मंगळवार, जुलै 15, 2025
Home Blog Page 885

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत निबे डिफेन्स एअरोस्पेसच्या नव्या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन

पुणे दि.१९: केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत निबे डिफेन्स एरोस्पेसच्या चाकण येथील नव्या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाला भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, गणेश निबे,  पोलीस उप अधीक्षक शिवाजी पवार आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य आणि देश घडविला. त्यांनी देशाचे संरक्षण कसे करावे हे कृतीतून दाखवून दिले. त्यांच्या जयंतीदिनी संरक्षण क्षेत्रातील निर्मितीचे नवे दालन साकार होत असल्याचा आनंद आहे. पुणे जिल्हा शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान पुणे येथे ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’चे आयोजन  करण्यात आले आहे. या भूमीतून भारतीय संरक्षण दलाला शक्तिशाली आणि आत्मनिर्भर  करण्यासाठी  महाराष्ट्र अग्रेसर राहील असा संकल्प करुया, असे आवाहन त्यांनी केले.

एमएसएमई उद्योगांचे संरक्षणविषयक सामग्री उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान- संरक्षण राज्यमंत्री अजय भट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे देशातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित सामग्रीचे उत्पादन करणाऱ्या एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये वाढ झाली आहे, असे प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी यावेळी केले.

ते म्हणाले, संरक्षण क्षेत्रातील सामग्री उत्पादनाच्या बाबतीत ‘आत्मनिर्भरता’ मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. नव्या संरक्षण  सार्वजनिक उपक्रमांमुळे या क्षेत्रातील स्पर्धा वाढली असून दर्जेदार सामग्रीच्या खरेदीसाठी ते उपयुक्त ठरते आहे. पूर्वी आपण इतर देशांकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा खरेदी करत होतो मात्र आता, विविध स्वदेशी प्रकल्पांच्या विकासामुळे एचएएल, डीआरडीओ यांसारख्या संस्थांना जगभरात महत्त्व प्राप्त झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक योगदानाचे स्मरण करून श्री.भट यांनी महाराजांना अभिवादन केले.

प्रत्येक गरजेबाबत आत्मनिर्भर होण्याच्या नौदल कटिबद्ध असल्याचे सांगून ॲडमिरल आर. हरी कुमार म्हणाले, भारतीय नौदल स्वावलंबी होण्याच्यादृष्टीने सर्व प्रकारच्या कार्यांमध्ये प्रगती करत आहे. वर्ष २०४७ पर्यंत नौदलाने आत्मनिर्भर होण्याचे उद्दिष्ट साध्य केलेले असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी  उद्योगांनी विशेषतः एमएसएमई उद्योगांनी पुढे  यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

श्री.निबे यांनी प्रास्ताविकात नव्या प्रकल्पाविषयी माहिती दिली. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक वेगाने प्रगती करणारे राज्य असून शासनाच्या सहकार्याने डिफेन्स एक्स्पोचे आयोजन करण्यात येत आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यात निबे डिफेन्स प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी आनंददायी वातावरणात परीक्षा द्यावी – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन

मुंबई, दि. १९ – बुधवार दि. २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षांसाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. लिखाणासाठी वेळ कमी पडू नये, यासाठी शेवटची १० मिनिटे  वाढवून दिली जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी आनंददायी तसेच तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या इयत्ता १२ वीच्या लेखी परीक्षांना बुधवार दि. २१ फेब्रुवारी पासून सुरूवात होत आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमध्ये इयत्ता १२ वी साठी एकूण तीन हजार ३२० केंद्रांवर १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थी परीक्षा देणार असून परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कमी गुण मिळालेल्या अथवा यशस्वी न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी जुलै महिन्यात पुरवणी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.

परीक्षा सुरळीत होण्यासाठी उपाययोजना

विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करता यावी यासाठी मंडळामार्फत सप्टेंबर महिन्यात संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. तर, परीक्षेचे अर्ज ऑनलाईन स्वीकारण्यात येऊन प्रवेशपत्रदेखील ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आले. परीक्षा निकोप व्हाव्यात, विद्यार्थ्यांचे परीक्षांबाबत दूरध्वनीद्वारे शंका समाधान व्हावे यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विभागीय मंडळ स्तरावर नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक सोयीसुविधा देण्यात येत आहेत.

परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठीदेखील उपाययोजना केल्या जात आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाची मदत घेतली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी तणावमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन मंत्री श्री.केसरकर यांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई, दि. 19 : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

सकाळपासूनच विधानभवनाचा परिसर तुतारी-सनई-चौघड्याच्या निनादाने दुमदुमून गेला होता. पारंपरिक वेषातील तुतारीवादक हे या शिवजयंती सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले.

यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील, विधानमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव डॉ.विलास आठवले,  सहसचिव श्रीमती मेघना तळेकर, शिवदर्शन साठ्ये यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.19: मेगापॉलिस मेटाव्हर्स प्रकल्पाच्या मदतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यात येत आहे. मुंबईत सुरु असलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प आणि डिजिटल प्रकल्पाद्वारे सन 2025 पर्यंत मुंबईचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि मुंबई मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या सहकार्यातून स्वप्नातील मुंबई साकार करणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे पर्यटन विभाग, सिडको, मुंबई महापालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई मेट्रो आणि मुंबई मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या माध्यमातून आयोजित मुंबई टेक विक कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, हंगामा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज रॉय, गोकीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गोंदाल, ड्रीम इलेव्हनचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष जैन, बुक माय शोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष हेमरजानी आणि हाबटेकचे अक्रीत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी लोकमतचे संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची मुंबईच्या विकासाबाबत मुलाखत घेतली. श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबईमध्ये कोस्टल रोड, मेट्रोसह पायाभूत सुविधांचे विविध प्रकल्प सुरु आहेत. मुंबई बदलत आहे, याचा नागरिकांना अनुभव येत आहे. शहरातील वाहतूक आणि प्रदूषण समस्याही दूर करण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. कोस्टल रोडचे काम पूर्णत्वास आले असून पुढील महिन्यात नागरिकांच्या सेवेसाठी सुरू होईल. मुंबईला बदलण्यासाठी मेट्रो तीन प्रकल्प आणि सर्वात लांब भुयारी मेट्रोही प्रगतीपथावर आहे. प्रत्येक मुंबईकराला भविष्यातील मुंबई पाहून आनंद वाटेल. ऑक्टोबरमध्ये नवी मुंबई विमानतळाच्या माध्यमातून चार प्रकल्प लवकरच सुरु होतील. 2014 मध्ये मुख्यमंत्री  झाल्यानंतर उद्योगपतींची बैठक घेतली होती. त्यामुळे अनेक उद्योग मुंबईत आले आता मात्र मुंबईत उद्योगांसाठी जागा अपुरी पडत आहे. मुंबईत अपुऱ्या जागेमुळे नवीन महामार्ग बनवू शकत नसल्याने मेट्रोचे जाळे तयार करीत आहोत.

अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा-शेवा अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई जोडण्याचे काम झाले असून कमी वेळात वेगाने पोहोचता येत आहे. नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढत असून तिसरी मुंबई तयार होत आहे. कोस्टल रोडसुद्धा अटल सेतूला जोडला गेल्याने नवी मुंबईचे अंतर कमी झाले आहे. अटल सेतू, कोस्टल रोड, कॉरिडॉर, भुयारी मेट्रो, टनेल यामुळे मुंबईतून एका तासात कुठेही जाता येणार असल्याचा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. सध्या 11 किमी भुयारी मेट्रो आहे, ती पुढील तीन वर्षात 375 किमी करण्याचा प्रयत्न आहे. पुढच्या पाच वर्षात मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यासाठी विकास कामे सुरू आहेत.

डेटा सेंटर, तंत्रज्ञानामुळे महाराष्ट्रात युवकांना रोजगार

स्टार्ट अप आणि इको सिस्टीममुळे युवक बंगळुरू, हैदराबादकडे जात होते. आता महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर येथे स्टार्टअप कार्यान्वित केले आहे. 2016 ला देशाला आकर्षित करेल अशी स्टार्टअप पॉलिसी राज्याने तयार केली. शिवाय अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेटा सेंटर तयार करीत आहे. अॅमेझॉन, गुगल या कंपन्यांशी गुंतवणुकीबाबत चर्चा झाली आहे. गुगलशी पुण्यात सामंजस्य करार झाला आहे. पुणे वेगाने तंत्रज्ञान शहर बनत असून नागपूर, पुणे, मुंबईत तंत्रज्ञान कंपन्या गुंतवणूक करण्यास पुढे आल्या आहेत. यामुळे महाराष्ट्राचा युवक इतर राज्यात नोकरीला जाणार नाही, असा विश्वासही श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.   

2028 मध्ये एक ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था

राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढत असल्याने येत्या 2028-29 मध्ये देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी राज्याचा एक ट्रिलियन डॉलरचा हिस्सा असणार आहे. यासाठी नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘मित्रा’ द्वारे काम सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यात गुंतवणूक येण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

राज्य शासनात तंत्रज्ञाचा वापर

चांगल्या आणि पारदर्शी सरकारसाठी तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञाचा आणि एआयचा वापर शासनामध्ये होत आहे. सामान्य नागरिकांना निधीचे वाटप, योजनेचा लाभ, विद्यार्थी शिष्यवृत्ती डीबीटीमार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहे. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला असून 300 शासकीय योजना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणल्याची माहितीही त्यांनी दिली.

कौस्तुभ धवसे आणि नीरज रॉय यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या पायाभूत सुविधांचे विविध प्रकल्प लॉन्च करून प्रकल्पांचे क्यू आर कोडही स्कॅन केले.

कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा

मुंबई, दि. १९ : काश्मीरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम झाला. सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमानात लष्कराच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय लष्कराच्या जवानांचे अभिनंदन करीत त्यांचे कौतुक केले. हिमवर्षावातदेखील काश्मीर खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष दुमदुमला.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. आज याठिकाणी मराठा बटालियनच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी सलामी दिली. कुपवाडा येथे उणे तापमानात हा अनोखा कार्यक्रम झाला. सभोवताली सर्वत्र बर्फ अशा कठीण परिस्थितीतही आपल्या जवानांनी महाराजांना जयंती दिनी केलेले अभिवादन पाहून अभिमान वाटल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल, त्यांचे मनोबल उंचावत राहील, असे मुख्यमंत्री पुतळा अनावरण समारंभात म्हणाले होते. त्याची प्रचिती आज आली.

आम्ही पुणेकर संस्था, ४१ राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन यांच्या माध्यमातून कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. त्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्याला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आदी मान्यवर उपस्थित होते.

अश्वारुढ पुतळ्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पाकिस्तानच्या दिशेने बघत आहेत. त्यांच्या हातात तलवार आहे. जवानांनी सुमारे १८०० ट्रक माती भरून पुतळ्यासाठी भक्कम पाया केला होता.

शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश असावा – राज्यपाल रमेश बैस

ठाणे, दि.19 (जिमाका):- विश्वशांतीसाठी आंतरिक शांती, राष्ट्रांमध्ये परस्पर शांती तसेच पर्यावरण शांती असणे आवश्यक आहे, असे सांगून चारित्र्यवान पिढी निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश करणे नितांत आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.  स्नातकांनी शिक्षण केवळ नोकरी अथवा चरितार्थासाठी न घेता ते चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व घडण्यासाठी घेतले तरच भारत विश्वगुरू होईल असे राज्यपालांनी सांगितले.

जैन विश्वभारती या अभिमत विद्यापीठाचा चौदावा दीक्षान्त समारोह राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि.19) वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्र येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

दीक्षान्त समारोहाला जैन तेरापंथ संप्रदायाचे प्रमुख आचार्य महाश्रमण, जैन विश्वभारती विद्यापीठाचे कुलपती तथा केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) अर्जुन राम मेघवाल, विद्यापीठाचे कुलगुरू बच्छराज दुगड, जैन विश्वभारतीचे अध्यक्ष अमरचंद लुंकड, जैन साधू-साध्वी तसेच स्नातक उपस्थित होते.

जैन धर्माने नेहमीच शांती, अहिंसा व सामोपचाराचा पुरस्कार केला आहे, असे सांगून, जैन धर्माची शिकवण आजच्या जगात पूर्वीपेक्षा अधिक प्रासंगिक आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल होत असून युवकांनी नाविन्यतेच्या माध्यमातून नव्या वाटा शोधाव्या व आपल्या सामर्थ्याचे योग्य नियोजन करावे असे राज्यपालांनी सांगितले.

राज्यपालांनी यावेळी जैन तेरापंथ संप्रदायाचे प्रमुख आचार्य तुलसी, आचार्य महाप्रज्ञ तसेच विद्यमानआचार्य महाश्रमण यांच्या मानवसेवा कार्याचा गौरव केला.

संस्कार व मूल्य शिक्षणाशिवाय मनुष्य निर्माण कार्य होणार नाही असे सांगून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये मूल्यशिक्षणाचा अंतर्भाव करण्यात आला असल्याचे केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितले. स्नातकांनी राष्ट्रहिताला प्रथम प्राधान्य द्यावे असे मेघवाल यांनी यावेळी सांगितले. जैन विश्वभारती विद्यापीठाने राष्ट्रीय पांडुलिपी मिशन सफल करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

आचार्य महाश्रमण यांचा युवकांना मूलमंत्र

मनुष्य जीवनात ज्ञानाचे फार महत्त्व आहे व ज्ञानाइतकी  दुसरी पवित्र गोष्ट नाही.  यासाठी स्नातकांनी ज्ञानासाठी समर्पित व्हावे असे आचार्य महाश्रमण यांनी यावेळी आपल्या संबोधनात सांगितले.

ज्ञानप्राप्तीमध्ये अहंकार, क्रोध, प्रमाद, रोग व आळस हे मुख्य अडथळे आहेत असे सांगून विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, अहिंसा, नीतिमत्ता, संयम आदी गुणांचा विकास व्हावा, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिओ फिनान्शियल सर्व्हिसेसचे अध्यक्ष कुंदापूर वामन (के. व्ही.) कामत तसेच वेद व जैन आगम शास्त्राचे अभ्यासक प्रा.दयानंद भार्गव यांना मानद डिलीट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी विविध विद्याशाखांमधील पीएच. डी. स्नातकांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.

नवनिर्मित जिल्ह्यांमध्ये नंदुरबारचा झपाट्याने विकास – डॉ. विजयकुमार गावित

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न

नंदुरबार, दि. १९ ( जिमाका वृत्त) – महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळी उकाई धरणाचे बॅकवॉटर आपल्या राज्याच्या वाट्याला आले. ते उचलण्यासाठी कुठलीही शाश्वत अशी यंत्रणा आजपर्यंत नव्हती. परंतु हे बॅकवॉटर उचलण्यासाठी १६ लिफ्टच्या निर्मितीचे काम सुरू झाले असून त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भाग मोठ्या प्रमाणावर सुजलाम्-सुफलाम् होण्यास मदत होणार आहे. तसेच २५ वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या नवीन जिल्ह्यांमध्ये नंदुरबार जिल्ह्याचा विकास झपाट्याने होत असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले..

येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता (नाशिक) प्रशांत औटी, कार्यकारी अभियंता वैशाली पाटील, उपविभागीय अधिकारी जेरा वळवी, गणपत गावित, चेतन पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, रस्ते,वीज आणि जलसिंचन या त्रिसूत्रीवर येणाऱ्या काळात जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन असून उकाई डॅमच्या बॅकवॉटरमुळे जिल्ह्यातील तळोदा, अक्कलकुवा, नवापूर आणि नंदुरबार हे तालुके सिंचनाखाली येत सुजलाम्-सुफलाम होणार आहेत. जिल्हा निर्माण झाला त्यावेळी जिल्ह्याचा निम्मा कारभार धुळे जिल्ह्यातील त्या-त्या विभागांच्या कार्यालयांमधून सुरू होता. आज मला सांगताना अतिशय आनंद होतोय की, जिल्ह्यात प्रत्येक विभागाचे स्वतंत्र कार्यालय असून काही कार्यालये अतिशय देखण्या आणि टुमदार इमारतींमध्ये जनसेवेचे काम करत आहेत. आज ज्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीचे कार्यालय उभे आहे, तेथे डोंगरदऱ्यांनी व्यापलेला निसर्गरम्य परिसर असून येणाऱ्या काळात या परिसरात स्टेडियम, वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय रूग्णालय, आदिवासी सांस्कृतिक भवन यासारख्या जिल्ह्याच्या विकासाला रूपेरी किनार देणाऱ्या इमारती उभ्या राहणार आहेत. एकप्रकारे नवीन नंदुरबारच या परिसरात साकारणार आहे. देखण्या वास्तूत सचोटीने आणि उर्जेने काम करण्याची प्रेरणा प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात निर्माण होत असते. जिल्हा निर्मितीपासून तर आजपर्यंत प्रत्येक त्रुटींवर मात करत पुढे वाटचाल करताना असे लक्षात आले की, जिल्ह्यात शासन-प्रशासन स्तरावर अधिक कार्यक्षमतेने काम करायचे असेल तर बहुविध कनेक्टिविटी ची गरज आहे. तसेच शाश्वत स्वरूपाच्या इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीची गरज आहे. आपण मंत्री झाल्यानंतर ज्या विभागाने ज्या गोष्टींची मागणी केली ती तात्काळ देण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याचीच फलश्रुती म्हणजे ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीचे भूमिपूजन एक वर्षापूर्वी केले होते, त्याचे उद्घाटन व लोकार्पण आज आपण स्वत: करत असल्याचे सांगताना त्यांनी आज आदिवासी विकास विभागाकडे मागणी केल्यास ८ दिवसात निधी दिला जाईल याबाबत आश्वस्त केले. ते म्हणाले, राज्यात १५२ शासकीय आश्रमशाळा स्वत:च्या इमारती तयार होताहेत त्यातील ६३ एकट्या नंदुरबार जिल्ह्याच्या आहेत. प्रत्येक शासकीय इमारतीसोबत कर्मचारी, अधिकारी यांची शासकीय निवासस्थाने करण्यावरही आपला भर आहे.

नव्या संकल्पनांचे स्वागत आणि गतिमान कामाबद्दल अभिनंदन डॉ. सुप्रिया गावित

सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या कार्यालयीन इमारत बांधकामात ज्या नवीन संकल्पना अंगीकृत करून एक देखणी आणि आगळी-वेगळी वास्तू निर्माण केली त्याबद्दल त्यांच्या नव्या संकल्पनांचे स्वागत असून, भूमिपूजनानंतर अवघ्या एका वर्षात इमारतीचे उद्घाटन करून एक गतिमान काम केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभाग अभिनंदनास पात्र आहे, असे  प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी यावेळी केले.

२५ फेब्रुवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करणार मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन डॉ. हिना गावित

नंदुरबार एका नव्या रूपात विकसित होत असून गेल्या दहा वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश मोठ्या प्रगतीचे शिखरं पार करतोय. त्यातील नंदुरबार जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्राला एका शिखरावर घेऊन जाणारा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असून, या वैद्यकीय महाविद्यालयाचा कोनशिला व भूमिपूजन सोहळा २५ फेब्रुवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होत आहे. ज्याप्रमाणे आज या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीचे काम गतीने आणि गुणवत्तेने झाले, त्याच गतीने प्रत्येक शासकीय इमारतीचे व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करताना तसा आदर्श घालून देण्याचे आवाहनही यावेळी खासदार डॉ. हिना गावित यांनी केले. तसेच लोकप्रतिनिधींचे जनतेप्रति असलेले स्वप्न साकार करण्याचे काम प्रशासकीय अधिकारी करत असल्याचेही खासदार डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

राज्यपालांकडून मुंबई महानगरपालिकेच्या संगीत विभागाला २५ हजार रुपयांचे बक्षीस

मुंबई, दि. 19 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे क्रीडा भवन येथे शिवजयंतीनिमित्त एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महानगरपालिकेच्या संगीत विभागातर्फे  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील पोवाडा तसेच देशभक्तीपर गीतांचे  सादरीकरण करण्यात आले. यावेळी राज्यपालांनी पालिकेच्या संगीत विभागाला 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

या कार्यक्रमाला पालिकेचे प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहरे) डॉ. अश्विनी जोशी, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष किशन जाधव तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

BMC celebrates Shiv Jayanti 

Maharashtra Governor Ramesh Bais attended the Shiv Jayanti celebrations organised by the Brihan Mumbai Mahanagarpalika at Krida Bhavan near Shivaji Park Mumbai. A cultural programme comprising patriotic songs on the life and work of Chhatrapati Shivaji Maharaj was presented by the Music Department of BMC.       The Governor announced a prize of Rs. 25000 to the Music Department of BMC on the occasion.

Administrator Dr I S Chahal, Additional municipal commissioner Dr Ashwini Joshi were among those present.

छत्रपती शिवाजी महाराज यांना मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. 19: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर व राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर, कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, विजय शिंदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

दरम्यान मंत्रालयातील माँ जिजाऊ यांच्या प्रतिमेस मंत्री श्री केसरकर यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.        

शिवजयंतीनिमित्त राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

मुंबई, दि. 19: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अश्वारुढ पुतळ्याला आज दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर, राज्यपाल रमेश बैस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इक्बाल सिंह चहल, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे किशन जाधव आदी उपस्थित होते.

Governor Bais garlands statue of Chhatrapati Shivaji Maharaj on Shiv Jayanti

Maharashtra Governor Ramesh Bais offered floral tributes to the equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Shivaji Park Mumbai on the occasion of Shiv Jayanti.

Guardian Minister of Mumbai Deepak Kesarkar, administrator of BMC I S Chahal, Kishan Jadhav of Chhatrapati Shivaji Maharaj Smarak Samiti were among those present.

ताज्या बातम्या

विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानातून युवकांच्या जीवनाला सकारात्मक दिशा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. १४, (जिमाका): जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता राबवण्यात येत असलेल्या विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानातून शासकीय संस्थांच्या योजना, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, अधिछात्रवृत्ती अशा अनेक...

देशाचा समृद्धीसाठी विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता वाढवावी – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे

0
नांदेड, दि. १४ : जगात शिक्षणाला अत्यंत महत्त्व आहे, त्यामुळे आपल्या देशाचा सर्वांगिण विकास व  समृद्धीसाठी विद्यापीठे, शाळांनी विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता वाढविण्यावर विशेषत्वाने भर...

प्रकरणांचा तत्काळ निपटारा होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करा – विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल

0
अमरावती, दि. १४ : विभागीय लोकशाही दिनासाठी प्राप्त अर्जांवर विहित कालमर्यादेत कार्यवाही करुन निपटारा होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. विभागाला प्राप्त होणाऱ्या प्रकरणांच्याबाबत मुद्देनिहाय...

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची गुंज येथील नॅचरल शुगर युनिटला भेट

0
यवतमाळ, दि.१४ (जिमाका) : राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ बागडे यांनी महागांव तालुक्यातील गुंज येथील नॅचरल शुगर युनिटला भेट दिली. यावेळी उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक तयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

0
छत्रपती संभाजीनगर दि.१४ (विमाका): विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर  यांनी छत्रपती संभाजीनगर विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत...