गुरूवार, मे 8, 2025
Home Blog Page 1222

सर्वसामान्याच्या प्रश्नाला भिडणारा नेता – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर दि.३१ : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर आज वरोरा मोक्षधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्ली येथील खाजगी इस्पीतळात उपचार घेत असतांना त्यांचे काल (30 मे) निधन झाले होते. शासनाच्या वतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर लोकसभेच्या वतीने जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खासदार मुकुल वासनीक व आमदार सर्वश्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे, चंद्रशेखर बावनकुळे, नितीन राऊत, सुनिल केदार, अनिल देशमुख, आशिष देशमुख, किशोर जोरगेवार आदींनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

 यावेळी आपल्या शोकभावना व्यक्त करताना पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूरचे युवा लोकनेते खासदार बाळू धानोरकर सर्वसामान्याच्या प्रश्नाला भिडणारे नेते होते. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी आक्रमकपणे काम केले. आपसात चांगला संवाद असलेल्या या नेत्याचे अकाली निधन हे दु:खद व वेदनादायी असून यामुळे चंद्रपूरची मोठी हानी झाली आहे. ते आपल्याला सोडून गेले याचे सर्वांच्या मनात प्रचंड दुःख आहे. धानोरकर परिवाराच्या दु:खात आपण सहभागी असून त्यातून त्यांना सावरण्याची प्रार्थना इश्वरचरणी करत असल्यांचे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

दिवंगत खासदार धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी बाळु धानोरकर यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी हाणी झाली असून चंद्रपुरच्या या ढाण्या वाघाला, दिलदार व्यक्तमत्व व लढवय्या नेत्याला मानाचा मुजरा करत असल्याच्या शोकाकुल भावना व्यक्त केल्या.

याप्रसंगी संपूर्ण शासकीय इतमामात दिवंगत धानोरकर यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. पार्थिवावर लपेटण्यात आलेला राष्ट्रध्वज धानोरकर परिवाराकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी दिवंगत खा. धानोरकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन, जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रकुमार परदेशी, उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे,  तसेच सामाजिक व राजकीय पदाधिकारी नरेशबाबू पुगलिया, शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे, रामू तिवारी, प्रकाश देवतळे, देवराव भोंगळे यांच्यासह राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील नागरीकांनी पुष्पचक्र अर्पण केले. अंतयात्रेला हजारोंच्या संख्यने नागरिक उपस्थित होते.

अन्न व औषध मंत्री संजय राठोड यांनी आज सायंकाळी वरोरा येथे धानोरकर कुटूंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. त्यांनी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

000

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या डॉ. कश्मिरा संखे यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या मुलाखत

मुंबई, दि. 31 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत या वर्षी देशासह राज्यातील मुलींनी यश मिळविले आहे. राज्यातील अनेक उमेदवारांनी यंदाही या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. ठाणे येथील डॉ. कश्मिरा संखे यांनी राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. डॉ. संखे यांनी त्यांच्या या प्रवासाबद्दल ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. संखे या महाराष्ट्रातून पहिल्या, तर देशातून 25 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरूवार, दि. 1 जून, 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येईल.

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामकरण

मुंबई दि. 31 : बारामती, जि.पुणे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नामकरण करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शासनाच्या वतीने त्यांच्या कर्तृत्वाच्या गौरव म्हणून आज याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती, मंत्री श्री. महाजन यांनी दिली.

सन २०१३ च्या शासन निर्णयान्वये बारामती येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ५०० रूग्ण खाटांचे रूग्णालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच सन २०१९ च्या शासन निर्णयान्वये प्रथम वर्षाकरिता १०० विद्यार्थी प्रवेशास परवानगी देण्यात आली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यकाळात अनेक समाजोपयोगी, लोकहिताची कामे केली असून शिस्तप्रिय, कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी अनेक लढाया जिंकल्या होत्या. अशा राजमातेच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण करण्यात येत असल्याची माहिती, मंत्री श्री. महाजन यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने ठाणे व पालघर जिल्ह्यातील ६० महिलांचा सन्मान

मुंबई,दि, ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार आज ज्या महिलांना प्राप्त झाला आहे त्यांचे अभिनंदन करून या पुरस्कारप्राप्त महिलांनी यापुढेही सामाजिक क्षेत्रात असेच काम सुरू ठेवावे. त्यामुळे महिलांना सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यास प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे ठाणे व पालघर जिल्ह्यातील प्रत्येकी १५ ग्रामपंचायतींमधील ६० पुरस्कार विजेत्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मंत्री श्री. लोढा बोलत होते.यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए.कुंदन, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्मिता काळे बनगर, ठाणे व पालघर जिल्ह्यातील सरपंच,पुरस्कार प्राप्त महिला उपस्थित होत्या.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून या वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर, सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या दोन कर्तबगार महिलांचा ग्रामपंचायतस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा निर्णय घेतलेला आहे.या पुरस्कारासाठी राज्यातील एकूण २७८९७ ग्रामपंचायतींमध्ये  सुमारे ५५,७९४ महिलांना पुरस्कार देऊन आज गौरविण्यात आले.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मंत्रालयात तंबाखूमुक्तीची शपथ

मुंबई, दि. 31 : जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांना त्रिमूर्ती प्रांगणात तंबाखूमुक्तीची शपथ दिली.

सामाजिक न्याय विभाग व नशाबंदी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यसनमुक्ती सापशिडीचे  आयोजन करण्यात आले होते. तंबाखू नियंत्रण कायद्याची माहिती दर्शविणारे कटआऊट, पोस्टर्स, पत्रक  मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात लावण्यात आले होते. नशाबंदी मंडळ व आरोग्य आयुक्तालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्ताने राज्यस्तरीय ऑनलाईन पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

यावेळी सामाजिक न्याय विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच मंत्रालयातील इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

******

शैलजा पाटील/विसंअ/

बोरीवली पश्चिम येथे ३ जून रोजी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर

मुंबई, दि. 31 : बोरीवली पश्चिम येथील साईली इंटरनॅशनल स्कूल येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले असून कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते शनिवार, दि.3 जून रोजी त्याचे उद्घाटन होणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीवली, जि.मुंबई उपगनर यांनी इयत्ता दहावी, बारावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम, महाविद्यालयीन अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया, कलमापन चाचणी, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज योजना माहिती तसेच याबाबत मान्यवरांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना होण्याकरिता छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर साईली इंटरनॅशनल स्कूल, एम.एच.बी. कॉलनी जवळ, गोराई रोड, बोरीवली (प.), मुंबई – 400091 येथे सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत होईल.

या शिबिरास कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री श्री. लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सर्वश्री सुनील राणे, मनीषा चौधरी, प्रकाश सुर्वे, अतुल भातखळकर, योगेश सागर, अस्लम शेख आणि संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण दिगांबर दळवी, सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, मुंबई, किशोर खटावकर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, मुंबई उपनगर प्रदीप दुर्गे,सहाय्यक आयुक्त, कौशल्य, रोजगार उद्योजकता नावीन्यता विभाग, मुंबई, रवींद्र सुरवसे, यांची प्रमुख उपस्थिती राहील.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्र राज्यातून पहिल्या आलेल्या डॉ. कश्मिरा संख्ये यांचे स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन, प्रा.डॉ.दिनेश गुप्ता, लेखक अल्मेडा रॉबर्ट, समन्वय तज्ञ, राज्य कल मापन समिती यांचे मार्गदर्शन या शिबिरात लाभणार आहे. इ.10 वी व इ.12 वी उत्तीर्ण तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थी व पालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीवलीचे, प्राचार्य अनिल एम. सदाफुले यांनी केले आहे.

राजधानीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

नवी दिल्ली दि. 31 :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती  महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली.

कस्तुरबा गांधी मार्ग स्थित नवीन महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात खासदार हेमंत पाटील, माजी मंत्री महादेव जानकर, सदनाच्या प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित जयंतीच्या कार्यक्रमात  प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम प्रवेश वेबपोर्टलचे उद्घाटन

मुंबई, दि. 31 : शैक्षणिक वर्ष 2023-24करिता दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशास 01 जून 2023 पासून सुरुवात होणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी व्हावी, यासाठी तंत्र शिक्षण विभागाकडून  https://dte.maharashtra.gov.in हे वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मंत्रालयात मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते या वेबपोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक विनोद मोहितकर उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, राज्यातील पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा मागील चार वर्षांपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कमी कालावधीत शालेय शिक्षणानंतर तंत्रशिक्षणातील पदविका ही रोजगारक्षम बनण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार, करिअर आणि रोजगाराभिमुख तांत्रिक शिक्षण देण्याचा तसेच पदविका अभ्यासक्रमांचे प्रवेश वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून  ही प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी व्हावी यासाठी हे वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन मंत्री श्री. पाटील यांनी केले.

तंत्र शिक्षण संचालक श्री. मोहितकर म्हणाले की, मागील चार वर्षांपासून पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश वाढविण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने, राज्यातील तंत्रनिकेतनांद्वारे “स्कूल कनेक्ट” हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. समुपदेशन सभा, जनजागृती मोहीम, जाहिराती, रेडिओ मुलाखती अशा विविध उपक्रमाद्वारे संस्थांनी आपले योगदान दिले आहे.

तसेच औद्योगिक क्षेत्रातील आवश्यक गरजा आणि भविष्यातील संधींचा वेध घेऊन 9 शासकीय व 30 विनानुदानित संस्थामध्ये  2हजार 460 प्रवेशक्षमतेचे  न्यू इमर्जिंग टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. त्यामध्ये  Artificial Intelligence (AI) and Machine Learning; Mechatronics; Automation and Robotics; Cloud Computing and Big Data, Computer Engineering and IoT अशा अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.

पदविका अभ्यासक्रमांच्या एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये 41 टक्के, 2019-20 मध्ये 50 टक्के, 2020-21 मध्ये 60 टक्के व 2021-22 मध्ये 70 टक्के होती. तर 2022-23 मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या 85 टक्के झालेली आहे.

शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांच्या संख्येची सरासरी टक्केवारी 97 टक्के आहे.

शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता एकुण 375 संस्थांची प्रवेशक्षमता जवळपास 1 लाख आहे.

पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता अध्यापनाच्या प्रक्रियेची अंमलबजावणी ऐच्छिक स्वरुपात “मराठी-इंग्रजी (द्विभाषिक)” माध्यमातून राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये, विकल्प अर्ज भरताना उमेदवारांना “मराठी-इंग्रजी (द्विभाषिक)” अभ्यासक्रम ठळकपणे दर्शविण्यात येणार आहेत.

पदविका प्रवेश प्रक्रिया :

10 वी नंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 10 वी चा निकाल घोषित होण्यापूर्वी प्रवेशप्रक्रियेसाठी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज ,ऑनलाईन नोंदणी  कागदपत्रांच्या स्कॅन, छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी, अर्ज करणे ही प्रक्रिया दि. 01 जून 2023 पासून सुरु करण्यात येणार आहे.

केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या आयोजित करण्यात येणार आहेत. यावर्षी ऑनलाईन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया ही मोबाईल ॲपवर सुद्धा उपलब्ध आहे.

विद्यार्थी त्यांचा केवळ दहावी/बारावीचा आसन क्रमांक नमूद करून अर्ज भरू शकतील व निश्चित करू शकतील. विद्यार्थ्यांचे प्राप्त गुण सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे अर्जामध्ये नमूद करण्यात येतील. तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे कागदपत्रांच्या प्रत्यक्ष छाननी प्रक्रियेव्यतिरिक्त ई-स्क्रुटीनीची संकल्पना राबविण्यात येणार आहे.

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षाच्या अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या सोयींसाठी व त्यांना प्रवेश अर्ज भरणे, त्यांचे समुपदेशन करणे, प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यावर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्यामध्ये ३२८ सुविधा केंद्रांची स्थापना तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे करण्यात आलेली आहे आणि त्याची यादी प्रवेशाच्या संगणकीय प्रणाली वर देण्यात येणार आहे.

सुविधा केंद्रांना उद्भवणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नोडल अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. सुविधा केंद्रांना / संस्थांना प्रवेश प्रक्रियेसंबंधी काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण आल्यास त्याचे निवारण नोडल अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना माहितीसाठी प्रवेशप्रक्रियेचे टप्पे उदा. नोंदणी करणे, अर्ज निश्चित करणे, छाननीची पद्धत निवडणे, हरकती नोंदवणे, विकल्प नमुना भरणे, इ. या महत्त्वाच्या टप्प्याचे व्हिडीओ संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार  आहेत. त्याचबरोबर या संकेतस्थळावर पदविका प्रवेश प्रक्रियेची थोडक्यात माहिती देणारे सादरीकरण, विद्यार्थ्यांना पदविका तंत्रशिक्षणाबद्दल माहिती देणारे शाखानिहाय माहिती चित्रपटदेखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

सर्व सुविधा केंद्रांवर विद्यार्थ्यांना मदत केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यापासून ते अगदी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्याने प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे माहिती देण्यात येणार आहे.

ज्या उमेदवाराला कॅपफेरी दरम्यान जागा वाटप केली गेली जाईल त्यांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी आणि जागा स्वीकृतीसाठी एआरसीकडे जाण्याची अट यावर्षीही शिथिल करण्यात आलेली आहे.

जागा वाटप झाल्यानंतर, उमेदवारांनी त्याला/तिला कॅप फेरीदरम्यान दिलेले जागा वाटप हे नियमांनुसार आहे किंवा नाही याची पडताळणी स्वत: लॉगिनमधून करु शकणार आहे व त्यानुसार उमेदवारांना जागा स्वीकृतीची कार्यवाही त्यांच्या लॉगीन मधून पूर्ण करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

*****

काशीबाई थोरात/विसंअ/

पैठण तालुक्यातील पुनर्वसित गावांमधील प्रलंबित कामांच्या पूर्ततेसाठी निधी उपलब्ध करुन देणार – मंत्री संदिपान भुमरे

मुंबई, दि. ३१ : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पाच्या पुनर्वसित गावातील नागरी सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे रोजगार हमी योजना मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.

मंत्री श्री. भुमरे यांच्या रत्नसिंधु या शासकीय निवासस्थानी पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्प टप्पा – १ बुडित क्षेत्रातील प्रकल्पबाधितांच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार प्रशांत बंब, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुर्नवसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता उपस्थित होते. औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मंत्री श्री. भुमरे म्हणाले की, पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्प टप्पा क्रमांक – १ बुडित क्षेत्रातील प्रकल्पबाधित गावांतील प्रलंबित कामांसह विविध समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुर्नवसन विभागाकडून निधी मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही.

पैठण तालुक्यातील १० गावांमधील प्रकल्पबाधितांच्या २६ नागरी सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत. मूलभूत सुविधांच्या कामांना प्राधान्य द्यावे. कुतुबखेडा, तांदूळवाडी, तुळजापूर, अमरापूर, पिंपळवाडी पि., तारुपिंपळवाडी, आगरनांदूर, घेवरी, लाखेफळ, इसारवाडी आदी पुनर्वसित गावांच्या समस्या सोडवाव्यात. प्रकल्पबाधित गावांमध्ये न झालेल्या कामांची चौकशीसाठी समिती नेमली असून समितीने तातडीने अहवाल सादर करावा, जेणेकरून संबंधित कामे तातडीने करण्यात येतील, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.

0000000

राजू धोत्रे/विसंअ/

निळवंडे धरण कालव्यांच्या उर्वरित कामासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

निळवंडेच्या कामाला गती देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 शिर्डी, दि. ३१ (उमाका वृत्तसेवा) :- निळवंडे धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा व ऐतिहासिक आहे. निळवंडे धरण कालव्यांच्या उर्वरित कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. हे शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असा  विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. धरणामुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवले जाणार नाही, अशीही ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी जीवनदायी ठरणाऱ्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची प्रथम चाचणी मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज निब्रळ येथे झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते जलपूजन करून निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी घेण्यात आली. यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण ‍विखे-पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय भोगले, अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, माजी  मंत्री मधुकरराव पिचड, अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड आदी उपस्थित होते.

या शासनाने पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी, कष्टकरी यांच्या हिताचे निर्णय घेतले असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शासनाने ११ महिन्यांच्या कालावधीत २९ प्रकल्पांना तत्काळ सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील ६ लाख ८ हजार हेक्टर  जमीन सिंचनाखाली येणार आहे. शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवून शासन काम करत आहे. केंद्राच्या धर्तीवर राज्याने शेतकऱ्यांना ‘नमो महासन्मान’ योजना सुरू केली आहे. यात शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणे ६ हजारांची मदत दिली जाणार आहे. ‌ एक रूपयात पीक विमा योजना सुरू करण्यात आली  आहे.

नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना निकषाच्या दुपटीने मदत देण्यात आली‌ . राज्याने २५ लाख हेक्टर क्षेत्रावर सेंद्रीय शेतीचे उद्दिष्ट ठेवले असून जलयुक्त शिवार योजना टप्पा २ सुरू करण्यात आला आहे. ‘निळवंडे धरणाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना ५३ वर्षे वाट पाहावी लागली. आता ही प्रतीक्षा फक्त या शासनाने घेतलेल्या कल्याणकारी निर्णयामुळे संपली आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

‘निळवंडे’ कालव्यांच्या कामांना गती देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, निळवंडे प्रकल्पाचा इतिहास मोठा आहे.  सुरूवातीला ८ कोटी रुपयांचा असलेला हा प्रकल्प आज ५ हजार १७७ कोटी रुपयांचा  झाला आहे. २०१७ मध्ये या प्रकल्पास अडीच हजार कोटी रुपयांची  सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आणि या प्रकल्पास गती मिळाली. धरणाच्या सुरूवातीच्या २२ किलोमीटरला स्थानिक शेतकरी व आदिवासींना विश्वासात घेऊन गती देण्यात आली‌.

यावर्षीच्या अर्थसंकल्पात गोसीखुर्द नंतर सर्वाधिक निधी निळवंडे धरणासाठी देण्यात आला आहे. त्यामुळे या धरण कालव्यांचे काम कोठेही थांबणार नाही. धरणाच्या उजव्या कालव्याचे काम  पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल. अशी ग्वाही  उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून २०१४ ते २०१९ या काळात अहमदनगर जिल्ह्यातील २ लाख,९८ हजार हेक्टर शेती संरक्षित सिंचनाखाली आली असल्याची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली‌.

महसूलमंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले की, अकोले व परिसरातील शेतकरी, आदिवासी बांधवांच्या प्रदीर्घ लढा व संघर्षामुळे आज निळंवडे धरण कालव्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे‌. आता यापूर्वीचे सर्व वाद निळवंडे कालव्याच्या पाण्यात विसर्जित करून आपण आजच आनंद साजरा करूया. पुढील दोन महिन्यात उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येईल.

यावेळी खासदार श्री. लोखंडे, माजी आमदार श्री. पिचड यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

प्रभावी उपचारांद्वारे थॅलेसेमिया मुक्तीचा निर्धार – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

0
मुंबई, दि. ८ : थॅलेसेमियासारख्या गंभीर अनुवंशिक रक्तविकाराविषयी जनजागृती निर्माण करण्याचा व्यापक प्रयत्न करण्यात येत असून प्रभावी उपचारपद्धतींद्वारे थॅलेसेमिया मुक्तीचा निर्धार करण्यात येत असल्याचे...

ज्येष्ठ नागरिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा – पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधदुर्गनगरी दि. 8 (जिमाका) : आपल्या पाल्यांपासून दुर्लक्षित व हक्कांपासून वंचित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे वृध्दापकाळातील आयुष्य सुखकर, आनंददायी, आरोग्यवर्धक व तणावमुक्त करणे ही सर्वांची...

अंगणवाडी सेविकांसह मदतनीसांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी  महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

0
नाशिक, दि. ८ : महिला व बालकांच्या विकासासाठी परिश्रम घेणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही महिला व बालविकास विभागाची जबाबदारी...

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी अंगणवाडी केंद्रास भेट

0
नाशिक, दि. 8 मे, 2025 (जिमाका वृत्तसेवा):  महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज दिंडोरी तालुक्यातील  वनारवाडी येथे एआय संकल्पनेवर साकारलेल्या अंगणवाडी...

अवकाळी पाऊस आणि वादळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पालकमंत्र्यांनी दिला धीर

0
जळगाव, दि. 8 (जिमाका वृत्तसेवा) – जिल्ह्यात 6 आणि 7 जून रोजी झालेल्या अवकाळी पावसासह वादळामुळे सुमारे 7 हजार 235 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले...