शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
Home Blog Page 1278

‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांची मुलाखत

मुंबई, दि. ६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘पर्यावरणपूरक गणेश उत्सव’ या विषयावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी शासनस्तरावर  प्रदूषण नियंत्रण महामंडळा मार्फत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या उपक्रमाबाबत डॉ. अविनाश ढाकणे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

ही मुलाखत गुरुवार दि. 7, आणि शुक्रवार 8 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

०००

उत्कृष्ट परसबागा निर्मितीसाठी शाळांमध्ये स्पर्धेचे आयोजन

मुंबई, दि. ६ : शाळांमध्ये परसबागा निर्माण करून त्यात उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण’ योजनेंतर्गत देण्यात आले आहेत. या अनुषंगाने राज्यात उत्कृष्ट परसबागा तयार होण्यासाठी आणि या उपक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट परसबाग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर आयोजित करण्यात येणार असून विविध निकषांच्या आधारे परसबागांचे 100 गुणांमध्ये मूल्यांकन करण्यात येणार आहे. उत्कृष्ट परसबागांना तालुका स्तरावर प्रथम क्रमांकासाठी पाच हजार रूपयांचे, जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकासाठी दहा हजार रूपयांचे तर राज्य स्तरावर प्रथम क्रमांकासाठी 51 हजार रूपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त प्रत्येक स्तरावर द्वितीय, तृतीय आणि प्रोत्साहनपर बक्षिसेही देण्यात येणार आहेत.

परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होऊन त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळणे, ताज्या भाजीपाल्याचा समावेश पोषण आहारात होऊन विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध होणे असे विविध चांगले हेतू साध्य होत आहेत. परसबाग उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये शासनाने उत्कृष्ट परसबाग स्पर्धा आयोजित केली होती. त्याचा परिणाम म्हणून राज्यामधील सुमारे 22 हजार 973 शाळांमध्ये परसबाग निर्माण झाल्या आहेत. हा प्रतिसाद पाहता चालू शैक्षणिक वर्षामध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्याचे उद्दिष्ट शासनाने निर्धारित केले आहे.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ देवनार येथे लेदर पार्क उभारणार

मुंबई, ‍‍दि. ६ : चर्म व्यवसायवाढीसाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्यावतीने (LIDCOM) विविध योजना राबविण्यात येत असून देशातील अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही क्लस्टर धोरण असावे यासाठी महामंडळाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच मुंबई देवनार येथे दोन एकर क्षेत्रावर महामंडळाच्या माध्यमातून लेदर पार्क  उभारण्यात येणार असल्याची माहिती संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली.

इंडियन फूटवेअर कॉम्पोनंट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (IFCOMA) यांच्यावतीने मुंबई येथे नुकतेच दोन दिवसाच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन इंडियन फूटवेअर कॉम्पोनंट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (IFCOMA) चे पश्चिम विभागाचे व्यवस्थापकीय संचालक नरेश बसीन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कौन्सिल फॉर लेदर एक्सपोर्ट चेन्नईचे कार्यकारी संचालक आर सेलव्हम (भा.प्र.से), फुटवेअर डिझाईन अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटचे सचिव पंकज कुमार सिन्हा, मलिक ट्रेडर्स मुंबईचे एच. आर. मलिक उपस्थित होते.

या प्रदर्शनाच्या अनुषंगाने कौन्सिल फॉर लेदर एक्सपोर्ट यांनी चर्मोद्योग व्यवसायातील उद्योजकांची तसेच निर्यातदारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस देशभरातील 70 उद्योजक तसेच निर्यातदार उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यातील मौजे रातवड तालुका माणगाव येथे मेगा लेदर फुटवेअर अँड ॲक्सेसरीज क्लस्टरबाबत श्री. गजभिये यांनी उपस्थितांना माहिती दिली. राज्यात लिडकॉमच्यावतीने चर्म व्यवसायाच्या विकासासाठी सर्वांगीण प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांची उद्या मुलाखत

मुंबई, दि. ६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या एसटीची सध्या स्थिती कशी आहे, एसटीची पुढील धोरणे काय आहेत, एसटीकडून दिल्या जाणाऱ्या सवलती, बस स्थानकांचे आधुनिकीकरण अशा विविध विषयांची माहिती, शेखर चन्ने यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात दिली आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवार, ७ सप्टेंबर, 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई, दि. ६ : राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी ३५० रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या अनुदान वितरणाच्या पहिल्या टप्याचा शुभारंभ आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला.


पहिल्या टप्प्यात तीन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० कोटी रुपये एवढा निधी ऑनलाईन वितरित होणार आहे. उर्वरित अनुदान वितरणासाठी दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. कांदा अनुदानासाठी १० कोटी पेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर, यवतमाळ, अकोला, जालना, वाशिम या जिल्ह्यातील पात्र लाभार्थींच्या थेट बँक खात्यात अनुदान जमा होणार आहे.

कांदा अनुदानासाठी दहा कोटी पेक्षा जास्त मागणी असलेले नाशिक, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, बीड या जिल्ह्यातील पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात प्रत्येकी १० हजार पर्यत सर्वांना अनुदान जमा होईल. ज्या शेतकऱ्यांची १० हजार पर्यतची देयक आहेत त्यांना पूर्ण अनुदान मिळणार आहे. ज्या लाभार्थींचे देयक १० हजार रुपये पेक्षा जास्त आहे त्या लाभार्थींच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात प्रत्येकी १० हजार रुपये अनुदान जमा होणार आहे.

 

000

काशीबाई थोरात/विसंअ/

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेतून महेश निकम यांना मिळाली आर्थिक सुबत्ता

पाटण तालुक्यातील उरुल येथील शेतकरी महेश निकम यांना ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मिळालेल्या ६ लाखांच्या कर्जामधून त्यांनी गोठा चांगला सुसज्ज करुन २  गायी घेतल्या. यातून त्यांना महिन्याकाठी २५ ते ३०  हजारांचे हमखास उत्पन्न मिळत आहे, त्यांची ही यशोगाथा.

महेश निकम हे पाटण तालुक्यातील उरुल येथील शेतकरी असून ते बागायती साडेचार एकर क्षेत्रात ऊस उत्पादन करीत आहेत. या उत्पादनातून त्यांना वर्षाला एकदा पैसे मिळत होते. मिळालेले पैस वर्षभर पूरत नसल्याने त्यांना आर्थिक चणचण भासत होती. त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडील योजनांची माहिती घेऊन गोठा बांधकामासाठी व गायी विकत घेण्यासाठी कर्जाचा प्रस्ताव मल्हार पेठ येथील शिव दौलत बँकेकडे सादर केला.

बँकेने कागदपत्रांची पडताळणी करुन श्री. निकम यांना ६ लाखांचे कर्ज दिले. या कर्जावर अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाकडून १२  टक्के व्याज परतावा दिला जात आहे. श्री. निकम यांनी ३  लाख रुपये खर्चून सुसज्ज असा गोठा बांधून उर्वरित तीन लाखाच्या 2  गायी घेतल्या आहेत. गायी साधरणत: दररोज किमान २५  ते ३०  लिटर दूध देत आहेत. हे दूध डेअरीला घालत असल्याचे सांगून १५  दिवसाला या डेअरीकडून दूधाचे पैसे पेड केले जात आहे. साधरणत: खर्च वजा जाता  महिन्याला २५  ते ३०  हजार रुपांचा निव्वळ नफा होत असल्याचेही श्री. निकम सांगतात.

कर्ज योजनेच्या लाभाबाबत सांगत आहेत शेतकरी महेश निकम…

गोठ्याची साफसफाई व गायींची देखभ मी आणि माझी पत्नी करीत आहे. या महामंडळाच्या योजनेमुळे माझी आर्थिक परिस्थिती सुधारली असून जीवनमानातही बदल झाला आहे. महामंडळाकडील योजनांमुळे अनेक मराठा समाजातील तरुण उद्योजक तसेच छोटे मोठे व्यवसाय सुरु करु शकले आहेत. उपलब्ध नोकऱ्या पाहता मराठा समाजातील युवक-युवतींनी नोकरीच्या मागे न लागता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकील योजनेचा लाभ घेऊन आपला व्यावसाय सुरु करावा असेही श्री. निकम आर्वजुन सांगतात.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे आत्तापर्यंत ९  हजार ७१५  नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यापैकी ४ हजार ७१४ लाभार्थ्यांना ४१०  कोटींचे कर्ज बँकेमार्फत वितरण करण्यात आले असून यावर महामंडळाकडून ३१ कोटी रुपयांचा व्याजपरतावा देण्यात आला आहे. उद्योग व छोटे व्यवसाय उभारणीसाठी जिल्ह्यातील मराठा समाजाततील युवक-युवतींनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, बॉम्बे रेस्टॉरंट उड्डण पुलाजवळ, सातारा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सन्मवय मयुर घोरपडे यांनी केले.
००००

-वर्षा पाटोळे
जिल्हा माहिती अधिकारी, सातारा

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी मंडळांनी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 06 : राज्य शासनाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी नोंदणी करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून राज्यातील नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तातडीने नावनोंदणी करुन यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. नावनोंदणी करण्याचा अंतिम दिनांक हा 15 सप्टेंबर, 2023 असा आहे.

राज्यात 19 सप्टेंबर 2023 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना अनुक्रमे पाच, अडीच आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत अधिकाधिक नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवावा. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेल आयडीवर अथवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात 15 सप्टेंबर 2023 पर्यंत नोंदणी करावी. स्पर्धेची अधिक माहिती आणि अर्ज htttp://pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावरही उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि पु. ल. देशपांडे कला अकादमीचे संचालक संतोष रोकडे यांनी दिली आहे.

राज्यात सन 2022 मधील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात आले होते. त्या अनुषंगाने सन 2023 मध्ये राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य समितीकडे जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या 44 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी वरीलप्रमाणे तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळांव्यतिरिक्त उर्वरित 41 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

या पुरस्कारांसाठी निवड होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी विविध निकष असतील. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. या स्पर्धेसाठी पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट (थर्मोकोल, प्लास्टिक विरहीत), ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन आदी समाजप्रबोधन, सामाजिक सलोख्यासंदर्भातील सजावट, देखावा, स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्ताने सजावट, देखावा, गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबिर, वर्षभर गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण रक्षण, सेंद्रीय शेती, सौर ऊर्जेबद्दल जागरुकता निर्माण करणे, रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) चालविणे, वैद्यकीय केंद्र चालविणे आदी सामाजिक कार्य, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आरोग्य आदीबाबत केलेले कार्य, महिला, ग्रामीण भागातील वंचित घटकांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक आदीबाबत केलेले कार्य, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, पारंपरिक, देशी खेळांच्या स्पर्धा, गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा उदा. पाणी, प्रसाधनगृह, वैद्यकीय प्रथमोपचार, वाहतुकीस अडथळा येणार नाही, असे आयोजन, आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छता अशा विविध निकषांसाठी गुणांकन दिले जाणार आहे.

विजेत्यांच्या निवडीसाठी जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी या समितीचा अध्यक्ष असेल. याशिवाय या समितीत शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी सदस्य असतील, तर जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव असतील. निवड समिती प्रत्यक्ष उत्सवस्थळी भेट देतील तसेच मंडळाकडून व्हीडीओग्राफी व कागदपत्र जमा करुन घेतील. जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येईल. सदर समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या 4 जिल्ह्यातून प्रत्येकी 3 व अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी 1 उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्यांची नावे सर्व कागदपत्र व्हीडीओसह राज्य समितीकडे सादर करेल.

अधिक माहितीसाठी नोंदणीकृत गणेश मंडळांनी संपर्क क्रमांक 8169882898, 022-243122956 / 022-24365990 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत ( सकाळी 10 ते सायंकाळी 6) अथवा स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

००००

दीपक चव्हाण/विसंअ

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि ६ :- पुणे जिल्ह्यातील लोहगाव परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने लोहगाव येथील सहा एकर जागेत १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व निवासस्थानांचे बांधकाम करण्यात येत आहे. सद्यस्थितीत ९० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित कामे जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

पुणे जिल्ह्याच्या लोहगाव (ता. हवेली) येथील उपजिल्हा रुग्णालय व निवासस्थान बांधकामाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आज घेतला. बैठकीस आमदार सुनील टिंगरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, पुण्याचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, उपजिल्हा रुग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून लोहगाव परिसरातील जनतेला आरोग्यसेवा पुरविण्यात येणार आहेत. रुग्णालयाचे बांधकाम, आतील साधनसामुग्री इतर सोयीसुविधा, रुग्णांवर उपचारासाठी साधने, आरोग्य यंत्रणा, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात यावी, असे  निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

0000

नीलेश तायडे / विसंअ

येरवडा आणि हवेली येथील औद्योगिक संस्थांना उपयुक्त व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. ६ :- पुण्यातील येरवडा येथे मान्यता देण्यात आलेल्या नवीन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि हवेली येथील शासकीय औद्योगिक संस्थांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पुणे येथील औद्योगिक संस्थांना उपयुक्त ठरणारे व्यावसायिक अभ्यासक्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये सुरू करावेत, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यानी दिली.

मंत्रालय येथे आयोजित कौशल्य विकास विभागाच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते.

या बैठकीला कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता  विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सुनील टिंगरे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, मुख्य अभियंता अतुल चव्हाण उपस्थित होते

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, येरवडा येथील नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कामासंदर्भात सुनियोजित आराखडा तयार करावा. विद्यार्थ्यांना आयटीआयमधील पारंपरिक अभ्यासक्रम शिकवण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व स्थानिक गरजा विचारात घेऊन ‘इंडस्ट्री फोर झिरो’ अंतर्गत रोबोटिक्स, सीएनएस मशीन हॅण्डलिंग, मेकॅनिक्स हे अभ्यासक्रम या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सुरू करण्याबाबत सर्व मान्यता घेण्यात याव्यात व त्याप्रमाणे कार्यवाही करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी प्राप्त होताच तत्काळ या कामांना गती द्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केल्या.

0000

संध्या गरवारे/विसंअ

महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली,  दि. 05 : शालेय, उच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने  सन्मानित करण्यात आले.

शैक्षणिक मोबाईल ॲप, उच्च गुणवत्तापूर्ण ई-सामग्री निर्मिती, दृश्य व श्राव्य सामग्री निर्मिती, संगणक, दूरचित्रवाणी, यू-ट्यूब, आकाशवाणी, सॉफ्टवेअर, हार्डवेअर आदींचा उपयोग करून शालेय शिक्षण सुलभ, गुणात्मक आणि संशोधनात्मक बनविणाऱ्या  शिक्षकांना  सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय शिक्षक दिना’च्या निमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्रदान  समारंभाचे आयोजन करण्यात आले.  यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शालेय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह आदी उपस्थित होते.

 यावेळी, महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष 2023 चे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. यामध्ये  शालेय विभागात आंबेगाव पुणे येथील, जिल्हा परिषद शाळेच्या मृणाल नंदकिशोर गांजाळे, उच्च शिक्षण विभागात व्हीजेटीआय मुंबईतील केशव काशिनाथ सांगळे, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन आणि संशोधन संस्थेतील डॉ.चंद्रगौडा रावसाहेब पाटील, आयआयटी मुंबईतील डॉ. राघवन बी. सुनोज तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागात मुंबईतील लोअर परेल येथील गव्हर्नमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या शिल्पनिदेशक, स्वाती देशमुख या शिक्षकांचा समावेश आहे.

श्रीमती मृणाल गांजाळे

पुणे येथील आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, पिंपळगाव महाळुंगे येथील उपक्रमशील शिक्षिका मृणाल गांजाळे-शिंदे यांना २०२३ या वर्षाचा शालेय विभागात राष्ट्रीय  शिक्षक पुरस्कार   (National Teachers’ Award 2023) प्रदान करण्यात आला. भारतातून 50 शिक्षकांची तर महाराष्ट्रातून एका शिक्षिकेची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांना यापूर्वी २०१९ मधील राष्ट्रीय आय.सी.टी. पुरस्कार व २०२२ मधील राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.

