रविवार, जुलै 6, 2025
Home Blog Page 107

सहकार विभागाची अर्धन्यायिक निर्णय प्रक्रिया आता आणखी जलद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २० : राज्यातील सहकाराशी निगडीत नागरिकांच्या सोयीसाठी ई-क्युजे (e-Quasi-Judicial) प्रणालीचे मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सहकार विभागाने विकसित केलेल्या या प्रणालीमुळे जनतेला जलद तसेच पारदर्शक पद्धतीने सहकार विभागाची अर्धन्यायिक निर्णय प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

ई-क्युजे प्रणालीविषयी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की,’महाराष्ट्र राज्य सहकारी चळवळीमध्ये देशात अग्रेसर असून राज्यात सुमारे २.२५ लाख सहकारी संस्था आहेत. या संस्थांचे कामकाज महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ मधील तरतुदीनुसार निबंधकामार्फत करण्यात येते. नागरिकांच्या सोयीसाठी शासनाच्या ई-गव्हर्नस धोरणांतर्गत ई-क्युजे प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ई-क्युजे अंतर्गत पारदर्शक पद्धतीने कागदविरहित पुनर्विचार व अपील प्रक्रिया प्रणाली (PRATYAY-Paperless Revision and Appeal in Transparent Way) विकसित करण्यात आली आहे. यामुळे जनतेला सर्व सेवासुविधा घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मिळणारआहेत. नागरिकांच्या, पक्षकारांच्या तसेच अधिकाऱ्यांच्या वेळेची बचतही यामुळे होणार आहे.

ई-क्युजे प्रणालीच्या लोकार्पण प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील,सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे उपस्थित होते.

ई-क्युजे अंतर्गत ऑनलाइन सुविधा

या प्रणालीमध्ये वकील /व्यक्ती /संस्थांची ऑनलाईन नोंदणी, सर्व पक्षकारांची ऑनलाईन नोंदणी, ऑनलाईन पद्धतीने प्रकरण दाखल करणे, दाखल प्रकरणांची ऑनलाईन छाननी, त्रुटी पूर्ततेसाठी ऑनलाईन सुविधा, दाखल प्रकरणांच्या सुनावणीच्या तारखा / त्यामधील बदल पक्षकारांना नोटीसा ई-मेल द्वारे बजावण्यात येणार, सुनावणीच्या तारखा व वेळा तसेच बोर्ड पक्षकारांना ऑनलाईन पाहता येणार, सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेता येणार व त्यांना ऑनलाईन रोजनामा उपलब्ध होणार, सर्व पक्षकारांना ऑनलाईन अर्धन्यायिक निर्णय (ई-मेल द्वारे) कळविण्यात येणार आदी सेवांचा यात समावेश आहे. या प्रणाली अंतर्गत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अॅक्ट १९६३ मधील मानीव अभिहस्तांतरण (Deemed Conveyance), महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या विविध कलमाअंतर्गत अर्ज, अपील व पुनरिक्षण अर्ज तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अंतर्गत अवैध सावकारीविरुद्ध तक्रार अर्ज या सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या प्रणालीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये व्हीसी द्वारे ऑनलाईन सुनावणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच नोटीस बजावण्यासाठी ई-टपाल सेवेचा अवलंब केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

००००

मंत्रिमंडळ निर्णय

वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय

वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करणे, त्यासाठीची आवश्यक पदे उपलब्ध करून देणे आणि येणाऱ्या खर्चास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव उच्च न्यायालयाकडून शासनास सादर करण्यात आला होता.  या प्रस्तावास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या न्यायालयाकरिता २३ नियमित पदे आणि बाह्य यंत्रणेद्वारे पाच पदांच्या सेवा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली. यापोटी येणाऱ्या एकूण रूपये 1,76,42,816/- इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. या न्यायालयासाठी दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर)-एक, अधीक्षक-एक, सहायक अधीक्षक-दोन, लघुलेखक श्रेणी-२-एक, वरिष्ठ लिपिक-तीन, कनिष्ठ लिपिक-नऊ, बेलीफ-तीन, शिपाई-तीन, पहारेकरी-एक, सफाईगार-एक अशा पदांना मान्यता देण्यात आली.

000

महानगर गॅस लिमिटेड कंपनीला बायोमेथेनेशन प्रकल्पासाठी देवनार येथील भूखंड

महानगर गॅस लिमिटेड कंपनीला देवनार येथील भूखंड सवलतीच्या दरात देण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

केंद्र सरकारचे गोबरधन योजनेअंतर्गत शहरी भागात ७५ बायोमेथेनेशन प्रकल्पासह ५०० नवीन बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट आहे.  या प्रकल्पाच्या उभारणीसाठी येणारा खर्च तेल आणि वायू विपणन संस्था करणार आहे.  मात्र या प्रकल्पांसाठी राज्यांकडून नाममात्र दरात जमीन आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा केंद्र सरकारच्या सूचना आहेत.  त्यानुसार महानगर गॅस लिमिटेड कंपनीला देवनार येथील १८ एकर जमीन २५ वर्षांसाठी भाडेपट्टयाने उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली.  या जागेवर बायोमिथेशन तंत्राचा वापर करून दर दिवशी ५०० टन क्षमतेचा कॉम्प्रेस्ड बायोगॅस उभारणी करण्यात येईल.  या जमिनीसाठी प्रतिवर्षी 72,843 रूपये भाडेपट्टा शुल्क आकारण्यात येईल.  यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महानगर गॅस लिमिटेड कंपनी यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

0000

एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणूकीसह, एक लाख रोजगार संधी आणणाऱ्या प्रकल्पांना मान्यता

उद्योग विभागातील धोरण कालावधी संपुष्टात आल्यामुळे प्रलंबित असलेल्या 325 प्रस्तावांना आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.  या प्रस्तावांना मंजुरी दिल्यामुळे 1,00,655.96 कोटी रूपयांची गुंतवणूक आणि 93,317 रोजगार निर्मिती होणे अपेक्षित‍ आहे.

उद्योग विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरण 2016 आणि त्याअंतर्गत फॅब प्रकल्पाकरिता प्रोत्साहने, महाराष्ट्राचे अवकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन  धोरण 2018, रेडिमेड गारमेंट निर्मिती, जेम्स ॲण्ड ज्वेलरी, सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक्स व अभियांत्रिकी घटक याकरिता फ्लॅटेड गाळायुक्त औद्योगिक संकुले धोरण 2018, महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण 2019 या धोरणांचा कालावधी संपुष्टात आलेला आहे.  सदर विषयांचे नवीन धोरण ठरविण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे.  मात्र धोरणाचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर प्राप्त झालेल्या विविध घटकांच्या प्रस्तावापैकी राज्याच्या विकासाच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील अशा घटकांना प्रोत्साहने मंजूर करण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे.  वरील धोरणांचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे नवीन धोरण लागू होईपर्यंत संबंधित धोरणानुसार प्रलंबित प्रस्तावांना मान्यता दिल्यास उद्योग घटकांना गुंतवणूक करणे, उद्योग घटकांना अनुदान देणे शक्य होणार आहे.  यानुसार महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरण 2016 आणि त्याअंतर्गत फॅब प्रकल्पाकरिता प्रोत्साहने धोरणाच्या अधीन राहून 313 प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.  313 प्रस्तावांमधून 42,925.96 कोटी रूपयांची गुंतवणूक अपेक्षित असून 43,242 रोजगार निर्मिती होणार आहे.

महाराष्ट्राचे अवकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन  धोरण 2018 नुसार एकूण 10 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. या 10 प्रस्तावांमधून 56,730 कोटी रूपयांची गुंतवणूक अपेक्षित असून 15,075 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. तर रेडिमेड गारमेंट निर्मिती, जेम्स ॲण्ड ज्वेलरी, सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक्स व अभियांत्रिकी घटक याकरिता फ्लॅटेड गाळायुक्त औद्योगिक संकुले धोरण 2018 अनुसार 2 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.   या प्रस्तावांमधून 1000 कोटी रूपयांची गुंतवणूक अपेक्षित असून 35,000 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

0000

सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेसाठी ५ हजार ३२९ कोटींची मान्यता

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेस 5329.46 कोटी रुपयांच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेस आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेमुळे शिंदखेडा आणि धुळे तालुक्यातील एकूण 36407 हे.क्षेत्र सिंचित होणार असून 52720 हे. सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.  हा प्रकल्प केंद्र सरकारच्या विशेष पॅकेजमध्ये बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पावर मार्च 2025 अखेर 2407.67 कोटी खर्च झाला आहे. आज द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार 5329.46 कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करावयाचे आहे. प्रकल्पाचे काम करताना राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या अहवालातील सर्व मुद्यांची पूर्तता करण्यात येणार आहे.

प्रकल्पाच्या कोणत्याही प्रयोजनार्थ मंजूर प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेबाहेर जाऊन निधी वितरण अथवा अतिरिक्त खर्च न करण्याची जबाबदारी महामंडळाची राहील. प्रकल्पाचे वाढीव लाभक्षेत्र 3040 हे.अधिसूचित करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.  प्रकल्पास आवश्यक वैधानिक आणि तांत्रिक मान्यता घेण्याची जबाबदारी महामंडळाची राहील. प्रकल्प पूर्णत्वाच्या संभाव्य नियोजनानुसार तरतूद उपलब्ध करण्याची संपूर्ण जबाबदारी महामंडळाची राहील, अशा अटींच्या अधीन राहून ही मान्यता देण्यात आली आहे.

000

सिंधुदुर्गमधील अरुणा प्रकल्पांतर्गत मौजे हेत जल सिंचन प्रकल्पास २ हजार २५ कोटी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मौजे हेत जल सिंचन प्रकल्पास 2025.64 कोटी रुपयांच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यतेस आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मौजे हेत जल सिंचन प्रकल्पामुळे वैभववाडी तालुक्यातील 4475 हेक्टर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये 835 हेक्टर असे एकूण 5310 हेक्टर क्ष्‍ोत्र सिंचनाखाली येणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेले भूसंपादन करून पुनर्वसनाबाबत प्राधान्याने कार्यवाही करणे आवश्यक आहे.  हे भूसंपादन करताना भविष्यात न्यायालयीन प्रकरणे उद्भवणार नाहीत, याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे.  प्रकल्पासाठी आवश्यक वैधानिक आणि तांत्रिक मान्यता सक्षम स्तरावर घेणे यांसह विविध अटींच्या अधीन राहून सदर प्रकल्पास 2025.64 कोटी रूपयांच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंजुरी देण्यात आली.

0000

 

रायगडमधील पोशीर प्रकल्पास ६ हजार ३९४ कोटी

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पोशीर प्रकल्पास 6394.13 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाच्या प्रशासकीय मान्यतेस आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे कुरूंग गावाजवळ पोशीर नदीवर 12.344 टी.एम.सी.चे धरण बांधणे प्रस्तावित आहे.  प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा 9.721 टी.एम.सी.आहे.  त्यापैकी पिण्यासाठी 7.933 टी.एम.सी. आणि औद्योगिक वापरासाठी 1.859 टी.एम.सी. पाणी वापर प्रस्तावित आहे.  या प्रकल्पाचे पाणी मुंबई महानगर, नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांना पिण्याच्या पाण्याकरिता पुरविले जाणार आहे.  त्यामुळे पाणी वापर आधारित लाभधारक संस्थांची भांडवली खर्चातील हिस्सेदारी निश्चित करण्यात आली आहे.  त्यानुसार मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (33.96 टक्के, 2171.45 कोटी रूपये), नवी मुंबई महानगरपालिका (43.53 टक्के, 2783.37 कोटी रूपये), उल्हासनगर महानगरपालिका (9.56 टक्के, 611.28 कोटी रूपये), अंबरनाथ नगर परिषद (7.07 टक्के,  452.06 कोटी रूपये), बदलापूर नगर परिषद (5.88 टक्के, 375.97 कोटी रूपये) या संस्थांना खर्चातील हिस्सेदारी निश्चित करून देण्यात आली आहे.    हा प्रकल्प कोकण पाटबंधारे विकास महामंडळद्वारे ठेव तत्त्वावर उभारण्यात येणार आहे.  हा प्रकल्प राबविण्याकरिता कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण, नवी मुंबई महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगर परिषद, बदलापूर नगर परिषद यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात येणार आहे.  प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार आहे.  या समितीत लाभदायक स्थानिक स्वराज्य संस्था आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या प्रतिनिधींचा समावेश असेल.

000

रायगडमधील शिलार प्रकल्पासाठी ४ हजार ८६९ कोटी

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे शिलार प्रकल्पास प्रशासकीय मान्यतेस आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे शिलार प्रकल्पांतर्गत मौजे किकवी येथे सिल्लार नदीवर 6.61 टी.एम.सी. क्षमतेचे धरण बांधणे प्रस्तावित आहे.  या योजनेस 4869.72 कोटी रूपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.  या प्रकल्पाचे पाणी मुंबई महानगर, पनवेल महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका आदी शहरांना पिण्याच्या पाण्याकरिता पुरविले जाणार आहे.  त्यामुळे पाणी वापर आधारित लाभधारक संस्थांची भांडवली खर्चातील हिस्सेदारी निश्चित करण्यात आली आहे.  त्यानुसार मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (भांडवली खर्चातील हिस्सेदारी टक्केवारी 15.08, रक्कम 734.35 रूपये कोटीत), पनवेल महानगरपालिका (भांडवली खर्चातील हिस्सेदारी टक्केवारी 75.42, रक्कम 3672.75 रूपये कोटीत), नवी मुंबई महानगरपालिका (भांडवली खर्चातील हिस्सेदारी टक्केवारी 9.5, रक्कम 462.62 रूपये कोटीत) या संस्थांना खर्चातील हिस्सेदारी निश्चित करून देण्यात आली आहे.    हा प्रकल्प कोकण पाटबंधारे विकास महामंडळद्वारे ठेव तत्त्वावर उभारण्यात येणार आहे.  सदर प्रकल्प राबविण्याकरिता कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवी मुंबई व पनवेल महानगरपालिका  यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात येणार आहे.  प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार आहे.  या समितीत लाभदायक स्थानिक स्वराज्य संस्था आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या प्रतिनिधींचा समावेश असेल.

0000

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

पुणे, दि. २०: पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाने महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाच्या विज्ञानविश्वाची हानी झाली आहे. ते केवळ एक महान खगोलशास्त्रज्ञ नव्हते, तर विज्ञानाच्या लोकाभिमुखतेचे जनकही होते, अशा शब्दांत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ज्येष्ठ वैज्ञानिक पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

राज्यमंत्री मिसाळ शोक संदेशात म्हणतात की, ज्ञान, प्रज्ञा, सुलभता आणि साधेपणा यांचा संगम असलेल्या डॉ. नारळीकर यांनी विज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवले. त्यांनी अंधश्रद्धेवर प्रहार करत विज्ञानवादी विचार समाजात रुजविले. त्यांनी केंब्रिजमधून घेतलेले शिक्षण, टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील योगदान, आयुका (IUCAA) ची स्थापना आणि मराठीतून विज्ञानलेखन हे सर्वच भारतीय विज्ञानविश्वासाठी दीपस्तंभ ठरले. आज आपण एका ज्ञानवृक्षाला मुकलो आहोत. त्यांचे जाणे ही केवळ वैज्ञानिक समुदायासाठीच नव्हे, तर प्रत्येक जिज्ञासू मनासाठी मोठी पोकळी निर्माण करणारी आहे. ही पोकळी भरून निघणे अशक्य आहे.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी डॉ. नारळीकर यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या परिवाराप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

 

डॉ. जयंत नारळीकर एक महान विज्ञान तपस्वी – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. २०: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञान प्रसारक पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. पुण्यातील ‘आयुका’ संस्थेचे संस्थापक असलेल्या डॉ. नारळीकर यांनी विज्ञान कथा, लघु निबंध व वृत्तपत्रातील लेखांच्या माध्यमातून विज्ञान विश्वातील नवनवीन घडामोडी व संशोधन जनसामान्यांसमोर आणले. कठीण वैज्ञानिक संकल्पना सोप्या भाषेत समजून सांगण्याची त्यांच्याकडे हातोटी होती, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

०००

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘शिक्षणवेध २०४७’ त्रैमासिकाचे प्रकाशन

मुंबई, दि. २०: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून या धोरणाच्या माध्यमातून नवकल्पना आणि संशोधनास अधिक चालना देण्यात येत आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने ‘शिक्षणवेध २०४७’ हे त्रैमासिक सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी या त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले.

या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्रिमंडळातील सदस्य, मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी उपस्थित होते.

‘शिक्षणवेध २०४७’ त्रैमासिकाच्या माध्यमातून विभागाच्या विविध योजना, उपक्रम, धोरणे, यशोगाथा, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे विचार, यशस्वी विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी कथा तसेच शैक्षणिक क्षेत्रातील नवप्रवाहांचा समावेश असणार आहे. तसेच तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण, कला शिक्षण आणि ग्रंथालय संचालनालय या विभागांची एकत्रित  माहिती वाचकांना उपलब्ध होणार आहे. शिक्षणवेध त्रैमासिक विद्यार्थ्यांसह प्राध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील सर्व संबंधितांसाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरणार आहे.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/

 

देशाच्या ज्ञान-विज्ञानाच्या नभांगणातील तेजस्वी तारा निखळला – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. २० : “जागतिक किर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात देशाला नव्या उंचीवर नेले. विज्ञानाची सूत्रे, विज्ञानवादी विचार, वैज्ञानिक दृष्टीकोन नव्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी जीवनभर कार्य केले. विज्ञानाची रहस्ये सहज-सोप्या भाषेत मुलांना समजावून सांगितली. त्यांच्या निधनाने ज्ञान-विज्ञानाच्या प्रसारासाठी वाहून घेतलेला देशाच्या वैज्ञानिक नभांगणातील तेजस्वी तारा निखळला आहे”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, “डॉ. जयंत नारळीकर जागतिक किर्तीचे वैज्ञानिक तसेच विज्ञानवादी विचार समाजात रुजवणारे कार्यशील विचारवंत होते. भौतिकविज्ञान, खगोलविज्ञानाच्या प्रसारासाठी त्यांनी स्थापन केलेली ‘आयुका’ संस्था ही देशाचं ज्ञानवैभव ठरली आहे. वैज्ञानिक क्षेत्रात स्थूलविश्वाचा उगम व बदलत्या स्वरूपावरच्या संशोधनामुळे जागतिक वैज्ञानिकांमध्ये ते आदरस्थानी होते. ‘क्वासी स्टेडी स्टेट थिअरी’ संदर्भातील त्यांचे संशोधन मैलाचा दगड ठरले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात मांडलेला विज्ञानवादी दृष्टीकोन, अंधश्रद्धेवरचा प्रहार कायम स्मरणात राहील. ‘महाराष्ट्रभूषण’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’सारख्या मानसन्मानाने गौरवान्वित डॉ. जयंत नारळीकरांचे निधन देशाची कधीही भरून न येणारी हानी आहे. त्यांनी सुरु केलेले विज्ञानप्रसाराचे कार्य पुढे सुरु ठेवणे, विज्ञानवादी दृष्टीकोन समाजात, विशेष करुन भावी पिढीमध्ये रुजवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

०००

डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाने विज्ञान विश्वात मोठी पोकळी

मुंबई, दि. २०: प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, विज्ञानलेखक आणि विज्ञान प्रसारक प्रा. जयंत विष्णू नारळीकर यांच्या निधनाने विज्ञान विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

प्रा. नारळीकर हे जागतिक पातळीवर खगोलशास्त्रात आपल्या संशोधनामुळे ओळखले गेले. त्यांचे कार्य भारतासाठी महत्त्वाचे होते. मराठी मातीच्या या सुपुत्राने खगोलशास्त्रात मारलेली झेप महाराष्ट्रासाठी निश्चितच अभिमानाची होती.

राज्य शासनाला देखील त्यांनी वेळोवेळी विज्ञान-तंत्रज्ञानाबाबतीत मार्गदर्शन केले आहे. पुण्यात ‘आंतरविश्व विद्यापीठ’ स्थापना करून राज्यात विज्ञान संशोधनाची भक्कम पायाभरणी त्यांनी केली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे महाराष्ट्राला वैज्ञानिक क्षेत्रात आघाडीचे स्थान प्राप्त झाले. त्यांचे निधन राज्य आणि देशासाठी मोठी हानी आहे. नव्या पिढीतील वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रज्ञ हे निश्चितच डॉ. नारळीकर यांची प्रेरणा घेत राहतील, असा मला विश्वास आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त करताना म्हटले आहे.

०००

भारतीय खगोलशास्त्राचा अध्वर्यू निमाला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • मंत्रिमंडळाच्या बैठकीतही श्रद्धांजली अर्पण

मुंबई, दि. २०:  भारताची विज्ञानाधिष्ठीत प्रतिमा उजळवणारा आणि खगोल शास्त्रातील महत्ता सिद्ध करणारा महान वैज्ञानिक सुपूत्र काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्भविभूषण, महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे. डॉ. नारळीकर यांच्या निधनाने भारतीय खगोलशास्त्राचा अध्वर्यू निमाला, असे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना महाराष्ट्रातील नागरिकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

डॉ. नारळीकर यांच्या कन्या श्रीमती गिरीजा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना सांत्वना दिली.

डॉ. नारळीकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार व्हावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणाना दिले. दरम्यान, आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत डॉ. नारळीकर यांच्या निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ‘भारतीय खगोलशास्त्राचा भक्कम पाया घालण्यात डॉ. नारळीकर यांनी अमूल्य योगदान दिले. गणितज्ज्ञ वडीलांकडून मिळालेला वारसा घेऊन डॉ. नारळीकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खगोलीय शास्त्रातील संशोधनात मोलाची भर घातली. त्यांच्या संशोधनात्मक कार्याला जगभरातील विद्यापीठांनी, संशोधनात्मक संस्थांनी मान्यता दिली. भारतात परतल्यावर त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रोनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स (IUCAA)’ ‘आयुका’ या संस्थेच्या उभारणीची जबाबदारी सोपवली. तीही त्यांनी समर्थपणे सांभाळली. या संस्थेलाही त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र अशी ख्याती मिळवून दिली. ‘बिग-बँग थिअरी’ला पर्यायी संकल्पनाही त्यांनी मांडली होती. त्यांनी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाच्या कॉस्मोलॉजी कमिशनचे अध्यक्षपदही भूषवले.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या प्रचार-प्रसारातील डॉ. नारळीकर यांचे कार्य देखील असेच भरीव राहिले. त्यांनी विज्ञान लेखक म्हणून केलेली कामगिरी साहित्यिकदृष्ट्या अजरामर अशीच राहील. कारण त्यांनी रसाळ आणि ओघवत्या भाषेत केलेल्या लेखनामुळे नव्या पिढीत, विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये विज्ञानाची गोडी वाढीस लागली. ‘आकाशाशी जडले नाते’ असे पुस्तकरुपातून सांगणाऱ्या डॉ. नारळीकर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेही अध्यक्षपद भूषवले होते. त्यांच्या ‘चार नगरांतले माझे विश्व’ या आत्मचरित्रालाही साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. यातूनही त्यांच्या साहित्यकृतींचे वैशिष्ट्य आणि गुणवत्ता लक्षात यावी.

डॉ. जयंत नारळीकर, पुणे या इतक्या पत्त्यावर त्यांच्याकडे लहानथोरांची शेकडो पत्र येत. या पत्रातील विज्ञान विषयक शंका-प्रश्नांचे ते आवर्जून समाधान करत. निखळ वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या प्रसारासाठी ते अखेरपर्यंत निरलसपणे कार्यरत राहीले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक – भारतीय खगोलशास्त्राचे अध्वर्यू ते शाळा-महाविद्यालये-विद्यापीठांमध्ये पोहचून विज्ञान आणि त्यातील गणिती सिद्धांताच्या प्रसारासाठी झटणारा प्रसारक अशी त्यांच्या व्यक्तिमत्वाची व्यापकता होती. डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनामुळे भारतीय वैज्ञानिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. डॉ. नारळीकर यांच्या परिवारावरही आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ज्ञ डॉ. नारळीकर यांना महाराष्ट्राच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

०००

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश

मुंबई, दि. २०:  महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ यांना राज्याच्या मंत्रीपदाची शपथ दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभात राज्यपालांनी भुजबळ यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, उद्योग ,मराठी भाषा मंत्री उदय सामंत, आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध व्यवसाय विकास विभाग मंत्री अतुल सावे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, कौशल्य विकास, रोजगार  उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, राज्यपाल यांचे सचिव प्रशांत नारनवरे, तसेच मंत्री  छगन भुजबळ यांचे कुटुंबिय यावेळी उपस्थित होते.

सुरुवातीला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथविधी सोहळ्यासाठी राज्यपालांची अनुमती मागितली. त्यानंतर राज्यपालांनी छगन भुजबळ यांना शपथ दिली. शपथविधी नंतर राज्यपालांनी मंत्री भुजबळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

०००

मंत्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ यांचा परिचय

जन्म: १५ ऑक्टोबर १९४७.

जन्म ठिकाण: नाशिक.

शिक्षण: एल.एम.ई. (आय), (मेकॅनिकल इंजिनिअर).

ज्ञात भाषा:  मराठी, हिंदी व इंग्रजी.

वैवाहिक माहिती :  विवाहित, पत्नी श्रीमती मीना.

अपत्ये:  एकूण १ (एक मुलगा)

व्यवसाय: शेती.

पक्ष:  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.

मतदारसंघ: ११९ – येवला, जिल्हा-नाशिक.

इतर माहिती: संस्थापक-अध्यक्ष, मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट, बांद्रा, मुंबई, माजी विश्वस्त, व्हि.जे. टी.आय. संस्था, मुंबई, विश्वस्त, नायर रुग्णालय, विश्वस्त, प्रिन्स आगा खान रुग्णालय, मुंबई; संस्थापक, महात्मा फुले समता परिषद, या संस्थेमार्फत उपेक्षित पद-दलित, मागासवर्गीयांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न तसेच, महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा व आदर्शाचा प्रचार व प्रसार, ५ नोव्हेंबर २०१० रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना मुंबई भेटीदरम्यान महात्मा फुले लिखित ‘गुलामगिरी’ या पुस्तकाचा ‘स्लेव्हरी’ हा अनुवादीत ग्रंथ भेट दिला. माजी विश्वस्त, मुंबई पोर्ट ट्रस्ट, १९८५ ‘दैवत’ व १९९० ‘नवरा बायको’ या मराठी चित्रपटांची निर्मिती; १९७३ सदस्य, १९७३-८४ विरोधी पक्षनेते, १९८५ व १९९१ महापौर, मुंबई महानगरपालिका; याकाळात गृहनिर्माण, झोपडपट्टी सुधारणा, मुंबई शहराचे सौंदर्यकरण, चौकांचे सुशोभिकरण, हुतात्मा चौकाचे सुशोभिकरण केले; १९९१ अध्यक्ष, ऑल इंडिया कौन्सिल ऑफ मेयर्स, १९९१ पर्यंत शिवसेनेत विविध पदावर कार्य; १९९१ नंतर काँग्रेस पक्षात कार्यरत; जून १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य; संस्थापक-सदस्य व जून १९९९ ते नोव्हेंबर १९९९ महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष; १९८५-९०, १९९०-९५, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा १९९६-२००२ व २००२-२००४ सदस्य, महाराष्ट्र विधानपरिषदः डिसेंबर १९९१ ते मार्च १९९३ महसूल खात्याचे मंत्री; मार्च १९९३ ते मार्च १९९५ गृहनिर्माण, गलिच्छ वस्ती सुधार, घरदुरुस्ती आणि पुनर्बाधणी खात्याचे मंत्री; १९९६-१९९९ विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्र विधानपरिषदः ऑक्टोबर १९९९ ते जानेवारी २००३ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृह आणि पर्यटन मंत्री, नोव्हेंबर १९९९ ते जानेवारी २००३ मुंबई शहराचे पालकमंत्री; जानेवारी २००३ ते डिसेंबर २००३ उपमुख्यमंत्री व गृह मंत्री; नोव्हेंबर २००४ ते ऑक्टोबर २००९ सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या खात्यांचे मंत्रीः नोव्हेंबर २००९ ते नोव्हेंबर २०१० दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) खात्याचे मंत्री; नोव्हेंबर २०१० ते सप्टेंबर २०१४ सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री; या काळात दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनाची वास्तु उभी केली, ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवडः जानेवारी २०२० मध्ये अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री, नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड.

छंद : क्रिकेट, चित्रपट, वाचन व प्रवास

परदेश प्रवास : १९८० आणि १९८६ मध्ये अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, नेदरलैंड आणि रशिया या देशाचा अभ्यास दौरा; १९९१ मध्ये ओसाका, जपान येथे जागतिक महापौर परिषदेसाठीच्या शिष्टमंडळासमवेत सहभाग, ऑक्टोबर २००० मध्ये फ्रान्स, जर्मनी व इंग्लंड, दुबई, मस्कत, अबुधाबी, कॅनडा, फ्रान्स, नेदरलँड, बेल्झिअम व स्विर्त्झलँड इत्यादी देशांचा अभ्यास दौरा, याच दौऱ्यात लंडनमधील स्कॉटलँड यार्ड पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चाः २८ मे २००१ ते १८ जून २००१ या काळात न्यूयॉर्क, जिनिव्हा, लंडन इत्यादी देशांचा अभ्यास दौरा तसेच ऑस्ट्रिया, स्वीडन, नॉर्वे, स्पेन इत्यादी देशांचा अभ्यास दौरा.

०००

 

 

 

 

गेवराई नगर परिषदेकडून १८ कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ

गेवराई, जिल्हा बीड :- गेवराई नगर परिषदेच्या माध्यमातून तब्बल 18 कोटी रुपये किंमतीच्या विविध विकासकामांचा शुभारंभ तसेच अतिक्रमण धारकांना हक्काच्या पी.टी.आर. (Property Tax Receipt) चे वाटप उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमास पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, आमदार विजय सिंह पंडित. आमदार सर्वश्री सतीष चव्हाण, विक्रम काळे, माजी आमदार अमरसिंह पंडीत, कल्याण आखाडे, प्रा.सुनील मगरे, राजेश्वर चव्हाण, शंकर देशमुख, स्वप्नील गलधर यांच्यासह अनेक मान्यवर, नगरसेवक, प्रशासनातील अधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या उपक्रमाचा उद्देश शहरी भागात भौतिक सुविधा वाढवणे, अनधिकृत बांधकामांना अधिकृत दर्जा देणे व नागरी विकासाला गती देणे हा आहे. कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगत, भविष्यात आणखी निधी देण्याचे संकेत दिले.
या विकास योजनेत रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा, स्ट्रीट लाईट आणि इतर नागरी सुविधा यांचा समावेश आहे. हा उपक्रम गेवराई शहराच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.


18 कोटी रुपये किंमतीच्या विविध विकास कामांमध्ये शिवाई नगरी येथे सिंमेट रस्ता व नाली बांधकाम, अहिल्यानगर येथे सिंमेट रस्ता व नाली बांधकाम, सेवालाल नगर येथे सिंमेट रस्ता व डोम बांधकाम, सावता नगर येथे सिंमेट रस्ता व नाली बांधकाम, इस्लामपूरा भागातील कब्रस्थान संरक्षक भिंत बांधकाम, ताकडगाव रोड येथे सिंमेट रस्ता व नाली बांधकाम, कृष्णाई नगर येथे सिंमेट रस्ता व नाली बांधकाम, पंचायत समितीलगत व्यापारी संकुल बांधकाम, छत्रपती संभाजी महाराज चौक सुशोभिकरण, जुने गेवराई शहर सिंमेट रस्ता व नाली बांधकाम, कोरबू मोहोल्ला येथे सिंमेट रस्ता व नाली बांधकाम, विरशैव समाज स्मशानभूमीचे बांधकाम, तय्यब नगर येथे सिंमेट रस्ता व नाली बांधकाम, संजयनगर येथे सिंमेट रस्ता व नाली बांधकाम, संघमित्र नगर येथे बौद्ध विहार बांधकाम, वीर लहुजी नगर येथे आरोग्य केंद्र बांधकाम, जलशुद्धीकरण केंद्र येथे एक्सप्रेस फिडरची जोडणी, गेवराई शहर येथे शादीखाना बांधकाम करणे इत्यादी कामांचा समावेश आहे.
***

ताज्या बातम्या

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...