बुधवार, जुलै 9, 2025
Home Blog Page 1057

मंत्रिमंडळ निर्णय  

धनगर समाजाच्या उन्नतीच्या योजना प्रभावीपणे राबविणार

सनियंत्रण करण्यासाठी समिती

          धनगर समाजाच्या उन्नतीकरिता प्रभावीपणे योजना राबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक शक्तीप्रदत्त समिती नियुक्त करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

          उपमुख्यमंत्री तथा तत्कालिन वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात धनगर समाजाच्या उन्नतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे त्याचप्रमाणे शक्तीप्रदत्त समिती स्थापन करण्याबाबत नमूद केले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री, आदिवासी विकास मंत्री, ग्रामविकास मंत्री, पशु दुग्ध व मत्स्यव्यवसाय विकास मंत्री, वस्त्रोद्योग मंत्री त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी निर्देशित केलेले धनगर व तत्सम समाजातील प्रत्येक महसूल विभागातून एक अशासकीय सदस्य, असे सदस्य असतील.

          अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर धनगर समाजाच्या विकासासाठी विविध 13 योजना राबविण्याचा निर्णय ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात आला होता. या योजनांसाठी 140 कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पासाठी करण्यात आली आहे.

          ही समिती आवश्यकता असल्यास नवीन योजना प्रस्तावित करून त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता आवश्यक त्या उपाययोजना व संनियंत्रण करतील.

—–०—–

राज्यातील निर्यातीला वेग देणार निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर

          राज्यातील निर्यात क्षेत्राला गती देऊन, थेट परकीय गुंतवणूक (FDI) आकर्षित करून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्याच्या पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

          यामुळे राज्यात अंदाजे रुपये 25,000 कोटी गुंतवणूक होईल.

           हे धोरण कालावधीमध्ये सन 2027-28 पर्यंत राबविण्यात येईल.  सध्या राज्याची  निर्यात 72 अब्ज डॉलर्स असून ती  150 अब्ज डॉलर्सपर्यंत इतके वाढविणे, राज्यामध्ये पुढील पाच वर्षामध्ये 30 निर्यातीभिमुख पायाभूत सुविधा विकास प्रकल्प विकसित करणे तसेच 2030 पर्यंत देशाच्या 1 ट्रिलियन डॉलर निर्यातीच्या उद्दिष्टात  राज्याचा 22 टक्के सहभाग साध्य करणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. या प्रोत्साहनाचा लाभ राज्यातील सुमारे 5,000 एमएसएमई व मोठ्या उद्योग घटकांना होईल. तसेच 40,000 रोजगार संधी निर्माण होऊन राज्याच्या निर्यातीमध्ये सध्याच्या 7 टक्के वरून 14 टक्के एवढी वाढ होण्यास मदत होईल.

          या धोरणात पायाभूत सुविधाविषयक कामांसाठी निर्यातीभिमुख विशिष्ट प्रकल्प (Export oriented Specific Project) बाबींना मंजूर प्रकल्प किमतीच्या रुपये 50 कोटीच्या मर्यादेत तसेच निर्यातीभिमुख औद्योगिक उद्यान (Export oriented Industrial Parks) बाबींना रुपये 100 कोटीच्या मर्यादेत राज्य शासनाचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल. यासह निर्यातक्षम सूक्ष्म, लघू व मध्यम घटकांना विमा संरक्षण, व्याज अनुदान व निर्यात प्रोत्साहन अनुदान देऊ केली आहेत. तसेच आयात पर्यायीकरणासाठी केंद्र शासनाने घोषित केलेल्या 14 पीएलआय क्षेत्रातील निर्यातक्षम मोठ्या उद्योग घटकांना  वीज शुल्क माफी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व विशेष भांडवली अनुदान इत्यादी प्रोत्साहने देऊ केली आहेत.

          या निर्णयामुळे जागतिक मूल्य साखळीमध्ये राज्याचा सहभाग वाढविणे शक्य होईल. राज्याच्या शाश्वत विकासासाठी प्राधान्य क्षेत्रे तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांच्या निर्यात क्षमतेचा पुरेपूर वापर करुन निर्यातीमध्ये वैविध्य साध्य करणे, राज्यातील शेतकऱ्यांना केंद्रबिंदू समजून त्यांच्या दरडोई उत्पन्न वाढीकरीता समृध्दी महामार्गालगतच्या कृषी समृध्दी केंद्रामध्ये अणु प्रक्रिया आधारित निर्यातक्षम अन्न प्रक्रिया, कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीकरीता चालना देणे, नवीन बाजारपेठा/देश, नवीन निर्यात संभाव्य उत्पादने आणि जिल्ह्यांतील निर्यातक्षम उद्योजक  शोधून निर्यातीत विविधता आणणे तसेच राज्याच्या प्रादेशिकदृष्ट्या संतुलित विकासासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे निर्यातीतील योगदान वाढवून जिल्हा हेच निर्यात केंद्र (Districts as Export Hub) म्हणून विकसित करण्याकरीता यामुळे गती मिळेल.

          उद्योगमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य निर्यात प्रचालन परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. या परिषदेस या निर्यात धोरणात आवश्यक सुधारणा करण्याचे अधिकार राहतील.

—–०—–

मंगरूळपीर तालुक्यातील बॅरेजेसना मान्यता

वाशीम जिल्ह्यात 2200 हेक्टर जमीन सिंचित होणार

          वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील 2 बॅरेजेसना मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे वाशीम जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा होणार असून 2200 हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचित होणार आहे.

          मंगरुळपीर तालुक्यातील बोरव्हा गावाजवळ अडाण नदीवर हा बॅरेज बांधण्यात येत असून यामुळे बोरव्हा, पोटी, पारवा आणि लखमापूर या 4 गावातील 900 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.  यासाठी 162 कोटी 43 लाख एवढा खर्च येणार आहे. याच तालुक्यातील घोटा शिवणी बॅरेज हा देखील अडाण नदीवरच बांधण्यात येत असून त्यामुळे जिल्ह्यातील घोटा, शिवणी, पोघात, उंबरडोह, गणेशपूर, बहाद्दरपूर या 6 गावातील 1394 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यासाठी 234 कोटी 13 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. अशा रितीने अमरावती भागातील  पाटबंधारे विकासाचा अनुशेष दूर होण्यास मदत होणार आहे.

—–०—–

अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील

 अध्यापकांची पदे राज्य निवड मंडळामार्फत भरणार

          अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांची पदे राज्य निवड मंडळामार्फत भरण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

          त्यानुसार वैद्यकीय शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव किंवा प्रधान सचिव अध्यक्षस्थानी असतील तर आयुष संचालनालयाचे संचालक, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे निवृत्त कुलगुरु, सह सचिव दर्जापेक्षा कमी नसलेले सामाजिक न्याय व सामान्य प्रशासन विभागातील प्रतिनिधी, संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुदानित खासगी आयुर्वेद व युनानी संस्थांचे व्यवस्थापन किंवा महाविद्यालयाचे नामनिर्देशित व्यक्ती हे या निवड मंडळाचे सदस्य असतील.

—–०—–

गणित, विज्ञानात विद्यार्थ्यांना पारंगत करणार

आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची 282 पदे भरणार

          आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गणित, विज्ञानात पारंगत करण्यासाठी शिक्षकांची 282 पदे भरण्याचा  निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी येणाऱ्या 30 कोटी खर्चास देखील आज मान्यता देण्यात आली.

          इतर मागास व बहुजन कल्याण विभागामार्फत 141 कला व विज्ञान तसेच 7 कला व वाणिज्य अशी 148 उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहेत.  उच्चस्तरीय सचिव समितीने गणित आणि विज्ञान विषयांकरिता पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे.  त्यानुसार ही पदे निर्माण करण्यात येतील.

          आश्रमशाळेतील विद्यार्थी 12 वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यावर वैद्यकीय, अभियांत्रिकी, स्थापत्य अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. त्यांना गणित आणि विज्ञानावर आधारित नीट आणि सीईटी सारख्या परीक्षांना सामोरे जावे लागते. आर्थिक परिस्थितीमुळे खासगी ट्यूशन आणि क्लासेस न मिळाल्याने हे विद्यार्थी स्पर्धेत टिकत नाहीत त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

—–०—–

विदर्भात 3 ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारणार

संत्रा उत्पादकांना मोठा फायदा

          विदर्भात नागपूर येथे 3 तर अमरावती जिल्ह्यात 2 अशा 5 ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे संत्रा उत्पादकांना योग्य भाव मिळून योग्य प्रतीचा संत्रा देशात आणि परदेशात पाठविता येईल.

          उपमुख्यमंत्री तथा तत्कालिन वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात याची घोषणा केली होती.  नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल व कळमेश्वर व अमरावती जिल्ह्यातील मोर्शी व बुलढाणा या ठिकाणी ही केंद्रे उभारण्यात येतील.  या केंद्रांमध्ये पॅक हाऊस, शीतगृह, वॅक्सिन युनिट असेल.  तसेच या ठिकाणी तयार होणाऱ्या उपपदार्थांवर प्रक्रिया करण्याच्या सुविधा उभारण्यात येतील.  या योजनेचा लाभ सहकारी प्रक्रीया संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी उद्योजक घेऊ शकतील.  योजनेत उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी अनुदान देण्यात येईल.  प्रत्येक लाभार्थींनी १५ टक्के स्वत:चा निधी खर्च करणे आवश्यक आहे.  आवश्यकतेनुसार उर्वरित ८५ टक्के बँकेकडून कर्ज मंजूर करुन घ्यावे लागेल.

          प्रकल्पाच्या ५० टक्के मर्यादेपर्यंतचे अनुदान हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीच्या बँकेत जमा करण्यात येईल.

          या योजनेसाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे हे नोडल असतील.

—–०—–

मॉरिशस येथे महाराष्ट्राची माहिती देणारे पर्यटक केंद्र बहुउद्देशीय संकुल उभारणार

          मॉरिशस येथे महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची  माहिती देणारे पर्यटक केंद्र व बहुउद्देशीय संकुल उभारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी 8 कोटी रुपये खर्च येईल.

          उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मॉरिशस दौऱ्यात मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीणकुमार जगन्नाथ यांच्याशी देखील चर्चा झाली होती.

          या पर्यटन केंद्रात पर्यटकांना माहितीशिवाय महाराष्ट्रातील आर्थिक गुंतवणुकीच्या संधीची माहिती मिळेल.  या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मॉरिशसचा वाणिज्य दूतावास आणि भारताचे मॉरिशसमधील उच्चायुक्त यांच्यात परस्पर समन्वय ठेवण्यासाठी पर्यटन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक सनियंत्रण समिती देखील गठित करण्यात येत आहे.

—–०—–

महाराष्ट्र गोवंशीय प्रजनन अधिनियम लागू

उच्च उत्पादन क्षमतेची दुधाळ जनावरे वाढविणार

          राज्यात उच्च उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ जनावरांची संख्या वाढविण्यासाठी महाराष्ट्र गोवंशीय प्रजनन अधिनियम लागू करून यासाठी प्राधिकरण स्थापण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

           सध्या जनावरांसाठी कृत्रिम रेतनावर भर देण्यात येत आहे. तथापि, कृत्रिम रेतनासाठी राज्य शासनाकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या गोठित रेतमात्रांशिवाय सध्या बाजारात उपलब्ध इतर गोठित रेतमात्रांच्या गुणवत्तेची हमी देता येत नाही.  या गुणवत्तेचे नियमन व तपासणी करण्यासाठी सध्या कोणतीही तरतूद नाही. गोठित रेतमात्रांच्या उत्पादन, साठवणूक, विक्री, वितरण यांचे नियमन करण्यासाठी “महाराष्ट्र गोवंशीय प्रजनन अधिनियम, 2023” हे विधेयक विधानमंडळात मांडण्यासाठी आज मान्यता देण्यात आली.

या अंतर्गत महाराष्ट्र गोवंशीय प्रजनन नियमन प्राधिकरणासाठी आवश्यक असलेली पदे उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने निर्माण करण्यात येतील.

—–०—–

बारामती येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारणार

          पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मौजे गोजुबावी येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

          सध्या पुणे येथे श्वान प्रशिक्षण केंद्र असून त्याचे बांधकाम मोडकळीस आलेले आहेत. तसेच या ठिकाणी प्रशिक्षणासाठी सुविधा नाही. सध्या श्वान पथकात १०२ गुन्हे शोधक, ७४ बॉम्ब शोधक, ४५ अंमली पदार्थ शोधक, ५ गार्ड ड्यूटी, ४ पेट्रोलिंग आणि बीडीडीएस पथकातील १२० असे ३५० श्वान असून पुणे येथे केवळ २० श्वान व हस्तकांना प्रशिक्षण देण्यात येते. नवीन प्रस्तावित श्वान प्रशिक्षण केंद्रात एकाच वेळी ५० श्वानांना प्रशिक्षण देण्याची सुविधा आहे.  हे केंद्र सुमारे ७ हेक्टर जागेवर उभारण्यात येणार असून भविष्यात वन विभाग, उत्पादन शुल्क, कारागृह, एसडीआरएफ अशा संस्था देखील त्यांच्या श्वानांना प्रशिक्षण देऊ शकतात.  या ठिकाणी श्वान ब्रीडिंग सेंटर सुरु होऊ शकते.  या प्रशिक्षण केंद्राकरिता एक पशुवैद्यकीय अधिकारी आणि एक पशु वैद्यकीय अधिकारी मदतनीस अशी २ पदे देखील निर्माण करण्यात येतील.  या केंद्राकरिता ५६ कोटी ७६ लाख १६ हजार ४४० एवढ्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

—–०—–

नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाची इमारत लवकर ताब्यात घेणार

एअर इंडियाचे बुडीत उत्पन्न व  दंड माफ

          नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी पाऊले उचलण्यात येत असून एअर इंडियाचे सर्व बुडीत उत्पन्न व अन्य दंड माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

          नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाची ही इमारत मोक्याच्या ठिकाणी असून येथून विलोभनीय देखावा दिसतो.  ही इमारत मंत्रालयापासून जवळ असून १६०१ कोटी रुपयांस महाराष्ट्र शासन ही इमारत खरेदी करणार आहे.  या २२ मजली इमारतीत ४६ हजार ४७० चौरस मीटर जागा शासकीय कार्यालयांसाठी उपलब्ध होऊ शकणार आहे.  मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर अनेक विभाग मंत्रालयापासून दूर अंतरावर इतर ठिकाणी विखुरलेले असून त्यांच्या भाड्यापोटी २०० कोटीपेक्षा होणारा खर्च एअर इंडिया इमारत ताब्यात आल्यामुळे वाचेल.  ही इमारत खरेदी करण्यापूर्वी राज्य शासनास देय असणारे अनर्जित (बुडीत) उत्पन्न आणि दंड माफ करण्यात येईल जेणेकरून ही इमारत लवकर रिकामी करून ताब्यात घेण्यात येईल.

—–०—–

मेगा वस्त्रोद्योग प्रकल्पांना देखील सामूहिक प्रोत्साहन योजना

वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा

          राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा करून मेगा वस्त्रोद्योग प्रकल्पांना देखील उद्योग विभागाच्या सामूहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ देण्याचा तसेच नंदुरबार जिल्ह्याचा समावेश झोन तीन मधून झोन दोन मध्ये करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

          30 मे 2023 रोजी राज्याचे वस्त्रोद्योग धोरण जाहीर करण्यात आले असून यामध्ये 25 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्यात येणार आहे.  तसेच 5 लाखांपर्यंत रोजगार निर्मिती देखील होणार आहे.  हे धोरण जाहीर झाल्यावर वेगवेगळ्या वस्त्रोद्योग घटक व संघटनांनी शासनास दिलेल्या निवेदनानुसार या धोरणात सुधारणा करण्यात येऊन आकांक्षित जिल्हा असलेल्या नंदुरबारचा समावेश झोन तीन मधून झोन दोन मध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला.  उद्योग विभागाच्या सामूहिक प्रोत्साहन योजनेत वस्त्रोद्योग विशाल प्रकल्पांना दर्जा व प्रोत्साहने देण्यात येतील, अशी सुधारणा देखील करण्यात आली.

—–०—–

महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. ८ : शासनाच्या ११ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपये किमतीच्या शासकीय रोख्यांची विक्री १५ नोव्हेंबर रोजी अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाणार असल्याची माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. (वित्तीय सुधारणा) यांनी दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.

13 नोव्हेंबर 2023 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारा ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बिडस् ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान 15 नोव्हेंबर 2023 रोजी करण्यात येईल.

यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

रोख्यांचा कालावधी १५ नोव्हेंबर २०२३ पासून सुरु होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक १५ नोव्हेंबर २०३४ रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल.

अधिकतम प्राप्तीचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दि. १५ मे आणि १५ नोव्हेंबर रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

 

 

महाराष्ट्र शासनाचे दहा वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. 8 : दहा वर्षे मुदतीचे 2 हजार कोटी रुपये किमतीच्या शासकीय रोख्यांची विक्री 15 नोव्हेंबर रोजी अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाणार असल्याची माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. (वित्तीय सुधारणा) यांनी दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.

13 नोव्हेंबर 2023 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारा ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बिडस् ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान 15 नोव्हेंबर 2023 रोजी करण्यात येईल.

यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

रोख्यांचा कालावधी 15 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक 15 नोव्हेंबर 2033 रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल.

अधिकतम प्राप्तीचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दि. 15 मे आणि 15 नोव्हेंबर रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

 

 

 

पहिल्या टप्प्यात ३५ लाख शेतकऱ्यांना १७०० कोटी रुपयांचा अग्रीम पीक विमा होणार वितरित – कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. 8 : राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 700 कोटी 73 लाख रुपये पीक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. बहुतांश ठिकाणी दिवाळी पूर्वीच पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

विमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यास विमा कंपन्यांनी सुरुवात केली आहे. खरीप हंगामात विविध जिल्ह्यात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. एक रुपयात पीक विमा योजनेमध्ये राज्यातील 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे.  अंतरिम नुकसान भरपाई (MSA) अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनाने संबंधित पीक विमा कंपन्यांना अधिसूचना निर्गमित करून 25 टक्के अग्रीम पीक विमा देण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यावरून बहुतांश कंपन्यानी विभागीय व राज्यस्तरावर अपील केलेले होते. अपिलांच्या सुनावण्या होत गेल्या, त्याप्रमाणे आतापर्यंत संबंधित विमा कंपन्यांनी एकूण 1700 कोटी रुपये रक्कम देण्याचे मान्य केले आहे. तसेच जसजसे अपिलांचे निकाल येतील, त्यानुसार शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याची अग्रीम रक्कम यामध्ये मोठी वाढ होणार आहे.

अग्रीमबाबत समस्या तातडीने सोडविण्यासंदर्भात मंत्री श्री.मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती. यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संबंधित पीक विमा कंपन्यांच्या सुनावण्या तातडीने पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही विम्याबाबत आग्रही होते. तसेच उर्वरित जिल्ह्यातील सर्वेक्षण, अपिलावरील सुनावण्या आदी बाबी तातडीने पूर्ण करण्याबाबत विभागाला सूचना मंत्री श्री.मुंडे यांनी केल्या आहेत.

जिल्ह्यासाठी पीकविमा मंजूर रक्कम अशी (रक्कम रुपयांत)

नाशिक – शेतकरी लाभार्थी – 3 लाख 50 हजार (रक्कम – 155.74 कोटी)

जळगाव – 16,921 (रक्कम – 4 कोटी 88 लाख)

अहमदनगर – 2,31,831 (रक्कम – 160 कोटी 28 लाख)

सोलापूर – 1,82,534 (रक्कम – 111 कोटी 41 लाख)

सातारा – 40,406 (रक्कम – 6 कोटी 74 लाख)

सांगली – 98,372 (रक्कम – 22 कोटी 4 लाख)

बीड – 7,70,574 (रक्कम – 241 कोटी 21 लाख)

बुलडाणा – 36,358 (रक्कम – 18 कोटी 39 लाख)

धाराशिव – 4,98,720 (रक्कम – 218 कोटी 85 लाख)

अकोला – 1,77,253 (रक्कम – 97 कोटी 29 लाख)

कोल्हापूर – 228 (रक्कम – 13 लाख)

जालना – 3,70,625 (रक्कम – 160 कोटी 48 लाख)

परभणी – 4,41,970 (रक्कम – 206 कोटी 11 लाख)

नागपूर – 63,422 (रक्कम – 52 कोटी 21 लाख)

लातूर – 2,19,535 (रक्कम – 244 कोटी 87 लाख)

अमरावती – 10,265 (रक्कम – 8 लाख)

एकूण – लाभार्थी शेतकरी संख्या – 35,08,303 (मंजूर रक्कम – 1700 कोटी 73 लाख)

००००

दत्तात्रय कोकरे/विसंअ

 

 

विद्यार्थ्यांमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याबाबत जागृती करावी – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. ८ – वाढत्या प्रदूषणामुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजारांबाबत विद्यार्थ्यांना माहिती देणे गरजेचे आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी यावर्षीची दिवाळी फटाकेमुक्त आणि दिवे लावून साजरी करण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना केले.

मंत्री श्री. केसरकर यांनी मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील सर्व मुख्याध्यापक व प्राचार्यांशी दीपावलीमध्ये फटाके न फोडण्याच्या अनुषंगाने जागृती करण्याबाबत संवाद साधला. या ऑनलाईन संवादास शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे, मुंबई विभागातील सर्व शिक्षण निरीक्षक आणि शिक्षणाधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, दिवाळी हा सण आनंदाचा आहे. हा सण हर्ष आणि उल्हासात साजरा करण्याबाबत शाळांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी. शाळांमध्ये विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना दिवाळी सणाचे महत्व सांगण्यात यावे. ‘स्वच्छता मॉनिटर’ या कार्यक्रमामध्ये शाळांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून सांगावे. शाळांनी परसबाग निर्माण करून परसबागेची निगा कशी ठेवावी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी नवनवीन गोष्टी आत्मसात कराव्यात यासाठी शाळांनी विविध उपक्रम राबवावेत, अशी सूचना त्यांनी केली.

प्रधान सचिव श्री.देओल यांनीही सर्व मुख्याध्यापकांना शाळेमध्ये विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना फटाकेमुक्त व प्रदूषणविरहीत दिवाळी साजरी करण्याबाबत मार्गदर्शन करावे, अशी सूचना केली. या संवादामध्ये उपस्थित मुख्याध्यापक आणि प्राचार्यांनी सध्या मुंबई शहर व उपनगरांमध्ये होत असलेल्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली.

विभागीय उपसंचालक श्री. संगवे यांनी या ऑनलाईन संवादास उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करून सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

00000

बी.सी.झंवर‍/विसंअ

 

 

नीति आयोगाच्या उपाध्यक्षांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट  

मुंबई, दि. 8: नीति आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रामध्ये असलेल्या पायाभूत सुविधा, दळणवळणाची साधने यामुळे औद्योगिक गुंतवणुक राज्यात वाढत असून उद्योगांना जलदगतीने परवानग्या देण्यासाठी देखील राज्य शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील विकास प्रकल्पांना नीति आयोगाच्या माध्यमातून सहकार्य असेच कायम ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

 वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव मनोज सौनिक, ‘मित्राचे’ मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त वभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय यावेळी उपस्थित होते.

राज्यात मध्यम, लघु, अतिलघु उद्योगांना गती देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. उद्योग वाढीसाठी चांगल्या पायाभूत सुविधा, संपर्क साधने, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता असून गुंतवणूक वाढीला चालना देण्यात आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून पुढील दोन वर्षांत खड्डे मुक्त मुंबई करण्याचा निर्धार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील विविध प्रकल्पांना केंद्र शासनाकडून आवश्यक ते सहकार्य मिळत आहे. भविष्यात विकास कामांसाठी नीती आयोगाचे असेच सहकार्य मिळत राहो, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

००००

 

 

मुंबई उपनगरमध्ये ‘नमो ११ कलमी कार्यक्रमाचा’ शुभारंभ

मुंबई,दि.८: समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ प्रत्येक पालकमंत्र्यांनी  प्राधान्याने राबवावा. शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून राज्याच्या विकासाला गती द्यावी, असे प्रतिपादन  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मंत्रालयातील  मंत्रिमंडळ बैठक  सभागृह येथे, मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रमाचा  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह मंत्रीमंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते. आमदार मंगेश कुडाळकर, दिलीप  लांडे,अमित साटम, प्रकाश सुर्वे,आशिष शेलार,मिहिर कोटेचा,पराग शहा,अतुल भातखळकर,पराग अळवणी,मुंबई उपनगरमधील लाभार्थ्यी दूरदृश्यप्रणालीव्दारे कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, दिपावली सण जवळ आला आहे. मुंबई उपनगर मध्ये ‘नमो ११ कलमी कार्यक्रमाचा शुभारंभ करताना आनंद होत आहे. शासनाच्या सर्व योजना सर्व घटकापर्यंत पोहोचतील यासाठी आपले शासन प्रयत्नशील असून. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रत्येक घटकाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर राज्याच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा देखील पाठींबा मिळत आहे. हेच लक्षात घेवून राज्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवत आहोत दीड कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलो आहोत.या उपक्रमाच्या माध्यमातून विकास होण्यास मदत मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले,हे शासन शेतक-यांच्या पाठिशी असून आपत्तीच्या काळात नियम बाजूला ठेवून आतापर्यंत दिलेली मदत ही आतापर्यंतची सर्वात अधिक मदत आहे. शेतकऱ्यांसाठी  शासनाचे अनेक प्रकल्प सुरू केले. पीक विमा योजना, प्रधानमंत्री नमो सन्मान योजना यासारख्या योजना राबविल्या. आरोग्य, शिक्षण, उद्योग,शेतकरी,महिला,कामगार,दिव्यांग,मागासवर्ग घटक अशा सर्व घटकांचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी आपले शासन कटिबध्द असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ हा सर्व घटकांना न्याय देणारा उपक्रम असून मुंबई उपनगरमध्ये हा उपक्रम सुरू झाला त्याच धर्तीवर राज्यातही प्रभावीपणे राबविण्याचे त्यांनी सांगितले.

नमो ११ कलमी कार्यक्रमातूनसमाजातील सर्व घटकांना लाभ  होईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘नमो ११ कलमी’ कार्यक्रमातून सर्व समाज घटकांसाठीच्या योजना प्रभावी पणे राबवाव्यात. आज मुंबई उपनगरमध्ये हा उपक्रम सुरू होत आहे याचा अत्यंत आनंद आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या अनेक महत्वपूर्ण निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला जगातील पाचव्या स्थानावर नेले आहे त्याच धर्तीवर राज्यातही सर्व घटकांचा विकास करून राज्याला विकासाच्या पथावर नेण्याचा मानस या उपक्रमातून आपण साध्य करत आहोत. कामगार, महिला तसेच समाजातील इतर घटकांना विकासाच्या समान संधी उपलब्ध होण्यासाठी हा उपक्रम निश्चीत मदत करेल. प्रत्येक घटकाचे जीवनमान उंचावण्यासाठी नमो कलमी ११ कलमी कार्यक्रम निश्चित मोलाची भूमिका बजावेल असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

मुंबई उपनगर मध्ये नमो ११ कलमी कार्यक्रमयशस्वीपणे राबविणार – मंगलप्रभात लोढा

मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या  ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. आज मुंबई उपनगर जिल्ह्यात या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विचारानुसार समाजातील शेवटच्या घटकाचा विकासावर आधारित अनेक जनहितार्थ निर्णय घेण्यात आले आहेत. त्याच विचारांवर आधारित सर्वात शेवटच्या घटकापर्यत शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. आज मुंबई उपगनरातील ११ ठिकाणी वेगवेगळया ठिकाणी हा उपक्रम सुरू करण्यात आला. आज सुरू झालेला हा उपक्रम असाच पुढे सुरू ठेवून प्रत्येक घटकाला शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्माने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या सहकार्यातून  ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’यशस्वीपणे राबविणार आहोत असेही मंत्री श्री.लोढा म्हणाले.

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून नमो ११ कलमी कार्यक्रमाचीअंमलबजावणी

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून हा नमो ११ कलमी कार्यक्रमांतर्गत नमो दिव्यांग शक्ती अभियान- मुलुंड,नमो कामगार कल्याण अभियान -चांदिवली, नमो आत्मनिर्भर ग्राम अभियान- वांद्रे (पश्चिम),नमो दलित सन्मान अभियान- घाटकोपर (पूर्व),नमो तीर्थ स्थळ सुधार अभियान- विलेपार्ले (पूर्व), नमो आदिवासी स्मार्ट स्कूल अभियान- मागाठाणे- बोरीवली (पूर्व),नमो क्रीडा मैदान आणि उद्यान अभियान मालाड (पश्चिम),नमो सौर ऊर्जा कार्यालय अभियान- वांद्रे (पूर्व),नमो शेत तळे अभियान अंधेरी (पश्चिम),नमो शहर सौंदर्यीकरण अभियान- कांदिवली (पूर्व),नमो महिला सशक्तीकरण अभियान- कुर्ला (पूर्व) येथे विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या योजनेमधून बचत गटाना अर्थिक मदत, कामगारांना सुरक्षा संचाचे वाटप करणे, पात्र महिला मच्छिमार महिला लाभार्थ्यांना शीतपेट्ट्यांचे वाटप,महिला बचत गटांच्या सेंद्रीय उत्पादनासाठी विशेष बाजारपेठ भरविणे, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सौरऊर्जा प्रकल्पाचे उदघाटन,आदिवासी विद्यार्थ्यांसाठी साहित्य वाटप, दिव्यांगाना इलेक्ट्रीक साहित्याचे वाटप, माता रमाबाई आंबेडकरनगर येथे  गंधकुटीर समाजकल्याण केंद्राचे भुमिपूजन, अंबोजवाडी, मालवणी येथे क्रीडा मैदानाचे भूमीपूजन, पार्लेश्वर मंदिराच्या परिसराच्या सुशोभिकरणाच्या कामाचे भूमीपूजन असे विविध  कार्यक्रम पार पडले.

००००

 

‘किशोर’च्या ‘मूलभूत जीवन कौशल्य’ दिवाळी अंकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. 08 :- शालेय शिक्षण विभागांतर्गत बालभारतीच्यावतीने प्रकाशित होणाऱ्या ‘किशोर’ मासिकाच्या ‘मूलभूत जीवन कौशल्य’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव मनोज सौनिक, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, किशोरचे संपादक किरण केंद्रे आदी उपस्थित होते.

मुलांना अवांतर वाचनाची गोडी लागावी, त्यांना पुस्तकाबाहेरील ज्ञान मिळावे, त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि त्यांच्या कोवळ्या मनावर उत्तम मूल्यसंस्कार व्हावेत या उद्देशाने गेली 52 वर्षे ‘बालभारती’च्या वतीने ‘किशोर’ हे मासिक प्रकाशित केले जाते. ‘किशोर’चा दिवाळी अंक हा नेहमीच आकर्षक आणि नाविन्यपूर्ण राहिला आहे. यंदाचा किशोरचा दिवाळी अंक ‘मूलभूत जीवन कौशल्य’ या विषयावर आधारलेला आहे. बालवयीन आणि किशोरवयीन मुले, अंगभूत बळ, आत्मविश्वास, धाडस यांच्या आधारे संकटांना कशी सामोरी जाऊ शकतील, या प्रश्नाचा वेध कथा, कविता, लेख आणि खेळ अशा माध्यमांतून या अंकात घेण्यात आला आहे. किशोरच्या परंपरेनुसार अंकात अनेक मान्यवरांनी दर्जेदार आणि मनोरंजक लेखन केले आहे.

                                                                                          00000

बी.सी.झंवर/विसंअ

प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे प्रयत्न हवेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ८ :- प्रदूषणमुक्त महाराष्ट्र व्हावा, यासाठी सर्वांचे प्रयत्न अपेक्षित आहेत. वाढती प्रदूषण पातळी रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. पर्यावरणपूरक भूमिका घेऊन प्रदूषण वाढणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे ‘प्रदूषणमुक्त दीपावली संकल्प अभियान – २०२३’ अंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, अल्पसंख्यांक व पणन मंत्री अब्दुल सत्तार, मुख्य सचिव मनोज सौनिक, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, जगभरात सध्या पर्यावरण हा गंभीर विषय आहे. वाढते तापमान आणि या घातक परिणामांची चर्चा सध्या जगभरात सुरु आहे. अशावेळी पर्यावरणपूरक भूमिका घेणे आवश्यक आहे. त्याचमुळे राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीला प्रोत्साहन दिले आहे. बांबू लागवडीसाठी अनुदान दिले जात आहे. याशिवाय, स्वच्छ भारत अभियानासारख्या मोहिमेतून पर्यावरण संवर्धनासाठी काम केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

शालेय विद्यार्थ्यांनी एखादी गोष्ट मनावर घेतली की त्या कुटुंबात पालकही त्याचे अनुकरण करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला, तर तो निश्चितपणे सर्वांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला. ही दिवाळी सर्वांना आरोग्यदायी आणि आनंदाची जावो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह मान्यवरांनी प्रदूषणमुक्त सण साजरे करण्याबाबत विद्यार्थ्यांना संकल्प करण्याची शपथ दिली.

कार्यक्रमाच्या स्वागतपर प्रास्ताविकात पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव श्री. दराडे यांनी प्रदूषणमुक्त दीपावली संकल्प अभियान -२०२३ राबविण्यामागील भूमिका समजावून सांगितली. गेल्या काही वर्षात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या व्यापक जनजागृतीमुळे फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी आजही याबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्याची नितांत गरज आहे. त्याच उद्देशाने मंडळामार्फत दरवर्षी विविध उपक्रम हाती घेतले जातात. फटाक्यांमुळे होणारे हवा आणि ध्वनीचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्पना राबविली जाते. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत त्याचे महत्व पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुस्कुटे यांनी केले.

00000

दीपक चव्हाण/विसंअ

 

महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या मुंबई विभागीय कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई दि.८- महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या मुंबई विभागीय कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार,महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्जा, खासदार इम्तियाज जलील,फौजिया खान, आमदार अबु आजमी, आमदार फारूख शाह, अल्पसंख्यांक विकास विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कार्यालयाची पाहणी केली.

अल्पसंख्याक विकास विभागाच्या मुंबई विभागीय कार्यालयामुळे परिसरातील अल्पसंख्यांक नागरिकांची कामे अधिक वेगाने होण्यास मदत होणार आहे.

0000

ताज्या बातम्या

नाशिक ‘मनपा’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 8 : नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर वेतनाबाबत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल. संबंधित...

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर

0
मुंबई, दि. 8 : राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण...

महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक मुंबई, दि. ८ : बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतील शब्दांचा युनेस्कोमधील राजदूतांकडून सन्मान

0
मुंबई, दि. 8 : - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांचा गौरवपूर्ण उल्लेख हा तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रासाठी एक आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे. युनेस्कोमधील...

वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

0
मुंबई, दि . ८ : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या...