गुरूवार, जुलै 17, 2025
Home Blog Page 1125

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ २०२३ स्पर्धेचा निकाल जाहीर

मुंबई, दि. ११- राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गुरुवार १२ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. अकोला येथील श्री खडकेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास प्रथम, सांगली जिल्ह्यातील तिरंगा गणेशोत्सव मंडळ (यशवंतनगर, विटा, ता. खानापूर) आणि तृतीय पुरस्कार पुणे जिल्ह्यातील मार्केट यार्ड मित्र मंडळ ( मंचर आंबेगाव) यांना जाहीर झाला आहे. याशिवाय जिल्हानिहाय पारितोषिक विजेतेही जाहीर करण्यात आले आहेत. राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास रुपये ५ लाख, व्दितीय क्रमांकास रुपये २.५० लाख आणि तृतीय क्रमांकास रुपये १ लाख इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांस राज्य शासनाकडून प्रत्येकी रुपये २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे दुपारी ४ वाजता हा पारितोषिक प्रदान समारंभ होणार असून खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी भैरी भवानी परफॉर्मिग आर्टस् यांचे सादरीकरण असलेला गणराज रंगी नाचतो हा सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालक मीनल जोगळेकर यांनी केले आहे.

या स्पर्धेतील जिल्हानिहाय विजेते खालीलप्रमाणे आहेत.

1 मुंबई 1. ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

२. पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ

३. निकदवरी  लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

2 मुंबई उपनगर: १. स्वप्नाक्षय मित्र मंडळ, २. बर्वेनगर व भटवाडी सार्व. गणेशोत्सव मंडळ, घाटकोपर(प) ३. बाल मित्र कला मंडळ, विक्रोळी (प)

3 . ठाणे : १. श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ ठाणे २. (विभागून) एकवीरा मित्रमंडळ ठाणे आणि  रिव्हरवूड पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ३. शिवसम्राट मित्र मंडळ, ठाणे

4 . पालघर: साईनगर विकास मंडळ, पालघर

5 . रायगड: संत रोहिदास तरुण विकास मंडळ, ता. महाड

6 . रत्नागिरी: जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जैतापूर

  1. सिंधुदुर्ग : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सलईवाडा, सावंतवाडी
  2. पुणे : १. नवज्योत मित्रमंडळ ट्रस्ट, खडकी

२. उत्कर्ष तरुण मंडळ, चिंचवडगाव

9 .सातारा:सार्वजनिक क्रीडा गणेशोत्सव मंडळ, सावली, ता. सातारा

  1. कोल्हापूर ,:श्री गणेश तरुण मंडळ, ढेंगेवाडी
  2. सोलापूर: श्री जगदंबा गणेशोत्सव सांस्कृतिक आणि सामाजिक क्रीडा मंडळ, माढा
  3. नाशिक: श्री प्रतिष्ठान मंडळ, नाशिक
  4. धुळे: वंदे मातरम प्रतिष्ठान, देवपूर

15.जळगाव: जळगाव जनता बँक कर्मचारी गणेश मंडळ, जळगाव

  1. नंदुरबार : क्षत्रीय माली नवयुवक गणेशोत्सव मंडळ, तळोदा

17 अहमदनगर : सुवर्णयुग तरुण मंडळ

18 . छत्रपती संभाजीनगर : जय मराठा गणेश मंडळ, चिखलठाण

  1. जालना : कारेश्वर गणेश मंडळ, देवगाव खवणे ता. मंठा, जि. जालना
  2. हिंगोली : श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश मंडळ, एन टी सी, हिंगोली
  3. परभणी : स्वराज्य गणेश मंडळ, देवनंदरा
  4. धाराशिव : बाल हनुमान गणेश मंडळ, गवळी गल्ली, धाराशिव
  5. नांदेड : अपरंपार गणेश मंडळ, नांदेड
  6. बीड : जय किसान गणेश मंडळ, मठ गल्ली, किल्ले धारूर
  7. लातूर : बाप्पा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लातूर
  8. नागपूर : शिवस्नेह गणेश उत्सव कमिटी
  9. गडचिरोली लोकमान्य गणेश मंडळ, गडचिरोली
  10. गोंदिया : सार्वजनिक बाळ गणेश मंडळ, बोडगाव
  11. चंद्रपूर : सार्वजनिक गणेश मंडळ चंद्रपूर
  12. वर्धा : बाळ गणेश उत्सव मंडळ, समुद्रपूर

31.भंडारा : हनुमान व्यायामशाळा गणेशोत्सव मंडळ, मोहगाव देवी, मोहाडी

  1. अमरावती : श्री बजरंग गणेशोत्सव मंडळ
  2. बुलढाणा : भक्ती गणेश महिला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बुलढाणा व सहकार्य फाऊंडेशन क्रीडा व बहु. संस्था, चिखली (विभागून)
  3. वाशीम : मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळ वाशीम.
  4. यवतमाळ : रिद्धी सिद्धी गणेश मंडळ

000

दीपक चव्हाण/विसंअ/

वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने राज्यात विविध कार्यक्रम

मुंबई, दि. 11 : माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा दिनांक 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस शासनाच्या वतीने ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ.मीनाक्षी पाटील यांनी केले आहे.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त रविवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने प्रकाशित झालेल्या ‘महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक स्थित्यंतराचा इतिहास’ या ग्रंथावर ‘चर्चा व अभिवाचन’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रवींद्र नाट्यमंदिर इमारत, प्रभादेवी, मुंबई येथे हा कार्यक्रम होईल.

या कार्यक्रमांबरोबरच महाराष्ट्रातील साहित्य संस्था, विद्यापीठे व महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने देखील महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमांमध्ये, दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता महावीर महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘वाचनकट्टा, व्याख्यान, पुस्तक प्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन, अभिजात मराठीसाठी राष्ट्रपतींना दोन हजार पत्रांचे लेखन’ असे कार्यक्रम महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथे होतील.

दिनांक १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता पूज्य साने गुरुजी संस्कारमाला सार्वजनिक वाचनालय, कुंटुर, जि.नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘व्याख्यान व काव्यवाचन : लेखक आपल्या भेटीला’ हा कार्यक्रम आ.मा.शाळा व वि.जा.भ.ज. कमवि कुंटुरतांडा, ता.नायगाव, जि.नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘आम्ही काय वाचतो आणि का वाचतो ?’ या विषयावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मनोगत हा कार्यक्रम गरवारे महाविद्यालय, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच सकाळी ११.३० वाजता मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘अभिवाचन व काव्यवाचन’ हा कार्यक्रम शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. तर, सायंकाळी ५.३० वाजता मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘व्याख्यान व अभिवाचन’ हा कार्यक्रम मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव, मुंबई येथे होईल. त्याचप्रमाणे सायंकाळी ७ वाजता दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘नाट्यअभिवाचन : संगीत देवबाभळी’ हा कार्यक्रम नाईट कॉलेज ऑफ आर्टस् ॲण्ड कॉमर्स, इचलकरंजी, जि.कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मराठी विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘व्याख्यान : वाचन संस्कृतीचे वर्तमान आणि युवक’ हा ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर, सायंकाळी ५.३० वाजता मराठवाडा साहित्य परिषद, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘पुस्तकावर निबंधवाचन व चर्चा’ हा कार्यक्रम ना.गो.नांदापूरकर सभागृह, मराठवाडा साहित्य परिषद, सन्मित्र कॉलनी, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.

दिनांक १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता विदर्भ साहित्य संघ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘कथाकथन’ हा कार्यक्रम विदर्भ साहित्य संघ, नागपूर येथे होईल. तर सकाळी १० वाजता जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालय, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘ग्रंथ प्रदर्शन आणि व्याख्यान’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० वाजता दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘व्याख्यान : वाचनाचे महत्त्व’ हा कार्यक्रम ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूर, जि.कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला असून सकाळी ११.३० वाजता मराठी विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘मराठी गद्यलेखनाचे अभिवाचन’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दिनांक १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘व्याख्यान : समकालीन वाचनसंस्कृती’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर, सकाळी १० वाजता दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘व्याख्यान : कशासाठी  वाचायचे ?’ हा कार्यक्रम पेठवडगाव, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘परिसंवाद’ इचलकरंजी, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला असून दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा-पिंपरी चिंचवड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘वाचक मेळावा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने वरील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. पाटील यांनी  केले आहे.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

करमणूक क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी मानक प्रणालीत सुधारणा करणार – कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे

मुंबई, दि. ११ :- चित्रपट व इतर करमणूक क्षेत्रातील मालक, निर्मात्यांची जबाबदारी आणि कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्याकरीता मानक कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे. या कार्यप्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी दोन आठवड्यांत त्यासाठीचा मसुदा तयार करण्यात येईल. तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या कुशल- अकुशल कामगार, कलावंत, तांत्रिक यांच्याकडून  प्राप्त झालेल्या तक्रारी विहीत अधिकारांचा अवलंब करून दोन महिन्यांत निकाली काढण्यात येतील, अशी ग्वाही कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी ‘सीटा’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

वेब सिरीज, दूरचित्रवाणी मालिका क्षेत्रातील कलावंतांच्या अडचणींबाबत आज मंत्रालयातील परिषद सभागृहात सिने ॲण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीत मंत्री श्री. खाडे बोलत होते. यावेळी आमदार योगेश सागर, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, कामगार आयुक्त सतीश देशमुख, अपर आयुक्त शिरीन लोखंडे, उपायुक्त भगवान आंधळे, संभाजी व्हनाळकर, सीटा संघटनेचे अध्यक्ष घनश्याम श्रीवास्तव,  संजय भाटिया, अयुब खान, रवी झंकार, टीना घई, दर्शन जरीवाला उपस्थित होते.

चित्रपट व इतर करमणूक क्षेत्रातील मालक, निर्माते यांची जबाबदारी आणि कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्याकरता तयार करण्यात आलेल्या मानक कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी चित्रनगरीत एक समिती गठित करावी. चित्रपट व करमणूक क्षेत्रात कामगारांचा व इतर तांत्रिक बिगर तांत्रिक कामगारांचा पुरवठा करणारे कंत्राटदारांची नोंदणी कामगार विभागाकडे करण्यात यावी. तसेच मालिका, वेब सीरीज, चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी कामगार विभागाची परवानगी असेल तरच स्थानिक प्रशासनाने परवानगी द्यावी.

त्याचबरोबर महिला व बालकांची सुरक्षितता, वेतन आणि भत्ते इत्यादी बाबींचा त्यात अंतर्भाव करावा.  निर्माता कंपन्या सुद्धा कामगार कायद्याअंतर्गत येतील, यासाठी नियमात सुधारणा करण्याची ग्वाही कामगार मंत्री श्री. खाडे यांनी दिली.

0000

मनीषा सावळे/विसंअ/

नवरात्री उत्सवासाठी बृहन्मुंबई महापालिकेचे ‘मंगलमय धोरण’

मुंबई, दि.११ : शहरात प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत नवरात्रौत्सव मंडळ आणि छटपूजा आयोजक मंडळ यांची संयुक्त बैठक झाली. बैठकीत या दोन्ही उत्सवांचे संपूर्ण नियोजन महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने करावे, असा निर्णय घेण्यात आला आहे.

पालकमंत्री श्री. लोढा यांनी आजवर प्रत्येक निर्णय प्रक्रियेत जनतेला सहभागी केले आहे. यावेळी ही सर्व सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ आणि छटपूजा आयोजक मंडळ प्रतिनिधींच्या समस्या, कल्पना आणि सूचना पालकमंत्री श्री. लोढा यांनी नमूद करून घेतल्या व त्यानुसार तात्काळ अंमलबजावणीसाठी आदेश दिले. यावेळी बिगर व्यावसायिक नवरात्र मंडळासाठी परवानगी शुल्क, अग्निशमन शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच यावर्षी नाममात्र अनामत रक्कम रु. १००/- आकारण्यात येणार असल्याने मंडळांना दिलासा मिळाला. नवरात्र हा स्त्री शक्तीचा उत्सव असून, पूर्वापार चालत आलेली ही भावना जपण्यासाठी पालकमंत्री श्री. लोढा यांनी एक अनोखी संकल्पना राबविण्याचे ठरवले आहे. या संकल्पनेनुसार नवरात्री, रास दांडिया, गरबा आयोजनाच्यावेळी महापालिका व पोलीस प्रशासन यांच्याद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.

या व्यतिरिक्त पोलीस प्रशासनाकडून महिलांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येईल. याकाळात पोलिसांचे निर्भया पथक संपूर्णपणे कार्यान्वित केले जाईल. महिला सुरक्षेची काळजी घेऊन उत्सव जल्लोषात साजरा व्हावा आणि आवश्यक तयारी कोणत्याही विलंबाशिवाय मंडळांना करता यावी यासाठी नवरात्रोत्सावासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या गणेश उत्सवाच्या धर्तीवरच एक खिडकी योजनेमार्फत देण्यात येतील. तसेच दसऱ्याला दुर्गा मूर्ती विसर्जन, गरबा विसर्जन यासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था, प्रकाश झोत दिवे, शौचालय, धुम्र फवारणी, स्वच्छता, निर्माल्य कलश इ. व्यवस्था गणेश विसर्जनाच्या धर्तीवर महापालिका प्रशासकीय विभागातर्फे उभारण्यात येईल.

छटपूजेसाठी आवश्यक कृत्रिम तलावांची व्यवस्था, प्रकाशझोत दिवे, शौचालय, धुम्र फवारणी, स्वच्छता, निर्माल्य कलश इ. व्यवस्था तसेच महिलांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र कक्ष अशी सर्व व्यवस्था प्रशासकीय विभागातर्फे करण्यात येईल. छटपूजेसाठी १९ नोव्हेंबर २०२३ रोजी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तसेच २० नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे सूर्योदयावेळी आवश्यक पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येईल. मुंबई शहरात १२०० हून अधिक नवरात्र उत्सव मंडळे दरवर्षी अधिकृतरित्या परवानगी घेतात तसेच मुंबई शहरात ८२ हून अधिक ठिकाणी छटपूजेचे आयोजन केले जाते.

****

संध्या गरवारे/विसंअ/

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाकडून करचोरी करणाऱ्या व्यक्तीवर अटकेची कारवाई

मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचोरी प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. ज्यामध्ये कर रक्कम रु. १५.८७ कोटीच्या निकेल धातू व्यवहारामध्ये रु. ८० कोटी पेक्षा जास्त रकमेच्या विक्री व्यवहारांचा समावेश असल्याची माहिती, राज्यकर सहआयुक्त अन्वेषण- अ,मुंबई यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाला आज एका विशेष मोहिमेद्वारे नॉन-फेरस मेटल मार्केटमधील निकेल व्यापारात जीएसटी चुकविण्याची फसवणूक उघड करण्यात यश आले आहे. करचुकवेगिरी करणाऱ्या कंपन्यांवर केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत कारवाईचा एक भाग म्हणून महाराष्ट्र जीएसटी विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल के. सूर्यवंशी यांनी मेसर्स नवकार मेटलचे ऑपरेटर आणि मालक सुनील कुमार बी. पिचोलिया यांना एकूण कर रक्कम रु. १५.८७ कोटीच्या, निकेल धातूच्या व्यवहारामध्ये ८० कोटीपेक्षा जास्त रकमेच्या विक्री व्यवहारांचा समावेश आढळून आला असल्याकारणाने अटकेची कार्यवाही करण्यात आली. मुंबईचे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांनी आरोपी  सुनीलकुमार बी. पिचोलिया याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक आयुक्त अमोल कालिदास सुर्यवंशी व निरीक्षकांचे पथक करीत आहेत.

राज्यकर सहआयुक्त प्रेरणा देशभ्रतार (भा.प्र.से.) यांच्या अधिपत्याखालील अन्वेषण-अ, शाखेच्या इतर अन्वेषण पथकेसुद्धा निकेल धातूच्या या व्यवहारासंबंधी समावेश असणाऱ्या इतर कंपन्यांच्या अंतर्गत बोगस व्यवहारामार्फत मोठया प्रमाणात करचोरी करण्याच्या कार्यपद्धतीचा उलगडा करीत आहेत. सध्या निकेल धातू हा सर्वात महागड्या नॉन-मौल्यवान धातूंपैकी एक आहे आणि इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल इंडस्ट्रीद्वारे याच्या प्रचंड मागणीमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

आरोपी सुनीलकुमार पिचोलिया यांच्याशी संबंधित सर्व कंपन्यांचा समावेश असलेल्या या तपासणीच्या परिणामामुळे मोठ्या बोगस व्यवहारांबाबत पुढील माहिती मिळाली आहे, ज्यात निकेल आणि इतर विविध धातूंचे व्यवहार देखील असू शकतात, जे मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर केले जातात. राज्यकर उपायुक्त सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील तपास पथक या व्यापारातील दुव्यांचा अधिक तपास करीत आहेत.

००००

वंदना थोरात/विसंअ/

मराठवाडा-विदर्भातील जिल्ह्यांना प्रकल्प मान्यतेसाठी आता संख्येची मर्यादा नाही – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई दि. ११ : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत वर्ल्ड बँकेकडून अर्थसहाय्य प्राप्त करून देण्यासाठी जिल्हानिहाय कृषी उत्पादक कंपन्यांची संख्या (लक्ष्यांक) निश्चित करण्यात येते. मात्र आता मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्ह्यातून या कंपन्यांच्या संख्येची (लक्ष्यांकाची) अट शिथिल करण्यात यावी, असे निर्देश आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी वर्ल्ड बँकेच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत दिले आहेत.

मराठवाडा व विदर्भ या भागात असलेल्या कृषी उत्पादक कंपन्यांचे उत्पादन अधिकाधिक वाढवले जावे, यादृष्टीने जिल्हानिहाय असलेली संख्येची मर्यादा रद्द करण्यात येत असल्याचे मंत्री श्री. मुंडे म्हणाले.

कृषिमंत्री श्री. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जागतिक बँकेचे वरिष्ठ अधिकारी आदर्शकुमार, ‘मित्रा’चे मुख्याधिकारी प्रवीण परदेशी, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, स्मार्टचे प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगावकर आदी उपस्थित होते.

कृषी उत्पादक कंपन्यांनी आपले व्यवसाय व उत्पन्न अधिक वृद्धिंगत करावेत. या दृष्टीने कोल्ड स्टोरेज उभारणीच्या खर्चाच्या रकमेत 12500 रुपये प्रतिटन वरून वाढ करून 17500 रुपये इतके करण्याचे निर्देशही मंत्री श्री. मुंडे यांनी दिले. 3000 टन किंवा त्यापेक्षा अधिक क्षमता असलेल्या कोल्ड स्टोरेजेला एक्सप्रेस फीडरऐवजी जवळच्या शासकीय सौर ऊर्जा प्रकल्पांशी किंवा तत्सम यंत्रणेशी लिंकेज केल्यास त्या कंपनीचा विजेचा वापर व बिलही कमी होईल, असेही यावेळी मंत्री श्री. मुंडे म्हणाले.

महाराष्ट्रात कृषी उत्पादक कंपन्यांच्या मार्फत सोयाबीन, कापूस, हळद यांसह विविध अन्न पदार्थांवर प्रक्रिया करून उत्पादने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जातात. याच उत्पादनांना प्रसिद्ध नामांकित कंपन्यांशी थेट जोडून दिले, तसेच उत्पादक कंपन्यांना ऑनलाईन मार्केटिंग सारख्या सहज उपलब्ध बाजारपेठा खुल्या करून दिल्या, तर शेतकरी अधिकचे उत्पन्न मिळवू शकतात. यादृष्टीने वर्ल्ड बँक, स्मार्ट व कृषी विभागाने कृषी उत्पादक कंपन्या, जागतिक कंपन्या व मार्केटिंग कंपन्यांची एकत्रित बैठक व कार्यशाळा घेऊन पुढील निर्णय घ्यावेत.

विदर्भ-मराठवाड्यासमोरील चाऱ्याच्या संभाव्य समस्येला अनुसरून मुरघास उत्पादनास देखील कृषी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात यावे, असेही त्यांनी निर्देश दिले आहेत.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

सोसायटी अचिव्हर्स मासिकाच्या नवीन अंकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. ११ : सोसायटी अचिव्हर्स या मासिकाच्या नवीन अंकाचे प्रकाशन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकलेले चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यावेळी उपस्थित होते.

वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या नागरिकांना सोसायटी अचिव्हर्स या मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकण्याचा मान मिळतो. श्री. भांडारकर यांच्या निमित्ताने एका मराठी कलावंताला हा बहुमान मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी सोसायटी अचिव्हर्स मासिकाचे मालक नारी हिरा, संचालक, संपादक अॅण्ड्रिया कोस्टा, मेघना प्रकाशनचे अशोक धामणकर आदी यावेळी उपस्थित होते.

वांद्रे शासकीय वसाहतीमधील एसआरएची क्षमता तपासून पुनर्विकासासाठी सविस्तर आराखडा सादर करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई, दि. ११ : वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीमध्ये उपलब्ध असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या जागेची क्षमता तपासून त्याठिकाणी पुनर्विकास करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करुन सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

वांद्रे (पूर्व) शासकीय वसाहतीमध्ये राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे देण्याच्या विषयावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी आमदार किरण पावसकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता रणजित हांडे यांचेसह शासकीय वसाहतीमधील कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपस्थित शिष्टमंडळाशी संवाद साधून वसाहतीतील सोयी-सुविधांची संपूर्ण माहिती घेतली. वसाहतीमधील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची जागा, तेथील क्षमता आणि फनेल झोनसह इतर सर्व तांत्रिक बाबींचा अभ्यास करुन त्या जागेचा सविस्तर आराखडा प्राप्त झाल्यानंतर पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

वांद्रे (पूर्व) येथे सुमारे ९० एकर क्षेत्रफळाच्या शासकीय भूखंडावर शासकीय वसाहत उभी असून १९५८ ते १९७३ च्या दरम्यान या वसाहतीचे बांधकाम करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या प्रथम वर्ग ते चतुर्थ श्रेणी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ४ हजार ७८२ सदनिका आहेत. यापैकी १६९ इमारती धोकादायक असून त्यातील ६८ अतिधोकादायक आहेत, उर्वरित १०१ इमारती रिकाम्या करण्यात येणार असून तेथील कर्मचाऱ्यांना लॉटरी पद्धतीने सेवा निवासस्थाने देण्यात येणार आहेत. या वसाहतीमध्ये १२ इमारतींचे बांधकाम प्रगतीपथावर असून त्यापैकी ४ इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. १२ इमारतींपैकी एक इमारत सावित्रीबाई फुले शासकीय वसतीगृहाला देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती म्हैसकर यांनी यावेळी सांगितले.

‘जय महाराष्ट्र’मध्ये उद्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षिका स्वाती देशमुख यांची मुलाखत

मुंबई, दि. ११ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या शिल्प निदेशक (कोपा) शिक्षिका स्वाती देशमुख यांची मुलाखत १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वा. प्रसारित करण्यात येणार आहे.

शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येते. यामध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, मुंबई येथील शासकीय प्रशिक्षण संस्था, लोअर परळ या संस्थेतील शिल्प निदेशक शिक्षिका श्रीमती देशमुख यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. या निमित्ताने श्रीमती देशमुख यांनी आपल्या वाटचालीबद्दल, शैक्षणिक क्षेत्रातील संशोधन व योगदानाबद्दल ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवार, दि.12 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

भाडेकरूंच्या तपशीलाची सिटीझन पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 11 : समाजविरोधी घटकांकडून सार्वजनिक शांतता, मानवी जीवनाला गंभीर धोका आणि त्या कारणास्तव खाजगी, सार्वजनिक मालमत्तेला इजा होण्याची शक्यता असल्याचे आढळून आले आहे. दहशतवादी, समाजविरोधी घटकांकडून विध्वंसक कृत्ये, दंगली, भांडणे आदी घडू नयेत म्हणून घरमालक, भाडेकरूंची तपासणी आवश्यक आहे. त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या कोणत्याही घर, मालमत्ता, हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस, मुसाफीर खाना  हा व्यवसाय करणाऱ्या  जागा मालकाने कोणत्याही व्यक्तीला राहण्यासाठी जागा भाड्याने दिली असेल, अशा भाडेकरूंचे सर्व तपशील त्वरित www.mumbaipolice.gov.in/ या पोर्टलवर ऑनलाईन नोंद करण्यात यावा, असे आवाहन पोलीस उप आयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आदेशान्वये केले आहे.

भाडेकरू व्यक्ती परदेशी असेल, तर मालक आणि परदेशी व्यक्ती यांनी त्याचे नाव, राष्ट्रीयत्व, पासपोर्ट तपशील, ठिकाण, जारी करण्याची तारीख, वैधता सादर करावी. व्हिसाबाबत व्हिसा क्रमांक, श्रेणी, ठिकाण आणि जारी करण्याची तारिख, वैधता, नोंदणीचे ठिकाण आणि शहरात राहण्याचे कारण नमूद करणे आवश्यक आहे, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.  हा आदेश 7 नोव्हेंबर 2023 रोजी मध्यरात्रीपर्यंत लागू असणार आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

****

निलेश तायडे/विसंअ/

ताज्या बातम्या

बिहारमधील मतदार नोंदणीसाठी केवळ ६.८५ टक्के मतदारांचे फॉर्म बाकी

0
मुंबई, दि. १६:  भारत निवडणूक आयोगाने आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, बिहारमध्ये आगामी मतदार यादीच्या प्रारूप प्रकाशनासाठी मतदार नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अद्याप...

नागपूरमधील विधानभवनाची विस्तारीत इमारत भव्यदिव्य असेल– विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

0
मुंबई, दि. १६: नागपूरमधील विधानभवनच्या इमारतीचे विस्तारीकरण व प्रस्तावित नव्या प्रशासकीय इमारतीच्या आराखड्याचे आज सादरीकरण करण्यात आले. विस्तारीकरण व प्रस्तावित इमारतीचे काम भव्यदिव्य असे...

विधानसभा इतर कामकाज

0
अर्धा तास चर्चा ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करणार -पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील मुंबई, दि. १६: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक...

एस.टी. बस चालकाचा मुलगा विरोधी पक्षनेता होणे, ही लोकशाहीची मोठी देणगी – मुख्यमंत्री देवेंद्र...

0
मुंबई, दि. १६: "एस.टी. बस चालकाचा मुलगा आपल्या कर्तृत्वाच्या बळावर राज्य विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, ही बाब अभिमानास्पदच आहे. कोणी कुठेही जन्माला आला तरी...

अंबादास दानवे हे विधानपरिषदेत चर्चेची उंची वाढवणारे विरोधी पक्षनेते – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
मुंबई, दि. १६ : अंबादास दानवे हे विधानपरिषदेतील चर्चेची उंची वाढवणारे आणि संयमी, परखड भूमिका मांडणारे विरोधी पक्षनेते असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...