शनिवार, ऑगस्ट 23, 2025
Home Blog Page 115

बॉम्बे बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार

मुंबई, दि. ४ : मुंबई उच्च न्यायालयाची ही इमारत, बॉम्बे बार असोसिएशन आणि इथल्या माझ्या सहकाऱ्यांनी मला घडवलं. आज जे काही आहे ते या संस्थांमुळेच. बॉम्बे बार असोसिएशन ही संस्था माझी कुटुंबासारखी आहे. या संस्थेच्या पाठिंब्याशिवाय मी आज या पदावर असू शकलो नसतो. ही वकिल संघटना म्हणजे न्यायव्यवस्थेला विचारवंत देणारी मातृसंस्था आहे, अशा शब्दांत भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी भावना व्यक्त केल्या.

न्यायमूर्ती श्री. भूषण गवई यांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल बॉम्बे बार असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी श्री. गवई बोलत होते.  यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे, श्री. गवई यांच्या सुविद्य पत्नी डॉ. तेजस्विनी गवई, भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग, महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल देशमुख, राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, ॲडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रशांत रेळेकर, बॉम्बे बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठक्कर, उपाध्यक्ष व्ही आर धोंड, सचिव फरहान दुभाष आदी उपस्थित होते.

आज सत्कार होत असलेल्या कोर्टरुमध्येच लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केलेली “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,” ही गर्जना आजही आपल्याला प्रेरणा देते, असे सांगून न्यायमूर्ती श्री. गवई यांनी आजपर्यंतचा प्रवास उलगडला. न्यायमूर्ती गवई यांनी आपल्या कारकिर्दीत मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजी नगर व गोवा खंडपीठांवर काम करतानाचे अनुभव सांगितले आणि हे सर्व अनुभव त्यांच्या न्यायिक दृष्टिकोनाच्या जडणघडणीत कसे उपयुक्त ठरले, हेही स्पष्ट केले.

सरन्यायाधीश श्री. गवई म्हणाले की, “संविधान हेच आमचे अंतिम मार्गदर्शक तत्त्व आहे आणि न्यायाधीश म्हणून आमची जबाबदारी केवळ अधिकार वापरण्याची नाही, तर कर्तव्य बजावण्याचीही आहे. रिक्त न्यायाधीश पदं भरली गेली तर प्रलंबित खटल्यांवर नियंत्रण येईल. आम्ही नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आणत आहोत. गेल्या काही दिवसांत अनेक नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

त्यांनी बार असोसिएशनने सुरू केलेल्या ‘पॉडकास्ट सिरीज’, व ‘बीबीए अ‍ॅप’चे कौतुक केले.

कार्यक्रमात न्यायमूर्ती दीपांकर दत्ता न्यायमूर्ती गवई यांचे विशेष कौतुक करताना म्हणाले की, न्यायमूर्ती श्री. गवई यांची विधी आणि संविधानातील जाण, विनम्रता आणि कायद्याचा अभ्यास यांचे उदाहरण देशभरातील न्यायाधीशांसाठी आदर्श आहे. नागपूरमधील न्यायालयातून सुरू झालेली न्यायमूर्ती गवई यांची कारकीर्द ही मेहनत, प्रामाणिकपणा आणि मूल्यनिष्ठा यांचे प्रतिक आहे. न्यायमूर्ती श्री. गवई यांचा मुंबई उच्च न्यायालयातील काळ केवळ त्यांच्या ऐतिहासिक निर्णयांसाठीच नव्हे, तर त्यांच्या शांत संयमी, प्रखर कायदेशीर बुध्दिमत्ता आणि सौम्य विनोदबुद्धीसाठीही लक्षात राहतो. त्यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून निवड हा फक्त मुंबई बारच नव्हे, तर संपूर्ण मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठीही गौरवाचा क्षण आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री. आराधे यांनी मनोगतात श्री. गवई यांच्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले की, लोकसेवा व न्यायव्यवस्था हीच खरी सेवा हे श्री. गवई यांचे तत्वज्ञान आहे. त्यांनी आतापर्यंत दिलेले निर्णय न्यायव्यवस्थेतील संवेदनशीलता आणि संविधान निष्ठा दर्शवतात. ते दूरदर्शी आहेत. त्यांच्या निर्णयांमुळे जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला.

यावेळी महाधिवक्ता श्री. सराफ, भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल श्री. सिंह यांनीही मनोगत व्यक्त केले. बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. नितीन ठक्कर यांनी प्रास्ताविक केले. सचिव फरहान दुभाष यांनी सूत्रसंचालन केले.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

 

जीएसटी उत्पन्न विश्लेषणासाठी मंत्रिगटाची पहिली बैठक

नवी दिल्ली, दि. 4 : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाची (GoM) वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) उत्पन्नाच्या विश्लेषणासाठी पहिली बैठक महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे पार पडली.

या बैठकीला महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, छत्तीसगड व पंजाबचे अर्थमंत्री आणि  यांच्यासह नऊ राज्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर दोन राज्यांचे प्रतिनिधी आभासी पद्धतीने सहभागी झाले. यावेळी आंध्र प्रदेश, गुजरात आणि तेलंगणा राज्यांच्या प्रतिनिधींनी आपली सविस्तर सादरीकरणे सादर केली.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, ही जीएसटी, आयजीएसटी आणि एसजीएसटी उत्पन्नासंबंधी पहिलीच बैठक होती. यापूर्वी मंत्र्यांच्या गटाच्या विविध मुद्द्यांवर बैठका झाल्या असल्या, तरी जीएसटी उत्पन्नावर केंद्रित अशी ही पहिली बैठक आहे. यावेळी तांत्रिक चर्चा मर्यादित राहिली, परंतु पुढील बैठकींमध्ये सर्व राज्यांकडून सखोल सूचना आणि चर्चा अपेक्षित आहे. महाराष्ट्र नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2025 मध्ये होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत आपले सादरीकरण करेल, त्यामुळे आजच्या बैठकीत महाराष्ट्राकडून सादरीकरण करण्यात आले नाही.

बैठकीत राज्यनिहाय महसूल प्रवृत्ती, आर्थिक घटकांचा प्रभाव, करचोरीविरोधी उपाय आणि धोरणात्मक शिफारशींवर सविस्तर चर्चा झाली. जीएसटी अंमलबजावणी समितीने महसूल संकलन आणि करचोरीविरोधी साधनांचा आढावा घेतला. राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC), जीएसटी नेटवर्क (GSTN) आणि आंध्र प्रदेश, गुजरात व तेलंगणा यांनी एकसमान अंमलबजावणी आणि अनुपालन व्यासपीठ विकसित करण्यावर जोर दिला. करचोरीला प्रवण क्षेत्रांमधील समस्यांचे निराकरण, नोंदणी, ई-वेबिल आणि बीटूसी अनुपालन यावरही लक्ष केंद्रित झाले. जीएसटी अंमलबजावणी समितीने पुढील बैठकीत या मुद्द्यांचा सखोल अभ्यास करण्याचे ठरवले.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर माध्यमांना सांगितले, ही बैठक जीएसटी धोरणांना स्पष्ट दिशा देण्यासाठी आणि केंद्र-राज्य यांच्यातील आर्थिक समन्वय बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे.

000000

 

प्रधानमंत्री सुर्य घर – मोफत वीज योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

मुंबई, दि. ४ : प्रत्येक घरात मोफत वीज पोहोचविण्यासाठी प्रधानमंत्री सुर्य घर- मोफत वीज योजना राबविण्यात येत आहे. शासनामार्फत सुरू असलेल्‍या या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी ऊर्जा विभागाशी समन्वय साधून, सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध योजना राबविण्यात येतात. प्रधानमंत्री सुर्य घर- मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात विधानभवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, प्रधान सचिव हर्षदिप कांबळे, आयुक्त सुरेंद्र पवार आदिसह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. शिरसाट म्हणाले की, सामाजिक न्याय विभागामार्फत सुरू असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. ऊर्जा विभागाशी समन्वय साधून प्रधानमंत्री सुर्य घर- मोफत वीज योजना राबवावी. तसेच, पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत असल्याची खात्री करण्यासाठी आयुक्तालयामार्फत यंत्रणा राबवावी. प्रत्येक लाभार्थ्याच्या घरावर सौर पॅनल उभारल्यास त्यांना 300 मेगावॅट वीज मोफत मिळणार असून, वीजेची बचतही होणार आहे. याचा लाभ त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

 

प्रामाणिक मेहनत आणि जिंकण्याच्या इच्छाशक्तीतून ध्येयप्राप्ती शक्य – सरन्यायाधीश भूषण गवई

मुंबई, दि. 4 : व्यक्तीच्या जडणघडणीत चांगले संस्कार आणि सकस मुल्यांची जोपसना या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात, कोणत्याही यशाचा मार्ग हा खडतर असतो. मात्र प्रामाणिक मेहनत आणि जिंकण्याच्या इच्छाशक्तीतून ध्येयप्राप्ती शक्य असते, असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.

कुलाबा येथील होली नेम हायस्कूलमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना सरन्यायाधीश भूषण गवई बोलत होते. यावेळी आर्च बिशप जॉन रॉडरिक्स, बिशप डॉमनिक्स फर्नांडिस, व्यवस्थापक फादर कॉनस्टॉन्सीयो नोरोना, प्रिन्सिपॉल सिस्टर लॉरेन्सीया  परेरा यांच्यासह संबंधित मान्यवर उपस्थित होते.

सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, प्रत्येकाच्या वाटचालीत शालेय जीवनाचा काळ हा सर्वात महत्वाचा असतो. शालेय जीवनातील अनेक आठवणी होली नेम हायस्कुलमधील आहेत, त्याच  शाळेत आज विशेष सत्कार होत असल्याचा क्षण निश्चितच खूप आनंदाचा आणि अभिमानाचाही आहे. आईवडिलांसोबतच या शाळेने आपल्यावर धर्मनिरपेक्षता, एकात्मता, बंधुभावाचे संस्कार केले. या  शाळेत वेगवेगळ्या समुहाच्या मित्र-परिवारासोबत एका उत्तम वातावरणात शालेय जीवन जगता आले. भारतीय संविधानाचे समतेचे तत्वही शालेय जीवनात या ठिकाणी शिकायला आणि अनुभवायला मिळाले. आपल्या आजपर्यंतच्या वाटचालीत होली नेम शाळेच्या शिकवणुकीचे, येथील शिस्त, संस्काराचे मोठे योगदान असल्याचे सांगून श्री.गवई म्हणाले की, यशाचा मार्ग हा खडतर असला तरी कोणत्याही क्षेत्रात करियर करण्याचे ठरवत असताना विद्यार्थ्यांनी त्यासाठी कष्ट घेण्याची, प्रामाणिक मेहनत करण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे. जिंकण्याच्या इच्छाशक्तीमुळेच ध्येय प्राप्त करणे शक्य होत असते. आपल्या वडिलांच्या इच्छेमुळे आपण वकिली क्षेत्रात करियर करण्याचे ठरवले असेही श्री.गवई यांनी यावेळी सांगितले.

आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पद असलेल्या सरन्यायाधीश पदी विराजमान होत असल्याचा सार्थ अभिमान आणि  आनंद शाळा व्यवस्थापनाला असून प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आपण एक प्रेरणा असल्याच्या भावना  आर्च बिशप जॉन रॉडरिक्स यांनी यावेळी व्यक्त केल्या.

००००

वंदना थोरात/विसंअ

 

भविष्य निर्वाह निधी वार्षिक खाते पत्रके २०२४-२५ वर्षासाठी आता ऑनलाईन उपलब्ध

मुंबई, दि.4 : सन 2024–25 या आर्थिक वर्षासाठीचे सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी (जीपीएफ) खाते पत्रके महालेखापाल (लेखा व अनुदान)–I, मुंबई, महाराष्ट्र यांच्या कार्यालयामार्फत जारी करण्यात आली आहेत. ही पत्रके लेखावाहिनी व कोषागारे संचालक यांना प्रदान करण्यात आली असून ती आता राज्य शासनाच्या सेवार्थ (SEVAARTH) पोर्टलवर (https://sevaarth.mahakosh.gov.in) अपलोड करण्यात आली आहेत.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या जीपीएफ सदस्यांना त्यांच्या वार्षिक खाते पत्रकांची पाहणी, डाउनलोड व प्रिंट वरील संकेतस्थळावरून करता येईल. सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय क्रमांक GPF-2019/प्र.क्र.61/क्र.24 दिनांक 11.06.2020 नुसार, 2019–20 या वर्षापासून जीपीएफ पत्रकांची हार्ड कॉपी देण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे.

खाते पत्रकात काही तफावत आढळल्यास, संबंधित आहरण व संवितरण अधिकारी (डीडीओ) यांच्या माध्यमातून ती महालेखापाल (लेखा व अनुदान)–I, मुंबई कार्यालयातील उपमहालेखापाल (निधी) यांच्याकडे कळवावी. खाते पत्रकावर जन्मतारीख, नेमणुकीची तारीख तसेच क्रेडिट/डेबिट तपशील मुद्रित नसेल तर ती माहिती त्वरित महालेखापाल कार्यालयाकडे पाठवावी, जेणेकरून ती तपासून अभिलेख अद्ययावत करता येतील.

सदस्यांना हवी असल्यास विरोध/तफावतीची माहिती या agaeMaharashtral@cag.gov.in ईमेलवरही पाठवू शकतात, असे महालेखापाल (लेखा व अनुदाने ) कार्यालयामार्फत कळवण्यात आले आहे.

००००

वंदना थोरात/विसंअ

विधानसभा कामकाज

आदिवासी विभागाच्या वसतिगृहांतील विद्यार्थ्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

मुंबई, दि. 4 : आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध भत्त्यांमध्ये मोठी वाढ केली असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

मंत्री डॉ. वुईके म्हणाले, अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना त्यांच्या गावी राहून उच्च शिक्षण घेणे सुकर व्हावे, याकरिता आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय वसतिगृहे कार्यान्वित आहेत. या वसतिगृहांमध्ये इयत्ता 8 वी पासून पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येतो. सध्या एकूण 490 वसतिगृहे कार्यान्वित आहेत.

आदिवासी शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास भत्ता, वेडिंग साहित्य, शालेय स्टेशनरी, क्रमिक पुस्तके इ. साहित्य खरेदी भत्ता, आहार भत्ता याकरिता एकरकमी रक्कम विद्यार्थ्याच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटीद्वारे हस्तांतरित केली जाते.

दि. २४ जून २०२५ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यतेनुसार आदिवासी शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना दरवाढ करण्यात येत आहे.

या भत्तेवाढीचा तपशील पुढीलप्रमाणे

निवास भत्ता (दरमहिना) — विभागीय स्तरावरील वसतिगृहांसाठी सध्याचा भत्ता ८०० असून सुधारित भत्ता १५०० करण्यात आला आहे. जिल्हास्तरावरील वसतिगृहांसाठी ६०० ऐवजी १३००, तर तालुकास्तरावरील वसतिगृहांसाठी ५०० ऐवजी १००० इतकी दरवाढ करण्यात आली आहे. सद्यस्थितीत मुलींना १०० रुपये अतिरिक्त निर्वाह भत्ता देण्यात येतो, जो सुधारित करून १५० इतका करण्यात येत आहे.

बेडिंग साहित्य, शालेय स्टेशनरी, क्रमिक पुस्तके व इतर साहित्य खरेदी भत्ता (वार्षिक) — इ. ८ वी ते १० वी साठी सध्याचा भत्ता ३२०० असून तो ४५०० करण्यात आला आहे. ११ वी, १२ वी व पदविका अभ्यासक्रमासाठी ४००० ऐवजी ५०००, पदवी अभ्यासक्रमासाठी ४५०० ऐवजी ५७००, तर वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी ६००० ऐवजी ८००० इतकी वाढ करण्यात आली आहे.

आहार भत्ता (दरमहिना) — “अ”, “ब” आणि “क” वर्गातील महानगरपालिका व विभागीय शहरांतील वसतिगृहांमध्ये सध्याचा आहार भत्ता ३५०० असून तो ५००० करण्यात आला आहे. जिल्हास्तरावरील वसतिगृहांसाठी ३००० ऐवजी ४५०० इतकी वाढ करण्यात आली आहे.

००००

शैलजा पाटील/विसंअ

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा ८ जुलै रोजी महाराष्ट्र विधानमंडळातर्फे सत्कार

मुंबई, दि. ४ : महाराष्ट्राचे सुपुत्र आणि देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचा सत्कार महाराष्ट्र विधानमंडळातर्फे करण्यात येणार आहे. हा गौरव सोहळा मंगळवार, ८ जुलै २०२५ रोजी दुपारी २ वाजता, विधान भवन, मुंबई येथील मध्यवर्ती सभागृहात पार पडणार आहे, अशी घोषणा विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी सभागृहात केली.

सत्कारानंतर सरन्यायाधीश भूषण गवई हे “भारताची राज्यघटना” या विषयावर दोन्ही सभागृहांतील सन्माननीय सदस्यांना संबोधित करणार आहेत.

0000

प्रत्येक क्षेत्रात देशाला अग्रेसर ठेवण्याची प्रेरणा पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या जीवनचरित्रातून – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

पुणे, दि. ४ : संपूर्ण विश्वात प्रत्येक क्षेत्रात आपला देश पुढे राहील हे आपले जीवन ध्येय असले पाहिजे, यासाठीची प्रेरणा आणि ऊर्जा पहिले बाजीराव पेशवे यांच्या जीवनचरित्रातून मिळते, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) परिसरातील त्रिशक्ती गेट येथे उभारण्यात आलेल्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (नि.) भूषण गोखले, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख ले. जनरल धीरज शेठ, एनडीएचे कमांडंट व्हाईस ॲडमिरल गुरचरण सिंग, खासदार मेधा कुलकर्णी, माजी मंत्री रविंद्र चव्हाण, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे आदी उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री श्री.शाह म्हणाले, पहिल्या बाजीरावांनी तंजावर ते अफगाणीस्तानपर्यंत आणि अफगाणीस्तान ते बंगाल कटकपर्यंत मोठ्या हिंदवी साम्राज्याची स्थापना केली जे छत्रपती शिवरायांचे स्वप्न होते. बाजीरावांनी युद्ध नियोजनातील वेग, रणकौशल्य, रणनीती आणि वीर सोबत्यांच्या साथीने अनेक पराभवांना विजयात रुपांतरीत केले. पालखेडच्या विजयाचा अभ्यास बारकाईने केल्यास हा अकल्पनीय होता हे लक्षात येईल. गुलामीचे निशाण उध्वस्त करुन स्वातंत्र्याचा दीप लावण्याचे काम त्यांनी यशस्वीपणे केले. देश-विदेशातील अनेक युद्धकौशल्यातील अभ्यासू सेनानींनी त्यांच्या युद्धकौशल्याविषयी गौरविले आहे.

युद्धनीतीचे काही नियम हे कधीच कालबाह्य होत नाहीत. त्यात व्यूहरचना, वेग, सैन्याची समर्पण भावना, देशभक्ती आणि बलिदान भाव सैन्याला विजय मिळवून देतो. गेल्या पाचशे वर्षातील या सर्व गुणांचे उत्कृष्ट उदाहरण पहिले बाजीराव पेशवे आहेत. त्यांनी त्यांच्या २० वर्षाच्या काळात मृत्यूपर्यंत लढलेली सर्व ४१ युद्धे जिंकली, असेही गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री यांनी काढले.

महान भारताची रचना ही शिवछत्रपतींची प्रेरणा आहे, असे सांगून केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह म्हणाले, संपूर्ण दक्षिण भारत अनेक जुलमी सत्ताधीरांमुळे पीडित होता आणि उत्तर भारत मुघल साम्राज्याच्या अधीन  होता. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ हिंदवी स्वराज्याची स्थापनाच केली नाही तर युवक, बालक आदींच्या मनावर स्वराज्याचे संस्कार केले, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर धर्मवीर संभाजी महाराज, वीर ताराराणी, संताजी -धनाजी आदी अनेक वीरांनी स्वराज्याची ज्योत विझू दिली नाही. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ आणि नंतर पहिल्या बाजीरावांची पेशवा म्हणून नेमणूक केल्यानंतर त्यांनी स्वराज्याची ज्योत तेवत ठेवली.

पहिले बाजीराव यांचे स्मारक बनविण्याची सर्वात उचित जागा कोणती असेल तर ती ‘एनडीएच’. कारण येथून देशाच्या तिन्ही सेनादलांचे प्रमुख अधिकारी प्रशिक्षित होऊन बाहेर पडत असतात. येथून बाहेर पडताना श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जीवनकाळाचा अभ्यास करून जेव्हा भविष्यातील सेनानी जातील तेव्हा भारताच्या सीमांना स्पर्श करण्याचे धाडस कोणी करणार नाही. भविष्यात स्वराज्य टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागल्यास आपली सेना आणि नेतृत्व निश्चित करेल. ऑपरेशन सिंदूर हे याचे उदाहरण आहे, असेही ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याला विस्तारित करण्याचा श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा इतिहास -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ माँसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जनतेला एक करून मुघल साम्राज्याच्या चारही आक्रमकांना सळो की पळो करून सोडले. या प्रेरणेतून अनेक पराक्रमी योद्धे तयार झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याला विस्तारित करण्याचा श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा इतिहास आहे.

त्यांनी लढलेल्या ४१ लढायापैकी एक ही लढाईत पराभव स्वीकारला नाही. उत्तरेला काबूलपर्यंत आणि पूर्वेला बंगालपर्यंत मराठी साम्राज्यचा विस्तार करण्याचे काम थोरल्या बाजीराव पेशव्यांनी केले. वेग ही त्यांची सर्वात मोठी रणनीती होती. युद्धासाठी मुघलांची सेना जेव्हा ८ ते १० कि.मी. प्रवास करत तेव्हा बाजीरावांची सेना ६० ते ८० कि.मी. चा प्रवास दररोज करत. पालखेड येथे झालेल्या युद्धाचा उल्लेख रणनितीनुसार सर्वात चांगली लढाई होय असा माँटगोमेरी यांच्यासारख्या सेनानींनी त्यांच्या युद्ध कौशल्याचा गौरव केला आहे, असे श्री. फडणवीस यांनी नमूद केले.

इंग्रजांनी आणि त्यानंतर काहींनी आपल्या इतिहासातील अनेक नायकांवर अन्याय केला आणि आपल्या हिंदवी स्वराज्याचा आणि मराठी साम्राज्याचा इतिहास त्यांनी आपल्या इतिहासातच विलीन करुन टाकला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या नायकांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आता प्रयत्न सुरू आहे. थोरले बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्यासाठी जिथे देशाच्या संरक्षण सज्जतेचे प्रशिक्षण दिले जाते अशा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसारख्या ठिकाणापेक्षा दुसरे योग्य स्थान नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

एअर मार्शल (नि.) भूषण गोखले यांनी प्रास्ताविक केले. एनडीए येथे महान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा समोरच असून बाजूला महाराजा रणजितसिंह, पहिले बाजीराव पेशवे, नरवीर तानाजी मालुसरे यांचे अश्वारूढ पुतळे आहेत. ते येथील प्रशिक्षणार्थी कॅडेटला प्रेरणा देतात. बाजीराव पेशव्यांनी त्यांच्या जीवनकाळात सर्व युद्धे जिंकली.

विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले, हे स्मारक पराक्रमाचे, पराक्रमातून निर्माण होणाऱ्या प्रतिरोधाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी भारतीय इतिहासात पराक्रम गाजविला आहे. भारतीय भाषाच नव्हे तर जगातील भाषांत हा इतिहास पुढे आणला पाहिजे, असेही ते म्हणाले.

0000

 

‘विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत’ योजनेद्वारे ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई,  दि. ४ : राज्यातील काही भागात १६ जून पासून शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येत आहेत. केवळ १५ दिवसात म्हणजे १६ ते ३० जून या कालावधीत तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थी – विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री श्री. सरनाईक म्हणाले, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा १६ जून पासून सुरू झाल्या. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६.६६ टक्के इतकी सवलत दिली आहे, म्हणजे केवळ ३३.३३ टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. या अंतर्गत १ लाख ६१ हजार २०४ विद्यार्थ्यांना त्यांच्या, त्यांच्या शाळेत जाऊन एसटी कर्मचाऱ्यांनी पास वितरित केले. त्याचप्रमाणे शासनाच्या ” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ” योजनेंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. या अंतर्गत ३ लाख ६० हजार १५० विद्यार्थिनींना त्यांच्या शाळेत जाऊन पास वितरित करण्यात आले. यापुर्वी विद्यार्थ्यांना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते. अथवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनकडून पास घेतले जात असत. आता विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा – महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून त्या विद्यार्थ्यांना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येत आहेत.

या संदर्भात १६ जूनपासुन एसटी प्रशासनातर्फे ” एसटी पास थेट तुमच्या शाळेत ” ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले होते.  या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होत आहे,  अशी माहितीही मंत्री श्री. सरनाईक यांनी दिली.

शालेय बस फेऱ्या रद्द करु नये

जून पासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. लाखो विद्यार्थी एसटी बसेसने शाळेला जातात. त्यांच्यासाठी हजारो शालेय फेऱ्या एसटीने सुरू केलेल्या आहेत. परंतु विविध कारणांनी काही फेऱ्या अचानक रद्द केल्या जातात, अशा तक्रारी शालेय विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून येत आहेत. विशेषतः आदिवासी पाडे आणि दुर्गम भागातील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना एकच बस फेरी उपलब्ध असल्याने. ती रद्द झाल्यास त्यांची प्रचंड गैरसोय होते. त्यामुळे यापुढे प्रत्येक आगार प्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शालेय फेरी कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

 

वन क्षेत्रातील निर्धारित जागांवर मेंढ्यांना चराई करण्यास परवानगी – वनमंत्री गणेश नाईक

मुंबई, दि. ४ : वनांमध्ये विशिष्ट वयापर्यंत वाढलेल्या झाडांच्या परिसरात मेढ्यांना चरण्यासाठी परवानगी देण्यात आली असून अशा ठिकाणी मेंढपाळांना अडवू नये, असे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले. तसेच अशा प्रकरणी कोणत्याही मेंढपाळांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई न करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

मेंढपाळांना वनांमध्ये चराईसाठी परवानगी देण्यासंदर्भात विधानभवनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी श्री. नाईक यांनी वरील सूचना केल्या. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आदी यावेळी उपस्थित होते.

वनमंत्री श्री. नाईक म्हणाले की, पावसाळ्याच्या चार महिन्यात वन क्षेत्रात लहान झाडे असलेल्या ठिकाणी मेंढ्यांना चारण्यास बंदी आहे. मात्र, मेंढपाळांची मागणी लक्षात घेऊन नियमांनुसार विशिष्ट वयाची वाढलेली झाडे असलेल्या क्षेत्रात मेंढ्या चारण्यासाठी परवानगी देण्यात आली असून यासंबंधीच्या सूचना सर्व वन अधिकाऱ्यांना देण्यात येतील. तसेच वन क्षेत्रात मेंढ्या चराईप्रकरणी कोणाविरूद्धही चुकीच्या पद्धतीने कारवाई होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात येतील. पावसाळ्याच्या कालावधीत शेळ्या मेंढ्यांना चराईसाठी फिरावे लागू नये, यासाठी शासकीय जागा, गायरान जमिनी तसेच जमिनी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल.

महसूलमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, वनक्षेत्राच्या बफर क्षेत्रात वन्यजीवांचा शेतीला होणारा त्रास कमी करण्यासाठी बफर क्षेत्रातील शेतजमिनी भाडेतत्वावर घेऊन तेथे सोलर प्रकल्प उभारण्याचा शासन विचार करत आहे. यामुळे सौर ऊर्जा निर्मितीबरोबरच शेतकऱ्यांना उत्पन्नही मिळणार आहे. तसेच वन विभागाने वनक्षेत्रात गवत कुरण तयार करण्यावर भर द्यावा.

माजी आमदार बच्चू कडू यांनी वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिक नुकसानाची भरपाई दुप्पट करावी. तसेच ती वेळेत द्यावी, अशी मागणी केली.

०००००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

ताज्या बातम्या

शासनातर्फे सुरू असलेला १५० दिवसांचा कार्यक्रम ही प्रशासकीय मोहीम नसून जनतेशी शासनाला जोडणारा सेतू...

0
पुणे, दि. २२ : शासनातर्फे सुरू असलेला १५० दिवसांचा कार्यक्रम ही प्रशासकीय मोहीम नसून जनतेशी शासनाला जोडणारा सेतू आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या ‘मी विकासयात्री’ पुस्तकाचे प्रकाशन

0
पुणे, दि. २२: ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. लोकांच्या सहभागातून शासनाच्या योजना कशा यशस्वी होऊ शकतात हे...

गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत – वनमंत्री गणेश नाईक 

0
ठाणे,दि. २२ (जिमाका):- गणेशोत्सवामध्ये भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवा, असे निर्देश राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गणेश...

आयुष्मान भारत योजनेचा लाभ वेळेत द्यावा – पालकमंत्री संजय शिरसाट

0
छत्रपती संभाजीनगर, दि. २२ (जिमाका)- आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ गरजू रुग्णांना वेळेत मिळावा यासाठी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ वेळेत द्यावा, त्यासाठी रुग्णालयांनी तत्पर...

करचुकवेगिरी प्रकरणात दोन जणांना अटक ३० कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक

0
मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र जीएसटी विभागाने देवरा एक्झिम एलएलपी या फर्मचे भागीदार मेहुल जैन व ऑपरेटर कमलेश जैन यांना ३० कोटी ५२ लाख...