शनिवार, मे 17, 2025
Home Blog Page 1177

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा धुळे जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जागर

 

धुळे, दि. 7 (जिमाका वृत्तसेवा) : ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत धुळे येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम सोमवार, 10 जुलै, 2023 रोजी दुपारी 2.30 वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एसआरपीएफ मैदान, धुळे येथे होणार आहे.  ‘शासन आपल्या दारी’ अभियानाची माहिती जनसामान्यापर्यंत एलईडी चित्ररथामार्फत पोहचविण्यात येत आहेत. या चित्ररथास आज जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.

या चित्ररथाचे जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांच्या हस्ते फित कापून उद्धघाटन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावडे, भूसंपादन अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, ‘शासन आपल्या दारी’ अभियांनातर्गत धुळे जिल्ह्यात सोमवार 10 जुलै, 2023 रोजी दुपारी 2.30 वाजता राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एसआरपीएफ मैदान, धुळे येथे कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास 12 हजारापेक्षा जास्त लाभार्थी तसेच जवळपास 30 हजारापेक्षा अधिक नागरिक उपस्थित राहण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत चित्ररथाव्दारे चारही तालुक्यात जनजागृती करण्यात येत आहेत. धुळे येथील आयोजित मुख्य कार्यक्रमास जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे. असे आवाहनही श्री. शर्मा यांनी यावेळी केले.

या चित्ररथाव्दारे आज शिरपूर येथे, 8 जुलै, 2023 रोजी शिंदखेडा, 9 जुलै, 2023 रोजी साक्री तसेच 10 जुलै, 2023 रोजी धुळे येथे जनजागृती करण्यात येणार आहे .

000000

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

शिर्डी, दि.७ जुलै २०२३ (उमाका वृत्तसेवा) :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शन घेऊन श्री साईबाबा वस्तुसंग्रहालयास भेट दिली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंदिरात आगमन झाल्यावर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, प्रमुख जिल्हा व सत्र ‌न्यायाधीश तथा श्री.साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.सिवाशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला उपस्थित होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे श्री साईबाबा मंदिरात आगमन झाल्यावर प्रथम त्यांनी ‘द्वारकामाई’ चे दर्शन घेतले. त्यानंतर श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेत पाद्यपूजा व आरती केली. समाधी मंदिर दर्शनानंतर गुरूस्थान मंदीर येथील निंबवृक्षास प्रदक्षिणा मारली. श्री साईबाबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या वस्तू ठेवण्यात आलेल्या श्री साईबाबा वस्तुसंग्रहालयात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भेट दिली. श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.सिवाशंकर यांनी त्यांना वस्तुसंग्रहालयातील वस्तू आणि प्रतिमांविषयी माहिती दिली.

अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सन्मानचिन्ह देऊन राष्ट्रपतींचा सत्कार केला. श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी पी.सिवाशंकर यांनी राष्ट्रपतींचा श्री साईबाबा यांची मूर्ती भेट देत सन्मान केला.

श्री साईबाबा मंदीर दर्शन झाल्यानंतर श्री साईबाबा प्रसादालयात राष्ट्रपतींनी प्रसादाचा आस्वाद घेतला.

भाविकांच्या शुभेच्छांचा स्वीकार – श्री साईबाबा मंदीर दर्शन झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या सुरक्षा वाहनांचा ताफा प्रसादालयाकडे मार्गक्रमण करत असतांना गेट नंबर १ येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ताफ्यातील गाड्या थांबवत गाडीतून खाली उतरत काही पावले चालत जाऊन सर्वसामान्य भाविकांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. राष्ट्रपतींच्या या साधेपणाचे भाविकांना कौतूक वाटले.

000

महाराष्ट्र विधानपरिषद शतकोत्तर महोत्सव विविध उपक्रम आणि कार्यक्रमांनी साजरा होणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. ७ : देशातील संसदीय लोकशाहीच्या संदर्भात द्विसभागृह व्यवस्थेत महाराष्ट्र विधानपरिषदेने उल्लेखनीय योगदान देत आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटविला आहे. “महाराष्ट्र विधानपरिषद शतकोत्तर महोत्सव” ऑगस्ट ते नोव्हेंबर, 2023 याकाळात विविध उपक्रम आणि कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहेअशी माहिती महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.

आज महाराष्ट्र विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याविषयावर चर्चा झाली. मुख्य कार्यक्रमास भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेविधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारविधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्याने महाराष्ट्र विधानपरिषद शतकोत्तर महोत्सवातील कार्यक्रमाची आखणी करण्यात येत असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

सन १८६१ च्या इंडियन कौन्सिल ॲक्टनुसार स्थापित कौन्सिल ऑफ द गव्हर्नर ऑफ बॉम्बे (Council of the Governor of Bombay) ची पहिली बैठक २२ जानेवारी१८६२ रोजी  मुंबई येथील टाऊन हॉलच्या दरबार हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. पुढे माँटेग्यू-चेम्सफर्ड शिफारशीनुसार भारत सरकार अधिनियम १९१९ अन्वये बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिल (Bombay Legislative Council) ची प्रारंभिक बैठक १९ फेब्रुवारी१९२१ रोजी टाऊन हॉल मुंबई येथे झाली. नारायण गणेश चंदावरकर यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी झालेली नियुक्ती ही एक ऐतिहासिक घटना होती. सन १८६२ ते सन १९२० पर्यंत गव्हर्नर ऑफ बॉम्बे (Governor of Bombay) यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिल (Council) चे कामकाज चालत होते. सन १९२१ मध्ये नारायण चंदावरकर यांच्या रुपाने पहिल्यांदा भारतीय व्यक्तीची सभापती म्हणून नियुक्ती झाली. नारायण चंदावरकर हे परिषदेचे पहिले नामनिर्देशित सभापती होते.  रावसाहेब एच.डी. देसाई हे निवडणुकीद्वारे उपसभापतीपदी  निवडून आले. सन १९२१ ते २०२१ हा महाराष्ट्र विधानपरिषद शतकपूर्तीचा कालखंड मानता येईल. कोविड – १९ महामारीमुळे यावेळी जाहीर कार्यक्रम घेणे शक्य झाले नाही.

ऑगस्ट ते नोव्हेंबर२०२३ याकाळात विद्यमान आणि माजी विधानपरिषद सदस्यांचा परिसंवादवरिष्ठ सभागृहाचे महत्व या विषयावर कार्यशाळाविधानपरिषदेत मांडण्यात आलेली महत्वाची विधेयकेठरावप्रस्ताव यांचे पुस्तक स्वरुपात संकलनशतकपूर्ती कालावधीतील महत्वाच्या घटनांवर आधारित “एक दृष्टिक्षेप” या पुस्तिकेचे प्रकाशन, असे विविध उपक्रमकार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेतअसेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

०००

राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही

मुंबईदि. ७ (रानिआ) : राज्य निवडणूक आयोगातर्फे ५ जुलै २०२३ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मतदार यादीबाबतची (कट ऑफ डेट) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात प्रत्यक्षात कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली नाही. शिवाय ग्रामपंचायत निवडणूक वगळता अन्य सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने जैसे थे चे’ आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्याचा प्रश्न उद्भवत नाहीअसे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केले.

श्री. मदान यांनी सांगितले कीस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार याद्या तयार करण्यात येत नाहीत. त्यासाठी विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्या जशाच्या तशा घेवून केवळ प्रभागनिहाय विभाजित केल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी संभाव्य सर्वच सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघांच्या याद्या वापरण्याकरिता एक विशिष्ट तारीख (कट ऑफ डेट) निश्चित केली जाते. त्याच धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी संभाव्य सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी 1 जुलै 2023 ही कट ऑफ डेट निश्चित करण्याबाबतची अधिसूचना 5 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघांच्या अद्ययावत मतदार याद्या वापरण्यासाठीच वेळोवेळी कट ऑफ डेट निश्चित केली जाते आणि त्यासंदर्भातील अधिसूचनाही प्रसिद्ध केली जाते. यापूर्वीदेखील या स्वरूपाच्या अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या अधिसूचना म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम नसतो. अधिसूचनेत नमूद केलेल्या कालावधीत सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुका न झाल्यासपुन्हा नव्याने कट ऑफ डेट निश्चित करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली जातेअसेही श्री. मदान यांनी सांगितले.

०-०-०

(Jagdish More, PRO, SEC)

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

मुंबई, दि. ७ : राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबई येथे होणार आहे. याबाबतची घोषणा विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी, तर विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

विधानभवनात पार पडलेल्या या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, यांच्यासह विधानसभा सदस्य सर्वश्री छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, गिरीष महाजन, अशोक चव्हाण, उदय सामंत, अमिन पटेल, आशिष शेलार, नरहरी झिरवाळ, तसेच विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विधानपरिषद सदस्य सर्वश्री ॲड.अनिल परब, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, शशिकांत शिंदे, विकास पोतनीस, कपिल पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, संसदीय कार्य विभागाचे सचिव सतीश वाघोले, विधानसभा सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, विलास आठवले, वित्त विभागाच्या सचिव श्रीमती शैला ए., यांच्यासह संबंधित उपस्थित होते.

विधिमंडळाच्या शतकोतर प्रवासाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ वाटचालीचे दस्ताऐवजीकरण करण्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सूचित केले. विधिमंडळाचा गौरवशाली इतिहास संदर्भग्रंथाच्या माध्यमातून जतन करण्याचे तसेच विविध परिसंवादाद्वारे विधिमंडळाच्या आजपर्यंतच्या कामकाजातून महत्त्वपूर्ण घटना, प्रसंगांना उजाळा देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्याची उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी सूचना मांडली.

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्तच्या पार्श्वभूमीवर अभिनंदनाचा ठराव अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्याबाबत जयंत पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी मांडलेल्या सूचनेवर अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी यावेळी संमती दर्शवत ठराव मांडण्याचा निर्णय घेतला. दिनांक 17 जुलै ते 4 ऑगस्ट या 19 दिवसांच्या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे दिवस 15 असून चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे (शनिवार, रविवार) असणार आहेत.

०००

वंदना थोरात/विसंअ/

नाशिकच्या विकासाला गतिमान शासनाची साथ

जिल्ह्यातील नागरिकांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी व प्रत्येक शेवटच्या घटकाला विकासाच्या प्रवाहात सामिल करून त्यांना आवश्यक सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावरून सातत्याने प्रयत्न होत आहेत. शासकीय योजनांची माहिती व लाभ संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहाेचविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राज्य शासनाच्यावतीने संपूर्ण राज्यभरात प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.

राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सहभागी व्हावेत या उद्देशाने १९७७ मध्ये राष्ट्रीय सैनिकी पूर्व शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे स्थापन करण्यात आली होती. याच धर्तीवर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये मुलींचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टिने नाशिक येथे शासकीय सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था १० जानेवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य शासना मार्फत मंजूर करण्यात आली असून या प्रशिक्षण संस्थेत जून, २०२३ पासून प्रवेश प्रक्रीया देखील सुरू आहे. या प्रशिक्षण संस्थेत प्रथम व द्वितीय वर्षासाठी प्रत्येकी 30 विद्यार्थींनीना प्रवेश दिला जाणार आहे. या शासकीय सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून केवळ नाशिक मधीलच नाहीतर राज्यातील मुलींचाही राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सहभाग वाढणार असून मुलींच्या प्रगतीसाठी राज्य शासनाने घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे.

अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे मार्च, 2023 मध्ये जिल्ह्यातील साधारण नऊ हजार 176 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्या बाधित शेतकरी बांधवांसाठी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रयत्नातून राज्य शासनामार्फत अंदाजे 17 कोटी 36 लाख 36 हजार रुपयांची मदत मंजूर करून शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे.

जिल्ह्यात 2022-23 या वर्षात प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत खरीप हंगामात साधारण 1 लाख 63 हजार 971 सहभागी शेतकऱ्यांतील 63 हजार 782 शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीसाठी 16 कोटी 55 लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. तसेच पीक काढणी पश्चात 9 हजार 169 शेतकऱ्यांना 3 कोटी 34 लाख अनुदान पीक विमा कंपनीमार्फत वितरीत करण्यात आले आहे. तसेच नाशिक जिल्हा द्राक्ष उत्पादनात अग्रेसर जिल्हा असल्याने केंद्र समुह विकास कार्यक्रमाअंतर्गत नाशिक द्राक्ष क्लस्टरसाठी तीनशे कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. त्या औचित्याने तृणधान्य पिकांच्या उत्पादन वाढीबरोबरच तृणधान्याचा आहारातील समावेश वाढविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात कृषी विभागाच्यावतीने साधारण तीन ते चार हजार कार्यक्रम घेण्यात आले आहेत. कृषी यांत्रिकीकरण, फळबाग लागवड, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रीया योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना यांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होत असून सर्व शेतकऱ्यांना या योजनांचा आवश्यक लाभ देण्यात येत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व गुढीपाडवा निमित्त जिल्ह्यात 100 रुपयांत ‘आनंदाचा शिधा’चे साधारण 7 लाख सहा हजार 413 लाभार्थ्यांना वाटप करण्यात आला आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासकीय सेवेत 75 हजार पद भरती करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नियुक्ती प्राधिकारी स्तरावरील सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांवर 449 उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. शासनाने केलेल्या अनुकंपा भरतीमुळे अनेक कुटुंबांचे भविष्य सुरक्षित होण्यास सहाय्य झाले आहे.

राज्यातील जनतेस आरोग्य विज्ञानाबाबत शिक्षण व आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनामार्फत सार्वजनिक हिताच्या प्रयोजनार्थ नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालय स्थापन करण्यासाठी 20 एप्रिल 2023 रोजी मान्यता देण्यात आली आहे. या पदवी व पदव्युत्तर महाविद्यालय व संलग्नित रूग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी नाशिक मौजे म्हसरुळ येथील 14 हेक्टर जागा हस्तांतरण करण्यास देखील राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली आहे.

जनतेचे आरोग्य चांगले रहावे यासाठी त्यांना आवश्यक आरोग्य सुविधा, औषधोपचार उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यात धर्मवीर आनंदजी दिघे महाआरोग्य अभियान राबविण्यात आले होते. या अभियानाच्या माध्यमातून साधारण दहा लाख 25 हजार 192 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. तसेच 2 हजार 214 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रीया केल्या असून 24 हजार 781 इतर आजारांचे निदान करून रुग्णांना पुढील उपचारांसाठी संदर्भित करून पुढील उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ‘जागरुक पालक व सुदृढ बालक’ या मोहिमे अंतर्गत ग्रामीण भागातील 0 ते 18 वर्ष वयोगटातील अंदाजे 9 लाख 16 हजार 223 बालकांची तपासणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांत अंगणवाडीतील 4 लाख 49 हजार 111 तर शाळेतील 7 लाख 48 हजार 441 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच त्यात 225 ह्रदयरोगाच्या शस्त्रक्रीया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने गेल्या वर्षभरात सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी सातत्याने विविध योजना उपलब्ध करून दिल्या असून त्या योजनांची अंमलबजावणी देखील जिल्ह्यात प्रभावीपणे सुरू आहे.

ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होण्यासाठी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मागील वर्षी 27.22 लक्ष मनुष्य दिवसांची निर्मीती करण्यात आली. तर मागील 15 वर्षांच्या तुलनेत गेल्या वर्षभरात 101 कोटी रुपयांचा सर्वाधिक निधी खर्च करण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील मालेगाव, नांदगाव, बागलाण, येवला, पेठ व सुरगाणा या तालुक्यात अधिक कामकाज झाले आहे. या माध्यमातून साधारण एक लाख 89 हजार 975 व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.

राज्य शासनाने १९ एप्रिल २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारीत वाळू धोरण निश्चित केले आहे. या सुधारीत वाळू धोरणानुसार अनधिकृत वाळू उत्खननास आळा बसून सामान्य नागरिकांना व बांधकाम व्यवसायिकांना बांधकामासाठी स्वस्त दरात वाळू उपलब्ध होणार आहे. या नवीन वाळू धोरणानुसार निफाड तालुक्यातील चांदोरी येथे जिल्ह्यातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात शासनामार्फत शैक्षणिक, आरोग्य, कृषी, वैद्यकीय, रोजगार अशा विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यातूनच गतिमान शासनाच्या साथीने जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाला गती मिळत आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पात नाशिक जिल्हा…

  •    छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे (सारथी) नाशिक येथे विभागीय कार्यालय, अभ्यासिका, मुला मुलींचे वसतीगृह सुरू करण्यासाठी 50 कोटींची तरतूद नाशिक पंचवटी येथे आदिवासी संकुलासाठी 99 कोटींची तरतूद

  • जिल्ह्याला भविष्यात पाणी टंचाईवर उपाययोजना म्हणून किकवी धरण उभारण्यासाठी 36 कोटींची तरतूद

  • त्र्यंबकेश्वर येथून निघणाऱ्या संत निवृत्तीनाथ निर्मलवारीसाठी 50 कोटींची तरतूद

  • १२ ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर तीर्थस्थळाच्या विकासासाठी देखील अर्थसंकल्पात तरतूद

  • नाशिकसह राज्यातील दोन जिल्ह्यांमधील उद्यानांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जीवन गाथा प्रदर्शित करण्यासाठी 250 कोटींच्या निधीला अर्थसंकल्पात मान्यता

 

अर्चना देशमुख,

माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शिर्डी विमानतळावर आगमन

शिर्डी, दि. ७  ( उ.मा.का. वृत्तसेवा) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने  शिर्डी विमानतळ येथे आगमन झाले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शिर्डी विमानतळावर  विमानाने आगमन झाल्यानंतर  राज्यपाल रमेश बैस, राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्वागत केले. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, अतिरिक्त पोलीस महासंचालक सुखविंदर सिंग, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनीही राष्ट्रपतींचे स्वागत केले.

०००

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शिर्डीकडे प्रयाण

मुंबई, दि. ७ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन दिवसीय मुंबई दौऱ्यानंतर आज वायुसेनेच्या विशेष विमानाने शिर्डीकडे प्रयाण केले.

यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य सचिव मनोज सौनिक, तिन्ही दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००

आदिवासी क्रांतिकारकांवर अधिक संशोधन करण्याची गरज – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मुंबई, दि. ७ : मुंबई भेटीवर आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांच्यासह राजभवनातील भूमिगत बंकरमध्ये तयार केलेल्या ‘क्रांती गाथा’ या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या दालनाला भेट दिली. यावेळी राष्ट्रपतींनी बंकरमध्ये ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

राष्ट्रपतींनी प्रथम राज्यातील तसेच देशातील आदिवासी क्रांतिकारकांच्या दालनाला भेट देऊन आदिवासी क्रांतिकारकांबाबत माहिती जाणून घेतली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी जनजाती समाजाचे योगदान फार मोठे असून त्यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे, असा अभिप्राय राष्ट्रपतींनी यावेळी दिला.

स्वातंत्र्यासाठी १८५७ पूर्वी देखील अनेक ठिकाणी छोटे मोठे लढे झाले होते. त्याविषयी देखील व्यापक संशोधन झाले पाहिजे, असे सांगून राजभवनातील क्रांतिकारकांच्या संग्रहालयाला विद्यार्थी व युवकांनी भेट दिली पाहिजे, असे राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी सांगितले.

यावेळी राजभवनाचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी राष्ट्रपतींना राजभवनाच्या स्वातंत्र्यपूर्व इतिहासाची तसेच क्रांतिकारकांच्या दालनाची माहिती दिली. ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री ‘उत्कल केसरी’ डॉ. हरेकृष्ण महताब सन १९५५ – १९५६ या कालावधीत मुंबई राज्याचे राज्यपाल होते व ते राजभवन येथे राहिले होते, अशी माहिती श्री. काशीकर यांनी राष्ट्रपतींना दिली.  ‘क्रांती गाथा’ संग्रहालयात विशेषकरून अज्ञात क्रांतिकारकांची माहिती देण्यात आली असून १८५७ ते १९४६ या काळातील महत्त्वाच्या घटनांना शिल्प व भित्तीचित्रांच्या माध्यमातून उजाळा देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.  क्रांतिगाथा संग्रहालयाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जून २०२२ मध्ये करण्यात आले होते. पहिल्या महायुद्धापूर्वी बांधण्यात आलेले भूमिगत बंकर सन २०१६ साली प्रकाशात आले होते.

संग्रहालय भेटीनंतर राष्ट्रपतींनी विविध अभ्यागतांच्या व शिष्टमंडळांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर राष्ट्रपती श्रीमती मुर्मू शिर्डीला जाण्यासाठी विमानतळाकडे रवाना झाल्या.

संत, समाज सुधारकांची भूमी असलेले महाराष्ट्र खरोखरच महान राज्य – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मुंबई, दि. ६ : समानता व भक्तीचा संदेश देणारे ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ व तुकाराम यांसारखे संत, आत्मसन्मान व राष्ट्र गौरव वाढवणारे छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या समाज सुधारकांची भूमी असलेले महाराष्ट्र खरोखरच महान राज्य आहे सांगून समाजाच्या शेवटच्या घटकासाठी कार्य करण्याची जाणीव राज्याकडून यापुढेही जपली जावी, अशी अपेक्षा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे व्यक्त केली.

राष्ट्रपतीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रातील प्रथम आगमनानिमित्त द्रौपदी मुर्मू यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने गुरुवारी राजभवन येथे नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे व पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ गायिका महाराष्ट्र भूषण आशा भोसले, उद्योजक राजश्री बिर्ला आदी उपस्थित होते.

आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करताना राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी महाराष्ट्राचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील, आर्थिक व सामाजिक विकासातील तसेच संगीत व लोककला क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले. राष्ट्रपती श्रीमती मुर्मू  म्हणाल्या की, राज्यात झालेल्या उत्साहपूर्ण स्वागताने आपण भारावून गेलो आहोत. हा प्रदेश विविधतेने नटलेला आहे. येथे सांस्कृतिक वारसा जतन करून ठेवला आहे. नागपूर, पुणे, मुंबई येथे देशभरातील लोक वास्तव्यास येतात. त्यांचेही या देशाच्या विकासात योगदान आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून, देशाच्या आर्थिक विकासात या शहराचे मोठे योगदान आहे. साखर निर्यातीत जगात देशाचा दुसरा क्रमांक आहे. यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे.

राज्याला समृद्ध इतिहास आहे. निसर्गरम्य पर्यटन स्थळे हे राज्याचे वैशिष्ट्य आहे. महान समाजसुधारकांचाही इतिहास या राज्याला आहे. संगीत कला क्षेत्रातही या राज्यातील कलाकारांचे मोठे योगदान आहे. लोककला, लोकनृत्य, चित्रपट यामुळे राज्याची एक वेगळी ओळख निर्माण होते. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचे कार्य आपले शासन करीत आहे. यामुळे हे महान राष्ट्र आहे असे सांगून, राज्यातील जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी आशीर्वाद दिले.

स्वातंत्र्याच्या अमृत काळात द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती लाभणे भाग्य – राज्यपाल रमेश बैस

द्रौपदी मुर्मू यांचा झारखंड राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्या राज्याचा  राज्यपाल म्हणून काम करण्याचे भाग्य आपणास लाभले असल्याचे राज्यपाल रमेश बैस म्हणाले. द्रौपदी मुर्मू राज्यपालांच्या परिषदेत करीत असलेल्या सूचना राष्ट्रपतींसह सर्वांकडून गांभीर्याने घेतल्या जात अशी आठवण राज्यपालांनी यावेळी सांगितली.

देश स्वातंत्र्याचा अमृतकाळ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष साजरे करीत असताना द्रौपदी मुर्मू यांसारखे साधे व निरलस व्यक्तिमत्व राष्ट्रपती म्हणून लाभणे हे देशाचे भाग्य असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

 आदिवासींच्या विकासासाठी शासन कार्यरत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांचा सत्कार केला. यावेळी ते म्हणाले की, राज्याच्या भेटीसाठी आल्यावर आपण प्रथम नक्षलप्रभावीत अशा गडचिरोली भागात भेट दिली. यामुळे स्थानिकांना आणि सुरक्षा रक्षकांना ऊर्जा मिळाली आहे. नक्षलवाद संपवणे आणि रोजगार प्राप्त करून देऊन आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कार्यरत आहे, ही भावना त्यांच्या मनात निर्माण होण्यास यामुळे मदत होणार आहे.

शासन आदिवासी विकासासाठी अनेक योजना राबवित असून आदर्श आश्रमशाळा निर्मितीसाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. आपण शून्यातून विश्व निर्माण केले असून शिक्षक ते राष्ट्रपती पदापर्यंतचा आपला प्रवास प्रेरणादायी आहे. सर्वसाधारण लोकांच्या प्रगती आणि विकासासाठी केंद्र शासनाच्यामदतीने लोकाभिमुख निर्णय घेण्यास प्राधान्य देत आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राष्ट्रपती मुर्मू यांचे व्यक्त‍िमत्व प्रेरक आणि प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

द्रौपदी मुर्मू या स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती असून अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत. त्यांचे व्यक्त‍िमत्व प्रेरक आणि प्रेरणादायी आहे. वंचित आदिवासी तसेच आदिम जनजातींप्रती त्या संवेदनशील आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, द्रौपदी मुर्मू यांचे जीवन अतिशय संघर्षमय होते. मुर्मू यांनी कठीण परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले परंतु त्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले.  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आदिवासी कुटुंबात व एका लहानशा गावात जन्मलेली मुलगी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाची अध्यक्ष होणे हा लोकशाहीचा गौरव असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरुवातीला राज्यपालांनी राष्ट्रपतींचा शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी राष्ट्रपतींना गणेशाची व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली.         महाराष्ट्राची लोकसंस्कृती दर्शविणाऱ्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ स्नेहभोज आयोजित केले. स्नेहभोजनाला राज्य मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित होते.

०००

अर्चना शंभरकर/श्रद्धा मेश्राम/विसंअ/

ताज्या बातम्या

सर्वांसाठी घरे योजनाबाबत शासन कटीबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली तब्बल १ हजार ५१ नागरिकांकडून निवेदने हैद्राबाद हाऊस येथे आयोजित जनता दरबारात प्रातिनिधीक स्वरूपात पट्टे वाटप नागपूर, दि. १७ :  नागपूर महानगरामध्ये...

सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळांमुळे दहशतवादविरोधी लढ्याला मोठे बळ; जगासमोर भारताची एकजूट दिसणार

0
मुंबई दि. १७ : ऑपरेशन सिंदूरचाच एक भाग म्हणून भारताची दहशतवादविरोधी 'झिरो टॉलरन्स’ भूमिका अधिक प्रभावीपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी खासदारांची सात सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळे...

विकासकामे मुदतीत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करा – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
नंदुरबार, दिनांक 17 मे, 2025 (जिमाका) : शासकीय यंत्रणांनी विकासकामे नियम आणि निकषाप्रमाणे मुदतीत पूर्ण करावीत; कामे वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदाराविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करावी. तसेच  जिल्हा...

युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी टाटाच्या मदतीने राज्यभरात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पुणे, दि.१७: रोजगाराच्या माध्यमातून युवकांना स्वावलंबी बनविण्यासोबतच उद्योगधंद्यांना प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील विविध भागात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री...

‘महाराष्ट्र दर्शन’ भित्तीपत्रकांचे मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात १९ मे पासून प्रदर्शन

0
मुंबई, १७ मे २०२५ : महिला व बालविकास विभागाच्यावतीने आयोजित ‘महाराष्ट्र दर्शन’ या विशेष उपक्रमांतर्गत मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात सचित्र भित्तीपत्रकांचे १९ ते २१ मे २०२५ या कालावधीत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात...