‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ महिलांचा सन्मान वाढविणारी योजना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
62

यवतमाळ येथे वचनपूर्ती मेळाव्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

यवतमाळ, दि. 24 : गेल्या दोन महिन्यात महिलांसाठी विविध निर्णय घेतले. महिलांची समाजात, कुटुंबात भागिदारीसह त्यांचा ‘सन्मान’ वाढविण्यासाठी आपण ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी आतापर्यंत एक कोटी 40 लाख महिलांनी नोंदणी केली. त्यापैकी एक कोटी 7 लाख बहिणींच्या खात्यात रक्कम देखील जमा केली आहे. राज्यातील शेवटच्या बहिणीचा अर्ज सादर होईपर्यंत नोंदणी सुरुच राहील, असे यवतमाळ येथे लाडक्या बहिणींशी संवाद साधतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या प्रचार-प्रसारासाठी येथे आयोजित वचनपूर्ती मेळाव्यात मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. जिल्हाभरातून 50 हजारावर लाडक्या बहिणी मेळाव्यास उपस्थित होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे कार्यक्रमस्थळी आगमण झाल्यानंतर लाडक्या बहिणींनी त्यांना राखी बांधून वचनपूर्तीनिमित्त त्यांचे आभार मानले.

या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री संजय राठोड, आ.भावना गवळी, आ.किरण सरनाईक, आ.मदन येरावार, आ.प्रा.डॅा.अशोक उईके, आ.डॅा.संदीप धुर्वे, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.नामदेव ससाणे, आ.इंद्रनिल नाईक, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की आदी उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांचा महासागर यवतमाळ येथे पाहिला होता. आज देखील स्त्रीयांची विराट शक्ती दिसून येत आहे. या शक्तीला वंदन करण्यासाठी यवतमाळ येथे आलो आहे. ज्या बहिणींची अद्यापही नोंदणी झाली नाही त्यांची नोंदणी करून त्यांना एकाचवेळी तीन महिन्यांची रक्कम देऊ. प्रत्येक पात्र महिलेची नोंदणी करण्याचे आपले लक्ष्य आहे. योजना सुरळीत सुरु राहण्यासाठी वर्षभरासाठीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुलींना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी शंभर टक्के मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला. गृहिणींचा आर्थिक भार कमी करण्यासाठी वर्षातून त्यांना 3 सिलिंडर मोफत देण्यात येत असल्याचे श्री.शिंदे यावेळी म्हणाले.

राज्य सरकारने गेल्या काही दिवसात विविध योजना महिलांसाठी आणल्या. राज्यातील महिलांना या योजनांच्या माध्यमातून आर्थिक सक्षम करण्याचे आमचे धोरण आहे. या माध्यमातून राज्यातील प्रत्येक बहिणीला लखपती होतांना पाहण्याचे स्वप्न आहे. लाडक्या बहिणींसोबतच लाडक्या भावासाठी देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आम्ही आणली. या योजनेतून भावांना महिन्याला 6 ते 10 हजारांपर्यंत विद्यावेतन दिले जात आहे. राज्यातील लाडक्या शेतकऱ्यांसाठी देखील मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आपण सुरु केली. 7.5 एचपी पर्यंत वीज वापर असलेल्या सर्व शेतकऱ्यांना यापुढे वीज बिल भरण्याची गरज नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण देण्यासाठी केवळ एक रुपया भरून पिकविमा योजनेत सहभागाची सोय उपलब्ध करून देण्यात आली. विमाधारक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्यांना मोबदला देणे बंधणकारक आहे. ज्या कंपन्या मोबदला देण्यास टाळाटाळ करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले.

राज्य शासनाकडून महिला शक्तीचा जागर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील सर्वसामान्य महिलांच्या कल्याणासाठी राज्य शासनाने गेल्या काळात विविध कल्याणकारी योजना आणल्या. या माध्यमातून शासन सातत्याने महिला शक्तीचा जागर करत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांना सक्षम करणारी योजना आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी लेक लाडकी योजना सुरु करण्यात आली. या योजनेतून मुलीला तिच्या 18 व्या वर्षापर्यंत 1 लाख रुपये मिळणार आहे. महिलांना बसमध्ये 50 टक्के सवलतीचा प्रवास आपण सुरु केला. बचतगटांचा फिरता निधी वाढविला. 8 हजार 500 कोटी रुपये बचतगटांना दिले. काही दिवसांपूर्वी बदलापुर येथे अप्रिय घटना घडली. अशा घटना होऊ नये यासाठी गैरवर्तनाबाबत प्रत्येक शाळेत मुलींची विचारपूस केली जात आहे.

शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या दिवसात शेतकऱ्यांना मोफत आणि दिवसाला 12 तास वीज मिळेल, यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागणार नाही. गेल्यावर्षी कापुस, सोयाबिनचे भाव पडले. यामुळे नुकसान सोसावे लागलेल्या शेतकऱ्यांना आपण आर्थिक मदत देतो आहे. शेतमालाच्या भावात कमी येणार नाही, यासाठी प्रयत्न करीत आहोत. वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा प्रकल्प विदर्भासाठी वरदान ठरणार आहे. या प्रकल्पामुळे यवतमाळ जिल्ह्यातील 50 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेमुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत महिला खूश आहेत. योजनेच्या निकषात बसणारी एकही बहीण लाभापासून वंचित राहणार नाही. ही रक्कम महिलांच्या हक्काची, अधिकाराची रक्कम आहे. या योजनेमुळे शहरी आणि ग्रामीण भागाला गती मिळेल. राज्यातील 52 हजार कुटुंबाना वर्षाला 3 सिलिंडर आपण मोफत देतोय. शेतकऱ्यांना मोफत वीज, मुलींना मोफत शिक्षण यासारख्या अनेक योजना राज्य शासनाच्यावतीने सुरु करण्यात आल्या. मुलींशी होणारे गैरवर्तन रोखण्यासाठी शक्ती कायदा आपण केला. राष्ट्रपतींची मंजुरी झाल्यानंतर हा कायदा अंमलात येईल. असे गैरवर्तन करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची देखील भावना असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले.

सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम सुरु – पालकमंत्री संजय राठोड

शेतकरी, महिला, गरीब, कामगार, युवक यांना केंद्रबिंदू मानून राज्य शासन काम करत आहे. सर्वसामान्यांच्या गरजांचा विचार करून त्यांच्यासाठी त्याप्रमाणे योजना राबविल्या जात आहेत. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतून 1 हजार 500 रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला. यवतमाळ जिल्ह्यात 4 लाख 60 हजार महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. राज्य शासनाने गेल्या काही दिवसात अनेक चांगल्या योजना आणल्याचे पालकमंत्री श्री. राठोड यांनी सांगितले. यवतमाळ येथे आज झालेल्या मेळाव्याप्रसंगी पाऊस असतानाही महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 50 हजारांपेक्षा अधिक महिलांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली.

लाडकी बहीण व भावाला लाभाचे वितरण

यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे व उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस आणि श्री.पवार लाडक्या यांच्या हस्ते बहीण व भावाला लाभाचे वितरण केले. लाडकी बहीण योजनेंतर्गत श्रुती विलास भगत, नंदा सुतारकर, बेबी माणिक चव्हाण, नलिनी राम राठोड, चंदा सचिन शेंडे, शुभांगी शिंदे, प्रतिभा कोरडे, सुमन रमेश गेजीक, जया हरीदास विरदंडे, इंदिरा लक्ष्मण मांगरे, शुभांगी रविंद्र ढोरे, टिंकल आकाश उरगुंडे, संगिता शेषराव राठोड, रेश्मा शेख जावेद, नाझीया अमजतखा पठाण यांना लाभाचे धनादेश दिले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या शितल घाडगे व वैष्णवी पैदपवार यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here