मंगळवार, ऑगस्ट 19, 2025
Home Blog Page 1252

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

मुंबई, दि. १५ : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार दि. 16 सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते, त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जारी केला आहे.

या टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव २०२३, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल.
पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या देखील सूचना आहेत.

000

असा करावा सारथी शिष्यवृत्तीसाठी अर्ज!

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे ( SARTHI PUNE ) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेद्वारे छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता नववी दहावी व अकरावी च्या मराठा व कुणबी गटातील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सारथी शिष्यवृत्ती काय आहे? कुणासाठी आहे? पात्रता काय आहे? कागदपत्रे कोणती आवश्यक आहेत? अर्ज कसा व कुठे करावा लागेल? या विषयी संपूर्ण माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत.

छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी इयत्ता ९ वी, इयत्ता १० वी व इयत्ता ११ वी च्या मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा- कुणबी या लक्षित गटातील विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेऊन सादर करणे बाबत परिपत्रक व मार्गदर्शक सूचना छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे यांचे कडून मागविण्यात येतात.   SARTHI PUNE संस्थे कडून वरील मराठा कुणबी गटातील इयत्ता नववी ते अकरावी तील पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात प्रतिमहा 800 रुपये प्रमाणे वर्षाला एकूण 9600 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. इयत्ता ९ वी, १० वी व ११ वी मध्ये नियमित शिकत असलेल्या व छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीचा पात्र असणाऱ्या मराठा व कुणबी या लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज तालुका स्तरावर गट शिक्षण अधिकारी कार्यालयाकडे जमा करायचे आहेत. अर्ज करू इच्छिणाऱ्या इयत्ता ९ वी, १० वी व ११ वी तील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे अर्जाचा नमुना असतो.

छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीद्वारे इयत्ता ९ वी, इयत्ता १० वी इयत्ता ११ वी तील मराठा व कुणबी समाजातील पात्र विद्यार्थ्यांना प्रतिमहा 800 रुपये म्हणजेच एका शैक्षणिक वर्षात 9600 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. मराठा व कुणबी समाजातील आर्थिक परिस्थिती दुर्बल असणाऱ्या होतकरू किंवा हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Chhatrapati Rajaram Maharaj sarthi scholarship eligibility: छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी पात्रता खालीलप्रमाणे आहेत.

  • Sarthi Scholarship 2023-24 चा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा इयत्ता ९ वी, इयत्ता १० वी व इयत्ता ११ वी या वर्गात शिक्षण घेत असावा.
  • या शिष्यवृत्तीचा लाभमराठा, कुणबी, मराठाकुणबी व कुणबीमराठा या चार गटातील विद्यार्थी घेऊ शकतात.
  • राज्यातील सर्व शासकीय, शासनमान्य, अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत जी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, असे विद्यार्थी सारथी शिष्यवृत्ती करिता पात्र आहेत.
  • NMMS ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व केंद्र शासनाची शिष्यवृत्ती अपात्र असलेल्या व इयत्ता ९ वी मध्ये शिकत असलेल्या मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या लक्षित गटातील अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती मात्र समजण्यात येईल.
  • इयत्ता १० वी मध्ये नियमित शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी इयत्ता ९ वी मध्ये 55% टक्के गुणांसह वार्षिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • इयत्ता ११ वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १० वी मध्ये 60% गुणांसह वार्षिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • इयत्ता नववी मधील प्रस्तुत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. 3,50,000/- पेक्षा कमी असावे.  इयत्ता १० वी व ११ वी मधील प्रस्तुत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. 1,50,000/- पेक्षा कमी असावे.

खालील शाळेतील विद्यार्थी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती साठी अपात्र आहेत.

  • विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी तसेच स्वयं अर्थसहाय्यित शाळेतील विद्यार्थी व ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थी.
  • केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
  • जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
  • शासकीय वस्तीगृहाच्या सवलतीच्या भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधेचा लाभ घेणारे विद्यार्थी.
    सैनिक शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.

: आवश्यक कागदपत्रे

  • छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती साठी आवेदन करताना विद्यार्थ्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.                                                                                        
  • विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीत विहित नमुन्यात शिष्यवृत्तीस मागणी केलेला अर्ज. इयत्ता ९ वी, १० वी व ११ वी साठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.
  • मुख्याध्यापकांचे / प्राचार्यांचे स्वाक्षरीत विहित नमुन्यातील शिफारस पत्र.               
  • विद्यार्थ्यांच्या पालकांचा तहसीलदारांच्या स्वाक्षरीतील चालू वर्षातील उत्पन्नाच्या दाखल्याची सत्य प्रत.
  • विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची सत्य प्रत.
  • विद्यार्थ्यांचे स्वतःचे नावे बँक पासबुक च्या पहिल्या पानाची सत्य प्रत ( नाव, खाते क्रमांक, IFSC कोडसह नमूद असणे आवश्यक आहे.)
  • इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी इयत्ता ९ वी च्या वार्षिक परीक्षेत 55% गुणासह पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असलेल्या गुणपत्रिकेची सत्यप्रत.
  • इयत्ता ११ वी च्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १० वी च्या वार्षिक परीक्षेत 60% गुणासह पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असलेल्या गुणपत्रिकेची सत्यप्रत.
  • NMMS परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक/ निकाल पत्रक.
  • अन्य् अनावश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडण्याची आवश्यकता नाही.
  • शाळा स्तरावर अर्ज भरून कागदपत्रांसह गट शिक्षणाधिकारी कार्यालय येथे जमा करणे व ऑनलाइन लिंक वर माहिती भरता येते.
  1. गट शिक्षणाधिकारी यांनी तालुका स्तरावर अर्जाची छाननी व पडताळणी केलेले अर्ज माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना सादर करावे.
  2. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी सर्व अर्ज मा. व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, Sarthi Pune महाराष्ट्र ४११००४ या पत्त्यावर सादर करावे.

000000

विभागीय माहिती कार्यालय,

कोकण विभाग, नवी मुंबई

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची ९.३३ टक्के दराने परतफेड

मुंबई, दि. 15 :  महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2023 च्या अदत्त शिल्लक रकमेची 9.33 टक्के दराने 22 ऑक्टोबर 2023 पर्यंत देय असलेल्या व्याजासह 23 ऑक्टोबर 2023 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने कळविले आहे.

शासकीय विनियमानुसार दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरूपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करावे. त्यांच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँक शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

विकास कर्जधारकांनी लोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाल्याबाबत ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत. रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरूपात असल्यास ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेत. रोखेधारकांनी रोखे मुखांकित ठिकाणी अथवा नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात पाठवावीत, असे वित्तिय सुधारणाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकाद्वारे सूचित केले आहे.

०००

राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांवर आधारित कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून १७ सप्टेंबरला प्रसारण

मुंबई, दि. 15 : क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचे वितरण नुकतेच मुंबईत झाले. या सोहळ्यावर आधारित विशेष कार्यक्रमाचे प्रसारण मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून रविवार दि. 17 सप्टेंबर रोजी सायं. 7.30 ते 8.30 या वेळेत करण्यात येणार आहे.

समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या आणि त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार देण्यात येतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 108 शिक्षकांना 5 सप्टेंबर रोजी एनसीपीए सेंटर, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा कार्यक्रम राज्यात सर्वांना पाहता यावा यासाठी पुरस्कार सोहळ्यावर आधारित एक तासाच्या विशेष कार्यक्रमाचे प्रसारण मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून येत्या रविवारी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची दूरदर्शन निर्मिती वैष्णो व्हिजनचे निर्माता दिग्दर्शक जयू भाटकर यांनी केली आहे, अशी माहिती शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

 

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १७ सप्टेंबर रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण

औरंगाबाद, दि. 14 (विमाका) :-  मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त रविवारी 17 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता औरंगाबाद महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील स्मृती स्तंभाजवळ ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

सकाळी 8.45 वाजता कार्यक्रमाला सुरूवात होईल. मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण करणे, परेडच्या पोलीस प्लाटूनकडून शोक सलामी, स्मृतीस्तंभास पुष्पचक्र, पोलीस बँड पथकाकडून हुतात्म्यांना मानवंदना असे कार्यक्रम ध्वजारोहणापूर्वी होणार आहेत.

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे निमंत्रीतांची भेट घेतील व चित्रप्रदर्शनास भेट देणार आहेत. अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

ज्या शासकीय तसेच निमशासकीय आस्थापनांना आपला ध्वजारोहणाचा कार्यक्रम करावयाचा असेल त्यांनी असा कार्यक्रम मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या अर्धा तास अगोदर किंवा अर्धा तास नंतर करावा, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

*****

जी-२० अंतर्गत आर्थिक समावेशनासाठी जागतिक भागीदारीची चौथी बैठक मुंबईत सुरु

            मुंबई, दि. 14 : मुंबईत आजपासून 16 सप्टेंबर 2023 पर्यंत जी 20 अंतर्गत आर्थिक समावेशनासाठी जागतिक भागीदारीची (जीपीएफआय) चौथी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या  बैठकीत, जीपीएफआयद्वारे राबवण्यात येत असलेल्या तीन वर्षांच्या आणि आता अंतिम वर्षात असलेल्या आर्थिक समावेशन कृती योजना 2020 च्या उर्वरित कामावर चर्चा समाविष्ट असेल. डिजिटल आर्थिक समावेशन तसेच लघु आणि मध्यम उद्योगांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होईल.

            या बैठकीपूर्वी 14 सप्टेंबर 2023 रोजी एमएसएमईना सक्षम करण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा यासंदर्भात  एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि आर्थिक समावेशन ही बैठकीशी संबंधित कार्यक्रमांपैकी एक मालिका असून जीपीएफआय कार्यगटाअंतर्गत भारताच्या जी 20 अध्यक्षतेने आयोजित केली आहे. वित्त मंत्रालयाचे (आर्थिक व्यवहार) सचिव अजय सेठ, रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी. रबी शंकर, (आंतरराष्ट्रीय वित्त निगम) उपाध्यक्ष मोहम्मद गौलेद तसेच एलडीसी वॉचचे जागतिक समन्वयक आणि अमेरिकेतील नेपाळचे माजी राजदूत डॉ. अर्जुनकुमार कार्की यांनी या परिसंवादात आपले विचार मांडले.

            “डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांद्वारे उच्च आर्थिक वृद्धीसाठी एमएसएमई” आणि “पतहमी आणि एसएमई कार्यक्षेत्र” या दोन प्रमुख विषयांवर आंतरराष्ट्रीय तज्ञांचा समावेश असलेला परिसंवाद झाला. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांद्वारे एमएसएमईला उर्जा देण्यासंदर्भातील पहिल्या परिसंवादाचे  संचालन एसएमई फायनान्स फोरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅथ्यू गेमर यांनी केले. या परिसंवादात भारतीय लघु उद्योग विकास बँकेचे (सिडबी) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिवसुब्रमण्यम रामन, भारतीय स्टेट बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी कुमार तिवारी, सहमतीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बी. जी. महेश, एफएमओचे मुख्य कार्यकारी अधिकारी मायकेल जोंगनील,  मास्टरकार्डच्या लघु आणि मध्यम उद्योग कार्यकारी विभागाच्या उपाध्यक्ष जेन प्रोकोप यांनी सहभाग घेतला. समृद्ध करणाऱ्या चर्चेने एमएसएमईच्या आर्थिक समावेशनाला झपाट्याने पुढे नेण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या  भूमिकेबद्दल मौल्यवान मुद्दे समोर आले.

            इजिप्तच्या पतहमी कंपनीच्या (सीजीसी) व्यवस्थापकीय संचालक नागला बहर यांनी पतहमी आणि लघु आणि मध्यम उद्योग (एसएमई) व्यवस्थेसंदर्भातील  दुसऱ्या परिसंवादाचे संचालन केले. परिसंवादामध्ये एईसीएमच्या महासचिव कॅटरिन स्टर्म, सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी पतहमी निधी ट्रस्टचे  (सीजीटीएसएमई) मुख्य कार्यकारी अधिकारी  संदीप वर्मा, कफलाहचे मुख्य कार्यकारी अधिकारी  होमम हाशेम, आणि केओडीआयटीएचे उपसंचालक वूइन पार्क यांचा समावेश होता.

            नवी दिल्ली येथे झालेल्या जी 20 नेत्यांच्या शिखर परिषदेमध्ये, नेत्यांकडून जीपीएफआयने भारताच्या अध्यक्षतेखाली तयार केलेल्या, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (डीपीआय) आणि जी 20 आर्थिक समावेशन कृती योजना (एफआयएपी) 2023 द्वारे आर्थिक समावेशन आणि उत्पादकता वाढीसाठी जी 20 धोरण शिफारशी या दोन महत्त्वपूर्ण दस्तऐवजांना मान्यता देण्यात आली.

            पुढील दोन दिवसांत, आर्थिक समावेशासाठी जागतिक भागिदारीतील (जीपीएफआय) सदस्य , डिजिटल आर्थिक समावेशासाठी जी – 20 जीपीएफआय उच्चस्तरीय तत्त्वे, वित्तप्रेषण योजनांचे अद्ययावतीकरण आणि एसएमई वित्तपुरवठ्यातील सामान्य अडथळ्यांवर मात करण्यासाठी एसएमई सर्वोत्तम पद्धती आणि नाविन्यपूर्ण साधनांच्या अंमलबजावणीबाबतच्या  जीपीएफआयच्या  कामावर चर्चा करतील. जीपीएफआय बैठकीचा  एक भाग म्हणून,  16 सप्टेंबर 2023 रोजी “डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांद्वारे आर्थिक समावेशनात प्रगती करणे : डिजिटल आणि वित्तीय साक्षरता आणि ग्राहक संरक्षणाद्वारे ग्राहकांचे सक्षमीकरण” या विषयावर एक परिसंवाद देखील आयोजित केला जाईल.

            जीपीएफआय कार्यगटासाठी उल्लेखनीय कामगिरी म्हणजे, अलीकडेच, नवी दिल्ली येथे झालेल्या जी 20 नेत्यांच्या शिखर परिषदेमध्ये, नेत्यांकडून जीपीएफआयने भारताच्या अध्यक्षतेखाली तयार केलेल्या, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (डीपीआय) आणि जी 20 आर्थिक समावेशन  कृती योजना  (एफआयएपी ) 2023 द्वारे आर्थिक समावेशन आणि उत्पादकता वाढीसाठी जी 20 धोरण शिफारशी या दोन महत्त्वपूर्ण दस्तऐवजांना मान्यता देण्यात आली, असे अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे  आर्थिक सल्लागार चंचल सरकार यांनी कार्यक्रमापूर्वीच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

* * *

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला विकास कामांचा आढावा; कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याच्या केल्या सूचना

सातारा दि.14 (जिमाका) : पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जलसंपदा, जलसंधारण व विद्युत विभागांतर्गत  जिल्ह्यात सुरु असलेल्या विकास कामांचा आढावा घेऊन ही कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना केल्या.

या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डूड, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, महावितरणचे अधीक्षक अभियंता हनुमंत ढोक यांच्यासह संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.

विद्युत विभागाचा आढावा घेताना पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, एकही घर विद्युत जोडणी पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच नियमानुसार शेतकऱ्यांच्या  शेतीपंपाना विद्युत जोडणीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे.
जिल्ह्यातील धरणाची, उपसा सिंचन योजनेची कामांना निधी उपलब्ध आहे. ती कामे लवकरात लवकर करावीत. ज्या धरणांच्या कामांचे प्रस्ताव मंत्रालयस्तरावर आहेत त्याची माहिती द्यावी. त्या कामांबाबत पाठपुरावा करुन मंजुरीसाठी प्रयत्न केले जातील, असे जलसंपदा विभागाचा आढावा घेताना पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

डोंगरी भागातील बंधारे नादुरस्त आहेत अशा बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची मोहिम हाती घ्यावी. तालुकानिहाय शाखा अभियंत्यांना उद्दिष्ट द्यावे. पुढील वर्षी होणाऱ्या पावसामुळे हे बंधारे 100 टक्के भरतील अशा पद्धतीने  नियोजन   करावे. यासाठी निधी दिला जाईल, असे जलसंधाण कामाचा आढावा घेताना पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

कुमार विश्वकोश सर्वांसाठी उपयुक्त ठरेल – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 14 : तंत्रज्ञानाच्या युगात आज जीवसृष्टी आणि पर्यावरण अभ्यासाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत जाणारे आहे. या विषयाची व्याप्ती लक्षात घेऊन अंकुरण ते ज्ञानेंद्रिय पर्यंत एकूण १,०२५ नोंदी समाविष्ट असलेला कुमार विश्वकोश जीवसृष्टीची विविधता आणि या विविधतेमागची एकता वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या कुमार विश्वकोश जीवसृष्टी आणि पर्यावरण या पहिल्या खंडाच्या चौथ्या भागाचे प्रकाशन आज विश्वकोशाच्या संकेतस्थळावर करण्यात आले. महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. श्यामकांत देवरे, मराठी भाषा विभागाचे उपसचिव हर्षवर्धन जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री यांनी सुरू केलेली परंपरा मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित यांनी कायम ठेवल्याबद्दल मंत्री श्री. केसरकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. हा खंड केवळ कुमारांनाच नव्हे तर, शिक्षक, प्राध्यापक आणि सर्वसामान्य वाचक यांना सखोल अभ्यास करण्यास प्रवृत्त करणारा आणि सामाजिक स्तरावरही पर्यावरणाविषयीची जागरूकता रुजविणारा ठरेल, असे मत मंत्री श्री. केसरकर यांनी व्यक्त केले.

पहिल्या खंडाचे दोन भाग यापूर्वी छापील स्वरूपात उपलब्ध असून लवकरच पुढील भागही छापील स्वरूपात वाचकांच्या हाती येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. हा भाग https://marathivishwakosh.org/tag/kvk1b4/ या संकेस्थळावर वाचता येणार असून महाराष्ट्रातील सर्व शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थीवर्ग तसेच जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी कुतूहल असणाऱ्या वाचकांसाठी हा कुमार विश्वकोश महत्वाचा ज्ञानऐवज ठरणार आहे.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

मृद व जलसंधारण विभागांतील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अभियंत्यांचा गौरव करणार – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

मुंबई दि. 14 : सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभागांमार्फत अभियंत्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल दरवर्षी पुरस्कार देण्याची परंपरा आहे. त्याच धर्तीवर आता मृद व जलसंधारण विभागांतील उल्लेखनीय कार्य केलेल्या अभियंत्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली.

भारतरत्न, सर विश्वेश्वरय्या यांचा 15 सप्टेंबर हा जन्मदिवस दरवर्षी “अभियंता दिन” म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने मृद व जलसंधारण विभागांतर्गत कार्यरत व उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अभियंत्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून याबाबतचे धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले.

मंत्री श्री. राठोड म्हणाले की, मृद व जलसंधारण विभागांतर्गत साखळी सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण व रूंदीकरण करणे, जुन्या जलसंरक्षणांचे पुनर्जीवन करणे, अस्तित्वातील लघु पाटबंधारे संरचनांची (केटी वेअर/साठवण बंधारा) यांची दुरूस्ती करणे, पाझर तलाव, लघु सिंचन तलाव दुरूस्ती व नुतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणे, पाणलोट विकासाची कामे करण्यात येतात. सदर कामांची/संरचनांची संकल्पना तयार करून व इतर उपकरणांचा/संगणकांचा वापर करून संकल्पचित्रे व कामांचे सविस्तर आराखडे बनविताना अभियंत्यांचे कौशल्य पणाला लागते व त्यामुळे अशा अभियत्यांची सेवा समाजपयोगी ठरते. सबब अशा तांत्रिक संवर्गातील अभियंत्यांचे प्रशासकीय व तांत्रिक कौशल्य विचारात घेऊन त्यांचा वैयक्तिक पुरस्कार देऊन गौरव करणे न्यायोचीत ठरते

मृद व जलसंधारण विभागांतर्गत कार्यरत व उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अभियंत्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून याबाबतचे धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल असेही मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले.

000000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

‘अभियंता दिनानिमित्त’ उद्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता, कर्मचाऱ्यांचा गौरव

मुंबई, दि. १४ : अभियंता दिनानिमित्त राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विभागातील अभियंता आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव सोहळा उद्या शुक्रवार १५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता षण्मुखानंद सभागृह (माटुंगा, मुंबई) येथे आयोजित करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अभियंता व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येईल. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (सार्वजनिक उपक्रम वगळून) उपस्थित राहतील. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर यांची प्रमुख उपस्थिती राहील.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सचिव (इमारती) संजय दशपुते, मुं. म. प्र. वि. प्रा. चे सचिव सुनील वांढेकर, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव खंडेराव पाटील, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सुधाकर मुरादे यांची विशेष उपस्थिती राहील, असे सार्वजनिक बांधकाम, मुंबई मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता रणजित हांडे यांनी कळविले आहे.

०००००

गोपाळ साळुंखे/ससं/

 

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा

0
मुंबई दि 19 : राज्यात अनेक ठिकाणी होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात राज्यातील मुसळधार...

महाराष्ट्रात ४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५ हजार ८९२ रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती

0
मुंबई, दि. 19 : महाराष्ट्र "डेटा सेंटर कॅपिटल" आणि "सौरऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल" म्हणून पुढे येत आहे. अनेक कंपन्या या क्षेत्रांत येत असून उत्पादन क्षेत्रातही मोठी क्रांती घडणार...

पावसाचा वाढता जोर पाहता, मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे – मुंबई उपनगर सह...

0
आपत्ती व्यवस्थापन विभागात घेतला मुंबईतल्या स्थितीचा आढावा मुंबई,  दि. 19 : गेले तीन दिवस मुंबई परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळित होत आहे. या पार्श्वभूमीवर...

पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ अवॉर्ड

0
मुंबई, दि. 19 :  राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना त्यांच्या विभागात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने 'कोहिनूर ऑफ इंडिया' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले....

अतिवृष्टी, पुराच्या अनुषंगाने यंत्रणांनी अधिक सतर्क रहावे – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

0
मुंबई, दि. १९ : भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असून राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी...