मंगळवार, ऑगस्ट 19, 2025
Home Blog Page 1249

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 16 : राज्यपाल रमेश बैस यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘मराठवाडा येथील प्रत्येक व्यक्तीकरिता दिनांक १७ सप्टेंबर हा अविस्मरणीय दिवस आहे. यंदा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. मुक्ती संग्रामात अनेक ज्ञात – अज्ञात देशभक्त नागरिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यांमधील लोकांचे या लढ्यामध्ये भरीव योगदान होते. मुक्ती संग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतो तसेच जनतेला मराठवाडा मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो’, असे राज्यपाल रमेश बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

००००

छत्रपती संभाजीनगर, धाराशिव महसुली विभाग नामकरण फलकांचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

छत्रपती संभाजीनगर, दि. १६ : छत्रपती शिवाजी महाराज की जय… छत्रपती संभाजी महाराज की जय… या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचे आणि धाराशिव महसुली विभागाच्या नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर आज येथे मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांचे छत्रपती संभाजीनगर येथे आगमन झाले. स्मार्ट सिटी कार्यालयात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार आणि मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते.

यावेळी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव महसुली विभाग, जिल्हा, तालुका, गाव या नामकरण फलकाचे अनावरण मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय…छत्रपती संभाजी महाराज की जय या जयघोषामुळे परिसर दुमदुमला.

००००

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्कार

मुंबई दि 15:- स्वराज्य मॅगझिनच्या वतीने गुड गव्हर्नन्स (सुप्रशासन) आणि महाराष्ट्रात पायाभूत सुविधा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पाँडेचेरीत ‘पाँडी लिट फेस्टिव्हल’मध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे उपमुख्यमंत्री  फडणवीस यांनी मुंबईत हा पुरस्कार स्वराज्यचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसन्न विश्वनाथन आणि संपादकीय संचालक आर. जगन्नाथन यांच्या हस्ते स्वीकारला.

स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरस्काराची रक्कम दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असण्यामध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे अमूल्य योगदान आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रेरणेनुसारच आमची वाटचाल सुरू आहे. सुशासन हा एकप्रकारे प्राणवायूच असतो. तो असेल तर किंमत नसते आणि नसला तर अस्वस्थता वाढते. सुशासन हा प्रशासनाचा पाया आहे.

महाराष्ट्रात विविध क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उभारणीमुळे नागरिकांचे जीवनमान उंचावते आहे, अशी भावना श्री फडणवीस यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पकतेने गेल्या काळात अनेक क्रांतिकारी निर्णय आणि सुधारणांद्वारे राज्यातील प्रशासकीय कामकाजात आमूलाग्र बदल घडले असून श्री. फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प इतिहासात मैलाचा दगड ठरत आहेत.

जनतेशी सहजतेने जवळीक साधण्याचे कसब, ध्येयासक्त, प्रामाणिक, आधुनिक तंत्रज्ञानातील जाणकार यांसारख्या गुणांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस हे देशात ओळखले जातात, अशा शब्दात उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा गौरव मानपत्रात करण्यात आला आहे.

पायाभूत सुविधांच्या उभारणीद्वारे महाराष्ट्र सर्व क्षेत्रात अग्रेसर राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि 15:- थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही पहिलाच आहे आणि पहिलाच राहील. विविध क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उभारणीद्वारे महाराष्ट्र सर्व क्षेत्रात अग्रेसर राहील असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे नवभारत ग्रुपच्या वतीने ‘नवभारत नवराष्ट्र महाराष्ट्र 1 कॉन्क्लेव्ह 2023’ चे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रबंध संपादक निमिष माहेश्वरी, युवराज ढमाले हे उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योगसमूहांचा आणि उद्योजकांचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्याचा नवभारत समूहाचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. वाचकांशी बांधिलकी जपत नवभारतने आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सगळे जग  आता भारताकडे आश्वासकपणे पाहत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे  जी 20 चे ‘डिक्लरेशन’ यशस्वी झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याच पुढाकाराने आफ्रिकन युनियनचा जी 20 समूहात समावेश झाला.

चीनचे औद्योगिक प्राबल्य दिवसेंदिवस कमी होत असून भारताचे प्राबल्य वाढते आहे. जपानमध्ये तंत्रज्ञान आधारित उद्योगात आता नवा विचार रुजतो आहे. आगामी काळात भारताची अर्थव्यवस्था 8 ट्रिलियन पर्यंतही जाईल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठे असणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र देशाचे  ग्रोथ इंजिन

महाराष्ट्र हे देशाचे  ग्रोथ इंजिन आहे. महाराष्ट्र आता डेटा सेंटरचे ‘कॅपिटल’ बनले आहे. मुंबईत पायाभूत सुविधांची कामे आता वेगात सुरू आहे. ट्रान्स हार्बर लिंक क्रांतिकारक ठरणार आहे. पुण्यातील रिंगरोडमुळे उत्पादन क्षेत्रात मोठे बदल होतील. पुण्याजवळ नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहे.

नागपूर आता लॉजिस्टिक कॅपिटल बनत आहे. समृद्धी महामार्गामुळे पोर्ट कनेक्टिव्हिटी वाढली आहे. वाढवण बंदर सर्वात मोठे बंदर ठरणार असून भूमिपुत्र आणि मच्छीमार यांना विश्वासात घेऊनच येथे विकास करण्यात येईल असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

जलयुक्त शिवार अभियान ठरले शेतकऱ्यांसाठी वरदान

जलयुक्त शिवार अभियानामुळे महाराष्ट्रातील भूजल पातळी वाढली असल्याचे केंद्रीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार अभियान अत्यंत उपयुक्त ठरले आहे. शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी कृषिपूरक उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता दिवसाही वीज पुरवठा करता येणे शक्य होणार आहे. यामुळे कृषी उत्पन्नातही वाढ होईल असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुंबईकरांचे जीवन सुसह्य होण्यात अभियंत्यांचे योगदान महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १५ : मुंबईकरांचे जीवन सुसह्य झाले पाहिजे.  मुंबईकरांना सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. यासाठी मुंबईत गेल्या वर्षभरात एक लाख कोटींहून अधिक रकमेचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू करण्यात आले असून मुंबईकरांचे जीवन सुसह्य होण्यात अभियंत्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांचा गौरव केला.

भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे रवींद्र नाट्य मंदिर येथे राष्ट्रीय अभियंता दिन सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. खासदार राहुल शेवाळे, वंदे भारत ट्रेनचे जनक सुधांशू मणी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तसेच प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू, उपायुक्त उल्हास महाले आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. येथील रहिवाशांना अपेक्षित अशा सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात विकास प्रकल्प हाती घेतले आहेत. मुंबईला अधिक वेगवान करणारा सागरी किनारा मार्ग, एमटीएचएल प्रकल्प, मुंबई मेट्रोचे जाळे, समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे मार्ग हे अभियंत्यांच्या मेहनतीचा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या दोन वर्षात दोन टप्प्यात मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असून खड्डेमुक्त रस्त्यांचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.

अभियंत्यांनी कामाचा दर्जा राखावा, मुंबईकरांना दर्जेदार सुविधा द्याव्यात, शासन देखील पूर्ण पाठिंबा देईल, असे सांगून मागील वर्षी दिलेल्या वचनाची पूर्तता करून अभियंत्यांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न सोडविण्यात आला असून त्यांना थकबाकी सुद्धा देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आपल्या अभियांत्रिकी क्षमतेच्या जोरावर भारताने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रोत्साहनातून संपूर्ण भारतीय बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. याचा गौरवपूर्ण उल्लेख करून या घटना भारताच्या अभियांत्रिकी क्षमतेचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

मुंबईला सुदृढ, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करायचे असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्याची सूचना केली. मुंबईसह महाराष्ट्र ड्रग मुक्त करण्याचे शासनाचे धोरण असल्याचे सांगून त्याबाबत कार्यवाही सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण मुंबईमध्ये आयकॉनिक अशा इमारती उभ्या कराव्यात, यासाठी विकासकांना प्रोत्साहन देण्याची सूचना त्यांनी केली. रहिवाशांना अपेक्षित असलेली मुंबई घडवण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जी-20 परिषदेत जग जिंकले. महाराष्ट्रातील व्यवस्था सुद्धा उत्तम होती. याचे शेर्पा अमिताभ कांत यांनी ‘मुंबई आपने चमका दी’ या शब्दात कौतुक केले. तसेच जपानचे राजदूत सुझुकी हिरोशी यांनी यांनी समुद्री सेतू प्रकल्प पाहून ही एक यशकथा, अभियांत्रिकी आविष्कार असल्याचे म्हटले, ही आपल्या कामाला मिळालेली उत्स्फूर्त दाद आहे, याचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.

खासदार राहुल शेवाळे म्हणाले, मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभियंत्यांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न सोडविण्याचे वचन दिले होते, ते आज पूर्ण केले आहे.

महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी नागरी सुविधा पुरविणारी महानगरपालिका आता पायाभूत सुविधा विकसित करणारी यंत्रणा झाली असल्याचे सांगितले. मागील वर्षभरात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या पाठिंब्यामुळे झपाट्याने विकासकामे होत असल्याचे सांगून सध्या मुंबईत एक लाख कोटींहून अधिकच्या सुरू असलेल्या कामांची माहिती त्यांनी दिली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘मी अभियंता’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

‘मराठवाडा मुक्तिसंग्रामा’ च्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम उत्साहात

औरंगाबाद, दि. १५:  औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने ‘मराठवाडा मुक्तिसंग्रामा’च्या अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारंभाच्या निमित्ताने मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळ मैदान येथे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमास  उपायुक्त अपर्णा थेटे, मंगेश देवरे, सविता सोनवणे, शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी   शंभूराजे विश्वासू, शहर अभियंता अविनाश देशमुख आदी उपस्थित होते.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी सांगता संपूर्ण मराठवाड्यात भरगच्च कार्यक्रमांनी साजरी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात अभिजीत आणि सरला शिंदे यांनी आलाप ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. यामध्ये वंदे मातरम..वंदे मातरम …, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा…, मेरे देश की धरती सोना उगले, उगले हीरे मोती…, संत महंताची भूमी माझी मराठवाड्याची, भोळीभाबडी माणसं लय पुण्यवान माती…जय जय महाराष्ट्र माझा…या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचविणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

औरंगाबाद, दिनांक १५ (विमाका) :  महाराष्ट्राला उज्ज्वल अशी सांस्कृतिक परंपरा आहे. यंदा शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्षपूर्तीचा महोत्सव राज्यभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे.  त्याच अनुषंगाने छत्रपती शिवरायांची वाघनखे लवकरच राज्यात दाखल होतील. त्याचबरोबर विकीपीडियाशी सामंजस्य करार करून जगभरातील ३०० भाषांत राज्याच्या सांस्कृतिक वारशाची माहिती उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच ऑनलाइन पोर्टलचाही आधार घेऊन राज्याचा सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचविणार असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मराठवाड्यातील लातूर, परभणी येथील नाट्यगृहे लवकरच पूर्णत्वास नेण्यात येतील, यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विनंती करणार असल्याचेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाने तापडिया नाट्य मंदिरात ‘नाट्य गौरव’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात राज्य हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य, दिव्यांग बालनाट्य आणि मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचे राज्यस्तरीय पारितोषिक वितरण मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री मुनगंटीवार बोलत होते.

या कार्यक्रमास केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड, गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे विभीषण चवरे आदींची उपस्थिती होती.

मंत्री मुनगंटीवार म्हणाले, राज्यातील जीर्ण झालेल्या नाट्यगृहांना नवसंजिवनी देण्याचे काम शासन करत आहे. सांस्कृतिक कार्याचे, विचारांचे अदान-प्रदान व्हावे यासाठी राज्यात नवीन ७५ ठिकाणी तालुका पातळीवर सांस्कृतिक नाट्यगृह उभारण्याचे सांस्कृतिक संचालनालयाचे नियोजन आहे. संचालनालयाने विविध पुरस्कारांच्या रकमांमध्येदेखील भरीव प्रमाणात वाढ केली आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक विभाग नवनवीन उपक्रम राबवित आहे. आगामी काळात महाराष्ट्राची कला, सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचावा यासाठी ‘ॲमेझॉन’ या ॲपप्रमाणे सांस्कृतिक पोर्टलची निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर देशासह परदेशात महाराष्ट्राची परंपरा पोहोचविण्याचा सांस्कृतिक संचालनालयाचा मानस आहे. लवकरच जपानमध्येही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा जागर करणार असल्याचेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.

प्रधान सचिव श्री. खारगे यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी सांस्कृतिक विभागाकडून उद्योन्मुख कलावंतांना प्रोत्साहन देणे, राज्य हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य, दिव्यांग बालनाट्य आणि मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचे आयोजन करणे, नाट्यक्षेत्रासाठी अधिकाधिक भरीव काम करणे, हौशी, व्यावसायिक नाट्यकर्मी, कलावंतांना  सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संचालनालय पुढाकार घेत असल्याचे श्री. खारगे म्हणाले.

कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून झाली. मान्यवरांनी स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन विजेत्यांना सन्मानित केले. प्रहसन, गणेश वंदन, सांस्कृतिक कार्यक्रमांनी पारितोषिक वितरण कार्यक्रमात रंगत आणली. ‘मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा रॉबिनहुड-क्रांतीवीर दत्तोबा भोसले’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. राज्य्भरातील नाट्यस्पर्धेतील विजेते संघ, नाट्यकर्मी, संगीत दिग्दर्शक, नाट्य लेखक, दिग्दर्शक आदींची कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थिती होती.

राज्य नाट्य स्पर्धेस मुदतवाढ

राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होण्याची आजची (ता.१५) शेवटची तारीख होती. परंतु कलावंतांची मागणी लक्षात घेऊन या स्पर्धेस सात दिवसांची मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा मंत्री मुनगंटीवार यांनी केली.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव : विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीने शहरात उत्साहाचे वातावरण 

औरंगाबाद, दि. 15 (विमाका) : ‘मराठवाडा मुक्तिदिनाचा विजय असो’…!  ‘मराठवाड्याचा जयजयकार’…! ‘मराठवाड्याचा विजय असो’…! ‘भारत माता की जय’…!  अशा विविध घोषणांनी आज सकाळी शहर दुमदुमले. निमित्त होते, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या प्रभात फेरीचे. क्रांती चौक येथून प्रारंभ झालेल्या या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांचा उत्साह आनंददायी होता.

आमदार संजय सिरसाट, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या हस्ते प्रभातफेरीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. सुमारे 40 शाळांचे 3 ते साडेतीन हजार विद्यार्थी प्रभात फेरीत सहभागी झाले होते. या फेरीदरम्यान विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब, कुस्ती, योगासने, बॉक्सिंग, लेझीमची प्रात्यिक्षिके सादर केली.  शहराच्या विविध भागातून  फिरुन या प्रभात फेरीचा समारोप खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झाला.

विविध सांस्कृतिक कार्यक्रम व महिला बचत गटांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात विद्यार्थी, शिक्षक, नागरिक यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महानगरपालिकेच्यावतीने आयोजित तीन दिवसीय कार्यक्रम आणि महिला बचतगटांच्या प्रदर्शन व विक्रीचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन पार पडले.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, उपायुक्त रणजित पाटील, अपर्णा थेटे आदींसह क्रीडा व शिक्षण विभागाचे अधिकारी, प्रभात फेरीतील सर्व सहभागी विद्यार्थी, शिक्षक, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या ठिकाणी देखील विद्यार्थ्यांनी मल्लखांब, कुस्ती, योगासने, बॉक्सिंग, लाठी प्रात्यक्षिके सादर केली.  यावेळी गायक अभिजित शिंदे व सरला शिंदे यांनी देशभक्तीपर गीते सादर करुन विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला.  उपस्थित सर्वच विद्यार्थ्यांनी त्यांच्या गाण्यांवर नृत्यही केले.

केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. कराड यांनी उपस्थितांना मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा देताना मराठवाड्याला निजाम राजवटीपासून कशाप्रकारे स्वातंत्र्य मिळाले, अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावून हा स्वातंत्र्याचा लढा कसा लढला याची माहिती आपल्या मनोगतात दिली. भविष्यात आपल्या भारत देशाला महासत्ता बनविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

प्रास्ताविकात जी. श्रीकांत यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त महानगरपालिकेच्यावतीने शहरात तीन दिवसांत आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच  मराठवाडा स्वातंत्र्यलढ्याबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यसैनिकांचा आदर्श अंगीकारण्यास सांगितले.

तत्पूर्वी यश शिंपले, रवींद्र बोरा, सारा भावले,  वैष्णवी मस्के, आर्या नाईक या विद्यार्थ्यांनी  मराठवाड्याचा स्वातंत्र्यलढा या विषयावर मनोगत व्यक्त केले.

यावेळी  माजी सैनिकांचा सहभाग असणाऱ्या नागरिक मित्र पथकातील सदस्यांचा आणि सफाई कर्मचाऱ्यांचा मान्यवर आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला.

 शंभर कोटी खर्चून शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची अत्याधुनिक इमारत उभारणार – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

शिर्डी, दि.१५ सप्टेंबर (उमाका)- उत्तर अहमदनगरमधील सहा तालुक्यांतील नागरिकांच्या प्रशासकीय कामांसाठी शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे आजपासून लोकार्पण झाले आहे. शेती महामंडळाच्या जागेवर या कार्यालयाच्या इमारतीसाठी १०० कोटी रूपये मंजूर झाले आहेत. अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची राज्यातील सर्वात मोठी अत्याधुनिक इमारत या ठिकाणी लवकर उभारण्यात येणार आहे. अशी‌ माहिती महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे दिली.

शिर्डी येथे उत्तर अहमदनगर मधील सहा तालुक्यातील नागरिकांच्या शासकीय कामासाठी सुरू करण्यात आलेल्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे लोकार्पण महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.  त्यावेळी ते बोलत होते‌. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सदाशिवराव लोखंडे उपस्थित होते. याप्रसंगी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिवाशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी , शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री विखे पाटील म्हणाले, उत्तर अहमदनगर जनतेसाठी शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची मोठी उपयुक्तता आहे. या कार्यालयामुळे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक,अडचणी दूर होण्यास निश्चितच मदत होणार आहे.  महसूल विभागाच्या बऱ्याच सुविधा ऑनलाईन झालेल्या आहेत‌. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमीत कमी मानवी हस्तक्षेप शिवाय पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्यावर महसूल विभागाचा भर आहे. असेही महसूलमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. लाखो शेतकऱ्यांनी एक रूपयात पीक विमा काढला आहे. शेत पीक नुकसानीची २५ टक्के अग्रिम देण्याची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. असे स्पष्ट करत महसूल मंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी निर्णयाची अंमलबजावणी प्रशासनाने तात्काळ करण्याची गरज आहे.

शिर्डी व परिसराच्या विकासासाठी शेती महामंडळाच्या जागेवर एमआयडीसी, श्री साईबाबांच्या जीवनावर आधारित शंभर कोटी खर्चून थीम पॉर्क, सहाशे कोटी खर्चून शिर्डी विमानतळाची नवीन विस्तारित इमारत असे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे शिर्डी व परिसराच्या विकासाबरोबर रोजगारवाढीला चालना मिळणार आहे. असेही महसूलमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

खासदार श्री लोखंडे म्हणाले, अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे कार्यक्षेत्रात संपूर्ण नेवासा तालुक्याचांही समावेश करणे गरजेचे आहे. शेती महामंडळाच्या जागेवर आयटी पार्क झाला तर शिर्डीची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होणार आहे.

आमदार आशुतोष काळे यांनीही यावेळी आपले मत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी केले. आभार अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी मानले.

राज्यातील सर्व आयटीआयमध्ये १७ सप्टेंबरला ‘पीएम स्कील रन’चे आयोजन

मुंबई, दि. 15 : राज्यातील युवक -युवतींमध्ये कौशल्य विकासाबाबत जनजागृती व्हावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थाद्वारे (आयटीआय) ‘पीएम स्कील रन’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच नागपूर विभागात रोजगाराच्या संधी वाढाव्यात यासाठी ‘इंडस्ट्री मीट’ व ‘कौशल्य केंद्र आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत हा उपक्रम राबविण्यात येईल. प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जवळच्या आयटीआयमध्ये संपर्क साधता येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास विभाग विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. कौशल्य विकास विभाग कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी सर्व शासकीय व खासगी आयटीआयचे बळकटीकरण करून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्यासाठी जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत नागपूर येथे दुपारी २ वाजता इंडस्ट्री मिट होणार असून हा कार्यक्रम गुरूनानक भवन, अंबाझरी वळणमार्ग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापीठ समोर अमरावती रोड,नागपूर ३३ येथे होणार आहे.

आयटीआयच्या सर्व उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन, व्यवसाय  शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी यांनी केले आहे.

000

संध्या गरवारे/विसंअ/

ताज्या बातम्या

ग्रामीण भागातील जनतेलाही आरोग्याच्या उत्तम सुविधा देऊ – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
नागपूर,दि. १८: ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्याच्या चांगल्यातल्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासन कटिबद्ध आहे. नागपूर जिल्ह्यात आपण भक्कम वैद्यकीय सुविधांचे जाळे निर्माण केले...

नागपूरलगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी परिपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणार –  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन विकास कामे प्रस्तावित करण्याचे निर्देश जिल्हा वर्षिक योजनेंतर्गत १ हजार ३२७ कोटी नियतव्यय मंजूर नागपूर,दि. १८: महानगराचा वाढता विस्तार...

समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा -पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
जळगाव दि. १८ (जिमाका): पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली धरणगाव पंचायत समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल...

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते अवयवदान करणाऱ्यांचा सत्कार

0
यवतमाळ, दि. १८ (जिमाका): राज्य शासनाच्या अवयवदान पंधरवड्यादरम्यान अवयवदानाकरीता इच्छुक व्यक्तींकडून तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील व सर्व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी...

किसान समृद्धी प्रकल्पांमुळे माल थेट बाजारपेठेत विकण्याची संधी – पालकमंत्री संजय राठोड

0
जिल्हा वार्षिक योजनेतून प्रकल्पांवर १२ कोटी ४७ लाखाचा खर्च यवतमाळ, दि. १८ (जिमाका): वसुंधरा महिला किसान समृद्धी कार्यक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या धान्य प्रतवारी, ग्रेडिंग व...