शनिवार, जुलै 5, 2025
Home Blog Page 129

महाराष्ट्र शासन आणि विधी सेंटर फॉर लीगल पॉलिसी यांच्यात सामंजस्य करार

मुंबई, दि. ८ : उद्योग व्यवसायाचे सुलभीकरण (इज ऑफ डुईंग बिझनेस) आणि नागरिकांचे जीवन अधिक सोयीचे, सुरक्षित व सुलभ करण्याच्या उद्देशाने कायद्यामधील तरतुदीचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि विधी सेंटर फॉर लीगल पॉलिसी यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.

सह्याद्री अतिथीगृह येथे  झालेल्या या सामंजस्य करारावर विधी व  न्याय विभागाचे सचिव  सतीश वाघोले, विधी सेंटर फॉर लीगल पॉलिसीचे अर्घ्य सेनगुप्ता यांनी स्वाक्षरी केली. याप्रसंगी विधी सेंटर फॉर लीगल पॉलिसीचे जीनाली दानी यांच्यासह  संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या सामंजस्य कराराच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देणारे कायदेमान्य वातावरण निर्माण व्हावे, उद्योग सुलभतेला गती  मिळावी आणि उद्योग व्यवसायांच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करणारे कठीण आणि फौजदारी स्वरूपाच्या कायद्यांचे पुनरावलोकन करता यावे यासाठी ‘डिक्रीमिनलायझेशन’ करण्यात येणार आहे. यासाठी विधी सेंटर फॉर लीगल पॉलिसीकडून राज्यातील कायद्यातील तरतुदीचा अभ्यास करून त्याचा अहवाल सामान्य प्रशासन विभागाला  सादर करण्यात येणार आहे.

00000

काशीबाई थोरात/विसंअ

 

 

सायबर गुन्हे व फसवणूक टाळण्यासाठी अधिक परिणामकारपणे काम करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 8 : सायबर सुरक्षेसाठी देशातील अत्याधुनिक सुविधा महाराष्ट्रात आहेत. या माध्यमातून सायबर गुन्हे, सायबर फसवणूक व मानवी तस्करीपासून लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.या पुढील काळातही अधिक परिणामकारपणे काम करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सायबरच्या आर्टिफिशियल इंटिलिजन्स बॉट व सायबर जागरुकता माहितीपट या नाविन्यपूर्ण नागरिक केंद्रीत उपक्रमांचे अनावरण सह्याद्री अतिथिगृहात करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सायबरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव, पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे, पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत, अभिनेता शरद केळकर, अभिनेत्री अमिषा पटेल, मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी सायबर सुरक्षा विषयक माहितीपट दाखविण्यात आला. मराठी आणि हिंदी भाषेत असलेल्या या माहितीपटात अभिनेते शरद केळकर, अभिनेत्री अमिषा पटेल यांनी काम केले आहे. या माध्यमातून सायबर गुन्हेगारी, सायबर फसवणूक संबंधी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र सायबरच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅट बॉटचे सादरीकरण करण्यात आले. हा चॅटबॉट महाराष्ट्र सायबरच्या 1945 या हेल्पलाईनशी जोडले गेले आहे. या चॅटबॉटमध्ये सायबर गुन्हे, तक्रार कशी करावी, यासंबंधीची माहिती मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सायबर फसवणुकीसंबंधीचे कॉल्स मोठ्या प्रमाणात येत असतात. त्या सर्वांना सावधानतेले उत्तर देणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा कॉल्सना उत्तरे देणे व नागरिकांना माहिती मिळण्यासाठी चॅटबॉट व माहितीपट महत्त्वाचे ठरणार आहे. सायबर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. अशा कामात अभिनेते शरद केळकर व अभिनेत्री अमिषा पटेल यांच्यासारख्यांनी सहभाग घेतल्यामुळे नागरिकांपर्यंत चांगला संदेश जाईल.

नोकरीच्या निमित्ताने परदेशात नेऊन विक्री करण्यासारख्या घटना रोखण्यासाठीही यापुढील काळात जनजागृती करावी. मानवी तस्करीसारखे अमानुष प्रकार बंद करण्यासाठी जनजागृती उपक्रम महाराष्ट्र सायबरने हाती घ्यावा, अशी सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.

अभिनेते श्री. केळकर म्हणाले की, सायबर गुन्हे व सायबर सुरक्षा विषयक जनजागृती करणे आवश्यक आहे. या उपक्रमात सहभागी झाल्याचा आनंद असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होईल. महाराष्ट्र सायबरने सुरू केलेला सायबर सुरक्षाविषयक हेल्पलाईन क्रमांक सध्याच्या काळात उपयुक्त आहे. श्रीमती पटेल म्हणाल्या की, डिजिटायझेशनच्या या युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकांमध्ये जागृती महत्त्वाची आहे. त्यामुळे महाराष्ट्र सायबरने घेतलेले जनजागृतीचा उपक्रम आजच्या काळात महत्त्वाचे आहे.

मानवी तस्करीतून सुटका झालेल्या तरुणाने मानले महाराष्ट्र सायबरचे आभार

महाराष्ट्र सायबरने नुकतेच नोकरीच्या निमित्ताने म्यानमार व लाओस या देशांमध्ये गुलाम म्हणून विकल्या गेलेल्या 64 जणांना सुखरूप सोडवून आणले आहे तसेच पाच एजंटनाही अटक केली. मानवी तस्करीतून सुटका झालेल्या एका तरुणाने यावेळी त्याच्यावर आलेल्या प्रसंगाची माहिती दिली व महाराष्ट्र सायबरने वेळीच केलेल्या कारवाईमुळे सुटका झाल्याचे समाधान व्यक्त केले. या मोहिमेची माहिती पोलीस अधीक्षक श्री. राजपूत यांनी दिली.

यावेळी श्री. धवसे यांनी महाराष्ट्र सायबरच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. अतिरिक्त पोलीस महासंचालक श्री. यादव यांनी जनजागृती उपक्रमाची माहिती दिली.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ

दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची मुलाखत

मुंबई दि. 8: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात वस्त्रोद्योग ‘विभागाच्या योजना, शंभर दिवसाच्या कामकाजाचा आराखडा व अंमलबजावणी’ या विषयावर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत सोमवार दि. 12, मंगळवार दि. 13 आणि बुधवार दि. 14 मे 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तसेच ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 13 मे 2025 रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर रात्री 8.00 वाजता प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर खाली दिलेल्या लिंकवरून ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR,

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR,

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR,

राज्यातील वस्त्रोद्योग उत्पादनांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि उद्योगात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी शासनस्तरावर विविध योजना आणि उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये पारंपरिक आणि आधुनिक वस्त्रोद्योग उपक्षेत्रांच्या मजबूतीकरणावर प्रामुख्याने भर देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील वस्त्रोद्योगाचा विकास करणे आणि या उद्योगांना प्रोत्साहन देणे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शंभर दिवसाच्या कामकाजात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून त्यांची अंमलबजावणी करण्यावर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. त्याअनुषंगानेच पारंपरिक आणि आधुनिक वस्त्रोद्योग उपक्षेत्रांच्या मजबूतीकरणासाठी व चालना देण्यासाठी विभगामार्फत घेण्यात आलेले निर्णय आणि त्याची अंमलबजावणी याबाबत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

मानसिक शांतता, आरोग्यवर्धनासाठी संगीत हे प्रभावी माध्यम – डॉ. संतोष बोराडे

Oplus_131072

मुंबई, दि. ८ : मानवाच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्यावर संगीताचा सकारात्मक परिणाम होतो, हे आता संशोधनातून सिद्ध झाले आहे. संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन न राहता, कार्यक्षमतेत वाढ, मानसिक शांतता आणि आरोग्यवर्धनासाठी प्रभावी माध्यम ठरू शकते, असे जीवनसंगीत समर्थक डॉ. संतोष बोराडे यांनी सांगितले.

टेक-वारी कार्यक्रमांतर्गत मंत्रालयात ‘जीवन संगीत’ या विषयावर डॉ. संतोष बोराडे यांचे व्याख्यान झाले.

डॉ. संतोष बोराडे म्हणाले, तंत्रज्ञान म्हणजे केवळ यंत्र नाही, तर जीवन जगण्याची आधुनिक पद्धती आहे. छोट्या-छोट्या गोष्टी समजून घेतल्यास जीवन अधिक सुलभ आणि आनंददायी होऊ शकत. आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात सतत अद्ययावत राहणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे हे जिवंतपणाच लक्षण आहे.

Oplus_131072

संगीतामध्ये माणसाचे आयुष्य बदलण्याची ताकद असते. चांगले संगीत मनाला उभारी देते, विचारशक्ती प्रगल्भ करते आणि नातेसंबंधांमध्ये सौहार्द निर्माण करते. अनेकवेळा जीवनातील तणाव, नैराश्य, किंवा अडचणींच्या वेळी संगीतच माणसाला मानसिक आधार देते.

डॉ. बोराडे यांनी या सत्रात ओव्या, गीत आणि संगीताच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल उपस्थितांशी संवाद साधला. तंत्रज्ञान हे सतत अद्ययावत राहण्याची प्रक्रिया आहे. रोज काहीतरी नवीन शिकण्याची वृत्ती अंगीकारली, तर वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन दोन्ही समृद्ध होऊ शकते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

0000

शैलजा पाटील/विसंअ

संतुलित आहार आरोग्यासाठी अधिक उपयुक्त – अन्वेषा पात्रा

Oplus_131072

मुंबई, दि. ८ : रोजच्या जेवणात विविध पोषणमूल्यांचा समावेश असलेला आहार शरीराला ऊर्जा तर पुरवतोच, पण रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतो. सुदृढ आरोग्यासाठी संतुलित आहार अत्यंत महत्त्वाचा आहे, असे इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या अन्वेषा पात्रा यांनी सांगितले.

टेक-वारी कार्यक्रमांतर्गत मंत्रालयात ‘डब्यासाठीच्या आरोग्यदायी पदार्थांच्या पाककृती’ या विषयावर अन्वेषा पात्रा यांचे व्याख्यान झाले.

अन्वेषा पात्रा म्हणाल्या, दिवसभराच्या कामकाजात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि आरोग्य उत्तम राखण्यासाठी ऑफिसच्या डब्याला विशेष महत्त्व आहे. फास्ट फूड तसेच पॅकेज्ड पदार्थांऐवजी घरचा पौष्टिक व संतुलित आहार असलेला डबा आरोग्यासाठी अधिक उपयुक्त ठरतो. मुलांच्या, आपल्या स्वतःच्या डब्यात प्रथिने, फायबर, जीवनसत्त्व, आणि कर्बोदके असणे आवश्यक आहे. डब्यात भाजी, डाळ, भात किंवा पोळी, फळ असावेत. फास्ट फूड, तेलकट, मसालेदार पदार्थ टाळून डब्यात सकस आणि सहज पचणारे पदार्थ समाविष्ट करावेत. यामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहते, थकवा कमी होतो आणि कामात लक्ष केंद्रित करता येते.

आजकाल अनेक पालक मुलांच्या डब्याचा आरोग्याच्यादृष्टीने विचार करून नियोजन करू लागले आहेत. ऑफिससाठी आठवड्याभराच्या डब्यातील आहाराचेही नियोजन करून वेळेचे व्यवस्थापन करता येते. पदार्थ दिसायला आकर्षक आणि चवदार असावा, पण त्यासोबत तो पोषणमूल्यांनी भरलेला असणे आवश्यक आहे, असेही अन्वेषा पात्रा यांनी सांगितले. शेफ अंकित पिल्ले यांनी डब्यासाठीच्या रेसिपींचे प्रात्यक्षिकही यावेळी करुन दाखवले.

 

0000

 

शैलजा पाटील/विसंअ

स्कूल बसमधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. ८ मे :- शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला परिवहन विभागाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखावह झाला पाहिजे, यासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा  केल्या जातील, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृह येथे स्कूल बस असोसिएशन व पालक असोसिएशन यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, स्कूल बसमधून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या  वाहनचालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे.  विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नियमावलीत सुधारणा करताना वाहनचालक आणि पालक संघटनांच्या भावना आणि अडचणींचाही विचार केला जाईल. विद्यार्थ्यांच्या जीविताशी कोणीही खेळू नये. नियमांचे पालन हे फक्त कायद्याच्या भीतीपोटी नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या भावनेतून व्हावे. स्कूल बस वाहतूक नियमावलीत सुधारणा करताना कोणावर अन्याय होणार नाही, पण नियमही शिथिल होणार नाहीत. नियमाचे पालन न करणाऱ्यांना कोणतेही संरक्षण दिले जाणार नाही. परिवहन विभागानेही अनधिकृतपणे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अनधिकृत स्कूल बसेसवर कारवाई करणार

सन २०११ च्या नियमावलीनुसार सध्या ४० हजार स्कूल बसेस राज्यभरात सेवा देत आहेत. मात्र या व्यतिरिक्त अनेक स्कूल बसेस विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने ने-आण करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. पुढील तीन महिन्यांमध्ये या अधिकृत स्कूलबस चालक- मालकांनी संबंधित  प्रादेशिक मोटर वाहन कार्यालयात दंडात्मक रक्कम भरून नियमावलीनुसार आपली स्कूल बस अधिकृत करून घ्यावी. अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच तीन महिन्यानंतर ज्या प्रादेशिक परिवहन विभागांमध्ये अशा प्रकारच्या अनधिकृत स्कूल बसेस आढळतील त्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांवरही  कारवाई केली  जाईल असेही परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी सांगितले.

परिवहन आयुक्त श्री. भीमनवार म्हणाले, स्कूल बस धोरण करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. या धोरणातील त्रुटी दूर केल्या जातील. बैठकीत स्कूल बस असोसिएशन व पालक असोसिएशन यांनी मांडलेल्या सूचनांचा धोरणातील नियम सुधारणावेळी विचार केला जाईल.

0000

एकनाथ पोवार/विसंअ

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेद्वारे जलसंधारण आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी महत्त्वाचे पाऊल

मुंबई, दि.८ : राज्यातील जलसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन आणि शेतीला पोषण देणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतला ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना  महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात विकासाचे नवे पर्व घडवते आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे धरणांत साचलेल्या गाळाचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन करून त्याचा पुनर्वापर शिवारांमध्ये करणे. परिणामी, जलसाठ्याची क्षमता वाढवली जाते आणि गाळातील पोषणमूल्ययुक्त माती शेतजमिनीत वापरून जमिनीची सुपीकता सुधारली जाते. ही योजना विशेषतः अल्पभूधारक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून धरणे, बंधारे आणि तलावांमधील गाळ काढून त्या परिसरातील जमिनीवर टाकला जातो.शासन त्यासाठी निधी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे शेतजमिनीची सुपीकता वाढते आणि पाणी साठवण क्षमता देखील सुधारते. अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे मर्यादित संसाधने असतात, त्यामुळे त्यांना नैसर्गिक साधनसंपत्तीच्या योग्य वापरामुळे थेट फायदा होतो. शासनाचा उद्देशही शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणे व नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर सुनिश्चित करणे हाच आहे. त्यामुळे ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी फारच उपयुक्त ठरत आहे.

१ एप्रिल २०२४ ते ७ एप्रिल २०२५ या कालावधीत राज्यात १२७४ एकूण ६६.९१ कोटी घनमीटर गाळ काढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते, त्यापैकी ४२.२९ कोटी घनमीटर गाळाचे उत्खनन पूर्ण झाले असून, हे लक्ष्याच्या ६३ टक्के इतके आहे. ही भरघोस कामगिरी प्रशासनाच्या प्रभावी अंमलबजावणीबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शक्य झाली आहे.

राज्य शासनाकडून २७८१.८ कोटी रुपये निधीची तरतूद

योजनेसाठी राज्य शासनाकडून २७८१.८ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून, आतापर्यंत १५४९.९ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. यामध्ये ३५,२०५ शेतकऱ्यांपैकी ३१,७१९ शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले असून, त्यांनी ३४.१७ कोटी घनमीटर गाळ काढला आहे. यासाठी १२२१.६ कोटी रुपयांचे अनुदान अपेक्षित असून, आतापर्यंत ५१२.४ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

उपक्रमामुळे १०.०६ लाख एकर क्षेत्रावर पोषणमूल्ययुक्त माती

या उपक्रमामुळे १०.०६ लाख एकर क्षेत्रावर पोषणमूल्ययुक्त माती टाकण्यात आली आहे, जी शाश्वत शेतीसाठी एक मोठा टप्पा आहे. विशेषतः अल्पभूधारक, गरीब शेतकऱ्यांना त्यांची जमीन पुन्हा उत्पादक बनवण्याची संधी या योजनेमुळे मिळत आहे.

शेतकऱ्यांच्या समृद्धीची गाथा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ मध्ये या योजनेचा प्रारंभ करताना स्पष्ट केले होते की, “ही योजना केवळ गाळ काढण्यापुरती मर्यादित नाही, तर ती जलसंवर्धन, जमिनीची सुपीकता आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीची गाथा आहे.” आज, त्यांच्या या दूरदृष्टीला राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी दिलेला प्रतिसाद हे या योजनेचे यश अधोरेखित करतो.

ग्रामीण महाराष्ट्राच्या आर्थिक आणि पर्यावरणीय उत्थानाचे प्रेरणास्थान

राज्य शासनाने या योजनेसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला असून, शेतकऱ्यांना संपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभागी बनवले आहे. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना आता केवळ जलसंधारण उपक्रम नसून, ती ग्रामीण महाराष्ट्राच्या आर्थिक आणि पर्यावरणीय उत्थानाची प्रेरणास्थान बनली आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध – केंद्रीय मंत्री डॉ.विरेंद्र कुमार

छत्रपती संभाजीनगर, दि.8, (विमाका) :- विमुक्त भटक्या जमाती, अर्ध भटक्या जमातीतील गरजू  कुटुंबाला  योजनांचा लाभ देण्यासाठी  केंद्र शासनाने डीएनटी (बीज) ही आर्थिक सक्षमीकरणासाठीची योजना सुरू केली आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉ.विरेंद्र कुमार यांनी केले.

केंद्र सरकारच्या डीएनटी (बीज) या आर्थिक सक्षमीकरणासाठीची योजनेच्या संदर्भात तिसगाव येथे केंद्रीय मंत्री डॉ.विरेंद्र कुमार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार प्रशांत बंब, डीएनटी बोर्डाचे सदस्य प्रवीण घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डी.एन.टी बोर्ड भारत सरकार श्री. आप्पाराव, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त शेख जलील आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्री.कुमार म्हणाले की, समुदायांच्या आर्थिक विकासाला चालना देणे, त्यांच्या पारंपारिक व्यवसायांचे पुनरुज्जीवन करणे, त्यांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांच्या जीवनाच्या दर्जाची सुधारणा करण्यासाठी योजना आखण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या कल्याणकारी कार्यक्रमांमध्ये या समुदायांसाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे.  डीएनटी संघटनांच्या कल्याणकारी अहवालांमध्ये अनेक शिफारशीकडे सामाजिक-आर्थिक, सांस्कृतिक, विमुक्त, भटक्या आणि विमुक्त जमातींच्या विविधतेच्या संदर्भात  लक्ष देणे आवश्यक आहे.

समाजातील गरजू घटकाला आर्थिक मदतीसोबत शैक्षणिक विकास, रोजगार निर्मिती आणि विमुक्त जमातींचे पुनर्वसन यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.  डीएनटी युनिट्सच्या सक्षमीकरणासाठी एक छत्री योजना तयार करण्यात आली आहे आणि पाच वर्षांच्या कालावधीत अंदाजे २०० कोटी रुपये खर्च करून शैक्षणिक सक्षमीकरण, आरोग्य उपजीविका, जमीन आणि गृहनिर्माण यावर भर दिला जाणार आहे. डीएनटी उमेदवारांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये भाग घेण्यास सक्षम करण्यासाठी त्यांना चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण, समुदायांना आरोग्य विमा प्रदान करणे, डीएनटी/एनटी/एसएनटी समुदाय संस्थांचे क्लस्टर तयार करण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी समुदाय पातळीवर उपजीविकेच्या उपक्रमाला चालना देण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री श्री. कुमार म्हणाले.

श्रीमती शीला प्रकाश पवार, श्रीमती इंदुबाई कैलाश राठोड, श्रीमती जयश्री बेन सुरमाने, वसंत पुरा राठोड, देव गुणा राठोड,  पंडीत राठोड यांनी मंत्री महोदयांकडे आपल्या अडचणी मांडल्या.

यावेळी नागरिकांना बांधकाम कामगार कल्याण पेटी, कामगार कल्याण स्मार्ट कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड आदी योजनेचे कार्ड मंत्री महोदयांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’चा आढावा

 जळगाव दि. 8 (जिमाका वृत्तसेवा ) : जिल्ह्यातील आदिवासी भागांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत एकूण 15 तालुक्यांमध्ये 112 गावांमध्ये सदर योजना अंमलबजावणी करण्यात येणार आहे, त्यापैकी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत 56 गावाचा सर्वेक्षण करण्यात आल्यानुसार चोपडा यावल व रावेर या तीन तालुक्यांचा केंद्रिय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.

            यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील,खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल , प्रकल्प संचालक राजू लोखंडे, उपवन संरक्षक, यावल जमीर शेख,प्रकल्प अधिकारी , यावल अरुण पवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

            बैठकीत केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला आणि खालील महत्त्वाच्या सूचना दिल्या:

             घरकुल योजना: यावल, रावेर आणि चोपडा तालुक्यातील प्रलंबित घरकुलांची कामे तांत्रिक अडचणी दूर करून त्वरित पूर्ण करावीत.

             ग्रामीण रस्ते: मुख्य रस्त्यांपासून गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण किंवा डांबरीकरण करावे.

 विद्युतीकरण: सर्व घरांमध्ये वीज जोडणी करून भागांचे विद्युतीकरण करावे.

            आयुष्यमान कार्ड: चोपडा, रावेर आणि यावल तालुक्यातील उर्वरित नागरिकांची आयुष्यमान कार्ड स्वस्त धान्य दुकानांमार्फत त्वरित तयार करावीत. सध्या चालू असलेल्या शिबिरामध्ये 7000 पेक्षाही जास्त आयुष्यमान भारत कार्ड  नोंदणी करण्यात आले आहेत

 एलपीजी कनेक्शन: आदिवासी कुटुंबांसाठी एलपीजी कनेक्शन आणि उज्ज्वला गॅस योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी.

 अंगणवाडी केंद्रे: अंगणवाडी केंद्र बांधण्याचे काम तातडीने पूर्ण करावे.

  कौशल्य विकास: आदिवासी विभागातील युवकांना कौशल्य विकास विभागामार्फत प्रशिक्षण द्यावे.

  पोषण आहार: आदिवासी भागातील लोकांच्या पोषण आहाराच्या स्थितीत सुधारणा करावी.

  वनहक्क योजना: मंजूर वैयक्तिक वनहक्क धारकांसाठी शेतीविषयक शाश्वत योजना राबवाव्यात.

  मत्स्यव्यवसाय योजना: मंजूर सामूहिक वनहक्क धारकांसाठी मत्स्यव्यवसाय योजना राबवाव्यात.

राज्यमंत्री खडसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

टेक वारी : शासकीय कामकाजाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक

Oplus_131072

मुंबई, दि. ८ : शासकीय कामकाजामध्ये अत्याधुनिक फ्रंटियर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हा केवळ एक पर्याय नसून भविष्यातील गरज ठरणार आहे, असे मत ‘टेक वारी – महा तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत चौथ्या दिवशी ‘शासकीय कामकाजात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर’ या विषयावर झालेल्या पहिल्या सत्रात तज्ज्ञांनी व्यक्त केले. या सत्रात नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.

Oplus_131072

स्मार्ट सिटीमध्ये तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत एआय, मशिन लर्निंग, डेटा सायन्स, जीआयएस आणि ब्लॉकचेन सारख्या तंत्रज्ञानाचा वापर प्रशासकीय कामकाजासाठी केला जात असल्याचे सांगितले. ई-गव्हर्नन्स अंतर्गत ई -ऑफीस, जीआयएस एनबल्ड ईपीआर ड्रोन सर्व्हेद्वारे प्रॉपर्टी टॅक्स मूल्यांकन, डेटा सेंट्रलायझेशन, फील्ड अ‍ॅक्टिव्हिटीजचे मॉनिटरिंग यासंदर्भातील कार्यप्रणालीही त्यांनी स्पष्ट केली.

आपत्ती व्यवस्थापनात ई-पंचनामाची भूमिका

नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी नैसर्गिक आपत्तीमधील नुकसानीचे मूल्यांकन तंत्रज्ञानाच्या मदतीने कसे अधिक कार्यक्षम होऊ शकते, याचे उदाहरण ‘ई-पंचनामा प्रणाली’ द्वारे स्पष्ट केले. या प्रणालीमुळे थेट लाभ हस्तांतरण, ई पिक पाहणी, राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण आणि मदत वितरण या साऱ्या प्रक्रिया सुलभ व पारदर्शक बनल्या आहेत. मोबाईल अ‍ॅप व पोर्टलद्वारे मिळणाऱ्या डेटाच्या आधारे निर्णय प्रक्रिया अधिक जलद व अचूक होऊ शकते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Oplus_131072

धोरणात्मक अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानाचा वापर

नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सिंहस्थ कुंभमेळा, तुळजापूर मंदिर संस्थान, वाळू उत्खनन आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांसारख्या प्रकल्पांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करण्यात आला याचे उदाहरणे दिली. जीआयएस, पिंग काउंट, जन स्वास्थ्य व्यवस्थापन इ. माध्यमातून कार्यपद्धतीचे संपूर्ण मॉनिटरिंग शक्य झाले. आयुष्मान भारत डिजिटल मिशन, युपीआय, अ‍ॅग्री स्टॅक याबाबतही त्यांनी माहिती दिली. तंत्रज्ञानाच्या प्रभावी अंमलबजावणीपूर्वी  संबधित तंत्रज्ञानाची शाश्वतता, विस्तारक्षमता आणि अनुकरणीय आहे का याबाबतही खात्री करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या सत्रात सहभागी तज्ज्ञांनी शासकीय यंत्रणांमध्ये तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देत त्याद्वारे कार्यक्षमता, पारदर्शकता आणि जलद सेवा वितरण कसे शक्य होते याची सखोल माहिती दिली. यामुळे आगामी काळात शासकीय धोरणांची अंमलबजावणी अधिक सक्षम, डिजिटल आणि लोकाभिमुख होणार असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी महाराष्ट्र सदनच्या आयुक्त आर. विमला यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

0000

संध्या गरवारे /विसंअ/

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील : कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
नाशिक, दि. 4 जुलै, 2025 (जिमाका वृत्तसेवा): रस्ते वीज व पाणी या शेतकऱ्याच्या मूलभूत गरजा असून पूर्ण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आवश्यक उपलब्ध करून देण्यासाठी...

कामात कुचराई करणाऱ्यांची गय न करता शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरवा – केंद्रीय आरोग्य...

0
बुलढाणा,दि. 4 (जिमाका) : सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यत आरोग्य सेवा सहज ,सुलभ आणि माफक दरात पोहचविण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे . हा हेतू साध्य करण्यासाठी आणि...

‘माये’चं दूध… नवजातांसाठी संजीवनी!

0
जळगावच्या 'ह्युमन मिल्क बँके'तून २०००हून अधिक बाळांना मिळाला जीवनदायी आधार आईपण म्हणजे माया, वात्सल्य आणि त्याग. पण काही वेळा ही आई काही कारणांमुळे बाळाला दूध...

बॉम्बे बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार

0
मुंबई, दि. ४ : मुंबई उच्च न्यायालयाची ही इमारत, बॉम्बे बार असोसिएशन आणि इथल्या माझ्या सहकाऱ्यांनी मला घडवलं. आज जे काही आहे ते या...

जीएसटी उत्पन्न विश्लेषणासाठी मंत्रिगटाची पहिली बैठक

0
नवी दिल्ली, दि. 4 : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाची (GoM) वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) उत्पन्नाच्या विश्लेषणासाठी पहिली बैठक महाराष्ट्र सदन,...