डॉ. राघवन बी. सुनोज

प्रा. राघवन बी. सुनोज मूळचे तिरुवनंतपूरमचे आणि आयआयटी मुंबईचे रसायनशास्त्राचे प्राध्यापक असून त्यांना अध्यापन आणि संशोधनासाठी सन २०२३ या वर्षाचा उच्च शिक्षण विभागात राष्ट्रीय  शिक्षक पुरस्कार  प्रदान करण्यात आला. रसायनशास्त्रामध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवले असून 2001 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूरकडून त्यांना सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार मिळाला आहे. वर्ष 2012 पासून ते रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

प्रो.केशव सांगळे

प्रा. केशव सांगळे यांना उच्चशिक्षणातील स्थापत्य अभियांत्रिकीमधील शैक्षणिक योगदान, संशोधन, शोधनिबंध, विद्यार्थी मार्गदर्शन, शैक्षणिक प्रशासन, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी संस्था, राज्य व राष्ट्रीयस्तरावर केलेली मदत, राज्य व देशातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम केल्याबद्दल सन 2023 या वर्षाचा उच्च शिक्षण विभागात राष्ट्रीय  शिक्षक पुरस्कार  प्रदान करण्यात आला आहे.

डॉ. चंद्रगौडा  रावसाहेब पाटील

डॉ. चंद्रगौडा रावसाहेब पाटील यांना उच्च शिक्षणातील तंत्रज्ञान वापर, समाज उपयोगी संशोधन तसेच नाविन्यपूर्ण व विद्यार्थीभिमुख शिक्षण पध्दतीचा विकास व वापरासाठी २०२३ या वर्षाचा उच्च शिक्षण विभागात राष्ट्रीय  शिक्षक पुरस्कार  प्रदान करण्यात आला.

स्वाती योगेश देशमुख  हस्तकला (क्राफ्ट्स कौशल्य) प्रशिक्षक

अत्यंत समर्पित आणि कुशल संगणक कौशल्य प्रशिक्षणात उल्लेखनीय कारकीर्दीची दखल घेत, स्वाती योगेश देशमुख यांना वर्ष 2023 चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यांना 22 वर्षांच्या प्रशिक्षण आणि मार्गदर्शन अनुभवासह, विद्यार्थ्यांना संगणक-संबंधित विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यास मदत करण्यासाठी त्यांच्या कौशल्याचा गौरव केला गेला. त्यांनी आजपर्यंत 500+ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण आणि मदत करून सर्वसमावेशकता आणि समर्पण दर्शविले आहे.

       या वर्षापासून, राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची व्याप्ती वाढवून उच्च शिक्षण विभाग आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या शिक्षकांचाही यात समावेश करण्यात आला आहे. यावर्षी 50 शालेय शिक्षक, उच्च शिक्षण विभागातील 13 शिक्षक आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या 12 शिक्षकांचा या पुरस्काराने पुरस्कृत केले आहे. गुणवत्तेचे प्रमाणपत्र, 50,000 रुपये आणि एक पदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

०००००

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 167, दि.05.09.2023

 पुरस्कार विजेत्यांबाबतची माहिती-

श्रीमती मृणाल गांजाळे

श्रीमती मृणाल गांजाळे- शिंदे यांनी अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञानाचा अभिनव वापर जगभरातील विद्यार्थ्यांना व्हर्चुअल प्रकारे शिक्षणाचे आदान-प्रदान, गेमी फिकेशन इन एज्युकेशन प्रकल्प, असे वेगवेगळे तंत्रज्ञानावर आधारित प्रयोग केले. ऑनलाइन शिक्षण, इतर देशातील शाळांशी थेट विद्यार्थ्यांचा संवाद, वेबसाइट मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर, राज्यातील इतर शिक्षकांना प्रशिक्षण, कोरोना काळात शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन अत्याधुनिक शिक्षण दिले. त्यांचे सन २०१९-२०२० या वर्षात इयत्ता पाचवीमध्ये शिष्यवृत्तीधारक १७ विद्यार्थी आणि ६ विद्यार्थी नवोदय २ विद्यालयासाठी निवड पात्र ठरले. प्रधानमंत्री विद्या वाहिनीवर शिक्षकांसाठी मार्गदर्शनपर सत्रात CIET-NCERT मार्फत तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले मागील वर्षी मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी देखील दिल्ली येथे त्यांच्या शैक्षणिक कामाचे कौतुक करून सन्मान केला. राष्ट्रीय आय.सी.टी मेला मध्ये देखील त्यांना पुरस्कार मिळालेला आहे.

डॉ. राघवन सुनोज

            डॉ.सुनोज यांनी सेंट जोसेफ स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केले असून, युनिव्हर्सिटी कॉलेज, तिरुवनंतपूरममध्ये शिक्षण घेतले आहे. डॉ. सुनोज यांनी बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमधून पीएच.डी प्राप्त केली. ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये संशोधन केल्यानंतर, ते वयाच्या 29 व्या वर्षी आयआयटी मुंबईमध्ये अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. डॉ. सुनोज यांना वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (CISR) 2019 मध्ये प्रतिष्ठित ‘शांतीस्वरूप भटनागर विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार’ प्रदान केला आहे.

प्र. केशव सांगळे

            प्रा. सांगळे हे सध्या वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे  संरचना अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख आणि संस्थेचे शैक्षणिक अधिष्ठाता या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी स्थापत्य  अभियांत्रिकीमधील पदविका शासकीय तंत्रनिकेतन पुणे, पदवी व पदव्युतर पदवी शासकीय अभियांत्रिकी  महाविद्यालय,  कराड येथे घेतली. त्यांनतर त्यांनी पीएचडी ही पूर्ण केली.

डॉ. चंद्रगौडा पाटील

            डॉ. पाटील हे विद्यार्थ्यांना स्वत:च्या गतीने क्लिष्ट विषयाचे अवलोकन करता यावे यासाठी मागील दोन दशकांपासून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण उपकरणे, शैक्षणिक साहित्य व शिक्षण पध्दती विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असतात. डॉ. पाटील यांनी विकसित केलेले एक्स-कोलॉजी व कॅलफार्म नामक परस्पर संवादी सॉफ्टवेअर औषधनिर्माण, वैद्यकीय, पॅरामेडिकल व पशुवैद्यकीय क्षेत्रात अभ्यास करण्याऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरले आहे. या सॉफ्टवेअरच्या वापरामुळे शैक्षणिक उद्दिष्टासाठी केल्या जाणाऱ्या विच्छेदनाला आळा बसून देशातील हजारो प्राण्यांचे जीव वाचले आहेत. यापूर्वी डॉ.पाटील यांना होमिओपॅथी क्षेत्रातील संशोधन कार्याबद्दल भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून देण्यात येणारा एक लाख रुपयांचा युवा वैज्ञानिक पुरस्कार प्राप्त झालेला असून डॉ.पाटील यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

 

श्रीमती स्वाती देशमुख

श्रीमती स्वाती देशमुख यांनी 4 सप्टेंबर 2010 पासून मुंबईतील सरकारी आयटीआय  लोअर परेल येथे संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग (COPA)असिस्टंट ट्रेडच्या क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी संस्थेचे संकेतस्थळ विकसित करून, शैक्षणिक यू ट्यूब व्हीडिओ तयार करून आणि संगणक-आधारित प्रशिक्षण (CBT) मॉड्यूल डिझाइन करून त्यांच्या संस्थेच्या तांत्रिक प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. याव्यतिरिक्त, प्रशिक्षणार्थींसाठी एक ई-लायब्ररी स्थापन केली आहे. डिजिटल शिक्षण संसाधनांचा प्रचार केला आहे. श्रीमती देशमुख यांनी संस्थेमध्ये हाय-टेक, इंटरनेट-सक्षम कॉम्प्युटर लॅबची स्थापना करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे व प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शिक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संसाधने उपलब्ध करण्यात तसेच विविध सक्षम विद्यार्थ्यांचे सक्षमीकरणात व रोजगार सुरक्षित करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यात दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत.

********

ताज्या बातम्या

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा -पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधुदुर्गनगरी दि २१ (जिमाका):- सततच्या पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरूस्तीची कामे २५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण...

पालकमंत्री नितेश राणे यांनी साधला उपोषणकर्त्यांशी संवाद

0
NHM काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि. २१ (जिमाका) :-  नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. रुग्णांना सेवा देताना कोणत्याही प्रकारची...

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती...

0
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता मुंबई दि २१ : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची...

महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन

0
नवी दिल्ली, दि.21 : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश...

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले...

0
मुंबई, दि २१ : केंद्राचे अमृत अभियान त्याचप्रमाणे नगरोत्थान महाभियानातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ...