सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 1003

विधानसभा इतर कामकाज :

मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या २५ वर्षातील आर्थिक कारभाराचे होणार लेखापरीक्षण – मंत्री उदय सामंत

नागपूर, दिनांक १२ – मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या २५ वर्षातील आर्थिक कारभाराचे लेखापरीक्षण करून त्याबाबतची श्वेतपत्रिका पुढील अधिवेशनात मांडण्यात येईल, अशी माहिती नगरविकास मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत पुरवणी मागण्यांना उत्तर देताना दिली. नियोजन विभागाचे अपर प्रधान सचिव, नगरविकास -१ चे प्रधान सचिव आणि संचालक (वित्त – लेखापरीक्षण) यांची समिती ही चौकशी करेल, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री श्री.सामंत म्हणाले की, सदस्य योगेश सागर यांनी मुंबई महापालिकेच्या गेल्या २५ वर्षातील आर्थिक कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. ती मान्य करण्यात येऊन याबाबत निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले.

याशिवाय, नगरविकास विभागाच्या अनुषंगाने ठाणे शहरातील घनकचरा, पाणीपुरवठा, याबाबतही तक्रारी नसल्याचे सांगून ठाणे शहराला ५८५ एमएलडी पाणीपुरवठा होत असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले. सूरज परमार गुन्हा प्रकरणी तपास सुरू असून याप्रकरणी अतिजलद तपास करण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, विधानसभेने आज नगरविकास विभागाच्या ५०१५ कोटी ११ लाख ९० हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. तसेच महसूल विभागाच्या ६३१ कोटी ६७ लाख ३८ हजार रुपयांच्या, तर मदत व पुनर्वसन विभागाच्या ११२ कोटी ८४ लाख १ हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. तसेच वन विभागाच्या ४२ कोटी ६१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ३०८० कोटी ७३ लाख रुपयांच्या तर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ५४ लाख ९६ हजार रुपयांचे पुरवणी मागण्या यावेळी मंजूर करण्यात आल्या.

00000

दीपक चव्हाण/निलेश तायडे/विसंअ/

देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनवण्याला प्राधान्य- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दि.11 : कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, व्यापार, पायाभूत सोयीसुविधा आदी सर्वांगीण विकासाच्या बाबतीत लोकाभिमुख कारभारातून राज्याला देशात प्रथम क्रमांकाचे बनविण्याला शासनाचे प्राधान्य असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे आय बी एन १८ वृत्तवाहिनीच्या ‘अजेंडा सशक्त महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमात दिली.
वृत्तवाहिनीचे संपादक आशुतोष पाटील यांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलखुलास उत्तरे दिली.


राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सोयीसुविधा उभारणीवर राज्य शासनाचा भर असून, उद्योग, व्यापारवाढीवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. शासनाने सुरुवातीलाच दावोस येथे जावून १ लाख ३७ हजार कोटीवर विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले आहेत. भविष्यातही अनेक कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले जातील, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
राज्य शासनाने महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा ५ लाख रुपयांवर केली असून, कँशलेस सुविधा देणे हा पुढील टप्पा असल्याचे सांगत राज्यातील गरीब जनतेला घराजवळच आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रम सुरु केला आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून मोठी रक्कम वितरित करून अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात राज्य शासनाचे उत्तम काम सुरु असन, राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सोयीसुविधांची उभारणी करण्यात येत आहे. देशात सर्वाधिक प्रकल्प राज्यात सुरु असल्याचे सांगून, नागपूर ते मुंबई हा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र एक्सप्रेस वे अर्थात समृद्धी महामार्ग गेमचेंजर ठरला असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
मुंबई – पुणे हा बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतील महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रत्यक्षात साकारला. शिवडी – न्हावा शेवा – चिरले हे अंतर २० मिनिटांवर आले असून, कोस्टल रोड, वर्सोवा – मिरा भाईंदर, वसई -विरार – अलिबाग, मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई मेट्रो २ ते ७ आदी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी माहिती दिली.
शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी हे सरकार उभे असून, गेल्या दीड वर्षात विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. त्यामध्ये पूर्वीच्या दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाईसाठी वाढ करण्यात आली आहे. राज्यात नुकताच अवकाळी पाऊस, गारपीट झाल्यामुळे पिकांच्या नुकसान भरपाईसाठी तात्काळ पंचनामे करण्यात येत आहेत. केंद्र सरकारप्रमाणे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून वार्षिक 6 हजार रुपये देणारे देशातील पहिलेच राज्य असल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.
केंद्र शासनासोबत चांगले संबंध असल्यामुळे राज्याच्या विकासासाठी लागणारा निधी मिळत आहे. शासन आपल्या दारी उपक्रमातून आतापर्यंत 1 कोटी 90 लाख नागरिकांना लाभ वितरित करण्यात आले. महिलांसाठी एस टी बस भाड्यात 50 टक्के सवलत, तसेच लेक लाडकी योजनेतून मुलीला तिच्या जन्मापासून 18 वर्षाची होईपर्यंत ७५ हजार रुपयांच्या निधीची मदत करण्यात येत आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांच्या सबलीकरणाचे धोरण राबविण्यात येत असल्याकडे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी लक्ष वेधले.
मराठा समाजाच्या मुलांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून 50 हजार रुपयांपर्यंत निधी उपलब्घ करून दिला जात आहे. आतापर्यंत 70 हजार मुलांनी याचा लाभ घेतल्याची माहिती त्यांनी दिली. राज्य शासनाने कोट्यवधी रुपयाचे व्याज भरले असून, महिलांनाही याचा लाभ होत आहे. ओबीसी समाजातील मुलांना मिळणाऱ्या सवलती सांगताना त्यांनी परदेशी शिष्यवृत्ती योजना, सारथीच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये याची मदत होत असल्याचे ते म्हणाले.
राज्य शासन सर्व समाजाच्या पाठीशी उभे असून, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, यासाठी मागासवर्ग आयोग त्याचे काम करत असल्याचे ते म्हणाले. शिवाय मराठा समाजाचे आरक्षण, सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात येत असलेले पुरावे, इंपिरीकल डेटा, ‍शिंदे समिती, मराठा आंदोलन आदी विषयांवर त्यांनी उत्तरे दिली. मराठा आंदोलनादरम्यान घडलेल्या अप्रिय घटनांबाबत बोलताना त्यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगून, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असल्यामुळे सर्वांनी याची खबरदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ ‍शिंदे यांनी केले.
मुंबईमध्ये 2-3 वॉर्डातील स्वच्छता कर्मचारी एकत्र आणून काम केल्यास त्याचा परिणाम दिसून येतो. लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती होते. त्यात लोकसहभाग वाढत आहे. त्यातून स्वच्छतेची चळवळ सुरु होईल, असे सांगून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्वच्छ भारत अभियान सुरु केले आहे. आता ही चळवळ बनली असून, धारावीतील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्याचा कायापालट करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. तसेच विकासाला सर्वांनी सहकार्य करावे. विकास प्रकल्पाला विरोध करू नये, राज्याचा सर्वांगीण विकास होताना सर्वांनी सहकार्य करण्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

कला केंद्रांच्या नियंत्रणासाठी एसओपी बनवण्यात यावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर दि. 11 :-  कला केंद्रावर अल्पवयीन मुली असू नयेत यासाठी या कला केंद्रांची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. पोलीसमहसूलआरोग्यमहिला व बालकल्याण व कामगार  विभागाच्या सहकार्याने कला केंद्रांच्या नियंत्रणासाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) बनवण्यात यावीअसे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

कला केंद्रांबाबत एसओपी तयार करणे संदर्भात विधान भवनात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस छत्रपती संभाजीनगरचे पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण व पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया प्रत्यक्ष उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे बीडचे पोलीस अधीक्षक  नंदकुमार ठाकूरनाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमपअहमदनगर पोलीस अधीक्षक  राकेश ओलालातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडेकलाताई शिंदेसुनीताताई मोरे उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्याकला केंद्रावर काम करणाऱ्या महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी भरोसा सेलमहिला दक्षता समितीसह पोलीसमहसूलआरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी या केंद्रांना नियमित भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. कला केंद्राच्या ठिकाणी महिला राहत असलेल्या ठिकाणीची जागा सुरक्षित आहे का यासह केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडत नसल्याची खात्री करावी. याबरोबरच कला केंद्रांवर कोणतेही अवैध व्यवसाय होत नाही याची खातरजमा करावी. कला केंद्रावर काम करणाऱ्या महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महिला व बाल विकास विभागाची मदत घ्यावी सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्याकोविड मध्ये  विधवा महिलांना मदत करण्यासाठी समिती केली होती. त्याच धर्तीवर कला केंद्रातील मुलींसाठी समिती नेमून त्या दृष्टीने त्या मुलींचे पुनर्वसन  करण्यावर भर देता येईल. कला केंद्रावर काम करणाऱ्या महिलांच्या अल्पवयीन मुलींना शिक्षण देण्यासाठी त्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन त्या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच कला केंद्रांवर काम करणाऱ्या कलाकारांच्या सामाजिक पुनर्वसनासाठी त्यांची नोंदणी असणे आवश्यक आहे. यासाठी कामगार विभागामध्ये जशी कामगारांची नोंदणी केली जाते त्याच पद्धतीने कला केंद्रावरील कलाकारांची नोंदणी कामगार विभागाने करावी. यामधे तमाशालोक कलावंतकला केंद्रावरील महिलांचा समावेश करावाअशा सूचनाही त्यांनी दिल्या.

बैठकीत संबंधित जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी आपापल्या जिल्ह्यातील कला केंद्राच्या सद्य:स्थितीची माहिती दिली.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान विभागीय पुरस्काराचे वितरण

छत्रपती संभाजीनगर दि. 10: गावशिवाराची स्वच्छता, जलसंधारण, शिक्षण, शाश्वत शेती, आरोग्य आदी सोयींमुळे गावांचे स्वरूप बदलू लागले आहे. स्वच्छ गाव, पाणीदार गाव, वनसंपदेचे गाव, आदर्श गाव अशी अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. गावांचा सर्वांगिण विकास करताना निसर्ग रक्षण, पर्यावरणाला हानी न पोचवता गावशिवाराची जैवविविधता अबाधित ठेवावी लागणार आहे. स्वंयपूर्ण गावांसाठी शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसोबतच गावातील प्रत्येक कुटुंबाचा सहभाग महत्त्वाचा ठरणार असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी केले.

 

विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय स्तरावरील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत सन 2020-21 व 2021-22 या वर्षातील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता व विशेष पुरस्कार वितरण विभागीय आयुक्त श्री. अर्दड यांच्या हस्ते झाले. यावेळी  विभागीय विकास उपायुक्त सुरेश बेदमुथा, सहाय्यक आयुक्त सिमा जगताप उपस्थित होते.

पुरस्कार वितरण कार्यक्रमात संवाद साधतांना विभागीय आयुक्त श्री. अर्दड म्हणाले की, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता चळवळ उभी राहिली आणि ती आजही अविरतपणे सुरू आहे. या अभियानाची दखल देशाने घेतली आहे. अभियानाच्या माध्यमातून गावांमध्ये वैयक्तिक, सार्वजनिक, शालेय स्वच्छता विषयक उपक्रम राबविले जात असून मोठ्या प्रमाणात लोकसहभागाच्या माध्यमातून विकास कामे केली जात  आहेत, हे उल्लेखनीय आहे. यापुढेही गावातील प्रत्येक घटकाचा सहभाग घेत स्वंयपूर्ण गावांसाठी प्रत्येकाने यामध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

दिव्यांग बांधवापासून ते वंचित घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत, गावागावात या योजनांचा लाभ या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या सर्वांचे प्रयत्न गरजेचे आहेत. प्रत्येकाने आपल्या गावात लोकसहभागातून विकास कामे केली तर ही विकासकामे राज्यातील इतर गावांनाही दिशादर्शक ठरतील. आपण नैसर्गिक स्त्रोताचा जबाबदारीने वापर केला पाहिजे, त्याचा विनाश न करता ते पुढच्या पिढीला उपयुक्त ठरतील, त्यासाठीचे प्रयत्न महत्वाचे आहेत. गावांचा विकास करताना निसर्ग जपण्यासोबतच सेंद्रिय शेतीकडेही वळावे. गावाला सुजलाम-सुफलाम करूया, असे आवाहन श्री. अर्दड यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय विकास उपायुक्त सुरेश बेदमुथा यांनी केले. त्यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, ग्रामविकासात पथदर्शी कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना तालुका, जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर या अभियानांतर्गत पुरस्कार दिले जातात. मराठवाडयात या अभियानात विशेष कामगिरी केलेल्या गावात पाण्याचा काटकसरीने वापर, मोठया प्रमाणात वृक्ष लागवड, प्लॅस्टीकमुक्त गाव अशा बदलासह बदलते गाव पहायला मिळते आहे. काही गावांनी अनेक वर्षापासून हे सातत्य कायम ठेवले आहे.

कार्यक्रमाचे आभार सहाय्यक आयुक्त (विकास) सिमा जगताप यांनी मानले. कार्यक्रमात लाडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री बागड व हाडोळी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. माधवराव अमृतवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

 

विभागीय पातळीवरील पुरस्कार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम प्रथम पुरस्कार (विभागून) रू.10 लक्ष

जवळगाव, ता. हिमायतनगर जि.नांदेड

हाडोळी, ता.भोकर, जि.नांदेड

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम द्वितीय पुरस्कार (विभागून) रू.8 लक्ष

भडंगवाडी, ता.गेवराई, जि.बीड

नळगीर, ता.उदगीर जि.लातूर

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम तृतीय पुरस्कार (विभागून) रू.6 लक्ष

कंडारी, ता.बदनापूर, जि.जालना

ब्राम्हणगाव ता.जि.परभणी

 

विशेष पुरस्कार स्व.वसंतराव नाईक पुरस्कार सांडपाणी व्यवस्थापन

मस्साजोग ता.केज, जि.बीड.

विशेष पुरस्कार डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार पाणी गुणवत्ता

उमरा, ता.जि.हिंगोली.

 

विशेष पुरस्कार स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार शौचालय

लाडगाव, ता.जि.छत्रपती संभाजीनगर

 

******

रेशीम संचालनालयातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया रद्द

नागपूर दि. ११ : रेशीम संचालनालयाच्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांसाठी १३ मार्च २०२० रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. कोविड १९ साथ व प्रशासकीय कारणांमुळे भरती होऊ शकली नाही. त्यामुळे ही प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक,  प्रयोगशाळा परिचर, आदी रिक्त पदांसाठी ही जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. रेशीम संचालनालयाकडून १२४ रिक्त पदांची भरती प्रस्तावित असून याबाबत लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल, असे रेशीम संचालक गोरक्ष गाडीलकर यांनी कळविले आहे.

०००

नाशिक, पुणे विमानतळांसह ५८ विमानतळे कृषी उडान योजनेअंतर्गत समाविष्ट

नवी दिल्ली, दि. ११: शेतकऱ्यांचे शेतमालाला देश व विदेशातील  बाजारपेठ  उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र सरकारने यासाठी सकारात्मक पाऊल उचलेले असून, नाशिक व पुणे विमानतळासह देशातील एकूण ५८ विमानतळांचा केंद्रीय ‘कृषी उडान योजना २.०’ अंतर्गत समावेश केला गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभासह त्यांच्या उत्पादनाला  जगभरात  ओळख  मिळेल.

नाशिक आणि पुणे विमानतळांचा या योजनेत समावेश झाल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत कमी वेळात आणि कमी खर्चात पोहोचवता येईल, पर्यायाने त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल.

शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन दूरच्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करणे आणि त्यांचे उत्पन्नात वाढ होईल या उद्देशाने ऑगस्ट २०२० मध्ये कृषी उडान योजना सुरु करण्यात आली होती.

 

कृषी उडान योजना २.० ची घोषणा २७ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आली. यात प्रामुख्याने: डोंगराळ प्रदेश, ईशान्य राज्ये आणि आदिवासी भागातून विमानतळांद्वारे विविध प्रकारच्या शेतीमाल (फळे, भाज्या, मांस, मासे, डेअरी उत्पादने इ.) वाहतुकीवर भर देऊन,  योजना अंतर्गत ईशान्य, डोंगराळ आणि आदिवासी भागासाठी २५ विमानतळ निवडण्यात आले आहेत, तर इतर भागांमध्ये ३३ विमानतळांचा समावेश आहे.

या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कृषी विभाग, नागरी विमान वाहतूक मंत्रालय, पशुपालन आणि डेअरी विभाग, मत्स्य विभाग, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, वाणिज्य विभाग, आदिवासी विकास मंत्रालय आणि पूर्वोत्तर प्रदेश विकास मंत्रालय अशी आठ केंद्रीय मंत्रालये योग्य  समन्वय साधून काम करीत आहेत.

हवाई मालवाहतुकीद्वारे कृषी उत्पादनाची वाहतूक सुलभ करुन त्यास प्रोत्साहन देण्यासाठी  विमान प्राधिकरण भारत (AAI) व सरंक्षण मंत्रालयाने विमानतळ शुल्क, पार्किंग शुल्क इ. सवलती देखील या योजनेअंतर्गत प्रदान केल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पदानांना देश विदेशात जलद आणि सुरक्षितरित्या पोहोचवण्यास मदत होईल व त्यांना उत्पादानाच्या विक्रीतून  अधिक उत्पन्न मिळू शकेल.

 

०००

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात नाचणी व इतर तृणधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. योगेश बन यांची मुलाखत

मुंबई, दि. ११ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३’ निमित्त राहुरी कृषी विद्यापीठ केंद्र कोल्हापूर येथील नाचणी व इतर तृणधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. योगेश बन यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे, संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत, 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष’ म्हणून जाहीर करण्यात आले. जागतिक पातळीवर भरड धान्यांच्या उत्पादनात वाढ करणे, कार्यक्षम प्रक्रिया तसेच आंतरपीक पद्धतीचा उत्तम वापर करून या उपक्रमाच्या माध्यमातून देशांतर्गत तसेच जागतिक पातळीवर भरड धान्यांचा वापर वाढविण्यासाठी शासन स्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. अन्नसुरक्षेचे आहारातील महत्व सर्वसामान्य जनतेला समजावे म्हणून देशभरात तसेच राज्यात यानिमित्ताने विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. भरडधान्य म्हणजे काय व याचे किती प्रकार आहेत. या पीक पध्दतीमुळे शेतकऱ्यांना कशाप्रकारे फायदा होतो याबाबत डॉ. बन यांनी ‘दिलखुलास’ आणि जय महाराष्ट्र कार्यक्रमात माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. बन यांची मुलाखत मंगळवार दि. 12, बुधवार दि.13, गुरुवार दि. 14 आणि  शुक्रवार दि. 15 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरुवार, दि. 14 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://x.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

 

हत्तींमुळे घरांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये वाढ करणार- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूर, दि. 11 : गडचिरोली जिल्ह्यामध्ये जंगलव्याप्त क्षेत्र असल्यामुळे येथील हत्तींचा उपद्रव शेती तसेच मानवी वस्त्यांपर्यंत होत आहे. या हत्तींमुळे घरांचे नुकसान झाल्यास द्यावयाच्या नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये वाढ करण्याचे निर्देश वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे दिले.

वनेमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली जिल्ह्यातील हत्ती व वाघ यांच्यामुळे होणाऱ्या संपत्तीच्या नुकसानाबाबत सेमिनरी हिल्स येथील वन विभागाच्या हरी सिंह सभागृह येथे आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार देवराव होळी, कृष्णा गजबे, सुभाष धोटे, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणू गोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वन संरक्षक वन बल प्रमुख शैलेंद्र टेंभूर्णीकर, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, नागपूर मुख्य वनसंरक्षक श्रीमती लक्ष्मी, गडचिरोली मुख्य वनसंरक्षक एस. रमेश कुमार आदी उपस्थित होते.

गडचिरोलीचा दोन तृतीयांश भाग जंगलाने व्यापलेला आहे. मागील काही वर्षात 23 हत्तींचा कळप येथे आलेला होता. या कळपामुळे येथील घरांचे नुकसान होत आहे. नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये वाढ करण्यात यावी. तसेच हत्तींमुळे काढणी केलेल्या धान तसेच शेतमालाचे नुकसान झाल्यास भरपाई देण्याबाबत तरतूद करावी, अशा सूचना वनेमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या.

जंगलालगत असलेल्या पडीक जमिनीवर वृक्ष लागवड करण्याच्या शक्यतेची तपासणी करावी. गडचिरोली जिल्ह्यातील वाघ व हत्तींचा वावर असलेल्या 52 गावांमध्ये वनहद्दीवर कुंपण उभारण्याची कार्यवाही करावी. याकरिता आवश्यक निधी श्यामाप्रसाद मुखर्जी योजना किंवा जिल्हा योजना निधीमधून घेण्यात यावा. तसेच प्रलंबित नुकसान भरपाईच्या प्रकरणातील गावकऱ्यांना तत्काळ अर्थसहाय्य देऊन याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

विकसित भारत संकल्पनेत युवकांनी सहभागी व्हावे –  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुंबई, दि. ११ : देशाच्या युवाशक्तीला दिशा देण्याची जबाबदारी सर्वांची आहे. नागरिकांच्या वैयक्तिक सहभागातूनच राष्ट्रउभारणी होते. विकसित भारताच्या संकल्पनेला प्राधान्य देऊन उद्दिष्ट पूर्तीसाठी विकसित भारत या संकल्पनेत युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

 

विकसित भारत @२०४७च्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील राज्यपाल, अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू, सार्वजनिक, खाजगी आणि अभिमत विद्यापीठांचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव यांच्याशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला.

महाराष्ट्रात राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली विकसित भारत@२०४७ च्या संकल्पनांवर विचार-विमर्श करण्यासाठी राजभवन येथील दरबार हॉल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सर्व अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू, खाजगी विद्यापीठ, अभिमत विद्यापीठांचे  कुलगुरू, प्र-कुलगुरु, शैक्षणिक संस्था प्रमुख उपस्थित होते.

दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधताना प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, विकसित भारताच्या उभारणीत  ‘विकसित भारत@२०४७’ यामध्ये ‘व्हॉइस ऑफ यूथ’ (Viksit Bharat@2047: Voice of Youth) हे व्यासपीठ (प्लॅटफॉर्म) उपलब्ध करुन दिले आहे. विकसित भारत संकल्पनेवर सामूहिक विचार करण्यासाठी हा मंच उपलब्ध आहे. युवाशक्तीमध्ये विचारांची विविधता असून या उपक्रमाचा उद्देश विकसित भारताच्या निर्मितीसाठी तरुणांनी एकत्रित असणे गरजेचे आहे. यामुळेच या उपक्रमात  युवकांनी मोठ्या संख्येने  सहभागी व्हावे, आणि विकसित भारतासाठी आपले योगदान द्यावे.

प्रधानमंत्री श्री.मोदी म्हणाले की, आपले ध्येय,संकल्प विकसित भारतासाठी असले पाहिजे, याद्वारे सुसंस्कारित, बुद्धिमान, अशी युवा पिढी तयार होईल आणि आगामी काळात देशाचे नेतृत्व करेल, देशाला योग्य दिशा देईल. डिजिटल इंडिया, स्वच्छता अभियान यासह कोरोना काळ आपण पहिला आहे. युवा शक्तीमध्ये परिवर्तन करण्याची ताकद आहे. देश उत्तुंग भरारी घेत आहे. अनेक देशांनी योग्य वेळेत जलद बदल करुन त्या ठराविक कालावधीत देशाचा विकास केला आहे.  भारतासाठीसुद्धा आता हीच योग्य वेळ आहे.  अमृत काळाच्या प्रत्येक क्षणी आपल्यापुढे भारताला विकसित देश म्हणून उभे करण्याचाच ध्यास असला पाहिजे. असेही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी सांगितले.

विकसित भारत @२०४७’ संकल्पनेत प्रत्येकाने आपल्या विचारांच्या कक्षा ओलांडून परिघाबाहेरील वेगळा विचार करावा. विकसित भारतासाठी उपयुक्त सूचना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले असून पाठवलेल्या  सूचनांची निवड करून  पहिल्या दहा चांगल्या सूचना मांडणाऱ्या व्यक्तींना विशेष सन्मानित करण्यात येईल, असेही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी सांगितले.

विकसित भारताच्या उभारणीसाठी शैक्षणिक संस्थासह विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा राज्यपाल रमेश बैस

राज्याला ज्ञान आणि शिक्षणाचा समृद्ध वारसा लाभला आहे. राज्यातील  विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्था शिक्षणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करीत आहेत. २०४७ पर्यंत विकसित भारत होण्यासाठी विद्यापीठ, शिक्षण संस्थांसह विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा असल्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी सांगितले.

समाज आणि राष्ट्रासाठी विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांनी लोकाभिमुख वार्षिक महोत्सव आयोजित करावे. शिक्षण प्रणालीमध्ये नाविन्यपूर्ण कल्पना, नवनवीन उपक्रम यांचा वापर करणे गरजेचे आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणीमध्ये एक बेंचमार्क ठरावा, अशा सूचनाही राज्यपालांनी यावेळी केल्या.

आज देश अनेक क्षेत्रात प्रगती करीत आहे. आशियाई खेळांमधील कामगिरी, जन-धन खाती, कोविड काळात लसींचा विकास, चांद्रयान मिशन, टीबी नियंत्रण, डिजिटल पायाभूत सुविधांची निर्मिती यामध्ये उत्तम कामगिरी केली आहे. तसेच जी-२०शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावली आहे. जपान, जर्मनी, सिंगापूर आणि दक्षिण कोरियासारख्या देशांनी महान राष्ट्र बनण्यासाठी मोठी झेप घेतली असून भारतासाठी हीच योग्य वेळ आहे. भारताला २०४७ पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी सर्वांनी सहभाग द्यावा, असे आवाहनही राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी केले.

विकसित भारत संकल्पनेचे लोकचळवळीत रूपांतर व्हावे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव काळात देशाच्या विकासासाठी नवीन दृष्टिकोन समोर ठेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रा  अभियान सुरू केले आहे. विकसित भारत संकल्प यात्रेचे लोकचळवळीत  रूपांतर होणे गरजेचे  आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्यलढ्यात सर्व समाजघटकांनी सहभाग घेतला होता. तसाच सहभाग विकसित भारत उपक्रमात द्यावा.

जी-२० परिषदेच्या माध्यमातून प्रधानमंत्री यांनी ‘वसुधैव कुटुम्बकम’ असा संदेश जगाला दिला आहे. समाजकारण, राजकारण, अर्थकारण, यामध्ये नवीन दृष्टिकोन देण्यासाठी विकसित भारत अभियानाच्या माध्यमातून युवकांनी, शिक्षणसंस्थांनी आपली वेगळी ओळख निर्माण करावी, असे श्री.प्रधान यांनी सांगितले. चर्चासत्रात शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी विकसित भारत संकल्पना यावर विचार मांडले. चर्चासत्र झाले.

०००

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांसाठी 1 हजार 690 कोटी रुपयांच्या पीक विम्याचे वितरण- मंत्री धनंजय मुंडे

नागपूर, दि. 11 : राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्याबाबत प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना 2216 कोटी रुपये इतका अग्रीम पीकविमा 25 टक्के प्रमाणे मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 1690 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असून उर्वरित रुपयांचे वितरण वेगाने सुरू आहे, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात विधानपरिषदेत दिली.

24 जिल्ह्यात स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीला अनुसरून संबंधित विमा कंपन्यांना 25 टक्के अग्रीम पीक विमा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरून अधिसूचना काढण्यात आल्या होत्या. मात्र, त्याविरोधात काही कंपन्यांनी जिल्हा प्रशासन व विभागीय स्तरावर अपील केले होते. ते फेटाळून लावल्यानंतर काही पीक विमा कंपन्यांनी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केले होते. यादरम्यान राज्य शासनाच्या वतीने हवामान तज्ज्ञ, कृषी विद्यापीठांमधील तज्ज्ञ व्यक्तींचे सहकार्य घेऊन 21 दिवसांच्या पावसाच्या खंडाच्या नियमाला अनुसरून तसेच विविध तांत्रिक बाबींच्या दृष्टीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कंपन्यांच्या पुढे सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्यास भाग पाडले. काही विमा कंपन्यांचे अपील अद्याप सुनावणी स्तरावर आहेत, ते अपील निकाली निघाल्यानंतर मंजूर पीक विम्याच्या रकमेत आणखी मोठी वाढ होणार आहे, असेही कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

विविध जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना एक हजार रुपयापेक्षा कमी विमा रक्कम मिळाल्याच्या बाबी काही सदस्यांनी उपस्थित केल्या. त्यावर ज्या शेतकऱ्यांना मिळणारी विमा रक्कम एक हजारापेक्षा कमी असेल, त्या शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये पीक विमा दिला जाईल. याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे  मंत्री श्री. मुंडे यांनी स्पष्ट केले.

पीक विम्यासंदर्भात विधानपरिषदेत आमदार सर्वश्री शशिकांत शिंदे, विक्रम काळे, सतीश चव्हाण, अरुण लाड, जयंत आसगावकर, प्रा. राम शिंदे, प्रवीण दरेकर, अमोल मिटकरी यांसह विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनीही प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता.

आमदार एकनाथ खडसे यांनी केळी पीक विमा व आमदार जयंत पाटील यांनी भात शेतीचे झालेले नुकसान याविषयावरील चर्चेत सहभाग घेतला.

000

प्रवीण भुरके/ससं/

————————————————————————————

स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची दोन महिन्यांत चौकशी– मंत्री दिलीप वळसे पाटील

नागपूर, दि. 11 : एसटी कामगारांची सुरक्षितता, प्रगती व्हावी त्याअनुषंगाने शासनातर्फे लक्ष देत वेळोवेळी निर्णय घेतले जातील. बँकेच्या संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे व चुकीच्या निर्णयामुळे बँकेचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अशा घटना होणार नाहीत याबाबत खबरदारी घेऊन सहकार आयुक्तांना सूचना केल्या असून पुढील कार्यवाही सुरु आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर दोन महिन्यांत चौकशी केली जाईल, असे सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याबाबत सदस्य अनिल परब यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री श्री. पाटील बोलत होते.

मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले की, बँकेच्या संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे बँकेचे नुकसान होत असल्याने बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याबाबत सभासदांचा ४ सप्टेंबर २०२३ रोजीचा तक्रार अर्ज सहकार आयुक्त कार्यालयास अथवा शासनास अद्याप प्राप्त नाही. याबाबत राज्य शासन व सहकार विभाग त्यावर लक्ष ठेऊन आहे. ही बँक एसटी कामगारांच्या हिताची बँक आहे. बँकेच्या ठेवीदारांनी सुमारे रुपये १८० कोटी रुपयांच्या ठेवी काढल्यामुळे बँकेचा क्रेडीट डिपॉझिट रेशो (सीडी रेशो) वाढला होता. हा सी डी रेशो कमी करण्यासाठी बँकेने कर्ज वितरण मर्यादित प्रमाणात सुरु ठेवले आहे. ठेवी वाढविण्यासाठी विशेष ठेव योजना कार्यान्वित केली आहे. बँकेच्या कर्जाचे व्याजदर ९ व १४ टक्क्यांवरून ७ टक्के इतके कमी करण्याचा ठराव केला.

या ठरावामुळे बँकेचे आर्थिक नुकसान होणार असल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने ५ सप्टेंबर २०२३ रोजीच्या पत्रान्वये योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश बँकेस दिले आहेत. त्यानुसार बँकेने हा ठराव मागे घेतल्याचे 15 सप्टेंबर 2023 रोजीच्या पत्रान्वये भारतीय रिझर्व्ह बँकेस कळविले आहे. संचालक मंडळाच्या चुकीच्या निर्णयामुळे बँकेच्या व्यवसायावर अनिष्ट परिणाम होत असल्याने बँकेचे कामकाज सहकार कायदा व बँकिंग नियमन अधिनियम मधील तरतुदीनुसार होत आहे किंवा नाही याबाबतचा आढावा घेण्याचे निर्देश सहकार आयुक्तांनी २५ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या पत्रान्वये विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई यांना दिले आहेत. त्यानुसार विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई यांच्या स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी सदस्य सर्वश्री जयंत पाटील, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला होता.

००००

प्रवीण भुरके/ससं/

————————————————————————————-

दुष्काळ निवारणाच्या अंमलबजावणीसंदर्भात कार्यवाही सुरू- मंत्री अनिल पाटील

नागपूर, दि 11 : केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यानुसार, १०२१ महसुली मंडळात सवलती लागू करण्यात येणार आहेत. दुष्काळाच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले असून यासंबंधी कार्यवाही सुरू असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील विधानपरिषदेत सांगितले.

विधानपरिषद सदस्य सतेज पाटील यांनी राज्यात दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत  प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री श्री. पाटील बोलत होते. या प्रश्नाच्या वेळी  विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे, जयंत पाटील, राजेश राठोड, अमोल मिटकरी यांनी सहभाग घेतला.

मंत्री श्री पाटील म्हणाले की, राज्यात २४ तालुक्यांमध्ये गंभीर व १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याबाबत शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असून सर्वतोपरी मदत करणार आहे.

१० नोव्हेंबर, २०२३ शासन निर्णय अन्वये ज्या महसुली मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर, २०२३ या कालावधीत सरासरी पर्जन्यमानाच्या ७५ टक्के पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मि.मि. पेक्षा कमी झाले आहे, अशा १०२१ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित केली आहे. दुष्काळ जाहीर केलेल्या ४० तालुक्यांत व १०२१ महसुली मंडळात जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्याच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे आदी सवलती देण्यात येणार आहेत.  दुष्काळग्रस्त भागातील एखादे मंडळ सुटले असेल, तर त्यांचा समावेश यामध्ये करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यांची अंमलबजावणी टप्याटप्याने करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. याबाबत दुष्काळाच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

0000

प्रवीण भुरके/ससं/


पापलेट माशांचे जतन व संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील– वने व मत्सव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूर, दि 11 : पापलेट मासा हा वैशिष्ट्यपूर्ण निवडक प्रजातीचा असल्याने शाश्वतता, संवर्धन आणि वाढीसाठी त्याला राज्य शासनाने “राज्य मासा” म्हणून घोषित केला आहे. जेणेकरून या माध्यमातून पापलेटचे जतन व संवर्धन, सागरी पर्यावरण, जीवसाखळी आणि मच्छिमारांची आर्थिक उपजिविका टिकवून ठेवता येईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही याला प्रोत्साहन दिले आहे. मासेमारी हा रोजगार देणारा व्यवसाय असून पर्ससिन, एलईडी पद्धतीने मासेमारीबाबत कडक कारवाई करण्यात येत असल्याचे वने, सांस्कतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य रमेश पाटील यांनी पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथील पापलेट माशाला विशिष्ट मानांकन देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मच्छिमारांना पारंपरिक पध्दतीने मासेमारी करताना आवश्यक असलेल्या मासेमारी साधनांच्या खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना शासनाकडून राबविण्यात येत असून ही योजना राबविण्यासाठी मासेमारीचे जतन, संवर्धनासाठी शासन प्रयत्नशील असून मासेमारी करण्यावर कोणतीही बंदी घालण्यात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पापलेट जातीच्या लहान माश्यांच्या मासेमारीला प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र  २ नोव्हेंबर २०२३ अन्वये महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन १९८१ अंतर्गत पापलेट माशाला वाणिज्यिकदृष्ट्या महत्वाच्या प्रजातीमध्ये समावेश करून १३५ टी. एल. इतके परिपक्वतेचे किमान आकारमान निश्चित करून त्यापेक्षा कमी आकाराचे पापलेट मासे पकडल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन १९८१ व सुधारित कायदा २०२१ अन्वये नियंत्रण ठेवण्यासाठी शास्तीचे प्रयोजन ठेवले आहे.

सातपाटी येथील सिल्वर पापलेट माशाचे महत्व अधोरेखित होण्यासाठी राज्य माशाचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी भौगोलिक संकेत व्हावे,  या कारणाने या माशाची निर्यात करताना मदत होईल. डिझेल तेलावरील विक्रीवरची प्रतिपूर्ती 70 कोटींवरून 161 कोटी रुपये वाढवली आहे, असेही त्यांनी सांगितले.

मासेमारी धोरण निर्मितीसाठी माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून यामध्ये विधानसभा, विधानपरिषदेचे सदस्य आहेत. या समितीचा अहवाल आल्यानंतर मसुदा अंतिम केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

या प्रश्नाच्या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य विक्रम काळे, जयंत पाटील, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.

०००००

प्रवीण भुरके/ससं/

 

ताज्या बातम्या

विधानसभा लक्षवेधी

0
राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच 'मेगा भरती' - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. ७ : राज्य शासनाने सर्व विभागांना १५० दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे. या...

विधानसभा प्रश्नोत्तरे

0
प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेतून १० लाखांहून अधिक लाभार्थ्यांना धान्याचा लाभ – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ मुंबई, दि. ७ : राज्यात प्राधान्य...

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कामांमध्ये अनियमितता प्रकरणी चौकशीनंतर योग्य ती कारवाई - ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे मुंबई, दि. ७ : जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा आणि...

पंढरपूरची वारी जगातील अद्भुत परंपरा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
मुंबई, दि.७ :  राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आषाढी एकादशी निमित्त चेंबूर येथील श्री शृंगेरी शंकर मठ शारदा मंदिराला भेट देऊन मंदिरातर्फे रविवारी (दि. 6...

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...