपले म्हणणे मांडले.

कुलकर्णी, म्हणाले की चित्रपट आणि इतर सर्व प्रकारच्या आशय निर्मितीसाठी भारत सर्वार्थाने सुयोग्य ठिकाण आहे. भारतीय हवामानामुळे जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात विविध सिनेमा व संलग्न क्षेत्रात निर्मितीसाठी उत्कृष्ट संधी आहे. भविष्यात येत्या पाच दहा वर्षांत भारत व्हर्चुअल निर्मितीमधील एक महासत्ता बनेल. केंद्र सरकार यासाठी पाठिंबा देत आवश्यक सहकार्य करत आहेत, त्यामुळे गेल्या दहा वर्षांत भारतात निर्मिती प्रकल्पाच्या प्रमाणात वाढ होत आहे.

चित्रपट दिग्दर्शक केतन मेहता म्हणाले की, गोष्ट, कथा सांगण्याची समृद्ध परंपरा भारतात आहे. सकस आशय हा भारतीय सिनेमाचे वैशिष्ट्य राहिले आहे. त्यामुळे बदल्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या सृजनशीलतेला मोठे अवकाश प्राप्त होईल. त्याचा लाभ भारतीय कलाकार, तंत्रज्ञ यांनी अवश्य घेतला पाहिजे. हा आपल्या क्षमता सिद्ध करून त्या जागतिक पातळीवर पोहचवण्याचा काळ आहे. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची उपयुक्तता सर्वाधिक प्रभावी ठरत आहे.

सृजनशीलता, वास्तव आणि कल्पना शक्ती यामध्ये खूप सूक्ष्म फरक आहे. त्या खूप सुंदर पद्धतीने एकत्रितपणे आशय निर्मितीसाठी सक्रिय आहेत. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान निश्चितच मोठा प्रभाव टाकत असल्याचे मत मेहता यांनी व्यक्त केले.

०००

वंदना थोरात/विसंअ/

 

लघुपट हे सामजिक भावना, विचार मांडण्याचे प्रभावी माध्यम- दिग्दर्शक व्याचेस्लाव गुज

मुंबई, दि. ०३ : लघुपट हे मनोरंजनाचे माध्यम नाही तर सामाजिक आणि व्यक्तिगत जीवनातील भावना आणि विचार प्रभावी मांडण्याचे प्रभावी माध्यम आहे,असे मत प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक व्याचेस्लाव गुज यांनी व्यक्त केले.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत ‘कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज’ या चर्चासत्रात ते बोलत होते.

दिग्दर्शक गुज़ म्हणाले की, सामजिक जीवनात आपल्याला येणाऱ्या वेगवेगळ्या अनुभवातून प्रत्येकाच्या मनात एक लघुपट (शॉर्ट फिल्म) तयार असतो, फक्त त्याला मूर्त स्वरूप देण्याची गरज असते. डिजिटल माध्यमामुळे आता ही प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.आजच्या तरुण कलावंतांमध्ये लघुपट निर्मितीकडे अधिक कल वाढला आहे. लघुपटाचे यश विषयापेक्षा त्यामागील भावना आणि आशय प्रेक्षकांपर्यंत नेमकेपणाने पोहोचविण्यात असते असे त्यांनी सांगितले. यावेळी विविध विषयांवर लघुपट दाखविण्यात आले.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/

 

कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून प्रत्येक समाजघटकाला मंच –  माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन

मुंबई, दि. ०३ : समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी कम्युनिटी रेडिओ हे अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे. या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला व्यासपीठ देण्याचे काम देशातील कम्युनिटी रेडिओने करावे, असे आवाहन माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी केले.

मुंबईत सुरू असलेल्या ‘वेव्हज्‌ २०२५’ या जागतिक परिषदेच्या निमित्ताने आठव्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरुगन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, सहसचिव पृथुल कुमार, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनच्या कुलगुरु डॉ. अनुपमा भटनागर आदी उपस्थित होते. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कम्युनिटी रेडिओ यांना इनोव्हेटिव्ह कम्युनिकेशन, प्रमोटिंग लोकल कल्चर, सस्टेनेबिलिटी मॉडेल अवॉर्ड्स यासारखे विविध पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय राज्यमंत्री मुरुगन म्हणाले की, कम्युनिटी रेडिओच्या कार्यक्रमांमध्ये स्थानिक समाजाच्या भावना, तेथील संस्कृती, कला, साहित्य, खानपान यांचे प्रतिबिंब पाहायला मिळते. वेव्हज्‌च्या पार्श्वभूमीवर हे संमेलन होत असल्याने त्याला एक वेगळा आयाम प्राप्त झाला आहे. कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून माहिती व मनोरंजनाबरोबरच महिला सक्षमीकरण, संस्कृतीवर्धन, ग्रामीण विकासासाठी काम होत आहे याचे समाधान वाटते. यापुढील काळात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून जास्तीत जास्त समुदायापर्यंत पोहोचण्यासाठी कम्युनिटी रेडिओ यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

उद्घाटनाच्या मुख्य सोहळ्यानंतर कम्युनिटी रेडिओशी संबंधित विविध विषयांवर दिवसभर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रांमध्ये कम्युनिटी रेडिओच्या आर्थिकदृष्ट्या विकासाबरोबरच त्यांच्या सक्षमीकरणाबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चासत्रामध्ये देशातील विविध विद्यापीठातील विषयतज्ज्ञांनी तसेच विविध कम्युनिटी रेडिओच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

०००

संतोष तोडकर/विसंअ/

 

सातारा सैनिकी शाळेची अभिमान वाटावा अशी कारकीर्द – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

जास्तीत जास्त तरुण एनडीएमध्ये जाण्यासाठी सैनिकी शाळांनी प्रयत्न करावेत

सातारा दि.3: राज्यातील सैनिकी शाळांचे जास्तीत जास्त तरुण एनडीएमध्ये जाण्यासाठी सैनिकी शाळांनी चौकटीच्या बाहेर जाऊन, यातील आव्हानामधील सकारात्मक दृष्टीकोन स्वीकारुन प्रयत्न करावेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून या शाळांना येणाऱ्या आर्थिक समस्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर निश्चीत प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

सातारा येथील सैनिकी शाळेस शालेय शिक्षण मंत्री दादाजी भूसे यांनी भेट दिली. भेट दिल्यानंतर राज्यातील 38 सैनिकी शाळांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस यवतमाळचे खासदार संजय देशमुख, शिक्षण आयुक्त् सचिंद्र प्रतापसिंह, महाराष्ट्र राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार, कोल्हापूरचे शिक्षण उपसंचालक महेश चौथे, सातारा सैनिक शाळेचे प्राचार्य के. श्रीनिवासन यांच्यासह राज्यातील 38 सैनिकी शाळेचे प्राचार्य, पदाधिकारी, प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

राज्यामध्ये सातारा व चंद्रपूर येथे शासकीय सैनिकी शाळा तर राज्यामध्ये 38 सैनिकी शाळेमध्ये 12 हजार 224 विद्यार्थी असल्याचे सांगून शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले, सैनिकी शाळांमधून प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये देशसेवा, देशभक्ती रुजविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. या शाळा इतर शाळांपेक्षा वेगळ्या असून याच्यामागे देशप्रेम, राष्ट्रीयत्वाची भावना जोडली आहे. सैनिका शाळा देशाची प्रतिमा उंचावण्याचे काम करतात. हे काम करताना त्यांना अनेक आव्हानांचा तसेच आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. पीपीई मॉडेल, अभ्यासक्रम, धोरणांची अंमलबाजवणी, 38 सैनिकी शाळांसाठी स्वतंत्र बोर्डाची मागणी, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष फिल्डवरील अनुभव मिळण्यासाठीचे नियोजन असावे, कमाडंट नियुक्तीचे धोरण, स्टाफींग पॅटर्न, एनसीसी, संस्थांचे सबळीकरण यासारख्या शाळांच्या अडचणी सोडविण्यासाठी बैठका घेऊन शाळांचे प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. मराठी मंडळाच्या माध्यमातून सीबीएसी पॅटर्नच्या चांगल्या गोष्टींचा विद्यार्थ्यांना उपयोग होईल. मराठी हे आपले दैवत आहे. इतर माध्यमांच्या शाळेत मराठी बंधनकारक आहे. यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राष्ट्रगीता नंतर राज्यगीत गायले पाहिजे याचीही प्रभावी अंमलबजावणी
करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सातारा सैनिक स्कूलची अभिमान वाटावा अशी कारकीर्द कायम

सातारा येथील सैनिक शाळेची अभिमान वाटावा अशी कारकीर्द कायम राहीली आहे, असे सांगून सातारा सैनिकी शाळेचे अभिनंदन केले. येथील शाळेच्या कामगिरीप्रमाणे काम करण्यासाठी इतर शाळांना याचा उपयोग व्हावा यासाठी सातारा येथे राज्यातील सैनिकी शाळांची बैठक घेतल्याचे शालेय शिक्षणमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईत मेगा ब्लॉक नाही

मुंबई, दि. ०३: राष्ट्रीय परीक्षा एजन्सी, नवी दिल्ली यांच्यामार्फत रविवार, ४ मे २०२५ रोजी National Eligibility cum Entrance Test (UG) – 2025 ही परीक्षा आयोजित केली आहे. यासाठी मोठ्या संख्येने परीक्षार्थी मुंबईच्या बाहेरील आहेत आणि त्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रावर विनाअडथळा पोहचण्यासाठी जिल्हा प्रशासन, मुंबई शहर यांनी रेल्वे प्रशासनास रविवार ४ रोजी कोणताही मेगा ब्लॉक ठेऊ नये असे कळविले होते. त्यानुषंगाने, रेल्वे प्रशासनाने ४ रोजी सेंट्रल, हार्बर व वेस्टर्न रेल्वे या तीन मार्गांवर कोणताही मेगा ब्लॉक नसल्याचे कळविलेले असून सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.

नीट परीक्षेकरिता बसलेल्या विद्यार्थ्यांनी https://cr.indianrailways.gov.in/  या लिंकवरून रेल्वेचे वेळापत्रक पाहावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी मुंबई शहर यांनी कळविले आहे.

०००

‘जगभरातील रसिकांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा’ यावर विशेष चर्चासत्र

  • वेव्हज – 2025 मध्ये कथाकथनाच्या भविष्याबाबत जागतिक संवादाला चालना
  • प्रसारण, चित्रपट आणि साहित्य यांचा मिलाफ

मुंबई, दि. ०३ : पहिल्यांदाच आयोजित करण्‍यात आलेल्या वेव्हज्‌ २०२५ शिखर परिषदेत  “जगभरातील रसिकांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा” या विषयावर आधारित सत्र पार पडले. नॅशनल जिओग्राफिक सोसायटी संस्थेतील मुख्य कथाकथनकार केटलिन यार्नाल, वॉल्ट डिस्ने कंपनीचे ईव्हीपी तसेच कॉर्पोरेट विकास विभाग प्रमुख जस्टीन वॉरब्रूक, अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ कंपनीत आंतरराष्ट्रीय विभागाच्या उपाध्यक्ष केली डे, बीबीसी स्टुडीओजच्या आशिया विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक फिल हार्डमन, प्रख्यात दिग्दर्शक राजकुमार हिरानी, लेखक आणि राजनीती तज्ज्ञ अनिश त्रिपाठी यांनी यात सहभाग घेतला.

विविध प्रसारण मंच आणि प्रसारण क्षेत्रातील कंपन्या ते चित्रपट आणि साहित्य जगतातील वक्त्यांनी गुंतवून टाकणाऱ्या कथा कशा पद्धतीने सीमापार प्रवास करुन संस्कृतीला आकार देतात आणि जगभरातील लोकांना एकमेकांशी जोडतात याबाबत भाष्‍य करण्यात आले.

या कार्यक्रमातील चर्चेने जागतिक कथाकथन क्षेत्राला चालना देणाऱ्या धोरणात्मक, सर्जनशील आणि भावनिक शक्तींवर आणि या शक्तींचा दृष्टीकोन, संस्कृती तसेच सामाजिक बदलांवर किती मोठा प्रभाव पडतो हे सांगण्यावर अधिक भर दिला.

जगभरातील प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी विज्ञान, शोध तसेच दृश्य कथाकथन यांची वीण असलेल्या सशक्त कथा निर्माण करण्यासाठीची धोरणात्मक दृष्टी केटलिन यार्नाल (नॅशनल जिओग्राफिक) यांच्याकडे आहे. उपरोल्लेखित चर्चेदरम्यान त्यांनी कथाकथन क्षेत्राची सत्यता तसेच उत्कृष्टता यांचे महत्त्व सांगण्यावर अधिक भर दिला. तसेच त्यांनी प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने आपलासा वाटेल अशा आशयाच्या निर्मितीत असलेली आव्हाने आणि संधी अशा दोन्हींवर त्यांनी यावेळी अधिक भर दिला.

जस्टिन वारब्रुक (वॉल्ट डिस्ने) यांनी भारतीय बाजारपेठेला सर्वोच्च प्राधान्य दिले असून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली आणि वेगाने वाढणारी माध्यम आणि मनोरंजन बाजारपेठ असल्याचे म्हटले आहे. त्यांनी डिस्नेच्या भारतीय कंपन्यांबरोबरच्या सहकार्याबद्दलही सांगितले, आणि ही भागीदारी परस्परांच्या संस्कृतीला जोडण्यासाठी आणि कथाकथनाच्या माध्यमातून जागतिक प्रेक्षकांना एकमेकांच्या जवळ आणण्यासाठी कशी सहाय्य करत आहे, यावर भर दिला.

केली डे (अमेझॉन प्राइम व्हिडिओ) यांनी जागतिक विस्तार आणि आशय सामग्री विषयक धोरण, विविध खंडांमधील प्रेक्षकांपर्यंत वैविध्यपूर्ण आणि स्थानिक पातळीवर गुंफलेल्या कथा आणण्याचे काम कसे करते, यावर आपले विचार मांडले. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोणत्या कथा आर्थिकदृष्ट्या यशस्वी होतील, हे व्यासपीठ ठरवते.  सशक्त कथाकथन, स्थानिक प्रेक्षकांचा कल ओळखणे आणि योग्य स्वरूप आणि शैली निवडणे यात यशाचे गमक असल्याचे त्यांनी सांगितले.

फिल हार्डमन (बीबीसी स्टुडिओ, आशिया) आशियाई प्रेक्षकांसाठी तयार केलेल्या निवडक ब्रिटिश सामग्रीच्या वितरणाचे प्रमुख आहेत. त्यांनी बीबीसीच्या शिक्षण आणि माहिती देण्याच्या मुख्य मिशनवर भर दिला. त्या ध्येयाला अनुसरून अर्थपूर्ण कथांचा शोध घेऊन त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यावर भर असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक्‍ राजकुमार हिरानी म्हणाले की, कथाकथन हे स्वाभाविकपणे व्यक्तीनिष्ठ असते, त्याचा प्रतिध्वनी व्यक्तीनुरूप वेगळा असतो.  कृत्रिम बुद्धीमत्तेबद्दल आपण आशावादी असून, सर्जनशीलता आणि कथाकथन शैलीत भर घालणारे हे एक मौल्यवान  साधन असल्याचे ते म्हणाले.

०००

भारतासाठी परंपरा आणि तंत्रज्ञानाचा मिलाफ असलेल्या नव्या कथांची निर्मिती करण्याची हीच वेळ – किरण मझुमदार शॉ

  • किरण मझुमदार शॉ यांनी वेव्हज‌्मध्ये मांडला भारताच्या सृजनशील भवितव्याचा आलेख
  • स्टार्ट अप्सनी चित्रपटांच्या पलीकडचा विचार करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ०३ : सृजनशील आशय निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतीय स्टार्टअप्सनी चित्रपटांच्या पलीकडे विचार करत जागतिक स्तरावर प्रभाव टाकणारे ब्रँड्स, परिसंस्था आणि बौद्धिक संपदा निर्माण केली पाहिजे, असे प्रतिपादन जागतिक व्यवसायातील अग्रणी आणि बायोकॉनच्या संस्थापक किरण मझुमदार शॉ यांनी  केले आहे. त्या  मुंबईत जियो वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित पहिल्या जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेच्या (वेव्हज) दुसऱ्या दिवशीच्या संवाद सत्रात बोलत होत्या.

“भारताचे नवोन्मेष पुनरुत्थान: जागतिक स्तरावरील पहिल्या स्टार्टअप्सचे पुढील दशक” या विषयावर फोर्ब्स एडिटर ॲट लार्ज मनीत आहुजा यांच्यासोबत चर्चेची सुरुवात करताना मझुमदार शॉ यांनी भारतीय कथांमधील जागतिक क्षमतेविषयी सांगितले. रामायणाचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, “परंपरा आणि तंत्रज्ञानाचा मिलाफ असलेल्या नव्या कथांची निर्मिती करण्याची ही वेळ आहे. ज्याप्रकारे जॉर्ज लुकास यांनी ‘स्टार वॉर्स’साठी भारतीय अजरामर महाकाव्यांपासून प्रेरणा घेतली, त्याप्रकारे आपणही आपल्या सांस्कृतिक वारशाचे रुपांतर जागतिक फ्रँचायझीमध्ये करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो.”

भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय आणि डिजिटल सामर्थ्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, “अब्जावधी स्मार्टफोन आणि तंत्रज्ञान-सजग जनरेशन झेड सह, भारत जागतिक नवोन्मेषासाठी सज्ज आहे. पण कोणत्याही ब्लॉकबस्टर म्हणजेच अतिशय गाजलेल्या सिनेमा किंवा विषयाप्रमाणे यशाची सुरुवात  एका कल्पनेने आणि अथक लक्ष्यकेंद्री पद्धतीने एका लहान स्तरावर होते.” हे सांगताना त्यांनी गॅरेजमध्ये बायोकॉन सुरू करून जागतिक बायोटेक पॉवरहाऊसमध्ये रूपांतरित करण्याच्या स्वतःच्या प्रवासाची तुलना केली.

भारताच्या सृजनशील अर्थव्यवस्थेविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, या क्षेत्रातील लोकांनी प्रचंड क्षमता असलेल्या ऑरेंज अर्थव्यवस्थेच्या वृद्धीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आज माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र जीडीपीमध्ये 20 अब्ज डॉलर्सचे योगदान देते. आपण 2047 पर्यंत 100 अब्ज डॉलर्स आणि सरतेशेवटी 1 ट्रिलियन डॉलर्सच्या ऑरेंज अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवले पाहिजे, जे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नाशी सुसंगत असेल,” असे शॉ म्हणाल्या.

सृजनशील निर्माते आणि स्टार्ट अप्सचे सक्षमीकरण

भारताच्या सृजनशील क्षमतेविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शॉ यांनी एआर (AR), व्हीआर (VR) आणि  इमर्सिव्ह अनुभवांचे  एकत्रीकरण हे महत्त्वाचे आघाडीचे क्षेत्र असल्याचे सांगितले. “पुढचे युनिकॉर्न केवळ ॲप्स नसतील  तर ज्यांना बौद्धिक संपदा , तंत्रज्ञान आणि इमर्सिव्ह  कथाकथनाचे आकलन होते, असे सृजनशील  निर्माते असतील ” असे त्यांनी नमूद केले. ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याचे उदाहरण देत त्या म्हणाल्या, की भारतीय सृजनशीलतेला केवळ समुदायाला भावनिक साद घालण्याच्या पलीकडे जावे लागेल. ते जागतिक स्तरावर प्रासंगिक असले पाहिजे .प्रत्येक महान कल्पना लहान स्तरावर सुरू होते. तुम्ही तिला किती दूर घेऊन जाता हे महत्त्वाचे आहे. अपयश हा या वाटचालीचाच एक भाग असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

०००

 

‘एआय’च्या वापरामुळे नवउद्योगाला उज्ज्वल भविष्य

मुंबई, दि. ०३ : भारतात स्टार्टअप्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रामुख्याने आयटी, फिनटेक, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत आहेत. राज्य शासनाकडून स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून विविध योजनांमुळे तरुण उद्योजकांना मोठा आधार मिळत असल्याने नवउद्योजकांना उद्योगात उज्ज्वल भवितव्य आहे. आधुनिकतेचा स्वीकार करून ‘एआय’चा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर स्वीकारावा लागणार असल्याचा सूर ‘भारतीय उद्योजकतेचे भवितव्य-एक दृष्टिक्षेप’ चर्चासत्रातून उमटला.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेमध्ये ‘भारतीय उद्योजकतेचे भवितव्य-एक दृष्टिक्षेप’ चर्चासत्र पार पडले. चर्चासत्रात ‘बोट’ लाइफस्टाइलचे सहसंस्थापक अमन गुप्ता, शादी डॉट.कॉमचे अनुपम मित्तल यांनी भाग घेतला, उद्योजक श्री. खुराणा यांनी मुलाखत घेतली.

गुप्ता म्हणाले की, सध्या कोणताही छोटा मोठा व्यवसाय करा, त्यामध्ये ‘एआय’चा वापर हा राहणार आहे, यामुळे गुंतवणूकदारांनी अशा उद्योगात पैसे गुंतवायला हवेत. आपल्या व्यवसायामध्ये गुंतवणूकदारांसाठी काही समस्या असतात, मात्र व्यवसाय आणि पैसा मिळवण्यासाठी गुंतवणूकदार हवेतच. पूर्वी शासकीय नोकरीला प्राधान्य होते, मात्र सध्या स्टार्टअपला प्राधान्य आहे. सुरुवातीला स्टार्टअपमध्ये काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. मात्र कधीतरी आपल्याला नफा मिळणार असल्याने कष्ट करण्याच्या मानसिकतेवर भर द्यायला हवा.

उद्योजक बनू लागले सेलिब्रिटी – गुप्ता

हिंदी आणि मराठी चित्रपटातील अभिनेते, अभिनेत्री यांना आपण पूर्वी सेलिब्रिटी समजत होतो. सध्या स्टार्टअप आणि उद्योजकांचे युग आहे. उद्योजक हे नव्या पिढीचे सेलिब्रेटी बनत असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. सध्या व्यवसायामध्ये महिलांचा वाढता सहभाग हा भारताच्या उद्योजकतेच्या विकासात सकारात्मक पाऊल आहे. सर्व क्षेत्रात महिला पुढे येत असून त्यांचा सहभाग वाढत आहे. महिला उद्योजकांसाठी विविध प्रशिक्षण व निधी शासकीय योजनातून मिळत आहे. मन, बुद्धी आणि वेळ दिला तर आपल्याला  कोणत्याही क्षेत्रांमध्ये यश नक्की मिळते, असेही गुप्ता यांनी सांगितले.

‘एआय’मुळे रोजगार जाण्याची भीती नाही – मित्तल

मोबाईल आणि सोशल मीडिया वापरासह सर्व क्षेत्रामध्ये ‘एआय’चा वापर होणार आहे. ‘एआय’ वापराने रोजगार जाण्याची भीती नाही, मात्र त्याचा सकारात्मक पद्धतीने स्वीकार करून आपल्या व्यवसायात वापर करायला हवा. विकसित भारताच्या जीडीपीमध्ये नवउद्योजकांचा खूप मोठा वाटा असेल, असे शादी डॉट कॉमचे श्री. मित्तल यांनी सांगितले.

चॅट जीपीटी, गो टू चाही वापर वाढत आहे. कोणत्याही टेक्स्टबाबत सर्व उपलब्ध माहिती मिळते. ॲप बनवायला सोपे असल्याने यामध्येही रोजगाराच्या भरपूर संधी आहेत. चांगली जागा/क्षेत्र (Area) निवडा. चांगल्या कल्पनांची अंमलबजावणी करण्याची क्षमता असेल तर चांगले उद्योजक बनाल. काहीतरी बदल घडवण्यासाठी किंवा समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याच्या उद्देशाने उद्योगाची सुरुवात करा, महिलांनी उद्योग करण्यासाठी पुढाकार घेऊन पुढे यायला हवे, असेही मित्तल यांनी यावेळी सांगितले.

०००

धोंडिराम अर्जुन/ससं/

डिजिटल माध्यमांसाठी नाविन्यता आणि सातत्य आवश्यक – डॉली सिंग

मुंबई, दि. ०३ : स्पर्धात्मक डिजिटल युगात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी चांगली संहिता, विषयांची प्रभावी मांडणी, व्हिज्युअलचा योग्य वापर याबरोबरच नाविन्यता आणि सातत्य असणे आवश्यक असते, असे मत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर व कंटेंट क्रिएटर डॉली सिंग यांनी व्यक्त केले.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटर येथे जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत “Connecting Creators, Connecting Countries” या चर्चासत्रात त्या बोलत होत्या. यावेळी देश-विदेशातील नामवंत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि लोकप्रिय कंटेंट क्रिएटर सहभागी झाले होते.

डिजिटल माध्यमात आपली ओळख निर्माण करण्यासाठी करण्यासाठी प्रेक्षकांशी संवाद साधणे आणि त्यांच्या प्रतिसादाला उत्तर देणे तेवढेच महत्त्वाचे आहे. यामध्ये नाविन्यता आणि नियमित  दर्जेदार मजकूर अपलोड  करणे गरजेचे असते,असे सिंग यांनी यावेळी सांगितले.

सोशल मीडियावरील पोस्टसाठी आवश्यक व्हिडिओ, मजकूर,विषय मांडण्याची पद्धत, संपादनाची शैली आणि सादरीकरणाची पद्धत हे सर्व घटक वेगळेपण सिद्ध करतात. तसेच कोणतीही प्रसिद्धी करण्यापूर्वी सोशल मीडियावर शॉर्ट व्हिडिओ, टीझर किंवा ट्रेलर प्रसिद्ध करणे आवश्यक असते तरच त्या इव्हेंटबाबत उत्सुकता निर्माण होते आणि प्रेक्षक जोडले जातात असे सांगून डॉली सिंग यांनी स्वतःच्या अनुभवातून कंटेंट निर्मितीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/

 

ताज्या बातम्या

विधानपरिषद इतर कामकाज

0
अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारी दाखल करण्यासाठी लवकरच टोल फ्री क्रमांक - मंत्री नरहरी झिरवाळ मुंबई, दि. १ : राज्यात अन्नपदार्थांची घरपोच सेवा...

शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरतील – कृषी आयुक्त सूरज मांढरे

0
मुंबई दि. १: शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी हातभार लावणाऱ्या आहेत. 'महाकृषी एआय धोरण शेतीमध्ये अचूकता आणून शेतीची उत्पादकता ते विक्रीमध्ये आमूलाग्र बदल घडवेल,...

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

0
एनडीआरएफच्या पथकांनी पर्यटकांना तत्काळ मदत करत सुरक्षित ठिकाणी हलवले मुंबई, दि. १: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मदतीचा हात...

महाराष्ट्र सदन येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन

0
नवी दिल्ली, दि. १ : महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी त्यांना विन्रम अभिवादन...

‘विकसित भारत युवा कनेक्ट’ कार्यक्रम १२ ऑगस्टपासून

0
मुंबई, दि. १: विकसित भारत अभियानात युवकांना सक्रीय सहभागी करून घेण्यासाठी केंद्र सरकारने ‘विकसित भारत युवा कनेक्ट’ हा व्यापक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे....