रविवार, जुलै 6, 2025
Home Blog Page 1065

तांत्रिक वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी टेक्स फ्यूचर परिषद एक प्रगतीशील पाऊल – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 1 : वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक आणि शाश्वत वस्त्र धोरण २०२३-२०२८ घोषित केले आहे. केंद्र सरकारच्या ५ एफ (फार्म,फायबर,फॅब्रिक,फॅशन आणि फॉरेन एक्स्पोर्ट) या भविष्यकालीन धोरणाशी सुसंगत, असे धोरण तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून संपूर्ण वस्त्रोद्योग व्यवसायाची एक दर्जेदार शृंखला निर्माण करणे, ती एकत्रित करणे आणि वस्त्रोद्योगासाठी पोषक वातावरण निर्माण करणे हा या धोरणाचा  उद्देश आहे. आर्थिक विकासाला चालना, रोजगार निर्मिती, कापड उत्पादनात महाराष्ट्राला अग्रेसर राहण्यासाठी टेक्स फ्यूचर गुंतवणूक परिषद एक प्रगतीशील पाऊल आहे. या परिषदेत विविध वस्त्रोद्योग घटकांतील 33 कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले असून या माध्यमातून ५ हजार  ५०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे, असे उच्च तंत्र शिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

वस्त्रोद्योग विभाग आणि सीआयआय (कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘टेक्स फ्यूचर 2023’ गुंतवणूकदारांची एकदिवसीय परिषद हॉटेल ताजमहल पॅलेस येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते.

या परिषदेला केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर,केंद्र शासनाच्या वस्त्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव रोहित कंसल, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, वस्त्रोद्योग आयुक्त गोरक्ष गाडिलकर, सीआयआयचे महाराष्ट्राचे अध्यक्ष के. नंदकुमार, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे (CII) प्रादेशिक संचालक डॉ. राजेश कपूर, रेमंड ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, राज्यातील तांत्रिक वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी नवीन वस्त्रोद्योग धोरणात 45 टक्के तांत्रिक वस्त्रोद्योग घटकांना भांडवली अनुदान (सबसिडी) देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कोविड काळातील काही वस्त्रोद्योग घटकांचे  भांडवली अनुदान  प्रलंबित राहिले आहे. त्याबाबत आर्थिक तरतूद करून  भांडवली अनुदान लवकरच देण्यात येईल.

शाश्वत उत्पादनासाठी पर्यावरणास अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर भांडवली सबसिडी देऊन विविध युनिट्सला प्रोत्साहन दिले आहे.  तसेच सहा तांत्रिक वस्त्रोद्योग पार्क उभारण्याचे प्रस्तावित आहे, असे सांगून वस्त्रोद्योग क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या  व्यावसायिक बांधवांचा या परिषदेतील सहभाग हा महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाची नांदी आहे, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

तांत्रिक वस्त्रोद्योग वाढीसाठी फाइव्ह एफ व्हिजन – केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश

वस्त्रोद्योग वाढीसाठी फाइव्ह एफ व्हिजन (म्हणजे फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन आणि फॉरेन एक्स्पोर्ट) व्हिजनची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. यामध्ये तांत्रिक वस्त्रोद्योगाला अधिक  चालना देण्यात आली आहे, असे केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी सांगितले.

जागतिक पातळीवरील भारतीय वस्त्रोद्योग उत्पादनांचा वाटा वाढविण्यासाठी धागा ते कापड या  मूल्य-साखळीला प्रोत्साहन देऊन वस्त्रोद्योगाचे उत्पादन वाढवण्यासाठी एकात्मिक कार्यपद्धती राबविली पाहिजे.  तसेच स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी हातमाग कारागीर, कच्चा माल, गुंतवणूक आणि बाजारपेठ यांची एकत्रित साखळी तयार करणे आवश्यक आहे. तांत्रिक वस्त्रोद्योगाबरोबरच प्रक्रियेच्या आधुनिकीकरणासह वस्त्रोद्योगातील रोजगार, गुंतवणूक आणि उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना व कार्यक्रम राबवित आहे, असेही श्रीमती जरदोश यांनी यावेळी सांगितले.

वस्त्रोद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे रोजगांराच्या संधी निर्माण होणार – विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर

देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्र वित्त, निर्यात आणि रोजगार निर्मिती यांसारख्या घटकांवर थेट परिणाम करत असते. देशातील कापड उत्पादनात राज्याचा सर्वात मोठा वाटा असून कापड उद्योगातून रोजगार निर्मितीत राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत वस्त्रोद्योग क्षेत्राची  मोठी भूमिका आहे.

वस्त्रोद्योग क्षेत्रात मोठे प्रकल्प गुंतवणुकीसाठी या नवीन वस्त्रोद्योग धोरणामुळे येतील  आणि त्यातून  रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, असेही विधानसभा अध्यक्ष श्री. नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.

वस्त्रोद्योग विभागाच्या लोगोचे यावेळी अनावरण करण्यात आले. वस्त्रोद्योग धोरणाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वस्त्रोद्योग विभागाने जाहीर केलेल्या एकात्मिक आणि शाश्वत वस्त्र धोरण २०२३-२०२८ चे चित्रफीत दाखविण्यात आली. वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग यांनी महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगासाठी उपलब्ध सोयी सुविधा याबाबत प्रास्तावित भाषण करून विभागाचे सादरीकरण केले.

000

काशीबाई थोरात/विसंअ/

एरंडोल शहरात साकारतोय ‘पुस्तकांचा बगीचा’

जळगाव,‌दि.१ नोव्हेंबर (जिमाका) – आपण वनस्पतीचे गार्डन पाहतो, फुलांचा बगीचा पाहिला असेल. मात्र एरंडोल नगरपरिषदेने तब्बल ३३ गुठ्यांत पुस्तकाचा बगीचा साकारला आहे. वाचन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने राज्यासाठी हा प्रयोग आदर्श ठरू शकणार आहे. राज्यातला अशा प्रकारचा पुस्तकांचा एकमेव बगीचा आहे हे विशेष !

आपण विविध प्रकारचे गार्डन पाहता, मात्र एरंडोल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या संकल्पनेतून वाचन संस्कृती टिकून राहावी, त्यात वाढ व्हावी या उद्देशाने शहरात पुस्तकांच्या बगीच्याची निर्मिती केली आहे. हा बगीचा एरंडोल शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

 

३३ गुठ्यांत साकारणार पुस्तक बगीचा

शहरातील आनंद नगर भागात 33 गुंठे  म्हणजेच बीघा भर जागेत पुस्तकांचा बगीचा साकारला जातो आहे. या नाविन्यपूर्ण गार्डनमधे विविध प्रकारचे पुस्तक उपलब्ध असणार आहेत. ठिकठिकाणी पुस्तकांचे बाॅक्स आहेत.  पुस्तक वाचनासाठी आठ वाचन कट्टे बांधले आहेत. बगीच्यात पूर्णत: निसर्गरम्य वातावरणाची निर्मिती करण्यात आली आहे. गार्डनमध्ये प्रत्येक मोठ्या झाडाखाली पुस्तकाचे बॉक्स आहेत. तेथून पुस्तक काढून तुम्हांला ते झाडाखाली बांधण्यात आलेल्या ओट्यावर बसून वाचता येणार आहे.

बगीच्यात सर्वकाही

या पुस्तकांच्या बगीच्यात ग्रीन लॉन व विविध सुगंधीत फुलझाड आहेत. त्यातून वातावरण सुगंधीमय होणार आहे. भिंतीवर विचारवंताचे पुस्तकात व्यक्त केलेले विचार चित्रीत करण्यात आले आहेत. तर ठिकठिकाणी कवितांचे पोर्ट्रेट करण्यात आले आहे. ग्रीन जीमची ही व्यवस्था करण्यात आली आहे. पुस्तक व वृक्ष यावर आधारीत भितीचित्र रंगविण्यात आले आहे. कवयित्री बहीणाबाईच्या कवितेसह पुस्तकांचे भव्य शिल्प उभारण्यात आले आहे. याबरोबरच पुस्तक प्रेमी वाचक प्रतीत करणारे पुतळे करण्यात आले आहेत.

ज्येष्ठांसाठी विशेष सोयी

म्हातारपणात माणसं ही बगीच्यातच अधिक रमतात. त्यादृष्टीने पालिकेने नाना-नानी पार्क ची व्यवस्था करण्यात आली आहे. या गार्डन मध्ये लहानपासून वयोवृद्धापर्यंत सर्वांच्या गरजा लक्षात घेण्यात आल्या आहेत हे विशेष. कथा, कादंबरी, विविध चरित्र, कवितासंग्रह, विविध स्पर्धा परीक्षांचे पुस्तक येथे उपलब्ध असणार आहे. याबरोबरच पुस्तकाचे सेल्फी पॉईंटही तयार करण्यात आला आहे.

राज्यातला पहिलाच प्रयोग

एरंडोल नगरपरीषदेने साकारलेला पुस्तकांचा बगीचा हा राज्यातला पहिलाच प्रयोग आहे. हा नाविन्यपूर्ण बगीचा निश्चितच वाचन संस्कृती व संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. या बागेची रचना ही सगळ्याच घटकांचा विचार करून करण्यात आली आहे. हा बगीचा राज्यासाठी आदर्श ठरणार आहे हे निश्चित! एरंडोल वासीयांसाठी हे गार्डन पर्वणीच ठरणार आहे.

“शहरातील नागरीकांमध्ये वाचन संस्कृती वृध्दिंगत व्हावी या उद्देशाने या पुस्तक बागेची निर्मिती करण्यात येत आहे. लहानांपासून वृध्दांपर्यंत सर्व जण पुस्तक वाचन करू शकतील अशी पुस्तक व व्यवस्था करण्यात आलेली आहे. लवकरच हा बगीचा नागरिकांसाठी खुला होणार आहे” – विकास नवाळे, मुख्याधिकारी एरंडोल नगरपरीषद

०००००००००

‘उमेद’ अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या मुलाखत

मुंबई, दि. 1 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे प्रमुख तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

सामान्य/गरीब कुटुंबांना स्वयंरोजगार मिळावा आणि (दारिद्र्य कमी होऊन) कुटुंब आर्थिकरित्या सक्षम व्हावे म्हणून शासन विविध योजना राबवित आहे. ग्रामीण भागातील महिलांना लघु उद्योगातून रोजगार निर्माण करून देणे आणि आर्थिक आत्मनिर्भर होण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (उमेद) अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान नेमके काय आहे, याची अंमलबजावणी आणि नियोजन; स्वयंरोजगारासाठी होणारे प्रयत्न, याबाबतची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.जयवंशी यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवार, दि. 2 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक

शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात २, ३, ४ आणि ६ नोव्हेंबरला मुलाखत

मुंबई, दि. 1 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘सायबर सुरक्षा’ या विषयावर राज्याचे सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

तंत्रज्ञानाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे प्रत्येक क्षेत्रात इंटरनेट, संगणकासारख्या गॅजेट्सचा वापर वाढला आहे. त्याअनुषंगाने नागरिकांची ऑनलाइन होणारी फसवणूक व गुन्हे रोखण्यासाठी शासनाच्या सायबर विभागामार्फत वेळोवेळी दक्षता घेण्यात येत आहे. नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, फसवणूक झाल्यास तक्रार कुठे नोंदवावी अशा विविध विषयांबाबत पोलीस अधीक्षक श्री. शिंत्रे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवार दि. 2, शुक्रवार दि. 3 ,शनिवार दि. 4, आणि सोमवार दि. 6 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे राजभवन येथे उत्कृष्ट सांस्कृतिक प्रदर्शन

मुंबई, दि. 1 : राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच हरियाणा, कर्नाटक, केरळ, पंजाब व तामिळनाडू या राज्यांचा, तसेच अंदमान व निकोबार, चंदीगड, दिल्ली, लक्षद्वीप व पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिवस समारंभपूर्वक साजरा करण्यात आला.

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाअंतर्गत विविध राज्यांचे स्थापना दिवस साजरे करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचनेला अनुसरून राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे स्थापना दिवस बुधवारी (दि. 1 नोव्हेंबर) साजरे करण्यात आले.  कार्यक्रमाला ज्येष्ठ संगीतकार अनू मलिक, राज्यपालांचे विशेष सचिव विपीन कुमार सक्सेना तसेच निमंत्रित उपस्थित होते.

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमामुळे विविध राज्यांची व केंद्रशासित प्रदेशांची लोकसंस्कृती, लोक संगीत व लोककला याबाबत माहिती मिळते. देशातील सर्व राजभवनांमध्ये इतर राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांचे स्थापना दिवस साजरे केल्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला पुष्टी मिळत आहे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

आद्य शंकराचार्यांनी देशाच्या चार दिशांना चार धर्मपीठे स्थापन करुन देशाला सांस्कृतिक एकात्मतेने जोडल्याचे नमूद करून आज काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देश एकात्म भावनेने जोडला गेला आहे, याचे श्रेय आद्य शंकराचार्य यांच्या द्रष्टेपणाला जाते, असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसेच एसएनडीटी महिला विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी कमी वेळात विविध राज्यांची लोकगीते व नृत्ये शिकून राजभवन येथे सादर केल्याबद्दल राज्यपालांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व प्रमाणपत्रे देऊन गौरवित केले.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी हरियाणा, पंजाब (गिद्धा लोकनृत्य), केरळ (मोहिनीअट्टम), तामिळनाडू (कारगट्टम) व कर्नाटक येथील लोकनृत्य सादर केले; तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील विद्यार्थ्यांनी भांगडा, कोलकली नृत्य (लक्षद्वीप) व पुडुचेरीचे गरादी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल यांनी प्रास्ताविक केले तर राज्यपालांचे परिवार प्रबंधक अरुण आनंदकर यांनी आभारप्रदर्शन केले. राज्यपालांच्या हस्ते संगीतकार अनू  मलिक, ‘बामू’चे प्रकुलगुरु  प्रो. श्याम शिरसाठ, एसएनडीटी महिला विद्यापीठाचे कुलसचिव विलास नांदवडेकर,  विद्यार्थी कल्याण अधिकारी नितीन प्रभुतेंडुलकर तसेच ‘बामू’चे  संपर्क अधिकारी मुस्तजीब खान यांचा सत्कार करण्यात आला.

Foundation day of Haryana, Karnataka, Kerala, Punjab and TN celebrated in Maharashtra Raj Bhavan

 

Mumbai, 1st Nov : The Foundation Day of the states of Haryana, Karnataka, Kerala, Punjab and Tamil Nadu was celebrated in Maharashtra Raj Bhavan in presence of Maharashtra Governor Ramesh Bais on Wed (१ Nov). The Union Territory Formation Day of Andaman and Nicobar, Chandigarh, Delhi, Lakshadweep and Puducherry was also celebrated for the first time at Maharashtra Raj Bhavan.

The Foundation Day programme was organised as part of the ‘Ek Bharat Shreshtha Bharat’ initiative of Government of India.

Addressing the gathering, Governor Ramesh Bais said celebration of the foundation days of other states and Union Territories in the Raj Bhavans across the country has created awareness about the culture and traditions of other States, thereby strengthening the cause of unity and national integration.

The Governor said the foundation of four dharma peethas by Adi Shankaracharya in different corners of the country united the nation from Kashmir to Kanyakumari through the bonds of shared culture.

The Governor complimented the students of the Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University (BAMU), Chhatrapati Sambhajinagar and the Smt. Nathibai Damodar Thackersey (SNDT) Women’s University for their excellent presentation of folk songs and folk dance of various states and union territories. All the students were presented with the certificate of participation by the Governor.

The Governor felicitated music composer Anu Malik, Pro Vice Chancellor of BAMU Prof Shyam Shirsath, Registrar of SNDT Women’s University Vilas Nandavadekar, Director Students Welfare of SNDT Women’s University Nitin Prabhutendulkar and Liaison Officer of BAMU Mustjeeb Khan on the occasion.

Secretary to the Governor Shweta Singhal delivered the welcome address, while the Comptroller of the Governor’s Households Arun Anandkar proposed the vote of thanks.

0000

 

धानाची तातडीने उचल करीत शेतकऱ्यांना देय असलेले पैसे तत्काळ अदा करावेत – मंत्री छगन भुजबळ

मुंबई, दि. 1 : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देय असलेले चुकारे विहित मुदतीत अदा करण्यात यावेत. तसेच धानाची घट होऊ नये याकरिता, तत्काळ धानाची उचल करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात येणाऱ्या अडचणी विषयी सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार नाना पटोले यांच्यासह विदर्भातील विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री.भुजबळ म्हणाले की, केंद्र शासनाकडून हंगाम 2022-23 करिताच्या तात्पुरत्या दरपत्रकात २० रुपये ४० पैसे प्रती क्विंटल इतके सोसायटी कमिशन मंजूर केलेले आहे. तथापि, हंगाम २०२३-२४ करिताच्या तात्पुरत्या दरपत्रकात ३१ रुपये २५ पैसे प्रती क्विंटल इतके सोसायटी कमिशन केंद्र शासनाच्या नियमान्वये देण्यात आलेल्या अटी व शर्तीच्या पूर्ततेच्या अधीन राहून मंजूर करण्यात आले.

धान खरेदी केंद्र निवडीकरिता एक कोटी रु. बँक गॅरंटी व वीस लाख रु. ठेव जमा करण्याबाबत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई यांनी काढलेले परिपत्रक रद्द करण्यात येत असल्याचे यावेळेस मंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले. तसेच धानाचा गैरव्यवहार करणाऱ्या संस्थांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

धानाच्या घटीसाठी कारणीभूत असलेल्या कारणांचा विचार करता, केंद्र शासनाने मंजूर केलेल्या 0.5 टक्के घटीव्यतिरिक्त राज्यशासनाकडून 0.5 टक्के अतिरिक्त घट मंजूर करण्याचे निर्देश मंत्री श्री.भुजबळ यांनी दिले.

विदर्भातील लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या या बैठकीत मांडल्या. सर्व समस्या सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे मंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठीच ‘जनतेशी सुसंवाद’ – पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 1 : अनेक वर्षांपासूनची जमीन मोजणीची मागणी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केवळ 12 दिवसांत मान्य केल्याने माटुंगा येथील साई विसावा एसआरए सहकारी हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्ष पद्मा नायडू यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले. मोजणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठीचे नगर भूमापन अधिकाऱ्यांचे पत्र पालकमंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते आज श्रीमती नायडू यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठीच ‘जनतेशी सुसंवाद’ आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री.केसरकर दर बुधवारी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात जनतेशी सुसंवाद साधत आहेत. आजच्या कार्यक्रमप्रसंगी आमदार सर्वश्री कालिदास कोळंबकर, कॅप्टन तमिळ सेल्वन, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर यांच्यासह संबंधित सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दर बुधवारी होणाऱ्या जनतेशी सुसंवाद कार्यक्रमामुळे नागरिकांची कामे जलदगतीने होऊ लागल्याची भावना येथे येणारा प्रत्येक नागरिक व्यक्त करू लागला आहे. साई विसावा संस्थेमार्फत 18 ऑक्टोबर 2023 रोजीच्या सुसंवाद कार्यक्रमात जमीन मोजणीच्या मागणीचे पत्र देण्यात आले होते. ते तत्काळ मान्य करण्यात येऊन आज त्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्याचे पत्र देण्यात आले. याबद्दल सर्व रहिवाशांच्या वतीने श्रीमती नायडू यांनी आनंद व्यक्त करून पालकमंत्री श्री.केसरकर यांचे आभार मानले.

याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आदी मागण्यांची तातडीने पूर्तता होऊ लागली आहे. आज पालकमंत्र्यांच्या हस्ते या प्रमाणपत्राचेदेखील वितरण करण्यात आले. आज आलेल्या अर्जांमध्ये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र मिळावे, रहिवासी प्रमाणपत्र मिळावे आदी मागण्या करण्यात आल्या. यापुढे प्रत्येक कामासाठीची कालमर्यादा निश्चित करून दाखले देण्याची कामे पूर्ण व्हावीत तसेच नागरिकांना तसे कळविण्यात यावे, असे निर्देश मंत्री श्री.केसरकर यांनी दिले. कुलाबा परिसरात नोटीस न देता घरे तोडल्याच्या एका तक्रारीच्या अनुषंगाने एसआरएच्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडून एका आठवड्यात अहवाल मागविण्याचे आदेश मंत्री श्री.केसरकर यांनी दिले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव

मुंबई, दि. 1 :- मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. मात्र, राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नयेराज्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावीअसे आवाहन आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आले. तसेच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते श्री. मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे व आपले उपोषण मागे घ्यावेअसे आवाहन करणारा ठराव सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमाजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवारमाजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणमंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटीलचंद्रकांत पाटीलछगन भुजबळदिलीप वळसे-पाटीलगिरीश महाजनदादाजी भुसेविधान परिषदेचे  विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेविधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारविविध पक्षांचे निमंत्रित सर्वश्री जयंत पाटीलनाना पटोलेसुनील तटकरेअनिल परबसुनील प्रभूआशिष शेलारराजेश टोपेसदाभाऊ खोतजोगेंद्र कवाडेसुलेखा कुंभारेबच्चू कडूशेकापचे जयंत पाटीलराजू पाटीलकपिल पाटीलसदाभाऊ खोतराजेंद्र गवईडॉ.प्रशांत इंगळेकुमार सुशीलबाळकृष्ण लेंगरे आदी उपस्थित होते. याशिवाय मुख्य सचिव मनोज सौनिकमहाधिवक्ता बिरेंद्र सराफसामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगेइतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या ठरावात पुढे असे म्हटले आहे कीमराठा आरक्षणाविषयी कायदेशीर कार्यवाही  शक्य तितक्या लवकर करण्यात यावी. मात्रत्याला आवश्यक तो वेळ देणे गरजेचे आहेहे आंदोलकांनीही समजून घ्यावे. राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत त्या अयोग्य असून आम्ही त्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करतो. राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नयेराज्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावीअसे आवाहनही करण्यात आले आहे.

कुणबी प्रमाणपत्रांबाबत तातडीने अंमलबजावणी सुरु – मुख्यमंत्री श्री. शिंदे

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षण विषयक घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले कीसरकार प्राधान्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकडे लक्ष देत असूनमहाराष्ट्रात जाती-जातींमध्ये सलोख्याची संस्कृती टिकवणे महत्वाचे आहे. आपल्या सगळ्यांचा उद्देश मराठा समाजाला आरक्षण देण्याचा असूनसर्व पक्ष संघटनांनी आपापल्या भागात या विषयी आपल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितले पाहिजे. एकीकडे आपण सर्वोच्च न्यायालयात क्युरिएटेव्ह याचिकेद्वारे राज्य शासनाची भूमिका भक्कमपणे मांडत आहोत. त्यासाठी न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळ नियुक्त केले आहे. दुसरीकडे आपण मागासवर्ग आयोगाला नव्याने इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचे निर्देशही दिले आहेत.

पूर्वीच्या त्रुटी दूर करून टिकणारे आरक्षण देणार

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने पूर्वी ज्या कारणांमुळे आणि त्रुटींमुळे रद्द केले होतेतसेच जी निरीक्षणे नोंदविली होती. त्या त्रुटी आता नव्याने माहिती (डाटा) गोळा करताना होणार नाहीतयाची संपूर्ण काळजी घेण्यात येणार आहे. या पावलांमुळे न्यायालयात टिकणारे असे आरक्षण मराठा समाजाला मिळू शकेलअशी खात्री आहे. काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर तत्काळ या संदर्भातील शासन आदेश काढण्यात आला असून सर्व जिल्हाधिकारीतहसीलदार यांना कालच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे कुणबी नोंदी असलेल्यांना तातडीने प्रमाणपत्रे देण्याचे निर्देश दिले आहेत. मोडी लिपीतील आणि ऊर्दू भाषेतील कागदपत्रांचे भाषांतर करूनडिजीटाईझ करण्यासाठी व पब्लिक डोमेनवर आणून त्याआधारे कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी देखील न्यायालयीन प्रक्रियेद्वारे मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलण्यात येतील. तसेच राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून त्रुटी नसलेलापरिपूर्ण डाटा विहित कालावधीत गोळा करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी देखील न्यायालयीन प्रक्रियेबाबत माहिती दिली. प्रारंभी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री. भांगे यांनी न्या. संदीप शिंदे समितीने आजपर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच जिल्हाधिकारी व सर्व तहसीलदार यांना कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देण्याबाबत निर्देश देण्यात आल्याचे सांगितले. बैठकीत विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते श्री.दानवेविधान सभेतील विरोधी पक्ष नेते श्री.वड्डेटीवार तसेच इतर उपस्थित पक्षांच्या प्रतिनिधींनी आपल्या सूचना मांडल्या.

००००

पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या पाठपुराव्यामुळे मालेगावच्या सामान्य रूग्णालयाचे होणार श्रेणीवर्धन

नाशिक दिनांक: 1 नोव्हेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) सामान्य रूग्णालय मालेगांवचे श्रेणीवर्धन करण्याबाबत 31 ऑक्टोबर 2023 रोजी  विशेष बाब म्हणून निर्गमित झालेल्या शासननिर्णयाद्वारे  मान्यता प्राप्त झाली आहे. यानुसार सामान्य रूग्णालय मालेगांवचे 200 खाटांवरून 300 खाटांचे सामान्य रूग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्याचे सार्वजनिक  बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास यश प्राप्त झाले आहे. सामान्य रूग्णालयाच्या श्रेणीवर्धनामुळे मालेगावकरांना उत्तम आरोग्य सेवा-सुविधांचा लाभ होणार आहे.

त्याचप्रमाणे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रयत्नातून मालेगाव तालुक्यातील ग्रामीण रूग्णालय, दाभाडी येथे 20 खाटांचे ट्रामा केअर सेंटर स्थापन्यासही विशेष बाब म्हणून 31 ऑक्टोबर 2023 रोजी निर्गमित झालेल्या शासननिर्णयानुसार मान्यता मिळाली आहे.

श्रेणीवर्धीत सामान्य रूग्णालय मालेगावचे बांधकाम व पदनिर्मिर्ती याबाबत स्वंतत्र कार्यवाही करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे  ग्रामीण रूग्णालय दाभाडी येथील 20 खाटांचे ट्रामा केअर सेंटरसाठी विहित पद्धतीने जागा अधिग्रहीत करून बांधकाम व पदनिर्मिती करणे याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद केले आहे.

000000

मराठा आरक्षणबाबत राज्य शासन सकारात्मक; आंदोलकांनी शांतता राखावी –  पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 1 (जिमाका): मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून आरक्षणाबाबत सर्व पक्षीय प्रमुखांची बैठक आज मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी मराठा बांधवानी कायदा व सुव्यवस्थेबाबतचा प्रश्न निर्माण करु नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. जरांगे पाटील यांनी सुरु केले उपोषण स्थगित करावे. त्याचबरोबर आपल्या तब्यतेची काळजी घ्यावी, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले. मराठा आरक्षणबाबत आत्तापर्यंत शासनाकडून 26 बैठका घेण्यात आल्या आहेत. मराठा समाजातील बांधवानींही शांतता पाळून सहकार्य करावे. असे आवानही श्री. देसाई यांनी केले.
0000

ताज्या बातम्या

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...