शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
Home Blog Page 1276

राज्यातील आदिवासी दिव्यांगांच्या वैद्यकीय उपचार व शस्रक्रियांचा खर्च शासनामार्फत करणार -डॉ विजयकुमार गावित

नंदुरबार : दिनांक 7 सप्टेंबर 2023 (जिमाका वृत्त) – दिव्यांग बाधवांच्या कल्याणासाठी शासन संवेदनशील असून राज्यातील 17 आदिवासीबहुल जिल्ह्यातील आदिवासी दिव्यांग बांधवांच्या वैद्यकीय उपचार, विविध शस्रक्रियांचा खर्च आदिवासी विकास विभागामार्फत केला जाईल, अशी घोषणा आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केली आहे.

ते आज नंदुरबार शहरातील श्री छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात आयोजित दिव्यांगांच्या दारी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हा परिषद सभापती हेमलता शितोळे, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, समाज कल्याण उपायुक्त सुंदरसिंग वसावे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राकेश वाणी, तहसीलदार नितीन गर्जे, विविध शासकीय यंत्रणांचे प्रमुख दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी व दिव्यांग बांधव यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी पाच टक्के निधीची तरतूद करण्यात आली आहे, परंतु एवढ्यावरच न थांबता जिल्हा नियोजन समिती व जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांग बांधवांसाठी पाच टक्के निधी राखीव ठेवला जाईल. तसेच राज्यातील आदिवासी बहुल 17 जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी विनामुल्य उपचार, वैद्यकीय शस्रक्रियेसाठी तरतूद करताना आदिवासी विकास विभागाच्या ज्या योजनांमध्ये दिव्यांग बांधवांचा समावेश करता येईल त्या प्रत्येक योजनेत त्यांचा समावेश करून थेट त्यांच्यापर्यंत लाभ देण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

पालकमंत्री झाल्यापासून जिल्ह्यातील सर्व शासकीय वैद्यकीय यंत्रणांना आपण गावनिहाय सर्वेक्षण करून प्रत्येक वंचितासाठी, दिव्यांगांसाठी काय गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. परिणामस्वरूप मधल्या काळात जिल्ह्यातील सुमारे तेराशे दिव्यांग बांधवांना विविध यंत्र व साहित्याचे वितरण करण्यात आले. येणाऱ्या काळात जिल्ह्यातील दिव्यांग बचत गटांना उभारी देण्याबरोबरच त्यांना समाजात, स्वाभिमानाने व सन्मानाने जगण्यासाठी उभारी देण्याचे काम शासन, प्रशासनामार्फत करण्यात येईल, असेही पालकमंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

दिव्यांगांचा उद्गार बनून प्रशासनाने काम करावे : ओमप्रकाश (बच्चू ) कडू

गेल्या कित्येक वर्षांपासून दिव्यांग बांधवांचे नेतृत्व करत असताना त्यांची जीवनशैली जवळून पाहता आली. सर्वसामान्यांच्या जगण्याच्या कल्पनेपलिकडे दिव्यांगांचे जगणे आहे. आपल्या एखाद्या अवयवाला दुखापत झाली तर आपण तीव्रतेने आपल्या भावना व्यक्त करतो, पण दिव्यांग बांधवांना जन्मत:च एखादा अवयव नसतो ते निमुटपणे त्या कमजोरीची अपरिहार्यता स्विकारून जगण्यासाठी संघर्ष करत असतात. अशा या अभावग्रस्त, नि:शब्द दिव्यांग बांधवांच्या जीवनात प्रभाव निर्माण करण्यासाठी प्रशासनाने त्यांचा उद्गार बनून काम केले पाहिजे, असे आवाहन यावेळी दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश (बच्चू) कडू यांनी यावेळी केले.

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग कल्याण विभागाची निर्मिती केल्याबद्दल त्यांचे आभार मानताना श्री. कडू म्हणाले, दिव्यांगांच्या कल्याणासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करणारे व दिव्यांगांसाठी स्वतंत्र पाच टक्के आर्थिक तरतूद करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगांच्या संवेदना,भावना. गाऱ्हाणी मांडण्यासाठी दिव्यांगांसाठी सांकेतिक भाषा तज्ञाची नेमणूक करण्यासाठी प्रयत्नशील असून जिल्हास्तरावर सुरूवातीला कंत्राटी पद्धतीने अशा तज्ञाची नेमणूक करावी त्याचा नंबर सर्वत्र उपलब्ध करून दिला तर शासन, प्रशासन स्तरावरच्या दिव्यांग बांधवांच्या बहुतांश संवादातील अडथळे दूर होतील, त्यांच्या संवेदना, भावना थेट पोहचण्यास मदत होईल. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक विभागाने एक दिवस दिव्यांगासाठी उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या अडचणी स्थानिक पातळीवरच सोडवण्यासाठी मदत होवू शकेल. दिव्यांगांसाठी शाळा, घरकुल, शॉपिंग मॉल यासारख्या संकल्पना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून पुढे येत आहेत, वंचितांच्या विकासासाठी देशात नावारूपाला आलेला नंदुरबार जिल्हा येणाऱ्या काळात दिव्यांग विकासाचा आदर्श बनून पुढे येईल, असा विश्वास व्यक्त करताना शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्य दिव्यांग बांधवांसाठी असल्याचे यावेळी दिव्यांग विभागाचे अध्यक्ष तथा आमदार श्री. कडू यांनी सांगितले.

विजयतर आहातच, पण खऱ्या अर्थाने तुम्हीडॉ. विकास गावित

या कार्यक्रमात राज्याचे आदिवासी विकास व पालकमंत्री मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कार्य-कर्तृत्वाचा गौरव करताना दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष श्री. कडू यांनी त्यांचा ‘डॉ. विकास गावित’ म्हणून उल्लेख केला. ते म्हणाले तुमच्या नावातच विजय आहे पण कामात तुमच्या विकासाचा ध्यास आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्ही डॉ. विकास गावित या नावाचे धनी आहात.

सांकेतिक भाषा तज्ञाची नेमणूक करणार

जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी सांकेतिक भाषा तज्ञाची नेमणूक करण्याची मागणी कार्यक्रमात आमदार  श्री. कडू यांनी केली. या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी जिल्ह्यातील प्रमुख कार्यालये, शासकीय आरोग्य संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांनध्ये सांकेतिक भाषा तज्ञाची नियुक्ती करणार असून त्यासाठी तात्काळ शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचे यावेळी सांगितले.

यावेळी प्रास्ताविक करताना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जिल्ह्यातील दिव्यांग कल्याणासाठी केल्या जाणाऱ्या उपक्रमांची व नियोजनाची माहिती सांगून दिव्यांगांच्या दारी कार्यक्रमाची संकल्पना विषद केली.

यांना दिला जागेवरच लाभ

यावेळी मान्यवरांकडून दिव्यांग लाभार्थ्यांना विविध शासकीय विभागाच्या योजनांचा लाभ देण्यात आला.

दिव्यांग जोडप्यांना प्रोत्साहन अनुदान

♿️ विलास वसावे

♿️ श्रीमती रविताबेन विजय वसावे.

 

विविध यंत्रांचे वितरण

श्रवणयंत्र:

♿️गणेश वळवी

♿️ पियुष गावित

♿️ नैतिक वसावे

♿️ केतेश्वर गावित

♿️ तन्मय वळवी

♿️ अश्विन वळवी

♿️ विकास वसावे

 

व्हीलचेअर

♿️ वेदांत चौधरी

 

हॅंडीकॅप स्टिक

♿️ श्रावण चव्हाण

♿️भाऊसाहेब बच्छाव

 

व्यवसाय कर्ज वितरण

♿️ अरुणा पाटील

♿️ आशाबाई भिल

♿️कुसुमबाई पाटील

 

संजय गांधी निराधार योजना

♿️ मुद्दस्सर खान वाहीद खान

♿️ गिरीष वसावे

♿️ मृणाली बोरसे

♿️ संजय पावरा

 

आनंदाचा शिधा व इरेशन कार्ड प्रमाणपत्र

♿️ मोहम्मद खलील इस्माईल मोमीन

♿️विजय ठाकरे

 

शबरी आवास योजना

♿️गजमल वळवी

♿️ ताराबाई गावित

♿️ मुकेश पवार

♿️ निर्मला ठाकरे

 

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत नवीन विहीरींसाठी अनुदान

♿️भावजी पाडवी

 

♿️ ठिबक संच : मदन बेलदार

♿️ ट्रॅक्टर : गणेश बावा

राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

ठाणे, दि.7 (जिमाका) :- राजे उमाजी नाईक जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास तहसीलदार युवराज बांगर यांच्यासह उपस्थित अभ्यागत, अधिकारी, कर्मचारी यांनीही पुष्प वाहून अभिवादन केले.

महाड येथे २०० खाटांचे रूग्णालय उभारण्याची कार्यवाही करा – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

मुंबई, दि. 7:  रायगड जिल्हा मोठा असून डोंगराळ प्रदेशाचा आहे. या जिल्ह्यात नागरिकांना सहज आरोग्य  सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आरोग्य सुविधा वाढविण्याच्या अनुषंगाने महाड येथे 200 खाटांचे रूग्णालय उभारण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिले.

मंत्रालयीन दालनात महाड येथे रुग्णालय उभारण्याबाबत आयोजित बैठकीत मंत्री डॉ. सावंत आढावा घेताना बोलत होते. बैठकीस आमदार प्रविण दरेकर, अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर,  सहसचिव अशोक आत्राम, सहसंचालक विजय कंदेवाड, विजय बावीस्कर आदी उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यातील परसुळे (ता. पोलादपूर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात निधीची उपलब्धता आणि कार्यवाही करण्याचे निर्देशही मंत्री डॉ. सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.  बैठकीत आशा कार्यकर्त्या यांना विमा संरक्षण देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मंत्री डॉ. सावंत यांनी दिल्या. तसेच 18 वर्षावरील पुरुषांची आरोग्य तपासणी मोहीम, आपला दवाखाना रूग्णसंख्या व सद्यस्थिती, खरेदी प्राधिकरण, धर्मादाय रूग्णालय ॲप, आरोग्य विभागाचे नवीन मंडळ कार्यालय स्थापन करणे आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीला आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

विकास कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करावीत; मात्र कामे दर्जेदार व्हावीत – पालकमंत्री शंभूराज देसाई

ठाणे, दि. 05(जिमाका) :- जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक योजनेत सन 2023-24 वर्षासाठी जिल्ह्याला वाढीव निधी मिळाला आहे. हा निधी 100 टक्के खर्च होणे अपेक्षित आहे, त्यासाठी ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर्व विहीत कार्यवाही पूर्ण करुन कामांना सुरुवात करावी, कोणत्याही परिस्थितीत ही कामे डिसेंबर पर्यंत पूर्ण व्हायला हवीत, मात्र ही कामे दर्जेदार असावीत,  असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे दिले.
  जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत विविध शासकीय यंत्रणांचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
     यावेळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री गणपत गायकवाड, निरंजन डावखरे, रमेश पाटील, संजय केळकर, कुमार आयलानी, शांताराम मोरे, रईस शेख, दौलत दरोडा, डॉ.बालाजी किणीकर, विश्वनाथ भोईर, श्रीमती गीता जैन, जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख, भिवंडी महापालिका आयुक्त अजय वैद्य, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी तसेच विविध शासकीय विभागांचे विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख आदी उपस्थित होते.
     जिल्हा वार्षिक नियोजन समिती निधीचा विनियोग व पुढील काळातील नियोजन याचा सविस्तर आढावा यावेळी घेताना पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, ठाणे जिल्ह्याला गेल्या वर्षीपेक्षा यंदा 132 कोटी रुपये जास्तीचे मिळाले आहेत. जानेवारी 2024 नंतर कधीही आचारसंहिता लागू शकते. याचा अंदाज घेता हा निधी यंदा डिसेंबर अखेरपर्यंत खर्च करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रशासकीय मान्यतेसाठी परिपूर्ण प्रस्ताव सप्टेंबरअखेर पर्यंत सादर करावेत. कोणत्याही परिस्थितीत ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर्व विहीत कार्यवाही पूर्ण करुन कामांना सुरुवात व्हायला हवी आणि ही कामे डिसेंबर पर्यंत पूर्ण व्हायला हवीत, हे करीत असताना कामे दर्जेदार होतील याकडेही कटाक्षने लक्ष द्यावे. चांगल्या प्रतीची लोकोपयोगी कामे करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.
     यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत बोलताना श्री. देसाई यांनी सांगितले की, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याशी चर्चा करुन याबाबत स्वतंत्र आढावा बैठक घेण्यात येईल.
       यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी ठाणे जिल्ह्यातील वाढत्या अनधिकृत बांधकामाविषयी चिंता व्यक्त केली. याबाबत श्री. देसाई यांनी जिल्हाधिकारी, सर्व महापालिका आयुक्त, प्रांताधिकारी व तहसिलदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सुरु असलेली अनधिकृत बांधकामे आहेत त्या परिस्थितीत तात्काळ थांबवावीत, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, असे आदेश दिले.
    बैठकीच्या सुरुवातीस पालकमंत्री महोदय व इतर उपस्थित सर्व समिती सदस्यांचे स्वागत करुन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सभागृहास  जिल्हा वार्षिक नियोजन निधीची माहिती दिली. जिल्हा वार्षिक योजनेतून सन 2022-23 या वर्षासाठी 618 कोटी इतका मंजूर निधी संपूर्ण खर्च झाला. यंदा सन 2023-24 साठी 750 कोटीचा नियतव्य मंजूर झाला असून गेल्या वर्षीपेक्षा 132 कोटी वाढीव मिळाले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या योजना, आरोग्य सुविधा, नगरपालिका क्षेत्र, शाळा दुरुस्ती, महिला व बालकल्याण, पोलीस यंत्रणा, गतिमान प्रशासन यासाठी वाढीव निधी मंजूर झाला आहे. तसेच यंदा नव्याने गड किल्ले संवर्धनासाठी जिल्ह्यास 16 कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी यावेळी दिली. यानंतर जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी  जिल्हा नियोजन समितीच्या दि. 11 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त व त्याचा अनुपालन अहवाल सभागृहासमोर मान्यतेसाठी सादर केला.
लाभार्थ्यांना “आनंद शिधा” किट चे वितरण
बैठकीच्या सुरुवातीस काही लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात “आनंद शिधा” किट चे वितरण पालकमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे यांनी याकरिता समन्वय साधला.
जिल्हा नियोजन निधीतून शासकीय कार्यालयांना “वाहन”
यावेळी जिल्हा पुरवठा कार्यालयासह अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड, मिरा-भाईंदर या तहसील कार्यालयांसाठी जिल्हा नियोजन निधीतून खरेदी करण्यात आलेल्या नव्या शासकीय वाहनाच्या चाव्या पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या.
     बैठकीचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन जिल्हा नियोजन अधिकारी श्री. वैभव कुलकर्णी यांनी केले. या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी संगिता पाटील, लेखाधिकारी संतोष जाधव, सहाय्यक संशोधन अधिकारी विपुला कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
0000000000

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ६ : – ओबीसी बांधवांवर अन्याय न करता, त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे स्पष्ट केले आहे.

वर्षा शासकीय निवासस्थानी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पण काही मंडळी दिशाभूल करताहेत. मराठा समाज आणि ओबीसी बांधवांमध्ये मतभेद, तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत हे दुर्देवी आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला एसईबीसी म्हणून १२ आणि १३ टक्के आरक्षण दिले होते. हे आरक्षण उच्च न्यायालयातही टिकले होते. त्यामध्ये कुठेही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नव्हता. पण दुर्दैवाने हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाले. मध्यंतरी तत्कालीन सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्यावर योग्य पद्धतीने बाजू मांडली गेली नाही, याची मराठा समाजाला कल्पना आहे, असेही त्यांनी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठा समाजाचे हे रद्द झालेले आरक्षण पुन्हा परत मिळावे यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील. ते आम्ही करणार आहोत. सर्वोच्च न्यायालयात देखील आपली क्युरेटिव्ह याचिका प्रलंबित आहे. त्याबाबतही विनंती करणार आहोत. त्याचबरोबर समाज हा सामाजिक मागास आहे, हे सिद्ध करण्यासाठी स्वतंत्र आयोग नियुक्त केलेला आहे. त्याचबरोबर अनेक नामवंत तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन केला आहे. त्यामध्ये अॅड. हरिष साळवी यांच्या सारखे ज्येष्ठ विधीज्ज्ञ देखील आहेत. या सगळ्यांची मदत आहे. मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी शासन प्रयत्न करेल. यातून निश्चित मराठा समाजाचे हे रद्द झालेले आरक्षण परत मिळेल. मराठा समाजाला इतर कुठल्याही समाजाचे आरक्षण कमी न करता आरक्षण दिले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वस्त केले.

ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे असेच प्रयत्न सुरु आहेत. यात कुणीही या दोन्ही समाजातील बांधवांची दिशाभूल करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
00000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंडिता मालिनीताई राजूरकर यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. ६ : – शास्त्रीय संगीतातील एक दैवी सूर निमाला आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्वाल्हेर घराण्यातील ज्येष्ठ गायिका मालिनीताई राजूरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘आपल्या स्वरांनी ग्वाल्हेर घराण्यातील गायन वैशिष्ट्ये जग आणि देशभरात पोहचवणाऱ्या मालिनीताईंची आगळी ओळख होती. त्यांच्या निधनामुळे शास्त्रीय संगीतातील एक दैवी सूर निमाला आहे. ज्येष्ठ गायिका पंडिता मालिनीताई राजूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली,’ असेही मुख्यमंत्र्यांनी शोक संदेशात म्हटले आहे.
००००

मराठी भाषा विद्यापीठाच्या उभारणीला वेग देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि 6:- मराठी भाषा विद्यापीठाच्या उभारणीला वेग देण्यात येत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त वडाळा येथील महानुभाव श्री कृष्ण ज्ञान मंदिर येथे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी श्रीकृष्णाचे दर्शन घेतले व पूजाही केली. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, कविश्वर कुलभूषण आचार्यप्रवर श्रीविजयराज बाबा शास्त्री, राणीबाईजी शास्त्री, श्री राहुलदादाजी महानुभाव, धर्मकुमार प्रसाद महानुभाव तसेच
आनंद मेमोरियल चक्रधर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, चक्रधर स्वामी आणि महानुभाव पंथाचे कार्य मोठे असून हे कार्य आज सर्वत्र पोहोचले आहे. जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर श्री कृष्ण चरित्रात आपल्याला मिळते. त्यातून ऊर्जा मिळते तसेच जगण्याची दिशाही मिळते. महानुभाव पंथाच्या विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सोयी सुविधा उभारण्याच्या कामांनाही वेग देण्यात येत आहे. या तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास करुन भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असेही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.

—–000——

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मालिनीताई राजूरकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई, दि. 6 :- “ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मालिनीताई राजूरकर हे भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातलं दिग्गज व्यक्तिमत्वं होतं. देशविदेशात त्यांचे चाहते होते. मुंबईत गुणीदास संमेलनाच्या, पुण्यात सवाई गंधर्व महोत्सवासारख्या संगीत कार्यक्रमातली त्यांची उपस्थिती संगीत रसिकांचं मन जिंकून घेत असे. महाराष्ट्राबाहेर राहूनही महाराष्ट्राशी नातं सांगणाऱ्या या मराठमोळ्या नावानं कोट्यवधी रसिकांच्या मनावर अनेक दशकं अधिराज्य केलं.

संगीत नाटक अकादमी, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांसारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारानं सन्मानित मालिनीताई राजूरकरांचं निधन हा कोट्यवधी संगीत रसिकांसाठी मोठा धक्का, भारतीय संगीतक्षेत्राची मोठी हानी आहे. मी मालिनीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मालिनीताई राजूरकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

०००००००००००

‘शासन आपल्या दारी’ : नागपूरसाठी २० लाखांचे उद्दिष्ट

‘शासन आपल्या दारी’, या अभियानातून लोकोपयोगी योजनांचा लाभ थेट जनतेच्या घरात पोहोचावा, यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या मोहिमेला नागपूर जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पुढे आले आहे. स्वतः उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोहिमेसाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा पिंजून काढणे सुरू केले असून नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी प्रशासनाला 20 लाख लाभार्थ्यांचे लक्ष्य निश्चित केले आहे.

            राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते नागपूर जिल्ह्यात कार्यक्रम घ्यायचा असेल तर 20 लाख लाभार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचायला हवे, अशी साद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तथा प्रशासनाला घातली आहे. त्यामुळे प्रशासन गतीने कामाला लागले असून लवकरच हे उद्दिष्ट पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातून किमान 75 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला जावा, यासाठी जिल्हा, तालुकास्तरावर 2 दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे उद्दिष्ट या योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अभियानाच्या सुरुवातीलाच निश्चित केले होते. त्यावेळी मोजक्या कालावधीसाठी हे अभियान निश्चित करण्यात झाले होते.

            कालावधी वाढविल्यानंतर जिल्ह्यात या अभियानाची बांधणी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभियानाची पायाभरणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये केली आहे.नागपूर जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणा, उमरेड, काटोल, नरखेड, रामटेक, मौदा या सहा उपविभागात बैठकी घेऊन जिल्हा पिंजून काढला. त्यामुळे 75 हजार लाभार्थी उद्दीष्ट जून महिन्याच्या सुरुवातीलाच पूर्ण झाले आहे. तर नागपूर महानगरातील विधानसभानिहाय लाभ पोहोचविण्यासाठी आयोजन सुरू आहे. नुकताच मध्य नागपुरातील मेळावा उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. अन्य ठिकाणच्या आयोजनासाठी नागपूर जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, जिल्हा परिषद याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बारकाईने नियोजन सुरू आहे.

            तथापि, या योजनेतून शाश्वत विकासाच्या लाभार्थ्यांची संख्या वाढावी, कायमस्वरूपी रोजगार, घरे, व्यवसाय, नोकरी, रस्ते, पाण्याचे स्त्रोत, सौर ऊर्जेची उपलब्धता, विजेचे कनेक्शन, घरांचे पट्टे, कृषी योजनेतून दीर्घकाळासाठी कामी पडणाऱ्या यंत्रसामुग्रीचे आरोग्य यंत्रणेचा मोफत लाभ, अतिवृष्टी नुकसान भरपाई, जलयुक्त शिवार, अमृत सरोवर, पीएमकिसान, जलजीवन अभियान, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, माझी वसुंधरा अभियान, पांदन रस्ता, रोजगार हमी योजना, सामाजिक अर्थ सहाय्य योजना, गाव तिथे स्मशानभूमी अशा शेकडो कायमस्वरूपी उपयोगी येणाऱ्या योजनांचा लाभ देण्याकडे शासन प्रयत्नशील आहे. काही समस्या या माध्यमातून कायमस्वरूपी सुटाव्यात हा देखील या अभियानाचा उद्देश आहे.

सामाजिक न्याय विभागाचा वेगळा प्रयोग

            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या पुढाकारात महाराष्ट्रामध्ये प्रथमच केवळ अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय घटकाच्या शेकडो लाभार्थ्यांना ‘शासन आपल्या दारी’ अभियानाअंतर्गत लाभ देण्याच्या कार्यक्रम जिल्हयात आयोजित करण्यात आला. ‘शासन आपल्या दारी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले होते. राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी अभियानाचे कौतुक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

                  या विभागांतर्गत असणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, धनगर घटकांच्या अनेक योजनांच्या माध्यमातून शेकडो लाभार्थ्यांना हा लाभ प्रत्यक्ष दिला. यावेळी सफाई कामगारांच्या वारसदारांना नुकसान भरपाईचे धनादेश वितरीत करण्यात आले. तसेच मार्जिन मनी योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना, रमाई आवास योजना, बचत गटांना मिनी ट्रॅक्टर वितरण, दिव्यांगांना सहाय्यक उपकरणे वितरण, यशवंतराव मुक्त वसाहत योजना, आश्रमशाळेच्या विद्याथ्र्याना टॅब वितरण, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत गावांना विकास कामांसाठी प्रत्येकी 20 लक्ष अनुदान, कन्यादान योजना, अनुसूचित जाती उपयोजना, निवासी शाळा व प्राविण्याप्राप्त विद्यार्थी तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव, आंतरजातीय विवाह योजनेंतर्गत जोडप्यांना प्रोत्साहन रकमेचे वितरण , महात्मा फुले मागासवर्ग मंडळातर्फे व्यावसायिकांना अर्थसहाय्य, स्वाधार योजनेचा लाभ, दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्रांचे, युडीआयडी वाटप आदी योजनांचा लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.

दिव्यांगांसाठी विशेष अभियान

            अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जाती, जमाती यांच्यानंतर आता दिव्यांगांसाठी ‘शासन आपल्या दारी’ विशेष अभियान राबविण्यात येणार आहे दिव्यांगांच्या योजना वैश्विक आधार कार्ड प्रमाणपत्र एकाच स्थळी देण्यासाठी जिल्हास्तरीय दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या अभियानाचा प्रारंभ जिल्ह्यामध्ये 25 सप्टेंबर पासून होणार आहे. जिल्हा परिषदेने यासाठी पुढाकार घेतला असून सामाजिक न्याय विभागामार्फत हे अभियान राबविण्यात येणार आहे.

25 लाख लाभार्थ्यांचे उद्दिष्ट

            नागपूर शहर, जिल्हा मिळून एकत्रित 25 लाख लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ पोहोचविण्याचे काम शासकीय यंत्रणेने करावे, असे उद्दिष्ट उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर राज्यव्यापी कार्यक्रम जिल्ह्यात घेण्यात येईल, त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहतील अशी सूचना प्रशासनाला केली आहे.

            जिल्हा प्रशासनाने या उद्दिष्टाकडे दमदार प्रवास सुरू केला आहे. नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये यापूर्वीच हजारो लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे. येत्या काही दिवसात या अभियाना अंतर्गत गाव पातळीवर देखील शिबिर आयोजित करण्यात येतील. स्वतः उपमुख्यमंत्र्यांनीच वस्तूपाठ घालून दिल्यामुळे प्रशासन गतिशील झाले आहे.

प्रवीण टाके

जिल्हा माहिती अधिकारी, नागपूर

चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार वैमानिक बनण्याची संधी – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबईदि. ६ : चंद्रपूर येथे होणाऱ्या फ्लाइंग क्लबमुळे या जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती – जमातीइतर मागास वर्ग आणि आदिवासी घटकातील विद्यार्थ्यांना वैमानिक होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे येथील फ्लाइंग क्लब तत्काळ सुरू करण्याची कार्यवाही करावीअशा सूचना वनेसांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

मंत्रालयात आज मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब सुरू करण्यासंदर्भात आढावा घेतला. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगेजिल्हाधिकारी विनय गौडा हरीश शर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याशिवायदूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूरहून विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरीएमएआयडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे उपस्थित होत्या.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीचंद्रपूर जिल्ह्यात फ्लाइंग क्लब झाल्याने येथील वैमानिक बनू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे  या संदर्भातील सर्व रीतसर परवानगी घेऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी किमान ३ शिकाऊ विमाने खरेदी करणे आवश्यक आहे. याशिवायसीएसआर फंडातून उद्योगपतींकडून अशी शिकाऊ विमाने मिळण्या संदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

चंद्रपूर विमानतळाचा वापर सध्या बंद आहे. त्यामुळे येथे फ्लाइंग क्लब सुरू केल्यामुळे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना नियमानुसार जे २०० तासांचे प्रशिक्षण देणे आवश्यक असतेते येथे देता येईल. विमानतळावरील सर्व आवश्यक सुविधांची पूर्तता विमानतळ प्राधिकरणाने कराव्यात. यासाठीचा सेवा रस्ता आणि इतर अनुषंगिक कामे राज्य शासन करेलअसेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

ताज्या बातम्या

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा -पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधुदुर्गनगरी दि २१ (जिमाका):- सततच्या पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरूस्तीची कामे २५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण...

पालकमंत्री नितेश राणे यांनी साधला उपोषणकर्त्यांशी संवाद

0
NHM काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि. २१ (जिमाका) :-  नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. रुग्णांना सेवा देताना कोणत्याही प्रकारची...

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती...

0
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता मुंबई दि २१ : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची...

महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन

0
नवी दिल्ली, दि.21 : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश...

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले...

0
मुंबई, दि २१ : केंद्राचे अमृत अभियान त्याचप्रमाणे नगरोत्थान महाभियानातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ...